ऐतिहासिक सातारा सहल (सज्जनगड, चाफळ श्रीराम मंदिर आणि अजिंक्यतारा)

Submitted by निमिष_सोनार on 16 March, 2023 - 05:09

नुकतीच मी फॅमिलीसहित ऐतिहासीक (गड, किल्ले) आणि धार्मिक सहल (मंदिरे) पार पाडली. मला आणि माझी सौ. मंजुषा दोघांना इतिहासाची आवड असल्याने आम्ही जमेल तसे ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देत असतो. तसेच पुण्यातील टेकड्यांवर भ्रमंती करतो. मुलांना पण आपल्या महान महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल माहीत व्हावा हा सुद्धा एक महत्त्वाचा उद्देश. त्याचे प्रवासवर्णन खाली देत आहे. एसटी आणि इतर सार्वजनिक वाहनांनी आम्ही पूर्ण प्रवास पार पाडला. हा प्रवास अगदी शंभर टक्के नियोजित नव्हता.

दिवस पाहिला (10 Feb 2023)

पुण्याहून सातारा शहराकडे:

प्रवास: सकाळी 8 ते पावणेनऊ. रिक्षाने स्वारगेट बस स्थानक.

पुण्यातील स्वारगेटवरून पावणे नऊ वाजता पुणे-विटा शिवशाही बस मिळाली. पुणे सातारा अंतर 113 किमी आहे. मार्गात कात्रज, शिरवळ, खंडाळा (हॉटेल स्टॉप), भुईंज ही गावे लागतात. आम्ही सकाळी साडे अकरा वाजता सातारा पोहोचलो.

माहिती: शहराचे नाव शहराभोवती असलेल्या सात किल्ल्या (सात-तारा) पासून आहे. एसटी स्टँड लगतच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आहे पण त्याचे फर्निचरचे काम सुरू असल्याने ते बंद होते. असे ऐकले की कोव्हिड दरम्यान त्याचे रूपांतर कोव्हिड सेंटर मध्ये केले होते. त्यानंतर पुन्हा ते सुरू व्हायचे आहे. संपूर्ण सातारा शहर हे पर्वतांवर आहे. शहरातील रस्ते म्हणजे एक तर चढाव किंवा उतार आहे.

तिथे आम्ही पोलीस मुख्यालय बिल्डिंग जवळ असलेल्या अवधूत लॉज येथे थांबलो. पोलीस मुख्यालय बिल्डिंगचे बांधकाम दगडी आणि इमारत भक्कम आहे. बिल्डिंगसमोर सोनेरी रंगात कबुतराचा एक मोठा पुतळा आहे, त्याखाली शांतीदूत असे लिहिलेले आहे. पोलिसांची परवानगी घेऊन तिथे आम्ही तिसऱ्या दिवशी फोटो काढले. दुपारी ऋतू हॉटेल येथे जेवण केले. थाळी मध्ये पनीर मसाला, पातळ रश्याची काजू करी आणि चपाती होते. इथे कुणीही पोळी शब्द वापरत नाही. चपाती म्हणायचे. जेवणाची एक वेगळीच सातारकडची चव होती.

सातारा शहराकडून सज्जनगडाकडे:

प्रवास: सज्जनगड इतके मोठे पर्यटन स्थळ आणि ऐतिहासिक धार्मिक महत्त्व असलेले ठिकाण असूनही तिथे जायला एसटी बसेस कमी आहेत. बसची वाट बघून थकल्यानंतर शेवटी दुपारी 3 वाजता आम्ही रिक्षाने सज्जनगड येथे साडे तीन वाजता पोहोचलो. सज्जन गडावर जाण्यासाठी एकूण 275 पायऱ्या आहेत. 75 पायऱ्या चढल्यानंतर नंतर दोन्ही बाजूला दोन उभट मंदिर लागतात आणि मग त्यानंतर पुन्हा 200 पायऱ्या आहेत. दोन मुख्य प्रवेशद्वारादरम्यान 50 पायऱ्या आहेत. चढण्याच्या मार्गात माठातील मसाला ताक तसेच लिंबू सरबतची दुकाने आहेत. चढतांना मार्गात विविध मारुती लागतात, माजगांव मारूती, उंब्रज मारुती, शिराळे मारुती इत्यादी.

माझा मोठा मुलगा आणि लहान मुलगी सहजपणे सर्व 275 पायऱ्या आमच्या आधीच चढून गेलेत. आम्हा दोघांनाही पायऱ्या चढायला फारसे कष्ट पडले नाहीत.

ससज्जनगडावर राहण्याची खाण्यापिण्याची सगळी सोय आहे. महाप्रसाद मिळतो.

माहिती: गडावर आम्ही रामदास स्वामी मंदिर (समाधी), त्यांनी बांधलेले श्रीराम मंदिर आणि मग शेवटी धाब्याचा मारुती बघितले. तिथून खाली विहंगम दृश्य दिसते: उरमुरी धरण, पर्वत रांगा आणि कमालीची शांतता!! एखादे ऐतिहासिक पुस्तक येथे बसून दिवसभर वाचण्यासाठी एक आदर्श ठिकाण!

सज्जनगडाचा इतिहास नेमका आणि थोडक्यात तिथे एका बोर्डवर लिहिलेला आहे.

सज्जनगड ते पुन्हा सातारा नटराज मंदिर:

प्रवास: साडे पाच ते साडे सहा एका तासात रिक्षाने सातारा शहरातील नटराज मंदिर येथे आलो.

माहिती: तेथे श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती कला मंदिर असून कुठला तरी सांस्कृतीक कार्यक्रम सुरू होता. येथे नटराज मंदिर, मूलनाथेश्र्वर महादेव मंदिर, नवग्रह मंदिर, राधा कृष्ण मंदिर अशी मंदिरे आहेत. मंदिर परिसर खूप मोठा आहे आणि मंदिर दाक्षिणात्य शैलीतील आहे आणि त्याला फिकट निळसर रंगाची झाक आहे पण रंग बऱ्याच ठिकाणी निघून गेला आहे.

रात्रीसाठी खाद्य भ्रमंती:

प्रवास: रिक्षेने नटराज मंदिर ते राजवाडा परिसर आलो. तिथे प्रसिध्द राजवाडा आहे पण सामान्य माणसासाठी तो आता बघायला मिळत नाही. तो उदयनराजे भोसले यांचा राजवाडा आहे.

तिथून सुपनेकर घरगुती हॉटेल येथे आलो. पुण्याच्या दुर्वांकुर हॉटेल सारखेच हे हॉटेल वाटले पण थाळीमध्ये मिळणारे पदार्थ तुलनेने कमी परंतु चवदार होते. तसेच किंमत पण तुलनेने कमी होती. संध्याकाळी साडेसात नंतर ते सुरू होते. त्या संध्याकाळी सुपनेकर मध्ये मट्ठा, आमटी, कोबीची भाजी, आंबट चुकांची भाजी, ठेचा, लोणचे, भात असा मेनू होता. अगदी घरगुती चव!

दिवस दुसरा (11 Feb 2023)

प्रवास: सकाळी साडे नऊ वाजता पुणे (पाटण मार्गे) चिपळूण या एसटी मध्ये बसलो. सवा दहा वाजता उंब्रज येथे पोहोचले. सातारा ते उंब्रज 34 km आहे. तिथून चालत चाफळ फाटा येथे आलो. तिथून सिक्स सिटर रिक्षा (काली पिली) 10: 50 am ला निघाली, चाफळ बस स्टॅण्डवर सव्वा अकरा वाजता पोहोचलो. उंब्रज ते चाफळ 11 km आहे. चाफळ पाटण तालुक्यात येते.

माहिती: श्रीराम मंदिर बस स्टँड लगतच आहे. सुरुवातीला समर्थ स्थापित दास मारुती आणि विर मारूती मंदिर आहे. इथे महाप्रसादची सोय नाही. मात्र कॅन्टीन आहे. तिथे नाश्त्याचे पदार्थ जसे मिसळ पाव, वडा सांबार वगैरे मिळतात. परंतु आधी सांगितल्यास चपाती आणि पिठले वगैरे बनवून देतात. बनवायला 20 मिनिटे वेळ लागतो. आम्ही मिसळ सोबत चपात्या खाल्ल्या. चपातीला चुलीचा छान जळका वास येत होता.

चाफळ मंदिर आणि परिसराबद्दल माहिती मंदिरावर लिहिलेली आहे.

खडीचा मारुती, आणि उत्तरमांड धरण:

12:45 pm वाजता एका ट्रॅक्सने टेकडीवरील खडीचा मारुती येथे गेलो. पाच मिनिटे अंतरावर आहे आणि नंतर उत्तरमांड धरण येथे गेलो. तिथून जवळच बोटिंग आहे. परंतु आम्ही बोटिंग केली नाही. तिथे अतिशय नीरव शांतता होती. पाण्याचा खळखळ आवाज सुद्धा ऐकायला येत होता. पाण्याजवळ थांबून दिवसभर शांततेत घालवण्यासाठी ती एक निसर्गरम्य आदर्श जागा आहे.

पुन्हा सातारा:

प्रवास: ट्रॅक्स वाल्याने उंब्रज ब्रीज पर्यंत सोडले, तिथून हात थांबवून 2 वाजता सातारा बस मिळाली.

अजिंक्यतारा किल्ल्याकडे:

प्रवास: संध्याकाळी 6 वाजता साताऱ्यातील योगविद्या धाम येथील योग शिक्षिका आणि प्रसिध्द लेखिका सौ. सविता करंजकर आणि त्यांचे जिल्हा परिषदेत नोकरीला असलेले आणि गायनाचा छंद असलेले मिस्टर श्री. सुनील करंजकर आणि मुलगा कृष्णा हे त्यांची गाडी घेऊन अवधूत हॉटेलला आम्हाला भेटायला आले. त्यांची मुलगी वैष्णवी करंजकर ही पुणे सकाळ पेपर मध्ये पत्रकार आहे. अगदी मनमिळाऊ आणि अगत्यशील कुटुंब. आधी आमची ऑनलाईन ओळख होती. सौ. सविता करंजकर आणि विविध शहरातील आम्ही काही जण "आरंभ" नावाचे ऑनलाईन मासिक चालवत होतो, ज्याचा मी संपादक होतो. त्यानिमित्त आम्ही चार वर्षे आँनलाईन एकत्र काम केले होते. परंतु आज आम्ही प्रथमच प्रत्यक्ष भेटलो. पण प्रथम भेटलो असे जाणवतच नव्हते. मग त्यांनी आम्हाला अजिंक्यतारा किल्ला दाखवला. गाडी किल्ल्याच्या मुख्य दरवाजापर्यंत त्यांनी नेली होती. तिथून वरपर्यंत जाण्यासाठी अंदाजे 100 पायऱ्या आहेत.

किल्ल्याची माहिती: प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर अजिंक्‍यतारा उभारलेला आहे. अजिंक्‍यताऱ्याची उंची साधारणत: 4400 फूट असून त्याचा दक्षिणोत्तर विस्तार 600 मीटर आहे.

कसे जायचे? बसने यायचे असल्यास सातारा ते राजवाडा अशी बससेवा दर 10 ते 15 मिनिटाला उपलब्ध आहे. "राजवाडा" या बस स्थानकापासून अदालत वाड्यापर्यंत चालत येण्यास 10 मिनिटे लागतात. अदालत वाड्याच्या बाजूने असलेल्ली वाट गडावर जाणाऱ्या गाडी रस्त्याला लागते. व त्या रस्त्याने १ कि.मी. चालत गेल्यावर माणूस गडाच्या दरवाज्यापाशी पोहचतो.

किल्ल्याचा थोडक्यात इतिहास: सातारचा किल्ला (अजिंक्‍यतारा) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्‍यतारा.

साताऱ्याचा किल्ला हा शिलाहार वंशातल्या दुसऱ्या भोजराजाने इ.स. 1190 मध्ये बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार होत असतांना 27 जुलै 1673 मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. सन 1700 नंतर तो महाराणी ताराबाई यांनी जिंकून घेतला आणि नंतर तो छत्रपती शाहू महाराजांकडे आला.

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराज यांची पत्नी आणि सरसेनापती हंबिरराव मोहिते यांची कन्या महाराणी ताराबाई यांनी गाजवलेल्या पराक्रमावर आधारित सोनी मराठी वर "स्वराज्य सौदामिनी तारा राणी" सिरीयल युट्युब आणि सोनी लिव या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे ती आम्ही सध्या बघत आहोत.

किल्ल्यावरची आमची भ्रमंती:

किल्ल्यावर चढतांना सातारा शहराच्या पार्श्वभूमीवर छान सूर्यास्त बघितला. नंतर अंधार झाला. पूर्ण किल्ला चालत चालत गेल्यास अंदाजे पाच ते सहा किलोमीटर अंतर होते. वरची मंगळाई देवी मंदिर पाहिले. खालचे मंगळाई देवी मंदिर बंद झाले होते.

सुस्थितीत असलेल्या एका मुख्य दरवाजाचे दोन्ही बुरूज अस्तित्वात आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. डावीकडे सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे प्रसारभारती केंद्राचे दोन टॉवर आहेत. पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाट दिसते व 'मंगळादेवी मंदिराकडे' असे तिथे लिहिलेले आढळते. या वाटेत ताराबाई यांचा निवास असलेला पण आता ढासळलेला राजवाडा आणि कोठार आहे. मंदिराकडे जाताना तीन तळी वाटेत लागतात. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मदिर लागते. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे. मंदिराच्या आवारात अनेक शिल्पे आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे.

मोठे अजिंक्यतारा नाव लिहिलेले आहे तो सगळ्यात वरचा भाग तिथे गेलो. तिथून रात्रीचे सातारा शहर बघितले. खूप विहंगम दृश्य दिसत होते. किल्ल्यावरून समोरच यवतेश्वराचे पठार, चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो. माहितगार करंजकर कुटुंब सोबत असल्याने कमी वेळेत जास्त परिसर बघता आला.

सकाळी आणि संध्याकाळी रोज मुख्य दरवाजा पर्यंत पायी चालत येऊन नंतर पूर्ण किल्ला चढून वर येऊन इथे नियमितपणे युवक व्यायाम करतात. साठी सत्त्तरी पार केलेले ज्येष्ठ नागरिक पण इथे नियमितपणे वर चढायला येतात.

रात्रीची खाद्य भ्रमंती:

रात्री 8 वाजता लेक व्ह्यू हॉटेलमध्ये आम्ही सर्वांनी जेवण केले. नंतर करंजे भागातील करंजकर कुटुंबाच्या युगंधर या बंगल्यात गेलो. तिथे गप्पा करून त्यांनी पुन्हा हॉटेलमध्ये रात्री सोडले. श्री व सौ करंजकर यांनी दोघांनीही आपापल्या व्यस्त वेळापत्रकातून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

दिवस तिसरा (12 Feb 2023):

सौ. सविता यांनी सुचवल्यानुसार सकाळी 9 ते 10 रिक्षाने 1.5 km दूर असलेले खिंडीतील गणपती, दत्त मंदिर आणि कुरणेश्र्वर महादेव मंदिर पाहिले. नंतर रिक्षाने पुन्हा सातारा शहरात परत येऊन जवाहर मुनोज चौक येथे उतरून श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पथ, खण आळी येथे गेलो. मग पंचमुखी गणेश मंदिर बघितले. तिथे देणगी दिली. लाटकर पेढेवाले यांचेकडे कंदी पेढे मिळाले. नंतर प्रसिद्ध चंद्र विलास हॉटेल मध्ये दुपारी 12 वाजता मेदू वडा, डोसा, पुरी भाजी, पाव भाजी खाल्ले. तेथे जेवण मिळत नाही. फक्त नाष्टा. येथे खवय्यांची खूप गर्दी असते. सातारा येथील हे प्रसिद्ध हॉटेल आहे.

राहून गेलेली ठिकाणे:

वेळेअभावी आणि इतर कारणास्तव राहून गेलेली ठिकाणे म्हणजे कास पठार (सध्या फुले नाहीत), ठोसेघर धबधबा (वर्षभर या धबधब्याला पाणी असते म्हणतात पण रिक्षावाला म्हणाला आता पाणी नाही म्हणून गेलो नाही), यवतेश्वर मंदिर वगैरे.

परतीचा प्रवास:

दुपारी 2 वाजता विना थांबा विना वाहक सातारा स्वारगेट मिळाली एसटी. सव्वा चार वाजता स्वारगेट पोहोचलो. घरी 5 वाजता पोहोचलो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी पायरी पायरीचा हिशोब दिलाय Wink

सातारा माझ खुप आवडत शहर - छोट नाही नी जास्त मोठ पण नाही. Happy

इतकी वर्ष आली सातारला जातोय, पण अजुन अजिंक्यतारा पाहीला नाही Lol

लाटकर पेढेवाले यांचेकडे कंदी पेढे >>>>> खुप दुकाने आहेत लाटकर नावाची, पण विसावा नाका येथे असलेल्या दुकानातील पेढे सर्वात भारी.

रात्री 8 वाजता लेक व्ह्यू हॉटेलमध्ये आम्ही सर्वांनी जेवण केले >>>>> बाय द वे , हे हॉटेल माझ्या बहिणीच आहे बर का ! Happy

मस्त लिहिलं आहे.
लेक व्ह्यू हॉटेल कुठे आहे साताऱ्यात ?

फोटो हवे आहेत.
वर्णन आवडले.

कास पठार, ठोसेघर,सज्जनगड सहल दोनदा केली आहे. पंढरपूर - गोंदवले -संगम/क्षेत्र दोनवेळा केलंय. संगमाची पार वाट लावली आहे मर्तिकांचे क्रियाकर्म करून. त्यामानाने क्षेत्र आवडले.
सज्जनगड गडफेरी केली होती . वरून खाली छान परिसर दिसतो. खालचे धरण आणि नदी उरमोडी आहे. त्याचेच पाणी शिष्य कल्याण खालून वर आणून दोन हांडे भरून ठेवी. ते हांडे पाहूनच धडकी भरते. गडावर दोन वेगळे गट आहेत. जुन्या गटाकडे रामदासमहाराजांच्या वस्तू आहेत. श्रीधर स्वामी स्थापीत नवीन गटाकडे चांगले भक्तनिवास आहे.
कंदी पेढे घ्यायचे म्हणून घेतले होते. यापेक्षा विजापूरी पेढा,भीमाशंकरी पेढा चांगला लागतो.
गडाकडे जाणाऱ्या बसेस दीड तासाने असतात. तिथे कुणी घाईचे येत नाही त्यामुळे फारसा फरक पडत नाही.
वातावरण आल्हाददायक असते.

लेक व्ह्यू हॉटेल कुठे आहे साताऱ्यात ?
>>>> गोडोली - रहिमतपूर रोडला.
गोडोली वरुन जाताना हायवे च्या अलीकडे अर्धा किमी