साप्ताहिके आणि मासिके यांचे युग संपले?

Submitted by निमिष_सोनार on 16 March, 2023 - 04:51

आज दुपारी "चित्रलेखा" कार्यालयातून मला फोन आला की तुमच्या उरलेल्या वर्गणीचे पैसे आम्ही परत करत आहोत कारण आम्ही चित्रलेखा साप्ताहिक बंद करतो आहे.

आजकाल छापील ऐवजी ईबुक वाचनात रस असल्याने क्षणभर असे वाटले की, फक्त छापील चित्रलेखा बंद झाले. पण नाही! डिजिटल चित्रलेखा पण बंद झाले आहे. म्हणजे काय की थोडक्यात चित्रलेखा मासिकाचे प्रकाशन पूर्ण बंद झाले आहे.

चित्रलेखा स्वतःची अशी एक वेगळी ओळख टिकवून होते. रंजक पद्धतीने आणि वेगळ्या धाटणीचे लेखन करून वाचकांना किचकट माहिती सोपी करून सांगणे हे चित्रलेखाचे वैशिष्ट्य होते, असे माझे मत आहे.

चित्रलेखा बंद झाल्याचा फोन आल्यानंतर मला राहवले गेले नाही आणि उत्स्फूर्तपणे हा लेख मी लिहिला!

काही वर्षांपूर्वी "लोकप्रभा" साप्ताहिक बंद झाल्याचे ऐकले. "झी दिशा" हे साप्ताहिक पण बंद पडले. मराठी साप्ताहिके, मासिके धडाधड बंद होत आहेत. हे ऐकून मन अस्वस्थ झालं. मनात अनेक मुद्दे उपस्थित झाले, अनेक प्रश्न पडले.

सखोल विश्लेषण असलेले लेख लोकांनी वाचणे बंद केले की काय?

1992 ला चित्रलेखाचा पहिला अंक मी लहान असताना वाचला होता, तेव्हापासून मी चित्रलेखाचा नियमित वाचक आहे. तसे मी लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ, इंडिया टुडे, आऊटलूक वगैरे साप्ताहिके सुद्धा अधून मधून वाचतो.

तसा मी नियमित दिवाळी अंक सुध्दा वाचतो. पण तो स्वतंत्र विषय आहे. दिवाळी अंक वार्षिक असतात आणि त्याचे विषय वेगळे असतात.

लहानपणी एकदा "प्रगत विज्ञान" नावाचे मासिक मी लावले होते, खूप दर्जेदार होते पण आर्थिक पाठबळाअभावी ते बंद पडले असे कळले, तेव्हाही असेच अस्वस्थ वाटले!

असे म्हणतात, की सिनेमाची लांबी गेल्या अनेक वर्षात तीन तासांवरून दीड दोन तासांवर आली. याचा अर्थ काय की आज लोकांना वेळ नाही. चित्रपटापेक्षाही दोन चार मिनिटांचे व्हिडिओ बघणे आजच्या पिढीला आवडते. सगळं काही क्विक आणि इन्स्टंट! इन्स्टंट मॅगी, फास्ट फूड!

सखोल माहिती देणारे दर्जेदार मासिके आणि वर्तमानपत्र वाचण्याऐवजी लोकांना व्हाट्सअपवरचे अपूर्ण किंवा अर्धवट माहिती असलेले लेख वाचण्यात आणि फॉरवर्ड करण्यात इंटरेस्ट असतो.

सखोल वाचन आणि विचार करायला कुणाकडेही वेळ नाही. विविध न्यूज चॅनेलवरील आरडा ओरड करणाऱ्या न्यूज अँकरने बनवलेल्या तात्कालिक मतावर आज लोकांचे मत तयार होते. प्रत्येक न्यूज अँकर सुध्दा काही त्या विषयातील तज्ञ असतोच असे नाही. कुणी खोलात जाऊन त्यामागची कारणमीमांसा, पार्श्वभूमी तपासून बघण्याच्या फंदात पडत नाही. त्यामुळेच की काय एखाद्या ठिकाणी काही घटना घडली की लगेच जगभर विविध ठिकाणी त्याचे नकारात्मक पडसाद उमटायला सुरुवात होते.

मी तर म्हणतो पुढे वर्तमानपत्र देखील टिकतात की नाही हा प्रश्न आहे. असे होऊ नये म्हणजे झालं. बऱ्याच जणांकडे आज वर्तमानपत्र येत नाही. सगळे जण मोबाईल वर बातम्या वाचतात. तसेच वृत्तपत्राचा कागद महाग झाला आहे त्यामुळे आणि मागणी कमी त्यामुळे वर्तमानपत्र महाग झाले आहेत.

दहा मिनिटात झटपट बातम्या ऐकणे, प्रत्येक बातमी पाच ओळीत देणारे ॲप वाचत वाचत पटापट वर स्कॉल करणे असे सुपरफास्ट आयुष्य झाले आहे.

एक विचार मनात असाही येतो की, वृत्तपत्रांनी रविवारच्या पुरवण्यामध्ये भरगच्च मजकूर असलेले विविध विषयांवरचे लेख दिल्यामुळे तर साप्ताहिकांचे अस्तित्वच नष्ट झाले नसावे? कारण इतके डिटेल लेख पुरवण्यांमध्ये दिल्यानंतर साप्ताहिकात आणखी वेगळं काय वाचायला देणार? स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे हे झाले. विचार करा, एक उदाहरण देतो: "सकाळ" च्या रविवारच्या पेपरच्याच किमतीत "सप्तरंग" पुरवणी देण्याऐवजी त्याचे वेगळे पुस्तक रुपात साप्ताहिक करायला काय हरकत आहे?

बहुतेक साप्ताहिके ही वृत्तपत्रांच्याच मालकीची असतात.

जसे "लोकप्रभा" हे इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे आणि "साप्ताहिक सकाळ" हे सकाळ ग्रुपचे. इंग्रजीतल्या काही साप्ताहिकांची सध्या काय स्थिती आहे याची कल्पना नाही. उदाहरणार्थ आऊटलुक इंडिया टुडे वगैरे.

साप्ताहिकांसारखीच मासिकांची पण गत झाली आहे. मला वाटते मासिक हा प्रकार पण आता दुर्मिळ होत चालला आहे. लहान मुलांसाठी साप्ताहिक, मासिक ही कल्पना पण आता जवळपास बंद झाल्यात जमा आहे.

फिल्मफेअर सारखे मासिक पण आता बंद झाले. असो.

लेख इथेच संपवतो. नाहीतर लेख लांबतो आहे हे बघून तुम्ही पुढे वाचणारच नाहीत. इन्स्टंट आणि फास्ट फूड चा जमाना आहे ना!

- निमिष सोनार, पुणे
- (17 जानेवारी 2023)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजकाल मुलांना युट्युब शॉर्ट्स बघायची सवय पडली आहे.. ७/८ मिनीट लांबी असलेले व्हिडीओज ही बघत नाही सहसा.
तसंच काहीसं.
शिवाय छापिल प्रत पिवळीपडते, शिवण सैल होते म्हणुन ही हे बंद पडत असावे. माझ्याकडे दिवाळी अंकांची चळत होती, लायब्ररी वाले फुकटातही ठेवायला नाही म्हणाले..जागा नाही म्हणे. फेकायला वाईट वाटते पण इलाज नाही.

लोकप्रभा आणि चित्रलेखा ही दोन्ही साप्ताहिकं बंद झाली हे माहिती नव्हतं. मी शाळेत असताना आमच्या घरी हे दोन्ही अंक यायचे अनेक वर्षे. 'चित्रलेखा'मध्ये 'लय-प्रलय' नावाची क्रमशः कादंबरी खूप काळ येत होती. लोकप्रभा थोडा गंभीर, तर चित्रलेखा थोडा लाईट असायचा.

तुम्ही लिहिलेली कारणं बरोबरच आहेत. काळ बदलला आहे हे खरं. त्याबरोबरच हेही खरं आहे की दर्जेदार लेखन असेल तर लोक वाचतात. तोचतोचपणा आला की वाचायला कंटाळा येतो. 'अंतर्नाद' हे मासिक काही वर्षांपूर्वी बंद पडलं. त्याबद्दल हळहळही व्यक्त झाली. आम्ही काही वर्षे 'अंतर्नाद'चे वर्गणीदार होतो. अनेक लेखक आणि लेख चांगले असायचे, पण तोचतोचपणा खूप जाणवायचा. तेच तेच लेखक, त्याच त्या विषयांवर परत परत लिहीत असले तर ते वाचायला कंटाळा येणारच. किंवा एखादा लेखक फार दर्जेदार नसला, तरी त्याचं लेखन वारंवार अंकात यायचं.
त्यानंतर गेली काही वर्षे आम्ही 'साधना' साप्ताहिकाचे वर्गणीदार आहोत. अतिशय उत्तम अंक असतो. नवीन आणि जुने, दोन्ही प्रकारचे लेखक, विविध विषय असतात. एक प्रकारचा 'ओपननेस' जाणवतो. सगळेच लेख/लेखक चांगले दर्जेदार असतात असं नाही, पण बहुतांश असतात.
योगायोगाने साधनाच्या या महिन्याच्या एका अंकात 'नियतकालिके' याच विषयावर संपादक विनोद शिरसाठ यांचं भाषण छापून आलं आहे. तेही चांगलं आहे.
https://weeklysadhana.in/view_article/vinod-shirsath-on-literary-and-ide...

लोकप्रभा आतापर्यंत होता. नेटवर शेवटचा अंक ८ एप्रिलचा दिसतोय. ४९ वा वर्धापनदिन विशेष दिसतो आहे.
लायब्ररीत अजूनही काही मासिके दिसतात. माहेर, मेनका, श्री आणि सौ, मिळून सार्‍याजणी. , सत्याग्रही विचारधारा, ललित, मुक्त शब्द.

चांगला लेख आहे.

<< वृत्तपत्राचा कागद महाग झाला आहे त्यामुळे आणि मागणी कमी त्यामुळे वर्तमानपत्र महाग झाले आहेत. >>
हा एक भ्रम आहे जो अगदी माझ्या लहानपणापासून पसरलेला आहे. मुळात वृत्तपत्रे ही जाहिरातींवर चालतात. माझा मित्र टाइम्स ऑफ इंडियामध्ये काम करत होता, त्यामुळे काही वेळा 'आतली बातमी' कळत असे. जाहिरातीच्या उत्पन्नामध्ये खरं तर ते फुकट देणे पण परवडण्यासारखे होते.

<< सखोल वाचन आणि विचार करायला कुणाकडेही वेळ नाही. >>
बऱ्याच अंशी हे खरे वाटले तरी हे सरसकटीकरण मला तरी पटत नाही. चांगला कंटेंट अजूनही उपलब्ध आहे आणि त्याला भरपूर वाचक आहेत. फरक इतकाच की आता हातात पुस्तक, वृत्तपत्र वगैरे घेऊन वाचण्याचा प्रकार बदलत आहे. खरं तर माहितीचा इतका खजिना समोर आहे, तर त्यातले काय निवडून काय consume करू, हा माझ्यासमोरील यक्षप्रश्न असतो नेहमी.

<< विविध न्यूज चॅनेलवरील आरडा ओरड... >>
आता आंतरजालामुळे मुबलक प्रमाणात माहिती सर्वानाच, आणि अतिशय सुलभतेने उपलब्ध होते. त्यामुळे वाचकाचे/प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि त्याला जास्तीत जास्त खिळवून ठेवण्यासाठी हे प्रकार केले जातात. व्यक्तिशः मला दररोज इतकी माहिती उपलब्ध आहे की दिवसाचे २ तास वाचनात अगदी सहज जातात. त्याशिवाय यूट्यूबवरसुद्धा अनेक चांगले व्हिडिओ बघायचा पर्याय आहे.

<< पुढे वर्तमानपत्र देखील टिकतात की नाही हा प्रश्न आहे. >>
जर वृत्तपत्रे बंद झाली तर काहीही वाईट होणार नाही. बातम्या आता जगातून अक्षरशः शेकडो/हजारो प्रकाराने आणि सहजपणे उपलब्ध आहेत. त्यासाठी रोज सकाळी दारात पेपर आला का याची वाट पण बघावी लागत नाही.

वृत्तपत्रे बंद व्हावीत अशी माझी इच्छा नाही. पण त्यांचे (आणि एकंदरीत सगळ्या मीडिया कंपनीचे) बिझनेस मॉडेल गंडलेले आहे आणि मुख्यत: ते ग्राहकांच्या हिताविरुद्ध आहे, असे मात्र नक्की वाटते.

मुळात आपला वेळ किती बहुमूल्य आहे आणि आपण अनावश्यक ठिकाणी तो किती वाया घालवतोय, हेच बहुतेकांना कळत नाही याची खंत आहे.

वृत्तपत्रे बंद झाली तर काही बिघडत नाही हे मला नाही पटत उ.बो. म्हणजे ई-पेपर चालेल, छापील पाहिजे असं नाही. पण 'वृत्तपत्र' पाहिजे.
सगळ्या, किंवा निदान बऱ्याच प्रकारच्या बातम्या एकत्र मिळण्याचं ते साधन आहे. मग त्यानंतर ज्याला ज्यात रस असेल त्यानुसार इतर साधनांमधून अधिक माहिती मिळवता येईल. पण यूट्यूब किंवा इतर ऑनलाइन माध्यमांमधून बातम्या मिळवणे यात मला तरी विशिष्ट प्रकारच्या, विशिष्ट बाजूने दिलेल्या बातम्या आपल्याला मिळत राहण्याचा धोका वाटतो.

<< विशिष्ट प्रकारच्या, विशिष्ट बाजूने दिलेल्या बातम्या आपल्याला मिळत राहण्याचा धोका वाटतो. >>
हा धोका केवळ वृत्तपत्रात न्हवे, तर बहुतेक सगळ्या मिडीयात दिसून येतो. त्यामुळे एकाच वृत्तपत्रांवर/सोर्स वर अवलंबून न राहणे उत्तम. घरी केवळ लोकसत्ता वाचण्यापेक्षा मटा, लोकसत्ता, सकाळ, नवाकाळ, सामना असे अनेक स्त्रोत चाळता येतात. तोच प्रकार टीव्ही चॅनलचा.

बातम्यांसाठी सुद्धा वृत्तपत्रे हा एकच पर्याय नाही.

वृत्तपत्र हा एकच पर्याय आहे असं नाही मला म्हणायचंय. वृत्तपत्र हा लसावि. त्यापुढे मग जेवढं आपल्याला वाटतं तेवढं पुढे जाऊन बातम्या मिळवाव्यात असं मला म्हणायचं आहे. एकापेक्षा जास्त वृत्तपत्रं वाचणं चांगलं, हेही मान्य आहे.

बहुतांश टीव्ही चॅनल्सवर दाखवल्या जाणार्‍या बातम्या फक्त सनसनीखेज वगैरेच असतात असं मला तरी वाटतं. ई-पेपर क्लीकबेटच्या प्रचंड आहारी गेले आहेत. त्यामुळे खरंतर छापील वृत्तपत्र बंद होऊ नयेत असं वाटतं. अजूनही दूरदर्शनच्या बातम्या शांतपणे सांगत असतील अशी एक आशा आहे. तस्मात खर्‍याखर्‍या बातम्या मिळवायचे खात्रीशीर पर्याय नेमके कुठले राहिले आहेत?

बाकी दर्जेदार कंटेंट सध्या पेपरांच्या पुरवण्यांमधे तरी येतो आहे काय? मला तरी सध्या सप्तरंग (रविवार सकाळ) आणि उत्सव (रविवार सामना) या पुरवण्या वाचायला चांगल्या वाटत आहेत. इथे राहत असल्याने ऑनलाईन पेपरचाच पर्याय उपलब्ध आहे. लोकरंग (रविवार लोकसत्ता) मला इतका खास वाटला नाही.

एकूणच सर्वत्र कंटेंटची बोंब झाली आहे की काय असा प्रश्न हल्ली वरचेवर पडतो. व्हॉट्सअ‍ॅपवरच्या लेखांनाच हल्ली कंटेंट म्हणत असतील तर अवघड आहे.

मागच्या वर्षी माहेर/श्री/सौ का कसला तरी अंक वाचला त्यात प्रत्येक पाना वर अ‍ॅड्स होत्या. गोष्टींना अगदी कमीत कमी खिसगणतीत धरलेले होते. पाव भाग पान वर कथा आणि बाकी सर्वत्र पानभर अ‍ॅड Sad
वाईट ही वाटले आणि खूप चिडचिड झाली. तो अंक विकत घ्यायचाच नाही हा निश्चय पक्का झाला.

नियतकालिकांमधे छापून येते ते ब्रह्मवाक्य पासून त्यात लिहीणारे एकसुरी लिहीतात असे वाचकांना वाटणे हा पहिला बदल. आंजाच्या विस्फोटानंतर माहितीचे थेट सोर्सेस उपलब्ध झाले. त्यामुळे वाचक नियतकालिकांच्या लेखकांपेक्षा जास्त अपडेट राहू लागले. अशात ज्या नियतकालिकांनी हा बदल पचवला ते टिकून राहतील, नाही तर बंद पडतील.

माझ्या मते सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आजकाल बहुसंख्य मुलं इंग्रजी माध्यमात शिकत असल्यामुळे नवे मराठी वाचक निर्माण होणं जवळपास बंदच झालंय. सर्व विषय इंग्रजीमध्ये शिकत असल्याने त्यांना मराठी वाचन तितकंसं चांगलं जमत नाही. त्यामुळे ती वाचनासाठी इंग्रजी पुस्तकांकडे वळतात.

विशिष्ट प्रकारच्या, विशिष्ट बाजूने दिलेल्या बातम्या आपल्याला मिळत राहण्याचा धोका वाटतो.>> हे मला १००% पटतं. इ-पेपर वाचताना मला ज्या विषयात मला रस आहे, केवळ त्याविषयीच्याच बातम्यांवर क्लिक केले जाते. आणि मग केवळ त्याच विषयाच्या/ त्याच पद्ध्तीच्या बातम्या माझ्यापुढे येत रहातात. छापील व्रुत्त्पत्र वाचताना आपल्याला ज्यात विषेश रस नाही अश्या विषयांच्या बातम्या निदान डोळ्यांपुढून तरी जातात.
Spotify, गाना वगैरेंसारख्या app वरून ठराविक playlist लावून गाणी ऐकणे हेही मला महा बोरिंग वाटते. कारण, अचानक कोणते तरी विस्मरणात गेलेले गाणे ऐकायला मिळाले ,किंवा एखादं नविन गाणं कानावर पडलं आणि आवडलं, त्या गाण्यातल्या कलाकारांविषयी काहीतरी नविन माहिती अचानक समजली; हे सगळं घडण्याची शक्यता कमी होते. पण रेडिओ ऐकताना हे सगळं घडू शकतं. चांगला anchor/ RJ असेल तर अजूनच मज्जा.
पण कालौघात हे RJ चे काम कदाचित chatGPT करू शकेल असं वाटतं आणि पुन्हा आपल्या आवडी/ निवडी, मनोरंजन AI च्या ताब्यात जाणार ह्या विचाराने धडकी भरते.