खेड्यातील जीवन व जेवण!!

Submitted by अश्विनीमामी on 12 March, 2023 - 09:22

लेमन टी, लेमन राइस, लेमन पेपर चिकन कँडीड लेमन, लेमन केक........ तोंपासु आंबट चिंबट मसालेदार मेनु ना!! हा पुणे- मुंबईतील कोणत्यातरी फॅन्सी इन्स्टा ग्रामेबल बिस्त्रोतला नाही. कोकणातील खेड्यातील जीवन पद्धती व रेसीपी दाखविणार्‍या रेड सॉइल स्टोरीज ह्या युट्युब चॅनेल वरचा एक भाग आहे. अश्या चॅनेलचा एक ठरावीक प्रेक्षक वर्ग आहे. मी ही काही दिवस होते पण मग ह्यातील सारखे पणा, तोच तोच पणा व एक्सेल शीट शिस्टिम लक्षात आल्यावर हवाच गेली.

पण समजा तुम्ही बेल्जिअम, आइस लँड न्युझिलंड कुठेतरी जगाच्या कोपर्‍यात बर्फाळ हवेत, अजून बर्फाळ ऑफिसात बसून नीरस डेटा वर काम करत आहात, जीरा मेसेजेस नी इ मेल भरून गेलेली आहे. घरी जाउन तेच बेचव जेवण जेवायचे आहे अश्या परिस्थितीत घरी गेल्यावर हे भारतीय उन्हे, शेते त्यात टुमदार घर, फळझाडे फुलझाडे, लगबगीने काम करणारी एक स्त्री साडीच नेसलेली. नाकी डोळी नीटस पण इत की ही सुरेख नाही की पाककृतींवरचे लक्ष उडून तुम्ही तिलाच बघत बसाल. ही सुती साडी नेसून असते. कधीच कॅमेरात बघत नाही. एकतानतेने घरात फक्त आणि फक्त स्वयंपाक करत राहते. हिचा हाप्पँट घातलेला नवरा/भाउ अधून मधून येउन मदत करतो व काही पन्हे सरबत सोलकढी टाइप बनवतो सुद्धा. पोर नसते असले तर कधी मधीच दिसते व लाडाने त्याला खाउ घालतात. कोण भारतीय विरघळून जाउन बघणार नाही सांगा!! सोब त अनेक पारंपारिक पाककृती. जरी आपण उबर इट्स स्विगी झोमाटो करत असलो तरी त्या बघत बघत खायला मात्र मजा येते बाई.

ह्या सर्व चॅनेलांची आजी ली झिकीच आहे. हिच्या चॅनेल वर एक स्वतंट्र बाफ आहे तो बघून घ्या. फारच आकर्षक पद्धतीने ही मुलगी शेती व स्वयंपाक करायची. अजूनही करते. मन मोहक असे हे चिनी सरकारतर्फे बनवलेले व्हिडीओ अगदी आसूस्सून बघितले. देन केम कोविड व चीनचे खरे विदारक रूप दिसले. एकाच इन्ग्रेडिअंट चे अनेक पदार्थ हे ह्या व्हिडीओज चे व्यवच्छेदक लक्षण. बटाटा/ लसूण/ शेंगदाणे...

मग त्याचे बरेच कॉपी कॅट चॅनेल्स अल्गोरिथम डोळ्यावर आदळू लागला. ट्रॅडिशनल लाइफ/ ट्रॅडि शनल मी असली नावे असतात. अगदी श्रीलंकेतील स्वयंपाकापासून ते तमीळ तेलुगु व केरला मधील खेड्यातील जीवन बघता येउ लागले. आपल्याकडे तात्याचा मळा, व्हिलेज कुकींग, गावरान एक अस्सल चव हे फेवरिट आहेत. ते मळा वाले व गावरा न वाले खरंच शेतातच स्वयंपाक करतात. सुक्के मटन चिकन व थालिपीठे झुण के मजेशीर असतात. सर्व चॅनेल मध्ये बायकाच स्वयं पाक करतात व पतीस अगदी प्रेमाने जेवु घालतात. ( फिर प्रॉब्लेम क्या है?!) भै वा. जिस घरमे घरकी लडकिया और औरते खाना खिलाए वौही घर घर है असे संस्कारी भाईसाब म्हणूनच गेले त.

तमीळ तेलुगु वाल्या बायका काही ही रेसीपी असली की लगेच पाटा वरवंटा रुब्बु गुंडा घेउन बसतात. भांडी सुद्धा अट्टहासाने मातीचीच व चुलीवरच स्वयंपाक. लाकुड फाटा तोडण्या पासून सुरुवात. मध्येच नटी देवघरात दिवा लाव. गाईला कुरवाळ असे लाडीक आविर्भाव करत असते. वॉट्स नाट टु लाइक. कायम मान खाली व सुपात घेउन तांदूळ निवडत राहते. मध्येच उंबर ठ्यावर डोके ठेउन निजते. ब्रेक झाला की लगेच हिच्या नशिबी वरुटा( वरवंटा!!) रात्रीचे जेवण करयला कटिबद्ध!!! तमीळ बाईच्या पोळ्या जाम विनोदी आहेत. घडी नाहीच. पण नवरा आव्डीने खातो. ( पर डे वर असणार हे लोक्स) अधुन मधून हातानेच गजरा करून माळते. सर्व कसे अगदी हवे हवेसे.

सर्व व्हिडीओ इतके पॉलिश्ड प्रोडक्षन आहेत की नजर हटत नाही. काय ती स्वच्छ भांडी, चुलीवर स्वयंपाक करुनही एक डाग नाही. का कधी भांड्यांचा रगाडा घासायला नाही. खेड्यातले जीवन पण एक गटार दिसत नाही की कचरा. सारे कसे कल्पनेपेक्षाही सुंदर. मन मोहित करुन टाकते. पण एक आठवडा बघितले की सर्वातला एक्सेल शी ट टाइप तोच तो पणा जाणवतो.

कांद हयाती हे एक अझरबैजान मध्यील चॅनेल पण असेच आहे. इंट्रनॅशनल आवृत्त्ती. ह्यातले काका काकू मध्यमवयीन आहेत. व घर आउट डोअर किचन एकदम सो प्रिटी सो लव्हली. पन आजकल कौन करता यार इतना!! असे म्हणावॅसॅ वाट्ते. सर्व चॅनेल वर रेसीपीच्यामध्ये घरातील प्राणी, फिश फुले पाने फळे ह्यांचे इतके भारी शॉट्स असतात की टू बीएच के मध्ये राह णारा प्रेक्षक नक्कीच वेडा होईल व वीकेंड ला हायवेला लागून असलेल्या इको रिजोर्ट चे बुकीं ग करून टाकेल. जोडीला ट्रॅडिशनल पण मोनोटोनस संगीत.

रेड सॉइल बाई काळ्या वाटाण्याची उसळ, खोबर्‍याची कापा शिरवाळे बनव्ते पण आज एक परफेक्ट लेमन केक पन दिसला. श्रिलंकेतील फ्रॉक वाली मुलगी एक इतका जबरदस्त चॉकोलेट केक बनवते की थिओब्रोमा मध्ये पण मिळणे अवघड आहे लेझी बम्स ना.

इथे कधी सासू सासरे येउन छळत नाहीत. आयत्यावेळी पाव्हणे नाहीत( रेड सॉइल वाली बाई करते पण केळ वणे. - अर्धा दिवस त्या किचन मध्ये घालवून) नवरा दारू पिउन मारत नाही कि मुले फोन मध्ये डोके खुपसून बसत नाहीत. अगदी आदर्श व्यवस्था. बायकानी हाताने व जुन्या पद्धतीने स्वयंपाक करण्याचे ग्लोरिफिकेशन!!! एक प्रकारे ग्रेट इंडिअन किचनच हे. मग मी वैतागून अजय चोप्रा नाहीतर रणवीर ब्रार कांदा टोमाटो ची ग्रेवी हजारव्यांदा करताना बघते. ते नोर्थ इंडिअन बाप्ये बोलताना मध्येच हॅ हॅ करतात तेव्हा पार फुटायला होते. स्वयंपाक ही आजकाल बघायची कला झालेली आहे ह्या हजारो कुकिंग चॅनेल्स मुळे. कधी कधी एखादी अनवट रेसीपी मिळून ही जाते.

भारताला लागून असले ले पाकिस्तानातले वाळवम्टी प्रदेश व तेथील लोकांचे जीवनही असेच दाखवणा रे चॅनेल आहेत. इथे थोडा पंजाबी प्रकार आहे. मथणीने दही घुसळून ताक काढायचे व लोणी साखर ह्या व्हिडीओ वाल्या ला हातात द्यायचे की तो लगेच वा क्या टेस्ट है बुनि यादी जायका म्हनत बोटे चाट णार. रेड सॉइल स्टोरी मधली बाई आंबोळीचे पीठ दळायला जात्यावरच डिरेक्ट व ओव्या गात गात स्वप्नातच हरवली.
तर पाकिस्ता नी खेड्यातली बाई ह्यांना पराठे करून घालायचे तरी पार जात्यावर पीठ दळ ण्या पासून सुरुवात. पण भातात घालायला फूड कलर असतात!!! मग अर्धा दिवस चुलीवर खटपट करून चार मोठे पराठे व हंड्यात शिजवलेले साग बनवून वाढणार चार बाप्यांना. ते काचेच्या प्लेटीत. तेही लाजत लाजत.

हाइट म्हणजे परवा असे च सर्फ करताना एक सिमिलर भोज पुरी चॅनेल दिसले. ती बाई गावाकडे चिली पनीर बनवत होती. ऐसा भी होता है.
म्हणून मी अग्निहोत्र लावले. ( हीच पंचलाइन आहे.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोकणातील अगदी वीस गुंठे वाडी असली (त्यात तीन गुंठे घराला गेली तरी)पोफळी (सुपारी), माड (नारळ) यांची बरीच झापं पडत असतात त्यांचा उपयोग जळण म्हणून होतोच. आंघोळीचं पाणी गरम करायला विशेषकरून वापरतात. पण स्वैपाकाला वापरणे कटकटीचे असते.

मस्त मजा आली वाचताना.
एक्सेल टेम्प्लेट्ला अनेक मोदक.
आता एकही असला चॅनेल बघत नाही. पेशन्स संपला. शेवटी हेब्बरला पर्याय नाहीच. Happy

भारी लिहिलंय!

म्हणून मी अग्निहोत्र लावले. >> Lol Lol Lol

एवढं शेतातलं काम करून नंतर ऐवढा निगुतीने स्वयंपाक….कौन करता है भाई इतना.
लगे हात ॲक्टींग पण करतात बाई. सासू सोबतचा एपिसोड सो फेक….एवढं जेवण दोघांसाठी ??? नक्कीच भली मोठी टीम असणार. बी रीअल गाईझ..

Lol
भारी लिहिलंय.
(प्यार का पंचनामा सिनेमातल्या त्या फेमस मोनोलॉगच्या चालीवर वाचलं मी.)

अरे काल तात्याचा मळा मध्ये अंडा लबाबदार!!!!! कहीं मै अजय चोप्रा का विडीओ तो नही देख री? तात्या तुम्ही सुद्धा!!
मला तर एक चहाचे भांडे, एक गाळणे एक कप, एक कढई / एक पॅन व एक जेवायची प्लेट हेच फक्त रोजचे घासायचे तर वैताग येतो. ह्या सुंदर्‍या कधीच हातात राख व घास णी घेत नाहीत. मी अव्वल पुण्या त राहुनही राख व नारळाच्या शेंडीने भांडी घासलेली आहेत. पितळेचे डब्बे सुद्धा. इथे तर सर्व जादूने चका चक. नवरा पन्हे बनवतो तेव्हा ट्रेत दोन ग्लास हजर. आमची मंजे एक प्लास्टिक चा ग्लास एक काचेचा मग अशी परिस्थिती असते.

धमाल लिहिलय.
ते ओपन किचन प्रत्यक्षात किती कठीण आहे. रात्री अन्नाच्या वासाने जनावरं ही शिरायची घरात.
तो नवरा लास्ट ला येतो आणि खातो , तोंडदेखल चांगले झालंय म्हणतो. "पाट्यावर वाटून आणि चुलीशी उभी राहून दमलीस हो "कध्धी म्हणून येत नाही तोंडातून.
ह्या सगळ्या सेट ने ती एवढी पकत असेल की शूटिंग झालं की फटाफट कुकरच्या शिट्या काढत असेल आणि वरणभाताच ताट हातात घेऊन टीव्ही च्या पुढ्यात बसत असेल किंवा मोबाईल मध्ये डोकं खुपसत असेल.

ते सेटअप फक्त तीन दिवस वापरतात, बाकी दुसरं घर आहे तिथे सासु सासरे आहेत, सा बा च स्वयंपाक करत असतील तिथे. त्यांच्या हातचंच जेवत असतील.

त्या दोघांच्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की तीन दिवस तिथे रेसिपीज करतो, उरलेले दिवस एडीटींग वगैरे. डॉक्टर नणंद कधी कधी मदत करते ह्यातल्या काही गोष्टीत. त्या दोघांचा वेळ ह्या घरात जास्त जातो. गावाचं नाव सांगत नाहीत कारण, ते दोघेच आहेत आणि आत्ता कोणी जास्त आलं गेलं तर पाहुणचार करता येणार नाही. बाकीच्या गावातल्या लोकांच्या प्रायव्हसीवर परीणाम होऊ शकतो.

बरेच युट्युबर तर जाऊन आले तिथे, गाव विचारलं कोणी तर फक्त सिंधुदुर्ग जिल्हा सांगतात.

तिथे भांडी वगैरे होतात ती घासायला नक्कीच कोणी मदतनीस असणार, नारळ खवून द्यायला वगैरेही असेल.

हिने खरवस दाखवलेला तो मात्र मला अजिबात आवडला नाही. जिरं, हळद वगैरे खरवसात आमच्याकडे तरी नाही घालत. गुळ, वेलची, जायफळ एवढीच पोच आमची. जास्त करुन गुळ, वेलची घालतो. केशरही अगदी क्वचित.

मी शाकाहारी पदार्थच बघते, मला यात ते मावशीकडे गेलेले आणि शिरवळ्या बेत होता तो एपिसोड आवडला होता, त्यात तिथल्या एकाने कोणीतरी सुपारीच्या पानांचे (बुंध्याकडचा भाग) लांबट द्रोण (द्रोण म्हणायचं का त्याला माहीती नाही) छान केलेले, सुबक वाटलेले. त्यात शिरवळ्या, रस घालून खायला देतात.

मधे धनगरी जीवन नावाचं चॅनेलही बघितलं, भट्क्या जीवनातलं रोजचं जगणं, तिथल्या रेसिपीज, ते वास्तव वाटलं. अर्थात सारखं तेही बघायला कंटाळा येतो.

मस्तच झालाय लेख! माझ्यासाठी पण हेब्बर जिंदाबाद.
तरी मला लिझिकी वेगळी वाटायची. अनप्रेडिक्टेबल वाटायची. स्पेशली जेव्हा तिने कापसाची शेती करून गादी तयार केलेली. बाकी सगळ्यांचे 2 3 विडिओ बघितले की कल्पना येते. अजून एक कोरियन बाई आहे . घरात लोकं 4 पण बाई दणदणीत 8 जणांचा स्वैपाक करते. ते पण निगुतीने. घर चकचकीत ठेवते, 5 7 भाज्या, 3 4 तोंडीलावणं, झालीच तर 2 3 फळं आणि काहीतरी गोड असं सगळं साग्रसंगीत. ते बघून मला जाम उत्साह येतो, मग मी पण त्या दिवशी 3 4 भाज्या करते, टेबलावर तोंडीलावणं न विसरता ठेवते, फळं कापते. आणि हे सगळं मग आम्हाला पुढचे 2 दिवस पुरतं.

रेड सॉइलवाल्यांचे गाव माझ्याजवळ आहे, फक्त घाट उतरावा लागतो Happy त्यांनी आधीच सांगितले की हा सेट आहे म्हणुन.

मी हल्ली असले सगळे चॅनेल बघणे बंद केले. कंटाळा आला. आता मुड लागला तर रणवीर आहेच.

अनिश्काशी सहमत. इथेही खरवसाfunction at() {
[native code]
}त जिरे हळद असते. उलट जयफळ वेल्चि चैन Happy

अंजु आमच्या इथे म्हणजे सासरी कुडाळ साईड ला जिरे , हळद मोस्टली गोड पदार्थात घालतातच....
खरवस मध्ये ही असतं... >>> अच्छा. ओके मला सवय नसल्याने मला नाही आवडणार ती चव. एकवेळ वेलची, जायफळ नसेल तरी चालेल पण हळद, जिरं नाही आवडणार. नुसता गुळ चालेल. हळद नसल्याने आमच्याकडे करतात तो खरवस उपासालाही चालतो.

काहीही घरगुती रेसीपी दाखवली की रील्स वाले हटकून ऐरणीच्या देवा गाणे लावतात मागे.
नाहीतर अगदी भावना प्रधान इंग्रजीत माय आज्जी ज फेवरिट रेसीपी गवारीची भाजी. करून तेच गवार मोडून फोडणीस टाकतात.

अजून एक कोरियन बाई आहे . घरात लोकं 4 पण बाई दणदणीत 8 जणांचा स्वैपाक करते. >>> ती सुद्धा २-३ दिवसांचा एकदमच करत असेल.

लेख आणि प्रतिसाद Lol
व्हिडिओज बघताना जे वाटायचं ते अमांच्या खुसखुशीत शैलीत वाचायला मजा आली

अजून एक कोरियन बाई आहे . घरात लोकं 4 पण बाई दणदणीत 8 जणांचा स्वैपाक करते. >>> ती सुद्धा २-३ दिवसांचा एकदमच करत असेल.>> Lol Lol Lol

मी हा लेख वाचल्यावरच रेड सॉईल चे २-३ व्हिडिओस बघितले. खूप बोरिंग आणि कृत्रिम वाटले.
अमा , तुमच्या लेखाने त्यांना अजून जास्त viewers मिळतायत. << Lol Lol Lol

खरवस म्हणजे केशर, वेलची आणि जायफळ आलेच हि माझी समजूत. एकतर क्वचित मिळतो. पूर्वी आजी खूप वेळा करत असे. तसा अजून कुठेही खायला मिळाला नाही

खरवस वेगवेगळ्या पद्धतींनी केलेला खाल्ला आहे. अनेक ठिकाणी गूळ वापरतात. शिवाय जिरे. आणि शिवाय भरीच्या दुधाऐवजी नारळाचे दूध ( रस).

खरवस वेगवेगळ्या पद्धतींनी केलेला खाल्ला आहे. अनेक ठिकाणी गूळ वापरतात. शिवाय जिरे. आणि शिवाय भरीच्या दुधाऐवजी नारळाचे दूध ( रस)

अच्छा. एकंदरीत वेगवेगळ्या प्रकारे खरवस करतात.

मी श्रीरामपुरला साखरेचा खाल्लाय, घरमालकीणबाईंनी केलेला. त्या सर्वांना माझा गुळाचा, थोडी वेलची घातलेला जास्त आवडला. नंतर त्यांनी तसा करून बघितला. इथे बरेचदा विकतचे खरवस खातो, गूळ किंवा साखरेचे. त्यातही कधी जिरं किंवा हळद बघितली नव्हती. पहिल्यांदा रेड सॉइलमध्ये बघितलं मी हे.

रेड सॉइलवाल्यांचे गाव माझ्याजवळ आहे, फक्त घाट उतरावा लागतो >>> तुम्ही आंबोली ना. आत्ता सहज youtube वर मूळचे आंबोलीचे श्री आणि संजीवनी सावंत यांचा ऑस्ट्रेलियातला vlog बघण्यात आला, त्यांनी आंबोलीचे ते सांगितलं आणि साधना मला पटकन तुम्ही आठवलात. त्यांना कोकणातील काहीजणांचे vlogs बघून vlogs करावेसे वाटले.

रेड सॉइल वाले एब्राम्हपुर मधले आहेत, गोव्याजवळ.
तो सेटअप बरा आहे तसा. नाटकी वाटतो खरा.
इथे कोकणातील लेखन करणारे पण असच सरसकट विधानं लेखात करताना वाचलीत. कोकणात माश्या भरपूर, कोकणात अळूवडीचा अळू पानं मिळतच नाही, सोनटक्का फक्त सफेदच असतो… वगैरे वगैरे.
आता त्यांचं जग लहान आहेत तर करु देत बापुडे…

बाकी, गोव्या बाजूला, “काही” जणं जीरं हळद घालतातच खरवस मध्ये.
कडीपत्ता माश्याच्या आमटीपसून, कोंबडी रस्स्यात सुद्धा घालतात.

रेड सॉइल वाले ईब्राहम्पूर मधले आहेत, गोवा. आधी ते महाराष्ट्रात होते गाव.
तो सेटअप बरा आहे तसा. नाटकी वाटतो खरा.
इथे मायबोलीवर कोकणावर लेखन करणारे पण असच सरसकट विधानं लेखात करताना वाचलीत. कोकणात माश्या भरपूर, कोकणात अळूवडीचा अळू पानं मिळतच नाही, सोनटक्का फक्त सफेदच असतो… वगैरे वगैरे.
आता त्यांचं जग लहान आहेत तर करु देत बापुडे…

बाकी, गोव्या बाजूला, “काही” जणं जीरं हळद घालतातच खरवस मध्ये.
कडीपत्ता माश्याच्या आमटीपसून, कोंबडी रस्स्यात सुद्धा घालतात.

कूकिंग चॅनेल आता बोर प्रकरण आहे.
भक्तगण प्रकार इथे सुद्धा आहेच.

मध्ये एकदा मधुराने, नुसता मैदा आणि किलोभर साखर टाकून वडी बनवून, झटपट बर्फी नाव देवून , अहाहा मस्तच… करूण( तिच्याच भाषेत) पहा, अप्रतिम चवीची छाण अशी बर्फी होते. असे म्हणत खाताना जीभ बाहेर दाखवत, घास तोंडात फिरताना दाखवून मिलियन व्युज मिळवले.
तो मैद्याचा तुपकट गोड चपटा गोळा आणि मिलियन व्युज …

एकदा तिचा, माहिमचा हलवा असाच फसलेला तरी तिचे ते, भन्नाट असा छाण हलवा करून पहा बोलणं.
आणि कमेंट पुर्ण भक्तांच्या..

शुभांगी किर ब्लॉगमध्ये तो येडपट पप्पू, मम्मी मम्मी करत उठल्यापासून झोपेपर्यंत दाखवत असतो.
भाजी कितीला पडली ते मीठ कसे मिळाले…
आता लोकांना विचारून विचारून, घरात बदल करतोय…

Pages