शिरोडकरची शाळा

Submitted by वावे on 4 March, 2023 - 05:33

हुश्श! बसलो एकदाचे आम्ही सगळे गाडीत! तीनचार दिवस नुसती सामानाची बांधाबांधच चालली होती. आता इथून व्ही.टी. आणि मग तिथून नागपूर. ती ट्रेन संध्याकाळी आहे म्हणा. संदीप आणि लहानीला खूपच वाईट वाटत होतं कालपर्यंत, हे घर सोडून जायचं म्हणून. सकाळी स्टेशनवर आल्यापासून मात्र खूश आहेत दोघं. गेल्यावेळेस बाबांची बदली झाली होती तेव्हा मी लहान होते. तेव्हा माझंपण असंच झालं होतं. आज मला एकाच वेळी वाईटही वाटतंय आणि सुटल्यासारखंही.
काल मांडे आणि जुवेकर भेटायला आल्या होत्या. तेव्हा मांडे म्हणाली की त्या गुप्तेने तक्रार केली तेव्हा म्हात्रेबरोबर जोशी उगाचच अडकला म्हणे. आणि म्हात्रेनी पण तिचा हात नव्हता धरला. गुप्तेनी वाढवून सांगितलं म्हणे. कुणास ठाऊक खरं काय ते. पण तिला या दोघांनी रस्त्यात अडवलं हे तर खरं ना? जाऊदे, काहीही असो, मला आता जोशीबद्दल काही ऐकायचंच नाहीये. आधी मला छान वाटायचं त्याचा विचार करताना. त्याच्याशी नजरानजर व्हायची तेव्हासुद्धा किती मस्त वाटायचं. कधी बरं बिघडायला लागलं हे सगळं? हां, आठवलं.

तो दिवस खरं तर किती छान सुरू झाला होता. सकाळी आक्का कॉलेजला निघाली, तेव्हा म्हणाली होती, पुढच्या रविवारी तिच्या मैत्रिणींबरोबर मला ’शोले’ बघायला घेऊन जाईल असं. मला खरं म्हणजे ते मारामारीचे पिक्चर आवडत नाहीत, पण आक्काच्या मैत्रिणींबरोबर पिक्चरला जायला मिळणार, त्यामुळे मी लगेच हो म्हणून टाकलं. मी नेहमी तिच्या मागे लागायचे, पण प्रत्येक वेळी ती म्हणायची, तू अजून लहान आहेस. ’आपकी कसम’ च्या वेळी तर आधी हो म्हणाली होती आणि ऐनवेळी म्हणाली, आत्ता नको, पुढच्या पिक्चरच्या वेळी नेईन. तू आईबाबांबरोबर जा म्हणे. आईबाबांबरोबर पिक्चरला जायला मला हल्ली अजिबात आवडत नाही. कारण संदीपला आणि लहानीला हिंदी डायलॉग नीट समजतच नाहीत आणि मग मला विचारत बसतात, ताई, ही काय म्हणाली, ताई, तो काय म्हणाला? मग मला पिक्चर नीट बघताच येत नाही. आणि बाबा खायला नेहमी आईस्क्रीमच घेतात. मला खरं तर ते समोसे खायचे असतात, पण लगेच आईचं सुरू होतं, तळायला कुठलं तेल वापरतात, स्वच्छता किती ठेवतात कुणास ठाऊक, त्यापेक्षा मी घरी समोसे करीन, तेव्हा खा हवे तेवढे. पण थेटरमधे खाण्याची मजा वेगळीच नं! मला आक्का सांगत होती, बाहेरचेच समोसे जास्त छान लागतात. पण हे आईला कोण सांगणार? आता आक्काबरोबर पिक्चरला गेल्यावर मी नक्की समोसे घेणार होते.
पण मग पिक्चरला जायचा मूडच गेला. शाळेत येताना रस्त्यात वाटवे भेटली. भेटल्याभेटल्याच म्हणाली, "अगं शिरोडकर, तुला आंबेकरचं कळलं का?" मला वाटलं, परत कुणी तिला मांजरेकरसरांवरून चिडवलं असेल. पण ऐकलं ते भलतंच काहीतरी. तिने म्हणे झोपेच्या गोळ्या घेतल्या. तिला हॉस्पिटलमधे नेलं म्हणे. आई गं...मला धक्काच बसला. वाटवेला जास्त काही माहिती नव्हतं. पण मग शाळेत गेल्यावर हळूहळू सगळं कळलंच. तिनी चिठ्ठी लिहून ठेवलीये आणि चिठ्ठीत मांजरेकरसरांचं नाव आहे म्हणे. हे काहीतरी वेगळंच. तिला सर आवडतात हे तर सगळ्यांना माहिती होतंच, पण म्हणून झोपेच्या गोळ्या घ्यायच्या? दिवसभर शाळेत लक्षच लागलं नाही. सारखा आंबेकरचाच विचार मनात येत होता. मग मला एकदम आक्का काय म्हणाली होती ते आठवलं. मुकुंद जोशीबद्दल आक्काला सांगितलं होतं तेव्हा. अर्थात मी तिला आम्ही क्लास सुटल्यावर त्या पिंपळाखाली भेटतो, एकदा गणपतीच्या देवळातही भेटलो होतो वगैरे सांगितलं नव्हतंच, नाही तर तिने उगाचच ताईगिरी सुरू केली असती. हल्ली पहिल्याइतकी करत नाही म्हणा. पण तरी तिला मी फक्त एवढंच सांगितलं की तो खूपदा माझ्याकडे बघत असतो, क्लासलाही यायला लागलाय, कधीकधी क्लासनंतर आम्ही बोलत असतो वगैरे. तेव्हा म्हणाली, या गोष्टी एवढ्या सोप्या नसतात. मोठी झालीस की कळेल तुला. आंबेकरचा विचार करताना माझ्या लक्षात आलं, की पिक्चरमध्ये दाखवतात तसं हे सोपं नसतं.

त्या दिवसानंतर हळूहळू सगळं बिनसतच गेलं. परीक्षा तर जवळ आली होतीच, आणि परीक्षा संपली तरी नंतर थोड्या दिवसांनी दहावीचा क्लास सुरू होणार होता. अर्थात आधी वार्षिक परीक्षेचा अभ्यास तर करायला हवाच होता ! मांजरेकर सर असताना निदान भूगोल आणि नागरिकशास्त्र तरी सोपं वाटायचं. आता तेही नव्हते. गणिताचा क्लास होता म्हणून बरंय. पण इंग्लिशची तर भीतीच वाटते, आणि ते रसायन आणि भौतिकपण कसले किचकट आहेत. मराठी आणि हिंदी मात्र मला आवडतं. मीपण आक्कासारखी कॉमर्सलाच जाणार, म्हणजे मग ह्या रसायन आणि भौतिकपासून सुटका होईल. जीवशास्त्र छान आहे. पण मुलं उगाच त्या पिरेडला फालतूपणा करतात. तो म्हात्रे तर मवालीच वाटतो. पवार तसा चांगला आहे, त्याच्याकडे भाजी आणायला गेलं की तो व्यवस्थित बोलतो. चित्रे पण सीन्सियर वाटतो. पण जोशी आणि हे सगळे त्या बिल्डिंगवर जमून मुलींची टिंगलटवाळी करायचे. मला आधी सरवटेने सांगितलं होतंच, पण मग त्या गीता शेणॉयला चिडवताना तर मी एकदा प्रत्यक्षच बघितलं. मी जोशीला एकदा म्हटलंसुद्धा, तू नको तिथे बसत जाऊ. पण मुलांना मुलींबद्दल काहीतरी अचकटविचकट बोलायला आवडतंच. माझ्याबद्दल पण असंच काहीतरी बोलत असतील का ते तिथे बसून? पण आक्का म्हणाली होती की जी मुलं सहज आपल्या घरी येतात, आपल्या घरच्यांशी व्यवस्थित बोलतात, ती चांगली असतात. म्हणून तर आक्का तिच्या मित्रांना घरी बोलवत असते. मलापण असंच आवडतं. उगाच बाहेर कुठेतरी चोरून कशाला भेटायचं? त्यामुळे जोशी घरी आला होता तेव्हा मला मस्त वाटलं होतं.

पण थोड्या दिवसांनी जोशी आणि म्हात्रेने म्हणे आठवीतल्या त्या गुप्तेची शाळेच्या रस्त्यावरच छेड काढली. मला मधल्या सुट्टीत समजलं. म्हात्रेने तर तिचा हातच धरला असं मिरीकर म्हणत होती. तो म्हात्रे त्यातलाच आहे. पण जोशीसुद्धा? आणि जोशीचं नाव आलं की मुली हळूच माझ्याकडे बघत होत्या. मला कसंतरीच वाटत होतं. त्या दिवशी सिनेमाच्या भेंड्या खेळताना उलट मला मस्त वाटलं होतं मुलं त्याला माझ्यावरून चिडवत होती तेव्हा. पण आज जणू मीच काहीतरी गुन्हा केलाय असं वाटत होतं. मला खूप वाईट वाटलं. मग त्या दिवशी मी मुद्दामच क्लासला गेले नाही. क्लासचा शेवटचा दिवस होता, पण मला तो समोर दिसायलाच नको होता. नंतर शाळापण थोडेच दिवस होती. मला कितीतरी वेळा लक्षात आलं होतं तो माझ्याकडे बघत होता ते, पण मी त्याच्याकडे अजिबात बघितलं नाही. अभ्यास तर होताच. पेपर्स तसे बरे गेलेत. बघूया काय होतं ते. बाबा म्हणत होते, तुझा रिझल्ट लागल्यानंतरचं तिकीट काढू का म्हणून. पण मीच नको म्हटलं. नाहीतरी ते लीव्हिंग सर्टिफिकेट लगेच मिळालं नसतंच आणि आक्काचा रिझल्ट तर कितीतरी उशीराने आहे. बाबाच नंतर येऊन ही सगळी कामं करतील.
रिझल्ट तर आलाच आता चार दिवसांवर. थांबलो असतो तर? जोशीबरोबर नीट बोलून त्याचा निरोप घेतला असता. पण त्यामुळे काही फरक पडला असता का? त्याच्याबद्दल आधी जे वाटायचं ना, ते आता कुठेतरी विरघळून गेलंय...स्काऊट गाईडच्या कॅंपमध्ये रात्री शेकोटीभोवती बसलो असताना किती सुंदर वाटत होतं..जादू झाल्यासारखं. ती सगळी जादू आता संपलीये असं वाटतंय.
अय्या..गाडी कधी सुरू झाली ते कळलंच नाही.स्टेशन बरंच मागे गेलं वाटतं.

(’शाळा’ या मिलिंद बोकील यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर ’फॅन फिक्शन’ या प्रकारात केलेलं हे लेखन आहे. सदर लिखाण करण्यापूर्वी मी श्री. मिलिंद बोकील यांची परवानगी घेतलेली आहे.)

बंगळूर महाराष्ट्र मंडळाच्या सनविवि या मासिकात मी गेल्या वर्षी लिहिलेली ही कथा आहे. या मासिकाची 'साहित्योन्मेष' नावाची, वर्षभर चालणारी स्पर्धा होती. दर महिन्यात विविध विषयांवर लेख/कथा लिहायच्या होत्या. स्पर्धेत मला तिसरं पारितोषिक मिळालं Happy या स्पर्धेसाठी लिहिलेले काही लेख इथेही आणण्याचा माझा इरादा आहे. इथे ते प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल सनविवि मासिकाच्या संपादक मंडळाची मी आभारी आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, छान लिहिली आहे!

ह्यावर पिक्चर आहे हे आत्ताच कळलं >> मी पिक्चर आधी बघितला होता तेव्हा बरा वाटला होता. पण नंतर पुस्तक वाचलं तेव्हा लक्षात आलं की त्यातली खरी जी गंमत आहे ती पिक्चरमध्ये दाखवणं अवघडच आहे. तिथे केवळ जोशीचं भावविश्व नाही, तर त्याला समांतर शाळेत होणारे बदल, समोरच्या बांधकाम चाललेल्या इमारतीतले बदल आणि वेगवेगळ्या ऋतूंमधून जाणार्‍या वातावरणातले बदल हे सगळे एकमेकांत गुंफलेले आहेत. शेवटी परीक्षा येते तेव्हा शिरोडकरचं जाणं, उन्हाळ्यातला रखरखीतपणा, माणसांच्या वागण्यात आलेला रखरखीतपणा - हे सगळेच एकदम अंगावर येतात; त्यांचा एकत्रित इफेक्ट होतो आपल्यावर वाचताना. ते पिक्चरमध्ये कसं दाखवणार!

जमलंय की.
तेव्हाचा काळ लक्षात घेता शिरोडकरच कुंपणावर असणं फार खटकलं नाहीच.

ह.पा., एकदम बरोबर!
शाळा न वाचलेल्यांनाही ही कथा कळली आणि आवडली हे वाचून बरं वाटलं Happy
सायो, क्लोजर Happy आधी माझ्या मनात होतं की वीसपंचवीस वर्षांनी कुठल्यातरी निमित्ताने जोशी आणि शिरोडकरची परत भेट घालून द्यायची ! बघूया, जमलं तर तसंही करून पाहीन.

मी अश्विनी, तुमचा दृष्टिकोन वाचायला आवडला. पण मला वाटतं की मग ती परत मुकुंद जोशीची शाळा होईल Happy

वावे, ती भेट त्यांच्या आयुष्यात २०-२५ वर्षांनी होते की आत्तापासून २०-२५ वर्षांनी भेट घालून देणार आहात?

भारी लिहिले आहे. शाळा वाचुन संपवली तेव्हा पुढे काय झाले असावे अशी हुरहूर लागली होती. जोशी ने तिला शोधायचा प्रयत्न केला असेल का? बाकी मित्र नंतर काय करत असतील? शिरोडकर कुठे गेली? असले अनेक प्रश्न ..
जमलं तर पुढे नक्की लिहा.

सुरेख लिहिलं आहे.
शाळा, x वर्षांपूर्वी वाचल्याने अंधुक आठवतेय.

Pages