मराठी भाषा गौरव दिन २०२३ - जी ए कुलकर्णी - पिंगळावेळ - शंतनु बेडेकर

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 27 February, 2023 - 11:59

बहुतेक गंगाधर गाडगीळ जी.एं.ना दु:खाची काळी वर्तुळे गिरवणारा लेखक म्हणाले होते. जी.एं.नी खरोखर तीच ती दु:खाची वर्तुळे गिरवली. पण त्यांचे प्रत्येक वर्तुळ आपले स्वतंत्र अस्तित्व घेऊन लखलखत बाहेर आले. त्यांचे निळासावळा, हिरवे रावे, पारवा, रक्तचंदन, काजळमाया असे एकाहून एक सरस कथासंग्रह १९६० ते ७५ या १५ वर्षांत प्रकाशित झाले. यातल्या बर्‍याश्या कथा त्यावेळच्या नियतकालिकांतून, दिवाळी अंकांतून प्रकाशित झाल्या होत्या. नियतकालिकांतील त्यांच्या सर्व कथा संग्रहातून प्रकशित झाल्या आहेत की काही रत्ने निसटून गेली ते माहीत नाही. उजवेडावे असा भेद करता येणार नाही इतके सरस त्यांचे सर्व कथासंग्रह आहेत. कोणत्याही संग्रहातील कोणतीही कथा काढून कधीही वाचावी, ती मनाला भिडली नाही असे माझ्या बाबतीत तरी कधी झाले नाही. तरी देखील १९७५साली प्रकाशित झालेला त्यांचा 'पिंगळावेळ' हा कथासंग्रह माझ्या खास जिव्हाळ्याचा आहे.
"Shallow people demand variety - but I have been writing the same story throughout my life, every time trying to cut nearer the aching nerve." ऑगस्ट स्ट्रिन्डबर्ग नावाच्या स्विडिश नाटककाराच्या या अवतरणाने हा संग्रह सुरू होतो. वर म्हटल्याप्रमाणे जी. ए. स्वतःच इथे आव्हान देतात की ते दु:खाची काळी वर्तुळे गिरवणार आहेत, वाचकाची हिंमत असेल तरच त्याने हात घालावा. तीच ती दुखरी नस ते वारंवार डिवचणार आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर जत्राबाजारातला सवंग खेळ नाही हा, इथे अस्सल दु:खाचा जहरी घोट मिळणार आहे.

गांडू नशीब आणि त्यासोबत येणारी हतबलता हे पिंगळावेळमधील कथांचे समान सूत्र आहे. पण ते नुसते एकषीय सपाट फुटके नशीब नाही. प्रत्येक कथेतल्या नायकनायिकेच्या आयुष्यात असा एक निर्णायक प्रसंग येतो ज्याने त्यांच्या आयुष्याची घडीच बदलून जाते. त्या प्रसंगी त्याने/तिने वेगळा मार्ग निवडला असता तर? आयुष्याची फरपट झाली असती की नाही? की कोणताही मार्ग निवडला असता तरी फरफट नशिबी लिहिलीच होती? का तो निर्णय तसाच घेणे हे नशिबातच लिहिले होते? नेमके माणसाच्या हातात त्यातले काय आहे? का सगळे नशिबातच लिहून ठेवलेले आहे आणि आपण फक्त कळसूत्री बाहुल्या आहोत? बौद्ध तत्त्वज्ञानात दु:ख हे अस्तित्वाचे एक प्रमुख अंग आहे. जगात दु:ख भरलेले आहे याची जाणीव ही प्राथमिक पायरी आहे. जीएंच्या कथांतून मला त्या बौद्ध तत्त्वज्ञानाच्या पहिल्या पायरीची अनेकदा अनुभूती येते.

ऑर्फियस, स्वामी, कैरी, वीज, फुंका, तळपट, मुक्ती, कवठे, घर, यात्रिक आणि लक्ष्मी या अकरा कथा पिंगळावेळमध्ये आहेत. या सगळ्या कथा १९७३-७५ या काळात विविध नियतकालिकांंतून प्रकाशित झालेल्या आहेत. या सर्वच कथा दीर्घकथा म्हणता येतील इतक्या मोठ्या आहेत. प्रत्येक कथा किमान १७-१८ पानांची आहे. स्वामी, कैरी आणि वीज या तीन कथा तर ३५-३६ पानांच्या आहेत. एकापाठोपाठ येणार्‍या या तीन दीर्घकथा माझ्या मते जीएंच्या प्रतिभेचे लखलखते शिखर आहे. आज या क्षणी जरी मी मेलो तरी या तीन दीर्घकथा मी वाचल्या या विचाराने मी आनंदाने मरेन. पानांची संख्या नमूद करण्याचे कारण हे की तत्कालीन नवकथा परंपरेतील एका छोट्याश्या प्रसंगातून फुलवत नेलेल्या या कथा नसून प्रत्येक कथा हे एक भरभक्कम चिरेबंदी नाट्य आहे.

रमलखुणामधील प्रवासी, एस्किलार या दीर्घकथा तसेच सांजशकुनसारख्या संग्रहातील कथा व इतर अनेक कथांतून रूपककथा हा प्रकार जी.एं.नी विविध प्रकारे हाताळलेला आहे. पिंगळावेळमधल्या ऑर्फियस, मुक्ती आणि यात्रिक या तीन कथा रूपक कथा म्हणता येतील. ऑर्फियस नावाप्रमाणेच ग्रीक मिथकावर आधारित कथा आहे तर 'यात्रिक' ही कथा डॉन क्विहोटे या सर्वांटेसच्या प्रसिद्ध स्पॅनिश कादंबरीतील डॉन आणि त्याचा सेवक सांको पान्झा यांच्यावरील जीएंचा 'टेक' आहे. 'मुक्ती' ही एकलव्याच्या कथेतून फुटलेली एक कथा आहे. ऑर्फियस आणि यात्रिक यांच्या मागचे मूळ संदर्भ माहीत असले तर या कथांचे भिडणे कदाचित वेगळ्या पातळीचे होईल. माझे या पार्श्वभूमीच्या संदर्भांबाबतचे ज्ञान फारच जुजबी आहे. एकुणातच मला कुठेतरी या सर्व रुपककथांत जी.ए. थोडेसे - कणभर - कृत्रिम वाटतात. या दोनतीनच नव्हे तर त्यांच्या इतर संग्रहांतील रूपककथांचा अवकाश मला थोडा कृत्रिम वाटतो. इंग्रजीतून लिहिणार्‍या अनेक भारतीय लेखकांसारखा. पण जेव्हा त्यांच्या कथा 'कडेमणी' कंपाउंडच्या आसपासच्या परिसरात घडू लागतात तेव्हा मात्र तो परिसर जिवंत होऊन चलचित्रासारखा डोळ्यासमोरून हलू लागतो.

पिंगळावेळमधल्या वीज या बळवंत मास्तराच्या कथेतले देऊळ, तळपट कथेमधली माळावरची कृष्ण गोल्ल गारुड्यांची वस्ती, फुंकामधले गाव आणि तीत हिंडणारी जोगतीण, मुक्ती कथेतले कपिलेश्वराचे देऊळ, मिशन हॉस्पिटल असलेले 'घर' नावाच्या कथेमधले गाव - ही वर्णने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातल्या मिरज, म्हैशाळ, जत, गदग, जमखिंडी, निपाणि, कागल, संकेश्वर, हुबळी, धारवाड, रामदुर्ग, चिक्कोडी, उगार, कुडची, घालवाड, बोलवाड, अथणी या गावांची जिवंत आठवण करून देतात. कदाचित या भागातला म्हणून मी माझ्या आठवणी या कथांतील वर्णानांवर सुपर-इम्पोज करत असेन. कसेही असले तरी या कथा वाचताना मी मध्ये उभा आहे आणि माझ्यासमोर हे घडते आहे असे वाटत राहते. सिद्राप्पाचे दुकान मला म्हैशाळ रस्त्यावरच्या शेवकांडी चहाच्या खोपटात दिसते. फुंकामधला माळ नरवाड - लोकुर गावांच्या बाहेर असलेल्या मुरुमाच्या माळासारखा दिसतो.

या अवकाशात घडणार्‍या घटनांची वर्णने जी.ए. त्या कथापात्रांच्या भाषेला प्रामाणिक राहून करतात. नाटकासिनेमात काम करणारा कसलेला नट जसे भूमिकेचे बेअरिंग सोडत नाही म्हणतात, त्याप्रमाणे जी.ए. त्या त्या कथेच्या नायका/नायिकेचे व भवतालाचे बेअरिंग कुठेही सुटू देत नाहीत. वीज ही कथा बळवंत मास्तराची आणि त्याची आई गोदाक्काची. गावात एके दिवशी सर्कस येते, त्यात ट्रॅपिझवर काम करणार्‍या एका शरीराने भरलेल्या सुंदरीच्या मोहात पडून बळवंत मास्तर घरदार नोकरी सोडून सर्कशीबरोबर हिंडू लागतो. आयुष्य पलटवणार्‍या एका क्षणी त्याच्या हातून चूक घडते आणि ती सर्कससुंदरी त्याला हाकलून लावते. वेडसर, अर्धवट झालेला बळवंतमास्तर परत गावी येतो आणि एका देवळाच्या आवारात आपले बस्तान मांडतो. तिथे तो लहान मुलांना कधी सर्कशीतल्या म्हणून, पण खरे तर केवळ त्याच्या कल्पनेतल्या गोष्टी सांगतो. तर कधी रात्रीबेरात्री त्याच्या स्वप्नात प्रसंग घडतात. या कविकल्पनांत, स्वप्नांत बळवंतमास्तर अतुलनीय शौर्याचे प्रदर्शन करून सर्कससुंदरीचे मन वळवण्याचा प्रयत्न करतो. बळवंतमास्तराच्या मनात त्या सुंदरीविषयी प्रामुख्याने वासनेची भावना आहे; तिला प्राप्त करून भोगण्याची इच्छा आहे. पण वेडसर झालेला बळवंतमास्तर बोलण्यावागण्यात शाळेतल्या मुलाच्या पातळीला आला आहे. हे जे द्वंद्व आहे ते शब्दातून जी.एं.नी फार प्रभावी उभे केले आहे. बळवंतमास्तर कधी उंच शिखर महत्प्रयत्नांनी सर करतो, कधी हिंस्र पाशवी तीन डोक्यांच्या कुत्र्याची कत्तल करतो. बळवंतमास्तराच्या मनात घडणार्‍या या घटना शालेय मुलांसारख्या फँटसी आहेत. त्याच्या वेडसर अवस्थेत तो एका बाजूला शालेय मुलासारखा आहे. पण हे सर्व तो करतो आहे ते वासनेच्या एका तीव्र ओढीने. संपूर्ण कथेत हे बेअरिंग जी.एं.नी टिकवलेले आहे.

कैरी ही कथा जी.एं.च्या इतर सर्व कथारत्नांमध्येही झळाळून उठणारा कोहिनूर हिरा आहे. तुती आणि कैरी या जोडकथा. तुती 'हिरवे रावे' या कथांसंग्रहात आहे. तिसरीचौथीत असलेल्या एका मुलाच्या कुटुंबाची झालेली वाताहत तुतीमध्ये आहे. आई, वडील, मोठी बहिण सुम्मी आणि मोठा भाऊ दादा हे सगळे एकामागोमाग एक दुर्दैवाच्या फेर्‍यात अडकून मरतात आणि तो अनाथ होतो. तुती ही कथा संपते तेथे कैरीची सुरुवात होते. कथानायकाचा शिंपीकाम करणारा श्रीपूमामा आपल्या दुसर्‍या बहिणीकडे - तानीकडे - या लहान अनाथ मुलाला सोपवतो. तानीमावशीच्या आयुष्यालाही तडे गेलेलेच आहेत. जेमतेम काही दिवसांच्या या मावशीभाच्याच्या सहवासाची ही कथा. तुती + कैरी या दोन कथा कुटुंबाच्या ससेहोलपटीच्या आहेत, सच्छील कुटुंबांच्या फुटक्या नशीबाच्या आहेत, चांगले वागणार्‍याला देव/दैव सुखी ठेवतात या भूमिकेच्या चिंधभूर्‍याणार्‍या आहेत. पण या दोन्ही कथांत एकही प्रौढ शब्द येत नाही. लहान मूल 'आज' मध्ये, वर्तमानात जगत असते. भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची चिंता करण्याची समज त्याला अजून आलेली नसते. वर्तमानात घडणार्‍या घटना त्याच्यासाठी महत्त्वाच्या असतात. शाळेत कुणी मारले, शर्ट फाटला, चप्पल तुटली, सहलीला जाता आले नाही या गोष्टी त्याच्या आयुष्यात केंद्रस्थानी असतात. अनाथ गरीब असलेल्या मला उद्या चांगल्या कॉलेजात जाता येणार नाही, माझे आयुष्य हे भिकार खडतर दु:खी असणार आहे हे आजच लिहून ठेवले आहे; ते त्या कथानायकाच्या ध्यानी अजून आलेले नसते. या दोन्ही कथांत सर्व अवकाश या मुलाच्या नजरेतून येतो. मात्र कुठेही प्रत्यक्ष न लिहिता जी.ए. त्याच्या आयुष्याची आजची आणि उद्याची हतबलता गडद रंगवत जातात. कसलेल्या चित्रकाराप्रमाणे चित्रात समोर एक प्रमुख विषय चितारतात पण रंगाच्या कुंचल्याच्या मोजक्या फटकार्‍यांनी मागे एक मोठे अवकाश उभे करतात.

आयुष्याला पडलेले दुर्दैवाचे वेढे आणि त्या दुर्दैवाची मगरमिठी दाखविण्यासाठी जी.ए. साप, अज,,र नाग यांचे रूपक वारंवार दाखवतात. फुंका, तळपट, लक्ष्मी, कवठे या कथांतून साप वारंवार येतात. तळ न दिसणारी खोल विहीर, नशिबाच्या भोगांना कंटाळून विहिरीला जवळ करणे हे देखील अनेक कथांतून येते. वीज मध्ये गाय विहिरीत अडकते, लक्ष्मी कपिलेश्वराच्या देवळामागचा डोह जवळ करते; तर कैरीमध्ये राजेसाहेबांची विहीर त्या मुलाला भीती घालते. साप, विहीर ही रूपके वारंवार येत असली तरी ती प्रत्येक कथेत आपपल्या स्वतंत्र बाजाने येतात, त्यात तोच तोचपणा नाही.

नशिबाने सगळीकडून फाट्यावर मारले असले तरी प्रत्येकाच्या आयुष्यात एक निर्णायक क्षण येतो आणि त्या क्षणी जो निर्णय घेतला जातो त्याने आयुष्य उलटेपालटे होऊन जाते. नोकरी सोडून तडकाफडकी बळवंतमास्तर सर्कससुंदरीच्या मागे जातो, तळपट मध्ये दानय्या दुसर्याने पकडलेला नाग घेऊन स्वतःचा म्हणून फिरवायचे ठरवतो, फुंकामध्ये जोगिणीचा जग चोरून विकण्याचा निर्णय संगा घेतो - या सगळ्यांत तो 'एक' क्षण त्या प्रत्येकाच्या आयुष्यात 'झळाळून' येतो. इंग्रजीत ज्याला 'फ्लॅश' होतो म्हणतात तसे. पण त्या क्षणी घेतलेला निर्णय आयुष्याचा पार चोळामोळा करून टाकतो. तो निर्णय कोणी घेतला? त्या माणसाने घेतला आणि म्हणून पुढल्या घटनांना तो जबाबदार? की त्याने तो निर्णय त्या क्षणी तसाच घ्यायचा हे पण नियतीनेच ठरवून टाकले होते आणि म्हणून नियती जबाबदार? हे सूत्रदेखील जी.एं.च्या या कथांमध्ये वारंवार येते. याचे उत्तर जी. ए. वाचकावर सोडतात. या कथा वाचणे हे एक प्रकारे या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रवास आहे.

स्वामी ही दीर्घकथा एक खोल, तळ न सापडणारी विहिर आहे. वाचनाच्या प्रत्येक वेळी ती एक वेगळा अनुभव देते. ही कथा कशाचे रूपक आहे? मनुष्याच्या अंतिम क्षणाचे? मरण्याच्या प्रक्रियेचे? मरून पुन्हा जन्म घेण्याचे? पुनर्जन्माच्या शृंखलेत पुन्हा गर्भात जाउन बसण्याचे? विविध वाचकांकडून मी या कथेबाबत वेगवेगळे इंटरप्रिटेशन ऐकले आहे. ही कथा कशाचे रूपक आहे, रूपक आहे का वगैरे प्रश्नांची उत्तरे जी.एं.नी वाचकावर सोडली आलीत. पण कथेच्या ओघात जी.ए. अनेक गहन विषयांवर भाष्य करतात. कथानायक जेव्हा मठाच्या तळघरात कोंडला जातो व ह ळूहळू स्थळकाळाचा संदर्भ हरवून बसतो तेव्हा त्याची मनोवस्था वर्णन करताना ते ध्यानावस्थेचे व ध्यानाच्या प्रक्रियेचे वर्णन करतात. त्या तळघरातून फुटलेल्या वेलीच्या कोंबातून जगण्याच्या, आयुष्याच्या चिवट दोरीची सत्यता दाखवतात. मी म्हणजे कोण, माझे आयुष्य हे केवळ माझे की माझ्याबाबतीत विचार करणार्‍या इतरांचे? मी सुरू कुठे होतो व संपतो कुठे? माझ्या जगण्याच्या अर्थासाठी बाह्य गोष्टींची - इतर लोक, प्राणी,
सूर्य, तारे, आकाश, झाडे - यांची गरज आहे की नाही? असे अनेकोनेक प्रश्न स्वामी कथा मांडते. त्यांच्या उत्तरांचा शोध हे वाचकाचे बक्षीस.

पिंगळावेळ मधील कथांचे मला भावलेले अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या दीर्घकथा असूनदेखील कुठे पसरट झालेल्या नाहीत. त्यांतील रूपके नेमकी आहेत. एक शब्द अधिक वा उणा नाही. वीज मधल्या कृष म्हातारी गोदाक्का चालत येते याचे वर्णन ते "या अंधारात आपले अंगच कोठेतरी हरवले आहे असे वाटून ते शोधीत असणार्‍या एखाद्या मोठ्या पक्ष्याप्रमाणे ती दिसत होती," असे करतात. लक्ष्मी या कथेची नायिका एक गरीब गृहिणी आहे. तिला व तिच्या मुलांना नेहेमी खाण्याची भ्रांत आहे. तिच्या सावत्र मुलाविषयी तिच्या मनात येणारा विचार लिहिताना जी.ए. "पण घरात तो न शिजलेल्या दाण्यासारखा राहिला," अशी चपखल शब्दयोजना करतात. सावत्र मुलासोबत नात्यात ओलावा नाही हे अनेक वेगवेगळ्या उपमा वापरून दाखवता येईल. पण एका गरीब बाईच्या, जिच्या डोक्यात नेहमी खाण्याच्या आबाळीचे विचार आहे, तिने केलेले वर्णन न शिजलेला दाणा यापेक्षा चपखल असू शकणार नाही. तळपट या कथेचा नायक दानय्या गारुडी आहे. पुढच्या पिढीतील मुले या कामाला घाबरून नाग पकडायचे सोडून शेतावर मजुरीला जातात. याचा राग दानय्या "पोराच्या अंगात रक्त आहे की गाढवाचे मूत" अश्या पद्धतीने व्यक्त करतो. हे वाक्य एखाद्या डॉक्टरच्या तोंडी विजोड दिसेल. पण दानय्याच्या तोंडी ते अकृत्रिम येते.

त्यांच्या कथांतील प्रमुख पात्रांबरोबरच इतर पात्रांची पार्श्वभूमी कमीत कमी शब्दांत - कधी कधी तर काहीही न लिहिता - ते उभी करतात. आजकाल ओटिटी प्लॅटफॉर्मवर मोठा कॅनवास उपलब्ध असतो; तेव्हा सिरीजमध्ये अश्या पार्श्वभूमीवर येणार्‍या कथांना 'आर्क' म्हणतात. जी.एं.च्या अनेक कथांत अश्या आर्क येतात; पण अगदी नेमक्या शब्दांत. घर या कथेत मधुकाकांच्या बरोबरीने त्यांची बायको, देशापांडे डॉक्टर, मधुकाकांचे आईवडील - सर्वांचेच आयुष्य आणि त्याची वाताहत समोर येते. वीज मधली गोदाक्काच्या आयुष्याची परवड तिचा अजून एक कर्तासवरता मुलगा तरुणपणी मेला आहे या एका पुसट वाक्यातून उभी राहते. त्यासाठी त्यांना परिच्छेद खर्ची घालावा लागत नाहीत. कवठे या कथेतला अर्धवट दामू व अंगाने भरलेली कमळी यांतला प्रणयप्रसंग एकही - अक्षरशः एकही शब्द न लिहिता त्यांनी उभा केला आहे. तो प्रसंग या कथेचा उत्कटबिंदू आहे. पण त्या प्रसंगाचे वर्णन एका शब्दानेही येत नाही.

पिंगळावेळमधील जी.एं.च्या या कथा त्यांनी त्यांच्या प्रतिभेच्या सर्वोच्च क्षणी लिहिलेल्या आहेत. केवळ दोनतीन वर्षांंच्या कालावधीत प्रसवलेल्या या एकाहून एक सरस कथा वाचणे हा एक विलक्षण अनुभव आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर एका प्राचीन (काल्पनिक) शिलालेखातील अवतरण छापलेले आहे. त्याची सुरुवात आहे Stranger, think long before you enter. जी.ए. जणू वाचकाला धमकीच देतात की स्वतःच्या जबाबदारीवर आत या. आतला प्रवास सुखाचा नाही. तुम्हाला या प्रवासात झगडावे लागेल. पण जर आत आलात तर या मार्गावर प्राचीन झाडांच्या मुळांचा शोध घेण्याची संधी तुम्हाला मिळेल.

अश्या प्रवासाची तुम्हाला आवड असेल तर जी.एं.चे बोट धरून पिंगळावेळ मधून तुम्ही सुरुवात करू शकता.

शंतनू बेडेकर (टवणे सर)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर! पिंगळावेळ अनेक वर्षांपूर्वी वाचले आहे. तुमचा लेख वाचल्यावर परत मिळवुन वाचावेसे वाटले. सुरेख लिहीले आहे.

सुंदर परिचय!

जीए वाचून अनेक वर्षे झाली. पिंगळावेळ वाचले आहे पण आता काहीच लक्षात नाही. आता पुन्हा वाचायची उत्सुकता आहे.

सुंदर लिहिलं आहे.
खूप वर्षं झाली हे पुस्तक वाचून. 'स्वामी' वाचताना अक्षरशः घुसमट जाणवलेली आठवतेय!
देवमाशाची शिकार हा प्रकार 'वीज' या कथेतच आहे का?

सुंदर लिहिले आहे.

आतला प्रवास सुखाचा नाही. तुम्हाला या प्रवासात झगडावे लागेल. ....... अगदी तसेच वाटते.काही वर्षांपूर्वी दुसऱ्यांदा हे पुस्तक वाचताना खिन्नता आली होती.स्वामी ही कथा वाचताना तर गुदमरल्यासारखे वाटले होते.

जी. एं च्या सर्व कथांमध्ये एक समन सूत्र आहे.ते म्हणजे नियती! नियतीच्या पुढे कोणाचे काही चालत नाही हे वारंवार त्यांच्या कथेतून जाणवते.

सुरेख.

या लेखाचे बोट धरून सुरुवात करणार ! जी.ए. कुलकर्णीं जे थोडेफार वाचले ते आता आठवत नाही.

फारच सुंदर लिहिले आहे टण्या. जी ए वाचताना एका अनोळखी भुयारात शिरल्यावर जी घुसमट होते, भीती वाटते यातून आपण कधी बाहेर पडू शकू का नाही अशी तगमग होते ती तंतोतंत पोचते आहे या लेखातून.

सुंदर परिचय!
मी जि ए कधीच वाचले नाहीत पण आता वाचायची उत्सुकता निर्माण झालीये!

मी आजपर्यंत कुणा एका लेखकावर जीव ओवाळून टाकला असेल, तर तो लेखक म्हणजे जी ए...
बाकी लेखक वाचताना मी सतरा ठिकाणी लक्ष देईन, पण जी ए वाचताना सगळा जीव त्यांच्या शब्द आणि शब्द यावरच गुंतलेला...
लेख छान झालाय, पण खूप काही लिहायचं राहून गेलंय असं वाटतंय.

जी.एं.चं हे पुस्तक आणि बाकीची पुस्तकं वाचली आहेत. तेव्हाचा सुन्न अनुभव लक्षात आहे.
शंतनु बेडेकर, तुम्ही खूप आतून आणि समजून लिहीलं आहे. अर्थात जी.एंच्या पुस्तकाबद्दल जाताजाता, वरवर असं लिहिता येणारही नाही. ते प्रकरण मुरवावं लागतं.

जीएंची एकावेळी एकच कथा वाचता येते. त्यानंतर अशीच घुसमट होते. त्यामुळे त्यांची बरीच पुस्तक वाचुनही सगळ्या कथा वाचल्या आहेत का नाही
नक्की माहित नाही.
बरेचदा प्रतिमा बंबाळ पणात अडकुन जायला होतं. तेव्हा ते सोडून देऊन पहिल्या वाचनात अर्धीच कथा समजते असं अर्धंच समजल्या कारणाने परत वाचताना वेगळंच जाणवलेलं ही आहे. पिंगळावेळ आहे इथे, परत वाचायला उद्युक्त केलं लेखाने.

जी ए फार कमी वाचले आहे.
मुळात माहितीच नव्हतं फारसं.
माबोवर वाचून आणि लोकसत्ता मध्ये लेख वाचून कळालं.
मग पिंगळावेल विकत घेतलेलं.
अडकत गेलो हळूहळू.
एक कथा वाचून लगेच पुढची कथा वाचायला घेणे मला तरी शक्य नाही झाले.डोक्यात ती कथा, त्या पात्राचं साचलेपण, त्यातून बाहेर पडण्याची धडपड, पदरी येणारी निराशा आणि एका क्षणी सगळं झुगारून एक निर्णय हे घोळत राहायचं.
जी ए कमीत कमी शब्दात वैराण निसर्ग, पात्राचे खुजेपण, गरिबी सपकन वार करत पोहोचवतात असे वाटले.
पिंगळावेळ देखील माझं पूर्ण वाचून झालय का आठवत नाही. तेव्हाच्या माझ्या मनस्थिती मध्ये ह्या कथा वाचून कुठेतरी फोल आहे सगळं ही भावना वरचढ होत होती मग ब्रेक लागला तो लागलाच. अर्थात नंतर तर वाचन अत्यल्प लेवल वर आहे.
परत सुरू करेन आणि पिंगळावेळ सुरू करेन.

खूप छान ओळख! किंडलवर घेतलं हे पुस्तक आत्ताच.

या उपक्रमासाठी धन्यवाद! त्या निमित्ताने या पुस्तकांची ओळख होईल. जी ए कधी वाचेन वाटलं नव्हतं कारण ती भाषा समजायला थोडी जड आहे असं वाटायचं.

आधुनिक मराठी साहित्याचा आढावा घेतला तर कथालेखकांमध्ये जी.ए. कुलकर्णी हे नाव ठळकपणाने पुढे येते. जीएंनी कथा, अनुवादित कथा व कादंबर्‍या, रूपक कथा -जीएंच्या भाषेत ‘दृष्टांत कथा’- असे बर्‍याच प्रकारचे लेखन केले असले तरी त्यांची मराठी साहित्यविश्वातली पहिली ओळख कथालेखक अशीच आहे. जी.ए.कुलकर्णी यांच्या कथांचे विषय, त्यांची मांडणी, त्या कथांमधील भाषाशैली, त्या कथांमध्ये येणारे विविध संदर्भ, त्या कथांची सांकेतिकता व त्यांतील व्यक्तिरेखांचे चित्रण हे जीएंच्या कथांचे विशेष गुण आहेत. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर, जयवंत दळवी, द.मा. मिरासदार, पु. भा. भावे इत्यादी आधुनिक मराठी लघुकथेच्या शिल्पकारांच्या रांगेत असलेले जी. ए. कुलकर्णी बहुप्रसव लेखक नव्हते. रंजकता या परिमाणाने लोकप्रियता मोजायची झाली तर जीएंच्या कथा त्यांच्या समकालीन लेखकांच्या कथांइतक्या लोकप्रियही झाल्या नाहीत. जीएंच्या कथांवर ‘गूढ, अगम्य’ असे शिक्के बसले. तरीही जीएंच्या कथेने मराठी साहित्याच्या इतिहासावर न पुसल्या जाणार्‍या पाऊलखुणा उमटवल्या आहेत. जीएंचा असा एक खास वाचकवर्ग आहे. जीएंच्या निधनाला आता बत्तीस वर्षे होऊन गेली तरी जीए मराठी वाचकाच्या विस्मरणात गेलेले नाहीत. जीएंचे लेखन आजही वाचले जाते, त्यावर चर्चा केली जाते, त्याचा अभ्यास केला जातो. मराठी कथाविश्वाच्या इतिहासात जीएंना बरेच वरचे स्थान आहे.
जी. ए. कुलकर्णी यांचे मूळ गाव कर्नाटकातील एकसंबा हे होते. त्यांचा जन्म १० जुलै १९२३ रोजी बेळगाव येथे झाला. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणही बेळगावात झाले. १९४५ ते १९४६ या दरम्यान त्यांनी ‘बी. के. मॉडेल हायस्कूल, बेळगाव’येथे नोकरी केली. १९४६ ते १९४७ ते नोकरीसाठी मुंबईला गेले. त्यानंतर १९४७ ते १९४९ या दरम्यान त्यांनी ‘बसवेश्वर आर्टस आणि सायन्स कॉलेज’, बागलकोट येथे नोकरी केली. त्यानंतर १९४९ ते १९५० या दरम्यान त्यांनी ‘कॅनरा आर्ट्स ऍन्ड सायन्स कॉलेज, कुमठा’ येथे नोकरी केली. त्यानंतरचा १९५० ते १९७८ हा प्रदीर्घ काळ ते ‘जनता (जनता शिक्षण समिती) कॉलेज,धारवाड’ येथे इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम करत होते. येथूनच ते विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. १९८५ साली ते धारवाडहून पुण्याला आले. पुण्यात ११ डिसेंबर १९८७ रोजी वयाच्या पासष्टाव्या वर्षी त्यांचे निधन झाले.
जीएंच्या लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यांच्या वडीलांनी दुसरे लग्न केले होते. जीएंच्या लेखनात त्यांच्या सावत्र भावाचा उल्लेख आढळतो. जीएंना पितृसुखही फार काळ लाभले नाही. इंदू व सुशीला या त्यांच्या सख्ख्या बहिणी होत. या दोघींना जीएंनी त्यांचा ‘निळा सावळा’ हा कथासंग्रह अर्पण केला आहे. “इंदू, सुशी व जाई या तीन आठवणींना” अशी ती अर्पणपत्रिका आहे. जीएंसोबत बराच काळ व्यतीत केलेल्या त्यांच्या नंदा पैठणकर या त्यांच्या मावसबहिणीच्या मते जाई हे त्यांच्या बहिणींच्या एखाद्या मैत्रिणीचे नाव असावे. जीएंचा ‘निळासांवळा’ हा कथासंग्रह १९५९ साली म्हणजे त्यांच्या ३७ व्या वर्षी प्रकाशित झाला. त्याआधी १९५७ मध्ये जीएंच्या इंदू या बहिणीचे निधन झाले होते व त्याच्याही आधी १९५१ मध्ये त्यांची बहीण सुशीला मरण पावली होती. त्यानंतरच्या आयुष्यात जीए धारवाडला प्राध्यापकी करायला आल्यानंतर त्यांनी त्यांच्या नंदा व प्रभावती सोलापूरकर या मावसबहिणींना आपल्याकडे बोलावून घेतले. धारवाडमध्ये बरीच वर्षे जीए त्यांच्या या दोन बहिणींसोबत कडेमनी कांपाऊंड, माळमड्डी येथे राहात होते. त्यानंतर १९७३ साली नंदा सोलापूरकर या नोकरीनिमित्त पुण्यास आल्या व पुढे श्री. सुधीर पैठणकर यांच्याशी विवाहबद्ध होऊन पुण्यातच स्थायिक झाल्या. १९७८ साली जीए निवृत्त झाले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढत गेल्या. १९८५ साली काहीसे त्यांच्या मनाविरुद्धच त्यांना नंदा पैठणकर यांनी पुण्यात आणण्याचा निर्णय घेतला. पुण्यात आल्यानंतरही जीएंच्या प्रकृतीचे चढउतार चालूच राहिले. ९ डिसेंबर १९८७ रोजी त्यांना काही तपासण्या करण्यासाठी पुण्याच्या जोशी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आणि तेथेच जीएंनी ११ डिसेंबर १९८७ च्या पहाटे शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या रोगाचे निदान होऊन तो रक्ताचा कर्करोग असल्याचे ध्यानात आले.
जीएंच्या जडणघडणीचे साक्षीदार आणि त्यांचे वर्गमित्र असलेल्या पांडुरंग ना. कुमठा यांनी लिहिलेल्या ‘विस्मरणांतील स्मरणं’ या लेखावरून जीएंच्या व्यक्तिमत्वावर बराच प्रकाश पडतो. या लेखात कुमठा म्हणतात, “१९३९ साली आम्ही दोघे मॅट्रिकची परीक्षा पास झालो. आम्ही आर्टसला गेलो. बी.ए.ला दोघांनीही इंग्रजी हा विषय निवडला. अवाढव्य, देदीप्यमान लेखकांच्या साहित्यानगरीत जीएंच्या आणि माझ्या भेटीगाठी व्हायच्या. आणि या स्नेहाला चेकॉव्ह, टॉलस्टॉय, दायस्तोवस्की, रोमारोला, इलीयट असे विराटपुरुष साक्षी होते. वेळी अवेळी पुस्तकांवरच्या चर्चा रंगायच्या. जीएंची मतं अत्यंत तीव्र होती. हेमिंग्वे, क्रोनिन यांच्याबरोबरच लीकॉक, जेरॉम के जेरॉम, वगैरे जीएंचे आवडते लेखक होते. जीएंचा स्वभाव अंतर्मुख होता. वाचनात त्यांचे मन रमत असे. कॉलेजच्या दिवसांत जीएंना वाचनाची फक्त आवडच होती असे नव्हे तर त्यांचा वाचनाचा झपाटाही मोठा होता. जीए दिवसाला ५००-६०० पाने लीलया वाचून संपवत.”
अगदी लहानपणापासून सुरू झालेले जीएंचे वाचन उत्तरोत्तर विविधांगांनी बहरत गेले. रशियन, फ्रेंच, ग्रीक अशा अनेक भाषांमधील इंग्रजीत अनुवाद झालेले साहित्य जीएंनी वाचले होते. नंतर इंग्रजीबरोबरच जीएंनी मराठी आणि हिंदी पुस्तके, नियतकालिके वाचायला सुरुवात केली. जीएंच्या या प्रचंड व्यासंगाबरोबर त्यांनी त्या वाचनावर केलेल्या चिंतनामुळे आणि त्याला जोड म्हणून त्यांनी आपल्या लेखनावर घेतलेल्या कष्टांमुळे स्वत:ची स्वाक्षरी असलेले आणि वैश्विक परिमाण लाभलेले लेखन जीएंच्या हातून झाले असावे असे वाटते.

जीएंच्या लेखनाचा अभ्यास करताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा विचार कशासाठी हा प्रश्न उभा राहणे स्वाभाविक आहे. “The writing, not the writer” हे वाक्य जीएं. च्या पत्रलेखनात अनेक वेळा येते. वाचकांनी लेखकाला त्याच्या लेखनातून पाहावा, त्याच्यापलीकडे तो एक सामान्य माणूसच असतो. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याच्या वाचकांनी ढवळाढवळ करु नये असे जीएंचे मत होते. तथापि सार्वजनिक जीवनात, कलाक्षेत्रात प्रसिद्धी पावलेल्या लोकांबद्दल सामान्य माणसाच्या मनात कुतुहल असते. लेखकाचे लेखन आणि त्याचे वैयक्तिक आयुष्य याची सांगड घालण्याची सामान्य वाचकाची प्रवृत्ती असते. जीएंच्या गूढ, शोकात्म, कळायला अवघड अशा कथा वाचून खाजगी जीवनात जीए कसे असतील याविषयीचे कुतूहल वाचकांच्या मनात निर्माण झाले होते. माणसांत, गर्दीत मिसळण्याचा जीएंचा स्वभाव नसल्यामुळे सामान्य वाचकाच्या मनात जीएंचे व्यक्तिमत्व एखाद्या कोडयासारखे होऊन राहिले होते. जीएंच्या लेखनाचा अभ्यास करण्याआधी त्यांचे व्यक्तिमत्व, त्यातले खाजगीपण विस्कटू न देता, तपासून पाहावे अशी या प्रकरणामागची भूमिका आहे.
जीए माणूसघाणे नसले तरी ते जगमित्रही नव्हते. गप्पांचे फड जमवणे, स्वत:चा कंपू तयार करणे, प्रकाशझोतात राहाण्यासाठी प्रयत्न करणे, पारितोषिके, बक्षीसे यांसाठी गटबाजी करणे हे त्यांच्या स्वभावात नव्हते. आयुष्यात त्यांनी खाजगीपणाला फार महत्त्व दिले. समारंभ, सत्कार, साहित्यसंमेलने यांच्यापासून जीए लांब राहिले. काही अपवाद वगळले तर त्यांना स्वत:ला मिळालेले पुरस्कार घेण्यासाठीही ते गेले नाहीत. त्यांच्या वाचकांना भेटण्यासाठीही ते फारसे उत्सुक नसत. त्यांच्या लेखनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात ते त्यांच्या वाचकांच्या पत्रांना उत्तरे देत असत. पुढे त्यांनी तेही बंद केले. त्यांच्या परवानगीशिवाय, पूर्वनियोजित वेळ ठरविल्याशिवाय त्यांना भेटणे अशक्यच होते. शिष्टाचाराच्या त्यांच्या कल्पनाही अगदी काटेकोर होत्या. स्वयंपाकात लागणारी कोणतीही वस्तू कोणाकडूनही कधीही उसनी मागून आणू नये असा त्यांचा दंडक होता. साग्रसंगीत स्वयंपाक झालेला असताना बहिणी लिंबू आणायला विसरल्या म्हणून जीएंनी त्या दिवशी वरणभात खाल्ला नाही असे नंदा पैठणकर यांनी जीएंच्या आठवणींमध्ये लिहिले आहे. त्यांच्या कॉलेजात त्यांना त्यांच्या साहेबी पोषाखामुळे, इंग्रजी पद्धतीच्या शिष्टाचारांमुळे आणि कडक शिस्तीमुळे ‘ब्रिटिश मॅन’ असे म्हणत असत. जीएंच्या प्रयत्नामुळेच त्यांच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मासिक वेतन त्यांना स्टाफरूममध्ये बंद पाकीटातून सन्मानाने देण्याची पद्धत सुरू झाली. वागण्यातला अघळपघळपणा जीएंना खपत नसे.
जीए विद्यार्थिप्रिय प्राध्यापक होते. ही लोकप्रियता त्यांनी आपला व्यासंग आणि व्यावसायिकता यांतून मिळवली होती. त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये काटेकोर शिस्त बाळगली होती. उशीरा येणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गात प्रवेश मिळत नसे. त्यांच्या विषयाशी संबंधित त्यांनी वळणदार अक्षरांत लिहिलेल्या नोटस ते बरोबर आठ दिवस नोटीस बोर्डवर लावत असत. आठ दिवसांनंतर त्या नोटस बोर्डवरून काढून घेण्याची शिपायाला ताकीद असे. सिगारेटचे जबरदस्त व्यसन असणारे जीए स्टाफरूममधील एक लहानशी खोली सोडून महाविद्यालयाच्या आवारात कुठेही धूम्रपान करत नसत. त्यांना त्यांच्याकडे कुणीही सिगारेट मागितलेली चालत नसे, एवढेच काय त्यांच्या काडीवर दुसर्‍या कुणी सिगारेट पेटवलेली चालत नसे. एकूणच कुणीही अनाहूतपणे केलेली सलगी जीएंना खपत नसे. जीएंच्या साहेबी पोषाखासारखेच त्यांच्या डोळ्यांवर सतत असलेल्या काळ्या चष्म्याबद्दलही लोकांना कुतूहल होते. अनाहूत लोकांना न भेटण्याचा त्यांचा दंडक, त्यांच्या घराच्या फाटकाला सतत घातलेले कुलूप वगैरे गोष्टींमुळे जीए हे एक गूढ व्यक्तिमत्व झाले होते.
जीएंच्या अशा काटेकोर वागण्यामुळे त्यांना 'चमत्कारिक, विक्षिप्त, माणूसघाणा, तुसडा' अशा विशेषणांनी संबोधण्यात आले. जीएंनी त्याचीही फारशी पर्वा केली नाही. जीएंच्या कथाही नियतीवादी, शोकपर्यावसायी असल्याने स्वत: जीएही तसेच होते असाही लोकांनी समज करुन घेतला होता. तथापि हा जीएंचा तिरसटपणा नसून जाणीवपूर्वक स्वत:ला सामान्य पातळीवरच्या समाजापासून वेगळे ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता असे वाटते. असामान्य प्रतिभेचे धनी असलेल्या जीएंना आसपासच्या बुटक्या, खुज्या लोकांमध्ये वावरताना गुदमरल्यासारखे होत असेल हे जीएंचा एक व्यक्ती म्हणून अभ्यास करताना ध्यानात येते. सामान्य लोकांचे विचार, आवडीनिवडी, आनंदाच्या कल्पना हे सगळे सामान्यच असते असे जीएंना वाटत असे. “बाजीच: -ए-अत्फाल है दुनिया, मिरे आगे, होता है शब-ओ-रोज तमाशा मिरे आगे” असा मिर्झा गालिब यांचा एक शेर आहे. गालिबच्या या शेराचा अर्थ ‘हे जग म्हणजे एक लहान मुलांच्या खेळण्याचे मैदान आहे आणि दिवसरात्र माझ्यासमोर त्या मुलांचा तो बालीश, पोरकट खेळ सुरू असतो’ असा आहे. जी.ए.कुलकर्णी यांची मानसिकता तशीच असावी आणि त्यामुळेच सामान्य लोकांपासून त्यांनी स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवले असावे असे वाटते.
जीएंच्या कथा निराशावादी असतात, त्या वाचून माणसाचे मर्यादित सामर्थ्य आणि मानवी जीवनाची नियतीच्याच हातात असलेली सूत्रे अधोरेखित होतात, त्यामुळे जीएंचे लेखन वाचून नैराश्य येण्याचीच शक्यता असते हा जीएंच्या लेखनावर केला जाणारा एक सर्वसामान्य आरोप आहे. जीएंनी अशा बाबतींत कधी स्पष्टीकरण दिले नाही आणि आपली मते किंवा वर्तनही बदलले नाही. आपण आपल्या कथा लिहिण्यासाठी कष्ट घेतो तसेच कष्ट वाचकाने आपल्या कथा समजून घेण्यासाठी घ्यावेत असे त्यांना वाटत असे. जीएंचे बर्‍याच बाबतीत पूर्वग्रह होते. “माझे preferences आणि prejudices अत्यंत जबरदस्त आहेत” असे त्यांनी लिहिले आहे. अनोळखी लोकांना न भेटणे, सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होणे या गोष्टींमुळे जी.ए.कुलकर्णी या एक तुसडा, आढयताखोर आणि कमालीचा रुक्ष मनुष्य असावा असे सामान्य माणसाला वाटले तर त्यात काही नवल नाही. जीएंनी आपल्या हयातीत काही पत्रे सोडली तर स्वत:बद्दल काहीच लिहिले नाही. जीएंची ही पत्रे त्यांच्या निधनांनंतर प्रसिद्ध झाली. ‘माणसे: अरभाट आणि चिल्लर’ हे त्यांचे पुस्तक आत्मचरित्रपर असले तरी त्यात जीएंचे स्वत:चे वर्णन फार कमी आहे. शिवाय तेही जीएंच्या मृत्यूनंतरच प्रकाशित झाले. जीएंनी स्वत:चे फारसे फोटोही काढू दिले नाहीत. आपल्या पुस्तकाच्या नव्या आवृत्त्या काढण्याबाबतही जीए फारसे उत्साही नव्हते, किंबहुना त्यांनी बऱ्याच वेळा तशा आवृत्त्या काढण्याला नकार दिला होता. यातून एक विक्षिप्त मनुष्य ही जीएंची प्रतिमा निर्माण झाली होती. जीएंनी स्वत: या प्रतिमेचे खंडन करण्याचा कधी प्रयत्न केला नाही. जीएंची मुलाखत घेण्याचे अनेक प्रयत्न जीएंनी धुडकावून लावले. जयवंत दळवींनी जीएंची मुलाखत घेण्यासाठी पाठवलेल्या अनेक प्रश्नांपैकी जीएंनी अगदी मोजक्या आणि त्याही फक्त त्यांच्या लेखनाच्या संदर्भात असलेल्या प्रश्नांना त्रोटक उत्तरे दिली. शंकर सारडा यांना लिहीलेल्या पत्रात जीए म्हणतात, “ती मुलाखतीची जी भानगड आहे तिच्यातून मात्र मला मुक्त करा. त्यात विनयापेक्षा सरळ व्यवहारज्ञान आहे. मुलाखत म्हणताच क्षणभर आनंद होईल, पण नंतर मात्र माझे मित्र जे हसे करतील त्याला तोड रहाणार नाही. म्हणजे मुलाखत म्हणजे क्षणाचा आनंद पण अनंतकाळची ससेहोलपट होऊन राहील. तेंव्हा तो विचारच पूर्ण काढून टाका.”
जीएंच्या मृत्यूनंतर जीएंवर अनेक लोकांनी अनेक स्वरुपाचे लेखन केले. त्यामध्ये जीएंच्या लेखनाबरोबरच एक माणूस म्हणून जीए कसे होते याबातचे कुतुहल आणि तर्कवितर्क यावरच भर दिलेला दिसतो. फेब्रुवारी १९८८ च्या ‘ललित’ मासिकाच्या अंकात जयवंत दळवींनी ‘जीए!- एक विलक्षण माणूस’ हा लेख लिहिला. हा लेख त्यांच्या ‘परममित्र’ या पुस्तकात समाविष्ट आहे. १० जुलै हा जीएंचा आणि १४ ऑगस्ट हा दळवींचा जन्मदिन. त्यानिमित्ताने ‘अंतर्नाद’ मासिकाने दळवींचा हा लेख त्यांच्या ऑगस्ट २०११च्या अंकात पुनर्मुद्रित केला. दळवींचा आणि जीएंचा खूप वर्षांचा परिचय होता. या दोघांचा पत्रव्यवहार वाचला की हे दोघे मित्रच होते हे ध्यानात येते. जीएंच्या आर्थिक अडचणींच्या काळात दळवींनी ‘युसिस’ तर्फे त्यांना इंग्रजी कादंबऱ्यांच्या अनुवादाचे काम मिळवून दिले होते आणि त्या कादंबऱ्या कॉनरॉड रिक्टरसारख्या आवडत्या लेखकाच्या असल्यामुळे जीएंना ते काम करताना पैशाबरोबर आनंदही मिळाला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर दळवींनी जीएंच्या मृत्यूनंतर जीएंवर या लेखात ज्या बोचरेपणाने लिहिले आहे ते वाचून जीएंच्या आणि दळवींच्या चाहत्यांना नवल आणि वाईटही वाटले. दळवी लिहितात, “मला असे सांगण्यात आले की जीए पुण्यात पुणेकरांना चुकवीत काहीसे ‘भूमिगत’ असल्यासारखे राहातात. आपल्याला कोणी भेटावे असे त्यांना वाटत नाही. हाही जीएंचा आपल्या प्रतिमानिर्मितीचा किंवा प्रतिमेशी खेळण्याचा एक प्रकार होता हे मी पस्तीस वर्षांच्या अनुभवातून ओळखून होतो. जीएंना प्रत्यक्ष भेटीत मी एकदा म्हटले होते की तुम्ही जर उत्तम लेखक झाला नसता तर उत्तम ‘बुवा’ झाला असतात. जीए आयुष्यभर असेच काहीतरी करत आले होते. आपल्यावर कोणी काहीही मत देवोत, मला त्याची पर्वा नाही असे ते वारंवार म्हणत. पत्रातूनही लिहीत. पण मी त्यांच्या रूपककथांवर प्रतिकूल मत दिले तर ते फणा काढून चिडले. जीएंच्या सर्व कथांची भाषा जवळपास एकसुरी, काहीशी कृत्रिम आणि अवजड अलंकारांनी ठासून भरलेली असते. जीएंची सर्व पत्रे अघळपघळ, विस्तृत, अलंकारांनी भरलेली दिसतील. त्यांच्या अनेक पत्रांत लेखनासाठी खुणावणार्‍या अनुभवाचेसुद्धा ते वर्णन करतात ते जखमेच्या रूपाने. लचके तोडलेली जखम ताजी, लसलसती दिसली पाहिजे, रक्तामासांचा वास आला पाहिजे- एवढेच नव्हे तर जखमेतले हाडसुद्धा दिसले पाहिजे असे ते या एकाच भाषेत परत परत सांगतात. साहित्य अकादमीचे पारितोषिक परत करताना त्यांना जे अतोनात दु:ख झाले त्याचे कारण पारितोषिकाचे ते पाच हजार रुपये उडवून त्यांनी दिल्ली, हृषीकेश. हरिद्वार, वाराणसी वगैरे ठिकाणी बहिणींना घेऊन मुक्तपणे प्रथमच प्रवास केला होता. त्या आनंदावर विरजण पडले होते.”
वस्तुत: या पारितोषिकाबद्दल वाद निर्माण होताच जीएंनी ते पारितोषिक आणि त्याचे पैसे परत पाठवले होते. ते पारितोषिक परत घेण्याची साहित्य अकादमीची पद्धत नाही असे सांगून साहित्य अकादमीने ते पुन्हा जीएंना पाठवले. जीएंनी ते पुन्हा परत केले. असे तीन वेळा झाल्यानंतर साहित्य अकादमीने अखेर ते पारितोषिक परत घेतले. विशेष म्हणजे अप्पा परचुरे यांच्या ‘जीए नावाचे स्वप्न’ या पुस्तकाच्या परीक्षणात ‘जीएंनी साहित्य अकादमीच्या पारितोषिकाचे पाच हजार रुपये आणि दिल्लीपर्यंतच्या प्रवासाचे म्हणून मिळालेले ४२०.७० रुपये असे ५४२०.७० रुपये परत केले आणि त्या परतीच्या पावतीवर त्यावेळचे अकादमीचे चिटणीस प्रभाकर माचवे यांची सही आहे’ असे खुद्द दळवींनीच लिहिले आहे. दळवी लिहितात, “साहित्य अकादमी दिलेले पारितोषिक परत घेत नाही. तरीही जीएंनी हट्टाला पेटून त्या पारितोषिकाचे पाच हजार रुपये आणि दिल्लीपर्यंतच्या प्रवासासाठी मिळालेली रक्कम परत केली आणि अकादमीकडून पावती घेतली. त्यांनी पारितोषिक परत केल्यानंतरही काही संशयखोर लोक अकादमीने ते पैसे परत घेतलेले नाहीत असे बोलत. अप्पांनी या पुस्तकात त्या पावतीचे छायाचित्र छापून त्या प्रकरणाचा कायमचा सोक्षमोक्ष लावून टाकला आहे.”
दळवींच्या ‘जीए!- एक विलक्षण माणूस’ या लेखाचे खंडन करणारा एक लेख मी ‘अंतर्नाद’ च्या फेब्रुवारी २०१२ च्या अंकात लिहिला होता. मे २०१२मध्ये जीएंच्या भगिनी नंदा पैठणकर यांनीही अंतर्नाद मासिकात लेख लिहून वर उल्लेख केलेल्या लेखाला पुष्टी दिली आहे आणि जीएंनी साहित्य अकादमीला पारितोषिकाचे पैसे परत पाठवल्याच्या पावतीची प्रतही सादर केली आहे. तथापि साहित्य अकादमीने ते पारितोषिक परत घेतलेच नाहीत असा दावा करणारे एक पत्र भालचंद्र नेमाडे यांनी ‘अंतर्नाद’ मासिकाला लिहून हा वाद पेटता ठेवण्याचा प्रयत्न केला. असाच प्रकार यापूर्वी श्री. ग. वा. बेहेरे यांनी ‘सोबत’ मध्ये लिहिलेल्या लेखात केला होता व त्याला उत्तर म्हणून विजय पाडळकर यांनी ‘मराठवाडा’ च्या रविवार पुरवणीत ‘समानधर्मीयांचा ठणठणाट’ हा लेख लिहिला होता . या लेखाबद्दल श्री. पाडळकर म्हणतात, “एखाद्या लेखकाच्या निधनानंतर श्रद्धांजली म्हणून काढलेल्या अंकात असा लेख लिहिणे हे औचित्याला सोडून आहे.”
असाच वाद विद्या सप्रे-चौधरी यांनी जीएंच्या जीवनावर लिहिलेल्या ‘गूढयात्री’ या कादंबरीच्या प्रकाशनानंतर झाला होता. पण विस्तारभयास्तव त्या प्रकरणाचा सदर अभ्यासात समावेश केलेला नाही “जी.ए. कुलकर्णी हे एक गूढ होते यात शंका नाही. ते जिवंत असताना ही गूढता त्यांनी जोपासली होती आणि निर्माणही केली होती, त्यांची साहित्यिक श्रेष्ठता सर्वमान्य झाली नाही, आजही झालेली नाही, हेच त्यांना पाहिजे होते असे ते दाखवत” असे जीएंचे स्नेही म.द. हातकणंगलेकर यांनी लिहिले आहे. जीए अत्यंत संकोची होते आणि त्यांना कोल्हापुरी चपला आवडतात असे कळाल्यानंतर त्यांच्या एका स्नेह्यांने त्यांना त्यांच्या मापाच्या चपला भेट दिल्या तेंव्हा जीए अत्यंत अवघडून गेले आणि त्या चपलांचे पैसे त्या गृहस्थाला दिल्यावरच त्यांचे समाधान झाले असेही हातकणंगलेकर यांनी लिहिले आहे.
रेणू देशपांडे यांच्या मते “जीएंच्या साहित्याप्रमाणे त्यांचे खाजगी जीवनही अपवादात्मक होते यात वाद नाही. साहित्यिकाने जे सर्व साधारण लौकिक व्यवहार पाळले पाहिजेत अशी रसिकांची अपेक्षा असते ते जीएंनी कधीच पाळले नाहीत.त्यांनी कुतुहलखोरांच्या अपेक्षा धुडकावून लावल्या होत्या. ज्याला तऱ्हेवाईक तुसडेपणाही म्हणता येईल अशा अलिप्तपणाने ते लोकांशी अनेकदा वागले होते. नको असलेल्या व्यक्तींना टाळणे हे खरे तर प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असते. पण ते करत असताना एका सफाईदार चातुर्याची गरज असते. अशा चातुर्याचा अभाव असल्यामुळे की काय, पण जीएंकडून अनेक लोक दुखावले गेले.”
जी.ए.कुलकर्णी यांनी आपल्या खाजगी जीवनाविषयी जे काही थोडे लिहिले ते त्यांच्या सुहृदांना लिहिलेल्या पत्रांतून. या पत्रांमधूनही जीएंनी आपल्या आयुष्याचे किंवा त्यातल्या व्यक्तींचे केलेले वैयक्तिक उल्लेख सलग आणि तपशीलवार नाहीत. प्रसंगानुरुप किंवा संदर्भानुरुप काही गोष्टी जीए तुटकपणे बोलून गेले आहेत इतकेच. यापलीकडे आपले आयुष्य चारचौघांसारखेच आहे आणि त्याबाबत अगदी आपल्या वाचकांनीही फाजील चौकशी करु नये ही त्यांची स्पष्ट भूमिका आहे. जीएंचे खाजगी, आणि त्यामुळे त्यांचा लेखक म्हणून विचार करत असताना बिनमहत्त्वाचे तपशील सोडून देऊन या पत्रांतूनदिसणारे जीएंचे अफाट वाचन, चिंतन, त्यांचे आयुष्याविषयक तत्वज्ञान आणि त्यांचे जीवनाबद्दलचे बालसदृश कुतूहल हे थक्क करून टाकणारे आहे.
जी. ए. कुलकर्णींचा व्यक्ती म्हणून विचार करताना जीएंच्या स्वत:च्या आणि त्यांच्या अगदी जवळच्या लोकांच्या लेखनातून दृष्टीस पडणारे त्यांचे चित्र हेच प्रमाण म्हणून मानावे लागेल. जीएंचे वागणे कदाचित चारचौघांसारखे, सामान्य नसेलही. काही लोकांना ते चमत्कारिक, विक्षिप्तही वाटू शकेल, पण त्यांच्या लेखनाशी या सगळ्या गोष्टींचा काही संबंध नाही हे जीएंच्या अभ्यासकाला समजून घ्यावे लागते. जीएंचे पूर्वग्रह अत्यंत तीव्र होते. “मूकपणे, फार दुरून, स्वतः झिजत भयंकर उच्च प्रेम करणाऱ्या शरदचंद्रांच्या नायिका” त्यांना हास्यास्पद वाटत असत असे त्यांनी एका पत्रात म्हटले आहे. शरदचंद्र हे सुनीताबाई देशपांडे यांचे आवडते लेखक, पण सुनीताबाईंसोबत कित्येक वर्षे घट्ट मैत्री असलेल्या जीएंना शरदचंद्रांबाबत आपले मत बदलावे तर नाहीच, पण तपासून घ्यावे असेही वाटले नाही. पूर्णपणे नास्तिक वृत्तीच्या जीएंना संध्याकाळी घरात मुलांनी 'शुभं करोती' म्हणणे फार आवडत असे. तसेच घरासमोर घातलेली रांगोळीही त्यांना प्रिय होती. मानवी वर्तनाचा, भाषेचा, चालीरीतींचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास असणार्‍या जीएंना माणसांत मिसळणे आवडत नसे. अशी जी.ए. कुलकर्णी यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक सुप्त विसंगती होती.
स्त्रियांबाबतचा जीएंचा दृष्टीकोन दोन प्रकारचा होता. त्यांच्या लेखनात येणार्‍या आई, बहीण या भूमिकेतल्या स्त्रिया, परिस्थितीशी दोन हात करणार्‍या स्वाभिमानी, बाणेदार स्त्रिया आणि नशीबाशी, नियतीशी प्राणपणाने झुंजणार्‍या पण ही झुंज अपयशी ठरल्यानंतर निमूटपणे संपून जाणार्‍या स्त्रिया यांच्यांबाबत जीएंनी उदात्त भावनेने लिहिले आहे. आईचे, बहीणीचे, मावशीचे निर्भेळ प्रेम, त्यांच्या पोटांत असलेली उदंड माया याबाबत जीए अतिशय तळमळीने, अति नाजुकपणाने लिहितात. याउलट प्रेयसी, पत्नी आणि काही ठिकाणी अनैतिक संबंध राखणारी स्त्री या भूमिकेतली पात्रे रंगवताना बर्‍याच वेळा त्यांची लेखणी टोकदार आणि तिरकस होते.खाजगी जीवनातही त्यांची स्त्रियांबद्दलची मते जुनाट वाटावी अशी होती. “तीन चतुर्थांश अंग पूर्णपणे उघडे व उरलेले अर्धवट उघडे टाकून हिंडणाऱ्या हल्लीच्या पुष्कळ नायलॉन निर्लज्ज बायका पाहिल्या की मला मस्तकतिडीक उठते” असेही त्यांनी लिहिले आहे. स्वतःला धूम्रपानाचे तीव्र व्यसन असलेल्या जीएंना स्त्रियांनी सिगारेट ओढलेली अजिबात आवडत नसे. त्यांना भेटायला आलेल्या आणि त्यांच्या पाकीटातील सिगरेटी ओढणार्‍या एका स्त्रीबाबत त्यांनी त्यांच्या एका पत्रात कडवटपणाने लिहिले आहे.
“तंबाखू खाणारी, ओठांची कुंची करून बोलणारी, चहा न घेणारी, सतत साजुक प्रकृतीला जपणारी, सहा तास क्रिकेट कॉमेंट्री ऐकणारी, हेमामालिनीला स्वप्नसुंदर तर राहोच, पण सुंदरी समजणारी, अमिताभला नट समजणारी, पिवळा टाय बांधणारी माणसे आपल्याला आवडत नाहीत” असे जीए म्हणत. सकृतदर्शनी अमिताभचा एकही सिनेमा न पहाता जीएंचे असे मत का झाले असावे हे समजत नाही. जीन्स घालणाऱ्या मध्यमवयीन स्त्रिया, चपातीच्या कडा काढून टाकून फक्त मधलाच भाग खाणारे लोक, दुसऱ्याच्या घरी जाताना आपल्याबरोबर उगीचच दोन-तीन अनोळखी लोकांना बरोबर घेऊन जाणारे लोक, इंग्रजी सात हा आकडा लिहिताना त्यामध्ये आडवी रेघ काढणारे लोक हेही आपल्याला आवडत नाहीत असे जीएंनी लिहिले आहे. शुभ प्रसंगी आपण निरांजन लावतो, त्यामुळे वाढदिवस साजरे करताना मेणबत्ती विझवली जाते हेही त्यांना अशुभ वाटत असे. जीए हे असे पूर्वग्रहांचे गाठोडे होते. ते पूर्वग्रह अगदी वैयक्तिक, खाजगी असतात, शिवाय त्यांचा लेखकाच्या लेखनाशी काही संबंध नाही असे त्यांचे मत असल्यामुळे त्यांनी त्यांबाबत इतरांची पर्वा केली नाही. उलट ‘I live on prejudices’ अशीच त्यांची भूमिका राहिली.
पुणे हे जीएं चे नावडते गाव होते. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या मनाविरुद्ध त्यांना आयुष्यातली शेवटची काही वर्षे पुण्यातच काढावी लागली. “मुंबईला किमान समुद्र तरी आहे. पुणे हे शहर जास्त ऍक्टिव्ह माणसांसाठी आहे. व्यापार आहे, चळवळी, व्याख्याने, चर्चा, गच्चीवरच्या गप्पा, तळघरातील मसलती सतत काहीतरी घडत आहे. जर येथे एखादा माणूस कुठे, शांतपणे काही न करता बसलेला दिसला तर त्याला उचलून सरळ मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकतील की काय अशी मला भीती वाटते” असे त्यांनी लिहिले आहे. एकंदरीत बिनचेहऱ्याच्या, बिनओळखीच्या शांत गावात राहणे जीएंना आवडत होते. धारवाडात ते इतकी वर्षे राहिले, पण थोर मराठी साहित्यिक या अर्थाने त्यांना ओळखणारे धारवाडातही फारसे लोक नव्हतेच. हिंदी चित्रपटांविषयीचे त्यांचे मत अगदी वाईट होते. हिंदी चित्रपटात उद्या या गोष्टी दिसल्या तर त्यांवर बाकी विश्वास ठेवणे मला जमणार नाही म्हणून जीएंनी दिलेली यादी मनोरंजक आहे : “वेळेवर कपडे देणारा शिंपी, रात्री ताणून झोप न काढणारा नाईट वॉचमन, शोकेसमध्ये साडया मांडलेल्या असता तिकडे पाठ करून फूटपाथवर उभी असलेली स्त्री, वेणीफणी करताना तोंडात हेअरपिना न धरणारी बाई, साहेबावर आपले किती वजन आहे हे न सांगणारा पुरुष, आपणाला किती आजार आहेत हे न सांगणारा म्हातारा, एखाद्या जुन्या, मेलेल्या उंदराकडे पाहावे त्याप्रमाणे आपल्याकडे न पाहणारा बँकेतील बाजीराव कारकून, इंग्रजी चित्रपट पाहताना ‘काय म्हणाला हो तो? काय म्हणाली हो ती?’असे सतत न विचारणारी शेजारी बसलेल्या जोडप्यांपैकी नवपरिणिता, पेपर उघडतो न उघडतो तोच "झाला का पेपर?" म्हणत समोर ठिय्या न मांडणारा निगरगट्ट फुकटा वाचक शेजारी” असे ते वर्णन आहे. व्यवस्थितपणाविषयी त्यांनी चहा -साखरेचे डबे जेथल्या तेथे ठेवण्याचा गावठी गुण असे म्हटले आहे. बऱ्याच हळव्या गोष्टींमध्ये जीएंना 'गर्भवती स्त्रीचा खुळचट हळवेपणा’ दिसतो. पण अशी कडूजहर टीका करताना आपल्या आयुष्यातही (आणि म्हणून आपल्या लेखनातही) अशा 'हळवेपणाच्या खुळचट' जागा आहेत या कल्पनेने ते अस्वस्थ होतात. त्यांच्या कथांमधील गाय व बहिणीचे प्रेम ही अशीच एक जागा आहे. त्यांवरची टीका मात्र जीएंच्या जिव्हारी लागते आणि ते विषय 'टॅबू' असल्याने त्यांवर बिलकूल भाष्य करणार नाही असा त्यांनी पवित्रा घेतला आहे. आपल्या लहानपणी घरी गाय असे, त्यामुळे आपल्या लिखाणात गायीचे उल्लेख हे अपरिहार्य आहेत हे त्यांचे म्हणणे होते. मधू मंगेश कर्णिकांचे 'लागेबांधे' हे पुस्तक हळवे आहे, फारच हळवे आहे असे म्हणून एकंदरीतच साहित्यातील भाबडेपणावर आणि हळवेपणावर जीएंनी त्यांच्या एका पत्रात टीका केली आहे, पण तेच जीए, त्याच पत्रात, त्याच परिच्छेदात “वडिलांविषयी, आईबहिणींविषयी, घराविषयी हळवे व्हायचे नाही, तर कोणाविषयी?” असे विचारतात.
गांधीवादाविषयी जीएंची मते तीव्र आणि टोकदार होती. ऐंद्रिय सुखांना नाकारण्याचा गांधीवादातला हट्ट त्यांना पोरकट वाटत असे. “आत्मा चिरंतन आहे, आणि काळ अनंत आहे. ते आपले एकमेकांना सांभाळून घेतील! इंद्रिये माझे साथी आहेत, शत्रू नव्हे. काळाने माझ्यासमोर कापडाचा जो एक तुकडा टाकला आहे, त्यावर मी काही गिजबिज करीन. भाग्य असेल तर त्याचे एक चित्रदेखील होईल, पण त्याची भगवी लंगोटी मात्र करण्याचा खुळचटपणा मी करणार नाही” असे त्यांनी म्हटले आहे. मार्क्सवादाविषयीही जी. ए. लिहितात, “इतके अनाकर्षक, कोडगे, वैराण, हमाली तत्त्वज्ञान मला कोठे आढळले नाही. मार्क्सवादी तत्त्वज्ञान घर बांधायला मदत करते, पण त्या घरात राहावे कसे हे शिकायला अन्यत्र गेले पाहिजे.” संतसाहित्याविषयीही त्यांचे असेच जबरदस्त पूर्वग्रह आहेत. संतांचा मानवी स्वभावाशी अत्यंत कमी परिचय होता, म्हणून सगळे संतसाहित्य अत्यंत मर्यादित, कोते आणि ज्या त्या संताच्या व्यवसायाशी निगडित झाले आहे असे सरसकट विधान, 'स्वीपिंग स्टेटमेंट' ते करतात. “माळी विठ्ठलाला कांदामुळेवांगी समजतो; चांभार स्वतःला वहाणा समजतो – “हे विठ्ठला, माझ्या आयुष्यावर तुझ्या पावलांचा रंधा मार' असे एखाद्या सुताराने लिहिले आहे की काय हे शोधून पाहिले पाहिजे” असे जीएंनी म्हटले आहे. जीएंची शब्दकळा इतकी प्रभावी आहे की एखाद्याची साल काढायची म्हटली की त्याला अगदी रक्तबंबाळ केल्याशिवाय त्यांचे समाधान होत नसे. मर्ढेकरांच्या कवितांच्या समर्थनार्थ लिहिलेल्या या पत्रात त्यांनी काव्य हे कायम अर्थपूर्णच असले पाहिजे असे म्हणणाऱ्यांवर तिरकस शेरे मारले आहेत. ते म्हणतात, “अर्थासाठी तळमळणाऱ्या लोकांसाठी मामलेदाराच्या स्वागतासाठी शाळामास्तरांनी लिहिलेल्या स्वागतगीतांची एक सस्ती आणि घरेलू आवृत्ती कोणी अर्थवाला प्रकाशक प्रसिद्ध करील काय?”
सामान्यतः आपण वाचकाला केंद्रस्थानी ठेवून लिहीत नाही, वाचकाला आपली कथा आवडते आहे की नाही याच्याशी आपला सुतराम संबंध नाही, किंबहुना एखादी कथा लिहून झाल्यानंतर ती आपण वाचतही नाही, आपल्याजवळ आपल्या कथासंग्रहाच्या प्रतीही नसतात असे जीएंनी एका पत्रांत लिहिले आहे. तथापि जीएंना त्यांच्या रूपक / दृष्टांत कथा लोकांना आवडल्या नाहीत ही गोष्ट जिव्हारी लागलेली दिसते. आपण जे लिहितो, ते वाचकाला समजते / आवडते की नाही याबाबत आपण बेफिकीर आहोत म्हणणाऱ्या जीएंना आपल्या कथांमधील सूचकता वाचकाच्या डोक्यावरून जाते याचे काहीसे असमाधानही असावे असे वाटते. तथापि लोकांना समजावे म्हणून आपल्या लेखनाशी तडजोड करणे जीएंनी कधी जमले नाही. किंबहुना सामान्य वाचकांच्या सामान्य आवडीविषयी त्यांच्या मनात काहीशी तुच्छताच असावी असे वाटते. ‘माणूस नावाचा बेटा’ या त्यांच्या कथेतील दत्तू जोशीला त्याच्या वर्गातील मुले पुढे मोठी होऊन ‘आम्हाला समजेल असं वाङ्मय द्या हो! आम्हाला कळेल असं संगीत द्या हो!’ असे ओरडत हिंडणार असे वाटते, ते जीएंचे स्वत:चेच मत असावे असे वाटते. त्यामुळे कुणीही गणा गणपाने आपली कथा वाचावी आणि त्यावर आपापल्या मताची एक पिंक टाकून पुढे जावे यापेक्षा चारच पण जाणकार लोकांनी ती वाचावी असा त्यांचा प्रयत्न दिसतो.
जीएंच्या व्यक्तीमत्वातला हा परस्परविरोध त्यांच्या पश्चात प्रकाशित झालेल्या त्यांच्या पत्रांमधूनच दिसून येतो. आपली पत्रे अत्यंत खाजगी असावीत असा त्यांचा आग्रह असे. तथापि त्यांच्या पत्रांत प्रसिद्ध लेखकांचा पत्रव्यवहार त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाल्याचे उल्लेख आहेत. आपल्या मृत्यूनंतर आपला पत्रव्यवहार प्रकाशित होण्याची शक्यता जीएंच्या मनात आली नसेलच असे नाही. पण आपल्या हयातीत आपल्या बाबतीत असले कोणतेही वादंग उद्भवू नयेत असा त्यांचा काहीसा सावध पवित्रा दिसतो.
सामान्य वाचकाला, अगदी जीएंच्या चाहत्यांनाही जीएंचे आयुष्य हे जीएंच्या लेखनाप्रमाणेच गूढ वाटते आणि त्यांच्या मनात जी.ए.कुलकर्णी हा एक श्रेष्ठ लेखक पण चमत्कारिक मनुष्य होता असे चित्र उभे राहाते. एका पातळीवर हा वाचक जीएंच्या शोकपर्यावसायी कथांची जीएंना त्याला उमगलेल्या व्यक्तिमत्वाशी सांगड घालू लागतो. जीएंच्या कथा दु:खाने ओथंबलेल्या आहेत कारण तो माणूसही तसाच निराश, समाजाला विन्मुख झालेला, कोरडा होता असे काहीसे जीएंच्या वाचकाला वाटण्याची शक्यता आहे. जीएंच्या आवडत्या ‘दी रायटिंग, नॉट दी रायटर’ या सूत्रानुसार तसे वाटले तरी काही फरक पडत नाही.
जीएंच्या वैयक्तिक आयुष्याचे आता हयात असलेले साक्षीदार म्हणजे जीएंच्या भगिनी नंदा सोलापूरकर (सुनीता पैठणकर) आणि जीएंच्या अखेरच्या काळात जीएंच्या खूपच जवळ आलेले अप्पा परचुरे. यापैकी पैठणकर यांनी जीएंबरोबर आधी बेळगाव-धारवाडमध्ये व नंतर पुण्यात बराच काळ व्यतीत केला. नंदा पैठणकरांनी जीएंच्या रसिकपणाबद्दल, त्यांना असलेल्या आयुष्याबद्दलच्या ओढीबद्दल आणि त्यांच्या जिंदादिल वृत्तीबद्दल ‘प्रिय बाबुआण्णा’ या पुस्तकात खूप मनापासून लिहिले आहे. नंदा पैठणकर आणि त्यांच्या भगिनी प्रभावती यांच्यावरीलही आईवडीलांचे छत्र त्यांच्या लहानपणीच हरपले होते. त्यामुळे जीएंप्रमाणे त्यांनाही त्यांच्या मामाकडे बेळगावला येऊन राहाणे भाग पडले. त्यांच्या मामांचा स्वभाव अत्यंत शीघ्रकोपी असल्याने त्यांचे बेळगावातले दिवस अत्यंत त्रासात गेले. बेळगावच्या त्या त्रासदायक दिवसांत जीएंचा सहवास हा त्यांच्या आयुष्यातील मोठा विरंगुळा आणि आधार होता असे नंदा पैठणकर यांनी लिहिले आहे.
आपली मायेची माणसे हरपलेल्या जीएंनी प्रभावती व नंदा या आपल्या मावसबहिणींवर आपल्या मायेची ऊब अंथरली होती. जीएंच्या कथांमध्ये वारंवार येणाऱ्या बहिणीच्या प्रेमाच्या उल्लेखाचे मूळ कदाचित येथे सापडते. संतापी स्वभावाच्या मामांमुळे बेळगावात असताना जीएंना आपल्या बहीणींचे फारसे लाड करता आले नाहीत, पण ही कसर त्यांनी ते व त्यांच्या बहिणी स्वतंत्रपणे धारवाडला राहायला आल्यानंतर भरुन काढली. तथापि त्या वेळीही त्यांनी नंदाताईंना कॉलेजात प्रवेश घ्यायच्या वेळी जीए ज्या कॉलेजमध्ये नोकरी करत होते ते कॉलेज सोडून दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला सांगितले. आपल्या कॉलेजमध्ये आपली बहीण शिकत असेल तर इतर अध्यापक तिला आपली बहीण म्हणून झुकते माप देतील, आणि तसे होऊ नये म्हणून जीएंनी ही खबरदारी घेतली होती.
बेळगावात असतानाही जीएंनी आपले छंद आणि आपल्या आवडी जोपासल्या होत्या. बाजारातून भाजी आणि फुले आणणे ही त्यांच्या आवडीची गोष्ट होती. छोटी जांभळ्या रंगाची वांगी, गडद हिरव्या रंगाच्या छोटया ढब्बू मिरच्या, कोवळे नवलकोलचे गड्डे, मुळे, मुळ्याच्या शेंगा, फ्लॉवर, मटार अशा भाज्या, शेवंतीच्या, सुरंगीच्या वेण्या, चाफ्याची फुले आणणे त्यांना आवडत असे. मसाला भरुन केलेली वांगी, ढब्बू मिरच्या, नवलकोलची भाजी, मुळ्याच्या शेंगांची भाजी, मुळा घालून केलेली आमटी, मटारची उसळ हे त्यांच्या आवडीचे पदार्थ होते. बेळगावातल्या ‘मिलिटरी महादेवा’च्या देवळाला सहल म्हणून जाणे, तिथला आलेपाक फुटाण्याचे लाडू, उसाचा रस घेणे हा त्यांच्या आनंदाचा भाग होता. आलेपाक हा खास कर्नाटकी पदार्थ आहे. या आलेपाकाचा महाराष्ट्रात मिळणार्‍या आलेपाकाशी संबंध नाही. महाराष्ट्रात आलेपाक याचा अर्थ आले, साखर घालून केलेली वडी असा आहे. जीएंच्या लेखनात आलेला आलेपाक म्हणजे भरपूर कोथिंबीर, किसलेले ओले खोबरे घालून ‘वरून लावलेले’ पोहे. कर्नाटकात या शब्दाचा असा अर्थ आहे. महाराष्ट्राच्या कोल्हापूर-कागल भागात हा शब्द आजही याच अर्थाने वापरला जातो,
खाण्यापिण्याच्या बाबतीत जीए नुसते शौकीनच नव्हे तर मर्मज्ञ जाणकार होते. कोणते पदार्थ कसे करतात, कोणते पदार्थ कशाबरोबर खातात याचीही त्यांना चांगली माहिती होती. त्यांना मांसाहारी जेवण विशेष आवडत असे. त्यांच्या घरातले वातावरण सोवळे असल्याने जीए त्यांच्या आवडीचे जेवण बाहेरच घेत असत. पुण्यात त्यांना आवडते तशा मांसाहारी जेवणाचे निमंत्रण सुनीताबाई देशपांडे यांनी कितीतरी वेळा दिले होते. पण संकोची स्वभावाच्या जीएंनी काही ना काही कारणे -एकदा तर बाहेरचे जेवण न घेण्याचे व्रत असल्याचे ‘आक्रितान्ना’चे कारण सांगून- ते टाळले. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचीही त्यांना आवड होती. सरस्वती राणे, हिराबाई बडोदेकर, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, प्रभा अत्रे यांच्या रेकॉर्डस ऐकणे त्यांना आवडत असे. बडे गुलाम अली खाँसाहेबांची ‘का करु सजनी’ ही ठुमरी त्यांच्या अत्यंत आवडीची होती. “ज्योत्स्ना भोळे यांचे माझिया माहेरा जा’ हे गीत ऐकल्यानंतर पाचदहा मिनिटे काही सुचत नाही, एखाद्या वारुळात अंग चोरून बसल्यासारखे वाटते” असे जीए विजया राजाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात लिहितात. धारवाडला असताना जीएंनी काही सुंदर ऑईल पेंटिंग्ज केली होती. जीएंच्या ‘डोहकाळिमा’ या निवडक कथासंग्रहाचे मुखपृष्ठ हे त्यांचेच एक पेंटिंग आहे. शिल्पकलेमध्येही त्यांना रस होता. धारवाडला असताना त्यांनी दगडाच्या बुद्धप्रतिमेच्या आणि घोडयाच्या मूर्ती कोरल्या होत्या. बागकामाची तर त्यांना आवड होतीच. आपल्या घराच्या आवारातच नव्हे तर शेजारच्या पठाण वकीलांच्या आवारातही (अर्थातच त्यांच्या परवानगीने) त्यांनी सुंदर बाग फुलवली होती. एरवी अनोळखी माणसांना भेटायला नाखूष असणारे जीए अकल्पितपणे काही स्नेहबंधांमध्ये अडकले गेले होते. याच पठाण नावाच्या कुटुंबातील अताउल्ला नावाच्या छोटया गोंडस मुलाशी त्यांची गट्टी जमली होती.
जीए रसिक आणि शिस्तप्रिय होते. त्यांच्या कपडयांची निवडही साधी पण अभिरुचीपूर्ण असे. जीएंनी त्यांच्या धारवाडच्या घरात बडरिजर्स (लव्हबर्डस) आणि इतर काही पक्षी पाळले होते. त्यांची निगा, देखभाल, खाणेपिणे यासाठी खास पुस्तक मागवून त्यांनी त्या पक्षांचे जतन केले होते. ‘नाद’ आणि ‘वीणा’ अशी त्या त्या पक्षांची नावे होती. त्यातल्या ‘नाद’ चे आयुष्य संपल्यानंतर जीएंनी त्यांच्या भगिनी नंदा पैठणकर यांना एक व्याकुळ करणारे पण सुंदर पत्र लिहिले आहे. जीए लिहितात:
“प्रिय नंदा,
एक वाईट बातमी.
नादचे छोटे निळे आयुष्य शुक्रवारी संपले. चार दिवसांपूर्वी अचानक त्याच्या पायातील शक्तीच गेली. दांडीखेरीज तो इतर कुठे बसत नसे. त्यामुळे खालून वर जायच्या धडपडीत तो वरचेवर खाली पडायला लागला. मला स्वतःला असल्याबाबतीत काय करायचे माहीत नाही आणि येथे पक्षांच्याबाबतीत (पुण्या-मुंबईप्रमाणे) डॉक्टर मिळत नाहीत. आम्ही शक्य होते ते केले. प्रभावतीने त्याच्यासाठी खालीच कापडाची गादी केली व ती त्याला हातात धरून दाणेपाणी देत होती. गुरुवारी रात्री तर तिने त्याला रात्रभर हातावरच ठेवले, पण या साऱ्याचा काही उपयोग झाला नाही. मी त्याला हातात घेतले तेंव्हाच मी तिला सांगितले की हा दोन दिवसांपेक्षा टिकायचा नाही. तो आमच्याजवळ दहाअकरा वर्षे होता. त्या पक्षांचे वय बारा ते पंधरा वर्षे असते, असे मी वाचले होते. कदाचित वार्धक्यामुळे हे आज ना उद्या होणार होतेच, पण झाले तेंव्हा आम्हाला एकदम फार व्याकूळ वाटले हे खरे. दोन दिवसांत त्याला झालेला त्रास पाहून मला मात्र वाटले, जर तो सुधारणार नसेल, तर शक्यतो लवकर तो संपलेलाच बरा. तो घराचा एक भागच झाला होता. दोनचार चिमूट दाणे, थोडे पाणी, आणि कोथिंबीर एवढीच त्याची अपेक्षा, व तेवढयासाठी तो उत्साहाने गरगर फिरत असे. मुंबईला मी अनेक पक्षी पाहिले, त्यांत उत्साहाने तो एकदम पुढे आला, म्हणून मी त्याची निवड केली होती. तो वाढला, त्याला पिलेही झाली आणि आता सगळेच संपले.
सकाळी देवपूजेच्या वेळी घंटा वाजली की तो हटकून वरून ओरडत असे. आता मला सकाळी फार चुकल्यासारखे वाटते.
सगळ्याच गोष्टींची सवय होते त्याप्रमाणे या गोष्टीचीही सवय होईल.या आधीदेखील दोनचार पक्षी गेलेच. पण नादची गोष्ट निराळी. त्याच्या आठवणीने एकदम उदास वाटते. पण मुक्कामाचे दिवस ठरलेले असतात. आता अनेकदा वाटते, पक्षी वगैरे जिवंत गोष्टींच्या भानगडीत आपण पडायला नको होते, म्हणजे आपण होऊन आणलेली ही व्यथा सहन करावी लागली नसती.
पण मग त्याचे मऊ निळे अंग, त्याचे हातावर येऊन दाणे टिपणे आठवते, व व्यथेला मऊपणा आहे हेही जाणवते. त्याचे राहणे तेवढेच होते. ती आठवण मी आमच्या बागेत लिंबाच्या झाडाखाली झाकून टाकली.
बराय.
तुझा,
जी. ए. कुलकर्णी”
सोनेरी मासे असलेला अॅक्वॅरियमही जीएंच्या धारवाडच्या घरी होता. जीएंना चालण्याची, पायी भटकण्याची फार आवड होती. पुण्यात आल्यानंतर पुणे विद्यापीठाच्या शांत आवारात फिरुन यायला त्यांना फार आवडे. आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत नाईलाजाने पुण्याला आल्यानंतर त्यांना धारवाडच्या फिरण्याची फार आठवण येत असे. त्यांचे धारवाडचे मित्र श्रीपाद भिर्डीकर यांना लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात, “अशा वेळी धारवाड आठवते. युनिव्हर्सिटीकडील दोनचार रस्त्यांवर तीनचार मैल निरंजन मनाने चालले की जे एक समाधान होते, जो निरंजन आनंद होता तो इथे दुरापास्त नव्हे, तर मला केवळ अशक्यच वाटतो.” तरुण वयात कित्येक मैल पायी भटकंती केल्याची त्यांची वर्णने त्यांच्या अनेक पत्रांमध्ये आहेत. तरुण वयात जीएंना व्यायामाची आवड होती. बागकाम करताना जमीन तयार करण्यासाठी त्यांनी भरपूर शारिरीक मेहनत घेतली होती. आंघोळीचे पाणी तापवण्यासाठीचे लाकूड कुऱ्हाडीने फोडून त्याचे लहान लहान तुकडे (बंबफोड) करणे हे कामदेखील जीए उत्साहाने करत असत.
जगण्यातली रसिकता आणि नवनवीन गोष्टींबद्दलचे बालसदृश कुतुहल हा जीएंचा स्वभावगुण होता. नवीन लोकांना भेटने जीएंना फारसे आवडत नसले तरी लोकांशी त्यांचे वागणे सौजन्यपूर्ण व मार्दवयुक्त असे.अप्पा परचुरे हे ‘परचुरे प्रकाशन मंदिर’ चे ग. पां. परचुरे यांचे चिरंजीव होत. ‘युसीस’ पुरस्कृत अमेरिकेतील वैशिष्टयपूर्ण लेखकांच्या मराठी अनुवादाची पुस्तके परचुरे प्रकाशन मंदिरातर्फे प्रकाशित होत असत. तशी कॉनराड रिक्टर या लेखकाची पाच पुस्तके जीएंनी अनुवादित केली होती. तथापि अप्पा परचुरे यांचा जीएंशी प्रत्यक्ष परिचय फार उशीरा जीए पुण्यात आल्यानंतर म्हणजे जीएंच्या शेवटच्या काही दिवसांत झाला. परचुरे यांनी जीएंचे ‘मुग्धाची रंगीत गोष्ट’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. पुण्यात त्यांची भेट झाली तेंव्हा आपल्या ‘स्वागता’ साठी जीए स्वत: रस्त्यावर येऊन उभे राहिले होते. जीएंच्या संकोची स्वभावामुळे जीए नवपरिचित माणसांकडून काही भेट वगैरे घेत नसत. लोकांनी आदरापोटी वाकून नमस्कार करणेही जीएंना आवडत नसे, पण पुस्तके स्वीकारण्याचे मात्र त्यांना वावडे नव्हते. आपली पुस्तके खपली नाहीत तर आपल्या पुस्तकाच्या प्रकाशकांना पदरमोड करावी लागेल या संकोचामुळे जीए आपल्या पुस्तकांची आवृत्ती कमी संख्येची असावी असा आग्रह धरत असत. अगदी त्यांच्या पहिल्या ‘निळासांवळा’ या पुस्तकाची आवृत्तीही फक्त पाचशे प्रतींचीच असावी असा आग्रह त्यांनी धरला होता.
अप्पा परचुरेंशी बोलताना जीएंनी त्यांना साध्या ओल्या नारळाच्या खोबऱ्याचेही किती प्रकार असतात आणि ते कोणकोणत्या पदार्थांमध्ये वापरायचे असतात याचे तपशीलवार वर्णन सांगितल्याचे परचुरे यांनी लिहिले आहे. स्वत: चहापलीकडे कोणतेही पेय न पिणाऱ्या जीएंना (गोव्याला गेल्यानंतर कधीतरी एखादा पेला ‘पोर्ट वाईन’ किंवा ‘व्हरमॉथ’ घेतल्याची त्यांनी एका पत्रात कबुली दिली आहे) (अ) पेयपानाचे प्रकार आणि त्याच्या पद्धती याविषयी खूप माहिती होती. मद्याचे विविध प्रकार, त्यांतले घटक, त्यांचे गुणधर्म याची त्यांना माहिती होती. जी.ए.कुलकर्णी अविवाहित होते आणि त्याबाबत कुणी काहीही विचारलेले त्यांना आवडत नसे. पण त्यांच्या स्वभावात एकटेपणामुळे आलेला चिडचिडेपणा, चमत्कारिकपणा किंवा विचित्रपणा नव्हता असे परचुरे लिहितात. पुण्यात आल्यानंतर जीएंच्या पुस्तकाची मुद्रिते पोचवण्याचे काम करणाऱ्या बाळू रिक्षावाल्यालाही जीएंनी चहा, फराळ घेतल्याशिवाय कधी सोडले नाही. आपल्या प्रकाशकांचा एक नोकर असे जीएंनी त्याला कधीही वागवले नाही अशी एक आठवण अप्पा परचुरे यांनी सांगितली आहे. अप्पा परचुरे यांचा चुलतभाऊ चंद्रकांत परचुरे यांच्याशीही जीएंची मैत्री झाली होती. चंद्रकांत परचुरे हे आयुर्विमा मंडळात काम करणारे साधे गृहस्थ होते. साहित्य, वाचन लेखन वगैरे गोष्टींशी त्यांचा फारसा संबंधही येत नसे. तथापि आपल्या लाघवी स्वभावाने त्यांनी जीएंना जिंकून घेतले होते. चंद्रकांत परचुरे यांच्या आग्रहाखातर जीएंनी पुण्यात विविध डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यायचेही मान्य केले. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर परिचय झालेल्या अशा एका माणसाविषयी जीए अप्पांना लिहितात, “सी.के (चंद्रकांत परचुरेंना संबोधण्याचे जीएंचे नाव) मधून मधून भेटतात. भेटले म्हणजे वेळ चांगला जातो. त्यामुळे त्यांच्या बाबतीत दिवस, वेळ, आधी सूचना असल्या गोष्टी मी पूर्णपणे बाजूला ठेवल्या आहेत.”
बागकाम व फुलझाडे यांच्यात जीएंचा अर्धा जीव गुंतलेला असे असे परचुरे म्हणतात. पुण्यातल्या ‘राम रोजेस’ या नर्सरीचे वर्षातून एकदा भरणारे प्रदर्शन पाहून जीएंनी त्या नर्सरीचे मालक जगताप यांच्याशी फुले, बागकाम यावर मनसोक्त गप्पा मारल्या. जगताप यांचा चित्रकलेचाही अभ्यास असल्याने ते व जीए बोलता बोलता रेंब्रां- पिकासोपर्यंत येऊन पोचले. या गप्पांमध्ये जीएंनी फक्त स्वत:च्या लेखनाबद्दल चकार शब्द काढला नाही.
जीएंच्या निसर्गप्रेमाविषयी अप्पा परचुरे लिहितात “खरोखर निसर्गावर त्यांचे विलक्षण प्रेम होते. जीएंनी काढलेली निसर्गचित्रे याची साक्ष देतील. जीए हे एक उत्तम चित्रकार होते हे फार थोडयांना माहीत आहे. वृक्षवेली, झाडेझुडुपे इत्यादी नैसर्गिक गोष्टींचे त्यांना जबर आकर्षण होते. निसर्गवर्णने त्यांच्या कथांतून जागोजाग आपणांस वाचावयास मिळतील. त्यांना गुलाबपुष्पांचे विशेष आकर्षण होते. एकदा गप्पांत गुलाबाच्या फुलांचा विषय निघाला. जीए मला म्हणाले होते, ‘गुलाबपुष्प झाडावर पाहण्यात खरी मौज आहे. जर फूल तोडण्याचा मोह झालाच तर त्या झाडाला वेदना न होता पुष्प तोडावे’. जीएंच्या घरी पांढर्‍या मिरचीचे झाड होते. त्यांनी खास माझ्यासाठी पांढर्‍या मिरचीचे रोप तयार करून त्याची एक कुंडी तयार केली व मला भेट म्हणून दिली. ते रोप थोडे मोठे झाल्यावर कुंडीतून काढून ते मी आचार्य अत्रे सभागृहाच्या आवारात लावले. रोप जमिनीत लावताना कोणती काळजी घ्यायची, पाणी देताना कशा पद्धतीने द्यायचे याची तपशीलवार माहिती त्यांनी मला दिली. वनस्पतीशास्त्रात त्यांचे ज्ञान खरोखर अफाट होते. धारवाडच्या काळ्याभोर भुसभुशीत मातीची आठवण झाली की जीए प्रफुल्लित होत असत.”
स्वत:च्या कथासंग्रहांच्या दुसऱ्या आवृत्या काढण्याला नकार देणाऱ्या जीएंना ‘सीकें’नी गळ घालून त्यांच्या एका कथेचे आकाशवाणीवरुन वाचन करण्यासाठीची परवानगी मिळवून द्यायला लावली होती. त्याचे मानधनही घ्यायला संकोची स्वभावाचे जीए तयार नव्हते. शेवटी ही रक्कम जीए, ‘सीके’ आणि अप्पा परचुरे यांनी एकत्र जेवणासाठी खर्च करायची या अटीवर जीएंनी ती स्वीकारली.
जुने इंग्रजी चित्रपट ही जीएंच्या आवडीची गोष्ट होती. पुण्यात आल्यानंतर ‘केन ऍंड एबल’ हा चित्रपट व्हीडीओवर पाहून ते खूष झाले होते. धारवाड - बेळगावला असताना तर त्यांनी कित्येक इंग्रजी चित्रपट पाहिलेले होते. त्यांच्या पत्रांमध्ये व काही कथांमध्ये, उदाहरणार्थ ‘एक मित्र, एक कथा’ ही कथा, या चित्रपटांचे उल्लेख आहेत. शिवाय शिल्पकला, चित्रकला, सुतारकाम याचीही त्यांना आवड होती. त्यांनी काढलेली काही चित्रे पाहिली असता ते एक चांगले चित्रकार होते आणि होऊ शकले असते याची जाणीव होते. तथापि जगातल्या श्रेष्ठ चित्रकारांच्या चित्रांच्या प्रतिकृती पाहून व त्यांच्याविषयी वाचून जीएंना आपली चित्रकला सामान्य आहे असे वाटले व त्यांनी चित्रे काढणे थांबवले. याला काही लोक त्यांचा चमत्कारिकपणाही म्हणतील, पण आपल्या मर्यादा ओळखून योग्य त्या वेळी थांबणे हा एक कलावंत आणि माणूस म्हणून जीएंचा मोठा गुण आहे. लेखनाच्या बाबतीतही जीएंनी असेच केले. शेवटच्या दहा-बारा वर्षांत जीएंनी लेखन थांबवलेच होते. आपल्या लिखाणाच्या बाबतीत आपण कायम असमाधानीच राहिलो असे जीएंनी आपल्या अनेक पत्रांत लिहिले आहे. 'आपल्या बर्‍याचशा कथा म्हणजे एक प्रकारे आपण आपल्या आयुष्यात पाहिलेल्या व्यक्तींना वाहिलेले तर्पण आहे' असे ते म्हणतात, पण आपल्याला जे लिहायचे होते त्यातले काहीच कागदावर आले नाही अशी एक खंत त्यांना वाटत राहिली. कदाचित उत्तमोत्तम जागतिक साहित्य वाचल्यानंतर अशी खंत प्रत्येक विचारी लेखकालाच वाटत असावी. त्यातून आपल्याला आपल्या कथांमध्ये म्हणायचे काय होते, आणि वाचकांनी, समीक्षकांनी त्यांचा अर्थ काय लावला यातली तफावत त्यांना अस्वस्थ करून जात असावी. त्यामुळेच जीएंना अखेरीस Is it worth it? असा प्रश्न पडला असावा. त्यांच्या कित्येक पत्रांमध्ये त्यांनी कित्येक कथा (एक कादंबरीही) लिहायला सुरुवात करुन नंतर त्या लिखाणाबाबत असमाधानी राहिल्याने त्या नष्ट केल्याचे उल्लेख आहेत. युजीन‘ओ’नील च्या ‘लॉन्ग डेज जर्नी इन्टू दी नाईट’ या नाटकाचा ‘दिवस तुडवत अंधाराकडे’ हा केलेला अनुवादही त्यांना समाधानकारक वाटत नव्हता. म्हणूनच त्यांनी त्या हस्तलिखितावर ‘हे प्रकाशनार्थ नाही’ असे लिहून ठेवले होते. या नाटकाचा आपण केलेला अनुवाद त्यांना फारसा समाधानकारक वाटला नव्हता. इंग्रजी भाषेत तू-तुम्ही असा भेद नाही. या नाटकात बाप आणि मुलांचे बिघडत जाणारे संबंध व्यक्त करताना कोणती सर्वनामे वापरायची याबाबत ते गोंधळात पडले होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी रंगभूमीशी संबंधित अमोल पालेकर किंवा श्रीराम लागूंसारख्या एखाद्या माणसाने हा अनुवाद करावा आणि त्यावर आपले नावही असू नये असे जीएंनी रामदास भटकळ यांना सुचवले होते. पण जीएंच्या आजारपणामुळे आणि नंतर अकस्मात मत्यूमुळे ते राहूनच गेले. हा कच्च्या स्वरुपात असलेला पण तरीही अत्यंत प्रभावी अनुवाद अलीकडे प्रकाशित झाला आहे. ‘माणसे अरभाट आणि चिल्लर’ या पुस्तकावरही जीएंना अखेरचा हात फिरवायचा होता. तेही त्यांच्या आजारपणामुळे आणि आकस्मिक मृत्यूमुळे राहून गेले. जीएंच्या मृत्यूनंतर त्यांची ‘माणसे अरभाट आणि चिल्लर’(१९८८), कुसुमगुंजा (१९८९), आकाशफुले (१९९०), सोनपावले (१९९१), दिवस तुडवत अंधाराकडे (अनुवादित नाटक) (२०१४) इत्यादि पुस्तके प्रकाशित झाली
कोणत्याही कलाकाराच्या जीवनाचा आणि त्याच्या कलेचा अभ्यास करताना अभ्यासकाने त्या कलाकाराच्या जीवनापेक्षा त्याच्या कलाविष्कारांना अधिक महत्त्व दिले पाहिजे. त्यामुळे जीएंचे खाजगी आयुष्य कसे होते याला एका मर्यादेपलीकडे महत्त्व देण्याचे कारण नाही. तथापि जीएंच्या कथा हे जीएंच्या वैयक्तिक आयुष्यातील वैफल्याचे प्रतिक आहे असे मानणाऱ्यांसाठी हा अभ्यास महत्त्वाचा आहे. वैयक्तिक आयुष्य इतके समृद्ध असूनही मानवी जीवनातील दु:ख, पीडा, व्यथा यांच्या गाभ्याला स्पर्श करणे हे जीएंच्या चौफेर निरीक्षणाचे, त्यांच्या संवेदनशीलतेचे आणि त्यांच्या लेखनकौशल्याचे वैशिष्टय आहे हे यावरुन लक्षात येते.
जीएंच्या कथांमधील दु:खाचा धांडोळा घेताना जीएंना लहान वयातच आलेले पोरकेपण ध्यानात घ्यावेसे वाटते. त्यांच्या पत्रलेखनात त्यांच्या सावत्र भावाचा उल्लेख येतो, पण तेही काही फार घट्ट नाते नव्हते. जीएंना त्यांच्या प्रकृतीने कधी चांगली साथ दिली नाही. विशेषतः पन्नाशीनंतर त्यांना कित्येक वर्षांपासून छळणारी पोटदुखी अधिकच त्रासदायक होत गेली. जीएंची सांपत्तिक स्थिती खाऊनपिऊन सुखी असे म्हणण्यासारखी होती, पण त्यांनीही आयुष्यात गरीबीचे चटके सहन केले होते. तथापि त्यांनी पैशासाठी कुणाचे मिंधेपण स्वीकारले नाही. जीएंचा स्वाभिमान आणि बाणेदारपणा त्यांच्या रक्तातच असावा. त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईची ओळख सांगून एका बाईने दुसऱ्या बाईकडून तीन रुपये उसने घेतले होते. दोन महिने होऊन गेले म्हणून त्या पैसे देणाऱ्या बाईने जीएंच्या आईला विचारले. वास्तविक जीएंच्या आईने पैशाची जबाबदारी घेतली नव्हती, पण पैसे विचारताच जीएंच्या आईने हातातली एक पाटली काढून त्या बाईच्या माजघरात फेकली. त्या वेळी सोन्याचा दर एकोणीस रुपये तोळा होता आणि जीएंच्या स्वत:च्या घरी असंख्य आर्थिक अडचणी होत्या. नंतर तीन महिने ती शेजारीण ती पाटली परत देण्याचा प्रयत्न करत होती, पण जीएंच्या आईने ती स्वीकारली नाही. त्यावर कडी म्हणजे जीएंच्या आईने जीएंच्या वडीलांना ही गोष्ट सांगितली त्यावर ते म्हणाले ‘तुला योग्य वाटले ना? बस्स. आता झटपट जेवायला वाढ!’ जीएंच्या काही कथांमध्ये परिस्थितीने सामान्य, शिक्षण, उत्पन्न नसलेल्या पण स्वाभीमानी, बाणेदार स्वभावाच्या स्त्रियांचे चित्रण आहे. या स्त्रिया जीएंनी आपल्या आसपास, आपल्या घरातच पाहिल्या असाव्यात.
'काजळमाया' या जीएंच्या संग्रहाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले, पण काही तांत्रिक बाबींवरून त्यावर वादंग निर्माण होताच जीएंनी ते परत करून टाकले. या बाबतीत त्यांच्या असंख्य चाहत्यांनी, मित्रांनी, समकालीन लेखकांनी आणि शेवटी साहित्य अकादमीनेही केलेली रदबदलीचे प्रयत्न त्यांनी कठोरपणे धुडकावून लावले. ‘काजळमाया’ या पुस्तकाच्या पारितोषिकाच्या निमित्ताने त्यांना अनन्वित मानसिक त्रास झाला. त्यांच्या अनेक वाचकांनी, मित्रांनी , प्रकाशकांनी ते पारितोषिक त्यांनी परत करु नये असे आग्रहाने सांगितले, पण जीए या बाबतीत ठाम राहिले. या बाबतीत साहित्य अकादमीला लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपली भूमिका नम्रपणे पण सडेतोडपणे मांडली आहे.कुणाच्या घरी जेवायला जाणे की कुणा कडून कसल्या साध्या भेटी, मग ते त्यांच्या आवडीचे दुर्मिळ पुस्तक असो, की एखादे सिगारेटचे पाकीट असो, स्वीकारणे असो, जीए अत्यंत संकोची आणि अवघडलेले राहिले. आपल्या पुस्तकांचे सगळे अधिकार प्रकाशकाला देऊन टाकणे आणि आणि पुस्तकांची दुसरी आवृत्ती काढायलाही नकार देणे या अत्यंत अव्यवहारी गोष्टींमागेही त्यांचे हेच अवघडलेपण असावे, असे वाटते. अमोल पालेकरांनी त्यांच्या कथेवर चित्रपट काढण्यासाठी 'कैरी' या कथेचे अधिकार जीएंकडून विकत घेतले आणि त्याबाबत जीएंना काही रक्कम दिली; तर हा चित्रपट काढण्यास विलंब होत आहे असे दिसल्यावर जीए कमालीचे अस्वस्थ झाले. ही रक्कम पालेकरांना परत करण्याची त्यांनी म.द. हातकणंगलेकरांना विनंती केली.
अशा या स्वभावाच्या माणसाला व्यावहारिक जगात 'तयार' असलेल्यांनी धक्केही बरेच दिले. पैशांच्या बाबतीत त्यांची फसवणूक झाल्याचे किमान दोन पुसट उल्लेख त्यांनी लिहिलेल्या पत्रांत येतात. आपल्या पुस्तकांचे मुद्रण, त्याचे मुखपृष्ठ याबाबत अतिशय आग्रही काटेकोर असलेल्या जीएंना त्यांच्या काही चित्रकार मित्रांनी ऐन वेळी दगा दिल्याचे संदर्भ त्यांच्या लिखाणात आहेत. दळवींसारख्या जीएंच्या घट्ट मित्रानेही शेवटच्या काही वर्षांत जीएंची चौकशी करण्याचेही सौजन्य दाखवले नाही. आपल्या मृत्यूची चाहूल लागल्यानंतर जीएंनी स्वत:ला कोषात बंद करुन घेतले. मृत्यूआधी जेमतेम दोन-तीन महिने जीएंनी म. द. हातकणंगलेकरांना लिहीलेल्या पत्रात जीएंनी परिस्थितीशी केलेली तडजोड दिसून येते. हे बहुदा जीएंनी लिहिलेले शेवटचे पत्र असावे. यातील काही भागाचा प्रस्तुत अभ्यासकाने केलेला ढोबळ मराठी अनुवाद खालीलप्रमाणे:
“तुम्ही म्हणता, हातकणंगलेकर, की मी आता पुण्यात हळूहळू रुळत चाललो आहे. तुमचे म्हणणे अगदी चूक आहे. पुण्यात मी कधी रुळू शकेन, असे मला वाटत नाही. फक्त आता या बाबतीत मी कुणाशीही काही बोलायचे नाही, असे ठरवले आहे. विशेषतः प्रभावती आणि नंदाशी. त्यांना मग फार वाईट वाटते...”
स्वत:चे खाजगीपण जपण्याबाबत अतिशय काटेकोर असलेल्या जीएंचे व्यक्तिमत्व त्यांच्या मृत्यूपश्चात प्रकाशित झालेल्या त्यांच्या पत्रांतून अधिक स्पष्ट होते. सुनीताबाई देशपांडे यांना लिहिलेल्या त्यांच्या पत्रांबाबत लिहिताना अरुणा ढेरे म्हणतात, “हा माणूस फार तीव्र रागलोभांचा होता. त्याची त्याला जाणीवही होती. त्याबद्दल कधी ओशाळे होत तर कधी सहज गंमतीने त्यांनी पुष्कळ लिहिले आहे. त्यांच्या एखाद्या जिव्हाळ प्रश्नाने आतला डोह डहूळला म्हणून, कधी एखाद्या पुस्तकाने वा व्यक्तीने टिचकी मारली म्हणून जीएंच्या मनातले कोवळे, हळवे असेही पुष्कळ काही शब्दांवर तरंगत आले आहे.”

मुळात तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे धनी असलेल्या जीएंना लहानपणापासूनच वाचन, मनन, लेखन याची आवड होती. अगदी शाळकरी वयातही त्यांनी बालसाहित्य या सदरात शोभेल असे लेखन केले आहे. जीएंच्या मृत्यूनंतर मिळालेल्या त्यांच्या असंकलित साहित्याच्या बाडावरून १९९१ साली परचुरे प्रकाशन मंदिराने ‘सोनपावले’ नावाचे पुस्तक काढले. ‘सोनपावले’ या संकलनात जीएंच्या सुरुवातीच्या लेखनाचे प्रमुख विभाग आहेत या काळात जीएंनी लिहिलेल्या बऱ्याच कथा त्यांच्या इतर कथांप्रमाणेच शोकपर्यावसायी आहेत. ‘सोनपावले’ या पुस्तकाच्या परीक्षणात अपर्णा तुळपुळे लिहितात, “प्रदीर्घ, मनोविश्लेषणात्मक आणि नाट्यपूर्ण, चटकदार या दोन्ही प्रकारच्या कथा जीएंना आवडत असाव्यात. या अगदी भिन्न प्रकारच्या कथा जीएंनी सारख्याच सहजतेने मराठीत सांगितल्या आहेत. स्वतंत्र कथांमध्ये विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या कथा आहेत. त्यापैकी गंभीर कथांमधील आवाहन काहीसे ढोबळ वाटते. इतर काही कथांमध्ये एखादी विशिष्ट शैली वापरण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकदा तो फसला आहे. सर्वच कथांमध्ये क्वचित बोचक उपरोध दिसतो. यांत चटपटीत किंवा हलक्याफुलक्या कथा आहेत. एकदोन कथांत कलाटणीतंत्र वापरण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्या कथा चाळीसच्या दशकातल्या आहेत. १९७० साली प्रकाशित झालेल्या दोन कथांमध्ये त्यांची स्वत:ची शैली पहायला मिळते.” ‘दीक्षा’ आणि ‘सांगाती’ या कथांबद्दल तुळपुळे यांचे हे विधान आहे.
जीएंनी बालवयात लिहिलेले लेखन शाळकरी स्वरूपाचे आहे. त्यात ‘वीरांचे स्मारक’ ‘माणसाची शिकार’ ‘मनोहरची दिवाळी’ अशा लघुकथा, काही शब्दकोडी, ‘करून तर पहा’ या सदरातले काही लिखाण हे समाविष्ट आहे. जीएंच्या स्वतंत्र कथालेखनाच्या सुरुवातीच्या प्रयत्नांवर त्या काळी प्रसिद्ध असलेल्या लेखकांची, विशेषतः खांडेकरांची मोठी छाप आहे. जीए आणि खांडेकर हे दोन स्वतंत्र विचारप्रवृत्तींचे, स्वतंत्र शैलीचे लेखक आहेत. तथापि खांडेकरांमुळे जीए त्यांच्या तरुणपणी प्रभावित झाले होते हे निश्चित. 'बाबारे, जीवनसर्वस्व त्यागात आहे, स्वार्थात नव्हे, ‘पंतांना वाटले, या दुसऱ्या बाळपणात सुगंध, पाकळ्या, रंग वगैरे सर्व जातात, फक्त काटे मात्र वाटणीला उरतात!, ‘अश्रू जरी डोळ्यांवाटे बाहेर पडत असले तरी त्यांचे उगमस्थान हृदयच आहे, स्वत: सुखी होण्यापेक्षा दुसर्‍यालाही सुखी करण्यात आनंद असतो' असली आदर्शवादी, खांडेकर छापाची वाक्ये जीएंच्या त्या वेळच्या कथांमध्ये सर्रास दिसून येतात. नंतरच्या काळात जीएंना खांडेकरांचे आदर्शवादी विचार हास्यास्पद वाटत असत. पण एकाच विचाराची पताका खांद्यावर घेऊन आयुष्यभर वाटचाल केलेला लेखक म्हणून जीएंना खांडेकरांविषयी आदरही वाटत आला होता. जीएंची खांडेकरांशी प्रत्यक्ष भेट कधी झाली होती असे दिसत नाही, पण खांडेकरांबरोबर त्यांचा पत्रव्यवहार होता. खांडेकर दत्तक जाण्यापूर्वी त्यांचे नाव गणेश आत्माराम खांडेकर होते आणि म्हणून त्यांच्या व जीएंच्या नावाची आद्याक्षरे एकच -GAK- हे कळाल्यावर जीएंना आनंद झाला होता. आपली पुस्तके व दिवाळी भेटकार्डे आपण त्यांना पाठवत असल्याचे जीएंनी आपल्या पत्रांत नमूद केले आहे.
१९४० - ४२ च्या सुमारास सुरू झालेले जीएंचे लेखन त्यांच्या त्या वेळच्या वयानुरुप शालेय व अगदी बाळबोध आहे. मात्र वयाच्या पंचविशीपर्यंत (१९४८) जीएंचे वाचन - विशेषतः इंग्रजी साहित्याचे वाचन- प्रगल्भ होऊ लागले होते, हे त्यांनी केलेल्या मॉमच्या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेच्या भाषांतरातून जाणवते. याच काळात जीएंनी अनेक इंग्रजी कथांचे उत्तमोत्तम अनुवाद केले आहेत. यातल्या बऱ्याच कथा ओ. हेन्रीच्या किंवा चेकॉव्हच्या कथांप्रमाणे शेवटी अनपेक्षित कलाटणी देणार्‍या - 'ट्विस्ट इन द टेल' या स्वरुपाच्या आहेत. घोडागाडीवाला आणि त्याचा मरण पावलेला मुलगा - म्हणजे एकंदरीत माणसाचे एकटेपण या चेकॉव्हच्या कथेच्या जवळपास जाणारी 'भागीदार' नावाची एक कथा जी.एं. नी या काळात लिहिली आहे. याच काळात जी.एं नी त्या प्रसिद्ध कथेचा 'भुर्र' या नावाने एक उत्तम अनुवादही केला आहे. या कथेच्या शेवटामध्ये जीएंच्या पुढील लेखनात त्यांच्या स्वत:च्या म्हणून विकसित झालेल्या आणि प्रसिद्धीला आलेल्या त्यांच्या लेखनशैलीची वैशिष्टये दिसतात. तो शेवट असा आहे:
“’ए बेटया, झोपलास की काय?’ आयोना घोडयाला म्हणतो, ‘बराय, बराय, झोप. आज पोटापुरतंदेखील मिळवलं नाही. आपण दोघेही गवत खाऊन राहू. गाडी हाकायचं कामच होत नाही रे आता माझ्या हातून! माझा मुलगा कसा, एक नंबर घोडा हाकीत असे. आज असायला हवा होता रे तो’
घोडयाच्या काचेसारख्या दिसणाऱ्या डोळ्यांकडे पाहात तो क्षणभर थांबतो.
‘हं, काय समजलं? माझा पोरगा मेला. या जगात जगायला आम्हाला टाकलं आणि आपण उडाला भुर्र. आता समज, तुलाच एक शिंगरू असतं, आणि जर ते तुला एक दिवस असंच सोडून गेलं असतं, तर तुलाही फार वाईट वाटलं असतं, नाही?’
घोडयाचे तोंड हलविणे चालूच राहतो. तो मध्येच वाकडी मान करतो व आयोनाचा हात हुंगतो.
इतका वेळ त्या मुठीएवढया जागी दडपून ठेवलेल्या भावना एकदम उचंबळतात. सारे बांध त्यांच्यापुढे पार वाहून जातात व त्या अमर्याद पसरतात. घोडयाच्या तोंडावरुन हात फिरवीत हलक्या आवाजात आयोना त्याला अगदी पहिल्यापासून सारी हकीकत सांगू लागतो.”
जीएंचे गंभीर स्वरूपाचे लेखन त्यांच्या पंचविशीनंतर सुरू झाले. जीएंच्या मृत्यूनंतरही त्यांचे काही लेखन प्रकाशित झाले. तथापि जीए कधीच बहुप्रसव लेखक नव्हते. त्यांच्या एकूण लेखनाची सूची बघता समकालीन लेखकांच्या तुलनेत जीएंनी कमी लिहिले आहे, हे ध्यानात येते. जीएंनी सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या कथांपैकी काही कथा अनुवादित तर काहे गूढ- रहस्य या सदरात मोडतील अशा आहेत. मानवी नात्यांचा अनाकलनीय ताण, पीळ आणि परिस्थिती, नियती, नशीब, - त्याच्या हातातले बाहुले होऊन आयुष्य कंठण्याची वेळ आलेली माणसे ही जीएंची लाडकी पात्रे या कथांमधून पुन्हा पुन्हा डोकावतात. पण एकंदरीतच ही शैली काहीशी विस्कटलेली, गोंधळलेली वाटते. अनुवाद म्हणून यातल्या काही कथा उत्तम आहेत, पण यांबाबत जीए स्वतः समाधानी असतील असे वाटत नाही. किंबहुना इंग्रजी वाङ्मयातील उत्तम कथा आणि स्वतःच्या कल्पना यातले जीएंचे चाचपडणे या काळात चालले असावे. यातल्या कथांच्या शेवटी 'आधारित' किंवा 'इंग्रजीवरुन' असे लिहिलेले आहे, पण त्या कथा मूळ कोणत्या आणि कोणाच्या कथांवर आधारित आहेत हे कळत नाही. वसंत आबाजी डहाके यांच्या मते ‘”जीएंच्या या कथांना कथेचा घाट उमगलेला नाही आणि त्यामुळे त्या विसविशीत वाटत असल्या तरी पुढल्या जीएंच्या खुणा त्यांतून दिसू शकतात.”
१९५५ मध्ये 'मौज' च्या अंकात त्यांनी 'अनाकलनीयाचे आकर्षण' हे 'आणखी एक वासुकी' या टोपणनावाने लिहिलेले पत्र जीएंच्या विकसित होणाऱ्या शैलीवर प्रकाश टाकते. याच काळात जीएंनी समाजातल्या ढोंगीपणावर आणि दुटप्पीपणावर वक्रोक्तिपूर्ण आणि विनोदी असेही काही लिहिले आहे. 'मारून मुटकून पुरोगामी' ही जीएंची नाटिका अशीच आहे. असे विविध प्रकारचे प्रयोग करत असतानाच जीएंना लघुकथांमध्ये स्वत:ची वाट सापडलेली दिसते. पुढे जीएंच्या या लघुकथा त्यांच्या खास शैलीच्या दीर्घकथा झाल्या. ‘निळासांवळा’ नंतर जीए गाडगीळ-गोखले-माडगूळकर यांच्याबरोबरचे महत्त्वाचे कथालेखक झाले.
प्रकाश देशपांडे केजकर यांच्या मते “जीएंच्या कथांमध्ये महाकाव्याचा, महाकादंबरीचा आवाका दिसतो. त्यांची दृष्टीही महाकवीची विशाल आणि मानवी जीवनाच्या अनेक अंगांचा सखोल वेध घेणारी व्यापक दृष्टी आहे. मुळात दीर्घकथा हा साहित्यप्रकार आपल्या साहित्य संस्कृतीच्या बाजारीकरणातून, नित्यातून आलेल्या व्यवहारवादातून आला. या व्यवहारवादातून कथेची लघुकथा झाली, निबंधाचा लघुनिबंध झाला आणि या लघुत्वाला प्रतिष्ठा मिळाली. ही लघुत्वाची चटक मराठी साहित्याला महागात पडली. मोठे नुकसानही झाले. अनेक ताकदीचे लेखक त्याचे शिकार झाले, हे आपले दुर्दैव आहे. तसे असले तरी जीएंकडे महाकवीची गरुड दृष्टी होती, त्यामुळे त्यांनी या लघुत्वावर मात केली.”
नंतरच्या काळात जीएंनी आपल्या स्वतंत्र शैलीचे मोजकेच पण दर्जेदार लेखन केले. १९५९ च्या ‘निळासांवळा’ नंतर जीएंचे ‘पारवा (१९६०), ‘हिरवे रावे ( १९६२), रक्तचंदन (१९६६), काजळमाया(१९७२), रमलखुणा (१९७५), सांजशकुन (१९७५) पिंगळावेळ (१९७७), पैलपाखरे (१९८६) व ‘डोहकाळीमा’ हा निवडक कथांचा संग्रह (१९८७) हे कथासंग्रह प्रकाशित झाले. याव्यतिरिक्त जीएंनी अनुवाद केलेली ‘रान’,’रानातील प्रकाश’, ‘शिवार’ वगैरे पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.
या सगळ्यापलीकडे जीएंचे पत्रलेखन हा एक स्वतंत्र विषय आहे. लोकांमध्ये मिसळायला, सभा-संमेलनात उपस्थिती लावायला नाखूष असणारे जीए पत्रांतून मात्र कित्येक लोकांशी मनमोकळेपणाने व्यक्त झालेले दिसतात. जीएंच्या मृत्यूनंतर जीएंच्या निवडक पत्रांचे खंड टप्प्याटप्प्याने प्रकाशित झाले ( ‘जीएंची निवडक पत्रे: खंड १’, मौज प्रकाशन, संपादन: म.द.हातकणंगलेकर व श्री.पु. भागवत,पहिली आवृत्ती, जुलै १९९५, ‘जीएंची निवडक पत्रे: खंड २’, मौज प्रकाशन, संपादन: म.द.हातकणंगलेकर व श्री.पु. भागवत,पहिली आवृत्ती, जुलै १९९८, ‘जीएंची निवडक पत्रे: खंड ३’, मौज प्रकाशन, संपादन: म.द.हातकणंगलेकर, सु.रा.चुनेकर व श्री.पु. भागवत,पहिली आवृत्ती, जुलै २००६, ‘जीएंची निवडक पत्रे: खंड ४’, मौज प्रकाशन, संपादन: म.द.हातकणंगलेकर, सु.रा. चुनेकर व श्री.पु. भागवत,पहिली आवृत्ती, जुलै २००६) जीएंच्या पत्रांमधून त्यांचा विविध विषयांतला व्यासंग, त्यांचे प्रचंड वाचन, त्याचे बालसुलभ (त्यांनीच उल्लेख केलेल्या शब्दांत लिहायचे झाले तर ‘Not childish, but childlike’) कुतुहल, त्यांचा शब्दांबाबतचा, शब्दांच्या वापराबाबतचा आग्रह आणि प्रसंगी त्यासाठी वाद घालण्याची खुमखुमी, त्यांचा खास असा तिरकस विनोद असे अनेक पैलू समोर येतात.
जीएंच्या साहित्याचे ढोबळ मानाने चार विभाग करता येतील. पहिल्या विभागात जीएंच्या गंभीर, तत्वचिंतनात्मक आणि काहीशा बोजड भाषाशैलीने नटलेल्या कथा समाविष्ट करता येतील, ‘विदूषक’, ‘रत्न’, ‘दूत’, ‘गुलाम’, ‘कळसूत्र’ या कथांचा या विभागात समावेश होतो. दुसर्‍या विभागात जीएंच्या अनुवादीत साहित्याचा समावेश होतो. तिसरा प्रकार म्हणजे जीएंनी लिहीलेल्या रूपककथा (जीएंना स्वत:ला हे नाव आवडत नसे. ते अशा कथांना ‘दृष्टांतकथा’ असे म्हणत असत. जीएंच्या ‘सांजशकुन’ मध्ये अशा कथांचा समावेश आहे.). जीएंच्या कथांचा चौथा विभाग हा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर बेतलेल्या कथांचा आहे. या कथांमधील पात्रे मराठी बोलणारी आहेत. या विभागातील काही कथांमधील भाषेवर कानडी भाषेचा प्रभाव दिसून येतो. या कथांमधील पात्रे मराठी आणि कानडी संस्कृतीची मिश्र पार्श्वभूमी असणारी, कानडी वळणाचे मराठी बोलणारी अशी माणसे आहेत. भाषा हे संस्कृतीचे एक महत्त्वाचे अंग आहे.
उत्तम वाचक हा चांगला लेखक होऊ शकतो हे जीएंच्या वाचनातून आणि लेखनातून अधोरेखित होते. जीएंचे इंग्रजी साहित्याचे वाचन अफाट होते. कर्नाटक विश्वविद्यालयाचे वाचनालय हे तर त्यांचे दुसरे घरच होते. जगातले उत्तमोत्तम साहित्य मिळवून ते वाचणे, त्यावर विचार आणि चिंतन करणे हा गुण जीएंमध्ये प्रकर्षाने दिसतो. धारवाडमध्ये त्यांच्या घरी स्वतः विकत घेतलेल्या चार - साडेचार हजार पुस्तकांचा संग्रह होता. याशिवाय वाचनालयातून आणून वाचलेली, मित्रांनी, स्नेह्यांनी वाचायला दिलेली असंख्य पुस्तके, जवळजवळ तितकीच मासिके, जागतिक दर्जाची जीएंच्या आवडत्या लेखकांची त्यांनी वेळोवेळी पोस्टाने मागवून घेतलेली पुस्तके असे जीएंचे प्रचंड वाचन होते. इंग्रजी भाषा, इंग्रजी चित्रपट या जीएंच्या आवडत्या गोष्टी होत्या. जीए लिहितात, “मला अजून निदान दोन पुस्तके लिहायची आहेत- आणि ती केवळ अर्पणपत्रिकेसाठी. एक पुस्तक मला सिगरेटला अर्पण करायचे आहे! आनंदात असताना आनंद वाढवणारा, त्रस्त मन:स्थितीत थोडी शांतता देणारा, सल्ला देत सतत किरकिर न करणारा असा तो एक शांत मित्र! दुसरे, इंग्रजी भाषेला. तिच्याबद्दलची तर कृतज्ञता अपार आहे व माझे दुसरे वंदन सदैव त्या भाषेला राहील.”
जीएंच्या इंग्रजी वाचनाचा धांडोळा घेताना दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. एकतर त्यांनी आपले आवडते म्हणून जे लेखक/ कवी सांगितले आहेत, ते भलतेच आहेत. 'गावाचे एक तर गावडयाचे /गावंढयाचे एक' हे तर त्यांचे आवडते वाक्य. दुसरे म्हणजे 'जे जे लोकप्रिय आहे, ते दर्जेदार नसतेच' हा त्यांचा जबरदस्त पूर्वग्रह इथेही तितक्याच प्रभावीपणे दिसतो. “वुडहाऊसचे एक पुस्तक वाचले की सहा महिने त्याच्याकडे बघवतही नाही” या एका वाक्यात ते वुडहाऊसची वाट लावून टाकतात. अमेरिकन पेपरबॅक्सवर तर त्यांनी निव्वळ जहरीपणाने लिहिलेले आहे. आयन रँड ही लोकप्रिय लेखिकाही जीएंना अजिबात आवडत नसे. तिची 'वुई द लिव्हिंग' ही कादंबरी दायस्तोव्हस्कीपेक्षा श्रेष्ठ आहे, असे समजणाऱ्या एका मित्राशी त्यांचे संबंध दुरावले. ही कादंबरी फार फार तर एखाद्या हिंदी चित्रपटासाठी योग्य आहे, असे त्यांना वाटे. जीएंचे हिंदी चित्रपटांविषयीचे मत ध्यानात घेता या लेखिकेला त्यांनी अगदीच किरकोळ लेखले आहे हे ध्यानात येते.
दायस्तोव्हस्की हे तर त्यांचे व्यसनच होते. दायस्तोव्हस्की आणि युजीन ओ'नील यांच्या कथांमधील आकर्षक साचाहीनता ओ. हेन्रीच्या कथांमधील निव्वळ कसबापेक्षा त्यांना कितीतरी सरस वाटत असे. इंग्रजी साहित्यातले अगदी दुर्लक्षित, लोकप्रिय नसलेले असे लेखक जीएंना आवडत असत. ल्यूक्रेशियस हा इसवीसनपूर्व काळातला रोमन कवी आणि तत्त्वज्ञ जीएंनी स्वतःच्या तिशीच्या आत वाचला होता आणि त्याने ते बरेच प्रभावितही झाले होते. ल्यूक्रेशियस नंतर त्यांना बराच अपूर्ण वाटत असे. असेच त्यांचे झ्वाईगच्या बाबतीतही झाले होते. लेखक आणि वाचक यांच्या वयानुसार आणि अनुभवानुसार त्यांच्या अभिरुचीत असा बदल घडत राहणे आवश्यक आहे असे प्रस्तुत अभ्यासकाला वाटते. आवडता कलाकार हा अथपासून इतिपर्यंत आवडला पाहिजे या भाबडेपणापासूनही जीए दूर होते. इथे जी. ए. कुलकर्णी आणि पु. ल.देशपांडे या दोन लेखकांच्या विचारप्रवृतींमधील फरक दिसून येतो. “थोडाफार वुडहाऊस आवडणारे त्याचे वाचक संभवतच नाहीत असे जेम्स ऍसेट हे स्तुतीच्या बाबतीत महाकंजूष आणि प्रतिकूल टीकेच्या बाबतीत केवळ जहरी असणाऱ्या त्याच्या टीकाकाराने म्हटले आहे. वुडहाऊस आवडतो याचा अर्थ अथपासून इतिपर्यंत आवडतो. हे आपल्या बालगंधर्वांच्या गाण्यासारखे संपूर्णच आवडायचे असते” असे पु. ल. देशपांडे यांनी पी.जी. वुडहाऊसबाबत लिहिले आहे. जीएंना असे सरसकटीकरण करणे मान्य नव्हते. एखाद्या आवडत्या लेखकाच्या लिखाणात हिणकस काही आले, तर ते तसे आहे, हे सांगण्याची वस्तुनिष्ठता त्यांच्यात होती. 'मी उगाच सांगत नाही' या गडकऱ्यांच्या ओळींची 'माणसे अरभाट आणि चिल्लर' मध्ये जीएंनी टिंगल उडवली आहे. वास्तविक गडकरी हे जीएंचे आवडते लेखक होते पण उत्तम लिखाणातही काही वेळा सामान्य ओळी येतात, किंबहुना लेखकाच्या बऱ्याच भरताड लेखनातून फार थोडे बावनकशी, निके असे हाती लागते असे त्यांचे मत होते. ऑलिव्ह श्रायनर या लेखिकेचे 'स्टोरी ऑफ ऍन आफ्रिकन फार्म' हे जीएंचे आवडते पुस्तक होते. त्याचे भाषांतर करण्याचाही त्यांना कैकदा मोह झाला असे त्यांनी लिहिले आहे. पण या लेखिकेच्या इतर कादंबऱ्या 'आपल्याकडे स्त्री लेखिका ज्या लायकीच्या कादंबऱ्या लिहितात, त्याच लायकीच्या' असे जीएंचे मत होते. स्त्री लेखिकांविषयी जीएंची मते ध्यानात घेता त्यांना काय म्हणायचे आहे, ते कळते. हेन्री जेम्सचे फक्त 'आर्ट ऑफ फिक्शन' हे पुस्तक जीएंना आवडत होते. त्याची इतर पुस्तके न वाचण्याच्या लायकीची असे त्यांचे रोखठोक मत होते. ‘जे लोकप्रिय ते हिणकस’ असा पूर्वग्रह बाळगणाऱ्या जीएंच्या आवडत्या लेखकांत सॉमरसेट मॉमचा समावेश असावा ही नवलाची गोष्ट आहे. मॉम हा तसा लोकप्रिय लेखक आहे, तरी जी. एंनी तो त्यांच्या प्रसिद्ध नियमाला बगल देऊन वाचला, आणि त्याचे 'ऑफ ह्यूमन बॉंडेजेस' हे पुस्तक त्यांना आवडले असे ते म्हणत असत. मॉमची इतर पुस्तके त्यांना फारशी आवडत नसत. नीत्शे या तत्त्वज्ञ कवीच्या 'बर्थ ऑफ ट्रॅजेडी' या पुस्तकाचा ते तसाच आवडलेल्या पुस्तकांत उल्लेख करतात . त्यांच्या अत्यंत आवडत्या दायस्तोवस्कीमध्येही पानेच्या पाने नुसता चिखल आहेहे सांगायला ते कचरत नाहीत. शेक्स्पियरबद्दलही त्यांचे तसेच मत होते. वसंत कानेटकरांची काही नाटके जीएंना आवडली होती, पण त्यांचे ‘गवताला भाले फुटतात’ हे नाटक, त्याचे मुखपृष्ठ वगैरे आपल्याला अजिबात आवडले नाही असे त्यांचे मत होते. बेलॉक हा जीएंचा आवडता लेखक होता. बेलॉकच्या 'हिज सिन्स वेर स्कार्लेट, बट हिज बुक्स वेर रेड' या वाक्याचा आणि त्यातील 'रेड' या शब्दावरील श्लेषाचा ते उल्लेख करतात. याशिवाय वोले सोईंका या आफ्रिकन नाटककाराचे ‘दी स्ट्रॉंग ब्रीड’ हे व इतर नाटके, मार्टीन ब्यूबर नावाचा एक ज्यूईश तत्त्वज्ञ, अनेक अप्रसिद्ध लेखकांची प्रवासवर्णने, थोर हेरुडू नावाच्या लेखकाचे 'अकू अकु' हे पुस्तक, प्रेस्कॉट या लेखकाचे 'कॉंक्वेस्ट ऑफ पेरु' हे पुस्तक असे बरेच अनवट लेखक आणि त्यांची अपरिचित, फारशी लोकप्रिय नसलेली पुस्तके जीएंनी वाचलेली होती.
कॉनराड रिक्टर, डब्ल्यू. एच. हडसन हेही जीएंचे आवडते लेखक होते. रिक्टरच्या कादंबऱ्यांचे तर त्यांनी अनुवादही केले आहेत. निसर्ग विरुद्ध माणूस हा संघर्ष हा जीएंचा आवडता विषय होता. त्यातही जीएंचा नियतीवादी पिंड लक्षात घेता कष्ट आणि यश यापेक्षा करुणा आणि भीषणता याकडे त्यांचे मन अधिक आकर्षित होत असले पाहिजे असे प्रस्तुत अभ्यासकाला वाटते. “नाईल नदीचा उगम शोधत जाणारे प्रवासी, वेश पालटून मक्केला जाऊन येणारा रिचर्ड बर्टन, ऍथेऑनच्या खोऱ्यात वेडयाप्रमाणे शिरलेली माणसे, उघडया डोळ्यांनी मृत्यू पत्करणारा ओटस. या विविध माणसांत असमाधानाचा असला कोणता अंगार होता की ज्यासाठी आम्ही क्षुद्र माणसे कणाकणाने झिजत शेणगोळा आयुष्य जगतो, ते सगळे बाजूला सारून त्यांना असला जुगार खेळणेच भाग पडावे?” असा प्रश्न त्यांना पडतो. सरधोपट, मिळमिळीत आयुष्यापेंक्षा, अनुभवांपेक्षा तीव्र, टोकदार आणि दाहक अनुभव जीएंना जास्त आकर्षक वाटत असत असे दिसते. मृत्यूविषयीचे जबरदस्त आकर्षण हेही त्यांच्या याच वृत्तीचे द्योतक वाटते. “आत्महत्या आणि खून या दोन बिंदूंशिवाय जास्त उत्कट, जळजळीत काही असूच शकणार नाही, आणि नेमके हेच शब्द वाङ्मयाला कधी गवसत नाहीत” असे जीएंना वाटत असे. कोसलर, सिल्व्हिया प्लाथ, बेरिमन, स्टीफन झ्वाइग, कावाबाटा, हेमिंग्वे इत्यादि आत्महत्या केलेल्या लेखक /कवींचे उल्लेख जीएंच्या पत्रांत अनेक वेळा येतात. मृत्यूविषयी जीएंना आकर्षण असावे असे वाटते. जीएंनी एका मर्यादेपलीकडे स्वत:वरही उपचार करून घेणे नाकारले होते. किंबहुना आपल्याला काहीतरी गंभीर झाले आहे हे ठाऊक असतानाही त्यांनी ही गोष्ट इतरांपासून, अगदी आपल्या बहीणींपासूनही लपवूनच ठेवली होती. त्या अर्थी त्यांचा मृत्यू म्हणजे एक प्रकारची आत्महत्याच होती.
सोफोक्लीस, एस्कीलस, या ग्रीक लेखकांच्या शोकांतिका, दायस्तोवस्की, चेकॉव्ह, टॉलस्टॉय आदि थोर रशियन लेखकांचे साहित्य, फ्रांझ काफ्काचे साहित्य, फ्लोबर, कामू ,सार्त्र या फ्रेंच लेखकांची पुस्तके हे सारे साहित्य त्यांनी इंग्रजीतून वाचले होते. याशिवाय इतरही प्रसिद्ध आणि विशेषकरून अप्रसिद्ध लेखक कवींची अनेक पुस्तके जीएंनी वाचली होती.
जीएंचे मराठी वाचनही भरपूर असले तरी इंग्रजीच्या तुलनेत कमी मराठी लेखक - कवींच्या रचना त्यांना आवडत असत. सावरकर, अत्रे, जयवंत दळवी, दि.बा मोकाशी, बालकवी, खानोलकर, मोरोपंत, ग्रेस हे त्यांचे आवडते लेखक/कवी होते. बालकवींची ‘औदुंबर’ ही कविता, जुन्या पिढीतल्या माधव या कवींची ‘हिरवे तळकोकण’ ही कविता, ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ ही कविता अशा काही कविता त्यांनी आपल्या भाच्यांसाठी केलेल्या पत्ररुपी कॅसेटमध्ये रेकॉर्ड करुन पाठवल्या आहेत. जुन्या पिढीतले लेखक विनायक लक्ष्मण बर्वे उर्फ 'कवी आनंद' यांनी केलेल्या ग्रेच्या विलापिकांचा अनुवाद आणि त्यांची 'मुचकुंददरी' ही कादंबरी आपल्याला आवडल्याचे ते लिहितात. अनिलांच्या कविता आणि कुसुमावती देशपांडयांचे लिखाण हे जी. एंच्या आवडीचे. पण त्यांच्या प्रेमपत्रांच्या संग्रहावर ('कुसुमानिल') ते तुटून पडलेले दिसतात. ना. सी. फडक्यांच्या कादंबऱ्यांबद्दल लिहिताना जीए त्यांतल्या “नायकांचे ओपन कॉलर शर्ट, काचा मारलेले धोतर, भव्य बुद्धिमत्तादर्शक कपाळ, वाऱ्यावर भुरभुरणारे कुरळे केस, नायिकेचा मोतिया रंगाचा ब्लाउज, चापूनचोपून नेसलेली आकाशी रंगाची साडी, धनुष्याकृती भुवया आणि त्या कादंबऱ्यांमधील डौलदार वळण घेणारी कोरी गाडी...त्या सगळ्या माणसांना एकजात मरीन ड्राइव्हवर उभे करावे व फाडफाड मुस्कटात मारत जावे” इतके विखारी लिहितात. त्या मानाने अपरिचित मराठी लेखक/ कवींचे निवडक लेखन जीएंच्या मनाला स्पर्श करुन गेलेले दिसते. कृष्णा जे. कुलकर्णी नावाच्या तरुण (आणि गूढपणाने या जगातून नाहीशा झालेल्या) लेखिकेच्या ‘यमुनातीरीचे बुलबुल’ या लहानशा कथासंग्रहाची जीएंनी प्रशंसा केली आहे. मराठी भाषेत प्रकाशित होणारी बरीचशी नियतकालिके नियमितपणे वाचणारे जीए श्री. पु. भागवतांसारख्या प्रकाशकांना ‘सत्यकथा’, ‘मौज’ वगैरे अंकांमधील साहित्याबाबत, त्या अंकांच्या मुखपृष्ठाबाबत उत्सुकतेने विचारणा करताना दिसतात.
मराठी समकालीन कथाकारांच्या थोडया कथा मनापासून आवडल्याचे जीएंनी लिहिले आहे. गाडगीळांची 'तलावातले चांदणे', गोखल्यांची 'यात्रा', थोरल्या (ग.दि.) माडगूळकरांची 'वीज', दळवींची रुक्मिणी, खानोलकरांची 'सनई' आणि शंकर पाटलांची 'दसरा' या कथा आपल्याला आवडल्याचे जीए लिहितात- बऱ्याच वेळा या कथा आपण न लिहिल्याबद्दलची खंतही त्यांच्या लिखाणात येते. माडगूळकरांची 'वीज' ही खरेतर जीएं धाटणीचीच कथा आहे. कुरुप, अपंग मुलात जागृत होणाऱ्या लैंगिक भावना आणि त्यांमुळे त्या मुलाची होणारी घुसमट या विषयावरची की कथा आहे. मराठीतल्या काही अतिशय अपरिचित, अनोळखी लेखक -लेखिकांचा जीए मुद्दाम उल्लेख करतात. अच्युत पारसनीस, मीना दीक्षित हे त्यातले काही लेखक. वामन चोरघडे यांच्या जिवंत अनुभवाने जीए प्रभावित झालेले दिसतात, पण त्यांच्या कथांमध्ये या अनुभवांच्या वर्णनाचा खोटा, चोरटा सूर – जीएंच्याच शब्दांत लिहायचे तर- “जास्त काव्यमय होण्यासाठी एखादा गायक चोरलेला, चिमटलेला आवाज लावतो ( उदा. सुधीर फडके, ‘अशी पाखरे येती’ मध्ये!)” - लागला आहे, असे त्यांना वाटते. मामा वरेरकरांचे 'अवघा महाराष्ट्र आपल्याला अनुल्लेखाने मारतो आहे' हे मत हाही जीएंच्या टवाळीचा आवडता विषय होता. गं.त्र्यं. माडखोलकरांविषयी जीएंनी बरे लिहिले आहे. माडखोलकरांच्या लिखाणात 'प्रमाथी' , 'उर्जस्वल' असे शब्द येत असले तरी त्यांच्या लिखाणाला स्वतःची एक ऐट, एक श्रीमंती आहे असे त्यांना वाटते.
श्री.म. माटे यांच्या काही कथांविषयीही जीए भरभरून लिहितात. पण इथेही त्यांचा खवचटपणा आहेच. 'सावित्री मुक्यानेच मेली' हे कथेचे नाव आहे की एखाद्या टूथपेस्टची जाहिरात?' हा खास जी.ए. शैलीचा प्रश्न आहे. इतर लेखकांच्या बाबतीत जीएंनी खाजगीत अत्यंत तीव्र शब्दांत लिहिले आहे. अशा लेखकांच्या खोटया, उबवलेल्या शब्दांना, उपमांना जीएंनी झोडपले आहे. नयना आचार्य यांच्या 'प्रतिभेचा स्पर्श, सूक्ष्म निरीक्षण, तरल संवेदना' अशा शब्दांवर टीका करताना'या बाईंना, काही लोकांना सतत शिंका येतात तसे प्रतिभेचे झंकार येतात’.असे जीए लिहितात. धनी वेलणकरांच्या पुस्तकात आलेल्या असंख्य विसंगतीपूर्ण उल्लेखांचा, उदाहरणार्थ ‘दर शनिवारी मुंग्यांना साखर घालणे पण साखर संपली की मुंग्या चिरडून टाकणे -कारण मुंग्या उपद्रवी असतात!’ ते असाच टोपीउडवू उल्लेख करतात. पण अशा विक्षिप्त वृत्तीच्या लोकांविषयी आपल्याला एक सुप्त कुतूहल आहे, असे त्यांनी कबूल केले आहे. (उदाहरणार्थ, स्त्री ही आपल्या विकासातील मोठी धोंड आहे असे मानून आपल्या बायकोचा जाहीर पाणउतारा करणारा आणि नंतर अतिव वैफल्याने तिच्याशीच रत होणारा टॉलस्टॉय - त्याला पंधरा मुले झाली या विरोधाभासाबद्दलही जीएंनी कुतुहलाने लिहिले आहे.) विद्रोही साहित्याविषयी बोलताना ते 'सतत ओरडून बोलणारा माणूस काय बोलत आहे, हे अनेकदा समजत नाही' असे म्हणतात. गो. नि. दांडेकरांची बरीच पुस्तके जीएंनी वाचली होती आणि त्यांतल्या भाबडेपणावर त्यांनी सणसणीत टीकाही केली आहे. जयवंत दळवींचे लिखाण - आणि 'ठणठणपाळ' - जीएंना आवडत असे. दळवींचे आणि जीएंचे अनेक वर्षाचे मैत्रीचे संबंध होते, पण दळवींचे काही लेखन त्यांना आवडले नव्हते. ‘चक्र’ ही दळवींची गाजलेली कादंबरी आहे, पण त्या कादंबरीतील घायाळ झालेल्या पक्षाचे आणि त्याच्या उरात शिरलेल्या बाणाचे कॅलेंडर ही खूपच ढोबळ, अति-सुलभीकरण केलेली उपमा आहे असे जीएंचे मत होते. विशेष म्हणजे जीएंच्या स्वतःच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक लिखाणातही उपमा -उत्प्रेक्षा खच्चून भरलेल्या असतात तरीही जीएंना इतरांच्या लेखनातील उपमा- उत्प्रेक्षा खटकतात, या विरोधाभासाचे नवल वाटते.
माधव आचवल ही जीएंचे घट्ट मित्र होते. त्यांच्या 'किमया' या पुस्तकाविषयी लिहिताना जीएंना शब्द पुरत नाहीत. आचवलांच्या‘किमया' या पुस्तकाकडे वाचक - टीकाकारांनी दुर्लक्षच केले, ही जाणीवही जीएंना अस्वस्थ करून जात होती. “मरीन ड्राईव्हवर समुद्रातून एखादी जलकन्या वर यावी व क्षणभर दृष्टी फिरवून नीरवपणे पुन्हा पाण्यात जावी, आणि भिंतीवर हजार माणसे निर्विकारपणे चणे-फुटाणे बकाबका खात सुस्त बसावी तसे त्या पुस्तकाच्या बाबतीत घडले” असे त्यांना वाटे. याउलट अनंतराव कुलकर्णी हेही जीएंचे जवळचे मित्रच होते. पण त्यांचे पुस्तक (जेनी) जीएंना मुळीच आवडले नाही. तसे त्यांनी अनंतरावांना स्पष्टपणे लिहिले आहे. पण हे लिहीत असतानाच आपल्याला ते का आवडले नाही याचेही जीएंनी सविस्तर विश्लेषण केले आहे. एक वाचक आणि अभ्यासक म्हणून जीएंचा हा वस्तुनिष्ठपणा विशेष उल्लेखनीय आहे.
शरच्चंद्र चॅटर्जी, टागोर या लोकप्रिय लेखकांविषयी जीएंचे मत फारसे बरे नव्हते. पतीसाठी भयंकर त्याग वगैरे करणाऱ्या शरदबाबूंच्या नायिकांची जीएंनी भरपूर टवाळी केली आहे. टागोरांची विश्वमानव ही कल्पना तर त्यांना कधीच पटली नव्हती. 'माणूस नावाचा बेटा' या आपल्या कथेत त्यांनी या कल्पनेची खिल्ली उडवली आहे. 'कवितेत टागोरांचे काळजीपूर्वक विंचरलेले केस कधी विस्कटत नाहीत' या शब्दांत त्यांनी टागोरांना निकालात काढले आहे. उर्दू शायरीही त्यांना फारशी रुचत नसे. विशेष म्हणजे ज्या पु. ल. , सुनीताबाई देशपांडयांशी त्यांचे त्यातल्या त्यात बरे होते, त्या पु. लं. चा विनोदही जीएंना फारसा आवडत नसे. 'व्यक्ती आणि वल्ली' मधले एक व्यक्तिचित्र (नंदा प्रधान?) आपल्याला आवडल्याचे त्यांनी लिहिले आहे. इतरत्र मात्र पु. लं च्या लिखाणाविषयीची त्यांची भूमिका म्हणजे “पाच -दहा मिनिटांच्या सूचनेने गदगदून जाणारा लेखक, विनोद करताना आपण विनोद केलाच पाहिजे असा त्यांचा इतका जॉनीवॉकरध्यास असतो, की एखादी 'जागा' आपण चुकलो नाही ना, असा त्यांना अधीरपणा असतो. एखादा पहिलवान जसा दिसेल त्याला धोबीपछाड टाकायच्या विचारात असावा, तसे विनोदी लेखक दिसेल त्या सिच्युएशनमधून विनोद उकळण्याच्या नादात असतात” अशी आहे. भास्करबुवा बखले यांचे गायन पु. लंनी प्रत्यक्षात कधी ऐकले नाही. त्यांच्या गाण्याच्या ध्वनीमुद्रिकाही उपलब्ध नाहीत - पण पु. लंनी त्यांच्या गायकीवर मोठा लेख लिहिला.म्हणजे पु. लंनी हा लेख संपूर्ण ऐकीव माहितीवर लिहिला. या उबवलेपणाचीही जीएंनी टिंगल केली आहे. मात्र पु. लं. च्या लिखाणाविषयी सुनीताबाई देशपांडयांना लिहिलेल्या पत्रांत जीएंनी सतत प्रशंसेचा सूर लावला आहे. केशवराव दाते आणि भास्करबुवांची व्यक्तिचित्रे आपल्याला 'सपाट' वाटली असे त्यांनी सुनीताबाईंना लिहिले आहे खरे, पण इतरांना पु. लंविषयी लिहिताना असलेली धार त्यांनी इथे जाणीवपूर्वक बोथट केल्याचे जाणवते.
पण एक माणूस म्हणून पु. लं विषयी जीएंना आदर असावा असेच वाटते. पु. लंनी सामाजिक कार्याला केलेल्या मदतीविषयी आणि त्यातही स्वतः अनामिक रहण्याच्या निर्णयाविषयी जीए अत्यंत भारावून गेलेले दिसतात. विकास आमटेंना लिहिलेल्या पत्रात ते पु. लं. विषयी “मला वाटते हा माणूस निघून गेल्यावर बसलेल्या जागी थोडा सूर्यप्रकाश सांडलेला आढळत असेल -आणि त्या प्रकाशाला मंद सुगंध असतो तो सौ. सुनीता देशपांडे यांच्या साहचर्याचा” असे लिहितात. पु. लं. च्या गप्पांची मैफल जमवण्याच्या हातोटीविषयीही जीएंनी असेच कौतुकाने लिहिले आहे. इचलकरंजीच्या फाय फाउंडेशनच्या समारंभात - जी. एंनी हजेरी लावलेल्या अत्यंत मोजक्या समारंभांपैकी एक –“पु. लं माझ्याविषयी फार मोठया मनाने बोलले - जुन्या काळच्या एखाद्या तालेवार स्त्रीने मोठया मोठया पशांनी ओटी भरावी त्याप्रमाणे.” असे त्यांनी लिहिले आहे.
जीएंच्या पत्रालेखनात आलेले मराठी कवितांचे उल्लेख पाहिले की जीएंचा मराठी कवितांचा जबरदस्त अभ्यास असला पाहिजे असे प्रस्तुत अभ्यासकाला वाटते. ग्रेस हे जीएंचे अत्यंत आवडते कवी होते. ग्रेस यांना लिहीलेल्या एका पत्रात ते लिहितात, “ ‘देवी’ कवितेने झपाटून गेलो. हा वेगळा, अपार्थिव अनुभव होता. तसा मी जाड कातडीचाच माणूस, सहजासहजी स्वत:ला विसरत नाही – of the earth, earthy! पण हे विलक्षण होते.”. बालकवी आणि गडकरी हेही जीएंचे आवडते कवी होते, पण त्या मानाने जीएंच्या मनोवृत्तीच्या जवळ जाणारे मर्ढेकर त्यांना फारसे जवळचे वाटले नाहीत. अर्थात काही ठिकाणी त्यांनी मर्ढेकरांचे समर्थनही केले आहे. मर्ढेकरांच्या समर्थनार्थ लिहिलेल्या एका पत्रात जी.एं. नी 'अन्वयार्थच सांगायचा तर त्यासाठी एखादा कवीच कशाला खर्ची घालायला पाहिजे? गिरीश आणि काव्यविहारी देखील ते काम करू शकतील' असा एक झणझणीत फटका मारला आहे. काव्य म्हटल्यावर त्यात 'ग्रेट युनिव्हर्सल थीम्स' आल्या पाहिजेत असे म्हणणाऱ्या लोकांसाठी ते लिहितात, “आणि ते ग्रेट युनिव्हर्सल थीम्स म्हणजे तरी काय? या शब्दांचा शब्दशः अर्थ घेतला तर जन्म आणि मृत्यू हे दोनच विषय युनिव्हर्सल ठरतात. या निकषाने मग बेळगावच्या म्युनसिपालटीतील जननमरणाचे दप्तर जगातील महाप्रचंड महाकाव्य ठरायचे! या ठिकाणी परसात वाती वळत बसलेल्या आजीबाईपासून उजदारी गटारात खेळणाऱ्या बाब्या आणि बेबीपर्यंत सगळ्यांनी एकत्र येऊन जे वाचावे ते साहित्य अशी कोणी तरी केलेली सोज्वळ, बोटचेपी व भोंगळ व्याख्या मला आठवते. काव्य किंवा कला म्हणजे साऱ्यांच्या जीवनात हजर असलेल्या भावनांचा लघुतम साधारण विभाज्य नव्हे.”
पाडगावकर आणि बोरकर हे जीएंचे आवडते कवी होते. आणखीही काही कवी जीएंना आवडत. पण पु. शि. रेगे हा तर आपल्या आयुष्यातला एक 'ब्लाइंड स्पॉट' राहिलेला आहे, असे ते लिहितात. इतर सामान्य कवी त्यांनी घाऊकपणे झिडकारून टाकले आहेत. विविध संतांनी केलेल्या रचनांविषयीही जीएंना फारशी आपुलकी वाटत नसे. याला कारण म्हणजे जीएंचा पराकोटीचा नास्तिकवाद असावा. मर्ढेकरही नास्तिक असले, तरी ते श्रद्धाळू होते. जीएंकडे असल्या कसल्याही श्रद्धा सापडत नाहीत. खानोलकर हेही जीएंचे आवडते लेखक - कवी. 'खानोलकरांना लाभलेला तेजस्पर्श असलेला मराठीत आज दुसरा लेखक नाही' असे त्यांचे मत होते. कवी मनमोहन यांच्याविषयी त्यांनी “ताऱ्या - ग्रहांची बटणे लावणारा हा माणूस असल्यामुळे जो भाग बटणे लावून झाकावा, तोच उघडा पडला” असे म्हटले आहे.
जी.ए.कुलकर्णी यांच्या प्रचंड व्यासंगाचा अभ्यास करताना केलेली ही काही निरीक्षणे आहेत. याव्यतिरिक्तही जीएंनी पुष्कळ वाचन केले होते व त्यावर त्यांनी त्यांच्या पत्रांत विस्ताराने लिहिले आहे. जीएंच्या साहित्यीक आवडीनिवडीचा हा एक ओझरता आढावा आहे.

एवढा मोठा प्रतिसाद पाहून चक्रावलो होतो. शेवटी नाव दिसल्यावर बरे वाटले.

जी एं विषयी लिहिण्याबद्दल काही मायबोलीकरांना विनंती केली होती. त्यांतील एकांनी तुमचे नाव सुचवले होते. तुम्ही जी एं च्या साहित्यावर पी एच डी केली आहे, असेही सांगितले.
या उपक्रमात लिहिण्यासाठी तुम्हांला फेसबुक मेसेज, मायबोली विचारपूस आणि मायबोली संपर्कातून विनंती केली होती. हे संदेश तुम्ही पाहिले का हेही कळत नव्हते.

आज प्रतिसादात का होईना, तुमचा लेख आला.

मराठी भाषा गौरव दिन २०२३ या ग्रुपमध्ये स्वतंत्र धागा काढून हा लेख लिहिलात, तर आणखी बरे होईल.

टण्या, सुंदर लिहिले आहेस.

प्रत्येक वेळी जीएंचा कथासंग्रह वाचायला घ्यायचा म्हणजे स्वतःचा एखाद्या चरख्यात प्रवेश करवून घ्यायचा, अशी भावना होते. तो चरखा एकदा फिरायला सुरू झाला की त्याच्याच गतीने, त्याच्याच नियमाने, आपल्या स्वतःच्या वलयांत सावकाश फिरत राहणार. त्यात घाईला थारा नाही. एकदा तो सुरू झाला की मधूनच बाहेर पडायला वाट नाही. त्या अनुभूतीतून पार झाल्याशिवाय पर्याय नाही. असे असूनही त्या अनुभूतीची तल्लफ अधूनमधून येत राहते, हेही खरे.

सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार.
मभादि संयोजकांपैकी भरत यांनी या विषयावर लिहायला लावल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानतो. अनेक दिवसांनी काहितरी लिहिले गेले.

सन्जोप राव यांनी दिलेला प्रतिसाद कृपया स्वतंत्र लेख म्हणून छापावा. महत्त्वाचा आढावा घेतला आहे त्यात.

उत्तम लेख. जी एं ची 'एक रात्र वैऱ्याची' आणि 'माणसे अरभाट आणि चिल्लर ' हि दोन पुस्तके आवडतात. इतर पुस्तकातील जड भाषा आणि विषय यामुळे एकावेळी जास्त वाचून होत नाही.

सुरेख लेख टण्या !
नुकतीच लक्ष्मी कथा वाचली / ऐकली त्यामुळे हे रसग्रहण खूपच आवडलं.

सन्जोप राव यांचा लेख स्वतंत्ररित्या माबोवर प्रकाशित करता येईल का? नंतर शोधायलाही बरे होईल. खूप इन्टरेस्टिंग प्रतिसाद आहे तो! विशेषतः लोकप्रिय साहित्यिकांबद्दलची जीएंची मतं एकदम त्याच्या लिखाणावरून ते कसा विचार करत असतील असे तुमचे जे एक मत बनते त्याला अनुसरूनच आहेत!

जबरदस्त लेख.
पिंगळावेळ, काजलमाया दोन्ही पुस्तकं केव्हाही वाचण्यासारखी आहेत.
स्वामी सारखी अतिशय ताकदीची कथा, उदास करून जाणारी कैरी, लक्ष्मी या कथा.तळपट चा वेगळा बाज.

इट इज सो सिम्पल टू बी डिफिकल्ट्, सो डिफिकल्ट् टू बी सिम्पल!
मी त्यांच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडलो. पण त्यांनी स्वतःला जो विळखा घातला त्यातून ते बाहेर पडू शकले नाहीत.
श्री म माटे, वि द घाटे, आचार्य अत्रे, चि वि जोशी
अर्नेस्ट हेमिग्वे -- फेअरवेल टुु आर्म्स
कामू --प्लेग
काफ्का -- द ट्रायल
डिक्शनरी न उघडता वाचता येणाऱ्या कथा.
तुम्हा सर्वांना अनेक सलाम!
आणि अगदीच तुलना करायची तर
शर्ली जॅॅक्सन ची "डार्क टेल्स" किंवा "लॉटरी" वाचा.

स्वामी खुप भयानक आहे. वाचताना आपल्यालाच कोन्डल्यासारख वाटत. >> +१. तरीही पिंगळावेळ म्हटलं की तीच कथा आठवते. वाचून बरीच वर्षं झाली, पण ती कथा अजूनही मनात रुंजी घालते आहे. जीएंच्या असल्या कथा म्हणजे मानगुटीवर बसणारी भुतंच आहेत, चांगल्या अर्थाने.

फारच सुंदर लिहिले आहे टण्या. जी ए वाचताना एका अनोळखी भुयारात शिरल्यावर जी घुसमट होते, भीती वाटते यातून आपण कधी बाहेर पडू शकू का नाही अशी तगमग होते ती तंतोतंत पोचते आहे या लेखातून. >>> +१

सन्जोप राव यांनी दिलेला प्रतिसाद कृपया स्वतंत्र लेख म्हणून छापावा. महत्त्वाचा आढावा घेतला आहे त्यात.
>> +१