मराठी भाषा गौरव दिन २०२३ - खेळ - शीघ्रकवितांच्या आनंदडोही -१. महाराष्ट्र गौरव गान

Submitted by संयोजक-मभागौदि-2023 on 27 February, 2023 - 03:03

शीघ्रकवितांच्या आनंदडोही - १ महाराष्ट्र गौरव गान
"
जय जय महाराष्ट्र माझा - गर्जा महाराष्ट्र माझा' कविवर्य राजा बढे यांनी रचलेले हे गीता नुकतेच महाराष्ट्राचे राज्यगीत घोषित झाले आहे.
यावरून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राचे वर्णन करणार्‍या कविता रचायच्या आहेत. त्यांत महाराष्ट्रातील नद्या, डोंगर, किल्ले , तीर्थक्षेत्रे यांची नावे असतील; संतांची मांदायळी असेल; ऐतिहासिक व्यक्तींचे स्मरण असेल किंवा अगदी हल्लीच्या एखाद्या दिग्गज मराठी माणसाचे कौतुक असेल.
फक्त या कविता अभंग, ओवी, पोवाडा, लावणी, श्लोक, आर्या, इ पारंपरिक छंदांत हव्यात. एखाद्या विषयाचे किंवा व्यक्तीचे समग्र वर्णन करणारी कविता थोड्या वेळात लिहिणे सगळ्यांनाच शक्य नसते. पण त्यांची ओळख करून देणार्‍या, त्यांच्याबद्दलचा एखादा प्रसग सांगणार्‍या काही ओळी नक्कीच लिहिता येतील.

तुमच्या रचना याच धाग्यावर लिहायच्या आहेत.

चला तर मग! आपल्या महाराष्ट्र राज्यातील गौरवपर गोष्टी आणि व्यक्तींवर कवने रचूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विविधांगी लेखनाची प्रसृत नित आभा
सर्वत्र संचार तरि भारतीयत्व हाच गाभा
अभ्यासपूर्वक मांडणीची रमणीय शोभा
भावतसे मजला ही 'रानड्यां'कडील 'प्रतिभा'..
(मराठी भाषेत विविध प्रकारच्या लेखनाची मौलिक भर टाकणाऱ्या प्रतिभा रानडे यांच्याबद्दलची आदरभावना व्यक्त करण्याचा किंचित प्रयत्न. गोड मानून घ्या.)

सुंदर कविता प्राची.

आता पुढची कविता लिहितो. एवढी शीघ्र केलेली नाहीये, पण त्यातल्या त्यात विषयाला धरून.

ऐका तुम्ही जन | त्या दोघींची कथा |
'जीवनात' व्यथा | दोन अर्थी ||
दोघींचाही असे | वेगळाच गाव |
एकमेका ठाव | नसे आधी ||
गाव तो सुंदर | निसर्ग सकळ |
अंतरी निर्मळ | सर्व तेथ ||
एक म्हणे आता | निघावे येथून |
पहावे फिरून | शहरात ||
दुजीनेही तेव्हा | त्यागिला स्वग्राम |
सोडोनी आराम | एकवार ||
दोघी जणी मात्र | मिळेल ते खात |
जाहल्या अशक्त | वाटेवरी ||
नगरवैभव | पाहो आल्या थेट |
दोघींचीही भेट | पुण्यक्षेत्री ||
पाहोनी उमगे | पुण्य फक्त नाम |
येथ पापकर्म | अहर्निश ||
दुष्ट जन तेथ | फेकती हो मल |
' दोघी अमंगल ' | म्हणती ते ||
पापप्रक्षालन | कराया जनांचे |
गिळती तयांचे | अपराध ||
एकलेपणाची | सोडोनी जाणीव |
झाल्या एकजीव | मुळा-मुठा ||

मिश्किल मुद्रा खट्याळ नखरा पडती पावले डौलात
बिंब शशीचे भाळि, सांडली कुपी मधाची बोलात
सावळी तनू अटकर बांधा अंबाड्यावर गजरा गं
नृत्यगायनी सभा डोलते रसिक करी तुज मुजरा गं
लावणीत लावण्य तुझें गं, बतावणीतिल मालण तू
ठुमरीची तू बहिण दूरची, गणासोबती गवळण तू
लोककलावंतीण म्हणविशी, सरस्वतीची लेकच तू
महाराष्ट्राच्या मंचावरती तुझ्यासारखी एकच तू!

सगळेच वाह!!

रेडीयोत रेडीयो मधुर
त्याला म्हणतात मर्फी
मराठी माणसाला हवी
चितळे पेढे नि बर्फी.

रिलायंस मोठी कंपनी
झाली तिची वाटणी
मराठी माणूस खूष
मिळता बेडेकर चटणी

पोळी देऊन घालवावं
जर आलं कुत्र झिप्रं
मराठी माणसाने हसावं
बघून लोणचं केप्र.

(छंद इ घ्या सांभाळून!! जे सुचलं ते लिहीलं.)

भटजीबुवा भटजीबुवा चालला कुठे तरातरा
आत्ताच आलो मी जाउन पुण्याला
भटजीबुवा भटजीबुवा काय पाहीले तिथे
सारसबाग, मंडई डेक्कन आणि वाडे

भटजीबुवा भटजीबुवा चालला कुठे तरातरा
आत्ताच आलो मी जाउन मुंबईला
भटजीबुवा भटजीबुवा काय पाहीले तिथे
सायन, दादर माटुंगा, आणि खारे वारे

भटजीबुवा भटजीबुवा चालला कुठे तरातरा
आत्ताच आलो मी जाउन नाशिकाला
भटजीबुवा भटजीबुवा काय पाहीले तिथे
त्र्यंबकेश्वर, काळाराम आणि द्राक्षांचे मळे

इतरांनी आपापली गावे घाला बघू.

सामो, भटजीबुवा दमलेत सध्या. थोडी विश्रांती घेऊन परत येतील हो.
Lol
तोवर - आजच्या विज्ञानदिनानिमित्त एक प्रयत्न -
विज्ञानाची धरूनि कास नवनवे सिद्धांत हे मांडती,
सामान्यांप्रति न्यावया परि तया गोष्टींरुपें सांगती.
ग्रहगोलांसह सख्य संस्कृत किती प्रिय वाणी भारती,
राष्ट्रासाठि ललामभूत असती पत्नी असे गणिती.
(रामो राजमणिः च्या चालीवर रचण्याचा प्रयत्न केला आहे)