मराठी भाषा गौरव दिन-स.न.वि.वि.- दत्तात्रय साळुंके

Submitted by दत्तात्रय साळुंके on 26 February, 2023 - 09:37

राजमान्य राजेश्री श्रीमंत बळीराजा
सेवेशी सादर प्रणाम,

सुरवातीला आदर व्यक्त करतो पण आपलं नातं मित्रवत वागणा-या बापलेकाचं त्यामुळे यापुढे एकेरी उल्लेख झाला तर अवमान समजू नये. लाडात पोर बाबाला ए बाबा म्हणतं म्हणजे ते बाबाचा अनादर थोडंच करतं.
सगळे तुला बळीराजा म्हणतात. तुझ्यातल्या दानशूरपणाला उद्देशून असेल. दारात आलेल्या कमीतकमी जेवायला तरी मिळेल, नाहीतर अर्धी भाकरी कुठं गेली नाही. वासुदेव, नंदीबैलही ओजंळी भरुन पावतो. रानात तर आनंदी आनंद कुणालाही वानोळा म्हणून सहज काहीही मिळतं. कुणीही हुरडा खावा, ऊस मोडावा, चार डहाळे हरभरा उपटावा.
पण जेव्हा तू आत्महत्या करतो तेव्हा तू बळीचा बकरा (बळीराजा) वाटतो. तुझ्या आत्महत्येला मी ही अंशत: जबाबदार आहे अशी दोषी भावना मनात दाटते. आणि तुझी आत्महत्या आम्ही थंड डोक्याने केलेला खून वाटतो. आम्ही अशी समाजव्यवस्था निर्मिली जिथं गरीबी हा शाप ठरतोय. गरीबाला बळ द्यायला आमचे तुटपुंजे प्रयत्न सध्यातरी फाटलेल्या आभाळाला ठिगळ जोडणंच आहेत. पण काहीच नसण्यापेक्षा काहीसं असणही सुखावतं.
तू जेवढा निसर्गाच्या अवकृपेचा बळी तेवढाच मानव निर्मित समाज व्यवस्थेचा.
जेव्हा तू ५०० किलो कांदा एक रुपया दरानं विकतो आणि वाहतूक खर्च ५१२ रुपये येतो तेव्हा तू कंबरकसून पुन्हा उभा रहा असं कुठल्या तोंडानं म्हणू. जर आम्ही कांद्याचे दर जरा वाढले की किती महागाई बाबा, असं म्हणत असू तर आम्हाला बदलायला हवं. मतांसाठी पणाला लागणारं तुझं अस्तित्व थांबवायला हवं. खर तरं आत्महत्येचा निर्णय तू वर्षानुवर्षे घेतलेला नसतो तो एकाच आशेवर. उद्या नवा सुर्योदय होईल. तो नवा सुर्योदय होत नाही याचा अर्थ तू स्वतःला बदलायला हवं असं मला वाटतं. जगाला तुझ्या अस्तित्वाची त्या शिवाय जाणीव होणार नाही.
तू समुह शेतीचा विचार कर. यातून तुझा खर्च वाचेल. परंपरागत शेती करताना आधुनिकतेची कास धर. ऊसाला ठिबकचं पाणी दे. शेतीला पुरक दूध दुभत्याचा व्यवसाय कर. त्यामुळे रासायनिक खताचा खर्च कमी होईल. शेतमालाला चांगला उठाव येईल. मुलाबाळांची लग्न साधीसुधी राहू दे. बडेजाव नको. तुकोबांचा बोल ध्यानात धर…
पाणी, वाणी, नाणी नासू नये.
शेती विकू नकोस. वाढत्या शहरीकरणामुळे एक दिवस तुझाच येईल.
चाराबंदी, कु-हाडबंदी, पाणी आडवा, पाणी जिरवा, पाण्याचं अभिलेख परीक्षण, झाडं लावणे, फळशेती करणे, बांधबंदिस्ती, मिस्र पीक पध्दती, आदी गोष्टी अमलात आण. आदर्श गावाची संकल्पना पोपटराव पवार, आण्णा हजारे, भास्कर पेरे पाटील आदीकडून शिक. कृषी विद्यापीठ, कृषी अधिकारी यांच्याशी सल्लामसलत कर.
अरे माणदेश सारख्या दुष्काळग्रस्त भागात महिलांनी केलेल्या प्रगती पासून प्रेरणा घे. अंबिका मसाले स्थापन केलेल्या कमल परदेशी पासून काही तरी शिक. राहीबाई पंरपरागत दुर्मिळ बियानं राखते कुणाच्याही मदती शिवाय. अरे चिमणीला कुठलं रेशनकार्ड नसतं, सरकारी योजनेतलं घर नसतं तरी ती जगते. तुझ्या करीता तर अनेक गोष्टी आहेत. तेव्हा असा आताताई विचार मनात आणू नकोस.
तू जेव्हा मरतो तेव्हा कुणी म्हणतं तू कौटुंबिक कलहातून आत्महत्या केली. कुणी अजून काही म्हणतं. मस्तवाल राजकारण होतं. आपल्या देशात मेल्यावर माणूस मोठा होतो हे तेव्हाच पटतं जेव्हा तुझ्या आत्महत्येची ब्रेकिंग न्यूज होते.
तू फक्त तुझ्या कुटुंबाला पोसत नसतो माझ्याही पोटात चार घास तुच घालतोस. म्हणजे मी ही एक विस्तारीत कुटुंबातील सदस्यच झालो. खूप उदात्त विचार आहे वसुदेव कुटुंबाचा. परस्परात जीवापाड मैत्र असावं म्हणजे एकाचं दुःख दुस-याच व्हावं.
तुझ्या दाण्या शिवाय पावसाच्या थेंबाला अर्थ येत नाही रे. पाचूनं बहरलेलं निसर्गाचं रुपडं तुझ्या घामानंच सजतं. उपाशीपोटी कोणालाही ते दिसणारही नाही. उपाशीपोटी जगाला भाकरीचा चंद्र दिसेल तू नसशील तर. मग कुठलं पिरतीचं चांदणं.
जगात जशी स्वार्थलोलुप माणसं आहेत तशी निस्वार्थीही आहेत. म्हणूनच कुठेतरी अंगारमळा न्यायासाठी पेट घेतो. नामचा उदय होतो.
म्हणून तुला जगायला हवं. तुझ्या पश्चात कुंटुबाचं काय होतं कधी विचार केलाय. तुझी अर्धांगिनी एक बैल असताना शेती कसते. शिवळाटीत एक बाजूला बैल आणि दुस-या बाजूला स्वत:ला जुपते. मग तुला पळपुटा म्हणू का? तुझं लहानं अनवाणी पायानं आईला मदत करतं. तुझे म्हतारे आईवडील तुझी बायको सांभाळते. कुठून आणतात हा दुर्लभ आत्मविश्वास.
आयुष्यात सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणं नाही घडत राजा. ज्या घडतात त्या आपलं म्हणायचं आणि पुढं चालायचं. घडत नाहीत त्या गोष्टीं साठी योग्य वेळ येईल असं समजायचं. म्हणून राजा आपण फक्त चालत राहयचं. हाच आपला धर्म. या चालण्यात जे जे उदात्त ते आपलंस करायचं मग वेदना जाणवत नाहीत.
बाकी तू तर जगाचा पोशिंदा जास्त काय समजावू. मी ही यापुढे मला जमेल तशी तुझी पाठराखण करेल. तेव्हा आत्महत्येचा विचार कधी मनात आणू नकोस. इतके दिवस धीर धरला अजून थोडा धर.
पत्राचा शेवट बहिणाबाईंच्या शब्दात करतो. त्यांनी संसारातल्या सुखदुःखांना किती तटस्थपणे पाहिलं. कष्टप्रद जगणं किती आनंदात व्यतीत केलं.
अरे संसार संसार, नाही रडनं कुढनं
येड्या, गयांतला हार, म्हणू नकोरे लोढनं ।
तुझा लाडका सेवक
क्ष
( टीप :- हा पत्रव्यवहार बळीराजा आणि माझ्यातला वैयक्तिक स्वरुपाचा आहे. कदाचित वाचक म्हणून तुमची काही मते वेगळी असतील ती कृपया या ठिकाणी मांडू नयेत

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे चिमणीला कुठलं रेशनकार्ड नसतं, सरकारी योजनेतलं घर नसतं तरी ती जगते.>>
आपल्या देशात मेल्यावर माणूस मोठा होतो >>
राजा आपण फक्त चालत राहयचं. हाच आपला धर्म. या चालण्यात जे जे उदात्त ते आपलंस करायचं मग वेदना जाणवत नाहीत.>.>
ह्यावर मी भला काय कॉमेंट करणार ?
खर आहे ते खरच आहे.

खूप छान लिहिलंय पत्र! अंतर्मुख व्हायला होतं.
जेवढा निसर्गाच्या अवकृपेचा बळी तेवढाच मानव निर्मित समाज व्यवस्थेचा.≤<<<<

हृद्य.
शेती विकू नकोस. वाढत्या शहरीकरणामुळे एक दिवस तुझाच येईल.>> आमच्या बऱ्याच मित्रमंडळींनी “फार्महाऊसेस” घेतलीय. मला मात्र दरवेळी वाटत असतं.. आणखींन एक शेत विकल्या गेलं.