मराठी भाषा गौरव दिन - स.न. वि.वि. - mrsbarve

Submitted by mrsbarve on 26 February, 2023 - 02:20

प्रिय चहास,
सकाळी जाग येते ती स्वयंपाकघरातून येणाऱ्या तुझ्याच सुंदर वासाने, त्यातच कधी आल्याचा तर कधी वेलचीचा मिसळलेला तुझा सुगंध ! माझ्या आवडत्या कपातून तुला मस्त वाफाळता असताना घेतलेले घुटके! अहाहा!! धरती पर गर कही स्वर्ग है तो बस चाय से है!

तशी तुझी अनेक रूपे आहेत. रस्त्यावरच्या टपऱ्यातून काचेच्या ग्लासातून ,कधी अमृततुल्य नावाने मिळणारा, तर कधी स्टार बक्स सारखया ठिकाणी मिळणारा चाय लाटे ! रूपे अनंत ! पण अनंत कोटी ब्रह्मांड नायक चहा - तुझ्या शिवाय बुवा माझा दिवस काही सुरु होत नाही!

तुझ्या चवीचे वर्णन करायला नकोच! कधी गोड़ तर कधी एकदम बिन साखरेचा अगोड हि! पण तरीही तितक्याच आतुरतेने, प्रेमाने आणि आनंदाने तुला मी प्राशन करते. तुझा रंग तर किती सुंदर! जणू सुंदर तरुणीच्या गोऱ्या गव्हाळ गालांसारखा!

आसामातल्या हिरव्यागार टेकड्यांवर आपलं बालपण घालवून तू हिरव्या पानापासून ते काळसर चॉकलेटी रंगाच्या पुडी च्या रूपात वेग वेगळ्या वेष्टनामध्ये भरून येतोस आणि बऱ्यापैकी महागही असतोस.

जसे राउळाच्या कळसाला लोटा कधी म्हणून नये या चालीवर कपभर चहाला नाही कधी म्हणू नये अशा भक्ती भावाने संपूर्ण देशात तुझे प्राशन होते. दक्षिणे कडे कॉफी या तुझ्या बहिणीचे साम्राज्य असले तरी! तू म्हणजे तूच! सगळ्या पेयांचा राजा! तुझ्या चुलत भावंडांमध्ये ग्रीन टी मोडत असावा. पण तुझ्या सारखी गम्मत कुणातच नाही! तुझ्या सारखा तूच!

कुणाकडेही गेल्यावर स्वागत गरम गरम सुंदर गव्हाळ सोनेरी अन गोड़ अशा तुझ्याच प्याल्याने होते! पण तुझीही चटक लागते बर का! म्हणजे तल्लफ येते ! छान पाऊस पडला असेल तर हमखासच तुझी आठवण येते . मग बरोबर काही तरी "बुडवा बुडवी " हवीच!

पोहे,उपमा, गरम पोळी यांच्या मागे पाठराखण करत तू येतोस तेंव्हा पोहे आणि उपमा भरून पावतात असे मला वाटते! तुझी तल्लफ येते पण तुझी सवय दारूच्या सवयी सारखी वाईट नाही .दारूने माणूस बरबाद होतो ,तर तुझ्या मुळे आबाद !

कधी नाक गच्च ,डोके गच्च होते तेंव्हा मस्त आल्याचा खिस घालून तुला घेतले कि कसे बरे वाटते ! कामाचा कंटाळा आला असेल तर तुझ्या एकाच प्याल्याने अशी मस्त तरतरी येते कि बस!

आज अचानक आठवतेय ,मी पावसात भिजत छत्री सांभाळत घरी येत होते. तू दिसलास, चक्क मातीच्या भांड्यातून तंदूर स्वादामध्ये! तुझे तेही रूप अन चव मला भावून गेले.

पण कधी कधी तुझ्या अतिसेवनाने लोक 'आम्ल पित्त' सारख्या आजारांना आमंत्रण देतात. पण त्यात तुझा काय दोष ? तुझ्यामुळे तर खरा ,झोपाळलेल्यालाही येतो होश!

आता तुला पत्र लिहिता लिहिता माझ्या आवडत्या तुझ्याच प्याल्याने मला इतके सारे पत्र सुचले बघ! असाच छान राहा! मला सकाळ संध्याकाळ भेटत राहा!

तुझी ,
चहाती
मी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

mrsbarve, तुम चा लेख सार्वजनिक कराल का?
संपादन -> Group content visibility ->Public - accessible to all site users.

मस्त,
चाय नाय तर काय नाय.. मी ही चहाच्या प्रेमात.. माझेही या लव्हलेटरला मम.. बदाम बदाम बदाम Happy