मी तांब्यापितळेच्या तारा वळवून त्यातून कलाकृती निर्माण करते हे इथे अनेकांना माहिती आहेच. आजवर भरपूर दागिने आणि काही ताराचित्रे तर काही मिक्स मिडिया ताराचित्रे केलेली आहेत. त्यातलेच हे नवीन पाऊल.
आधी बनवलेल्या 7-8 इंची गणपती आणि फुले-दुर्वा असा ताराचित्राचा फोटो बघून मैत्रिणीने त्याच धर्तीवर मोठे चित्र करून देशील का? असे विचारले. तिला कुठल्याही बोर्ड वा कॅनव्हासवर लावलेले तारचित्र नको होते. डायरेक्ट भिंतीवर लावता येईल आणि भिंतीचीच पार्श्वभूमी वापरता येईल असे हवे होते.
साईज दोन अडीच फुटाचा तरी हवाच होता. पण ते तसे रँडम बोलणे झाले होते. मैत्रीण सातासमुद्रापार राहणारी आणि भारतात येईल तेव्हा हे इथून घेऊन जाणार असा प्लॅन होता. मग नक्की कसे न्यायचे वगैरे बरेच विचार आणि शोधाशोध करून अखेर तिने तिच्या केबिन लगेजमध्ये व्यवस्थित झोपवून ही वस्तू न्यायची असे ठरवले. मग तिच्या केबिन बॅगेची मापे आणि वस्तूच्या बाजूने घालायचे पॅकिंग वगैरे बघून दोन फूट आणि दीड फूट ही आपल्या वस्तूची लिमिट आहे हे नक्की झाले.
आडवे लिमिट दीड फूट असले तरी पूर्ण चित्राचा तोल बघता दोन फूट उंचीला 15 इंचच पुरे होते. मग या मापाचा ड्रॉईंग शीट कापून घेतला.
7-8 इंची वस्तू 24-30 इंच इतकी मोठी करायची तर सगळीच गणिते बदलतात. चित्राचा ताल, आस तोच ठेवूनही तोल सांभाळताना काही बदल करावे लागतात. वेगवेगळ्या भागांचे एकमेकांशी प्रमाण कसे ठेवायचे याचा नव्याने विचार केला. काही गोष्टी(accents) लहान वस्तूत छान दिसतील त्या मोठ्या वस्तूत चांगल्या दिसणार नाहीत हे लक्षात आले. तर ज्यांची छोट्या वस्तूमध्ये गरज नव्हती अश्या काही नवीन गोष्टी आणाव्या लागतील हे जाणवले.
भिंतीवर खिळे ठोकून त्यावर हे चित्र चढवले जाणार तर कुठला भाग वजन पेलायला योग्य, कुठे कुठे खिळ्यांचा सपोर्ट हवा वगैरेही प्लॅनिंग लक्षात घ्यायला हवे होते.
हे सगळं डोक्यात गणपतीच्या रूपाचे स्केचिंग केले. गणपती झाल्यावर त्या हिशोबाने स्केच न करता डायरेक्ट दुर्वा, फुले वगैरे बनवायचे असे ठरवले.
एवढे मोठे चित्र करायचे तर 18 गेजच्या तारेची रेष फारच जास्त बारीक, नाजूक दिसली असती. त्यामुळे 16 गेज तार आणली बाजारातून. आधीच पितळ मिश्रधातू असल्याने घट्ट असतो वळवायला त्यात 16 गेज (तारा किंवा धातूंचे शीट्स यात गेजचा नंबर आणि जाडी व्यस्त प्रमाणात असते. नंबर लहान म्हणजे जाडी जास्त.) म्हणजे हात आणि खांद्याची मस्त मज्जा झाली.
मग दुर्वा आणि जास्वंदीचे फूल बनवले. पण दुर्वा फारच cluttered वाटत होत्या त्यामुळे केवळ फूलच ठेवले. कितीही प्लॅनिंग/ स्केचिंग आधी केले तरी वस्तू तयार होत जाताना इतपत बदल करावे लागतातच.
काल हे सगळे मैत्रिणीच्या हाती सुपूर्द केले. आता लवकरच तिच्या बॅगेतून बाप्पा सातासमुद्रापार रवाना होतील आणि मग तिच्या घरात भिंतीवर विराजमान होतील.
हात आणि खांदा दुखतोय अजून पण तयार झालेली वस्तूचे समाधान आणि ती बघून मैत्रिणीला झालेला आनंद यापुढे दुखणे फिके पडलेय.
सुंदर!
सुंदर!
सुंदर आहे. जास्वंदीचे फूलही
सुंदर आहे. जास्वंदीचे फूलही भाव खाउन गेले. गंध म्हणुन मस्त दगड प्लेस केलायस. फारच सुंदर.
मला अक्षरक्षः कालच भारतातल्या मैत्रिणीला भेटवस्तू पाठवायची होती तेव्हा तुझी आठवण आली. पण युट्युब चॅनलही आठवणीतुन गेलेला होता. नाहीतर तुला विचारायचे होते. कारण शोकामध्ये, तिला 'फील गुड' असे काहीतरी पाठवायचे होते. आणि जर तू काही व्यवसाय करत असशील तर तुझी एखादी कलाकृती मला, प्रचंड आवडली असती कारण अक्षरक्षः आत्मा असतो तुझा त्यात - असा अनुभव आहे. मग शोधले व शेवटी अन्य तडजोड केली.
ओह थँक्स गं!
ओह थँक्स गं!
थोडा स्टॉक असतो माझ्याकडे. आता 2-4 महिन्यांनी होपफुली अजून स्टॉक तयार असेल.
अरे वाह हटके आहे हे..
अरे वाह हटके आहे हे..
कल्पक आणि दिसतेयही छान
छान झाले आहे.
छान झाले आहे.
जास्वंदी फूल विशेष आवडले.
फोटो सुद्धा बघत बसावा असा आहे
फोटो सुद्धा बघत बसावा असा आहे. मूळ कलाकृती तर अगदी खिळवूनच ठेवेल..
अप्रतिम गणपतीबाप्पा आणि
अप्रतिम गणपतीबाप्पा आणि जास्वंदही. प्रसन्न वाटलं एकदम.
>>अप्रतिम गणपतीबाप्पा आणि
>>अप्रतिम गणपतीबाप्पा आणि जास्वंदही. प्रसन्न वाटलं एकदम.>> +१
सुंदर बाप्पा.
सुंदर बाप्पा.
जास्वंद फूल फार आवडलं.
खूपच सुंदर कलाकुसर
खूपच सुंदर कलाकुसर
लाईट बॅकग्राऊंड वर ही बघायला आवडेल किंवा भिंतीवर.
थँक्स सर्वांना!
थँक्स सर्वांना!
वस्तू क्लाएंटच्या सुपूर्द केलीये. आता लाईट बॅकग्राउंड वगैरे शक्य नाहीये.
मैत्रिणीच्या घरी भिंतीवर
मैत्रिणीच्या घरी भिंतीवर गणपतीबाप्पा विराजमान झाले.