चित्रपटाची सुरुवात होते ती लहान मुलांनी बसवलेल्या संगीत शारदेच्या प्रयोगाने. 'म्हातारा इतुका न, अवघे पाऊणशे वयमान' हे औपरोधिक पद संपते, छोटी शारदा 'विंगेतून' बाहेर येते आणि आपल्या खेळगड्याने लावलेली पांढरी मिशी पाहून गडबडते. 'मी नाटकातसुद्धा म्हातार्याशी लग्न करणार नाही!' असे जाहीर करून रडू लागते. 'आमच्या मुख्य नायिकेची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे' नाटकावर पडदा पडतो आणि 'पुढच्या वर्षी याच तिकीटावर हेच नाटक दाखवू' असे आश्वासन देण्यात येते.
हे पाहाताना हसूही येते, आणि चरकायलाही होते. चित्रपटातील पुढच्या घटनांची नांदी त्यात आहेच, पण एखादी स्त्री 'स्क्रिप्ट' फॉलो न करता स्वतंत्र मत मांडू पाहाते म्हणजे तिच्या प्रकृतीतच काहीतरी बिघाड असला पाहिजे असे मानणारे वयाने वाढलेले कितीतरी स्त्रीपुरुष आठवून एक कळ उठते.
'कुंकू' ही नीरू या मुलीची कथा. तिला इंग्रजी/मराठी शाळेबरोबरच गाणेही शिकवणार्या सुधारक विचारांच्या आईबापामागे मामामामींनी सांभाळले आहे. पैशाच्या मोहापायी मामा तिचे लग्न म्हातार्या बिजवराशी लावून देतो, आणि नीरेचा आत्मशोधाचा प्रवास सुरू होतो.
ती संतापाने पेटून उठते, पण यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग तिला त्या क्षणी दिसत नाही. दावणीला बांधलेल्या गायीसारखी मुकाट नवर्याच्या बिर्हाडी निघून जाते. मात्र 'तुम्ही आजपासून मला मेलात' असे मामाला स्पष्ट सांगायला कमी करत नाही. नवर्याच्या घरी संपूर्ण असहकार मांडते. तिला हे लग्न नकोसे आहे, त्याबरोबर येणारे कुठलेही नातेसंबंध, सामाजिक बांधिलक्या नको आहेत. अपवाद शाळकरी पुतणीचा. ही मात्र तिला सहज भाबडेपणाने जीव लावते.
नवर्याच्या एक काकी घरात आहेत. त्या नवर्याच्या ताटात तिला जेवायला लावण्यापासून नवर्याची शय्यासोबत करायला लावण्यापर्यंत सगळ्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. त्या खवट्ट आहेतच, पण मुळात त्याही चाकोरीच्या बळी आहेत. त्यापलीकडे विचार करायचा असतो हे त्यांना माहीतच नाही. तो कोणी केला तर त्याला कसे प्रत्युत्तर द्यायचे हेदेखील त्यांना माहीतसुचत नाही.
नीरा त्यांची मुळीच पत्रास ठेवत नाही. मात्र तिची ही चीड आणि कडवटपणा हा परिस्थितीने आलेला आहे, नीरूचा मूळ पिंड तो नाही. तिचे पोरपण जसे काकींच्या खोड्या काढण्यात दिसते तशीच तिच्यातली कोवळीक अंगणात बाग करण्यात दिसते. प्रतिकूल परिस्थितीतदेखील फुलझाडे फुलवणे हादेखील धैर्याचाच एक आविष्कार नाही का?
'वाटेल तितके दु:ख सहन करेन, पण अन्याय मुळीच सहन करणार नाही!' हा मंत्र तिने उराशी बाळगलेला आहे. तो मंत्र, आईवडिलांनी केलेल्या संस्कारांवरची श्रद्धा आणि आपले स्वच्छ चारित्र्य यांचाच तिला आधार आहे.
नवरा तिला 'कुलटा' म्हणतो तेव्हा ती वाघिणीसारखी चवताळून उठते आणि तिच्याकडे वाईट नजरेने पाहणार्या सावत्र मुलाला फोकाने बडवायला मागेपुढे पाहात नाही!
तिची उलघाल कळते ती आता तिची सावत्र मुलगी झालेल्या समाजसेविका चित्राला, पण तीदेखील 'तपश्चर्या करीत राहा, वाट पाहा, एक दिवस तुला प्रकाश नक्की दिसेल' असा दिलासा देण्यापलीकडे काहीही मदत करू शकत नाही. चित्रा राहायला येते तेव्हा नीरू तिला हेन्री वॉड्सवर्थ लॉन्ग्फेलोचं 'साम ऑफ लाइफ' गाऊन दाखवते.
Lives of great men all remind us
We can make our lives sublime,
And, departing, leave behind us
Footprints on the sands of time;
Footprints, that perhaps another,
Sailing o’er life’s solemn main,
A forlorn and shipwrecked brother,
Seeing, shall take heart again.
नेमकं हेच तीही म्हणते. 'माझा त्रागा फक्त माझ्यासाठी नाही, पण यातून धडा घेऊन दुसर्या एखाद्यातरी नीरूला अशी परिस्थिती टाळता आली तरी ते मी सार्थक समजेन.'
नंतर सासरी मामा तिला भेटायला येतो तेव्हा ती त्याची ओळखदेखील उडवून लावते आणि खुशाल त्याला पोलिसांच्या ताब्यात देते. 'आज हा मला आपली भाची म्हणतो आहे, उद्या बायकोसुद्धा म्हणेल' हे केवळ नाटक नाही. कुठल्या ना कुठल्या नात्याच्या मिषाने स्त्रीला उगाचच 'पंखाखाली' घेऊ पाहणार्या मानभावी पुरुषांना ती एक चपराक आहे.
अर्थात हे सगळे जमेस धरूनही नीरूदेखील तिच्या काळाच्या परिघातच बांधली गेलेली आहे. म्हातार्याऐवजी तिला वयाला साजेसा नवरा मिळाला असता, तर बहुधा तिने लग्न आणि त्याबरोबर येणारी सारी जोखडे आनंदाने वाहिलीच असती. शिकलीसवरलेली असूनही स्वतंत्रपणे वेगळे राहाण्याचे तिच्या मनातदेखील येत नाही, आणि नवरा त्याचे डोळे उघडल्यावर स्वहस्ते तिचे कुंकू पुसतो तेव्हा ती कावरीबावरीही होते! चारित्र्याबाबतच्या तिच्या कल्पनांत ‘परपुरुषांबरोबर न बोलणे, फिदीफिदी न हसणे’ आहेच.
नवर्याचे वय हादेखील फक्त एक तत्कालसुसंगत प्रातिनिधिक मुद्दा वाटतो मला. पुरुषी वर्चस्वाच्या अवास्तव कल्पनांचे बळी आधी पुरुष असतात, आणि त्यातून अपरिहार्यपणे निर्माण होणार्या असुरक्षिततेच्या बळी बायका! हे चित्र आजतरी बदलले आहे का?
चित्रपट व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केला आहे, आणि त्यांची चित्रपट माध्यमावरची पकड पावलोपावली दिसते. नीरूच्या लग्नघरामागे कोणीतरी ओढत नेलेली गाय, 'कधीचा मुहूर्त धरायचा' विचारताना नवर्याने मांडीवर आपटलेल्या छडीतून दिसणारा उतावीळपणा, भिंतीवरच्या अधूनमधून बंद पडणार्या लंबकाच्या घड्याळाचे रूपक, चित्रा जायला निघते तेव्हा पिंजर्यातून ओरडणारा पक्षी, अशी कितीतरी दृक्श्राव्य सूचने कथेच्या ओघात येतात. केशवराव दात्यांनी म्हातारे वकीलसाहेब इतके आब राखून रंगवले आहेत की अभिनयातला तो एक वस्तुपाठच ठरावा. सर्वात व्हल्नरेबल भूमिका ही, पण ते कुठेही तिचे व्यंगचित्र होऊ देत नाहीत. शांता आपटे नीरूच्या भूमिकेत मूर्तिमंत विद्युल्लताच दिसतात. इतरही प्रभातची नटमंडळी लहानमोठ्या भूमिका चोख बजावतात. शांताराम आठवल्यांची केशवराव भोळ्यांनी संगीतबद्ध केलेली आशयसंपन्न गीते आजही कानाला गोड लागतात.
'मन सुद्द तुजं, गोस्ट हाये प्रिथिवीमोलाची! तू चाल फुडं, तुला रं गड्या भीती कशाची? पर्वाबी कुनाची?!' हे माझे अतिशय आवडते गीततर प्रेरणादायी गीतांचा मुकुटमणीच आहे.
झेंडा भल्या कामास जो घिऊन निगाला
काटंकुटं वाटंमंदी बोचती त्येला
रगत निगंल, तरीबी हासंल, शाबास त्येची!
हा चित्रपट ना. ह. आपट्यांच्या 'न पटणारी गोष्ट' कादंबरीवर आधारित आहे. मी कादंबरी वाचलेली नाही.
आपली मतं, इच्छाआकांक्षा बाळगून असणारी आणि त्यांच्या पूर्तीसाठी झगडणारी unapologetic स्त्री ही मात्र मला फार फार पटणारी गोष्ट आहे!
(सदर चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध आहे.)
वा!!! दिग्दर्शनाचे, कंगोरे
वा!!! दिग्दर्शनाचे, कंगोरे मस्त उलगडून दाखवले आहेस. मला कळले नसतेदेखील. छान लिहीलयस आवडत्या चित्रपटाबद्दल.
फार आवडले हे.
फार आवडले हे.
नीरेला स्वतःचं सत्य हवंय, समाजाचं नाही. बहुतांश स्त्रियांना हे माहितीच नसायचं त्यामुळे त्या कस्टमाईज व्हायच्या. ज्या गोष्टी तिच्या पिंडाशी व इतरांशी समांतर आहेत, त्या मात्र ती जपतेयं.
पुरुषी वर्चस्वाच्या अवास्तव कल्पनांचे बळी आधी पुरुष असतात, >>> हे ते हवं तेव्हा सेलेक्टिव्हली वळवत असतात नं. समाजाची व संस्कृतीची बहुतांश जडणघडण त्यांच्या सुखासाठी आहे. बायकांनी मात्र सर्वांची सोय पहावी, सुख नाही असे एकंदर धोरण आहे.
छान लिहिलं आहेस परिक्षण आणि
छान लिहिलं आहेस परिक्षण आणि कलाकृतीची निवड तर फारच आवडली.
पुरुषी वर्चस्वाच्या अवास्तव कल्पनांचे बळी आधी पुरुष असतात >>> हेच बायकांबद्दलही म्हणता येइल. स्त्रीत्वाबद्दलच्या अवास्तव कल्पनांच्या बळी आधी बायका असतात आणि मग त्या इतर बायांनाही बळी देतात, अगदी सर्रास, आजही.
अतिशय सुंदर परीक्षण.
अतिशय सुंदर परीक्षण.
फार सुंदर परीक्षण.. केवढा
फार सुंदर परीक्षण.. केवढा जुना चित्रपट असूनही आजही relevant वाटतो.. पण नंतर अलका कुबल पटां मुळे मराठी चित्रपट सृष्टीला जी काही उतरंड लागली.. बाबा रे..
ह्या चित्रपटाविषयी ऐकलं
ह्या चित्रपटाविषयी ऐकलं/वाचलंय, पण पहायचा राहून गेलाय. हा लेख वाचून सिनेमा पहायच्या विचारानं परत उचल खाल्लीय. अप्रतिम लिहिलंय.
परीक्षण इतकं छान आहे की
परीक्षण इतकं छान आहे की चित्रपट पाहावा वाटतोय.
सुंदर परीक्षण.
सुंदर परीक्षण.
छान ओळख. या चित्रपटाबद्दल खूप
छान ओळख. या चित्रपटाबद्दल खूप ऐकलं आहे पण बघितलेला आठवत नाही. बघतो आता.
मभागौदि उपक्रमासाठी उत्तम
मभागौदि उपक्रमासाठी उत्तम चित्रपट निवडला. तुमचे लिखाण वाचतो नियमित. उत्तम आहे परीक्षण.
दूरदर्शनवर बहुतेक प्रभात किंवा व्ही शांताराम फिल्म महोत्सव दाखवला होता त्यात कुंकू, माणूस, शेजारी आणि अजून एक कुठलासा चित्रपट दाखवला होता. अरूणा अंतरकरांचं शब्दबंबाळ परीक्षण केसरीत असायचं त्यामुळे केसरीच्या वाचकांचा चित्रपटाचा वर्गच भरायचा. कमी वयात बघितलेला आहे, ते ही एकदाच तरीही लख्ख आठवतो. कारण अंगावर आला होता. प्रतिमा का वापरतात हे माहिती नसतानाही या चित्रपटात सतत येणारं घड्याळ आणि त्याचे टोल पडल्यावर वयस्कर नवर्याची होणारी घालमेल हे आजही जसंच्या तसं लक्षात राहीलं आहे. नायिकेचं नाव आता लक्षात नाही, पण बंडखोर स्त्री जबरदस्त उभी केली आहे.
त्या काळासारखी माणसं लहान असताना अजूनही पाहण्यात आलेली असल्याने आणि हे असे का वागतात हा प्रश्न पडत असल्याने चित्रपट चांगलाच भिडला. आता मुलांना हे सगळे संदर्भ आधी सांगून मगच सिनेमा दाखवावा लागेल.
अतिशय सुंदर परीक्षण.
अतिशय सुंदर परीक्षण.
खूप छान लिहिलंय स्वाती.
खूप छान लिहिलंय स्वाती.
लहानपणी पहिला होता. अगदी तपशिलात नाही पण बराच आठवतोय.
अप्रतिम लिहिले आहे. खूप
अप्रतिम लिहिले आहे. खूप सुरेख.
खूप सुरेख लिहिलं आहे.
खूप सुरेख लिहिलं आहे.
नवऱ्याला तंबी देताना 'हा माझ्या हातात दिवा आहे,दिव्यात भरपूर तेल आहे ' हा डायलॉग भारी आवडला होता.
आवडलं लेखन.
आवडलं लेखन.
नाव ऐकून होतो या सिनेमाचे, सविस्तर माहिती आज मिळाली.
सर्व अभिप्रायदात्यांचे
सर्व अभिप्रायदात्यांचे आणि हा उपक्रम राबवणार्या संयोजकांचे मनःपूर्वक आभार.
>>> हेच बायकांबद्दलही म्हणता येइल. स्त्रीत्वाबद्दलच्या अवास्तव कल्पनांच्या बळी आधी बायका असतात आणि मग त्या इतर बायांनाही बळी देतात
खरं आहे. वर्षानुवर्षांचं कंडिशनिंग मोडायलाही तितकाच काळ जावा लागतो की काय नकळे!
अर्थात हे सगळे जमेस धरूनही
अर्थात हे सगळे जमेस धरूनही नीरूदेखील तिच्या काळाच्या परिघातच बांधली गेलेली आहे. म्हातार्याऐवजी तिला वयाला साजेसा नवरा मिळाला असता, तर बहुधा तिने लग्न आणि त्याबरोबर येणारी सारी जोखडे आनंदाने वाहिलीच असती. शिकलीसवरलेली असूनही स्वतंत्रपणे वेगळे राहाण्याचे तिच्या मनातदेखील येत नाही, >> हा कंगोरा आवडला. कधी डोक्यातहि आला नव्हता.
छान लिहीले आहे. एक फार जुना
छान लिहीले आहे. एक फार जुना गाजलेला पिक्चर इतकेच माहीत होते याबद्दल. आवडला लेख.
म्हातार्याऐवजी तिला वयाला साजेसा नवरा मिळाला असता, तर बहुधा तिने लग्न आणि त्याबरोबर येणारी सारी जोखडे आनंदाने वाहिलीच असती. शिकलीसवरलेली असूनही स्वतंत्रपणे वेगळे राहाण्याचे तिच्या मनातदेखील येत नाही, >>> हे नीट समजले नाही. अजूनही लोक हेच करतात ना? काही अपवाद सोडले तर लग्न करणे व त्यानंतर येणार्या जबाबदार्या घेणे हेच कॉमन आहे. त्या जबाबदार्या किमान भारतात अजूनही अगदी समसमान नाहीतच आणि अगदी अमेरिकेत व इतर प्रगत देशात आता राहणार्या भारतीयांमधेही अजूनही त्या तितक्या समान नाहीत.
वर्षानुवर्षांचं कंडिशनिंग मोडायलाही तितकाच काळ जावा लागतो की काय नकळे! >>> यात असेही आहे की पीडित किंवा एकूणच सामजिकरीत्या खालच्या समजलेल्या गेलेल्या गटातून/वर्गातून वर आलेले लोक त्या वरच्या वर्गाशी जास्त असोसिएट करतात आणि एकेकाळी आपण ज्या वर्गात्/सामाजिक गटात होतो त्यातील लोकांबद्दल फार सहानुभूती बाळगत नाहीत. उदा: इथे अनेक वर्षे असलेले भारतीय नवख्या भारतीयाला आम्ही तुमच्यातलेच आहोत हे दाखवण्यापेक्षा आम्ही अमेरिकन आहोत हे जास्त ठसवतात
>>> हे नीट समजले नाही.
>>> हे नीट समजले नाही. अजूनही लोक हेच करतात ना?
म्हणजे तिला मामाने तिच्या अपेक्षा वा मतं न विचारता आणलेलं स्थळ, ‘दाखवून’ लग्न, फक्त वरपक्षाकडूनच होकार/नकार, यापैकी कशाहीबद्दल तात्त्विक आक्षेप नाही. चार बुकं शिकलेली असूनही कुणा(ही) नवऱ्याची बायको म्हणवून घेण्यापलीकडे स्वतःची अशी काही महत्वाकांक्षा (aspiration) दिसत नाही. तिच्याच वयाची सावत्र मुलगी लग्न न करता समाजकार्य करते आहे हे प्रत्यक्ष पाहिल्यावरही घर सोडण्याचं तिला सुचत नाही, अशा अर्थी म्हणते आहे.
इतकंच काय, तरूण मुलगा दाखवून म्हाताऱ्याला बोहल्यावर उभा केला या फसवणुकीबद्दलही ती बोलताना दिसत नाही. ते खरंतर जास्त क्लेशकारक नाही का? जणू काही तरणा असता तर नगाला नग चालला असता!
या सगळ्यात काय गैर आहे हे आज आपल्याला दिसतं, तिला तीच जगरहाटी ठाऊक आणि मान्यही आहे. She’s a product of her time.
चित्रपटाचे मर्म उलगडून
चित्रपटाचे मर्म उलगडून दाखवणारे लिखाण.
ह्यातला खरा व्हिलन काळ च आहे. मामाची नाही तरी एका टप्प्यानंतर वकीलसाहेबांची कीवच येते.
'मन सुद्ध तुझं ' गाणं आवडते. बरेच वेळा यु ट्युब वर बघितले जाते. आता परत एकदा संपुर्ण चित्रपटही बघायला हवा.
धन्यवाद ताई, माझ्याच
धन्यवाद ताई, माझ्याच आजोबांच्या "न पटणारी गोष्ट" कादंबरीवरील "कुंकू" चित्रपटाचे रसग्रहण आवडले. ही कादंबरी जेव्हा १९२२ साली पहिल्यांदा प्रसिद्ध झाली, तेव्हाच महाराष्ट्रात या कादंबरीने वादळ उठवले होते. त्या वादळाचे कुंकू चित्रपटाने मोठ्या वादळात रुपांतर केले. या निरेची कथा खरी घडली असून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली येथे घडली आहे. माझे आजोबा नारायण हरी आपटे एकदा लग्नाला गेले होते. तेथे नवरीने होणार्या नवर्याला घास भरवायचा नाकारला. हे या कथेचे मुळ बीज.
बराच काही सांगण्यासारखं आहे ते पुन्हा कधीतरी. सध्या मी माझ्या आजोबांचे चरित्र लिहित आहे. त्यामुळे थोडक्यात लिहिले. विस्मृतीत गेलेल्या तरीपण सजग समाज न विसरलेल्या चित्रपटाच्या रसग्रहणाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
एक छोटी सूचना, नायिकेचे नाव दोन्हीकडे नीरा असे आहे नीरु नव्हे. शक्य असेल तर संपादन करा. प्रेमाने म्हणाले असेल तर राहूद्यात.
नारायण हरी आपटे हे तुमचे
नारायण हरी आपटे हे तुमचे आजोबा __/\__
त्यांचे चरित्र लवकर वाचायला मिळेल ही अपेक्षा!! शुभेच्छा!!
क्या बात है केदारजी६५००!
क्या बात है केदारजी६५००! चरित्रलेखनाबद्दल अनेक शुभेच्छा.
>>>>>विस्मृतीत गेलेल्या तरीपण
>>>>>विस्मृतीत गेलेल्या तरीपण सजग समाज न विसरलेल्या चित्रपटाच्या रसग्रहणाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट आहे ही स्वाती.
अरे, इथे पाहिलंच नव्हतं!
अरे, इथे पाहिलंच नव्हतं!
धन्यवाद, केदारजी.
चरित्र प्रकाशित केलंत की नक्की कळवा, वाट पाहात आहे.
आता संपादित करण्याची मुदत संपलेली दिसते आहे, खेरीज ‘नीरू’ हे संबोधन आपुलकीनेच वापरलं होतं.
मला माहीत होतं की तुझ्या
.
कुंकू बघितला.
कुंकू बघितला.
१९३८ म्हणजे जवळ जवळ ९० वर्षे होत आली या चित्रपटाला. ती ताठ मानेने जगणारी, आपल्यावरील अन्याय आपण स्वतः दूर करण्याचा प्रयत्न करणारी, त्यासाठी इतर कोणाला दूषणे सोडा, जबाबदारही न धरणारी, मध्यममार्ग काढून त्यातल्या त्यात तिची आणि आपली फसवणूक अजिबात न करणारी अशी नायिका मराठीत ९० वर्षांपूर्वी होती. तो चित्रपट प्रदर्शिक तेव्हा होऊ शकला, तो लोकांनी बघितला... आणि आज?
त्याकाळी नीरा जे बोलली आहे ते आजची स्त्री, चित्रपट मालिका सोडा त्यात बुरसटलेलं दाखवलं तर प्रेक्षक मिळतात असा सार्वजनिक समज आहे, बोलते का? परंपरा आणि संस्कृतीची पुरुषसत्ताक जोखडं आज तरी सैलावली आहेत का? बिजवर/ वयातील फरक ही चित्रपटांत दाखवलेला प्रश्न असला तरी व्यापक अर्थाने शिकलेली, विचार करणारी, निर्णय घेणारी, ते निभावणारी, आणि तडजोड अजिबात न करणारी नायिका फार लोभस आहे.
ह ना आपटे आणि व्हि. शांताराम यांना सलाम!
सॉरी, वर ना. ह. आपटे
सॉरी, वर ना. ह. आपटे लिहायला हवं होतं. पण आता संपादनाची वेळ टळली.