मराठी भाषा गौरव दिन - स.न. वि.वि. - कुमार१

Submitted by कुमार१ on 25 February, 2023 - 01:06

प्रति
( दुर्मिळ झालेल्या) प्रिय टपालपेटीस
स न वि वि.

अग, किती वर्ष झालीत तुझ्याशी संपर्क संपून ! खरंच आता आठवत नाही. संपर्क तर जाऊदेच, गेल्या कित्येक वर्षांत माझ्या जाण्या-येण्याच्या रस्त्यांवरून तुझं दर्शन सुद्धा झालेले नाही. आता तुझ्या आठवणी काढायच्या तर भूतकाळात जावे लागणार.

बहुतेक तुझा माझा पहिला संपर्क पन्नास वर्षांपूर्वी आला. माझे ते शाळकरी वय. घरातल्या वडीलधाऱ्यांनी लिहून ठेवलेली पोस्टकार्ड आणि अंतरदेशीय पत्रे तुझ्यात नेऊन टाकण्याचे काम आम्हा भावंडांना करावे लागे. त्या काळी तुझा दिमाख काही औरच होता. मस्तपैकी लालभडक रंगात तुला रंगवलेली असायची आणि कुठेतरी त्यात काळ्या रंगाचा पट्टा. तुझ्यात पत्र टाकण्याची जी खाच होती त्याच्यावर तुझी एक छानशी चोच देखील असायची. तुझ्या मधल्या भागामध्ये पोस्टमनने पत्र काढून नेण्याच्या वेळा लिहिलेल्या असायच्या. मला आठवते त्यानुसार पोस्टमन 24 तासातून दोनदा ते काम करीत असत. तुझा आकारही लक्षवेधी होता. शहरांमध्ये तुझी एकूण संख्या तर भरपूर असायचीच. अक्षरशः फुटाफुटावर तुझी स्थापना झालेली असायची; याबाबतीत तू अगदी गणेश मंडळांशी स्पर्धा करायचीस ! तुझ्या ठिकाणानुसार तुझ्या आकारांमध्ये तीन तरी प्रकार दिसायचे- लहान मोठा आणि भव्य.

तुझ्या या सगळ्या ठिकाणच्या रूपांमधून ठराविक वेळेला पोस्टमन लोक पत्रे काढून नेत. मग ती पत्रे विभागीय टपाल खात्यांकडे जात. कधीतरी अशा खात्यात जाण्याचा योग यायचा तेव्हा तिथे चाललेली आवाजी गडबड आणि लगबग अगदी बघण्यासारखी असायची. तुझ्यामार्फत तिथे पोचलेल्या विविध पत्रांची विभागणी, मग वेगवेगळे गठ्ठे आणि पुढे मोठी पार्सल बांधून त्या पत्रांची रेल्वे किंवा बस स्थानकांवर पाठवणी व्हायची. कितीतरी लांब पल्याच्या रेल्वे गाड्यांना टपाल नेण्यासाठी खास ‘मेल’ गाड्या असायच्या. त्या गाड्या म्हणजे रेल्वे खात्याचे एक भूषण असायचे.

तुझ्यामार्फत टाकलेले पत्र दुसऱ्या माणसाला मिळायला काही दिवस लागायचे. परंतु तो वाट पाहण्याचा कालावधी देखील एक हुरहूर निर्माण करणारा असायचा. तुझ्यात टाकलेले आणि परदेशी पोचणारे पत्र तर बऱ्यापैकी उशिराने पोचायचे. पण शहरातल्या मोठ्या टपाल विभागांमध्ये तुझा एक स्वतंत्र अवतार देखील स्थापन केलेला असायचा. तो खास परदेशी पाठवायच्या पत्रांसाठी असायचा. त्यात टाकलेलं पत्र हे त्यातल्या त्यात परदेशात लवकर पोहोचत असे. मग आमच्यासारखे जातिवंत पत्रलेखक तुला इथे भेटण्यासाठी येणारच की ! एकदा शहराच्या मुख्यालयात म्हणजे जीपीओमध्ये मी तुला एका वेगळ्याच रंगात पाहिले होते. तुझ्या नेहमीच्या लाल साडी ऐवजी तुला वेगळ्या रंगाची साडी नेसवली होती. त्या पेटीचा नक्की हेतू आता आठवत नाही.

टपाल कार्यालयांमध्ये असलेल्या काही मोजक्या पेट्या वगळल्या तर गावामधल्या बहुतेक सगळ्या पेट्या उघडयावरच असायच्या. रस्त्यात तुला असं वर्षानुवर्ष उघड्यावरच ठेवलेले असल्यामुळे सर्व हवामानांचा सामना तू किती समर्थपणे करायचीस. रणरणत्या उन्हामुळे तू अगदी तापून निघायचीस. तर पावसाळ्यात तुला दिवसातून कित्येक वेळा सचेल स्नान देखील घडायचे आणि ऐन हिवाळ्यात पहाटे पहाटे तुझ्या अंगावर छानसे दव सुद्धा साठायचे. या सगळ्याचा मुकाबला करत तू तुला स्थापलेल्या ठिकाणी किती खंबीरपणे उभी असायचीस- पत्रे स्वीकारण्यासाठी कायमच आ वासून. दिवसाकाठी तुझ्या पोटामध्ये तू काय काय साठवत असायचीस ग ! आनंद, दुःख, राग, लोभ जन्ममृत्यू वार्ता, जाहिरात आणि प्रसार …. बाप रे बाप ! किती ते मानवी भावभावना आणि व्यवहारांचं विचित्र मिश्रण. हे असलं रसायन तुझ्या पोटात असताना देखील तू किती शांत आणि निर्विकारपणे उभी असायचीस. दर बारा तासांनी पोस्टमनभाऊ तुला रिकामी करणार आणि मग पुन्हा एकदा उपाशीपोटी तू हे असलं सगळं फतफतं स्वीकारण्यासाठी तयार…

असे अनेक उन्हाळे पावसाळे झेलल्यानंतर हळूहळू तुझे देखील वय व्हायचं. तुझा रंग उडायचा आणि मग पाऊसपाण्याच्या माऱ्यानंतर तुझा काही भाग गंजू लागायचा. तुझी ही अवस्था झाल्यानंतर तुझी डागडुजी करणे भाग असायचे. पण तू पडली सरकारच्या मालकीची. मग तुझ्याकडे वेळच्यावेळी कोण लक्ष देणार ? त्यामुळे कित्येक महिने तुला अशा दुर्दशेतच काढायला लागायचे. मग काही जागरूक नागरिक वर्तमानपत्रातून त्वेषाने पत्र लिहायचे,

अमुक अमुक ठिकाणची पेटी आता गंजली आहे आणि पार तुटण्याच्या बेतात आहे. संबंधित अधिकारी इकडे लक्ष देतील काय ?”.. वगैरे.

आणि मग सावकाश योग्य त्या अधिकाऱ्यांना जाग येऊन एक तर तुझी दुरुस्ती व्हायची किंवा तुझी फारच वाईट अवस्था झाली असल्यास तुला काढून तिथे नव्या पेटीची स्थापना व्हायची.

माणसे एखाद्या परिसरात राहत असतात तेव्हा त्यांच्या आसपासच्या अनेक गोष्टी त्यांच्या जिव्हाळ्याचा भाग असतात. एखाद्या पेठेतील दुकान असो की देऊळ, शाळा असो की उद्यान, आणि अशा अनेक गोष्टी या तिथल्या लोकांना ‘आपल्या’ वाटत असतात. त्या सगळ्या यादीत आपली टपालपेटी ही सुद्धा खूप महत्त्वाची वाटायची. किंबहुना आम्हा सर्वांच्या संसाराचा तू देखील एक घटक होतीस. आमच्या घरी येणाऱ्या एखाद्या नव्या पाहुण्यांना आमचा पत्ता सांगताना तुझी खूण हटकून सांगितली जायची.

जगामध्ये टपाल व्यवस्था निर्माण झाल्यापासून काही शतके तुझे स्थान अबाधित व मानाचे होते. पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तंत्रज्ञानाचे नवनवे अवतार येऊ लागले. दूरभाष व आंतरजाल सेवा यांचा जसजसा विकास होत गेला तसा तुझ्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला. मग हळूहळू हे यंत्र आणि तंत्र तुफान वेगाने विकसित होत गेले आणि हाताने पत्र लिहिणे आणि ते तुझ्यात येऊन टाकणे या गोष्टी इतिहासजमा होऊ लागल्या.

तुझे आणि एकंदरीत टपाल खात्याचे अस्तित्व टिकावे म्हणून सरकारतर्फे काही क्षीण प्रयत्न होत राहिले. अमुकतमुक सरकारी खात्याला पाठवायचे पत्र हे टपाल खात्यामार्फतच पाठवावे, कुरिअर चालणार नाही, यासारखे काही नियम काही काळ अस्तित्वात होते. पण पुढे मोबाईल फोनवर येणारा ‘ओटीपी’ नामक मूलमंत्र अस्तित्वात आला आणि त्यानंतर अशा छोट्या योजनाही बारगळल्या.

सुमारे पंधरा वर्षांपूर्वी गावातील शहरातील टपाल पेट्यांची संख्या एकामागून एक कमी करण्याचा घाट घातला गेला. वर्षानुवर्षे तुझ्या अस्तित्वाने व्यापलेला एखादा कोपरा आता सुनासुना भासू लागला. तरी देखील काही हौशी मंडळी मुद्दाम पत्रे लिहीत आणि जिथे कुठे तू शिल्लक असशील ते ठिकाण शोधून तुझ्यात टाकत असत.

असेच एक हौशी पत्रलेखक एकदा तणतण करीत टपाल खात्यात गेले आणि म्हणाले,

अहो आमच्या पेठेतली अमुकतमुक पेटी तुम्ही का काढलीत ? आता पत्र टाकायचे तरी कुठे आम्ही?’

तेव्हा पोस्टमास्तर हसून त्यांना म्हणाले,
एखादी छोटी पेटी तुमच्या घरावर बसवायला तयार आहोत आम्ही. देऊ का बसवून” !

एकंदरीतच काय, तर आता आम्हाला तुझी गरज राहिलेली नव्हती. आजच्या घडीला मोठ्या शहरांमध्ये बहुधा तू फक्त विभागीय कार्यालयांत अस्तित्वात असावीस. लहान गावांमध्ये कदाचित तुझा एकमेव अवतार शिल्लक असावा. आम्ही सगळे सजीव मर्त्य आहोत. आज ना उद्या हे जग सोडून जाणारच आहोत. आमच्या हयातीत बहुधा तुझ्या अस्तित्वाच्या थोड्याफार खुणा शिल्लक राहिलेल्या असतील. परंतु पुढच्या शतकात तुझे अस्तित्व तरी असेल काय याची आम्ही फक्त कल्पनाच करू शकतो.

असो.
आज आमच्या मायबोलीच्या उपक्रमामुळे निदान तुला पत्र लिहिण्याची संधी तरी मिळाली. परंतु हा उपक्रमच आंतरजालीय असल्यामुळे हाय रे हाय ! हे लिहिलेले पत्र मी तुझ्याकडे येऊन थोडेच देणार आहे ? हे पत्र तर मी आंतरजालाच्या गंगेतच सोडून देणार आहे. पण तरीसुद्धा या निमित्ताने तुझे जे स्मरण झाले ते आनंददायी होते. निदान आमच्या हयातीत तरी तू मोजक्या ठिकाणी का होईना, पण शिल्लक रहा. तू कुठेतरी आहेस ही कल्पनाही आम्हाला सुखद वाटेल. परवाच एका रेल्वे स्थानकावर तुला अशी टांगलेली पाहून किती भरून आले म्हणून सांगू?

20230223_160636.jpg

अग, तू जिथे कुठे आहेस तिथे सुखात रहा आणि तुझी तूच काळजी घे. तुझ्या कुटुंबीयांना नमस्कार सांगावा.
कळावे, लोभ असावा

तुझा एकेकाळचा परमप्रिय मित्र,
प. त्र. लेखक

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे. टपालपेटी अगदीच बालपणीची आठवण आहे. तरी घरच्यांनी लिहिलेले पत्र त्या टपालपेटीत टाकायचे काम केलेले आठवतेय. पहिल्यांदा केले तेव्हा घरच्यांनी आपल्याला फारच जबाबदारीचे काम दिले असा फिल आलेला Happy

छान आठवणी.
तुझ्या मधल्या भागामध्ये पोस्टमनने पत्र काढून नेण्याच्या वेळा लिहिलेल्या असायच्या.>> आणी त्या वेळा काटेकोर पाळल्या जायच्या.
ह्यावरून एक गंमत आठवली. मावशीला एक स्थळ ‘बघून’ गेलं. घरच्या सगळ्यांना ते स्थळ आवडलं. मावशीलाही विचातलं तर ती फक्त खाली मान घालून उभी राहिली. लाजत असेल.. असं वाटून आजोबांनी होकराचं पत्र लिहिलं आणी पोस्टाच्या पेटीत टाकलं मात्र.., मावशीने धो धो रडायला सुरवात केली, ‘मुलगा आवडला नाही’ म्हणून.
मग मामा पोस्टाच्या पेटीतून पत्र काढणाऱ्या पोस्टमन ची वाट पहात तिथे उभा राहिला, आणी त्याची विनवणी करून टाकलेलं पत्र परत मिळवलं.

एका पत्रलेखकाच्या पत्राला प्रतिसाद दिलेल्या
सर्वांना धन्यवाद !
...
**"घरच्यांनी आपल्याला फारच जबाबदारीचे काम दिले>>
अगदी अगदी !

***मावशीने धो धो रडायला सुरवात केली, ‘मुलगा आवडला नाही’ म्हणून.>>>
ध-मा-ल किस्सा आहे हा !

छान.

पोस्टाने पत्र आता नाहीच फारसे. स्पीडपोस्ट सेवा मात्र महत्वाची कागदपत्रे पाठवण्यासाठी बेस्ट आहे अजून !

छान लिहिला आहे लेख. विजयपुराची 'पत्रगळु' (मराठीत - पत्रे) लिहिलेली छोटी टपालपेटी बघून ऊर भरून आला.

सर्वांना धन्यवाद !

**स्पीडपोस्ट सेवा >>> होय, याचे अनुभव चांगले आहेत.
...
पत्रगळु >>> अरे वा.!
तुम्हाला ते वाचता आले हे पाहून माझाही उर भरून आला. Happy

खूपच मस्त पत्र आहे. गतस्मृतींत रमावयास लावणारे , छान खूप आवडले. शर्मिला यांचा किस्सा प्रचंड विनोदी आहे. खूप हसले.
>>>>>>>>काही जागरूक नागरिक वर्तमानपत्रातून त्वेषाने पत्र लिहायचे,
पुण्यामधील 'वाचकांची पत्रे' खतरनाक असत. मग आधीच्या पत्रांना दिलेली उत्तरे. मनोरंजक होते सर्वच. बालपणीचा हिस्सा होती ही पत्रे.

धन्यवाद !
**वाचकांची पत्रे' खतरनाक>>>
अगदी !
संवाद, विसंवाद, सडेतोडपणा, वगैरे वगैरे... एकूणच धमाल असायची.

सर्वांना धन्यवाद !
...
सवांतर :
पत्रलेखन या विषयावरील एक पुस्तक चांगले खपते आहे:
पत्रास कारण की…
अरविंद जगताप
ग्रंथाली प्रकाशन.
१२ वी आवृत्ती, २०१९.

पूर्वी झी मराठीवरील चला हवा येऊ द्या मध्ये वाचन झालेल्या पत्रांचा हा संग्रह आहे. पुस्तकाची प्रस्तावना खूप आवडली. हस्ताक्षरातील पत्रलेखनापासून ते अलीकडे इ माध्यमांमधील संपर्कापर्यंत जो बदल झाला, त्याचा आढावा घेतला आहे. मागच्या पिढीतील ज्यांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या पत्रलेखनाचा अनुभव घेतलेला आहे त्यांच्यासाठी हे सुरेख स्मरणरंजन आहे.
पूर्वीच्या आणि आताच्या लेखनमाध्यम व पद्धतीबाबत समतोल विचार मांडलेले आहेत.
….

छानच लेख, डॉक्टर.
स्वहस्ताक्षरात पत्र लिहिण्याची /वाचण्याची ज खरंच वेगळीच असते.

आस्थेने प्रतिसाद दिलेल्या सर्वांना धन्यवाद !

या पूर्वी एकंदरीत टपालसेवेचा इतिहास, स्वहस्ताक्षरातले पत्र आणि पत्रलेखनाचा छंद यावर लेख लिहून झाले होते.

आताच्या उपक्रमानिमित्ताने पेटी ही निर्जीव वस्तू निवडून त्यावर लिहावेसे वाटले.

लेखात मी लाल रंग सोडून वेगळ्या रंगाच्या पेटीचा ओझरता उल्लेख केला आहे. खालच्या दुव्यावर काही चित्र पाहिली असता स्थानिक पत्रांसाठी हिरव्या रंगाची पेटी दाखवलेली दिसते:

https://www.google.com/search?q=Indian+post+letter+box+types&client=ms-a...

पण हिरव्या पेट्या कितपत होत्या ते आता नक्की आठवत नाही

धन्यवाद !
........
आता इथे असलेली (https://m.youtube.com/watch?v=XVG1EU-bsho)
सुनील गावस्कर यांची मुलाखत पाहिली. त्यामध्ये त्यांनी लग्न होण्याच्या आधी होणाऱ्या बायकोशी झालेल्या पत्रसंवादाचा छान अनुभव सांगितला आहे.

त्या काळी एकमेकांच्या पत्रांची वाट पाहणे यात खूपच मजा असायची. पुढे त्यांना मुलाखतीत असे विचारले गेले की तुम्ही तेव्हाची बायकोची सर्व पत्रे जपून ठेवलीत का?
त्यावर ते म्हणाले,
" माझ्याकडे त्यातली काहीच पत्रे आहेत. परंतु तिच्याकडे मात्र माझी सर्व पत्रे जपून ठेवलेली आहेत !"