मुंबई परिसर भेट

Submitted by Srd on 21 February, 2023 - 05:23

मुंबई परिसर भेट

मुंबई हे बंदर म्हणून ब्रिटिशांनी वाढवले आणि व्यापारी उलाढाल केंद्र म्हणून झाल्यावर लोक इथे येऊन राहू लागले. शैक्षणिक केंद्रही झाले. विविध सुंदर कार्यालय इमारती बांधल्या गेल्या . कापड गिरण्यांनी मध्यमुंबईत जागा व्यापल्या आणि तीस वर्षे जोरात होत्या. मनोरंजनासाठी सिनेमा,नाट्यगृह,बागा तयार झाल्या.

मुंबईत येण्याची कारणे विविध आहेत. धंदा,व्यापार,नोकरी. प्रवासाची अनेक साधने यासाठी तयार झाली आणि केंद्रबिंदू झाला.
_____________________________

मनोरंजनासाठी मुंबई भेट

आज ( २०२३_०२_२१)मुंबईत 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ' इथून नवीन एअर कंडिशन डबल डेकर बसेस सुरू होत आहेत. या निमित्ताने हा चर्चा लेख. मी इथे थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.

बोरिवली ते ठाणे उपनगरांत राहणारे मुंबई सहज बघू शकतात. पण पुणे,नाशिक,उर्वरित महाराष्ट्रातून येऊन मुंबईतली ठिकाणं पाहाणे वेळखाऊ आणि खर्चिक आहे. तरीही थोडीफार माहिती देण्याचा हा एक प्रयत्न.

यावं कसं - कुठून सुरुवात करावी.
बरेच पर्याय आहेत आणि प्रत्येकाच्या अडचणी आहेत. मुख्य म्हणजे सकाळी रस्त्याने मुंबईत शिरणे अवघड कारण ट्राफिक जाम असतात. रविवारी ठीक. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ( शॉटफॉम CSTM किंवा CST) येथे किंवा मुंबई सेंट्रल येथे एक्स्प्रेस रेल्वेने येणे अगदी सोपे. या स्टेशनाबाहेरून भरपूर बसेस आणि टॅक्सीज मिळतात.

कारने पुण्याकडून
एक्सप्रेसवे ने - नंतर BARCपाशी फ्रीवेने थेट डॉकयार्ड स्टेशन -पुढे सीएसटी -म्युझिअम -कुलाबा.
डॉकयार्ड स्टेशन नंतर फ्रीवे खालच्या मुख्य रस्त्यावर येतो तिकडे रस्ता रुंद आहेच गाड्या पार्क करता येतील. रविवारी कुणी नसते. सेंट जॉर्जेस रुग्णालयाजवळ म्हणजेच सीएसटी. इथून टॅक्सी बसेस मिळतात सर्व ठिकाणी जाण्यासाठी.टॉइलेटस जवळच आहेत.

आज सुरु होणाऱ्या एसी डबल डेकर (आजची क्र ११५ नरीमन पॉइंटला जाणार) इथे आहे. गेटवे, म्युझियम, कोलाबा.
111 - सीएसटी ते गेटवे ते सीएसटी.
138 - सीएसटी वर्ड ट्रेड सेंटर
१११,१३८या बसेस पूर्वी साध्या डबलडेकर होत्या त्या बंद होऊन साध्या सिंगल डेकर चालायच्या. त्या आता परत एसी डबलडेकर होतील बहुतेक.सीएसटी ते कमला नेहरू पार्क (क्र१०८)साधी सिंगल डेकर आहे.

मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण समुद्र हे होय. त्यासाठी बऱ्याच जागा आहेत. जुहू, दादर आणि गिरगाव चौपाटी,अक्सा बीच. गेटवे ओफ इंडिया आणि भाऊचा धक्का ( ferry wharf). समुद्राकाठी नेणाऱ्या जागेत हाजी अली,वरळी सीफेस व सेतू , महालक्ष्मी मंदीर आहे.

'भाऊचा धक्का' (= Ferry Wharf).इथून काय करता येईल
वर आपण पाहिलेच की तिकडे पार्किंग करता येईल. किंवा सीएसटीहून टॅक्सीने भाऊच्या धक्क्याला पोहोचता येईल. (४किमी). फिश मार्केट रविवारी आणि भरती ओहोटी प्रमाणे असते.
(१)तिथून बाजुलाच 'Eastern water front ' ला फेरी उभी राहते. ( फेरीचे अडवान्स ओनलाइन बुकिंग करावे लागते.)त्याने कारसह रेवसला पोहोचून पुढे अलिबाग - नागाव -चौल -काशिद -मुरुड जंजिरा(फेरीने) दिवेआगर -श्रीवर्धन -माणगाव- कोलाड -पौड -पुणे शक्य आहे.
फोटो १
भाऊचा धक्का

फोटो २
भाऊचा धक्का आतील भाग

फोटो ३
लॉन्चचे वेळापत्रक

फोटो ४
कार्सना रेवसला नेणारी मोठी रोरो फेरी मागे दिसत आहे.

(२)१३५ रूटची एसी बस दर दहा मिनिटांनी भाऊचा धक्का ते 'जे.मेहता मार्ग '(मलबार हिल नेपिअन सीरोडने जाते. तिकिट रु १३/-. वाटेत 'प्रियदर्शनी पार्क' (पाहाच एकदा )लागेल. पण ही बाग १०-४ बंद ठेवतात. इथून बाणगंगा तलाव, बाजूचे वाळकेश्र्वर देऊळ मग कमला नेहरू पार्क आणि हँगिंग गार्डन (याच्याखाली पाण्याची टाकी आहे म्हणून)उर्फ फि.मेहता गार्डन पाहता येईल. वरून गिरगाव चौपाटी दिसते. इथे टॉयलेट्स आहेत आणि या दोन बागा पहाटे पाच ते रात्रीपर्यंत उघड्या असतात. इथे आराम करू शकता. इकडून एक शार्टकट बाबुलनाथ मंदिर/ इस्कॉन मंदिर/मणिभवन/ किंवा गिरगाव चौपाटीकडे जातो (चालत दहा मिनिटे). या पायऱ्यांच्या वाटेने उतरताना श्री गगनगिरी महाराजांचा वाळकेश्र्वर आश्रम लागेल. किंवा १०८ नंबरची बसनेही इथूनच खाली जाते ती चौपाटी,मरीन ड्राईव,विधानभवन,मंत्रालय दाखवत परत सीएसटीला सोडेल. ही १०८ एसी नाही परंतू होण्याची शक्यता आहे
वाळकेश्र्वरवरून पुढे गेल्यास प्रसिद्ध राजभवन आहे. तिथले बंकर म्युझियम पाहणे जमणार नाही कारण सकाळी सहा ते आठ एवढीच वेळ दिली आहे. ओनलाइन बुकिंग करावे लागते.
(३) 'जे मेहता मार्ग' इथून सुटणारी 'ए ६३' ही एसी बस( दर दहा मिनिटांनी) महालक्ष्मी मंदीर, हाजी अली/ हीरा पन्नास शॉपिंग सेंटर मार्गे मार्गे भायखळा पश्चिमेला सोडेल. राणी बाग भायखळा पूर्वेला आहे. तिथून डॉकयार्ड रोड जवळ आहे.टॅक्सीवाले आपण सांगू तिथे नेणारच. परंतू बस मार्ग/रूटचे वैशिष्ट्य म्हणजे ते साधारणपणे सोयीचा रस्ता घेतात,फारसे यू टर्न,राईट टर्न घेत नाहीत. इथेही जवळची एका वर्तुळात येऊ शकणारी ठिकाणं निवडली आहेत.
बसने जाण्याचा एक फायदा म्हणजे गूगल मॅप नको काही नको. चटपट पोहोचतो.
फोटो ५
बाणगंगा तलावाचा भाग

फोटो ६
वाळकेश्र्वर देऊळ

फोटो ७
बाणगंगा तलावाकडे जुने देऊळ

४)डॉकयार्ड रोड नंतर मशिदबंदरला पूल ओलांडून पलीकडे गेल्यास मनीष मार्केट आहे.

मुंबईचे एक दक्षिण टोक असे पाहता येते. दुसरे टोक म्हणजे कुलाबा,नेव्ही नगर,TIFR . तिथे जाण्यासाठी सीएसटीहून बऱ्याच बसेस मिळतात. रीगल सिनेमापुढे फॅशन स्ट्रीट(१) आहे. रस्त्यावरचा कपडे बाजार. ( अजून (२) क्रॉस मैदान चर्चगेट जवळ,आणि तिसरा बाद्रा वेस्टला आहे.)

आपल्याकडे असलेला वेळ आणि लहान मुलांचा कल पाहून थोडी थोडी मुंबई पाहता येईल. तीन ते आठ वयाच्या मुलांना बागा नक्कीच आवडतील. चौपाटीवर संध्याकाळी सहापर्यंत कडक ऊन असते. ते टाळा.

वाचकांनी आपले अनुभव व आराखडे दिले तर पुढील पर्यटकांना उपयोगी पडतील.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिओ जिओ जिओ
आमचा भाऊचा धक्का Happy
हावरटासारखे आधी फोटो बघून घेतले. आता वाचतो सविस्तर Happy

धन्यवाद srd या धाग्याबद्दल. खूप उपयुक्त माहिती दिलीत. जाणकारांनी यामध्ये अजून भर घालावी ही विनंती.

मुंबई म्हटली की युनिव्हर्सिटीचा राजाबाई टॉवर किंवा गेटवेची इमारत किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारत नव्हे असं मला वाटतं. म्हणून एक वेगळीच माहिती दिली. दुसरा एक धागा खाऊ गल्ली सुरू आहे बोर्डावर त्यात मुंबईतील खाऊ गल्ल्या येऊ शकतात. म्हणून ते टाळले. यूट्यूबचा विडिओ करणे अवघड आहे.

खूप छान धागा काढलात. प्रत्येकासाठी काही ना काही आहे मायानगरीत -दक्षिण मुंबईचा परिसर हा मुकुटशिरोमणी. धार्मिक, ऐतिहासिक इमारती, बागा, जुने-नवे रेस्तराँ. एक ना दोन.

माझ्यातर्फे :-

कलाप्रेमींनी न चुकवण्यासारख्या काही सुंदर जागा फोर्ट-कुलाबा-नेपियन सी या भागात :

जहांगीर कलादालन - काळाघोडा उत्सवाच्यानिमित्ताने अनेकांनी भेट दिली असेलच, वर्षभर फार सुंदर उपक्रम सुरु असतात इथे.

NGMA - नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट - नावाप्रमाणेच अनवट कलाविष्कारांसाठी प्रसिद्ध. त्यांचे उत्सव-प्रदर्शने यांची माहिती मीडियावर असते.

Chemould Prescott रोड गॅलरी - आता नवीन जागेत. एक वेगळाच अनुभव, भारतात दुर्मिळ.

कोलाब्यातच मीरचंदानी आर्ट गॅलरी - हटके चित्रे आणि म्युरल्स / स्क्लप्चर प्रदर्शने, वर्षभर.

NCPA - नाम ही काफी है Happy यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर नजर असू द्यावी, उत्तम नाटके, संगीताचे कार्यक्रम कधी-मधी हाताशी येतात.

मलबार हिलची Artéques आर्ट गॅलरी - देखणेपण मिरवतांना तरुण आणि नवनवीन कलाकारांच्या कलाकृती पेश करणारी, ही थोडी नवीन जागा आहे अजून प्रसिद्धी न पावलेली.

बाकी एशियाटिक, हॉर्निमन सर्कलचा दृष्ट लागेल असा सुंदर भाग आणि तिथे पार्क केलेल्या व्हिंटेज कार्स, छोटी बुटीक रेस्तराँ, त्या भागातली खूप जुनी चर्चेस, पारशी-इराणी बेकरीज वगैरे अगदी लव्ह लव्ह लव्ह हैत Happy

बाणगंगा तलाव परिसर अस्वच्छ असतो. तिथे पिंडदानादि विधी केले जातात. अवशेषांतला काही भाग तलावात जातोच. त्याकडे पाहिले न पाहिलेसे करून बाकी जुनी देवळे, जुने आर्किटेक्चर पाहाता येईल. बाणगंगा तलावात मूळचे झरे पावणेदोनशे वर्षांपूर्वी होतेही असतील पण तिथले पाणी अस्वच्छ होऊ लागल्याने हँगिंग गार्डन खालच्या पाणीसाठ्यातून एक नळ तलावात सोडण्यात आला अशी बॉम्बे गॅझेटीअर मधली माहिती मी वाचलेली आहे. तो नळ बदलला गेला आहे की नाही वगैरे पुढची माहिती मिळाली नाही. सध्यातरी मुंबईत मूळचे नैसर्गिक झरे सापडणे अशक्यप्राय आहे. वाळकेश्वराच्या देवळात सतत अभिषेकाचे पाणी,दूध, फुले ह्यांचा पातळ चिखल असतो. एके काळचे पूर्ण मराठी वातावरण आता पूर्ण अमराठी झाले आहे.
असे धागे पाहिले की माझ्यासारख्याला लिहावे तितके थोडे होते.

एके काळचे पूर्ण मराठी वातावरण आता पूर्ण अमराठी झाले आहे.

काय करणार? पण त्या भागातल्या ऐतिहासिक गोष्टी आहेत. त्यांचा उल्लेख कसा टाळणार? बाणगंगा महोत्सवही या वर्षी होऊन गेला. हल्ली 'झोपडपट्टी' हा शब्दही वर्ज्य आहे.
बसवर लिहिलेले असते -
ही 'बेस्ट' बस आहे,
पुढे चला.'
तसे चाललो आहे. धाग्यावर या चर्चा सुरू केल्यास पर्यटन आणि ठिकाणं बाजूला पडतील.
( उज्जैन ही सप्तपुऱ्यांपैकी एक आहे. तिथली पापनाशिनी क्षिप्रा नदी पाहिलीत का? )

हिरा सहमत
वरिल सर्व ठिकाणी विकेंड आणि सुट्टीच्या दिवशी जाऊ नका‌‌.
प्रचंड गर्दी असते. गेट वे ला तर चेंगराचेंगरी होण्याइतकी असते.

वीकेंडला जायचे असल्यास मरीन ड्राईव्हला रात्री उशीरा डिनर करून मध्यरात्रीनंतर जावे. गर्दीही नसते आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेशी जागही असते. आम्ही तिथे असताना सहकुटुंब जायचो हवा खायला.

बाणगंगा आणि परीसर मला बिलकुल जावेसे वाटत नाही.
भाऊचा धक्काही कधी व्यवस्थित काळजी न घेतल्यास अस्वच्छ होतो. त्यामुळे मुद्दाम कोणाला जा असे सुचवत नाही कधी. मला पर्सनली तिथे शांत वाटते. आवडते.

RoRo serviceचे प्रवेशद्वार ( Welcome to Eastern Water Front कमान हे भाऊच्या धक्क्याच्या अगोदर वेगळे आहे. सीएसटी कडून येणाऱ्या पी डिमेल्लो रस्त्यावर जो 'सेंट्रल रेल्वे भंडार' (goods depo) स्टॉप आहे तिथून आत गेल्यावर ही कमान लागते. आतमध्ये खाजगी स्वच्छ प्रापर्टी आहे. याचा शेवटच्या धक्क्याशी संबंध नाही. १३५ एसी बस ही सेंट्रल रेल्वे भंडार' स्टॉप जवळ मिळणार आहे. आत जाण्याची गरज नाही.
RoRo serviceसाठी पुण्याहून/दुसरीकडून कारने येणाऱ्यांना काहीच अडचण नाही. भाऊच्या धक्क्यावर जाणाऱ्यांना 'बॉम्बे काफे' ला उजवीकडे वळायचे आहे. रोरोचा प्रवेश त्याच्या अलीकडे वेगळे आहे.

ज्यांना 'प्रियदर्शनी पार्क' पाहिल्यावर बाणगंगा पाहायचे नाही ते कमला नेहरू पार्कला जाऊन ( दीड किमी )तिथून चौपाटी/बाबुलनाथ/सीएसटी जाऊ शकतात. चौपाटीवर (गिरगाव किंवा कोणतीही) नऊ ते पाच प्रचंड ऊन असते. सहानंतर रविवारी प्रचंड गर्दी असते.