आजकालपासून – किंवा असं म्हणता येईल की कालपरवापासून – सामाजिक स्थितीमुळे आपल्या वैयक्तिक जीवनातील कोणत्याही कृतीत बेगडीपणा घुसून जणू काही मुरून बसलाय. हा बेगडीपणा हल्ली इतका सामान्य झालाय की कोणी ‘सामान्य’ वागला तर तोच इतरांना ‘बेगडी’ वाटायचा! इतरांना सामान्य वागणं वेगळेपणाचं वाटेल की नाही ते मला निश्चित सांगता यायचं नाही; पण सामान्य वागण्याला ‘मागास’ समजण्याची नवीन रीत निर्माण झाली आहे. हा सुद्धा आपल्या सामाजिक व्यवस्थेचा दुष्परिणाम आहे, असे ना का! आपण पुन्हा बेगडीपणाकडे वळूयात.
खोटेनाटे आभास उभे करून इथं सगळेच आता कोणत्यातरी अनोळखी भासमान व्यक्तीला कसलातरी व कशाचातरी मोठेपणा दाखवण्यासाठी शिवशिवलेले सापडतात. आपल्या जगण्यातला हा दांभिकपणा भाषेत शिरला नसता तर नवलच. मी अलंकारिकता व शब्दप्रचुरता (म्हणजे अनाकलनीय शब्द लेखनात घुसडणे. उदाहरणार्थ, शब्दप्रचुरता!) यांनी भाषेच्या सौंदर्याचे केलेले – व कधीच भरून न निघणारे – नुकसान या विषयावर ‘लंब्याचौड्या’ दिल्या तर मूळ विषय भरकटण्याची भीती जास्त आहे. पाल्हाळ हा सुद्धा भाषेच्या बेगडीपणातील आणखी एक रोगच आहे.
ही बेगडी, खोटी कादंबरीची कपोलकल्पित, बनावट भाषा कायमच ठराविक वर्गाला (म्हणजे स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणाऱ्या प्रत्येकाला. नाहीतर ‘ठराविक वर्ग’ म्हणताच अनेकांचा गैरसमज एक तर ‘इस्लामी’ होतो किंवा ‘ब्राह्मण’ तसं काही इथं अभिप्रेत नाही) रिझवत आलेली आहे. परिणामी नवेनवे लेखक लेखनातील नव्या(?) प्रयोगातही भाषेला आणखी बेगडी बनवत गेले व साहित्यक्षेत्रास बनावटपणाचा शिक्का बसत गेला. त्यासोबत असलं काहीतरी ‘अभूतपूर्व’ इत्यादी भाषेत लिहिणारा लेखक थोर किंवा मग तो परग्रहावरून आलेला असावा असले समज बळावत गेले. थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून भाषेच्या वास्तवी रूपावर यदाकदाचित चुकूनमाकून कोणी बोलायचं म्हणलं तर दलित साहित्याचा संदर्भ निघतो आणि दलित साहित्य विरूद्ध प्रस्थापित साहित्य असा संघर्ष सुरू होतो. त्याच्याशी आपणाला तूर्तास तरी काही देणेघेणे नसावे.
साहित्य ज्या बेगडी भाषेत रचलं गेलं त्यातच पुन्हा त्याची समीक्षा घडत गेली. आपल्याकडे ऐच्छिक सेवा पुरवणारे ‘मानद समीक्षक’ सुद्धा उपलब्ध होते, अजूनही आहेत; पण टीकाकार तितकेसे नाहीत (जो व्यक्ती भाषिक बेगडीपणा मोडू पाहतो त्यावर टीका करणारे पुन्हा ऐच्छिक व मानद सेवा पुरवतातच हा भाग अलाहिदा). जे कोणी आहेत तेही बेगडी जड भाषेचे गुलाम. अशामुळे ‘समीक्षा किंवा टीका वाचून कोणत्याच पुस्तकाबद्दल पूर्वग्रह तयार करू न घेणे’ यावर मी ठाम आहे. हे मी फार उशिरा शिकलो.
काही ठिकाणी दगडी भाषेत संवेदनशील पुस्तकांची समीक्षा, काही ठिकाणी पुळचट भाषेत युगप्रवर्तक साहित्याची समीक्षा, काही ठिकाणी दलित साहित्य न झोपणाऱ्यांची उगाच ‘हवेत गोळीबार’ टीका, कुठे शिव्यांच्या भाषाशैलीस अश्लील ठरवून प्रचारकी विरोध, तर कुठे ‘आपल्या’ गोटातील लेखकाला पाठिंबा दर्शवणारे लेख, प्रस्तावना वगैरे भाषेत चिक्कार घुसले. याला माझी तक्रार नाही; पण यातही भाषेच्या मानेवरून बेगडीपणाचे जू उतरवले गेले नाहीत याची मला खंत वाटते.
वास्तविक पाहता माणूस पुस्तक परीक्षणं, समीक्षणं किंवा टीकालेख का लिहितो? आपण प्रस्तुत ‘काहीतरी व कितीतरी’ वाचलेलं आहे हे दाखवण्यासाठीच! हे माहीत असतानाही मग मी पुस्तकांवर लिहिण्याचं का ठरवलं? अर्थातच त्यामागे वरील काही कारणे आहेत; पण त्यापलीकडे जाऊन मला ते पुस्तक खरोखरीच कसं भासलं, कसं जाणवलं हे सामान्य, रोजच्या जगण्यातील भाषेत कुठेतरी नमूद करायचं आहे. त्याला मी परीक्षण किंवा समीक्षण किंवा टीका यांपैकी काहीच म्हणू शकत नाही, कारण यांच्या ठरलेल्या साचेबद्ध दांभिक भाषेत मला ते लिहायचं नाही. किंवा मग रकान्यातील शब्दमर्यादा मापून बळंच तोकडं किंवा दीर्घही लिहायचं नाही. जितकं मनात आहे, जसं आहे, तसं कागदावर आणायचं आहे. चांगलं ते चांगलं, वाईट ते वाईट. म्हणून मग मी त्याला ‘इतस्तत:’ म्हणणार. पुस्तकाचं नाव आणि पुढे ‘इतस्तत:’ प्रत्यय लागला की समजायचं मी ते पुस्तक वाचलेलं आहे व त्याविषयी वाटलेल्या चार – किंवा जास्तच – ओळी लिहीलेल्या आहेत. हा शब्द सहज सुचला म्हणून वापरण्याचं ठरवलं.[ हा माझ्या ‘इतस्तत:’ लेखाचा संक्षिप्त तुकडा. हा संपूर्ण लेख तसेच या लेखमालेतील पुढचे लेख वाचण्यासाठी ‘टाकबोरू’ भेट द्या; https://www.takboru.com/2022/12/marathi-review-article-on-how-not-to-rev... ]
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
बरेच मुद्दे आवडले. खूप मस्त
बरेच मुद्दे आवडले. खूप मस्त लिहिलेत. टाकबोरू लिंक तेवढी क्लिक केली नाही अजून!
छान आहे !
छान आहे !
लिखाण आवडले.
लिखाण आवडले.
"पाल्हाळ हा सुद्धा भाषेच्या बेगडीपणातील आणखी एक रोगच आहे." हे विधान पटले नाही. पाल्हाळ हा रोग वाटणे एकवेळ समजू शकतो पण बेगडीपणा नक्कीच नाही.
उलटपक्षी पाल्हाळ म्हणजे वाहून नेईल तसे, अ-कृत्रीम, अ-संपादित, बिनहिशेबी, मोजून मापून न लिहिलेले असे असते.
असो
लिहीत रहा.