हिंजवडी चावडी-डेमो आणि बरंच काही

Submitted by mi_anu on 12 February, 2023 - 09:31

हिंजवडी चावडी-डेमो आणि बरंच काही

निलेश ने आज 11 वाजताची सिगरेट वारी रद्द केली.
पल्लवी ने आज लंच आधी केशर चंदन फेसवॉश ने चेहरा धुवून फेस सिरम आणि लिप ग्लॉस लावणं रद्द केलं.
विद्येश ने आज लंच पूर्वी 20 मिनिटं शेअरबाजाराच्या बातम्या वाचणं रद्द केलं.
संजना ने आज मैत्रिणीला फोन करून सासूबाईंचे विचित्रपणे सांगणं रद्द केलं.
खुद्द मुख्य मांजर राजभूषणने त्याच्या मित्रांबरोबरचा पिझ्झा बेत पुढे ढकलला.

या सगळ्यांच्या त्यागाचं कारण एकच: संध्याकाळी 6.30 ला जॉन ला द्यायचा असलेला डेमो.जॉन नवा नवाच आलाय.त्याला इथे काय काम चालतं(म्हणजे नक्की कामच चालतं ना) ते दाखवायचंय.तशी अगदी गुणी टीम आहे ही.आणि खूप भारी भारी गोष्टी बनवतात.पण या भारी भारी गोष्टी कोणाला दाखवताना मात्र नेमकी माशी शिंकतेच.

"हे बघा.जॉन एकदम स्पष्टवक्ता, डायनॅमिक माणूस आहे.(म्हणजे, एखादं उद्धट खत्रुड तिरसट जुनं खोड आपलाच कस्टमर एन्ड म्हणून येणार असल्यास त्याला नम्रपणे 'स्पष्टवक्ता' म्हणायचं असतं.) त्याला डेमो दाखवताना अगदी सावधपणे घ्या.व्यवस्थित कोणी कुठे क्लिक करायचं,कोणी काय बोलायचं, सोम्यानंतर पुढच्या गोम्याने बोलताना 'टू ऍड टू सोम्याज इन्फॉर्मेशन' म्हणायचं.एकाचं वाक्य पूर्ण होईपर्यंत दुसऱ्याने मध्ये बोलायचं नाही.दाखवायच्या गोष्टींची नावं काय ठेवायची ते ठरवून घ्या.मागच्या वेळ सारखं कमेंट च्या बॉक्समध्ये 'माय लास्ट कमेंट इन लाईफ' वगैरे लिहू नका.मॉडेल चं नाव देताना sshsjsbs टाईप करू नका.नीट 'विमान क्र.1' 'पंख क्र.2' वगैरे अशी गोंडस नावं द्या.सगळ्या चॅट खिडक्या नीट बंद करून ठेवा.मला कोणाची स्क्रीन शेअर असताना 'गण्या सुट्टा मारायला ये टपरीवर' असे मेसेज आलेले अजिबात चालणार नाहीत."

राजभूषणने नेहमी प्रमाणे काय काय गोंधळ होतील याचा विचार करून आधीच सूचना देऊन ठेवल्या.पण कोणत्याही शुभकार्यानंतर गोंधळ हा घडलाच पाहिजे.शास्त्र असतं ते.त्यामुळे डेमो ची मीटिंग ठरल्यावर गोंधळ हे झालेच पाहिजेत.मागच्या वेळी या टीम ने खूप काय काय हाय फाय स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजी वापरून बनवलेलं बँकिंग सॉफ्टवेअर मुख्य बँकेला दाखवताना एका खोट्या गिऱ्हाईकाने गुंतवलेल्या खोट्या 5 लाखाचा खोटा बँक बॅलन्स शेवटी स्क्रीनवर 0 रुपये लिहून आला होता.म्हणजे तसे हिशोब बिशोब बरोबर लिहिले होते हो सॉफ्टवेअर मध्ये, पण बटन दाबल्यावर 1 सेकंद नेमकं इंटरनेट आजारी झालं होतं हिशोब करताना.आता इतक्या ठिकाणच्या इतक्या गोष्टी एकत्र जोडल्यावर कुठेतरी गोंधळ होणारच.

कँटीन मध्ये ऍडमिन चा सुभ्या शून्यात बघत कॉफी पित होता.
"तुम्हाला आणि तुमच्या टीम ला हिमालयाच्या बाहेर बसायची जागा दिलीय फ्लोर प्लॅन मध्ये.चालेल ना?"(हिमालय मीटिंग रूम बरं का.)
"सुभ्या, बसायला खुर्च्या आणि समोर लॅपटॉप ठेवायला टेबल दे.बाकी कोणालाही कुठेही बसव."
सुभ्याने मनातल्या मनात गहिवरून राजभूषण ला मिठी मारली.
"सकाळ पासून इतकी सॅम्पल बघतोय रे मी.एकदा सगळे लोक त्यांना दिलेल्या लोकेशन ला 'हो' म्हणून जागेवर बसले की मी डोंगर चढून काळोबा ला एक नारळ फोडणार आहे.त्या विश्वंभर ला त्याच्या टीम साठी वास्तू शास्त्रात बसणारी, दाराकडे तोंड करून असलेली, पाणवठ्याजवळ असलेली, टी जंक्शन समोर नसलेली जागा पाहीजेय.कोणाची पाठ मेन एन्ट्री ला पाठ करून नको.सोनाली ला लेडीज रूम ला कोणाला न दिसता चालत जाता येईल अशी जागा पाहिजे.दिनेश आणि सुरेश कोकाकोला आणि पेप्सी च्या प्रोजेक्ट वर कामं करतात.त्यांना एकमेकांचं बोलणं दुसऱ्याला ऐकता येणार नाही अश्या लांब लांब जागा पाहिजे.दिनेश ला खिडकी पाहिजे.दिनेश च्या टीम ला डोळ्यावर ग्लेअर यायला नको अशी जागा पाहिजे.तुम्ही प्रोग्रामर लोकं ना?या सगळ्या अटी एकावेळी पूर्ण करून सीट नंबर देणारा अल्गोरिदमच लिहून द्या ना मला!"
राज ने सुभाष साठी एक थंडगार मसाला छास ऑर्डर केलं.

जेवण करून सुपारी चघळत जागेवर बसतो न बसतो तोच समोरून दीपाली तावातावाने आली.
"काय हो राज सर, तुम्ही 'आमच्या टीम ला कुठेपण बसवा' का सांगितलं त्या सुभाष ना?त्यांनी वॉशरूम बाहेरची जागा दिलीय आपल्याला प्लॅन मध्ये.फ्लश चे आवाज येतात कॉल्स मध्ये.अशी बेकार आणि भिकार जागा कामचुकार कमी कॉल्स वाल्या टीम ला, किंवा बेंच वरच्या लोकांना द्यायला पाहिजे ना?"
"शांत हो दीपाली.आणि यु कॅन कॉल मी राज.आता आपण रक्ताचं पाणी करून सिटिंग प्लेस साठी भांडायचं, त्या सुभाष ला मायग्रेन आहे.अलरेडी जवळ आला की अमृतांजन चा वास घेऊन येतोय.परत फेब्रुवारीत आपल्या प्रोग्राम मॅनेजर बरोबर आपण वेगळ्या टीम मध्ये जाणार.परत जागा बदलणार.तो भांडतो आहेच चांगल्या जागेवरून, आणि सगळी टीम माझ्या शेजारी पाहिजे म्हणून.त्याच्या भांडणात घर चालतंय,परत आपल्याला भांडणाचे कष्ट कशाला?"

मेल उघडले तर अमितावो(म्हणजे हा अमिताभ आहे, पण त्याने न्यूमेरॉलॉजी प्रमाणे ऑफिसमधलं नाव 'अमितावो' करून घेतलंय.या नावाने त्याला पुढच्या 1 वर्षात एच5 व्हिसा मिळणार आहे असं त्या लॉजीवाल्याने सांगितलंय.) आणि निल्या ची 15 वेळा रिप्लाय केलेली मेल चेन परत वर आली होती.

"निल्या, तो पलीकडे 10 फुटावर बसतो अमितावो.तुम्ही बोलून प्रश्न मोकळे का नाही करत?त्या मेल चेन मध्ये सगळ्यांनी '+अमुक तमुक' करत 25 माणसं झाली.'कटप्पाने बाहुबली को क्यो मारा' सारखं मला आता डायरेक्टर लोक पाणी पिताना भेटले तरी विचारतात 'अरे वो निलेश का इश्यू क्लोज हुवा क्या?'.
"मी काय करू?मी जेव्हा प्रोग्राम लिहिला होता तेव्हा 100 गोष्टी टेस्ट करून ओके आहेत याचा व्हिडिओ टाकला होता इश्यू वर.तेव्हा झोपले होते का लोक?आता 2 महिन्यांनी माझ्याकडे एका आठवड्यात 50 इश्यू असताना हे चालत नाही म्हणून जागे झालेत.माझ्याकडे सगळं नीट चालतंय."
"तुझ्याकडे चालत असेल.म्हणून सगळे लोक तुझ्या मशीनवर बसून कामं करणार का?त्यांच्याकडे का चालत नाही हे बघून त्यांच्या चुका काढायचे कष्ट तुलाच घ्यावे लागतील.अगदी वेळ नसेल तर सध्या त्या इश्युवर तो व्हिडिओ परत टाकून 'चेक युवर जावा व्हर्जन' इतकं लिहून ये. 'काम चालू आहे' हा कॉन्फिडन्स मध्ये मध्ये दाखवून देणं काम नीट करण्याइतकंच महत्वाचं."

अखेर डेमो चा मुहूर्त आला.निल्याने किचकट गणित करून देणारं पान नीट दाखवलं.गणिताचं उत्तर पण बरोबर आलं.आता विद्येश समजावून सांगत होता.संजनाने स्वतःच्या मशीनवर पुढचं पान उघडून पाहिलं.रिपोर्ट मध्ये सगळीकडे अक्षराऐवजी नुसतेच पानभर प्रश्नचिन्हं होती.तिने विद्येश ला खुणा केल्या.त्याचं लक्ष नव्हतं.तिने 'पुढच्या पानावर जाऊ नको' असा मेसेज केला.त्याने पाहिला नाही.तिने फोन केला.
विद्येश बोलत बोलत त्याने 'क्रिएट रिपोर्ट' चं बटन दाबलं आणि मग ते पान येईपर्यंत कॉल म्युट वर टाकून फोन उचलला.
"अरे काही मेसेज बिसेज बघायची पद्धत आहे की नाही?फोन ठेव आणि रिपोर्ट चं पान शेअर स्क्रीनवर बंद कर."

विद्येश ने पटकन पान बंद करून 'सध्या इंटरनेट जरा मध्येमध्ये जातंय' म्हणून टेक्निकल बडबड चालू ठेवली.
जॉन ने "ओह इज ईट, वी नेव्हर हॅव पॉवर कट्स हिअर.लास्ट पॉवर कट वी हॅड वॉज 20 इयर्स अगो." म्हणून 'लंकेत सोन्याच्या विटा' पुराण चालू केलं.
यापुढची सगळी पानं सुरळीत चालून डेमो संपला.सर्वजण कॉल बंद करून घाम पुसतात न पुसतात तोच राजभूषण चा सगळ्यांना फोन आला.

"तुम्हा लोकांना किती वेळा सांगितलं होतं सगळं नीट तपासून बघा.अचानक क्वेशचन मार्क कसे आले?आणि 'इंटरनेट अधून मधून जातं ' काये?कॉल चालू आहे म्हणजे इंटरनेट चालू आहे.अश्या वेळी 'ओरॅकल सर्व्हर चा मेंटेनन्स चालू झालाय' म्हणायचं असतं.मी परत सांगतोय.हे असं चालणार नाही.त्या जॉन ला असं पेज दाखवलं आपण?तितक्या भागाचा डेमो उद्या परत ठेवा.आज सर्व परत टेस्ट करा."
"पण राज, डेमो मध्ये होतात अश्या गोष्टी. मायक्रोसॉफ्ट विंडोज च्या पहिल्या डेमो मध्ये निळी स्क्रीन आली होती."
"आपण मायक्रोसॉफ्ट विंडोज आहे का?आणि पुढच्या वेळी सर्व चांगलं चालत असताना व्हिडीओ काढून ठेवायचा.अश्या वेळी 'सध्या मेंटेनन्स चालू आहे पण आपण व्हिडीओ बघू' म्हणून व्हिडीओ लावून द्यायचा."

राज सोडून सर्व जण जड पावलांनी कॉफी प्यायला गेले.पुढच्या डेमो ला एकदम स्टीव्हन स्पिलबर्ग च्या तोडीचा
व्हिडिओ समोर येणार हे नक्की!

-अनुराधा कुलकर्णी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा !! खूप दिवसांनी लिहिले आहेस . छान वाटले वाचायला . मुलगी सध्या ह्याच फील्ड मध्ये शिकते आहे . त्यामुळे तिला आवर्जून दिला वाचायला . पुढं काय असेल ह्याची कल्पना यायला .

मस्त लिहिलं आहेस.

वरच्या गोष्टींशी दुरूनही संबंध नसतानाही डोक्यावरुन असं वाटले नाही.

अहो भाग्यम्.. किती दिवसांनी ही चावडी भरली.
खूप दिवसांनी खिक खिक करून हसलेय..
रूढार्थाने आय टी मधे नसले तरी खूप गोष्टी relate होतात.

मस्त लेख. खुसखुशीत एकदम. रिलेट झाला अगदी.

डेमो सुरू झाला की मर्फीज लॉ नुसार सर्व्हर डाऊन होणे /ऍडमीनने सर्व्हिसेस रिस्टार्ट करणे / आधी व्यवस्थित टेस्ट केलेल्या functionality ने मोक्याच्या क्षणी आचके देणे / फ्रेश डेटा न घेता आधी टेस्ट केलेलाच डेटा जुगाड करून डेमोला वापरल्याने ऐन वेळी validation errors येणे इ.इ. !! लिस्ट न संपणारी आहे Lol

भारी! Lol मजा आली.
खूप दिवसांनी लिहिलंस.

कटप्पा प्रश्न, त्याच्या भांडणात घर चालतंय, कॉल चालू आहे म्हणजे नेट सुरू आहे - काही जागा भारी जमल्यायत. Biggrin

Biggrin Biggrin

त्या विश्वंभर ला त्याच्या टीम साठी वास्तू शास्त्रात बसणारी, दाराकडे तोंड करून असलेली, पाणवठ्याजवळ असलेली, टी जंक्शन समोर नसलेली जागा पाहीजेय. >>> खिक्क

तरी फारच स्मूथ चालतो बाई तुमच्याकडे डेमो. त्यावेळी तुमच्या शेजारच्या बे मध्ये कुणाचा तरी (तो जागेवर नसताना) आपडी पोडे रिंग टोन नाही वाजत? एखादा खडूस कस्टमर सपोर्टवाला १८५७ च्या बंडातला मायनर इशू नाही काढून दाखवत?

मला कोणाची स्क्रीन शेअर असताना 'गण्या सुट्टा मारायला ये टपरीवर' असे मेसेज आलेले अजिबात चालणार नाहीत.">> Lol

मस्त. Happy
. रिलेट नाही झाले तरीही वाचायला मजा आली

मस्त लिहिलय. डेमो चालु असताना तुमचा लॅपटॉप कधी रिबूट होत नाही का??? आणि तो देखिल Forced Reboot
मी घेतलाय हा अनुभव. आणि ते रिबूटिंग चालू असताना क्लायंट बरोबर मारलेल्या गप्पा आणि मॅनेजरच्या कपाळावरच्या आठ्या ..... Happy

मस्तचं. पूर्ण विरामानंतर तेवढे स्पेस द्या बाबा. मी पायथन प्रोग्रॅमिंग करताना वाचले तर डेमो.जॉन म्हणजे डेमो ऑब्जेक्टचे जॉन फिल्ड वाटले Happy