वाई ते पुणे

Submitted by पराग१२२६३ on 11 February, 2023 - 06:57

अलिकडेच एके दिवशी पाचगणीला गेलो होतो. बऱ्याच वर्षांनी पाचगणी, वाईला भेट देत असल्यामुळं गेल्या वेळेपेक्षा आता तिथं बदललेलं बरंच काही दिसत होतं. पाचगणीची भेट आटपून पुण्याला परत येण्यासाठी सकाळी निघालो. पाचगणीच्या एसटी स्थानकात पोहचल्यावर पुण्याच्या बसला वेळ आहे समजलं. त्यामुळं समोर उभ्या असलेल्या वाईच्या बसमध्ये आम्ही बसलो. वाईला पोहचल्यावर काही वेळानं पोलादपूर-स्वारगेट बस आम्हाला मिळाली.

पोलादपूर ते स्वारगेट बस कोणत्या मार्गावरून जाते, हे पाहिल्यावर असा पूर्ण प्रवास एकदा करावा असं वाटू लागलं. बसच्या फलकावर पोलादपूर-महाबळेश्वर-पाचगणी-वाई-खंडाळा-शिरवळ-स्वारगेट असे लिहिलेलं होतं. वाईचा 10 मिनिटांचा थांबा उरकून ती बस पुढच्या प्रवासासाठी निघाली. अस्सल राज्य परिवहनच्या तांबड्या-भगव्या रंगसंगतीमधल्या त्या बसची अवस्था तशी विचित्रच होती. सीट्स जुन्या झालेल्या होत्याच, शिवाय दरवाजा, खिडक्या आणि एकूण सगळंच थोड्या-अधिक प्रमाणात खिळखिळं झालेलं वाटत होतं. मग असं मनात आलं की, पोलादपूर ते स्वारगेट असा तीन घाटांचा प्रवास अशी गाडी कशी काय पार करत असेल. आमच्या मागच्या रांगेमधल्या एका बाजूच्या सीट्स काढून टाकलेल्या होत्या. तिथं बसचं भलमोठं अतिरिक्त चाक (स्टेपनी) ठेवलेलं होतं.

आता पुढच्या प्रवासात एकेक अनुभव येऊ लागले. बस आता दिल्ली-चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर आली होती. पोलादपूरपासून जवळपास अखंडपणे पळत असलेली ही बस आता महामार्गाला लागूनच असलेल्या पारगाव-खंडाळा बसस्थानकात जाऊन काही वेळ विसावली होती. नाश्त्यासाठी तिथं बस थांबेल, असं वाईतून बस सुटताना वाहक सतत सांगत होताच. बसमधला प्रत्येक जण तिथं काही ना काही खाण्यासाठी, पाय मोकळे करण्यासाठी उतरला होता. आम्हीसुद्धा तिथं चहा घेतला. पारगाव-खंडाळ्याचा विसावा आटपून बस 20 मिनिटांनी पुण्याकडे निघाली. स्थानकातून बस बाहेर पडून पुण्याच्या दिशेला येत आहे हे पाहून आताच बसमध्ये चढलेल्या आणि अगदी पुढं बसलेल्या एका महिलेनं गोंधळलेल्या सुरात वाहकाला विचारलं, “बस वाईला जात नाही आहे?” मग त्यानं तिला “स्वारगेला चालली आहे गाडी” असं सांगितल्यावर ती बसमधून खाली उतरली.

पारगाव-खंडाळ्याला आणखीही काही प्रवासी बसमध्ये चढलेले होते. तोपर्यंत आमच्या जवळच्या रिकाम्या आसनांवर आई आणि तिची दोन तरुण मुलं येऊन बसली होती. बस सुटल्यावर त्यांच्यातल्या तरुणीला लक्षात आलं की, तिची आणि आईची, दोघींच्याही पर्सेस घरीच राहिल्या आहेत. त्यांनी बरोबरच्या तरुणाला विचारलं पैशाबाबत, तर तो म्हणाला की, त्यानं पैसे घेतलेले नाहीत. मग तडकाफडकी ती तरुणी वाहकाकडे जाऊन विचारून आली की, जीपेनं तिकिटाचे पैसे दिले तर चालतील का. त्यानं नाही म्हटल्यावर त्यांची बेचैनी वाढू लागली. वाहक आता या प्रश्नामुळं पुन्हा वैतागलेला होताच. तोपर्यंत त्या तरुणीनं आणि तिच्या आईनं आम्हाला विचारलं की, तुमच्याकडे जीपे आहे का. हो म्हटल्यावर त्या तरुणीनं लगेच 300 रुपये ऑनलाईन पाठवून आमच्याकडून रोख पैसे घेतले. आता त्या तिघांचा जीव भांड्यात पडला होता, “हुश्श्श!”

आता नव्या प्रवाशांना तिकिटं देत वाहक मागं आमच्या दिशेनं येत होता. आतापर्यंत पारगाव-खंडाळ्याच्या पुढे 4-5 किलोमीटरवर बस आली होती. त्या तिघांजवळ येऊन त्यानं तिकीटाबद्दल विचारलं. त्या तरुणीनं अगदी आत्मविश्वासानं “3 वाई” म्हटलं. आता वाहक पुन्हा वैतागला, “अहो मॅडम, बस स्वारगेटला निघाली आहे.” आता ते तिघं मगाचपेक्षा जास्तच गोंधळले. बस इतक्या पुढं येईपर्यंत त्यांच्या हेही लक्षात आलं नव्हतं की, बस दुसरीकडेच निघाली आहे. मग ते तिघंही बस थांबवा, आम्ही खाली उतरतो असं वाहकाला सांगू लागले. त्यांचा गोंधळ पाहून शेवटी वाहकानं जरा आधाराच्या स्वरात त्यांना सांगितलं, “गाडी बरीच पुढं आली आहे. आता शिरवळला उतरा. तिथून तुम्हाला बस मिळतील.” शिरवळ आल्यावर ते तिघं खाली उतरू लागले, पण तेवढ्यात आमचं लक्ष गेलं की, त्यांच्या किल्ल्या शेजारच्या सीटवर पडलेल्या आहेत. मग आम्ही त्यांना हाक मारली आणि किल्ली त्यांच्याकडे देऊन टाकली. या तिघांचा गोंधळ पाहून आम्ही आपापसांत बोलत होतो. आम्हाला आश्चर्य वाटत होतं की, इथेच राहणारे वाटत असून त्यांना बस दुसरीकडेच निघाली आहे, हे कसं काय लक्षात आलं नाही त्यांच्या. किती गोंधळ चालला होता त्यांचा वगैरे वगैरे. कदाचित काही तरी गंभीर, तणावपूर्ण घडलं असेल आणि तिकडं जायच्या गडबडीमुळंच त्यांचा इतका गोंधळ सुरू असेल यावर आमचं एकमत झालं.

शिरवळला काही प्रवासी उतरले आणि काही जण बसमध्ये आले. वाईला आम्ही बसल्यापासून सुट्ट्या पैशावरून कंडक्टरचं प्रत्येकाला आवाहन सुरू होतं. आता त्या आवाहनाचा सूर जरा वैतागलेल्या स्वरुपाचा होता, कारण आता शिरवळहून स्वारगेटपर्यंत तिकीटाचा दर कमी होता आणि प्रत्येक जण शंभरच्याच नोटा काढत होता. सुट्टे पैसे द्या, असं सांगूनही काही उपयोग होत नव्हता. मग दोघा-तिघांनी जणांनी जरा नाखुषीच्या हावभावानं कंडक्टरला सुट्टे पैसे दिले. आता निरा नदी ओलांडून पुणे जिल्ह्यात बस आली होती. या सर्वांची तिकिटं काढून होताहेत, तोवर बस अचानक रस्त्याच्या बाजूला थांबली. बाहेर बघितलं तर महामार्गावर पुण्याकडे येणारी एक बस खेड-शिवापूरच्या आधी बंद पडलेली होती. पुण्याकडे जाणाऱ्या बसला हात दाखवून थांबवून त्यात त्या बसमधल्या प्रवाशांची सोय करून देण्यासाठी त्या बसचे चालक-वाहक खाली उतरलेले होतेच. पण आमच्या बसमध्ये गर्दी असल्याचं खालूनच दिसल्यावर त्यांच्यापैकी काही प्रवासी आमच्या बसमध्ये येत नव्हते. पण तो कंडक्टर त्यांना आवाहन करत होता की, अहो, जावा की या बसमधनं. इतका वेळ थांबलोय आपण आपण बसची वाट बघत. आता गर्दी असली तरी जावा. मग त्या प्रवाशांसह आमची बस पुण्याकडे निघाली.

आता कात्रजच्या घाटातून जुन्या बोगद्याकडे बस निघाली होती. पुढे बोगदा ओलांडून बस स्वारगेटच्या दिशेनं निघाली होती. आता घड्याळाकडे लक्ष गेल्यावर लक्षात आलं की, बस तशी वेळेतच पोहचत आहे, जरी बस खिळखिळी वाटत असली तरी!

लिन्क
https://avateebhavatee.blogspot.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एसटी बसचे विशेष म्हणजे त्यास एंजिने असते ८०/१२० एचपीचे. एक गिअर बॉक्स असतो. मागे चार चाकं आणि पुढे दोन असतात. ती गाडी वळवण्यासाठी असतात. चालकाचे हातचे चाक फिरले की ही वळतात. मागच्या चाकांना गती एंजिनमधून कणा जोडून असते. वेग कमी अधिक करण्यासाठी अक्सेलेटर आणि ब्रेकस असतात. डेपोमध्ये उभ्या असलेल्या कोणत्याही बसच्या टायरसचे ट्रेड पा‌हिल्यास ते झिजून गुळगुळीत झालेले दिसतात तरीही रस्त्यावर पकड घेणारच असे रबर वापरलेले असते.
विशेष म्हणजे अगदी वेळात इच्छित स्थळी प्रवाशांना नेते.

तुमच्या नेहमीच्या लेखांपेक्षा हा लेख जरा वेगळा आहे. पहिल्यांदाच तुमचा human interaction असलेला लेख वाचला.
एकाच बसमध्ये उलट दिशेने प्रवास करणारे एवढे लोक निघावेत हे नवल म्हणावे का?

<<एकाच बसमध्ये उलट दिशेने प्रवास करणारे एवढे लोक निघावेत हे नवल म्हणावे का?>>

हो, मलाही त्याचं नवल वाटलं. इतक्या वेळा बसचा प्रवास केला; पण हा प्रकार पहिल्यांदाच अनुभवत होतो.

इंदापूर गावाबाबत फसगत होते पनवेलला. एक इंदापूर कोकणात जाणाऱ्या मार्गावर व दुसरे पुणे सोलापूर मार्गावरचे. परंतू उलट जाणाऱ्या बसबद्दल हाहाहा.

राज्य परिवहन बदलत्या काळाच्या मागे आहे. त्यांनी आता क्रेडिट कार्ड, जी-पे अश्या सोयी द्यायला पाहिजेत. रोख रक्कम हाताळणे जितके कमी, तितके सर्वाँना सोईचे होईल.

दिल्ली चेन्नई राष्ट्रीय महामार्ग नक्की कुठे आला म्हणायचं.

तुम्ही ज्या ठिकाणचे नाव लिहला आहे तो मुम्बई बंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे

खासगी बस पेक्षा मला आज पण एसटी महामंडळ च आवडते.
दोन सीट मध्ये योग्य अंतर असते.
खासगी बस मध्ये पाय सरळ केला की पुढच्या सीट ला लागतो.
खूप कमी अंतर दोन सीट मध्ये असते.
बाहेरून चकाचक आत मध्ये कोंदाड अशा खासगी बस आहेत.
एसटी महामंडळ च्या बस ठराविक थांब्यावर ठराविक वेळ च थांबत असतात.
खासगी बस दोन दीन किलोमीटर वर एक एक प्रवाशाची वाट बघत तासनतास थांबत असतात.
जाम वैताग येतो.
सरकार नी अनुदान देवून महामंडळ जगवावे आणि योग्य ती आर्थिक मदत करून त्यांच्या सेवेची अजून गुणवत्ता वाढवावी.
प्रवाशांच्या सेवेसाठी हे त्यांचे ब्रीद अगदी योग्य आहे.

<<तुम्ही ज्या ठिकाणचे नाव लिहला आहे तो मुम्बई बंगलोर राष्ट्रीय महामार्ग आहे>>

राष्ट्रीय महामार्गांना अलिकडे नव्यानं क्रमांक दिलेले आहेत. पूर्वी ४ नंबरचा राष्ट्रीय महामार्ग मुंबई - चेन्नई असा होता. आता पूर्वीचा मुंबई - चेन्नई (क्र. ४) आणि मुंबई-दिल्ली व्हाया जयपूर (क्र. ८) यांचं एकत्रीकरण करून तो दिल्ली - चेन्नई (क्र. ४८) असा झाला आहे.