बाल्कनीतील बाग (बॉटलचा उपयोग)

Submitted by Srd on 9 February, 2023 - 03:59
रिकाम्या बॉटलमध्ये झाड

बाल्कनीतील बाग (बॉटलचा उपयोग)

छोट्याशा जागेत चार फुलझाडं लावणे आणि टाकाऊ बॉटलचा वापर या हेतूने केलेले प्रयोग.
फोटो १
ऑफीस टाइम फुलझाड

बाल्कनीत किंवा खिडकीत जागा लहान असते. तिथे ग्रीलही असते. कधी भाड्याची जागा असते पण झाडांची हौस तर करायची असते. शिवाय माती लाल वापरली तर त्याचे पाणी खाली ओघळायला नको. त्याचे प्रयोग.
फोटो २
पुदीना लावू शकतो.

खिडकीच्या ग्रीलमध्ये बॉटलस बांधल्या आहेत.
फोटो ३
ग्रीलमध्ये टांगतात येईल

पुदीना,ऑफीस_टाइम आणि चिनी गुलाब ही झाडे यासाठी योग्य आहेत.कारण ती वाढली की खाली वाढतात आणि सुंदर दिसतात. तीन चार तास ऊन येते खिडकीत तिथे जोमाने वाढतात. घराच्या आत बॉटल टांगायची असेल तर मनी प्लान्ट योग्य.

बॉटल तयार करणे - लिम्काच्या(६५०एमेल) बॉटलचा तळ योग्य ठिकाणी कापला की तो बॉटलच्या आत सुलटाच बसतो. साध्या चाकूने तळ कापता येतो. त्यास दोन चार चिरा काढायच्या. मग बुडाकडे म्हणजे वरती नायलॉन दोऱ्याने तुकडे असे बांधले आहेत की आतले झाड आणि मातीचे वजन कुठल्याही बाजूस गेले तरी बॉटल सरळच राहाते. ( फोटोंवरून थोडी कल्पना येईल दोऱ्या बांधण्याची) बॉटल उलटी टांगायची. यांचे बूच घट्ट असते आणि गळत नाही. मातीतले पाणी खालच्या बुचाकडच्या अर्ध्या भागात साठते ते बॉटल तिरकी करून परत मातीत जिरवता येते.
इतर शोभेच्या पाण्याच्या बॉटलस मात्र गळतात. त्यांचे तळही बरोबर कापून आत बसवणे जरा कटकटीचे असते. प्लास्टिक कठीण असते. पण या बॉटल दिसतात मात्र छान.
फोटो ४
पाण्याच्या रंगीत बॉटल

(कोणत्या बॉटलचा तळ कुठे कापून परत आतमध्ये बसवता येतो ते शोधावे लागेल. बुचाकडून पाणी गळणारी बॉटल टाळावी.)

खिडकीच्या ग्रीलच्या चिंचोळ्या उभ्या जागेत बॉटलस बांधून परत डासांची जाळीही आतून बसते.
फोटो ५
डासांची जाळी लावता येते

मोठ्या एक दीड लिटर्सच्या बॉटल मात्र बसणार नाहीत. इतर ठिकाणी शक्य असल्यास तरी खूप जड होईल.

यूट्यूबवर बॉटल वापरण्याचे बरेच विडिओ सापडतात. मीही वेगवेगळे प्रयोग केले आहेत त्यातला हा एक. टिकली तर टिकली नाही तर फेकून दिली.

फोटो ६
वेगवेगळ्या बॉटल्स बाल्कनीत

लहान मुलांसाठीही काम होईल.
करून पाहा.

______________________

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण जेव्हा प्रयोग करायला जातो तेव्हा एकेक अडचणी डोकं वर काढू लागतात.
१) बॉटल तिरकी होणे
२) माती किती भरणे.
३)संपूर्ण काथ्याच भरला तर काय होईल, मुळे निघतील का?हलकी होते पण वाढ होत नाही. काथ्या उर्फ नारळाची शेंडी ही टाकावूच आहे.
४) ऊन लागले की बऱ्याच प्लास्टिकना महिन्याभरात भेगा पडतात. चुरा होतो. यु.वी. किरणांमुळे होते.
५)बॉटलची फार कापाकापी करण्यात अर्थ नाही.
६) सरळ वर वाढणारी झाडे उपयोगाची नाहीत.
७) पाणी राहिले उघडे तर डास होतील.
८)लाल माती फार त्रास देते. कोरडी झाल्यास, वाळल्यावर घट्ट ढेकूळ होते. ओघळल्यास लाल डाग पडतात.
माझ्याकडे दुसरी साधी भुसभुशीत माती आहे तिचा हा त्रास नसतो. पण ती ट्रेकवरून येताना आणावी लागते. (पिशवी रिकामी आणू नये म्हणतात. चार पाच किलो)
९) कोणतेही घन, द्रवरूप खत घालायचे नाही कारण टाकावूतून करण्याचा हेतूच बाद ठरेल. फक्त ऊन पाण्यावर वाढवायची आहेत झाडं.