पैशाचे झाड- अंतिम भाग

Submitted by अतरंगी on 30 January, 2023 - 23:15

भाग १ https://www.maayboli.com/node/82901
भाग २ https://www.maayboli.com/node/82912
भाग ३ https://www.maayboli.com/node/82915
भाग ४ https://www.maayboli.com/node/82919
भाग ५ https://www.maayboli.com/node/82936

दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळीच अमोलचा मेसेज आलेला पाहून अभिने कुतूहलाने तो मेसेज ऊघडला. आदल्या दिवशी बोलण्याच्या ओघात अभ्याने गरिबीचे दुष्ट्चक्र आणि संपत्तीच्या भाग्यचक्र याचा ऊल्लेख केला होता. पण त्यानंतर त्याविषयी सांगायचे विसरला होता. अमोलने त्याचीच आठवण करुन द्यायला मेसेज केला होता. अमोल एवढ्या बारकाईने ऐकतो आहे आणि विचार करतो आहे हे कळल्यावर अभिच्या चेहर्‍यावर स्मितहास्य पसरलं. त्याने लगोलग अमोलला फोन लावला.

" काय आजकाल झोप वगैरे येत नाही का तुला? रात्रंदिवस एकच विचार करतोएस का?"

"साल्या तू आमची झोप ऊडव आणि वर आम्हालाच विचार की झोप येत नाही का?"

अभि अगदी मनमोकळेपणाने हसला.

" अभ्या मला दोन तीन नविन प्रश्न पडले आहेत. एक म्हणजे संपत्तीचे भाग्यचक्र म्हणजे काय? धनवान होणे एवढे सोप्पे आहे तर आपल्या आजुबाजूला धनवान लोकं का नाहीत ? मला तर कोणी असे भेटत का नाही?"

" अरे हो!! जरा दम घे.
अगदी साध्या सरळ सोप्प्या भाषेत सांगायचे झाले तर जेव्हा तुला स्वतःला पैसा कमावण्यासाठी काम करावे लागते आणि तुझी कमाई ही तु किती वेळ काम करत आहेस यावर अवलंबून आहे, तो पर्यंत तुझी वाढ ही लिनिअरच असणार. जेव्हा तुझा पैसा तुझ्यासाठी पैसे कमावतो आणि तुला मिळणारा पैसा तू किती तास काम केले यावर अवलंबून नसून, तू किती व काय काम केले यावर अवलंबून असतो, तेव्ह तुझी ग्रोथ ही एक्सपोनेंशिअल असते. हेच संपत्तीचे भाग्यचक्र आहे. तिथे जायचे कसे हे तर आपण कालच बोललो. पैशाचा आणि स्किलचा योग्य वापर करुन आपल्याला बिझनेस किंवा गुंतवणूकीच्या माध्यमातून ईन्कम मिळवायचे आहे."

" तू जे काल सांगितले ते तर किती सोप्पे वाटते, मला नाही वाटत त्याला फार काही डोकं लागतं. जर हे एवढे सोप्पे आहे तर मग आपल्या आजुबाजूला अशी धनवान लोकं का नाहीत? "

"श्रीमंत व्ह्यायला फार काही हुशारच असावं लागतं असे नाही. श्रीमंत असण्याचा बुद्धीमान असण्याशी फारसा संबंध नाही. श्रीमंत व्हायला बुद्धीपेक्षा योग्य ती मानसिकता लागते. ती मानसिकता लोकांमधे नसते. ती मानसिकता आपल्या अंगी मुरवणे अवघड असते."

" अवघड काय आहे त्यात? "

"संयम, शिस्त, सातत्य राखणे"

" मला नाही वाटत तसं"

"येईल तुला अनुभव.... सोप्प्या गोष्टीच सातत्याने करत राहणे अवघड असते. चांगल्या आरोग्या साठी रोज अर्धा एक तास व्यायाम करायचा आणि खाण्यावर ताबा ठेवायचा, हेल्दी खायचे. या किती साध्या गोष्टी आहेत! किती जण सातत्याने वर्षानुवर्ष हे करु शकतात?

आपण जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो ना, तेव्हा आपण एकदम उत्साहात असतो. आता तुला काहीतरी बदलावंसं वाटत आहे, म्हणून तू ऊद्या पासून सुरुवात करशील, नविन काही तरी शिकायला लागशील, एखादा बिझनेस सुरु करशील, म्युच्युअल फंड मधे पैसे टाकायला लागशील, कुठेतरी चांगल्या ठिकाणी पैसे पण गुंतवशील. सगळं करशील, पण नव्याचे नऊ दिवस सरल्यावर ते रोज सातत्याने करणे तुला जड जायला लागेल. कारण तुला या सगळ्यातून लगेच रिटर्न मिळणार नाहीत. फार संयम ठेवावा लागेल. पी हळद आणि हो गोरी असे होत नसते. या सगळ्याचे रिझल्ट दिसायला फार वेल जाईल, तो पर्यंत तुझ्या आजुबाजुचे सगळे नवनविन गाड्या, टिव्ही, मोबाईल, कपडे अजून काय काय प्रकारची मजा तुझ्या समोर करत असतील. तुला हे सगळे करायचे मोह टाळावे लागतील. या सगळ्याने विचलित न होता तुला तू ठरवलेल्या मार्गावर चालत रहावे लागेल. शिवाय तू कितीही प्लॅन केला तरी तो फेल जायचे चान्सेस आहेत ते आहेतच. बरं हे सगळे करुन पण तू यशस्वी आणि श्रीमंत होशीलच याची १००% खात्री नाही. हे माहित असून आपण निवडलेला मार्ग न सोडणे हे किती अवघड आहे ते तुला आत्ताच नाही कळणार. "

"हं, ते तर आहेच."

" जाता जाता अजून एक सांगायचं आहे. आत्ता तुला आर्थिक स्वातंत्र्य मिळवायची, पॅसिव्ह ईन्कम तयार करायची ईच्छा आहे. तू ईच्छा, प्रेरणा, ईच्छाशक्ती या शब्दांमधला फरक समजून घे. तो फार महत्वाचा आहे

एखादी गोष्ट मिळावी, व्हावी असं वाटणं ही झाली ईच्छा. त्यासाठी आपण प्रयत्न करुन, कष्ट करुन ती मिळवायची ही झाली प्रेरणा. आणि वाट्टेल ती संकटं येऊ देत, विघ्नं येऊ देत, त्यांच्यावर मात करुन मला हवी ती गोष्ट मी करुन, मिळवून दाखवणारच, ही झाली ईच्छाशक्ती.

साधे सोप्पे ऊदाहरण द्यायचे झाले तर शाळेत मी परिक्षेत पहिला यावं किंवा नेहमी नापास होणार्‍या मुलाला मी पास व्हायला हवं असं वाटणं ही झाली ईच्छा. मग पुढची पायरी असते की मला पहिलं यायचंच आहे किंवा पास व्हायचंच आहे, त्या साठी मी रोज शाळेत जाणार, अभ्यास करणार, जे कष्ट करावे लागतील ते मी करणार, ही झाली प्रेरणा. मग तुम्ही ते करायला सुरुवात केलीत की मी मगाशी म्हणलं तसं नव्याचे नऊ दिवस सरले तरी ते कष्ट करत राहणं, सुरुवातीला आणि त्यानंतर कितीही अडचणी आल्या, कितीही वेळा अपयश आलं तरी आपण घेतलेला ध्यास न सोडणं, याला लागते ती जबरदस्त ईच्छाशक्ती.

तुला स्वातंत्र्य मिळवायची ईच्छा आहे. आत्ता तुला प्रेरणा पण असेल. पण लाँग टर्म मधे तू यशस्वी होणार की नाही हे फक्त तुझी ईच्छाशक्ती किती प्रबळ आहे, स्ट्राँग आहे हेच ठरवणार. तुझ्या समोर येणार्‍या प्रलोभनांना, छोट्या छोट्या अ‍ॅट्रॅक्शन्सना तू बळी पडतोस की त्यावर मात करतोस, तू ठरवलेल्या गोष्टींवर किती फर्म राहतोस, छोटं मोठं यश मिळाल्यावर, त्यामुळे हुरळून न जाता तू ठरवलेल्या गोष्टीचा ध्यास न सोडता त्या मार्गावर चालत राहतोस का यावर सगळं अवलंबून आहे.

श्रीमंत व्हायची, यशस्वी व्हायची ईच्छा जगात प्रत्येकाला आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन काही लोक सुरुवात पण करतात. पण मेजॉरिटी लोक फेल होतात ते ईच्छाशक्ती नसल्या मुळे. त्यांच्यात कितीही संकटं आली, काहीही प्रॉब्लेम आले तरी, वाट्टेल ते झालं तरी आपले प्रयत्न न सोडणे, आपण ठरवलेल्या मार्गावर चालत राहणे हे गुण नसतात."

" असे किती लोक असतील रे? जे ईतक्या सातत्याने काम करत राहतात आणि पैशाने पैसा कमावत राहतात.... मला तर आजुबाजूला कोणी दिसतच नाही...."

" आहेत की. कमी आहेत पण आहेत. त्यांना ओळखायची नजर तयार करावी लागते"

" उदाहरणार्थ दोन चार सांग....."

" दोन चार काय माझ्या स्वतःच्याच ओळ खीत सात आठ जण निघतील. आपण फक्त आपल्या कॉमन ओळखीतले जे आहेत त्यांच्याविषयी बोलू....

अनिकेत नलावडे होता बघ आपल्या शाळेत, आपल्याला चार की पाच वर्षे सिनिअर होता. कसंबसं बी ए करुन एका कंपनीत चिकटला होता. तिथे काम करता करता त्याला लक्षात आले की तिथे बाहेरगावातले अनेक ईंजिनिअर आहेत. याने त्यांना डबे द्यायला सुरुवात केली. पगार आणि त्या डब्यांमधून नफा यायला लागल्यावर पैसे साठवून एक ईनोव्हा घेतली, ती ड्रायव्हर ठेवून एका कंपनीत लावली, पगार आणि त्या ईनोव्हा मधून येणार्‍या नफ्यातून अजून एक ईनोव्हा घेतली ती टुरिस्टला लावली. त्याच्या आधीच्या कंपनीतला एक जण दुसर्‍या कोणत्यातरी कंपनीत जॉईन झाला तिथे पण याने त्याला डबा द्यायला सुरुवात केली. आता तिथले पण काहीतरी २५ की ३० डबे त्याच्या कडे आहेत. आता स्वतःच्या घरी डबे बनवत नाही. दुसर्‍या कोणाकडून तरी बनवून घेतो आणि डबे पोचवायला एक पोरगा ठेवला आहे. साल्याचं नशीब बघ, एकदा त्याची ईनोव्हा एका बिझनेसमनने चार दिवस बूक केली होती, ह्याने त्याच्याशी ओळख वाढवली, त्या माणसाची पुण्यात एक बिल्डींग आहे. त्याला ती भाड्याने द्यायची होती. ती आख्खी याने भाड्यावर घेतली आणि त्यात तो त्या बिल्डींग मधे दुसरे टेनंट ठेवणार वगैरे मान्य करुन घेतले. त्याच्या कंपनीतल्या बॅचलर्सच्या कॉन्टॅक्ट मधून त्याने आता ते फ्लॅट्स शेअरिंगमधे द्यायला सुरुवात केली. त्या बिझनेसमनचीच अजून २ रो हाऊस आहेत बालेवाडीला. आता त्या विषयी पण बोलणी चालू आहेत.

दुस्रं उदाहरण आपल्याला तीन वर्षे ज्युनिअर एक मंगेश ताकवले नावाचा मुलगा होता बघ, माझ्या सोबत दुबईला होता. तिथले पैसे साठवून एक हिंजवडी मधे आणि गावाला एस.टी. स्टँडसमोर एक मोठं दुकान घेतलं होतं. गावतल्या दुकानात एक पार्ट्नर घेऊन हॉटेल टाकलंय. पार्ट्नर सगळे कष्ट करतो, दर महिन्याला नफ्यातले ३० कि ४०% याच्या अकाउंटला भरतो. त्या नफ्यातून गायी, म्हशी, ५ गीर गायी घेतल्या आहेत. हिंजवडीच्या दुकानात डेअरी टाकली आहे. आता गावाला थोडी जागा आहे त्यात कोल्ड स्टोरेज चालू करतोय.

आपल्या आजुबाजूला असे अनेक जण आहेत रे. काहींना नशिबाने हेड स्टार्ट दिली, त्यांच्या कडे पैसा अडका होता, वाड वडिलांनी घेऊन ठेवलेली जमीन होती. पण असेही कित्येक जण माझ्या पाहण्यात आहेत ज्यांनी काही बॅकग्राउंड नसताना, फारसे औपचारीक शिक्षण नसताना सुद्धा फक्त हातात येणारा पैसा योग्य प्रकारे कामाला लावून शुन्यातून सगळे उभे केले. आर्थिक स्वातंत्र्य कमावले कारण त्यांना त्याचे महत्व माहित होते. हे करायला फार काही डोके लागते अशातला पण भाग नाही. फक्त योग्य दिशा लागते. विचारसरणी लागते."

" खरे आहे. मलाही माझ्या परिचयातले दोन चार जण आठवले, ज्यांनी दहा- पंधरा वर्षे कष्ट करुन स्वतःचे पुर्ण आयुष्यच बदलून टाकले आहे. "

"हो, आपण योग्य मर्गावर चालत राहिलो तर साधारण दहा ते पंधरा वर्षे हा खरे तर योग्य कालावधी म्हणता येईल, की ज्यात चांगले रिटर्न मिळतात.
बिझनेस, रिअल ईस्टेट, शेअर्स यातला पैसा लगेच मोठे रिटर्न देत नाही. ऊलट सुरुवातीला त्यावर खर्चच करावा लागतो. संपत्ती किंवा वेल्थ क्रिएशन शॉर्ट पिरियड मधे होत नसतं. त्याचं कंपाऊंडीग व्ह्यायला वेळ द्यावा लागतो.

आपल्या लहान पणी एक कायम वाक्य कानावर पडायचं बघ, आम्ही काय पैशाचे झाड लावले आहे का? किंवा पैसे काय झाडाला लागतात का ? मी म्हणतो लागतात. चांगले बिझनेस, रिअल ईस्टेट, शेअर्स किंवा ईतरही चांगल्या गुंतवणूकी ही पैशाची झाडेच आहेत. ही ती रोपटी आहेत ज्याचे महाकाय वृक्ष व्हायला, त्याला फळं यायला कित्येक वर्षे लागतील, तो पर्यंत तुला त्याला सातत्याने खतपाणी घालावे लागेल, संयम ठेवावा लागेल. यातून जी फळे येतात ती जर तू परत पेरलीस, तर त्याचीही रोपटी येतील आणि हे चक्र चालू राहिल.....

तू ही पैशाची रोपटी पेरायला सुरुवात तर कर, आणि मग बघ, काही वर्षातच कसे त्याचे रुपांतर एखाद्या वृक्षात होईल, जो तुला आयुष्यभर सावली आणि फळे देत राहील..... "

समाप्त.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या आणि मागच्या लेखात नेहमीच्या वित्तनियोजनाच्या पलीकडचं बरंच काही लिहिलं आहे. दोन्ही लेख आवडले.
गरिबीचे दुष्ट्चक्र आणि संपत्तीच्या भाग्यचक्र हे गिमिक वाटू शकतं. उदाहरणे दिल्याने ते अचीव्हेबल आहे हे कळलं.
लेखमाला चांगली झाली.

आवडली।लेखमाला.

बिजनेस सेट करताना बरीच उरफोड करावी।लागते.
संधी ओळखणे खूप महत्वाचे.

मध्यमवर्गीय लोक्स PF PPF lic mutual fund ह्यापलीकड फार जात नाहीत हे जाणवलं.

पूर्ण लेखमाला सावकाश वाचून काढली. अतिशय योग्य विषय मांडला आहे. Financial awareness असणे हे आता हातात खूप पैसा असण्यापेक्षा जास्त महत्वपूर्ण झाले आहे.
पुन्हा पुन्हा वाचावी आणि आचरणात आणावी अशी लेखमाला.

>>सगळ्यांना सगळं रुचेल पटेल असे नाही पण गुंतवेल, विचारप्रवृत्त करेल असे लेखन
एकंदरित आवडली लेखमाला.>> +१