मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … ) भाग -७

Submitted by Sujata Siddha on 27 January, 2023 - 07:16

https://www.maayboli.com/node/82907

मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … )
भाग -७

दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला जरा लवकरच आले , आत्ता यु डीं चे क्लासेस चालू असतील लगेच काही ते भेटणार नाहीत या विचारांनी मन खट्टू झालं . तितक्यात त्यांची केबिन उघडी असलेली दिसली , केवढा आनंद झाला मला , हलकी हलकी पावलं टाकत मी दारापाशी गेले आणि डोकावून बघितलं तर यु डी खुर्चीवर डोळे मिटून बसले होते आणि चेहेऱ्यावर मंद हसू होतं , माझी चाहूल लागताच त्यांनी डोळे उघडले आणि मला बघून प्रसन्न हसले ,त्या हसण्याने कालपासून तडफडणाऱ्या माझ्या मनाला तृप्त आणि शांत वाटलं . यु डी ना साडी घातलेली आवडायची म्हणून रेशमाच्या ठिपक्यांची फिकट गुलाबी रंगाची साडी मी घातली होती , आणि यु डी तर कायम कडक इस्त्रीचा पांढरा शर्ट आणि कॅरॅमल कलरची ट्राउझर घालायचे ,आणि त्याखाली चकचकीत काळे शूज , एकदम एक्सझिक्युटीव्ह वेशात असायचे ते . तसेच आजही होते .
“बसा “ त्यांनी खुर्चीकडे बोट दाखवत म्हटलं
“सर आज बॅच लवकर संपली की काय तुमची ? “ खुर्चीत बसता बसता ,मी विचारलं ,
“संपली नाही ,संपवली , काल रात्रभर झोपलो नाही , बाय द वे काल मी रात्री तुमच्या ईथे आलो होतो बरं का “ यु डी ने माझ्या डोळ्यात रोखून बघत म्हटलं . मला उगाच धडधडलं .
“आमच्या ईथे ? किती वाजता ?” .
“तुमच्या ईथे म्हणजे ऍक्च्युली सिंहगडाच्या पायथ्याशी गेलो होतो ,तेव्हा तुमच्या घरावरूनच गेलो , साधारण दोन अडीच वाजले असतील “
“ एवढ्या रात्री ? “तिथे काय करत होते हे ? सिंहगडाच्या पायथ्याशी हे काय करायला गेले होते ?कि तिथे न जाता माझ्या घराच्या आसपास ? अरे देवा .. माझ्या मनात काय चाललंय हे यांना कळलं की काय ?”
“तुमच्या मनात जे काही चाललंय ते प्रत्यक्षात घडणं शक्य नाही सर !.. “ माझ्या या गंभीर पणे उच्चारलेल्या वाक्यावर ते मोठ्याने हसले ,
“काय शक्य नाही . आत्ताच्या बॅचला फायनल exam ला बसवायचं का याचा विचार करत होतो मी , तुम्हाला काय वाटलं ? ”
“ओह ..सॉरी आय मीन .. मला वाटलं .. “ खूप संकोच वाटून मी पट्कन बाहेर आले तर तिथे मंदार बसला होता , मला एकदम स्वतः:ची लाज वाटली , याने ऐकलं असेल का ?
तेवढ्यात यु डी बाहेर आले , आणि मंदार च्या हातात त्यांनी गाडीची चावी दिली , मंदार न बोलता खाली निघून गेला , यु डी मला म्हणाले , “चला निघूया आपण “ कुठे ?असं मी विचारायच्या आत ते खाली गेले होते . मग मी त्यांच्यामागोमाग खाली गेले , मंदारने गाडी बाहेर काढली होती , यु .डी . नी अगदी आदबीने गाडीचा मागचा दरवाजा उघडून दिला , मी आत जाऊन बसले ,हे काय ? आज आपण तिघेच ?बाकीचे का नाहीत ? असं विचारावंस खूप वाटलं पण हा प्रश्नही मनातच विरला , गाडी सुसाट सुरू झाली आणि थोड्याच वेळात , डेक्कन ला ‘ccd ‘ च्या दारात थांबली , आम्ही तिघेही आत पोहोचलो , यु डी ने नेहेमीसारखी रुबाबात कॉफी आणि बर्गर ची ऑर्डर दिली , वातावरणात कमालीची आर्द्रता होती , आजूबाजूला मंद संगीत चालू होतं , मला नेमकं काय चालू आहे कळत नव्हतं , एकदम यु डी नी बोलायला सुरुवात केली , “हं बोला मॅडम , काय अडचण आहे तुमची ? “
“कशाबद्दल ? “
“हेच मघाशी तुम्ही जे स्टेटमेंट केलं त्याबद्दल “ ते आणि मंदार दोघेही माझ्याकडे पहात होते .
आता हे नक्कीच स्टुडंट्स च्या फायनल exam बद्दल बोलत नाहीये हे कळण्याइतकी मला अक्कल होती .
मी ओशाळले ,काय उत्तर देऊ यांना , आणि “अडचण काय अडचण , किती ऑकवर्ड पोझिशन आहे माझी हे कळत नाही का यांना ? आणि ईतका खाजगी विषय मंदार समोर कसा काय बोलतात हे ? माझं लग्न झालंय एवढंच नव्हे तर मी एका मुलीची आई आहे .सुपर्णा बोलली होती ते खरंच असेल का? मंदार यांना या असल्या बाबतीत सपोर्ट करत असेल का? नक्की वेड घेऊन पेडगावला कोण जातंय ? मी की हे ? मी काहीच बोलत नाहीये हे बघून यु डी नी स्वतः:च बोलायला सुरूवात केली ,
“ उल्का .. “ त्यांच्या या एकेरी संबोधनाने मी एकदम चमकले , आणि खोटं कशाला बोलू , मला एकदम सतारीची झंकार ऐकल्यावर सर्वांगातून एक हवाहवासा तरंग उमटतो तसं झालं .
“उल्का बिलिव्ह मी , ज्या दिवशी तुला पहिल्यांदा बातम्या देताना मी टी व्ही वर पाहिलं त्याच दिवशी तुझ्या प्रेमात पडलो . तु मॅरीड आहेस की अनमॅरिड या गोष्टींचा मी विचारच केला नाही . विचार करून कोणी प्रेमात पडतं का गं ?त्या क्षणानंतर तु मला माझ्या ईथे माझ्या डोळ्यासमोर हवी होतीस , आणि मी त्या एकाच ध्येयाने झपाटून गेलो . मग मी आणि मंदार ने मिळून बराच काथ्याकूट केला मग सुपर्णाचा अंदाज घेतला आणि तिला ईथे एक जागा रिकामी आहे असं सांगितलं. मला माहिती होतं की ती तिच्या विश्वसातली माणसं (विशेषतः: स्त्रिया ) बघणार त्यातून मॅरीड असतील हे बघून , कारण मॅरीड स्त्रियांपासून आपल्या नवऱ्याला धोका नाही (अशी तिची समजूंत ) . आणि तसंच झालं , तिने तुलाच विचारलं , मग तु त्या दिवशी ईथे आलीस . तुला माहितीये ?त्या दिवशी मंदारने माझ्या समोर सात वेळा लोटांगण घातलं . कारण त्याची माझी तशी पैजच लागली होती , मी त्याला म्हटलं होतं की मी माझ्या विल पॉवर वर उल्काला ईथे आणीन .मग तु खरंच आलीस ,सुरूवातीचे दिवस तु गोंधळलेली असायचीस , घाबरलेली असायचीस , मला खूप वाटायचं तेव्हा तुला बोलतं करावं , तुझ्याशी खूप गप्पा माराव्यात , पण तु तुझ्याच कोषात असायचीस , मग एके दिवशी जाई कडून ऐकल की तू घरी एवढी कामं करून , दोन दोन नोकऱ्या करतेस . हे ऐकून तर मी आणखी तुझ्या प्रेमात पडलो , मग तुझं गाणं , तुला माहितीये ? गाण्यातल्या प्रत्येक छोटया छोट्या हरकती तुझ्या गळ्यातून अगदी सहजतेने निघतात , कित्येक लोकांच्या गळ्यात अशी गम्मत नसते , मग तुझं साहित्यातलं अफाट वाचन , तुझे विचार , तुझी काम करण्याची आणि स्वतःला सुधारण्याची धडपड , एखाद्यावर डोळे मिटून विश्वास ठेवण्याची पद्धत , तुझा सरळ साधा निष्कपट स्वभाव , काय आणि किती सांगू गं , आकंठ बुडालोय मी तुझ्या प्रेमात . तुझ्या भावना किंवा तुझं अपराधी पण मला कळतं , मला याची जाणीव आहे की तु मॅरीड आहेस , तुला तुझा संसार आहे , ई ई . पण जेव्हा माणूस प्रेमात पडतो तेव्हा विचार करून नाही ना गं पडत . प्रेम हे प्रेम असतं ज्या व्यक्तीला बघून आपल्याला एकदम असं वाटतं की अरे ही माझीच आहे , काही कारणांनी काही दिवसांसाठी लांब गेली होती , फक्त इतकंच. तेच प्रेम असतं ना गं ? आपल्याला आवडणारं माणूस ज्याच्यासाठी काहीही करावंसं वाटावं , अगदी जीव सुद्धा द्यावा असं वाटावं , ते समोर असणं , आपल्याला त्याच्याबरोबर सगळं शेअर करता यावं , जे जे आपल्याला आवडतं ते त्यालाही आवडावं , अजून काय हवं असतं गं . आणि मला असं माणूस सापडलं असताना , मी कसा लांब राहू ? हे बघ उल्का तुलाही माझ्याबद्दल तेच वाटतंय हे मला माहिती आहे , मलाच का सगळ्यांनाच माहिती आहे . तुझं प्रेम तुझ्या डोळ्यातून दिसतं , तुझे डोळे विलक्षण बोलके आहेत . तु कमी बोलतेस पण ते डोळे सगळं सांगून जातात .एनीवेज .. तुला माहिती नसेल तर सांगतो सुपर्णा आणि माझा घटस्फोट होण्याच्या मार्गावर आहे . आत्ता तशीही ती वेगळी रहाते माझ्या मुलाला घेऊन. मीच घेतलेल्या प्रशस्त फ्लॅटमध्ये . आणि मी रेंट वर रहातो. माझ्याच घरातून तिने मला बाहेर काढलंय , का माहितीये ? कारण माझ्याच आई-बाबांची तिला फूस आहे . मग माझा एकटेपणा घालवण्यासाठी मी हे असं दिवसभर स्वतः:ला सगळ्यांच्यात बिझी ठेवतो ,उल्का आयुष्यात मला सुख हवंय , मला ते समोर दिसत असताना मी ते घेऊ नये हे माझ्या तत्वात बसत नाही . मन मारून केवळ समाजाच्या भीतीने मला माझं एकुलतं एक आयुष्य नासवायचं नाहीये , बोल उल्का देशील तू मला साथ ?” एवढं बोलून यु डी विलक्षण कातर डोळ्यांनी माझ्याकडे बघू लागले . त्या डोळ्यात ईतकी आर्जवं होती , की माझ्या घसरणाऱ्या मनाला खूप प्रयत्नपूर्वक मी सावरलं .
“ प्लिज असं काही बोलून माझ्या मनातली तुमची प्रतिमा मोडू नका सर, माझ्या दृष्टीने जगातल्या कुठल्याही समस्येवर तुमच्याकडे सोल्युशन असलेले तुम्ही सुपरमॅन आहात . माझे रोल मॉडेल आहात आणि दुसरं म्हणजे माझं माझ्या नवऱ्यावर आणि मुलीवर खूप प्रेम आहे . तुमच्या बद्दल मला आकर्षण वाटलं असेलही कदाचित पण त्यात तुमच्याबद्दलच्या आदराची भावना जास्त आहे “
“ अंग तुझ्या संसाराच्या आड मी का येऊ ? तुझ्याकडून मला खरच काहीही नकोय , फक्त तु मला सतत दिसावीस , माझ्या अवतीभोवती असावीस , माझी प्रेरणा बनून राहावीस एवढंच मला वाटतं , राहशील ना उल्का ?? “ यु .डी चा आवाज बऱ्यापैकी घोगरा झाला होता , डोळे पाण्याने भरले होते . त्यांचा हा अवतार माझ्यासाठी नवीन होता , सतत लोकांच्या गराड्यात वावरणारा , अनेक मुलींच्या मनांवर राज्य करणारा यु डी मी पहिला होता , त्याच्या आय टी च्या क्लास मधल्या कित्येक तरुण आणि इंटेलिजन्ट मुली , तसंच कंपनीतर्फे विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या लेडीज मॅनेजरना ही मी त्याच्यावर लट्टू होताना पाहिलेलं , सदोदित हसणारा , दुसऱ्यांची खेचणारा यु .डी आतून ईतका एकाकी आहे ? एरवी सगळ्यांना भक्कम आधारस्तंभ म्हणून , मेंटॉर म्हणून , जीवाला जीव देणारा म्हणून परिचित असलेला यु डी, याला नेमकं काय हवंय माझ्याकडून ? तितक्यात मंदार ने हलक्या रिदम मध्ये गायला सुरवात केली ,
Nothing's gonna change my love for you
मग यु डी आणि मंदारने मिळून मला ते कडवं ऐकवलं , सगळे आमच्याकडे बघतायत याचं त्यांना भान नव्हतं ,
If the road ahead is not so easy
Our love will lead the way for us
Like a guiding star
I'll be there for you if you should need me
You don't have to change a thing
I love you just the way you are !..
Ccd चा मंद , तरल म्युझिक , आजूबाजूचा गारवा आणि माझ्यासाठी गाणारे दोन तरुण , मी मंत्रमुग्ध झाल्यासारखी बसून राहिले . नंतर त्या तरल स्पंदनावर स्वार होऊन मी घरी आले . जिन्यातून वर येताना मी माझी उरले नव्हते , कितीवेळ मी त्या स्वरांच्या कोषात वावरत होते देव जाणे , हे असलं प्रपोजल कोणाच्या नशिबात असेल ?ते ही लग्न झाल्यानंतर सहा वर्षांनी अचानक एके दिवशी आपल्या आयुष्यात आपल्याला हवा असणारा राजकुमार घोड्यावरून येतो आणि आपल्यापाशी प्रीतीची याचना करतो ? कसं आणि कुठे नेमकं चुकतंय ? माझ्याच विचारात हरवलेली मी ‘निशी’ च्या रडण्याने भानावर आले , ती खाली खेळताना पडली होती आणि रडत रडत वर येत होती , मी धावतच जिन्यात गेले तिला उचलून पोटाशी धरलं त्या ईवल्याशा जीवाच्या कोवळ्या स्पर्शाने मला जाग आणली ,काय चाललाय आपलं ? या लहानग्या जीवाला सोडून कुठे भरकटत चाललोय आपण ?आपण फक्त आपला विचार करतोय . निशीचं तिच्या बाबावर किती प्रेम आहे , तिला तोडायला बघतोय का आपण तिच्या बाबापासून ? एक मूल पदरात असल्यावर आपल्याला काय अधिकार उरतो स्वतः:चा विचार करायचा ? आपलं प्रेम त्यात या लेकराची फरपट कशाला ? निशी मोठी झाल्यावर तिला काय वाटेल ? आपण ईतके स्वार्थी कसे झालो ? हे अनैतिक आहे ,हे पाप आहे , हे आताच ईथेच थांबलं पाहिजे .मनात चाललेला कल्लोळ सहन न होऊन असहाय्य्पणे मी मान मागे सोफ्यावर टेकली आणि रडायला लागले ,तसं निशी आपलं रडणं थांबवून लुकलुकत्या डोळ्यांनी माझ्याकडे बघायला लागली .
त्याच तिरीमिरीत परत उठले आणि फोन पाशी गेले , उद्यापासून मी ऑफिस ला येत नाही हे कळवलं . माझ्या मते यातच सारं काही आलं ,आता यु डी ला वेगळं सांगायची काही गरज नाही , ते तितके सुज्ञ होते . ती संध्याकाळ मी मानस आणि निशीच्या भोवती भोवती करण्यात घालवली , दुसऱ्या दिवशी ऑफिस मधून काहीही कॉल आला नाही , मी सुस्कारा सोडला , सासूबाईंनी लगेच घासण्यासाठी धान्याचे डबे रिकामे केले , गोधड्या चादरी धुवायला काढल्या ,मानस ऑफिसला निघून गेला , निशी शाळेत गेली , मी फरशी पुसत असताना जाऊबाई छान आवरून ,ऑफिसला निघाल्या , जाता जाता मी कशी दिसते हे विचारायला विसरल्या नाहीत , अख्खा दिवस मी पुन्हा कामाला जुंपलेली राहिले , पहिला दिवस आपण करतोय ते बरोबर आहे या समाधानात मी झोपले . दुसरा दिवस तसाच कामाला जुंपून घेण्यात गेला , तिसरा दिवस गेला , मानस ने दोन-तीन वेळा विचारले , काहीतरी जुजबी कारण सांगून मी वेळ मारून नेली पण मला कळून चुकलं की मला लगेचच दुसरी नोकरी बघितली पाहिजे कारण जाऊबाई एकही रुपया घरात देत नसत , त्या तिघांचा खर्च , सासूबाई, शिवाय,आमचं तिघांचं कुटुंब या सगळयांचा भार मानस वर होता शिवाय मानस ला नकळत माझ्याकडून मिळणाऱ्या पगाराची सवयही झाली होती . मी घरात थांबल्यामुळे होणारी सर्वांची धुसफूसही मला कळत नव्हती असे नव्हे . यु डी च्या विश्वात मला प्रेम ,सन्मान , कौतुक सारं काही मुक्त हस्ताने दिलं जात होतं त्या बदल्यात तो माझ्याकडून काहीही मागत नव्हता पण समाजमान्यता नसल्यामुळे त्या सुखाला समाधानाची जोड नव्हती . आणि मानस च्या विश्वात बायकोलाही सुख द्यावं लागतं हे असलं काही नव्हतंच . त्याचं विश्व वहिनी , माऊ यांच्यावर आपल्या नाकर्त्या भावामुळे झालेला अन्याय ,या भोवतीच फिरत होतं , बायकोच्या काही वेगळ्या गरजा असू शकतात , याचा विचार करायचं त्याला काही कारणच नव्हतं . माझ्या कुठल्याच गुणाचं , आवडी -निवडीचं किंबहुना मी माणूस असण्याचं कोणालाच सोयरं -सुतक नव्हतं ,माझं आयुष्य मी पुन्हा स्वतः:च्याच हाताने एकसुरी , बेरंगी करून घेतलं होतं , माणसाला जगायला काय हवं असतं ? ज्या कळपात आपण राहतो तिथून थोडं प्रेम आणि आपुलकी , मायेचा ओलावा , थोडी काळजी आणि तु आम्हाला हवी आहेस याची पावती . हे जिथे मला मिळू पहात होतं ते मी हाताने लोटून दिलं होतं आणि ज्यांना ना माझ्या हसण्याचं सोयरं सुतक ना रडण्याची चिंता अशा लोकांना मी जवळ केलं होतं , का? आणि कशासाठी ? माझं मलाही समजत नव्हतं .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे कथा,
वाचताना उंबरठा आठवला, पण ही कथा वेगळी आहे
स्वतःसाठी जगाव की ज्यांना आपली कदर नाही त्या "आपल्यांसाठी" .....