केल चिकन

Submitted by धनि on 22 January, 2023 - 21:38
केल चिकन
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बेबी केल (२५० ग्रॅम)
चिकन (बोनलेस टेंडर्स ६)
कांदा (मोठा अर्धा - बारीक कापून)
आले लसूण पेस्ट (१ चमचा)
टोमॅटो (१ कापून)
हिरवी मिरची ( तुमच्या आवडीनुसार)
दही (१ मोठा चमचा)
धणे पूड (१ चमचा)
मीठ
तिखट (काश्मिरी लाल आणि तिखट तिखट)
हळद
गरम मसाला (एव्हरेस्ट - १ चमचा) किंवा चिकन मसाला (एम डी एच - १ चमचा)
साखर (चिमूटभर)
तेल
जीरे

क्रमवार पाककृती: 

आमच्याकडे हिरव्या भाजीचे वेगवेगळे प्रकार करून बघायला आवडतात त्यामुळे ही पाककृती सुचलेली आहे.
१) चिकन टेंडर्स चे १ इंचाचे तुकडे करून घ्या.
२) मी तसे तर बेबी केलचे एक पाकीट आणतो की जे आधीच धुतलेले असते. तुमच्या कडे नसेल तर बेबी केल नीट धुवून घ्या. पाने खूप मोठी असतील तर थोडी कापून घ्या.
३) एका भांड्यात तेल टाकून ते गरम करा. तेल गरम झाले की त्यात जीर्‍याची फोडणी करा.
४) त्यात कांदा टाकून परतून घ्या.
५) कांदा थोडा गुलाबी झाला की त्यात हिरवी मिरची आणि आले - लसूण घाला.
६) हे सगळे चांगले परतले गेले की त्यात टोमॅटो टाका.
७) टोमॅटो शिजला की त्यात धनेपूड, मीठ, तिखट, हळद आणि मसाला टाकून नीट परतून घ्या.
८) मसाला शिजत आला की त्यात दही टाका.
९) दही परतून तेल वेगळे होत आले की त्यात चिकन टाका.
१०) चिकन थोडे परतून घेतले की गॅस कमी करा आणि झाकण ठेवा.
११) झाकण ठेवून १० मिनीटे चिकन शिजवून घ्या. बोनलेस चिकन असल्याने ते तसे लवकर शिजते.
१२) चिकन शिजत आले की त्यात केल टाका.
१३) आपल्याला केल जास्ती शिजवायची नाही त्यामुळे केल टाकल्यावर अगदी थोडावेळ शिजवा.
१४) झाकण काढून रस आटवा.
१५) सगळे शिजले की शेवटी मीठ आणि साखर प्रमाणात आहे ना ते बघा.

वाढणी/प्रमाण: 
३ - ४ लोकांकरता
अधिक टिपा: 

१) केल ऐवजी पावर ग्रीन्स किंवा बेबी पालक वापरू शकता. पालक वापरणार असताल तर थोडी कसूरी मेथी मसाल्या बरोबर घाला आणि आल्याचे प्रमाण वाढवा.
२) दही आंबट असेल तर कमी घाला.
३) यात उद्देश हा भाज्यांमधील फायबर खाण्याचा आहे त्यामुळे त्या थोड्या क्रंची लागल्या तर चांगलेच आहे.
४) हे थोडे कमी मसालेदार केले तर पोळी/नान बरोबर न खाता नुसतेच खाता येते.

माहितीचा स्रोत: 
वेगवेगळे व्हिडीओ आणि प्रयोग
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली आहे आयडीया! केल चा काही फ्लेवर लागतो का वेगळा? मलाही मसाला कमी करून नुसतीच खायला आवडेल. हाय प्रोटीन, फायबर आणि लो कार्ब!

छान आयडीया!
चिकन सूप मधे इतर भाज्यांसोबत केल नेहमी वापरला जातो आणि बरेचदा डाळ-केल करते. आता केल-चिकनही करेन. खरे तर पालक चिकन केले जाते पण केल चिकन करावे हे काही सुचले नाही. Happy

मैत्रेयी, केलला वेगळा असा फ्लेवर नसतो. मी ऑम्लेटमधे घालते बारीक चिरुन.

धन्यवाद सगळ्यांना!

अमा, मैत्रेयी > कमी मसाल्याचे एकदम बरोबर.
स्वाती२ > मोठा केल वापरला तर एक स्ट्राँग फ्लेवर असतो त्याला. पण बेबी केलला इतका स्ट्राँग नसतो.
सायो > बोनलेस ब्रेस्ट चालतील की. टेंडर्स म्हणजे मी नेहमी टेंडरलॉइन्सचा पॅक आणतो. बर्‍याच ठिकाणी असे मिळतात वेगळे. त्यांची चव मला ब्रेस्ट मीट पेक्षा जास्ती आवडते.
केशवकुल > बॉकचॉय एशियन स्टाईल रेसेपी मध्ये वापरून पाहिलेले आहेत पण अजून देशी रेसेपी मध्ये टाकलेले नाही

मुठीपेक्षा थोडं जास्त केल घेतलं. मुलगा फार कटकट्या आहे खाण्याबाबतीत म्हणून खूप नाही घातलं. त्याला चव आवडली तेव्हा पुढच्या वेळी थोडं जास्त केल घालेन किंवा पॉवर ग्रीन्स वगैरे.

मी आधी "केलं चिकन" असं वाचलं. Happy
केल हा प्रकार अजून माहिती नव्हता. म्हणजे बघितला होता पण हाच तो, तोच हा हे माहिती नव्हतं. छान वाटतेय रेसिपी.

केलं चिकन >> सध्याच्या वर्तमानपत्रांमधले मराठी वाचून असे वाटले असेल Lol

चामुंडराय >> केल चिप्स खाता आता केल चिकन पण खा Proud