मिशन मजनू सिनेमाच्या निमित्ताने

Submitted by रघू आचार्य on 21 January, 2023 - 23:48

मिशन मजनू हा सिनेमा नेफिवर प्रदर्शित झाला आहे. चिकवा धाग्यावर लिहीताना या निमित्ताने काही संदर्भ दिले. ते चिकवावर असावेत कि नाहीत या शंकेमुळे स्वतंत्र धाग्याचे प्रयोजन.

अलिकडे रॉ च्या आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स बद्दल डझनावारी सिनेमे आले. यात मुख्य भूमिकेत अक्षयकुमार होता तर सपोर्टिंग भूमिकात कुमुद मिश्रासहीत कधी अनुपम खेर तर अन्य काही ठराविक कलाकार दिसत. अगदी बॉण्डपटात एमशी संबंधित चेहरे दिसावेत तसे कलाकार फिक्स असत.

राझी या सर्व गुप्तहेरपटात उजवा आणि हटके ठरला. नुकताच आलेला मिशन मजनूही राझीच्या वाटेवरचा आहे. पण तितका प्रभावी होता होता राहिला आहे. राझी हा मोठ्या पडद्यावर(च) बनवायचा या हेतूने बनलेला सिनेमा असल्याने त्याचे छायालेखन उत्कृष्ट आहे. मिशन मजनू जरी मोठ्या पडद्यासाठी सुरू झालेला असला तरी मालिकेपेक्षा उत्तम पण मोठ्या पडद्याला अनुकूल नसलेलं छायाचित्रण असा मध्यममार्ग असलेल्या काही वेबसिरीज / वेबसिनेमांच्या वाटेने तो जातो. (काही काही वेबमालिकांचे चित्रण हे मोठ्या पडद्यावरच्या चित्रपटांनाही टक्कर देणारे असते).

पाकिस्तानच्या रावळपिंडीच्या गल्ल्या दाखवण्यासाठी लखनौच्या मुस्लीम भागात चित्रीकरण केलं आहे. ते छान जमले आहे. सिनेमाचा जो हाय पॉईण्ट आहे त्याचं चित्रण उरकल्याप्रमाणे घेतलेलं आहे. काहुटा प्रकल्प अगदीच खेळण्याप्रमाणे घेतला आहे. त्या क्षणाला त्याची भव्यता सिनेमास्कोप पडद्यावर दिसेल अशा बेताने घेतली असती तर वेगळा परिणाम साधला गेला असता. त्या प्रकल्पाचे फोटो घेण्याचा प्रसंग सुद्धा बालनाट्यात असावा असा आहे. इतका लष्करी दृष्ट्या संवेदनशील प्रोजेक्ट जिथे असेल तिथे अशा प्रकारे पहाडीच्या मागच्या बाजूला कुणीही जाऊ शकेल का ?

मात्र हा चित्रपट इतिहासातल्या अनेक घटनांशी प्रामाणिक राहतो. काही काही प्रसंगांबाबत शंका आल्याने गुगळून पाहिल्यावर सिनेमा बनवताना जास्तीत जास्त तटस्थ राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे जाणवले. हा इतर स्पाय मूव्हीजप्रमाणे पोलिटिकल नरेटिव्हज हळूच सोडून देत नाही. पण या चित्रपटाच्या कथेने / घटनांमुळे काही प्रश्न उभे राहतात. त्याची चर्चा चिकवावर केली होती. ती तिथे नको. वेगळ्या स्वतंत्र धाग्यावरच व्हावी हा हेतू असल्याने इथे ती चर्चा हलवली आहे.

SPOILER ALERT

रविंद्र कौशिक हे भारताचे आजवरचे सर्वोत्कृष्ट गुप्तहेर समजले जातात. ब्लॅक टायगर या कोडनावाने ते ओळखले जात. दिसायला ते विनोद खन्नासारखे होते. सिनेमात येण्याचे त्यांचे स्वप्न होते आणि अभिनयातही रस होता. ते हेरूनच मिलितरी इंटेलिजन्सने त्यांना पाकिस्तानात हेरगिरीसाठी पाठवले होते. त्यांची ओळख मिटवली गेली. सगळी कागदपत्रे जाळली गेली होती. ते पाकिस्तानच्या आर्मीमधे मेजर या पदावर कार्यरत होते. त्यांनी पाकिस्तानच्या गुप्त अशा अणूप्रकल्पाच्या (Project 706) हालचालींचे इनपुट्स भारताकडे पोहोचवले होते. इस्लामिक बाँब अशी संज्ञा त्यांनी वापरली. त्यामुळेच इस्त्राएलने या प्रकरणात रस घेतला होता. त्यानंतर रामनाथ काव यांनी रॉ च्या पाकिस्तानातल्या नेटवर्कला सक्रीय केले होते.

रामनाथ काव यांच्या रॉ ने पुढची जबाबदारी चोख पार पाडली. या कामगिरीवर मिशन मजनू बेतलेला आहे. अर्थात यातल्या नायकाला जास्तीचे श्रेय दिले गेलेले आहे. त्याला हेअर सलूनमधून सँपल्स आणायचे काम दिले गेले होते. पण चित्रपट असल्याने टीम वर्कचे श्रेय एकाच नायकाकडे दाखवावे लागले असावे.

मात्र या सिनेमामुळे एक वेगळा वाद रंगू शकतो. एखादा पीएम इतका बावळट असू शकतो का ? कारण २०१५ नंतर या प्रकरणाच्या निमित्ताने मोरारजी देसाई यांच्यामुळेच पाकिस्तानातले रॉ चे नेटवर्क उद्ध्वस्त झाले असे सांगितले जात होते. या चित्रपटात सुद्धा पाकिस्तानचे मिशन एक्स्पोज झाले हा एण्ड होऊ शकत होता. पण तो पुढे रॉ चे नेटवर्क कसे उद्ध्वस्त केले गेले या शेवटावर थांबतो. त्यामुळे ते सत्य आहे का हे काल शोधले. तर अशा प्रकारच्या बातम्या आहेत. त्या २०१४ नंतरच्याच आहेत. सिनेमात देसाईंना जबाबदार धरलेले नाही. पण त्यांची प्रतिमा एक बावळट गांधीवादी, आदर्शवादामुळे शेजारच्यांशी संबंध चांगले करायला निघालेला मुत्सद्देगिरी कशाशी खातात हे ठाऊक नसलेला राजकारणी अशी उभी केली आहे.
https://www.dailyo.in/politics/morarji-desai-kargil-war-pervez-musharraf...

सिनेमात मात्र ते झिया उल हक यांना खडसावून सांगतात कि तुमचे काहुटाचे धंदे बंद करा नाहीतर ....! या सूचक धमकीमुळे झिया उल हक हा प्रकल्प गुंडाळतात. मात्र ही माहिती भारतापर्यंत पोहोचली म्हणजेच रॉ चे नेटवर्क आहे असा निष्कर्ष ते काढतात. हे पटण्यासारखे आहे. एजंटस थेट दिल्लीला फोन करत असताना पकडले जात नाहीत हे ही थोडे खटकण्यासारखे आहे. कदाचित रॉ अनुभवातून शिकत असावी. परदेशात त्यातही शत्रूदेशात जाणारे कॉल्स, पत्रं ही स्कॅनिंग खाली असतात हे बेसिक रॉ ला माहिती नसेल यावर विश्वास बसत नाही.

मोरारजी देसाईंना रॉ बद्दल आकस होता कारण इंदिरा गांधींनी विरोधकांच्या विरोधात रॉ चा वापर केला असा संशय त्यांना होता. या बातम्या तीस चाळीस वर्षांपूर्वी वाचलेल्या आहेत. रामनाथ काव त्या वेळी वादग्रस्त होते अशा मोठ्यांच्या चर्चा वर्तमानपत्रातल्या बातम्यांवरून चालत हे ही आठवते.

भयंकर गुंतागुंतीचं प्रकरण आहे. इंदिरा गांधींसारख्या शक्तिशाली राजकारणी महिलेला सत्तेतून खाली खेचणारा नेता मुत्सद्दी नसेल असे वाटत नाही. नंतर कदाचित मोरारजींनी डोकंच वर काढू नये यामुळे जनता पार्टी आणि देसाई यांचं प्रतिमाभंजन झालं असावे असे वाटते. किरकोळ किंवा नसलेल्या चुका मॅग्निफाय केल्या गेल्या असाव्यात. मात्र काही रिपोर्ट्स मधे मोरारजींना शिवांबू कोला बद्दल झिया उल हक फोन करून मजा घ्यायचे असे म्हटलेले आहे. शिवांबू कोला बाबत देशातही टिंगलीचा सूर होता. त्यामुळे मोरारजींबाबत एक वेगळीच प्रतिमा निर्माण झाली होती. अर्थात अशा बातम्या पेरण्यामागे इंदिराजींचे मीडीयातले हितसंबंध असणे हे उघड आहे. जनता पक्षाची प्रतिमाच विदूषकांची पार्टी अशी बनवण्यात त्या वेळी काँग्रेस यशस्वी झाली होती.

रॉ चा वापर हा एक वादग्रस्त मुद्दा होता. त्यामुळे सत्तेत आलेल्या जनसंघ + समाजवाद्यांच्या + गांधीवाद्यांच्या युतीला कोण आपले कोण पराये हे समजत नव्हते. रॉ सारख्या अनेक संस्थांबाबत हे अस्तनीतले निखारे ठरू शकतात असे त्यांना वाटत होते. समजा मोरारजी देसाई हे तत्कालिन रिपोर्ट्सप्रमाणे बावळट असतील तरी परराष्ट्रमंत्री अटलबिहारी बाजपेयी आणि माहिती व प्रसारण आणि नभोवाणी मंत्री लालकृष्ण अडवाणी हे तर त्यांना रोखू शकत होते ना ? त्यामुळे आपल्यापर्यंत ज्या बातम्या येतात तेव्हढेच हे प्रकरण नसावे असे वाटते.

सिनेमा त्या मानाने तटस्थ आहे. हा त्याचा प्लस पॉईण्ट आहे. तसेच उथळ देशभक्तीवर सिनेमात भाष्य केले आहे. ते ही काहींसाठी गरजेचे वाटते ( हा ही वादाचा मुद्दा असेल त्यांच्यासाठी).

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद. त्या वेळच्या घटनांबद्दलची माहिती/प्रश्न ई. करता वेगळा धागा बरा. माझा तिकडचा प्रतिसाद आता काढता येत नाही. तो राहू दे. लोक इथे लिहू शकतील.

इंटरेस्टिंग माहिते, रघू आचार्य! हो मला आधी वाटले मोरारजी देसाईंना एकदम भोंगळ वगैरे दाखवतील. पण बर्‍यापैकी समतोल आहे चित्रण नेत्यांचे. त्यात एकतर तेव्हाची अनेकांची जाहीर वक्तव्ये अशीच असत. दुसरे म्हणजे मोरारजी प्रत्यक्षात भोंगळ नसावेत पण राजकीय पोश्चरिंग करताही असे म्हणत असावेत तेव्हा. तसेही चित्रपट पुढे सरकतो तसे ते सरावलेले दाखवलेले आहेत.

थेट फोन बद्दल मलाही तीच शंका आली. त्यावेळेस इतके फोन कॉल्स थेट रावळपिंडी-दिल्ली होताना कोणालाही संशय येत नाही हे आश्चर्य आहे. दुसरे म्हणजे रॉ ने सुद्धा एक दुसराच देश असे फोन करायला का वापरला नाही ते ही कळत नाही. दुबई वगैरे. पिक्चर पाहता असे वाटते की हे फोन थेट नसते, तर कोणालाच पत्ता लागला नसता.

इंटरेस्टिंग आहे हे सर्व.

रविंद्र कौशिक ग्रेट, त्यांचं पुढे काय झालं, त्यांच्याबद्दल आणि रामनाथ काव यांच्याबद्दलही जाणून घ्यायची उत्सुकता लागून राहिली आहे.

अंजु

कौशिकांचा शेवट वाईट (किंवा एका हेराचा जसा होतो तसा) झाला.

इनायत मासी नावाचा एक रॉ एजंट पाकिस्तानात धरला गेला आणि थर्ड डिग्री टॉर्चर मध्ये तो आपलं तोंड बंद ठेवू शकला नाही.

कौशिक त्या मुळे पकडले गेले आणि पुढली जवळपास 20 वर्षे पाकिस्तानी जेल मध्ये खितपत होते.

त्यांची पाकिस्तानी पत्नी आणि मुलं यांचं पुढे काय झालं याची माहिती नाही.

2000 च्या आसपास त्यांचा TB मुळे मृत्यू झाला.

रॉ ने प्रोटोकॉल नुसार हा आमचा माणूस नाही असे सांगून हात वर केले.

तळटीप - हि काही रॉ वर टीका नाही. CIA, MI6 किंवा ISI हि अंडर कव्हर एजन्ट बाबत पकडले गेल्यावर असेच वागतात.

ओहह so sad. थोडं वाटलंच होतं असं झालं असावं. तरी थोडी आशा होती. ह्या फिल्डमधल्या लोकांबद्दल, त्यांचे जे नंतर हाल होतात याबद्दल फार वाईट वाटतं आणि एकीकडे त्यांचा अभिमानही वाटतो.

माहितीसाठी धन्यवाद अक.

धन्यवाद फारेंड.
राजकीय गरजेपोटी अशी वक्तव्ये येतात याच्याशी सहमत. फोन ऐवजी बिनतारी यंत्रणेचा वापर दाखवून काम झाले असते. तळाचा कॉन्टॅक्ट थेट फोनवरून संपर्क साधत नाही. त्याच्या वर त्या ऑपरेशन चा एक माध्यम असतो. असे लोक कुणा एका किंवा जास्त लोकांना रिपोर्ट करत असतात. त्यांचा दिल्ली किंवा त्या देशातील वकिलातीशी संपर्क असतो.

तात्पुरत्या कामासाठी एखाद्या देशात घुसवलेल्या एजंटने थेट संपर्कात राहणे समजू शकतो. रविंद्र कौशिक यांचे नेटवर्क होते. ते एजंटस पाकिस्तानी नागरिक म्हणून सेटल झालेले होते.

अक नि रघू तुम्ही दिलेली वांतर माहिती छान आहे. सिनेमा बकवास आहे. शत्रूला हास्यास्पद दाखवून आपण आपल्याच लोकांच्या कामगिरीचे अवमूल्यन करत असतो हे कधी लक्षात येणार लोकांना ? राजकारणी नि गुप्तहेर संघटना - आय एसाय नि रॉ ह्यांच्यामधल्या चेस मॅच ला मुखबीर मधे अधिक कौशल्याने हाताळले आहे. त्यातला हिरॉ ही थोडा सुपरमॅन कॅटेगिरी मधे गेला तरी सिरीयल वाहून जात नाही.

मोरारजी देसाईंना रॉ बद्दल आकस होता कारण इंदिरा गांधींनी विरोधकांच्या विरोधात रॉ चा वापर केला असा संशय त्यांना होता. या बातम्या तीस चाळीस वर्षांपूर्वी वाचलेल्या आहेत. रामनाथ काव त्या वेळी वादग्रस्त होते अशा मोठ्यांच्या चर्चा वर्तमानपत्रातल्या बातम्यांवरून चालत हे ही आठवते. >>>>

मोरारजीं बद्दल बोलायचं झाले तर माझ्या वाचण्यानुसार ते वारल्यावरही कित्येक वर्ष ते CIA चे मुखबीर होते अशी वदंता होती.

इंदिराजींच्या कॅबिनेट मधला कोणता तरी मोठा माणूस CIA ला बातम्या लीक करे असा बरीच वर्ष संशय होता.

दिल्लीतल्या मीडिया मधल्या कोणाचं वाचता याअनुसार मोरारजी किंवा बाबू जगजीवनराम किंवा यशवंतराव यांवर संशयाची सुई होती.

जवळपास 8-10 वर्षांपुरवी हिंदू मधला एक रिपोर्ट वाचल्याचे आठवते जेव्हा वर्षानुवर्षे RTI टाकल्यावर सरकार ने ह्या तिघांपैकी कोणीही मुखबीर नव्हता असे उत्तर दिले होते.

शत्रूला हास्यास्पद दाखवून आपण आपल्याच लोकांच्या कामगिरीचे अवमूल्यन करत असतो हे कधी लक्षात येणार लोकांना ? >>> +1

अक, आमच्याकडे केसरी यायचा. त्यात तर जवळपास सगळेच विरोधी पक्ष सीआयए कडून पैसे घेऊन सरकार अस्थिर करायचे काम करतात अशा आशयाच्या बातम्या नाव न घेता दिलेल्या असायच्या. शाळेत कुणालाही उभे करून आज वर्तमानपत्र वाचले का? कोणती बातमी? असे विचारत. त्यामुळे हे वाचायचो.

त्या वयात विरोधी = देशद्रोही असे ठसले होते. आम्ही केसरी घेतो हे अभिमानाने सांगायचो पण. वस्तुस्थिती कॉलेज संपल्यावर नोकरीच्या संधी शोधताना समजली.

रघु आचार्य >>

आपल्याशी 100% सहमत.

हेरगिरी वरचे सिनेमे म्हणायचे झालं तर लवकरच येणारा विशाल भारद्वाज चा खुफिया चांगला असो अशी आशा आहे.

त्यातही सत्य घटने वर आधारलेला असल्यानं कशी ट्रीटमेंट देतो हे पाहावं लागेल.

छान लिहिले आहे.
अक यांनी लिहिलेली पूरक माहितीही आवडली.

शाळेत कुणालाही उभे करून आज वर्तमानपत्र वाचले का? कोणती बातमी? असे विचारत. त्यामुळे हे वाचायचो. >>> हो आमच्याही शाळेत रोजची मुख्य बातमी फळ्यावर लिहीण्याचे फॅड आले होते. ते वेळीच गेलेले दिसते. नाहीतर आजच्या इरसाल कार्ट्यांनी "या अ‍ॅक्टरची बायको सर्व हिरॉइन्सचे काम तमाम करेल. तिचे व्हायरल फोटो पाहिलेत का?" ही "बातमी" लिहीली असती.

पण सिरीयसली, आमच्याकडे कायमच केसरी यायचा. त्याचा प्रवास बर्‍यापैकी काँग्रेसकडे झुकलेला ते कट्टर काँग्रेसवाला आणि मग नंतर पवारांचा सकाळ व भाजपचा तरूण भारत यांच्या तुलनेत न्यूट्रल असाही केसरी पाहिला आहे. नंतर केसरी रिलेव्हंट राहिला नाही, आणि आता तर वर्तमानपत्रेच रिलेव्हंट राहतील का अशी शंका आहे. एकेकाळी हे ओपिनियन मेकर्स होते.

"या अ‍ॅक्टरची बायको सर्व हिरॉइन्सचे काम तमाम करेल. तिचे व्हायरल फोटो पाहिलेत का?" >>> Lol

एकदा शाळेत येतानाच असेंब्लीला बातमी वाचून दाखव असे सरांनी सांगितले. आदल्या दिवशी लिहून आणायला सांगितलेलं मी विसरलो होतो. एव्हाना बातमीचा फॉरमॅट लक्षात यायला लागला होता. विसरलो म्हटलं तर मार खावा लागला असता. मग पटकन एका वहीच्या पानावर बातमी तयार करून लिहीली.

दोन गटात दगडफेक
आज पुण्यात लग्नात मानपानावरून वधूपक्ष व वरपक्ष यांच्यात मारामारी झाली. त्याचं पर्यावसान दगडफेकीत झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती काबूत आणली. या प्रसंगी पोलिसांनी नवरदेवासह सात जणांना अटक केली आहे.

सरांना पान फाडून दिलं. ते म्हणाले असल्या बातम्या नाही वाचायच्या.

छान माहिती अक.

फा :D. आणि पोरं लोकसत्ता वाचत असतील तर ' तमुक अ‍ॅक्टरची बायको रात्री 'हे' करते ' असल्या छापाचे सुविचार फळ्यावर आले असते.

मोरारजी देसाई यांना पाकिस्तान कडून निशाणे पाकिस्तान अवॉर्ड पण देण्यात आला होता
पण ते मुद्दाम दिला असेल असे पण असू शकते