समसमा संयोग

Submitted by Abuva on 18 January, 2023 - 06:16
Sinking battleship (DALL-E)

न अब मंज़िल है कोई
न कोई रास्ता है..

मध्यंतरी आकाशवाणी विषयीच्या आठवणींची एक पोस्ट व्हॉट्सॅप वर फिरत होती. मला ती खूप भावली! क्रिकेट कसोटी चालू असताना कानाला ट्रॅन्झिस्टर लावून फिरायच्या काळातला मी माणूस, कदाचित त्याच काळात रमलेला. या अनेक वर्षांच्या साहचर्यात किती असे प्रसंग आले आहेत, की आकाशवाणीने दिन सुहाना केलाय, वा रातें जवां केली आहेत.‌ पण कधी कधी हे नातं या ही पलिकडे जातं. अंतर्मनाला स्पर्श‌ करणारी एक माझ्या आयुष्यातली घटना सांगतो.

अकरावी बारावीचा काळ असावा. म्हणजे मी नुकतंच इंग्लिश पुस्तकं वाचायला सुरुवात केली होती. सळसळत्या उत्साहाचा काळ होता. बाहू फुरफुरत होत्या. नवे दोस्त, नवी आव्हाने, नव्या आशा.. वा! काय काळ होता तो...
घरातच मला ॲलिस्टर मॅक्लीनचं एच एम एस युलिसिस हे पुस्तक सापडलं. त्या काळात मी मॅक्लीनचं गन्स ऑफ नॅव्हरोन वाचलं होतं आणि पिक्चर ही पाहिला होता. दुसऱ्या महायुद्धानं वेड लावलं होतं. नाझी भस्मासुराचा उदयास्त तर पारायणे म्हणावी इतक्या वेळा वाचून झालं होतं. युद्धकथा रम्य वाटण्याचाच ते वय होतं. बरं वाचायची पद्धत काय? वेळोवेळी, वेळ काढून, वेळ मिळेल तेंव्हा... आकाशवाणीवर गाणी लावायची, जून्या जीर्णशीर्ण कोचावर लवंडायचं, समोरच्या भिंतीला तंगड्या लावायच्या अन् वाचन सुरू. मग ते किती वेळ चालेल याची गणती नाही! तर...

एच एम एस युलिसिस. सागरीसमरकथा अशी पहिलीच, माझ्यासाठी. दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलंय. जर्मनांच्या ब्लिट्झक्रीग समोर युरोपियन सत्तांची वाट लागली आहे. अजून अमेरिका युद्धात उतरली नाहीये. इंग्लंडवर आगओक्या विमानांचे हल्ले चालू आहेत. ब्रिटिश सागरी सत्तेच्या तोंडाला जर्मन यू-बोटींनी, पाणबुड्यांनी फेस आणलाय. अशी युद्धाची पार्श्वभूमी घेऊन एच एम एस युलिसिसची कथा चालू होते.
रशियामधल्या युद्धप्रयत्नांना बळ देण्यासाठी, अमेरिका आणि कॅनडा येथून रसद घेऊन निघालेली मर्चंट शिप्स. त्यांना सुरक्षितपणे रशियातील बंदरांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेऊन निघालेला ताफा. त्याचं नेतृत्व युलिसिसकडे, अन् पर्यायाने कॅ. रिचर्ड व्हॅलरी, डी एस ओ, याच्या हाती.
कडाक्याची थंडी, हिवाळ्यातली बर्फाळ वादळं, त्यात होणारी हानी.
यू-बोटींचा सुळसुळाट, त्यांचे छुपे हल्ले. त्यांच्यापासून बचावासाठी केलेल्या व्यूहरचना, त्यासाठी लागणारी सततची जागरुकता. त्यामुळे पडणारा ताण.
यू-बोटींच्या टोर्पेडोंच्या माराने पेटणारी, जळणारी, पाण्यात कलणारी, आणि हळूहळू बुडणारी जहाजं. प्रत्येक बुडणारं जहाज म्हणजे युरोपच्या म्हणजेच पर्यायाने इंग्लंडच्या युद्धक्षमतेची होणारी पिछेहाट.
जर्मनांचे हवाई हल्ले. त्यापासून हा भला मोठा, मैलोनमैल पसरलेला काफिला दडवायचा तरी कसा? आणि हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी सगळ्या जहाजांना एकत्र आणावं तर ती यू-बोटींना मेजवानी!
निसर्गाच्या लहरींना तोंड देत, शत्रूच्या डावपेचांना उत्तर देत,‌ हवाई आणि सागरी हल्ल्यांचा प्रतिकार करत, प्रसंगी मानवी क्षमतेची कमाल मर्यादा पार करत, हा तांडा मजल दर मजल करत नॉर्थ सी मधून ब्रिटिश बेटांकडे निघालाय. पण काम कठीण आहे. विजयाची स्वप्ने सत्यात उतरताना पहाणारे जर्मन सध्या तरी वरचढ आहेत. काफिल्यावर हल्ल्यामागून हल्ले होताहेत. प्रत्येक हल्ल्यांचा सामना करताना कमी जास्त हानी होते आहे - काफिल्याची, त्याला संरक्षण देणाऱ्या नेव्हीच्या बोटींची, आणि मानवी.

एक प्रसंग सांगतो. तांड्यावरच्या यू-बोटींच्या हमल्यात एक मर्चंट शिप पेटली आहे, जळते आहे. गगनचुंबी ज्वाळांनी वेढलेल्या त्या जहाजाचा प्रकाश रात्रीचा अंधार भेदतो आहे. इतर जहाजं त्या प्रकाशात उजळली आहेत. यू-बोटींसाठी हे आमंत्रणच जणू! कॅ. व्हॅलरी, हा धोका ओळखून त्या जहाजाच्या कप्तानाशी बोलतो. शिप आपणहून बुडवून टाकायला सांगतो. पण तो जाॅंबाज गडी उत्तरतो, माझा मी एकटा पोहोचतो. माझी काळजी करू नका! कॅ. व्हॅलरी हतबुद्ध होतो. काय ही बहादुरी, काय हा वेडेपणा! पण हा धोका कॅ. व्हॅलरी पत्करू शकत नाही. गनरी ऑफिसर ले. रालस्टनला तो तोफांचा मारा करून ती शिप बुडवायला सांगतो. ले. रालस्टन त्याच्याशी वाद घालतो. हा खरोखरच अपवादात्मक प्रसंग. राॅयल नेव्हीचा अधिकारी त्याच्या उच्चाधिकाऱ्याशी हुज्जत घालतोय? ते काही नाही. शेवटी ले. रालस्टनला कॅ. व्हॅलरीची आज्ञा पाळावी लागणारच. कॅ. व्हॅलरी एक शेवटचा संदेश त्या शिपला पाठवतो - आम्ही तुम्हाला बुडवत आहोत. Abandon ship. तिकडून उत्तर येतं - Au revoir - फिर मिलेंगे! ले. रालस्टन तोपचींना तोफांचा मारा करण्याचा आदेश देतो. भरल्या अंतःकरणाने ते जहाज बुडताना हे सगळे पहात असतात. कॅ. व्हॅलरी विचारतो - काय नाव होतं त्या कॅप्टनचं? इतर कोणाच्याही आधी ले. रालस्टन उत्तर देतो - कॅ. रालस्टन, माझे वडील!

त्या कादंबरीनं मला सुन्न केलं होतं. त्या दिवसांत मी जणू त्या काफिल्याचा एक भाग बनलो होतो. ती जीवघेणी थंडी, तो खवळलेला समुद्र, तो स्वाहाकारी अग्निवर्षाव, ती मती कुंठवणारी भिती माझ्या मनात घर करून राहिली होती.

कादंबरीचा शेवट जवळ आला होता. रविवारी दुपारची वेळ होती. रेडिओवर विशेष जयमाला चालू होतं.

शेवटच्या घमासान लढाईचं वर्णन मॅक्लीन करतोय. युलिसिस विकल झाली आहे. तांडा भरकटला आहे. फार थोडी मर्चंट शिप्स वाचली आहेत. आकाशातून जर्मन विमानं आणि समोरून एक बलाढ्य जर्मन क्रूझर आणि तिचा ताफा आग ओकतोय.

पण संदेश आलाय की तासभर धीर धरा, लढा चालू ठेवा. नेव्हीचा एक काफिला तुमच्या मदतीला येतोय.

रेडिओवर गाणं चालू झालंय...

अकेले है, चले आ ओ जहां हो...
कहां आवाज दे तुमको..

इकडे अंतःकरण पिळवटून काढणारा प्रसंग, आणि तिकडे विदीर्ण करणारं संगीत. रफीसाहेबांचा आर्त स्वर, मनाच्या गाभ्यातून आलेली हाक...

युलिसिसचा डेक बाॅम्बच्या माऱ्याने क्षतिग्रस्त झालाय, आगीच्या ज्वाळांत लपेटला आहे. तिच्या तोफा थंड पडल्या आहेत. त्या चालवायला आता फार कुणी जिवंत राहिलेले नाहीत.अशा वेळी कॅ. व्हॅलरीकडे एकच पर्याय राहिलेला असतो. तो आदेश देतो - Ram her! त्या जर्मन क्रूझरला धडक देऊन तिच्यासह जलसमाधी घ्यायची. Full speed ahead! आत्मार्पणाची किंमत देऊन उरलेल्यांचा जीव आणि रसद वाचवायची. युलिसिस जर्मन क्रूझरच्या रोखाने वळते. जर्मनांना हे लक्षात येतं. सगळ्या जर्मन गोळाबारीचं लक्ष्य आता युलिसिस बनतं. आता अंत जवळ आलाय.

न अब मंझिल है कोई
न कोई रास्ता है

डोळ्यांचा बांध फोडून अश्रू वाहायला लागले आहेत. गाण्यात व्हायोलिनचे सूर टिपेला पोहोचले आहेत.

त्या भयाण भडिमारामुळे युलिसिसचा पुढचा भाग तुटतो. शिप मध्यातून मोडते. Her great screws, her executioner. पूर्ण ताकदीनं घरघरणारी तिची इंजिनं तिला सागरतळाला कायमच्या विश्रांतीसाठी घेऊन जातात.

न जीते है न मरतें
बताओ क्या करे हम..

निव्वळ योगायोग होता मी कादंबरीच्या या अत्त्युच्च बिंदूला असताना रेडिओवर हे गाणं लागणं म्हणजे! पण त्यानं या प्रसंगाची खोली, त्याची उंची कैक पटीनं वाढवली. त्यात गहिरे रंग भरले, आणि एक अविस्मरणीय, अनुपमेय अनुभव देता झाला.
आज कधीही हे गाणं रेडिओवर किंवा कुठेही ऐकलं तरी एच एम एस युलिसिसची आठवण, त्या शेवटाची आठवण झाल्यावाचून रहात नाही.

https://youtu.be/WNLfTgbS7ig
मुद्दाम इथे लिंक देताना गाणं फक्त ऐकता येईल अशीच दिली आहे. कारण त्याच्या पिक्चरायझेशनचा आणि मी वर्णन केलेल्या प्रसंगाचा सुतरामही संबंध नाहीये!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलेय.
नुकतेच हिटलर वाचून झालेय..गन्स ऑफ नेवरॉन वाचतेय..रिलेट करता आली वर्णने.
एच एम एस युलिसिस वाचायच्या यादीत आहे.

मस्त लिहिलंय
मी सध्या समग्र अलिस्टर मकलीन वाचायला घेतलं।आहे

गन्स ऑफ नव्हेरॉन, व्हेअर इगल्स डेअर, युलिसिस आणि लास्ट फ्रॅंतीयर ही पूर्वीच वाचली होती
आता आईस स्टेशन झेब्रा, बेअर आयलंड आणि नाईट विदाऊट एंड झाली वाचून
सध्या रांदेवु पॉईंट वाचतोय

छान लिहिलय! हे असच कधी कधी गोष्टी जुळून येतात आणि आपल्या मनात, तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्या प्रसंगाची उंची आणि खोली खुप वाढवून जातात.

मस्तच जमलय ..... हँक्स चा ग्रे हाऊंड सिनेमा तुमचा लेख वाचताना आठवला जो बॅट्ल ऑफ अटलांटीक वरून बेतला होता - माझ्यासाठी तोच समसमा संयोग !

त्या प्रसंगाची उंची आणि खोली खुप वाढवून जातात. >> +१

युलिसिस माझी आवडती कदंबरी. सॅन अ‍ॅन्द्रियस पण छान आहे.
१९४१ च्या पहिल्या ६ महिन्यात जर्मन यु बोटींनी इतर ५ वर्षांपेक्षा जास्त बोटी बुडवल्या होत्या.
त्यावेळी किती टनाचा कर्गो बुडवला यावरुन युबोटींच्या कॅप्टन्सना प्रमोशन मिळत असे.
युलिसिस छान असली तरी एका वयात ती वाचली पाहिजे असे मला वाटते (अकरावी बारावीचा काळ बरोबर!) कारण ती प्रदीर्घ आणि उदासवाणी पण आहे.
अर्थात लेख एकदम उत्तम आणि गाण्यांचा उल्लेख ही विशेष.