गोव्याचा रंजक इतिहास

Submitted by TI on 9 January, 2023 - 11:54

हिंदवी साम्राज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात केली, पुढे भारतभर अगदी उत्तरेपासून खाली दक्षिणेत तंजावर पर्यंत मराठी साम्राज्याची पताका फडकावली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पेशव्यानी मराठी साम्राज्याचा विस्तार केला तो अगदी अटकेपार हे आपल्याला माहितच आहे.
ह्या सगळ्यात महत्त्वाचा प्रदेश म्हणजे आत्ताचे गोवा राज्य. गोव्याच्या इतिहासात मागे डोकावत गेलो तर अगदी सातवाहन, मौर्य, यादव, कदंब, चालुक्य त्या नंतर आदिलशाही, पोर्तुगीज आणि मराठे इथपर्यंत पाऊलखुणा दिसतात. पैकी बऱ्याच जणांना फक्त पोर्तुगीज इतिहास ओळखीचा आहे असं दिसून येतं.
परंतु त्याआधी सुमारे इ.स १४७० मध्ये विजयनगर साम्राज्याचा गोवा हे महत्त्वाचा भाग होते. पुढे विजयनगर साम्राज्याच्या अस्ता दरम्यान आदिलशाही मध्ये गोवा बेटाचा समावेश झाला आणि मग गोव्यात आदिलशाही राजवट आली. आदिलशाही मध्ये आल्यानंतर गोव्यात अनेक किल्ले बांधले गेले, पुढे पोर्तुगीज अंमल आल्यावरही बरेच किल्ले बांधले गेले. ह्या सगळ्यासोबतच मराठी साम्राज्याचा एकमेव गोव्यातील किल्ला बेतूल सुद्धा ह्याच दरम्यान बांधण्यात आला.
१५१० पर्यंत अदिलशाहि राजवट ह्या बंदरावर होती. त्यानंतर पोर्तुगीजांनी गोवा जिंकून आपली सत्ता स्थापन केली. समुद्री मार्ग, जलवाहतूक आणि मध्यवर्ती ठिकाण, तसेच भौगोलिक परिस्थिती या सर्वांमुळे पोर्तुगीजांनी गोव्याला आपले बस्तान बसवले ते अगदी अलीकड पर्यंत.
आदिलशाहीच्या काळात बांधलेले अनेक किल्ले पोर्तुगीजांनी नंतरच्या काळात पाडले आणि काही डागडुजी करून पुन्हा उभारले. जुन्या नोंदीनुसार गोव्यात तब्बल ४० किल्ले अस्तित्वात होते.
पुढे जलमार्गाचे महत्त्व आणि पोर्तुगीज इंग्रज मंडळी डोईजड होण्याचे जाणून छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टी आणि गोव्याच्या आसपासच्या प्रदेशात अनेक जलदुर्ग तसेच किनाऱ्यालगतचे किल्ले बांधले. आपले स्वतःचे आरमार स्थापन केले. आजच्या नेव्ही चा उगम हाच!
त्या सुमारास इंग्रज, डच, फ्रेंच तसेच पोर्तुगीज ह्यांची घुसखोरी वाढतच चालली होती. व्यापाराच्या नावाखाली आलेली हि परदेशी मंडळी इकडेच बस्तान बसवू लागली. ह्यातली मेख जाणून १६५९ मध्ये आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यावेळी गोव्यापेक्षाही कोकणात चौल बंदर हे आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होते. मुंबई पुढील वसई बंदर सुद्धा ह्याच ख्यातीचे महत्वाचे बंदर होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी हि खाडीवरची ठिकाणं तसेच विजयदुर्ग पद्मदुर्ग या सारखे भक्कम जलदुर्ग बांधून आरमाराची ताकद वाढवली.
त्या दरम्यान सावंतवाडीच्या भोसल्यांनी बांधलेल्या तेरेखोल किल्ल्यावर पोर्तुगीजांनी विजय मिळवला आणि गोव्यात आपले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करू लागले.
गोव्याचे महत्व आणि पोर्तुगीजांचा व्यापार सोडून वेगळा हस्तक्षेप ह्याचे गांभीर्य महाराजांनी जाणले आणि गोव्यात दक्षिणेत बेतूल किल्ला बांधला. १६७९ साली बेतूलचे बांधकाम पूर्ण झले.मडगाव पासून २२ किमी वर असणाऱ्या साळ नदीच्या काठावर बेतूल किल्ला बांधण्यात आला. महाराजांनी आणि मराठ्यांनी बांधलेला गोव्यातला हा एकमेव दुर्ग. मडगाव पासून जवळच वेर्णा येथे साळ नदीचा उगम होतो. पोर्तुगीज या जलमार्गाने मडगाव आणि पुढे जलवाहतूक करत असत, त्याला निर्बंध घालणे ह्या मुख्य हेतूने बेतूल किल्ल्याची स्थापना झाली.

दक्षिण गोवा तसेच उत्तर गोव्यातला काही भाग आणि पुढे फोंडा हे सर्व प्रदेश मराठ्यांनी जिंकून घेतले आणि स्वराज्यात जोडले. महाराजांच्या मृत्यूनंतर बेतूल किल्ला पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली गेला. बेतूल वर बघण्यासाठी दुर्दैवाने आज फार काही उरले नाहीए. तुरळक तटबंदी, एक तोफ आणि एक बुरुज इतकेच अवशेष उरले आहेत.

शाहपुरा आत्ताचा शापोरा (आदिलशाही बांधणी), आलोर्णा (सावंतवाडीचे भोसले-बांधणी १७४६), मांडवी मधला अग्वाद (पोर्तुगीज-बांधणी १६१२-Aguada Fort), रीस मागोस (आदिलशाही-बांधणी १४९५ Reis Magos) तसेच पुढे नारोआ, मार्मगाव हे पोर्तुगीज बांधणीचे किल्ले गोव्यात पाहायला मिळतात. नंतरच्या काळात रीस मागोस, खोलगडे आणि सांव इश्तव्हाव मराठ्यांनी जिंकले आणि अलीकडच्या काळात (१९६१ पोर्तुगीज सत्ता असे पर्यंत) पुन्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले. पोर्तुगीजांनी सुमारे ४० किल्ले गोव्यात बांधले आणि पुढच्या काळात त्यातले अर्ध्याहून जास्त पाडले असे जुन्या नोंदीत आढळते. उत्तरार्धात रीस मागोस चा तुरुंगासाठी वापर करण्यात आला, तर काबो दे रामा चा राज्य निवास करण्यासाठी वापर झाला. गोव्याच्या इतिहासाच्या अशा रंजक खुणा आजही घडलेल्या घटनांची साक्ष म्हणून उभ्या आहेत. पुढे गोवा पोर्तुगीजांकडून मुक्त झाले आणि अखंड स्वतंत्र भारतात सामील झाले. आज मागे राहिलेल्या ऐतिहासिक वास्तू फिरून अनेक शतकांचा प्रवास आपण करून येऊ शकतो. सध्या ह्यातले काही किल्ले पर्यटन स्थळं म्हणून सुद्धा प्रसिद्धीस आले आहेत.स्वैर, उनाड किनाऱ्यांसोबतच गोव्याची हि ऐतिहासिक बाजू खरंच बघणीय आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लेख. इथे एक गोवा गृप ने लिहिलेली गोव्यावरची लेख माला पन आहे. आपल्यासाठी गोवा म्हणजे फिश बीअर सुशेगात.