सकाळची अंघोळ ही एक उरकायची गोष्ट नसून एक मनोभावे करायची उपासना आहे. असं आपलं माझं मत आहे!
सकाळी उठल्यापासून आपल्याभोवती घरातल्यांचा वावर असतो. रेडीओ रेकत असतो, वर्तमानपत्रं बकत असतात, पोरांची शाळेची लगबग, डब्याचा धबडशा, केरवारे, आवराआवर, दूध, दगड अन् धोंडे.
पण एकदा का गरम पाणी काढून न्हाणीघराचे दार बंद केले की आपलेच जग आणि आपणच राजे.
एकांतात उनउन पाण्याने शरीराचा मळ घालवतानाच, मन मात्र...
कधी त्रिखंडाची सैर करण्यात रमते
कधी घडलेल्या घटनांमध्ये गुरफटते
कधी येणाऱ्या प्रसंगांच्या विचारांत गुंतते
कधी स्वप्नरंजनात
कधी आत्मताडनात
कधी सिंहावलोकनात
कधी एखाद्या सुहृदाशी एकांगी संवाद
कधी हाता खालच्याची खरडपट्टी
कधी काश्मीर प्रश्नात मन गुंततं
कधी गणपती डेकोरेशनमध्ये अडकतं
कधी वाहत्या पाण्यात सूर गवसतो
कधी ठिबकत्या नळात उद्वेग भासतो
शॉवर खाली उभे असताना वा बादलीतून पाणी अंगावर घेत असताना, मनाचं मालीश चाललं असतं. दिवसाची तयारी असते. कधी येणाऱ्या संकटाला तोंड द्यायची तयारी होते, तर कधी त्या विषयापासून दूर पळून जाऊन मनगढंत बतिया बनवत असतं. उघडे डोळे ओल आलेली, पोपडे उडालेली भिंत बघत नसतात तर त्यांना कधी राजगडाचं नेढं दिसत असतं, कधी ढगांत अन् धुक्यात नंदादेवीचं शिखर शोधत असतात, वा एखाद्या फ्लायकॅचरच्या मोहक, लांबलचक शेपटीवर झुलत असतात. सुखस्वप्नांच्या, दिवास्वप्नांच्या दुनियेत आपण अगदी गुरफटून जातो. त्या कमलदलात अडकलेल्या सुभाषितातील भुंग्यासारखी अवस्था होते म्हणा ना! फरक एवढाच की मीच त्या ओढीने या कल्पनारंजनात रंगतो. गजमुज्जहार व्हायला ही नलिनी नव्हे, बादलीतलं गरम पाणी संपलं की ही भावावस्था आपसूकच संपणार आहे!
अगदी असं समजू नका की रोजच मनोराज्यांचीच सद्दी असते! अहो, संपलेला साबण लक्षात आल्यावर डोक्यात किराण्याची लिस्ट बनते, अन् डोळ्यांत साबण गेल्यावर.. पोरांचा अभ्यास आठवतो. अन् अंग पुसायचा टॉवेल विसरल्यावर मात्र बायकोची आठवण होते! फुरसतीच्या वेळी विचारांच्या आवर्तात चार तांबे आणखी खांद्यावर घेतले जातात. पण ज्यादिवशी घाई असते, तेंव्हा मात्र घड्याळ्याच्या काट्यावर चार तांब्यांतच उरकतं! त्यात माझी एक आवड म्हणजे, पाण्यात एखाद थेंब सुवासिक तेल टाकायचं. त्यात ते लेमनग्रास ऑईल असेल तर बहारच! काहीच नसेल तर डेटाॅलचा थेंब तरी टाकायचा. कोकणात आमचे पूर्वज गावातल्या उन्हाळ्यावर अंघोळीला जायचे. निसर्गाच्या सान्निध्यात, उन उन, औषधी, उग्र वासाच्या पाण्यात अंघोळ करायची म्हणजे सौख्याची परमावधीच की! कुठे तरी त्या परंपरेशीच नाळ जोडून घ्यायचा हा प्रयत्न असावा का?
आजकाल मोबाईल आणि यूट्यूबच्या जमान्यात कधीकधी साग्र'संगीत' अंघोळ घडते. म्हणजे, आत गेल्यावर कधी जुनी गाणी, वा एखादा रागदारीचा अंक लावायचा आणि श्मश्रूला सुरुवात करायची. विचारांच्या आवर्ताला ही सोबत उत्तम! पण कधीकधी मूड लागतो, अन् न्हाणीघरात जाताना कानावर पडत असलेल्या गाण्याचे वा भक्तिगीताचे मनात घोळणारे सूर तावात गळ्यातून बाहेर पडू लागतात! बादलीत पडणाऱ्या पाण्याच्या आवाजात आपला आवाज बाहेर कुणाला ऐकू जाणार नाही अशी सोयिस्कर समजूत करून घ्यायची अन् मग लताबाईंच्या नजाकतदार वा भीमण्णांच्या पल्लेदार तानांना आपल्या गळ्यातून वाट द्यायची! त्या गाण्यांचा गळाच घोटायचा म्हणा ना! पण तुम्हाला सांगतो, या घराणेदार मेहनतीनंतर चित्तवृत्ती अशा प्रफुल्लित होतात, काय सांगू! फक्त बाहेर आल्यावर घरच्यांच्या शेरेबाजीकडे अजिबात लक्ष द्यायचे नाही!
पहिला गरम पाण्याचा तांब्या शिणलेल्या, आंबलेल्या, वाशेळ्या शरीरावर उतरला, की नवीन ऊर्जा जाणवायला लागते. शरीराला साबण फासताना अभावितपणे झालेलं मर्दन आणि नंतर कढत पाण्याचा उतारा, वा! नवचैतन्य सळसळायला लागते! आणि मग शेवटचा तांब्या, खरं तर उरलेली आख्खी बादलीच डोक्यावर ओतून घेतानाचा हर गंगे-भागिरथीचा गजर! बास, जणू काही पुनर्जन्मच! पंच्याने खसखसून अंग अन् डोके पुसतानाच तोंडाने स्तोत्र सुरू होते. आणि आतले कपडे चढवून पंचा गुंडाळेपर्यंत संपतंही!
धुतलेल्या कपड्यांचा पिळा खांद्यावर टाकून बाहेर पडताना दाढी घोटलेली असते, अंघोळ आटपलेली असते, केस विंचरलेले असतात. मोरीच्या दरवाज्याच्या खिट्टीला हात घालतानाच दशदिशांच्या फेरीला गेलेले मन शरीराइतकेच ताजेतवाने होऊन वर्तमानात परतलेले असते. दरवाजा उघडला की दिवसभराच्या उटारेटी चालू!
वा, आवडले.
वा, आवडले.
छान लिहिलंय. कोकणात पाली
छान लिहिलंय. कोकणात पाली जवळचे उन्हेरे ऐकून माहिती आहेत. अजून कुठे आहेत?
कोकणात पाली जवळचे उन्हेरे
कोकणात पाली जवळचे उन्हेरे ऐकून माहिती आहेत. अजून कुठे आहेत? >> ह्या लेखात बरीच माहिती आहे
http://suvratk.blogspot.com/2019/08/hot-water-springs-of-konkan-geologic...
छान लिहिलंय!
छान लिहिलंय!
आवडले व रिलेट सुद्धा झाले .
आवडले व रिलेट सुद्धा झाले .
थँक्स एबुवा
थँक्स एबुवा
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
ऋतू प्रमाणे गरम किंवा थंड पाणी अंगावर पडलं की मनाची।सगळी मरगळ निघून जाऊन , भीड चेपून आपल्या तरस्वरात गाणी म्हटल्या वाचुन रहावत नाही.