पाटील v/s पाटील - भाग २८ समाप्त!!!!

Submitted by अज्ञातवासी on 25 December, 2022 - 09:56

याआधीचा भाग

https://www.maayboli.com/node/77727

"अण्णा."
"बोला जाधव."
"ते, आपल्या रानाच्या मागे शिडीफर्मची जमीन आहे बघा."
"सिडफार्म हो."
"तोच तो. तिथे सरकार काहीतरी प्रोजेक्ट टाकतय."
"टाकू द्या मग."
"अहो, मग काय टेंडर निघणार असतील, आपण भरायला नको."
"ठीक आहे, मी उद्या आमदाराशी बोलतो."
"जी." जाधव निघून गेले.
अण्णांनी कागद बाजूला ठेवले.
"वत्सलाबाई!" त्यांनी हाक मारली
"वत्सलाबाई आत आल्या."
"अहो बसा आमच्याजवळ थोडा वेळ. किती दिवस झाले तुमच्याशी मोकळं बोलायला वेळच नाही मिळाला. सोनीचं काय चाललंय?"
"व्यवस्थित वागते, बोलते. पोटभर जेवते. दाखवत नाही काही झालंय, पण आतून पोखरल्यासारखी झाली आहे."
"तिला समज द्यावी लागेल. तिच्या भविष्याचाही विचार करावा लागेल. मी कोरगावकरांशी बोलतोय. जमलं तर सोन्याहून पिवळं."
"तिचं प्रेम फक्त..."
अण्णांनी हात वर केला.
"स्वप्नांना मर्यादा ठेवा, मृगजळ आली, आणि गेलं. भविष्याचा विचार करा. मी बोलतो सोनीशी." ते म्हणाले.
"जसं तुम्ही म्हणाल तसं." वत्सलाबाई म्हणाल्या आणि निघून गेल्या.
दुसऱ्या दिवशी अण्णा मुद्दामहून सिडफार्म जवळ गेले.
अनेक ट्रक, जेसीबी आणि ट्रॅक्टर कामात व्यस्त होते.
"अण्णा, खूप मोठा पसारा आहे."
अण्णांनी मागे वळून बघितले.
आमदार त्यांच्या मागेच उभे होते.
"साहेब, पण पाटीलवाडीत कुणाला कानोकान खबर नाही."
"आम्हालाही नव्हती आणि अजूनही नाहीये. सीएम साहेबांचे स्पष्ट आदेश आहेत, या प्रोजेक्टमध्ये काहीही ढवळाढवळ करायची नाही. वीस हजार कोटींची इंवेस्टमेंट आहे."
"बापरे, आहे तरी कुणाचा हा प्रोजेक्ट."
"कुठलीतरी मोठी आयटी कंपनी आहे, ती येतेय. एक शहरच उभारणार आहेत म्हणा ना."
"सगळच बदलेल आमदारसाहेब अशाने."
"चांगल्यासाठीच बदलेल. चला, बोलू नंतर." आमदार निघाले.
अण्णा कित्येक वेळ तिथे उभे राहिले.
त्यांच्या मनात हा प्रकल्प कोणाचा आहे, याविषयी तिळमात्र शंका नव्हती...
दिवसेंदिवस प्रकल्प वेगाने पुढे जात होता.
मोठमोठ्या काचेच्या बिल्डिंग, रस्ते, जलशुद्धीकरण प्रकल्प, वाय फाय, आणि रेल्वेचे रुळ सुद्धा पाटीलवाडीत आले होती.
पाटीलवाडी बदलत होती.
मात्र अजूनही नेमका प्रकल्प कुणाचा, काहीही कळत नव्हतं.
...आणि प्रचंड वेगाने सहा महिन्यातच प्रकल्प पूर्ण झाला.
अण्णा पाटील हा बदल बघत होते, अनुभवत होते.
आणि एके दिवशी पाटलांच्या घरी पत्रिका येऊन पडली...
' उद्घाटन समारंभ
पाटील टेक!
निमंत्रक - मोहन पाटील.'
पाटलांनी पत्रिका बघितली, व स्वतःशीच हसले.
त्यांनी अंदाज केलाच होता, व तो अंदाज खराही ठरला.
"सोने..." त्यांनी हाक मारली.
"आले अण्णा..." सोनीने आवाज दिला.
"ही पत्रिका..." त्यांनी सोनीच्या हातात पत्रिका दिली.
सोनीने पत्रिका घेतली, व मजकूर वाचला.
"मला अंदाज होताच अण्णा."
"बोलली नाहीस कधी."
"काय बोलू? एकदा जाऊन बघून आले. मस्तपैकी एका झाडाखाली खुर्ची टेबल टाकून बसलेला होता. पाय हलवत. मला बघून ओळखलं सुद्धा नाही."
"काय? मोहन पाटीलवाडीत राहतोय?"
"हो. कळलं मला ते."
"मग आपल्याकडे आला का नाही?"
"बदला घ्यायचा होता, तो झाला पूर्ण, आता आपली त्याला काय गरज? सोनी फणकाऱ्याने म्हणाली."
"बदला नव्हता तो..."
"मग?"
"सांगता येणार नाही सोने, बदला मात्र नक्कीच नव्हता. हा अण्णा पाटील ओळखतो सगळ्यांना."
"मग जा तुम्हीच कार्यक्रमाला, मी नाही येणार."
"मी जाईन. बघू काय होतं ते." अण्णा तावतावात तिथून निघून गेले.
*****
'आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाटील टेक या अजस्त्र अशा कंपनीचं उद्घाटन होणार आहे. पुणे, मुंबई अशा मेट्रो सितिजमध्ये न जाता पाटील टेकने नवीन वाट चोखाळली आहे.'
अनेक कॅमेरे, चॅनल्स... सगळे झाडून हजर होते.
आमदारसाहेबांची मुख्यमंत्र्यासोबत राहण्याची धावपळ चालू होते. अण्णा पाटील एका समोरच्या रांगेत निवांत बसले होते.
सूत्रसंचालक आलेल्या मान्यवरांच स्वागत करत होता.
मात्र मोहन पाटील कुठेही हजर नव्हता.
"अण्णा!" कुणीतरी ओळखीच्या व्यक्तीने अण्णांना हाक मारली.
कृष्णराव पाटील...
"कसा आहेस..."
"मी बरा..." अण्णा पाटलांचा कंठ दाटून आला.
"आज आनंदाचा दिवस आहे अण्णा." मागून आवाज आला.
वसंतराव पाटील मागे उभे होते...
आनंदीबाईंसोबत...
*****
वाड्यावर आज शांतता होती. बरीच मंडळी आज कार्यक्रमाला गेलेली होती.
तेवढ्यात वाड्यासमोर बऱ्याच गाड्या थांबल्या.
गाड्यांचा आवाज ऐकून जाधव बाहेर आले.
"अरे... अरे... कार्यक्रम तिकडे आहे, इकडे कुठे घुसताय."
"जाधव... माय फ्रेंड..." एका गाडीतून मोहन उतरला.
"मोहन... साहेब??" जाधवच्या चेहऱ्यावर भलंमोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं.
"हो मीच. जा. सोनीला बोलवा बाहेर."
पण हे सांगण्याच्या आतच सोनी बाहेर आली.
"तू इथे काय करतोय?" तिने रागाने विचारले.
"अहो.. अहो म्हण. लग्नानंतर अरे तुरे खपवून नाही घेणार मी."
"कोण करतंय लग्न तुझ्याशी?"
"तू... तूच..."
"मी नाही करणार. मला वेड नाही लागलं."
"पण मला वेड लागलंय सोने. आय मीन मी युक्रेनला होतो ना, तूच दिसायचीस ग. जागेपणी, स्वप्नात... फक्त तू... मी वेडा झालो असतो, म्हणून फ्लाईट पकडली, आणि आलो इकडे."
"असं? वेड लागलेला माणूस इतके दिवस सोडून नाही जात."
"कारण मला परत यायचं होतं, कायमसाठी..."
"म्हणजे?"
"म्हणजे असं, की. जाऊ दे... सोनाली पाटील, माझ्याशी लग्न करशील. नाही जगू शकणार तुझ्याविना..."
"इतके दिवस जगलास ना, यापुढेही जगशील."
"खरचं?"
"हो.. एन्जॉय..."
"ठीक आहे. व्यास..."
इतका वेळ गाडीत बसलेले व्यास टुणकन उडी मारून बाहेर आले.
"व्यास... तेच म्हटलं तुमच्याविना साहेब एकटे कसे फिरताहेत?" सोनी उपहासाने म्हणाली.
"हे मोहन, मी पेंद्या... ते जिथे, तिथे मी. ही ही..." व्यास हसले.
"इनफ. अनुला होकार कळवा. सांगा, मोहन पाटील तिच्याशी लग्नाला तयार आहे. "
"अनु कोण." सोनालीने विचारले
"एनास्थेशिया. शॉर्ट फॉर्म अनु. माझी होणारी बायको. बाय." मोहन निघाला.
"खरच तू लग्न करणार?" सोनीचे डोळे आता भरून आले.
"नाही ग राणी, तुला सोडून जगूच शकत नाही मी." तो तिच्या जवळ गेला आणि त्याने तिला मिठीत...
... खाड...
"मारलं का..." तो गाल चोळत म्हणाला.
"अनुसाठी... कारण तू फक्त माझा आहेस... कळलं?"
"हो कळलं. चल आता, उशीर होतोय. व्यास, तुम्ही सासूबाई, अंबाबाई, मिने, सगळ्यांना घेऊन या मागून."
"याची तर मला आधीच प्रॅक्टिस झालीय सर."
"गुड.. चल..."
त्याने गाडी स्टार्ट केली...
सोनी त्याच्या शेजारी येऊन बसली.
आणि सुसाट वेगाने गाडी निघाली.
*****
"आई वारली. मोहन घरी आला. पण ना जाणे त्याचं मनच रमत नव्हतं. सदैव उदास. शेवटी मीच म्हटलं... जा पाटीलवाडीत, काय करायचं ते कर, पण तो मला सोबत घेऊन आला, आणि आनंदी इथेच होती... मग जमत गेलं सगळं." वसंतराव शांतपणे सांगत होते.
"पण आम्हाला सांगितलं का नाही?"
"कारण अण्णा आमचीच आम्हाला शाश्वती नव्हती, आम्ही इथे राहू की नाही. पण आता झालंय सगळं नीट. आता मोहन आणि मी इथेच राहणार. कृष्णा तिकडचं सगळं सांभाळेल."
"पण मोहन आहे तरी कुठे?" अण्णा म्हणाले.
"तुझ्याच मुलीला घ्यायला गेलाय." कृष्णराव मागून म्हणाले.
अण्णांनी हसून फक्त हात जोडले.
वसंतराव तिथून उठले, आणि पहिल्या रांगेच्या शेवटच्या कोपऱ्यात बसलेल्या माणसाकडे गेले.
"मनू!" त्यांनी आवाज दिला.
तो माणूस उठला...
काका बोला ना...
"तुला निवांत बघून बरं वाटलं... पण आता तुला अजून खूप काम करायचंय. पाटील टेक बरोबर संपूर्ण पाटील स्टीलचं कँपेन तू सांभाळायचं."
"आम्ही दोघेही सांभाळू..." शेजारीच बसलेली स्नेहल म्हणाली.
"दिवसाची रात्र केलीत तुम्ही पाटील टेक साठी, आता आम्हाला यात तिळमात्र शंका नाही..." वसंतराव हसले...
"एक मिनिट... तुम्ही दिवसाची रात्र केलीत, तर मीही चार दिवसांपासून झोपले नाहीये. माझंही कौतुक व्हायला हवं." मनूच्या शेजारून आवाज आला.
सायली!
"हो सायली पटवर्धन, तू तर सी. ई. ओ आहेस ग. फक्त तू आणि तू..."
"थँक्यू." ती गोड हसली. "अरे मोहनदादा आला."
".. आणि तिकडून दणक्यात मोहनची एंट्री झाली."
सोनीसोबत...
"मनूसाहेब, खरं बोलला होतात तुम्ही. खरं प्रेम मिळतं, आणि ते वाटही बघतं.." मोहन मनुकडे येत म्हणाला.
"हो, मनूसाहेब आहेतच आमचे हुशार..." सायली म्हणाली.
"तुमच्या कौतुकाची संततधार पुरे, जा आता नातीगोती सांभाळा. नाहीतर तुमच्या कौतुकाने आम्हाला अज्ञातवासी व्हावं लागेल." मनू हसत म्हणाला.
"येस..." मोहन म्हणाला आणि धावत स्टेजवर चढला.
"दोन मिनिट माईक दे." त्याने सूत्रसंचालकाला सांगितले.
"कधीतरी एका व्यक्तीने मला सांगितलं होतं, हे नाशिक माझं आहे, कारण मी या नाशिकचा आहे. आपल्या गावावर इतकं प्रेम करता येतं, हे मी पहिल्यांदा बघितलं.
या पाटीलवाडीत मी आलो, आणि या गावाने मला आपलंस केलं. आत मी या पाटीलवाडीचा, आणि पाटीलवाडी माझी.
माझी सगळी नातीगोती इथेच आहेत. माझी माणसे इथे आहेत. आणि आता माझं आयुष्य, माझं प्रेम, माझी होणारी बायको सोनाली पाटील इथे आहे."
सोनाली मस्तपैकी लाजली.
"या प्रेमाच्या मी लायक नाही. पण आयुष्यभर हे प्रेम फेडण्याचा प्रयत्न करेन... आणि सगळ्यात शेवटी... सोनी, आय लव यू... "
...आणि सोनीने चेहरा लपवला.
"चालू दे तुझं..." त्याने सूत्रसंचालकाला माईक दिला, आणि तो खाली उतरला.
"हे जे काही होतं, त्याने आजचा दिवस खूप खास बनवला आहे. धन्यवाद मोहनसाहेब, आणि आताच एक बातमी कळली आहे. महाराष्ट्राच्या महसूलमंत्री सत्यभामा शेलार यांचे आताच कार्यक्रमस्थळी आगमन झालेलं आहे..."
मनू, सायली आणि मोहन येणाऱ्या दरवाजाकडे बघतच राहिले...
दहा बारा मशीनगनधारी, त्यांच्यामागे पंधरा आमदार... आणि प्रत्येक आमदाराच्या बाजूला दोन दोन बंदूक धारी.
"एवढी सिक्युरिटी तर मुख्यमंत्र्यांना नाहीये," सायली म्हणाली.
"कारण ही सरकारी सुरक्षा नाहीये."
"मग?"
"इट्स प्रायव्हेट आर्मी..." मनू भारावून जात म्हणाला.
... आणि त्यांच्या मागून एक उंचपुरा माणूस चालत आला...
"मोक्ष," मनूने आनंदाने हाक मारली.
मोक्ष हसतच पुढे झाला, व त्याने मनूला मिठीत मारली.
सायली आणि मोहन त्यांच्याकडे बघतच राहिले...

समाप्त - उपसंहार बाकी!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अज्ञातवासी, कथा पूर्ण केली त्याबद्दल अभिनंदन!
इतक्या gap नंतर लिहिली तरीही सलग वाटली, उत्सुकता वाढवणारा शेवट..
पु ले प्रतिक्षेत Happy