किम् नरः?

Submitted by Abuva on 21 December, 2022 - 01:21

विमानतळाच्या रस्त्यावर एक मोठा सिग्नल आहे. तिथे दोन्ही बाजूंनी भरपूर ट्रॅफिक असतं. गेल्या वेळेपासून मी तिथे तृतीयपंथी लोकं बघतोय. पैसे मागत असतात. त्याला भीक मागणं म्हणवत नाही. ते काय असतं, तो जोगवा असतो का, त्याच्या मागचं कारण काय, लोकं का पैसे देतात मला काहीच माहिती नाही. तो एक नकोसा प्रसंग असतो एवढं खरं. कोरोनाच्या काळानंतर यांची संख्या फार वाढली आहे. म्हणजे, चौकाचौकात पैसे मागताना दिसतात. ही लोकं दिसली की माझी सर्वसाधारणपणे चिडचीड होते, कशाला खोटं बोलू?

काल चौकात गर्दी जरा जास्त होती. पाच सात वाहनांच्या नंतर माझी गाडी होती. डाव्या बाजूनं दुचाक्या येऊन पुढे जाऊन थांबत होत्या. उजवीकडे एक उंच, नाकी डोळी नीटस, माफक मेक अप केलेला, कुठलाही भडकपणा नसलेला आणि नेटका पदर घेतलेला एक तृतीयपंथी मंद गतीनं चालत, वाट काढत येत होता. त्याच्या डाव्या हातात त्यानं काही नोटा दुमडून धरल्या होत्या, अन थांबलेल्या एकेका गाडी जवळ जाऊन तो उजवा हात पसरत होता. त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव... सोशीक, गंभीर म्हणावे असेच होते. चेहेऱ्यावर अथवा चालण्यावागण्यात कुठेही थिल्लरपणा, बेरकीपणा, बिलंदरपणा वा गुर्मी जाणवत नव्हती. तो टाळ्या वाजवत नव्हता. आणि कदाचित त्या वेगळेपणामुळे त्यानं माझं लक्ष वेधलं असावं. नेहेमी चटकन नजर फिरवणारा मी, त्याच्याकडे लक्ष देऊन बघू लागलो. होकार देणारे, पैसे देणारे कुणी नव्हतेच. गाड्यांच्या बंद काचांआडून दुर्लक्ष करणारे जास्त. तर दुचाकीस्वार मान हलवून, हात झटकून नकार दर्शवत होते. याच्या चेहेऱ्यावरच्या भावांत कुठेही फरक पडत नव्हता. समजूतदारपणे, तगादा न लावता, त्रागा न करता तो पुढच्या माणसाकडे वळत होता.

तेवढ्यात डावीकडे थांबलेल्या एका दुचाकीवरच्या आईने, तो तृतीयपंथी येतोय हे बघून, पर्स मधून काढून एक नोट मागे बसलेल्या साताठ वर्षाच्या मुलाच्या हातात ठेवली. तो तृतीयपंथी जवळ येताच मुलानं नोट त्याच्या पुढ्यात धरली. तृतीयपंथीयाचा चेहेरा बदलला. गंभीर मुद्रा मंदस्मितात परिवर्तित झाली. मुलानं दिलेली नोट त्यानं घेतली. मला वाटतं नोट मोठी असावी. मला गाडीच्या बंद काचेतून त्या आईनं काहीतरी सांगितल्याचं माझ्या दृष्टीस पडलं. चटकन त्या तृतीयपंथीयानं दुसऱ्या हातातली मोड घेतली अन् मुलाच्या हाती ठेवली. मोकळा झालेला उजवा हात, त्या मुलाच्या डोक्यावर ओझरताच ठेवला. मुलगा त्या स्पर्शाला नवखा नसावा, कारण तो त्या स्पर्शापासून दूर गेला नाही, आक्रसला नाही. आशीर्वचन पुटपुटताना क्षणभरच त्या तृतीयपंथीयाचा चेहेरा उजळला. एक मुग्ध भाव त्या चेहेऱ्यावर उमटला. पुरुषी ठेवणीच्या चेहेऱ्यावर मेकअप पलिकडे मार्दव उमललं. जणू क्षणभरासाठी आदिम, अनादि मातृशक्तिचं चैतन्य, पावित्र्य त्याच्या ठायी संचारलं होतं त्या मुलाला आशीर्वाद द्यायला... झर्रकन तो तृतीयपंथी पुनश्च स्थितप्रज्ञ मुद्रेनं पुढे सरकला.

मी मात्र अभावितपणे नजरेसमोर घडलेल्या या दृष्यानं भांबावलो होतो. ही एक अनन्वित सामाजिक रुढी माझ्यासाठी तशी नवीन नव्हती. पूर्वी पाहिलेला प्रकार होता. तरी त्याचा हा भावाविष्कार खचितच अनोळखी होता. सिग्नलला पैसे मागणाऱ्या, या समाजानं झिडकरलेल्या लोकांकडे तुसडेपणानं बघणारा मी या प्रसंगानं, त्यातल्या गूढत्वाच्या प्रचीतिनं एक क्षण अचंबित, निःशब्द झालो होतो.

आणि परतीच्या प्रवासात त्याच सिग्नलला उलट्या बाजूला मरणाचा मेकअप थापलेला, बारीक डोळ्यांचा, कावेबाज नजरेचा, थिल्लर टाळ्या वाजवत विचकट अंगविक्षेप करणारा दुसरा एक हि... आपलं, तृतीयपंथी होता. हा नेहमीचा अनुभव. म्हणूनच तो अनुभव कायमची आठवण ठेऊन जातो.

या सगळ्या वर्णनात मी 'तो' असा उल्लेख केला आहे. पण त्याची वृत्ती, त्याचा वेष तर स्त्रीचा आहे. त्याला 'ती' ही भूमिका, नव्हे ओळख, हवी आहे. पण बहुसंख्य समाजासारखा मी ती मान्य करायला तयार नाहीये. ते द्वंद्व माझ्या मनात धुमसतंय. काय बिघडतंय मी जर हा उल्लेख स्त्रीलिंगी केला असता तर? परंपरेचा पगडा, ओझं बुद्धीला टाकता येतं पण मनाला पटकन समजवता येत नाही. उत्तर न सापडणाऱ्या प्रश्नांची उकल काळं नाही तर पांढरं असं द्वैत मानणाऱ्या मनाला कशी करता येणार? आणि समाजाचा एक भाग असलेला हा मनुष्यमात्रही 'किम् नर:' ह्याच गुंत्यात स्वत: अडकलेला दिसतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आज दुर्गा भागवत यांचं पैस हे लघुनिबंधांचं पुस्तक परत वाचत होतो. जोगवा या नावाचा एक लघुनिबंध आहे. ह्याच तृतीयपंथीयांच्या विषयी. त्यांना आलेला अशा प्रकारचा एक अनुभव. पण बाईंचा अभ्यास मोठा, आवाका मोठा आणि तद्वतच अधिकार मोठा! जोगवा मागणारे तृतीयपंथी, त्यांचा एक नाच, त्या नादात गुंगलेले जोगत्ये आणि त्यांना जोगवा देणारी वेश्या. याचं ज्या सहृदयतेने बाईंनी वर्णन, नव्हे चित्रणच, केलं आहे ते मुळातून वाचण्याजोगे.
या सर्वांचा धर्माशी, रूढींशी बाईंनी जो संदर्भ मांडला आहे तो त्यांच्या अभ्यासाचा द्योतक आहे. ज्या समाजाने तृतीयपंथीयांना उपेक्षित ठरवले आहे, त्याच समाजाचा धर्म त्यांना एक विविक्षित स्थान उपलब्ध करून देतोय. हे वाचताना, कदाचित ग्राम्य वाटेल, पण त्या जोकमधल्या लिक्विड ऑक्सिजन ची आठवण येते. " राबर्ट इसको लिक्वीड ऑक्सिजन मे डाल दो. लिक्वीड इसे जीने नहीं देगा और ऑक्सिजन इसे मरने नही देगा"! धर्माची तरी या बाबतीत भूमिका दुसरी काय आहे?

Pages