किम् नरः?

Submitted by Abuva on 21 December, 2022 - 01:21

विमानतळाच्या रस्त्यावर एक मोठा सिग्नल आहे. तिथे दोन्ही बाजूंनी भरपूर ट्रॅफिक असतं. गेल्या वेळेपासून मी तिथे तृतीयपंथी लोकं बघतोय. पैसे मागत असतात. त्याला भीक मागणं म्हणवत नाही. ते काय असतं, तो जोगवा असतो का, त्याच्या मागचं कारण काय, लोकं का पैसे देतात मला काहीच माहिती नाही. तो एक नकोसा प्रसंग असतो एवढं खरं. कोरोनाच्या काळानंतर यांची संख्या फार वाढली आहे. म्हणजे, चौकाचौकात पैसे मागताना दिसतात. ही लोकं दिसली की माझी सर्वसाधारणपणे चिडचीड होते, कशाला खोटं बोलू?

काल चौकात गर्दी जरा जास्त होती. पाच सात वाहनांच्या नंतर माझी गाडी होती. डाव्या बाजूनं दुचाक्या येऊन पुढे जाऊन थांबत होत्या. उजवीकडे एक उंच, नाकी डोळी नीटस, माफक मेक अप केलेला, कुठलाही भडकपणा नसलेला आणि नेटका पदर घेतलेला एक तृतीयपंथी मंद गतीनं चालत, वाट काढत येत होता. त्याच्या डाव्या हातात त्यानं काही नोटा दुमडून धरल्या होत्या, अन थांबलेल्या एकेका गाडी जवळ जाऊन तो उजवा हात पसरत होता. त्याच्या चेहेऱ्यावरचे भाव... सोशीक, गंभीर म्हणावे असेच होते. चेहेऱ्यावर अथवा चालण्यावागण्यात कुठेही थिल्लरपणा, बेरकीपणा, बिलंदरपणा वा गुर्मी जाणवत नव्हती. तो टाळ्या वाजवत नव्हता. आणि कदाचित त्या वेगळेपणामुळे त्यानं माझं लक्ष वेधलं असावं. नेहेमी चटकन नजर फिरवणारा मी, त्याच्याकडे लक्ष देऊन बघू लागलो. होकार देणारे, पैसे देणारे कुणी नव्हतेच. गाड्यांच्या बंद काचांआडून दुर्लक्ष करणारे जास्त. तर दुचाकीस्वार मान हलवून, हात झटकून नकार दर्शवत होते. याच्या चेहेऱ्यावरच्या भावांत कुठेही फरक पडत नव्हता. समजूतदारपणे, तगादा न लावता, त्रागा न करता तो पुढच्या माणसाकडे वळत होता.

तेवढ्यात डावीकडे थांबलेल्या एका दुचाकीवरच्या आईने, तो तृतीयपंथी येतोय हे बघून, पर्स मधून काढून एक नोट मागे बसलेल्या साताठ वर्षाच्या मुलाच्या हातात ठेवली. तो तृतीयपंथी जवळ येताच मुलानं नोट त्याच्या पुढ्यात धरली. तृतीयपंथीयाचा चेहेरा बदलला. गंभीर मुद्रा मंदस्मितात परिवर्तित झाली. मुलानं दिलेली नोट त्यानं घेतली. मला वाटतं नोट मोठी असावी. मला गाडीच्या बंद काचेतून त्या आईनं काहीतरी सांगितल्याचं माझ्या दृष्टीस पडलं. चटकन त्या तृतीयपंथीयानं दुसऱ्या हातातली मोड घेतली अन् मुलाच्या हाती ठेवली. मोकळा झालेला उजवा हात, त्या मुलाच्या डोक्यावर ओझरताच ठेवला. मुलगा त्या स्पर्शाला नवखा नसावा, कारण तो त्या स्पर्शापासून दूर गेला नाही, आक्रसला नाही. आशीर्वचन पुटपुटताना क्षणभरच त्या तृतीयपंथीयाचा चेहेरा उजळला. एक मुग्ध भाव त्या चेहेऱ्यावर उमटला. पुरुषी ठेवणीच्या चेहेऱ्यावर मेकअप पलिकडे मार्दव उमललं. जणू क्षणभरासाठी आदिम, अनादि मातृशक्तिचं चैतन्य, पावित्र्य त्याच्या ठायी संचारलं होतं त्या मुलाला आशीर्वाद द्यायला... झर्रकन तो तृतीयपंथी पुनश्च स्थितप्रज्ञ मुद्रेनं पुढे सरकला.

मी मात्र अभावितपणे नजरेसमोर घडलेल्या या दृष्यानं भांबावलो होतो. ही एक अनन्वित सामाजिक रुढी माझ्यासाठी तशी नवीन नव्हती. पूर्वी पाहिलेला प्रकार होता. तरी त्याचा हा भावाविष्कार खचितच अनोळखी होता. सिग्नलला पैसे मागणाऱ्या, या समाजानं झिडकरलेल्या लोकांकडे तुसडेपणानं बघणारा मी या प्रसंगानं, त्यातल्या गूढत्वाच्या प्रचीतिनं एक क्षण अचंबित, निःशब्द झालो होतो.

आणि परतीच्या प्रवासात त्याच सिग्नलला उलट्या बाजूला मरणाचा मेकअप थापलेला, बारीक डोळ्यांचा, कावेबाज नजरेचा, थिल्लर टाळ्या वाजवत विचकट अंगविक्षेप करणारा दुसरा एक हि... आपलं, तृतीयपंथी होता. हा नेहमीचा अनुभव. म्हणूनच तो अनुभव कायमची आठवण ठेऊन जातो.

या सगळ्या वर्णनात मी 'तो' असा उल्लेख केला आहे. पण त्याची वृत्ती, त्याचा वेष तर स्त्रीचा आहे. त्याला 'ती' ही भूमिका, नव्हे ओळख, हवी आहे. पण बहुसंख्य समाजासारखा मी ती मान्य करायला तयार नाहीये. ते द्वंद्व माझ्या मनात धुमसतंय. काय बिघडतंय मी जर हा उल्लेख स्त्रीलिंगी केला असता तर? परंपरेचा पगडा, ओझं बुद्धीला टाकता येतं पण मनाला पटकन समजवता येत नाही. उत्तर न सापडणाऱ्या प्रश्नांची उकल काळं नाही तर पांढरं असं द्वैत मानणाऱ्या मनाला कशी करता येणार? आणि समाजाचा एक भाग असलेला हा मनुष्यमात्रही 'किम् नर:' ह्याच गुंत्यात स्वत: अडकलेला दिसतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अगदी लहानपणी म्हणजे पाचवीत असेन मी बसने एकटी शाळेत येत जात असे. एकदा शेजारी एक किन्नर बसलेला होता. त्याने मग बोलायला सुरुवात केली - कोणत्या शाळेत जातेस, किती शिकलीयेस वगैरे. मी सुद्धा उत्तर दिले. नंतर माझा स्टॉप येतेवेळी तो काहीतरी स्वतःच्या दुर्भाग्याबद्दल उद्गारला मात्र मला 'खूप शिका' असा आशीर्वाद दिलेला मला नीट आठवतोय.
या लोकांकडे आशीर्वादाशिवाय देण्यासारखं काही नसतं. समाजाची घडी व वर्तणूक अशी आहे ना की त्यांना कोणी नोकरी देत नाही. कशी भरावी पोटाची खळगी त्यांनी. जरा विचार करा (हे कोणालाही उद्देश्युन नाही) . हे लोकंही समाजाचा हिस्सा आहेत.

Exactly सामो. चांगलं शिक्षण, करियर, चांगलं आयुष्य या लोकांनाही हवं असेलच की. प्रत्येक माणसाचा तो मूलभूत हक्कच आहे. पण मी अजूनतरी एकही तृतीयपंथी कुठल्याच ऑफिसमधे काम करताना बघितलेला नाही किंवा कुठल्या शाळा-कॉलेजात शिक्षण घेताना बघितलेला नाही. त्यांना कायम "इतर" च मानत आलोय आपण सगळेच. त्यांचं जग जाणूनबूजून आपल्यापासून वेगळं ठेवलेलं दिसतं.

माझ्या बहिणीच्या नंणंदेला बाळ झालेलं तेव्हा तिच्या बारशाला आलेले ४-५ किन्नर. त्या सगळ्यांनी बाळाला आशीर्वाद दिले तेव्हा त्यांच्या डोळ्यांत अगदी लेखात लिहीलेत तसेच भाव तरळले.

दिल्लीला मी काकां कडे दिवाळीच्या सुट्टीत गेले होते. तिथे शेजार्‍यांना बाळ झालेले तेव्हा एक ग्रुप आलेला. किन्नरांचे नेटवर्क असते व आपापले एरियाज असतात असे ऐकलेले तेव्हा. मग ते कळवतात की इथे इथे मूल होणार आहे, लग्न होणार आहे वगैरे बित्तंबातमी.

पुण्यात वेस्ट एन्ड मॉल मध्ये एका शॉप मध्ये मेकअप सेक्शन मध्ये एक बघितला होता.. बरे वाटले तिला/त्याला असा चांगला जॉब करताना बघून...

लेख छान !

लेख छान आहे.
{
मेकअप थापलेला, बारीक डोळ्यांचा, कावेबाज नजरेचा, थिल्लर टाळ्या वाजवत विचकट अंगविक्षेप करणारा}
मला अशाचाही राग किंवा कोणताही नकारात्मक भाव आता येत नाही. अनेकांना हेही पोटासाठी करावं लागतं.

मध्य प्रदेशात एक तृतीयपंथी महापौर होत्या. दिल्ली मनपात आताच एक नगरसेवक आहे.
तामिळनाडूत एक न्यूजरीडर आहे.
रस्त्यावर वाहतुकीचे नियम समजावून सा़गणारा त्यांचा एक व्हिडियो आहे.
पण त्यांना कोणत्या कार्यालयात काम करताना कधी पाहिले नाही, हे खरंय.

चांगलं लिहिलंय. मुंबईत लोकल ट्रेन्समध्ये येतात. बहुधा बायकांच्याच डब्यात येतात फक्त. त्यांना पाहाताक्षणी, किंवा नुसती टाळी ऐकताक्षणी इतरांच्या चर्येवर जे भाव येतात, किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायला नजरा फिरवल्या जातात, तसं आपल्याबाबतीत कोणी केलं तर आपणही बिथरू. ती माणसंच आहेत हेही अ‍ॅक्नॉलेज करत नाही आपण! सहसा त्यांच्याशी नीट आय कॉन्टॅक्ट करून, सस्मित मुद्रेने 'नाही' म्हटलं तर ते शांतपणे पुढे जातात असा माझा अनुभव आहे.

अवांतर:
मला त्यांच्यापेक्षा भीती लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये हातात घाणेरडं फडकं देऊन गाडीचा फूटबोर्ड पुसण्याची अ‍ॅक्शन करत भीक मागायला लावलेल्या मुलांची वाटते. सहसा त्यांना अपंगही केलेलं असतं. आणि आपण काही देणार नाही म्हटलं तर त्यांना अग्रेसिव्हही झालेलं पाहिलं आहे.
वाईट वाटतं पण या प्रकाराशी कसं डील करायचं हे अजून लक्षात आलेलं नाही माझ्या.

फार पूर्वी बहुतेक मनोहरच्या दिवाळी अंकात या व देवदासी प्रथेबद्दल वाचले होते.
यल्लम्मा देवीचे भक्त आहेत ते. देवीला वाहिलेले.

टंकनकंटाळा.

लेखात उल्लेखलेलं द्वंद्व कित्येकदा वाटून गेलंय. पण आपलं कंडिशनिंग पण असं असतं की अश्या लोकांकडे बघणंही टाळलं जातं. शिवाय मागे १-२ अनुभव असे आलेत की नीट 'नाही' असं म्हटलं तर शिव्याशाप द्यायलाही कमी करत नाहीत. हे अनुभव कदाचित प्रत्येकाचे वेगवेगळे असावेत. मला नक्की ठाऊक नाही. आपण त्यांना माणूस म्हणून स्वीकारणंच नाकारतो आहोत ही टोचणी आहेच. पण अजूनही मला अश्या लोकांशी कसं डील करायचं हे नीटसं समजलं नाहीये.

लेखातला अनुभव खूपच वेगळा वाटला. कदाचित असं सगळेच वागू लागले तर भीती वाटणं कमी होईल आणि अ‍ॅक्सेप्टन्स वाढेल?

परवा एका लग्नात यांच्या दोन टोळ्या आल्या होत्या. तब्बल ११ हजार उकळले वधु वराच्या घरच्यांकडून.
चेहर्‍यावरचे भाव तर असे की बिदागी मागताहेत की खंडणी तेच समजत नव्हते.

मुंबईत लोकल ट्रेन्समध्ये येतात. बहुधा बायकांच्याच डब्यात येतात फक्त.## नाही, पुरुषांच्या डब्यातही.
हल्ली म्हणजे मागच्या 3-4 वर्षात ही संख्या खूप वाढते आहे असे दिसते. एक बातमी अशीही होती की पूर्वी जसे ह्यांचे पंथ असत, त्यांना दीक्षा घ्यावी लागत असे तसे आता नाही. सध्या ट्रेनमध्ये फिरून पैसे गोळा करणे हा व्यवसाय करण्यासाठी हे केले जाते

मला एक शंका आहे.... जरी कुणी 'असा' असला तरी.. साडी नेसणं , टाळ्या वाजविणं वगैरे काय कंपलसरी आहे का? सरळ शर्ट - पँट घालायचे आणि नॉर्मल च वावरायचे. कुणाला कळूच द्यायचे नाही. असे नाही का शक्य?
निदान थोडे तरी सर्व सामान्य आयुष्य नाही का जगता येणार..?

साडी नेसणं , टाळ्या वाजविणं वगैरे काय कंपलसरी आहे का >>> हा खरा प्रश्न आहे.
त्या आड अस्मिता वगैरे विषय तर येत नसतील?

त्यानी केलेला स्पर्श नको म्हणून बहुतांश नाइलजाने पैसे दिले जातात आणि जे नाही देत त्याना तो स्पर्श अनुभव सिग्नल आणि ट्रेन दोन्हीकडे फार विकृत स्वरुपात भोगावा लागतो. एकीकडे बॅड टच च्या व्याख्या आणि उपाय शिकवले जातात तेथे ह्या प्रकाराला का आळा नाही घातला जात ? आपल्या अनुमति शिवाय कोणी आपला मोबाईल मधून गुपचुप फोटो काढल्याचे लक्षात आले तरी मारामारीवर प्रकरण आलेली बघतो तेव्हा ह्या जबरदस्तीने अंगचटीला आलेल्या लोकांना निव्वळ सहानुभूति म्हणून खपवून घेतले जात असेल तर पुढे काही गुन्हा घडल्यास त्यास नक्की जबाबदार कोण ?

आंबट गोड , मला पण हाच प्रश्न आहे खूप वर्षांपासून.. नॉर्मल पुरूष किंवा स्त्री सारखे नाहीत का ते राहू शकत?

खूप गहन प्रश्न आहे. काही पंजाबी लोक त्यांना मुद्दामहून बोलावतात व नवजात मुलांसाठी आशिर्वाद घेतात.
गुरू तेगबहाद्दूर नगर ( पूर्वीचे सायन कोळीवाडा) स्टेशनजवळ दोन पाण्याच्या टाक्या आहेत दोन टेकड्यांवर. तिथे त्यांची मोठी वस्ती आहे. तिकडे मी फिरलोही आहे '७५ मध्ये. खूप कुत्रेही पाळतात ते. त्यांना भावना खूप असतात पण शरीर अपूर्णच असतं. प्रेम हवं असतं. पण यांचं जीवन हलाखीचं असतं. पार्वती यांची देवी, अर्जुन( बृहन्नला) यांचा आदर्श पुरुष,श्रीकृष्ण एक ( अर्ध्या )रात्रीचा नवरा अशा आख्यायिकांवर त्यांचा विश्वास असतो. ते स्वतः ला स्त्री म्हणवतात.
खुशवंत सिंग यांचे Delhi हे पुस्तकही वाचा.
मोगल आणि रजपूत राजांकडे यांना राणीवसा सांभाळायचे, निरोप्यांचे काम मिळायचे. पण आता राजे गेले आणि यांचे महत्त्व ( चुकीचा शब्द आहे) उरले नाही.

>>> सरळ शर्ट - पँट घालायचे आणि नॉर्मल च वावरायचे. कुणाला कळूच द्यायचे नाही. असे नाही का शक्य?
मला फार माहिती नाही या विषयात, आणि कदाचित हा भाबडेपणा असेल, पण कोणी हे आवडीने करत असेल असं वाटत नाही.
न कळत्या वयात जबरदस्तीने खच्चीकरण केलेले लोक असतात, त्याचं कारण धार्मिक असो किंवा अन्य काही, शेवटी भिकेलाच लावलं जातं, इतपतच जुजबी आणि ऐकीव माहिती आहे.

लेख आवडला.

ह्यात इतकं 'ह्यूमन ट्रॅफिकींग' आहे की नैसर्गिकरीत्या जन्माला येणाऱ्या तृतियपंथींची संख्या नेमकी किती आहे नक्की कळत नाही. कारण इतक्या मोठ्या संख्येने असणे संशयास्पद आहे. त्यामुळे एकात एक गुंतलेली अशी भयंकर सामाजिक समस्या आहे एवढेच म्हणेन. चुकीच्या रूढी व अंधश्रद्धा यांनी आपण डिनायल मधे रहातो. हे सगळे असे असण्यात कुणाचा तरी फायदा असेल, त्यांचा किंवा समाजाचा नाही. कुण्यातरी तिसऱ्याचाच. तोपर्यंत आपल्या समाजात असलेल्या अनेक
पृथक-पृथक उपसमाजासह असंच आपापल्या बबलमधे को-एक्झिस्ट करत रहायचं.

चांगलं लिहिलंय.
सेक्शुअ‍ॅलिटी एक्सप्लॉईट होणार असेल तर नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणून कोणीही ती लपवुन क्लॉजेट मध्येच राहण्याचा प्रयत्न करेल. पण प्रथा, परंपरा, धार्मिक पिळवणूक ते ह्युमन टॅफिकिंग यानेच 'हात पसरणे' हे जगातचं साधन बनत असणार. कोण कशाला मुद्दाम असं करेल? दुसरा काही जगायचा पर्यायच उपलब्ध नसेल तरच कोणी करत असतील.

नो थँक्यू हसुन म्हणून, कधी पैसे देऊन तात्पुरता गिल्ट घालवुन डील करतो. ती आपल्या सारखी माणसं आहेत हे डोक्यात ठेवुन वागायचा प्रयत्न करतो. जमतं असं नाहीच.

लेख आवडला.
नैसर्गिक रित्या तृतीय पंथी लोकांची संख्या ही आता बरीच आहे. पूर्वी लोकलाजेसत्व ही लोकं पुढे येत नसावीत. किंवा यातून च लग्न झाली तरी आकर्षण समलैंगिक राहतं. समाज बहिष्कृत करतो म्हणून मूळ प्रवृत्ती दडवायची.
आता लक्ष्मीनारायण त्रिपाठी जी उत्पन्नासाठी नृत्य / कोरिओग्राफी करते(तो) . आणि या लोकांना समाजात मान मिळावा म्हणून प्रयत्न करते. तिचा स्वतःचा प्रवास 'तो' कडून 'ती' कडे 'मी हिजडा मी लक्ष्मी.. ' या पुस्तकात सविस्तर दिला आहे. यात तिचा स्वतःचा पुरुष असून स्त्री का व्हावंसं वाटलं हे प्रकर्षाने लिहिलंय.
याही पेक्षा स्वाती चांदोरकर यांचं 'हिज डे' हे पुस्तक फार डिटेल आहे. प्रत्येक झालेल्या हिजड्याची मनोवृत्ती , शुभकार्यत जाऊन पैसे मागणे, अगदी सेक्स वर्कर म्हणून ही काम करण्यास भाग पडणे, शस्त्रक्रिया करवून हवे ते शरीर मिळवणे. त्यामागची सायकॉलॉजी वगैरे डिटेल विषय आहेत. लेखिकेने नावं बदलून व्यक्तिरेखा आणि त्यांचं संभाषण - सत्यघटना मांडल्या आहेत. आपल्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे यातून मिळायला मदत होते.
एकदा रेस्टॉरंटमध्ये वॉशरूम ला जात असताना त्याच वेळी महिला तृतीयपंथी ही तिथंच आलेला. मी घाबरून न जाताच डबल स्पीड ने मागे आलेले. त्यांनतर मी ही दोन्ही पुस्तके याच कुतूहलापोटी वाचलीत.
पूर्वी कोकणात राहत होते तेव्हा लग्न, मुंज , बारसं असलं की हे लोकं हमखास येऊन भला मोठा आशीर्वाद देऊन पैसे घेऊन जायचे. लोकं ही कुणी अडवत नसत. अगदी दारातल्या दोरीवर बाळांचे कपडे दिसले वाळत टाकलेले तरीही काही शुभ प्रसंग नसला तरी येत.

माझ्या PhD मधल्या एक जुनिअर कम मैत्रिणीनी ट्रान्सजेंडर्सच्या रीप्रोडक्टिव्ह हेल्थवर संशोधन करायचे ठरवले होते, तिचा तसा संशोधनपर प्रस्तावही मंजूर झाला होता. त्याआधी तिने घाटकोपर (सेंट्रल लाईनला घाटकोपर जवळ त्यांचा अड्डा आहे. दिवसभरात वेगवेगळ्या लोकलमध्ये विखुरण्याआधी सकाळी तिकडे भेटतात) मध्ये काही ट्रान्सजेंडर्सला वारंवार भेटून मैत्रीपूर्ण संबंध तयार करून त्यांची संशोधनकार्यात मदत घ्याचे ठरवले होते, तथापि त्यांनीही पुढाकार दर्शवला होता. पण २०२० नंतर सगळंच बदललं, अभ्यासच बारगळला.

एका जटिल प्रश्नावर बराच उहापोह झाला. मूळ लेखापलिकडे जाऊन बरीच चर्चा झाली. अनुभवांचं आदानप्रदान घडलं. मनापासून भाग घेतल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार.

मुंबई - महाराष्ट्रातला अनाम प्रेम परिवार हा गट तृतीय पंथीयांना सुलभपणे जीवन जगता यावे यासाठी कार्यरत आहे. त्यांना सर्वसाधारण कुटुंबात मिसळायला मिळावे यासाठी त्यांना हे लोक घरी बोलावतात. त्यांच्याबरोबर सहभोजन करतात. त्यांनी स्वावलंबी बनावं,पैसे मागू नयेत, ह्यासाठी त्यांचे क्षमतावर्धन आणि कौशल्य वर्धन करणे, वकुबानुसार छोट्या नोकऱ्या शोधून देणे, गृहउद्योग उभारून देणे असे उपक्रम राबवले जातात.

>>>>>>>>>तृतीय पंथीयांना सुलभपणे जीवन जगता यावे यासाठी कार्यरत आहे.
अ तिशय कौतुकास्पद!!! किती तरी लोक मिळुन किती उत्तम कामे करत असतात.

Pages