पावसाळ्यातील प्रवासवेणा

Submitted by Abuva on 13 December, 2022 - 22:40
ST

निघालो होतो कोकणात. रातराणीचा प्रवास चांगला चालला होता. दिवस पावसाचे असले तरी पाऊस पडत नव्हता. गाडी वेळेला धरुन चालली होती. मोजकेच प्रवासी होते. बंगळूर रस्ता सोडून गाडी कोकणवाटेला लागली कधी पत्ताही लागला नाही. हा टप्पा गेलाबाजार मी साताठ वर्षं तरी बघतोय. ना कधी गर्दी, ना कधी काम चालू ना रस्ता बंद. तरीही गुळगुळीत! खड्डे असलेच तर एखाद्या सुकांत चंद्राननेच्या गालावर मोहक स्मिताने खुलणाऱ्या खळीएवढेच!
तो टप्पा संपल्याची वर्दी गाडीने एक सपाटून खड्डा घेऊन केली होती. पण झोप नुस्ती चाळवली गेली होती. नवा कॉन्क्रीटचा रस्ता होता. त्यामुळे रस्त्याच्या कडेने रिफ्लेक्टर्स वगैरे चंगळ होती. रस्ता बरा झालेला दिसतोय अशी पेंगुळल्या मनानं नोंद घेतली. ही वादळापूर्वीची शांतता ठरली. रात्रीच्या एकच्या सुमारास तालुक्याच्या गावी पोहोचलो तेंव्हा बाजार झोपला होता. ते सोडलं आणि एकदम माहौल बदलला. दाटून आलेला मिट्ट काळोख, पावसाळी वातावरण आणि सह्याद्रीचं निबीड अभयारण्य.
दाणकन धक्का‌ बसला. बस प्रत्येक जॉईंटातून हादरली. सारे प्रवासी धडपडून जागे झाले. आणि आपण जरी बुडावरून ढळलो असलो तरी गाडीची चारही चाके जमिनीवरच आहेत हे बघून निःश्वसले. गाडीचा सांधा अन् सांधा वात झाल्यासारखा हेंदकळला होता. यष्टीच्या ज्या म्हणून कोणत्या भागातून जे कोणते आवाज येणं शक्य होते ते सगळे आले. आणि प्रवासाच्या पुढच्या पर्वाला सुरूवात झाली. तो धक्का पहिलाच होता म्हणून एवढा जाणवला, एवढेच! कारण पुढचे दोन तास हेच कर्दनमर्दन चालू होते.
पाण्यानं भरलेले खड्डे. मग डायवरचा अंदाज चुकायचाच. जरा लहान खड्डा असेल म्हणून चाक घालावं तर तो जीवघेणा गचका द्यायचा. चक्का, ॲक्सल खड्ड्यात गेले की गाडी वाकायची, झुकायची. मग पाटा गाडीला हे जोरात उलटा झटका मारायचा का गाडीचं नाक उर्ध्वदिशेने. तंवर दुसरं चाक तिसऱ्या खड्ड्यात गेलेलं असायचं, ते आता फटका द्यायचं. इंजिन गाडीला पुढे रेटतच असायचं अन् मग मागची चाकं त्या खड्ड्यात हापटायची. पुढच्या चाकांचा शॉक पोहोचे पर्यंत मागच्या चाकांनी हबका दिलेला असायचा. प्रवाशी खिडकीच्या दांड्याला, पुढच्या सीटला, हॅन्डलला, जिथे जमेल तिथे पकडून बूड जागच्या जागी ठेवण्याची कसरत करत होते. पण चारी चाकांनी आपापली स्वतंत्र लढाई चालू केल्यानं पार तिंबून निघत होते. डावीकडच्या मागच्या चाकाचा आणि माझ्या शेजारच्या खिडकीचा खास ऋणानुबंध होता. ते खड्ड्यात आपटले की ह्या खिडकीला चेव यायचा आणि ती कल्पान्ताचा कल्लोळ करायची. मागे उजवीकडे आख्खी फ्रेमच जणू रणदुंदुभी अन् भेरींचा गजर करत होती. प्रत्येक खड्डाघातात सगळ्या खिडक्या जिवाच्या आकांतानी विव्हळून उठायच्या. खिडकीच्या काचा ब्रॅकेटपासून, ब्रॅकेट फ्रेम पासून, फ्रेमा चौकटीतून, चौकट बॉडी पासून आणि यष्टीची बॉडी तर या भूतलापासून मुक्ती मिळवण्याच्या खटाटोपात होती! पावसाच्या सरी कोसळताहेत, कृष्णपक्षातली रात्र कोंदाटून आलेली, झाडांच्या वेड्यावाकड्या सावल्या आणि हे भयाण नर्तन-रूदन-क्रंदन... जणू रूद्राच्या तांडवाला भूतप्रेतगणांचा तांडा बीभत्स अंगविक्षेप करत, भेसूर कोलाहल करत साथ देतोय!
चढावर खालच्या गिअरमध्ये, कमी वेगात, समोरून येणारे ट्रक बापुडवाणे दिसत होते. या खड्ड्यांशी झालेल्या युद्धात जणू पराभूत होऊन शस्त्र टाकून थकल्या भागल्या सैनिकांसारखे पाय ओढत येत होते. खरं सांगायचं तर शहाण्या माणसानं स्वताच्या मालकीची गाडी या रस्त्यावर आणूच नये. गाडीचे एवढे हाल करणं आपल्याला जमणार नाही, आणि परवडणारही नाही. झालंच तर गाडी आपल्यावर बलात्काराचा आरोप लावायची हो! ही म्हामंडळाची बस, आणि काॅन्ट्रॅक्टवरला डायवर. त्याला गाडीचं सोयर नाय का सुतक. त्याचं एकमेव ध्येय - वेळेत गाडी स्टॅन्डात लावायची. तो बिनधास्त होता. पाऊस, पाणी, पाशिंजर गेले (शब्दश) खड्ड्यात, तरी हान तिच्याहैला... ती बसही धन्य, जी रोज हे असे जीवघेणे धक्के खात खात पंधरा-वीस वर्ष सेवा देते. आणि ती बस बांधणारे तर त्याहून धन्य!
यथावकाश गाडी स्वःताच्या चारी चाकांवर, सगळ्या पाशिंजरांसकट घाटमाथ्यावरल्या स्टॅन्डला पोहोचली. सगळ्यांनी एक निश्वास सोडला. बोंबलायला च्यापाण्याची समस्त हाॅटेलं बंद होती. रक्तदाब वाढला होताच, मग काय, डोस्कंच फिरलं. ज्या कुण्या सरकारी सायबांच्या, काॅन्ट्रॅक्टरांच्या, कारकूनांच्या आणि मायबाप आमदार-खासदारांच्या कृपेने ह्या रस्त्याची अशी चाळण झाली होती, त्या हतवीर्य, दासीपुत्रांच्या समस्त घराण्याला क्लैब्य येवो असा तळतळाट व्यक्त करत पुन्हा बशीत चढलो.
मागाहून कंडक्टर-डायवर दुक्कल चढली. आन् बघतो तर काय.. दातखीळच बसली. डायवर कंडक्टराच्या जागी बसला, अन कंडक्टरभौ श्टीरिंगवर की. त्यानं तिकडे किल्ली मारलीन् गाडीला आन् हिकडं माझी शुद्धच हरपली, आयशपथ सांगतो! त्या रातीला म्हणे घाटमाथ्यावर म्हणे कोणी इसम म्हणे कपडे फाडत बोंबलत फिरत होता म्हणे. कोण व्हता काय की बाॅ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खिडकीच्या काचा ब्रॅकेटपासून, ब्रॅकेट फ्रेम पासून, फ्रेमा चौकटीतून, चौकट बॉडी पासून आणि यष्टीची बॉडी तर या भूतलापासून मुक्ती मिळवण्याच्या खटाटोपात होती! >>>> हे वाक्य पु लं च्या लिखाणशैली शी साधर्म्य साधणारे वाटते.

डावीकडच्या मागच्या चाकाचा आणि माझ्या शेजारच्या खिडकीचा खास ऋणानुबंध होता. ते खड्ड्यात आपटले की ह्या खिडकीला चेव यायचा आणि ती कल्पान्ताचा कल्लोळ करायची. मागे उजवीकडे आख्खी फ्रेमच जणू रणदुंदुभी अन् भेरींचा गजर करत होती.

णि हे भयाण नर्तन-रूदन-क्रंदन... जणू रूद्राच्या तांडवाला भूतप्रेतगणांचा तांडा बीभत्स अंगविक्षेप करत, भेसूर कोलाहल करत साथ देतोय!
>>>>>>>> अगदी अगदी