पुण्यातल्या नवले ब्रिज येथे नेहमी होणारे अपघात

Submitted by शाखाहारी पिशाच्च on 21 November, 2022 - 09:33

विषय सर्वांनाच माहिती आहे. तरी कुणाला माहिती नसेल तर थोडक्यात.
पुण्यात काल रात्री एका ट्रेलरने ४७ वाहनांना धडका दिल्या. हा ट्रेलर सातार्‍याहून मुंबईच्या दिशेने जात होता. आंबेगावच्या बोगद्यातून तीव्र उतारावरून येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि नर्‍हे इथे स्मशानभूमीच्या वरच्या हायवेच्या भागात जाम मुळे थांबलेल्या वाहनांना त्याने धडाधड धडका देत २०० ते ४०० मीटर अंतर कापले. यानंतर ड्रायव्हरने त्याची गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि तो पळून गेला. त्यामुळे नक्की काय झाले याचा अंदाज अद्याप पोलिसांना आलेला नाही. पोलिसांनी धडकगाडीचे ब्रेक्स तपासले का हे समजलेले नाही. दुर्घटनाग्रस्त वाहनांमधील ७ ते ८ लोक गंभीर जखमी आहेत. यापेक्षा जास्त असू शकतील.

या भागात नियमित अपघात होत असतात. कधी छोटे छोटे तर कधी एकदम मोठा. दर महिन्याला इथे जीव जात असतात. पण फक्त सुरक्षेची तत्त्वे जाहीर केली आहेत असे सांगितले जाते. बोगद्यातून जो तीव्र उतार लागतो तिथे एकतर डिजाईन फेल्युअर झालेले आहे. किंवा डिजाईन बाजूला ठेऊन प्रत्यक्ष साईटवर ठेकेदार आणि मुकादम यांनी स्वतःची पिढीजात अभियांत्रिकी राबवली असावी. कारण याच कारणासाठी खंबाटकी घाटातला बोगदा आता इतक्या लवकर वाहतुकीला बंद करण्यात येणार आहे. तिथे पर्यायी बोगद्याचे काम चालू आहे.
इथेच मुंबईकडून येताना सिंहगड रस्ता ओलांडून पूल संपला कि डावीकडे जाणारे आणि सिंहगड रस्त्यावरून कोल्हापूरला जाण्यासाठी हायवेवर चढू पाहणारी वाहने यांची टक्कर होता होता राहते. पोलीस पुलाखाली पैसे खात बसलेले असतात. इथे सिग्नल आणि पोलिसांची गरज आहे. नर्‍हे गावातून मुंबईकडे जाणारी वाहने विरूद्ध बाजूला हायवेवर चढतात तेव्हां मागून येणार्या वाहनांना अंदाज येत नाही.

सरकार, प्रशासन यांचा गलथानपणा तर आहेच पण लोकही भलतेच बेफिकीर आणि असंवेदनशील आहेत. वाहकांची बेदरकार वृत्ती हे सुद्धा अपघाताचे एक कारण आहे ज्यावर बोलले जात नाही.

याशिवाय पुण्यासारख्या शहराची एव्हढी मोठी लोकसंख्या सामावून घेण्यासाठी तयारी झालेली नसताना त्याची झालेली बेसुमार वाढ हे ही अपघातांचे, वाहन कोंडीचे आणि मनःस्तापाचे कारण आहे. मुंबई पुणे पट्ट्यात बेसुमार वाढणार्‍या मध्यम शहरांची वाटचाल आता अनियंत्रित महानगरांकडे होत आहे. त्यामुळे या १८० किमीच्या महामार्गावर कोट्यवधी वाहने येत आहेत. ती वाढतच जाणार आहेत. कितीही पदरी रस्ते बांधले तरी ते अपुरेच पडत आहेत. शिवाय हे नवे महामार्ग इथे भरवस्तीच्या ठिकाणी खुले होतात तिथे वाहने जाण्यासाठी आणि येण्यासाठी थांबून राहतात. त्यामुळे मोठ मोठे जाम लागताहेत.

अशात एखादं नादुरूस्त वाहन आलं तर काय होईल ते कालच्या घटनेने दाखवले आहे. याचा विचार नियोजनात करता येतो.. तसा तो केला गेलाय का याची कल्पना नाही.

महाराष्ट्रातला पुणे नासिक मुंबई हा त्रिकोण अपघातांचे माहेरघर बनू पाहतोय.
या रस्त्यांचे काम कधी पूर्ण होणार आणि कधी अपघाताविना वाहने धावणार हे गडकरींनाच ठाऊक.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतात अपघात होण्याचे सर्वात मोठे कारण.
अकुशल ड्रायव्हर.
वाहतुकीचे नियम माहीत नसणारे . मानसिक स्थिती ठीक नसणारे, शारीरिक क्षमता नसणारे पण भारतात आरामात वाहन परवाना मिळवतात.
सर्व नियम काटेकोर पाळले तर ८०,, टक्के driver हे गाडी चालवण्याच्या लायकीचे नाहीत हे सिद्ध होईल .

रोज रस्त्यावरती त्याची प्रचिती येते.
अप्पर दिप्पर कधी वापरावा हे चालकांना माहीत नसते.
Lane चे महत्व चालकांना कळत नाही.
सिग्नल तोडणे हा त्यांचा हक्क च असतो.
वेगाची मर्यादा पाळत नाहीत.
अशी अनेक अडाणी पणाची लक्षण रोज रस्त्यावर दिसतात

सर्व नियम काटेकोर पाळले तर ८०,, टक्के driver हे गाडी चालवण्याच्या लायकीचे नाहीत हे सिद्ध होईल . >> अगदी बरोबर.
वाट दिसेल तशी रिक्षा दामटणारे रिक्षावाले , दोन्ही पायांचा लॅण्डीग व्हील / ब्रेक म्हणून वापर करणाऱ्या एक्टीव्हा वाल्या , नवशिके हौशे कार चालक , कशीही येडया सारखी बाईक चालवणारे दादा भाई मंडळी ... ही यादी बरीच मोठी होईल.