अनाथा (विधवा) मातेस तिच्या मुलाच्या लग्नकार्याचे विधी करण्यास शास्त्रानुसार परवानगी आहे कां?

Submitted by यक्ष on 20 November, 2022 - 00:24

मित्रपरिवारात एक नवीन प्रश्न उद्भवलाय...

काही कालावधीपूर्वी माझा मित्र दुर्दैवाने अपघातात गेला. त्याच्या मुलाचे लग्न उपयोजीत आहे. वर वधू परदेशी स्थाईक असले तरी आई भारतात आहे व लग्न हिंदू पद्धतीने करणे आहे. मित्राच्या मुलाला आईने सर्व लग्नविधी स्वतः करावे अशी त्याची इच्छा आहे.

अनाथा (विधवा) मातेस तिच्या मुलाचे लग्नकार्य करण्यास (हिंदू) शास्त्रानुसार परवानगी आहे कां?
नसल्यास शास्त्राने काय पर्याय सुचवले आहेत?
सद्यस्थितीत (भावना प्रंमाण मानून व कालानुरूप बदल करायचा असल्यास पण दोन्हीत समतोल साधून ) ते कसे करता येईल ह्याविषयी आपले मत जाणून घ्यायला आवडेल. कुणाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास फारच उत्तम.

धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपला हिंदू धर्म फार लवचिक आहे त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार नक्कीच मार्ग काढता येईल. किंबहुना त्यांच्या इच्छेनुसार मार्ग काढणारे पुरोहितच बघावे हे इष्ट.

हो असं उदाहरण पाहिलं आहे. नवऱ्या मुलाची आई विधवा होती व तिने मुलाच्या लग्नातले सर्व विधी केले होते. (मुलीकडचे लोक जरा जुन्या विचारांचे असल्यामुळे मुलाचा धाकटा काका- काकूच देवक ठेवणार असं त्यांना वाटत होतं. पण माझ्या आईला विधी करू देणार नसाल तर मी कोर्ट मॅरेजचा पर्याय ठेवतो अशी धमकी मुलाने दिल्यावर ते तयार झाले.)
(ही जुनी घटना आहे. आता त्या जोडप्याला शाळेत जाणारा मुलगा आहे व उत्तम संसार चालू आहे. आईने लग्नविधी केल्यामुळे काही प्रोब्लेम आलेला नाही.)

त्याचप्रमाणे customized विधी - म्हणजे जे विधी discriminate करणारे वाटतील ते skip करून मोजकेच विधी करणं असा आता ट्रेंड आहे. उदा- अलीकडे पाहिलेल्या एका लग्नात कन्यादान, जावयाची पूजा हे विधी करायचे नाहीत असा निर्णय जोडप्याने आधीच घेतला होता व त्याला दोघांच्याही घरच्यांचा पाठिंबा होता.

हिंदू धर्म लवचिक, काळासोबत बदलणारा असल्याने इतकी flexibility तर हवीच.

आपला हिंदू धर्म फार लवचिक आहे त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार नक्कीच मार्ग काढता येईल. किंबहुना त्यांच्या इच्छेनुसार मार्ग काढणारे पुरोहितच बघावे हे इष्ट.
>>>>

+७८६

फक्त उपायाच्या नावाखाली अमुकतमुक खर्चिक विधी करणारे कोणी पकडू नका.

जवळच्या नात्यात लग्न ठरलंय. मुलगा लहान असताना वडील गेले. आईने उत्तमरित्या भूमिका पार पाडल्या. जवळचा नातेवाईक असा एक चूलत भाऊ आहे ज्याचा फार संबंध आला नाही. तो सगळे विधी करणार आहे जे आम्हाला कुणाला पटलं नाहीये पण मुलाला व त्याच्या आईला पटतंय. ज्या आईने एकल पालकत्व निभावलंय ... मुलाला उच्चशिक्षीत केलंय तिला हक्क सम्मान देऊ पहातोय काही बदल घडू इच्छीतो .... काय करणार?
फक्त उपायाच्या नावाखाली अमुकतमुक खर्चिक विधी करणारे कोणी पकडू नका. >>>>> + १

विधि म्हणजे काय?
तर पूर्वी लहानपणी अज्ञान असता लग्न करवत तेव्हा आईबाप किंवा मोठे नातेवाईक जबाबदारी घेत. आता सज्ञान असता कुणाचीच गरज नसते.

कोर्टात लग्न असो किंवा धार्मिक/वैदिक असो
मुख्य भाग हा
१) नोटीस /ज्ञापन /निमंत्रण पत्रिका
कोण कोणाशी कधी कुठे लग्न करणार आहे.
२)साक्षीदार
मोठे दोन दोन कमीतकमी दोन्हीकडचे,/ देवा ब्राह्मणांच्या /अग्नीच्या साक्षीने
३)संमती
स्वतः मुलगा मुलगी ची किंवा त्यांच्या वतीने मोठ्यांची.
बाकी भाषा कोणतीही चालते.
४)गावांत पंचासमक्ष.
विधि म्हणजे हेच असते.

आमच्या घरात विधवा आईने लग्नाचे सर्व विधी करणे हे झाले आहे. एकदा आमच्या बाजूने १० वर्षांपूर्वी आणि एकदा व्याही मंडळींच्या बाजूने २६-२७ वर्षांपूर्वी. दोन्ही वेळेला लग्न लावणारे गुरुजी निवडताना हे आधी सांगितले होते म्हणजे उगाच आयत्यावेळी गुरुजींना सरप्राईझ, आक्षेप असे काही नको. ज्या गुरुजींना यात काही नाविन्याचे आहे असे वाटले नाही त्यांची निवड केली.

वीस पंचवीस वर्षांपुर्वी म टा मधे एक लेख वाचलेला. मुलीचे बाबा नव्हते आणि ती आईनेच सर्व विधी करावेत ह्या मताची होती, मुलाकडच्यांनी तिच्या मताचा आदर केला आणि सर्व तिच्या आईने केलं. लेख बहुतेक त्या आईनेच लिहिलेला असं आठवतंय.

आमच्या परिचयाच्या एका कुटुंबात 1995 सालीच हे घडले आहे. मुले प्राथमिक शाळेत असतानाच वडील वारले. त्यांच्यानंतर आईनेच मुलांना अतिशय उत्तमरित्या वाढवले. दोन्ही मुलांना डॉक्टर केले. दोघांच्याही लग्नात आईनेच सर्व विधी केलेत. त्यामूळे हे चालेल का वगैरे विचार मनातही आणि नका

अनाथा (विधवा) मातेस तिच्या मुलाच्या लग्नकार्याचे विधी करण्यास शास्त्रानुसार परवानगी आहे कां? >>> मनात ही शंकाच येऊ नये, निसंकोचपणे करावे.

स्त्री स्वतःच्या पोटात गर्भाला ९ महिने सांभाळून गर्भावस्थेतील व प्रसूतीदरम्यान अनेक हालअपेष्टा सोसून बाळाला जन्म देतो (त्याचबरोबर तिचाही आई म्हणून पुनःर्जन्म होतो). मग ती विधवा असो वा एकल माता, तिच्या मुलांच्या लग्नात तिला सर्व विधी करू शकते. शास्त्र काय आहे हो! माणसांनीच लिहिले आहे. आणि वेळेनुसार ते बदलले पाहिजे, नाहीतर त्यांच्या उपयोग काय?

हिंदू धर्म हा लवचिक आहे.कट्टर पना हिंदू धर्मात आणि हिंदू धर्मीय लोकात नाही.
त्या मुळे त्यांनी विधी केले तरी चालतील.
समाज पातळीवर कोणी विरोध करणार नाही

असा विचार तरुण पिढी करत असेल तर त्या विचारांचे कौतुक वाटते.
सर्व धार्मिक नियम आपण आपल्या सोईनुसार बनविले आहेत. धर्म यात अडथळा ठरणार नाही.

माझ्या स्वतः च्या लग्नात माझे सगळे विधी आई ने केले होते १७ वर्षां पूर्वी. गुरुजी ना आधी सांगितले होते. प्लस नवऱ्याला आणि त्याच्या घरी सुद्धा सांगितले होते कि आईच सगळे विधी करेल म्हणून. माझे बाबा सुद्धा नव्हते लग्नाच्या वेळी.ज्या आई ने बाबानंतर आम्हाला वाढवले तिला हा हक्क ना देता दुसऱ्या कोणाला देणं मला बरे वाटले नाही.

इथे गोर्‍या बायका, दोनदा लग्न करून घटस्फोट करून तिसरे लग्न करतात नि विधवा होतात, पण मुलाने जर हिंदू मुलीशी लग्न करायचे ठरवले, तर तिला गंमत म्हणून नउवारी साडी नेसून, मंगळसूत्र व कुंकू लाऊन दारू पिऊन मुलाच्या लग्नात नाचायचे असते.
मग भारतात निदान या आनंदाच्या प्रसंगी विधवेने विधीच काय, नाचायला सुद्धा चालेल. बिचारा नवरा अपघाताने मेला असेल तर त्या बाईचा काय दोष?

नन्द्या
नवरा कशाने वारला हा मुद्दाच नाही!!

लिली फार छान वाटले तुमचा प्रतिसाद वाचून. अशी उदाहरणे जितक्या जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचतिल तितक्या गतिनी ह्या विषयाभोवती निर्माण झालेला टॅबु दुर व्हायला मदत होईल.

@ यक्ष, तुम्ही हे उदाहरण नक्की नवरा मुलगा आणि संबंधित मंडळिंना सांगा.

आमच्या नात्यात, कुटुंबात ( कट्टर पारंपारिक ते आधुनिक विचारसरणी अशी मोठी range आहे व शहरी - निमशहरी राहणे ) अशी उदाहरणे आहेत.
मामेसासूबाईंनी मुलगा व मुलगी दोघांच्या लग्नाचे विधी पतीच्या निधनानन्तर स्वतःच केले, त्या पूर्वी जसे टिकली मंगळसूत्र घालीत असत तसे अजूनही घालतात.
आतेबहिणीने तिच्या आईवडिलांना स्वतः अग्नी दिला.
सासुबाई सासऱ्यांच्या निधनाच्या दुःखातून बाहेर आल्यानन्तर हळदीकुंकू व लग्नाच्या वरातीत नाचणे हौसेने करतात.
आणि मुख्य म्हणजे वरील गोष्टी सामान्य, सर्वसाधारण आहेत अशीच भावना असल्याने त्याबद्दल कुटुंबात चर्चा, gossip ऐकलेल नाही. ही सर्व उदाहरणे गेल्या २० वर्षांतली आहेत. कालानुरूप हा बदल सहज झाला आहे. अशी अजूनही उदाहरणे आहेत.
कुठलाही किंतु न बाळगता या बाईसुद्धा जरूर लग्नविधी करतील अशी आशा आहे.

शास्त्र म्हणजे परंपरा.
नवरा मेल्यावर केस पूर्ण काढणे,पांढरी साडी नेसणे,कोणत्याच शुभ कार्यात सहभागी न होणे .
अशी परंपरा होती.
तो काळ वेगळा होता तेव्हाच समाज वेगळा होता.समाज रचना वेगळी होतो,आर्थिक गणित वेगळी होती.
म्हणून ती चुकीची पद्धत होती,मागास विचार होते असले मत मी तरी व्यक्त करणार नाही.
आज नवरा मेल्यानंतर केस काढण्याची गरज नाही, पांढरी साडी नेसण्याची गरज नाही,शुभ कार्यात सहभाग घेण्यास कोणी हरकत घेत नाही..कारण आता स्थिती बदलली आहे.
माणूस शहरात राहतो की खेड्यात हा प्रश्न गौण आहे..शहरात राहणारे आताच्या काळाशी सुसंगत वागतात आणि खेड्यातील वागत नाहीत..ही अंध श्रद्धा आहे

आनंदाने व समाधानाने सांगू इच्छितो की आम्हाला कालानुरूप विचारसारणीस अनुसरून व मुलाच्या इच्छेने त्याचे सर्व लग्नविधी त्याची आई सन्मानाने व कुठलीही तडजोड न करता कसे करावे ह्याचे एका जाणकार गुरुजींकडून योग्य मार्गदर्शन मिळाले. त्याप्रमाणे सर्व आयोजन करीत आहे. मित्रपत्नीचा योग्य सन्मान होतो असल्याने मलापण समाधान वाटते आहे.
आपणा सर्वांच्या योग्य व सुस्थानी प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद व तसेच मायबोलीचेपण (हा प्रश्न विचारून त्यावर मंथन करण्याची सोय उपलब्ध करून दिल्याबद्द्ल!).

हे त्या आई वर च सोडावे .उगाच genealization करू नका.
प्रतेक कुटुंबातील कौटुंबिक संबंध वेगळे असतात ,प्रतेक स्त्री चे नवऱ्या विषयी आस्था वेगळ्या असतात,प्रतेक व्यक्ती चा स्वभाव वेगळा असतो .
त्या विधवा आई नीच विधी केले तर ते योग्य बाकी लोकांनी केले तर ती बाई परंपरेची शिकार असले काही निष्कर्ष काढू नका.
फक्त एकच त्या संबधित व्यक्तीची जी इच्छा असेल तिचा मान राखणे बस इतकंच सर्वांनी पाळायचे आहे.

कोणत्याही प्रश्नाला अनेक कंगोरे असतात.इथे प्रिंट केल्यासारखी एकाच पद्धतीची मत येत होती.
ती योग्य च होती.
पण स्वतःला सुधारणावादी,आधुनिक दाखवण्यासाठी लोक तसे व्यक्त होतात.
मी दुसरी बाजू पण दाखवली.
पूर्ण विरुद्ध जाणारे पण समाजात आहेत.