And the shoe fits

Submitted by Zara Tambe on 12 November, 2022 - 04:58

And the shoe fits

माणसाला विविध प्रश्न असू शकतात पण हे जरा अतीच झालं. तसं काहीच अती नसतं. म्हंटले तर अती नाहीतर जरा जास्ती.
काही केल्या तिला कुठलीच चप्पल, बूट पसंतीस येईना. तिला काय तिच्या पायाला म्हंटले पाहिजे. गेले काही दिवस तिची टाच दुखत होती. तशी चालायची तिला फार आवड. लांब लांब फिरतच राहावे हे तिचं स्वप्न. कानात हेडफोन कधी असत,कधी नसत. पण निसर्गाचं भरभरून देणं आणि अगदी दिवसाच्या प्रत्येक वेळी बदलणारे त्याचे ऋतू ह्याचं तिला अप्रूप वाटत असे. मनाचे पण ऋतू असतात आणि त्यांचं आणि दिवसाच्या ऋतुंच घट्ट साटलोट आहे असं तिचं मत होतं.
पहाटे पहाटे थंडीत छान गुरगुटून वॉकला बाहेर पडायचं आणि सूर्य दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करायची हा एक दिवसाचा अविभाज्य भाग होता. रोजचे कामाला जाणारे कामकरी, आरामात गप्पा मारत चहाचे घोट घेणारे आजोबा लोक, फिटनेस प्रेमी( फ्रिक सुद्धा) आणि त्यांना गरजेनुसार पुरवणारे विक्रेते ह्यांचं दर्शन झालं की सकाळ कशी बरोबर सुरू झाली वाटायचं तिला. म्हणजे भाजी, फुलं,मोड आलेली मटकी,कडधान्ये पासून ते दुधीचा किंवा इतर कसले कसले ज्यूस विकणारे, मसाला, खांडसरी, गुळाच्या चहाचं नॉन स्टॉप आधण ठेवण्याचं पुण्यकर्म करणारे टपरीवाले, समोसे तळणारे . हे सगळं सगळं खूप मस्त वाटे. शाळेला जाणारी पिल्लं,त्यांना सोडणारे आजी,आजोबा नाहीतर तेव्हडाच वेळात वेळ काढून आलेले बाबा किंवा आई. हे चित्र कधी संपूच नये असं तिला वाटे. ह्या चित्राच्या परत परत अनुभवलेल्या मेमरीला जागृत ठेवणे आणि त्याचा एक सूक्ष्म का होईना भाग होणे हे तिचं रोजच्या लवकर उठण्याचं कारण होतं.
तशी रोज लवकर उठायची इतरही कारणे जी आम दुनियेला असतात ती होतीच. मुलं लहान होती तेंव्हा जास्तच होती. पाणी भरणे, बाई यायच्या आता आवरणे, दुपारच्या जेवणाची व्यवस्था करणे,सासूबाईंच्या नाश्त्याची, डब्यांची व्यवस्था करणे, पिल्लांच्या अचानक लास्ट मिनिट आठवलेल्या होम वर्क वर एखाद्या सुपर वुमन प्रमाणे मदत करणे, कॅस्पर बोकोबाला लाडकवून खाऊ घालणं ( हे मात्र आवडीचे) , तिचा आणि आणि मनोजाचा डबा अशीच आणि बरीच जी रोजची म्हणता येतील अशी आवश्यक पण कंटाळवाणी कामे करणे. हे सगळं करून नऊला ऑफीसला टच झालं की चला आजची लढाई जिंकली,उद्याचं उद्या हा विचार मनात येई.
बऱ्याचदा हे सगळं कुणाला तरी outsource करून मस्त लाँग वॉक घ्यावेत आणि मनसोक्त भटकंती करावी असं तिला तेंव्हा वाटत असे.
पण जसं की काळ स्प्रिंट मारत असल्याप्रमाणे मुलं भरकन मोठी झाली आणि कधी भूरकन उडाली ते कळलंच नाही. मधल्या काळात सासूबाईंचं काही पडल्याचं निमित्त झालं आणि त्या गेल्या. घर कसं रिकामं रिकामं झालं. आता खर तर दोघच होती आणि वेळही होता. आता कुणाचे डबे नव्हते की डब्यात हे दे ते दे म्हणून डिमांड नव्हत्या. मनोज त्याच्या कामात आणि ती तिच्या. असं रेल्वेच्या रुळागत आयुष्य संथ वाहते कृष्णामाईचं चालू होतं.
तिनेही योगा क्लास, आठवड्यातून दोनदा झुंबा क्लास आणि मध्ये वॉक असं स्वतःच रूटीन केलं होतं आणि ऑफिस व्यतिरिक्त मैत्रिणी, त्या दोघांचे फॅमिली फ्रेंड्स होतेच. पण ते वीकेंड रूटीन. हो रूटीनच.
असं सगळं छान बोअरिंग व्हायला लागले होते तिला. तेव्हड्यात मनोजच्या आत्याबाई चार दिवस येणार म्हणून फोन आला. एक काहीशी उत्सुकता, आतुरता आणि थोडीशी भीती निर्माण झाली. ह्या आत्या फार शिस्तीच्या होत्या. त्यांना सगळे वेळच्या वेळी, ज्या त्या पद्धतीचंच लागे आणि त्या बोलायलाही कमी करत नसत. त्यांची वाहिनी म्हणजे मनोजची आई जोवर होत्या तोवर त्या ही आघाडी लढत. सुनेला त्यांनी जराही ह्याची धग लागू दिली नव्हती. पण आता जरा परिस्थिती वेगळी होती. सासूबाई नव्हत्या, मनोज कामानिमित्त बाहेर आणि गेल्या वर्ष दोन वर्षात माणसांची सवयच गेली म्हणा ना असं झालं होतं.
तिला एकदम टेन्शन आलं.सगळे क्लासेस, वॉक आणि वीकेंड आत्याबाईना द्यावे लागणार ह्याने जरा चिंताही वाटली.
मनोज ला सांगितलं तर म्हणतो कसा की उगाच टेन्शन घेतेस म्हणून. ह्याला काय जातंय म्हणायला. ह्याला थोडी ना उठ बस करायची. वरती आत्या लाड करेल ते वेगळंच.असे आणि बरेच विचार तिला भंडावून सोडू लागले.
त्या दिवशी रविवार होता. आत्या यायला एक आठवडा बाकी होता. चला उठून मार्केट ला जाऊन आठवड्याची भाजी, फळं आणावी म्हणून ती उठली. तर काय सगळे सांधे जाणवतील अशी परिस्थीती. हात, पाय सगळे दुखायला लागले. ताप आला असेल म्हणून मनोजने थर्मामीटर आणला पण ताप नव्हता. पण तिला उठवेच ना. मग काय त्यानेच चहा केला. नाश्ता स्विगी करायचं कामही केलं. तिनेही हळू हळू उठून सुरुवातीचं आवरलं. इडली सांबार आणि कॉफी घेऊन ती परत आडवी झाली. एक क्रोसिन पण घेतलेली बरी म्हणून तीही घेतली.
असाच कसा तो दिवस गेला. अजूनही जॉइंटस दुखतच होते. त्यात टाच पण दुखू लागली. इतकी की पाय टेकवेना.
रविवार म्हणून डॉक्टर पण नव्हते. असेल काही, जाईल उद्या म्हणून विचार झटकला. विचार झटकला तरी दुखणं थांबेना. दुसऱ्या दिवशी तिने सुट्टीच काढली. डॉक्टरांना दाखवायला गेली. सगळे चेकिंग झाल्यावर डॉक्टर म्हणाले होतं असं ह्या वयात. कॅल्शिअम , बी १२ च्या गोळ्या सांगितल्या. दुखणं कमी व्हावे म्हणून इतर ही गोळ्या दिल्या.
आतापर्यंत तिच्या मनाची पुरती खात्री पटली की तिचं आता वय झालं आहे आणि हे असं होणारच. मैत्रिणींना, बहिणीला फोन झाले. सगळ्यांना कसं त्रास वाढला ते इत्यंभूत वर्णन झालं. डॉक्टर हेही म्हणाले होते की मऊ चप्पल घाला. फ्लॅट्स आता वापरू नका. तिचे आवडीचे सँडल, साडी नेसल्यावर घालायच्या फ्लॅट चपला ह्या सगळ्यांना बाय बाय म्हणावे लागणार म्हणून दुःख झाले तिला. तरी असू देत म्हणून टाकायच्या नाहीत ठरवले. मग आता नवीन चप्पल घ्यायला हवी. मऊ वाली..म्हणून मोर्चा चपलेच्या दुकानात वळवला. टाच दुखतीय मऊ चप्पल दाखवा सांगितलं. सगळ्या चपला बेकार होत्या. मऊ होत्या पण सुंदर अजिबात नव्हत्या. पण काय करणार. अडला नारायण. घेतली त्यातील एक. पायाला जरा मऊ वाटली. थोड्या वेळ चालून जरा बरं वाटलं. तसेही जास्त चालवत नव्हतच.
अशा रीतीने एक चपला, सपाता, ऑर्थोवाल्या घरी आल्या. त्याने जरा बरे वाटू लागले. गोळ्याही काम करत होत्या. असे पाच दिवस गेले. आता आपण बरे झाले आहोत आणि वॉकला जायचे तिने ठरवलं. पायात नेहमीचे बूट घातले आणि बाहेर पडली. एक शंभर दोनशे पावले चालली असेल नसेल तर परत टाच ठणकू लागली. आली परत. आता बाहेर जायलाही वेगळे बूट घ्यायला हवेत.
पण नकोच. जरा थांबून मग बरं वाटले की चालायला परत सुरू करू असं तिने ठरवलं.
त्या चपला, घरातील मऊ सपाता वापरून कसे बसे दिवस गेले. म्हणता म्हणता आठवडा संपला आणि आत्या यायचा दिवस ठेपला.
ठरल्या प्रमाणे आत्या सकाळीच आल्या. मग काय कसं, एकडे तिकडे विचारून झालं. त्या ठीक होत्या. रविवार असल्याने सगळ्यांनी जेवायला बाहेर जायचं ठरलं. जेवण ,मग दुपारी थोडी विश्रांती आणि संध्याकाळी एखादं नाटक किंवा गाण्याचा प्रोग्राम असा मस्त कार्यक्रम ठरला. आत्या पण खूश होत्या. भाचा भेटला, सून भेटली आणि बरेच दिवसात असं बाहेर जाणे झालं नव्हतं.
रविवार छान आनंदात गेला. तिलाही छान वाटले. खर तर पायाचे झाल्यापासून पहिल्यांदाच म्हंटले तरी चालेल. एकदाही तिला तिच्या दुखऱ्या टाचेची आठवण झाली नाही. रात्री खिचडी कढी असा साधासा बेत तिने केला. दुपारचे जेवणही बरेच झाले होते. त्यामुळे सौम्य काहीतरी बरे. उगाच त्रास नको व्हायला. जेवण करून ती जेंव्हा आडवी झाली तेंव्हा तिला तिच्या पायाची आठवण झाली.पाय दुखत होते. पण झोपही खूप आली होती. मग जरा बाम लावला आणि कधी तिला झोप लागली ते कळलंच नाही.
दुसऱ्या दिवशी सोमवार होता. पण तिने आणि मनोजने दोन दिवस जोडून रजा काढली होती. खास आत्या येणार म्हणून. तिलाही मदत होईल आणि आत्याही खूश होईल हा खरा हेतू.आणि तो बऱ्याच अंशी साध्य झाला. मनोज बरीच मदत करत होता.
सकाळीच ते गाडी काढून बाहेर पडले. आजूबाजूची ठिकाणं आणि येताना आत्यांचा पुतण्याला भेटीचा कार्यक्रम होता. तसे प्रती शिर्डी, प्रती बालाजी अशी काही ठिकाणं बघून ते इनामदारांकडे, आत्यांच्या पुतण्याकडे आले. तिथे छान गप्पा झाल्या. चहा ,नाश्ता घेऊन झाला. नव्यानेच ओळख झाली. छान माणसे होती ती. आगत्य भारी. चार दिवस नाही तरी दोन तरी दिवस आमच्याकडे आलच पाहिजे असा आग्रहही केलान त्यांनी. शेवटी आत्यांनी पुतण्याला हो म्हटलं आणि शेवटचे दोन दिवस येईन असं कबूल केलं.
असा हाही दिवस छान मजेत गेला.आत्याही प्रेमाने बोलत होत्या. कुठे गेला त्यांचा खाष्टपणा आणि शिस्त असही तिला वाटून गेलं. पण जाऊ दे ना, वागताहेत ना चांगल्या मग झालं तर.
आजही तिचा पाय अगदी कमी दुखत होता. आजही झोप मस्त गाढ लागली.
दुसऱ्या दिवशी उठून ती चहा करायला किचन मध्ये आली तर आत्याबाई नी चहा चा वाफाळता कप समोर ठेवला. म्हणाल्या घे. रोज तुमची गडबड असेल. आज माझ्या हातचा घे. मनोज उठला की त्याच्या आवडीची आंबोळी, नारळाचं दूध असा बेत करूया. तिला एकदम हे स्वप्न आहे की सत्य तेच कळेना. ह्याच का त्या आत्या ज्या सासूबाईंना सळो की पळो करायच्या. ह्याच का त्या ज्यांना चहा हातात हवा असायचा. ह्याच का त्या ज्या हे स्तोत्र म्हण ते स्तोत्र म्हण म्हणून मुलांना शिकवायच्या. "माझे सोवळे ओवळे कडक असते तेंव्हा माझे पाणी वेगळे ठेवा, जेवणात कांदा लसूण नको इ इ."
आता कोणच्या आत्या आल्या आहेत असा तिला प्रश्न पडला.त्यांना एकदा विचारावं असं पण तिला वाटलं. त्या बदलून दुसरीच कोणी त्यांचा वेश घेऊन तर आली नाहीये ना असं तिला वाटलं. पण आली तरी खुशाल येऊ दे. हेच रूप चांगले आहे असं ही वाटले.
येताना आत्यांनी ओले काजू आणले होते. तिला आवडतात म्हणून. त्याची उसळ ही छान खोबरं वाटून घाटून त्यांनीच खमखमित केली. न राहवून तिने त्यांना विचारलं पण ," आत्या,रेसिपी सांगाल का?"
" अग अगदी सोपी आहे बघ" म्हणून प्रेमाने तिला रेसिपी पण सांगितली.
आता पायाची आठवण ही नव्हती.
आता तिला खरचं मस्त वाटत होते. दिवस एकदम सुंदर चालले होते. ऑफिस चालू होत आणि घरही परत एकदा चालू होतं. झुंबा,योगा,मैत्रिणी ह्यातील काही नाही आणि फक्त एकट्या आत्या तरीही घराला घरपण आले होते. मनोजचे पण लाड होत होते त्याने तोही खूश. तो खूश म्हणून ती पण खूश.
उगाच काळजी करत होते असं तिला वाटलं. आता तब्येत पण छान होती म्हणून तिने तिच्या आवडीच्या वॉक ला जायचं ठरवलं. सकाळी उठून तयार झाली आणि बूट घातले आणि बाहेर पडली. तर परत पाय थोडा कुरकुरत होता. तरी पण बरेच दिवसांनी बाहेर पडल्याच्या आनंदात ती होती. नेहमीच्या एव्हढे नाही पण थोडे कमी अंतर चालून ती घरी आली. बूट उतरवले तर परत तेच. टाच दुखू लागली.
दुसरे बूट घ्यायला हवेत असं ठरवलं.वॉक परत ठप्प.
पण तसा वेळही मिळत नव्हता. आत्यांना जेंव्हा तिच्या पायाचे कळलं तेंव्हा त्यांनी काश्याची वाटी आणायला लावली. त्याने रोज झोपताना तळपायाला मालिश कर सांगितलं. आणि खरंच त्याने बरेच बरे वाटू लागले.
असं करता करता आत्या जायचा दिवस उजाडला. तिने छान तलम कॉटन साडी भेट आणली होती. त्यांना आवडेल अशी. त्या ही आनंदात होत्या. परत ये, असं सांगून मनोज त्यांना सोडायला गेला.
आता घर परत रिकामे झाले. इतके दिवसाची उठ बस संपली होती. आता परत योगा, झुंबा, वॉक,मैत्रिणी भेटणार ह्याने तिला आनंदच वाटला. परत माझे मी पण भेटणार आणि त्या मी पणाला लेबल नसेल ह्याने तिला मुक्त वाटले.
काहीसं सुटे सुटे वाटले.
आत्या काही बांधून मारत नव्हत्या की उपाशी ठेवत नव्हत्या. खरं तर त्या तिच्या सासूबाई नसून तिच्या आत्या झाल्या होत्या. ह्या भेटीत त्यांच्यातील अंतर बरेच कमी झालं होते. त्यांची भीती पण कमी झाली होती. त्याची जागा प्रेमाने घेतली होती. खरच, भीतीची भीती च आपल्याला खात होती असं तिला जाणवलं.
पण बऱ्याचदा तसेच असते नाही का? एखादी गोष्ट व्हायची किंवा न व्हायची कारणे बरीच असतात आणि आपण त्या प्रोसेस चा एक लहान भाग असतो. उगाच आपण सगळं कर्तेपण आपल्याकडे घेतो आणि स्वतःवर एक प्रकारे अन्यायच करतो. अन्याय बंधन घालण्याचा. स्वतः स्वतःलाच आडकविण्याचा. स्वतः स्वतःभोवती कुंपणे, भिंती बांधण्याचा. ही भीती जी वाटते ती त्या आडकण्याची वाटते. आणि त्या भीती वाटण्याच्या भीती मध्ये आपण गुरफटून जातो. नाही का?
आणि तसेही परिस्थिती काहीही आली तरी आपण करतोच की जे लागेल ते. इथेच आत्या पाहिल्याप्रमाणे असत्या तरी काही ना काही आपण केलच असते. आपणही आता पूर्वीच्या नाही.विशी तिशितील सुरभी आणि आताची सुरभी ह्या दोन भिन्न व्यक्ती म्हणाव्या इतकी आपली वाढ झाली आहे. मनोज ही खूप समजुतीने घेतो. आपल्याला जपतो. मग का आपण पूर्वीची माणसं दिसणार ह्या कल्पनेने पूर्वीचे होतो? ते ही कल्पनेत.
भूकाळातील काय किंवा भविष्यातील क्षण वर्तमानात आणला की त्याचं भविष्य काही खरं नाही. तो बिघडणारच!
प्रत्येक क्षण स्वतः परिपूर्ण आणि संपूर्ण आहे. त्याचं असणें त्याच्या आधीच्या किंवा नंतरच्या क्षणावर अवलंबून नाही.असं स्वातंत्र्य कधी आपण त्या प्रत्येक क्षणाला देऊ शकू?
आणि सासूबाई होत्या तोवर ती लहान होती आणि त्या आत्यांना झेलत होत्या ह्याच कारण त्या दोंघिंचे नणंद भावजय हे नाते. त्यांचं आणि आपले नाते कधीच तसे नव्हते. खरे तर नव्हतेच हेच जास्त बरोबर. आता कुठे आम्ही भेटलो आहोत आणि it wasn't that bad either. आवडेलही त्यांना परत भेटायला. पण हे परत भविष्य झालं. तेंव्हा जशी परिस्थिती असेल तसे. ते आताच कसं ठरेल?
आताचा वेळ मजेत गेला हेच छान नाही का? ह्यावरच आपण समाधान मानले पाहिजे. इथेच थांबलं पाहिजे.
मनाचे उंच उंच हिंदोळे थांबवून आजूबाजूचे बघितले पाहिजे. त्याचा आस्वाद पण घेतला पाहिजे.
बाह्य परिस्थिती चा ताबा घेण्याऐवजी आपला, आपल्या मनाचा ताबा घेतला तर आपण कुठेही कधीही आनंद घेऊ शकू.
ह्या विचारांनी तिला एकदम मोकळं , आनंदी वाटायला लागले.
एवढ्यात मनोज आला. तिची तयारी बघून कुठे निघालीस म्हणाला. ती म्हणाली,"वॉकला!"
आणि काय आश्चर्य तेच शूज आज छान बसले. कुठे म्हणून कुठे त्रास नाही. मनाचं आणि शरीराचं हे घट्ट नाते तिला खूप काही शिकवून गेलं. हेडफोन कानात अडकवून सुरभी लाँग वॉकला बाहेर पडली.

© झारा तांबे
११/११/२०२२

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलं आहे.
मंगला गोडबोल्यांच्या लिखाणाची आठवण झाली.

function at() { [native code] }इशय सुंदर लिहीले आहे. सध्या माझीही टाच दुखते आहे. कालच आर्च सपोर्ट लावला. बरे वाटले.
>>>>>>प्रत्येक क्षण स्वतः परिपूर्ण आणि संपूर्ण आहे. त्याचं असणें त्याच्या आधीच्या किंवा नंतरच्या क्षणावर अवलंबून नाही.असं स्वातंत्र्य कधी आपण त्या प्रत्येक क्षणाला देऊ शकू?
किती खरे आहे. लक्षात ठेवावे असे.

छान लिहिली आहेत कथा.
पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.
सध्याच डॉक्टर कुमार यांनी लिहिलेला मनाच्या तापावरचा लेख आठवला.