Silver Trumpet and Trumpet Banner

Submitted by पराग१२२६३ on 4 November, 2022 - 12:43

H20221028120385.jpeg
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 ऑक्टोबरला राष्ट्रपती अंगरक्षक (President’s Body Guard) दलाला राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान केली. प्रत्येक राष्ट्रपतीच्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पार पडणारा हा औपचारिक, शिस्तबद्ध आणि दिमाखदार समारंभ. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 14 मे 1957 ला राष्ट्रपती अंगरक्षक दलाला पहिली राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान केली होती.

स्वातंत्र्योत्तर काळात चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान करण्याचा समारंभ (Silver Trumpet and Trumpet Banner Ceremony) नव्या राष्ट्रपतींनी पदभार स्वीकारल्यावर काही दिवसांनी आयोजित केला जातो. त्यामुळं दर पाच वर्षांतून एकदा हा समारंभ होत असतो. या समारंभात राष्ट्रपतींसह विविध देशांचे भारतातील राजदूत आणि लष्करी प्रतिनिधी तसेच सामान्य नागरिकही सहभागी होत असतात. लष्करी शिस्तीत पार पडणाऱ्या या समारंभाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अंगरक्षक दलाच्या घोडेस्वारांच्या On Parade ने होते. राष्ट्रपतींचे घोडेस्वार अंगरक्षक खास समारंभासाठीचा हिवाळी पोशाख परिधान करून राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात येतात. तगडे घोडे, लाल-शुभ्र पताका लावलेले भाले हातात घेऊन घोड्यांवर स्वार झालेले अंगरक्षक, त्यांच्या छातीवर चमकणारी पदकं आणि पार्श्वभूमीवर असलेलं ऐतिहासिक राष्ट्रपती भवन. सगळंच दृश्य मोहक असतं.

चंदेरी तुतारी आणि पताका प्रदान करून झाल्यावर हे घोडेस्वार राष्ट्रपतींसमोर संचलन करून त्यांना सलामी देतात. त्यानंतर राष्ट्रपती अंगरक्षक दलाच्या इतिहासाविषयी माहिती देणारी एक ध्वनिचित्रफीत दाखवली जाते. मग राष्ट्रपती अंगरक्षक दलामधले घोडेस्वार आपली घोडेस्वारीमधली कौशल्य उपस्थितांपुढं सादर करू लागतात.

H20221028120387.jpeg
दरम्यान, या समारंभात सहभागी झालेलं लष्कराच्या तिन्ही दलांचं बँडपथक राष्ट्रपती भवनाच्या पायऱ्यांवरून विविध धून सादर करत राहतं. समारंभाच्या मध्यावर हे पथकही प्रांगणात येऊन बँडच्या काही धून सादर करून जातं. अशा या दिमाखदार सोहळ्याचा समारोपही राष्ट्रगीतानं होतो.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/11/silver-trumpet-and-trumpet-b...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users