Sports Diplomacy means क्रीडा राजनय

Submitted by पराग१२२६३ on 15 October, 2022 - 07:21

यंदाच्या क्रीडा हंगामाचा शेवट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनं होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून तो देश आपली प्रतिमा उंचावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. या वर्षी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा, बीजिंग हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, महिला क्रिकेट विश्वचषक यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. मात्र चीनमध्ये अजूनही COVID-19 ची स्थिती गंभीर असल्यामुळं सप्टेंबर 2022 मध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा एक वर्ष पुढं ढकलण्यात आली आहे. हांगशाऊ इथं होणाऱ्या या स्पर्धांमधून चीन पुन्हा आपलं प्रतिमा संवर्धनाचं उद्दिष्ट साध्य करेल.

आधुनिक काळात महत्त्वाच्या क्रीडा सोहळ्यांचे भव्य आयोजन करून आपली आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा उजळविण्याचा प्रयत्न प्रत्येक आयोजक देशाकडून होत असतो. क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून दोन देशांमधला तणाव, कटुता कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असतात. या सर्व प्रकारांचा मिळून क्रीडा राजनय बनतो. म्हणूनच या राजनयात महत्वाचा घटक असलेल्या खेळाडूंकडेही संबंधित देशाचे दूत म्हणून पाहिलं जात असतं.

प्राचीनकाळी ऑलिंपिया नगरातून सुरू झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांची लोकप्रियता कालांतरानं ग्रीसच्या अन्य भागांमध्येही वाढली. त्यानंतर विविध ग्रीक नगरराज्यं या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागली. परिणामी वेगवेगळ्या ग्रीक नगरराज्यांमधील खेळाडूंचा आणि सामान्य जनतेचाही एकमेकांशी संपर्क वाढू लागला.

प्राचीन ऑलिंपिकचं आधुनिक रुप म्हणजे सध्याच्या ऑलिंपिक स्पर्धा. 1896 मध्ये कुबेर्तीन यांच्या विशेष प्रयत्नांमधून पुनरुज्जीवित झालेली ऑलिंपिक चळवळही आज राजनयाचे एक साधन बनली आहे. सोव्हिएट संघ आणि अमेरिका या महासत्तांमधल्या शीतयुद्धात क्रीडा क्षेत्राचा आंतरराष्ट्रीय राजकारणाशी थेट संबंध येऊ लागला. 1980 मध्ये मॉस्कोमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांवर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील साम्यवादविरोधी गटानं बहिष्कार टाकला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून 1984 च्या लॉस एंजिल्स ऑलिंपिकवर सोव्हिएट संघ आणि त्याच्या गटामधल्या देशांनी बहिष्कार टाकला होता.

संबंधित स्पर्धेच्या आकर्षक शुभंकर आणि बोधचिन्हाच्या माध्यमातून आपल्या देशातील पर्यावरण, कला-संस्कृती, इतिहास आदींचे दर्शन घडविण्याची प्रथा मॉस्को ऑलिंपिकपासून ठळकपणे सुरू झाली आहे. नवी दिल्लीत 1982 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांद्वारे भारतानं जगासमोर आपल्या सांस्कृतिक, ऐतिहासिक वारशाचं आणि तांत्रिक प्रगतीचं दर्शन जगाला घडवलं होतं. त्याचा शुभंकर असलेला अप्पू खूप लोकप्रिय झाला होता. मात्र 2010 च्या नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा विविध घोटाळे आणि अन्य नकारात्मक कारणांनी चर्चेत राहिल्या होत्या. त्यानंतर 2017 मध्ये पुरुषांच्या आणि 2022 मध्ये महिलांच्या 17 वर्षाखालील फिफा विश्वचषक स्पर्धांचं भारतानं यशस्वी आयोजन केलं आहे.

कारगिल संघर्षानंतर भारत-पाकिस्तान संबंधात बराच तणाव आला होता. काही काळानंतर क्रिकेट डिप्लोमसीचा आधार घेऊन हा तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न केले होते. तणाव कमी करण्यासाठी क्रीडा राजनय उपयोगी ठरत असतो, पण दोन्ही देशांमधील तणावाचा परिणामही क्रीडा क्षेत्रावर होताना दिसत असतो. 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर भारताने चॅलेंजर चषक स्पर्धेतून माघार घेतली होती. दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदी राजवटीचा निषेध म्हणून भारतासह जगातील अनेक देशांनी त्या देशावर क्रीडा बहिष्कार टाकला होता. अमेरिकेचे राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांच्या कार्यकाळात वॉशिंग्टन आणि बीजिंग यांच्यात राजनयिक संबंध वेगाने विकसित होऊ लागले होते. त्यावेळी टेबल टेनिस खेळाद्वारे (पिंग पाँग डिप्लोमसी) व्दिपक्षीय संबंधांच्या विकासाला गती देण्यात आली होती. पण हाँग काँगमध्ये चीनकडून होत असलेल्या लोकशाहीच्या गळचेपीच्या विरोधात अमेरिका, ब्रिटनसह अन्य काही देशांनी बीजिंगमध्ये 2022 मध्ये झालेल्या हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिकवर राजनयिक बहिष्कार टाकला होता.

फुटबॉल हा स्पेन आणि अर्जेंटिनामधला सर्वात लोकप्रिय खेळ. अर्जेंटिना ही एकेकाळची स्पॅनिश वसाहत. त्यामुळं त्या दोन देशांमधील ऐतिहासिक, पारंपारिक संबंध अधिक मैत्रीपूर्ण व्हावेत या हेतूनं त्यांच्यात फुटबॉल सामन्यांचं आयोजन होत राहिलं. सामान्यत: अशा मैत्रीपूर्ण सामन्यांसाठी संबंधित देशांमध्ये लोकप्रिय असलेल्या खेळाचीच निवड केली जाते. आणि त्या सामन्यांना संबंधित देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थिती लावत असतात.

दोन देशांमध्ये असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा उपयोग त्यांच्यातील क्रीडा सहकार्य वाढवण्यासाठीही होत असतो. त्यासाठी द्वीपक्षीय करार करून एका देशात खेळाडूंना प्रशिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक प्रशिक्षण आणि सुविधा दुसऱ्या देशाच्या खेळाडूंना उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचप्रमाणं त्या देशांदरम्यान खेळाडूंचे आदानप्रदानही होत असते. आजकाल परदेशांमधील विविध क्लब भारतात येत आहेत. मोहन बागान आणि जर्मनीतील बायेर्न म्युनिक फुटबॉल क्लब यांच्यातही मैत्रीपूर्ण सामने झालेले आहेत.

लिन्क
https://avateebhavatee.blogspot.com/2022/10/sports-diplomacy-means.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users