आमच्या घरातल्या भिंती बोलतात..

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 September, 2022 - 17:06

आमच्या घरातल्या भिंती बोलतात..

छे!, भुताटकी नाही. चमत्कार तर बिलकुल नाही. पण खरेच आमच्या घरातल्या भिंती बोलतात. घरात गोकुळ नांदतेय याची साक्ष देतात. (हि उपमा मायबोलीकर विशाल कुलकर्णी यांच्या प्रतिसादातून ढापलेली Happy )

तर कुरीअरवाला असो वा स्विगीवाला, कोणीही सेल्समन दारात आला की सवयीने घरात डोकावतोच. आणि भिंतींवर नजर पडताच चार शब्द बोलल्याशिवाय त्यांना राहावत नाही. काहीजण तर भिंती बघायला मुद्दाम चार पावले आत येतात. कारण त्यांना भिंतीवर रेखाटलेल्या बालगोपाळांच्या कला खुणावतात.

----

चार पाच महिन्यांपूर्वीचीच गोष्ट. एका शाळेच्या ईंटरव्यूला मुलाला काहीच लिहीता येत नाही म्हणून ॲडमिशन मिळाली नव्हती. अर्थात यात शाळेचा दोष नव्हता. वॅकेन्सी कमी होत्या आणि कँडीडेट जास्त. त्यामुळे त्यांनी हुशार मुलांना पहिली संधी दिली.

अर्थात यात आमच्या मुलाचाही काही दोष नव्हता. त्याचे प्लेग्रूप, नर्सरीला जायचे वय आले तेव्हाच कोरोनाचा जन्म झाला. लॉकडाऊन लागले. शाळा ऑनलाईन झाल्या. काही मुलांना ते ऑनलाईन प्रकरण झेपले. आमच्या पोराला नाही झेपले.

बर्रं, घरात आम्हीच शिकवावे म्हटले, तर आम्हाला दाद द्यायचा नाही. कारण त्याने कधी शाळाच बघितली नव्हती. शिक्षण हा प्रकारच माहीत नव्हता. त्यामुळे हात धरून लिहायला त्याला कधी शिकवू शकलो नाही. अगदी गेल्या दोन तीन महिन्यांपुर्वी त्याला पेन्सिल पकडून साधी स्ट्रेट लाईन मारता येत नव्हती.

.... 'पण अपना टाईम आयेगा' म्हणत एक दिवस दिव्यशक्ती प्राप्त झाल्यासारखे ऊठला. पेन, पेन्सिल, खडू, स्केचपेन जे हातात सापडेल ते घेऊन भिंती रंगवत सुटला. आम्ही त्याला अडवले नाही. कारण त्या भिंती त्याचीच वाट बघत होत्या. आम्ही स्वतःदेखील तो कधी भिंती रंगवायला सुरुवात करतोय याची वाट बघत होतो. आणि "देर आये पर दुरुस्त आये" म्हणत एकदा सुरुवात करताच त्याने मागे वळून बघितले नाही. एवढ्या काळाचा बॅकलॉग जो भरून काढायचा होता.

आता त्याला कोणी काही शिकवायची गरज पडत नाही. टीव्हीवर यूट्यूब चॅनेल लावतो आणि तिथे जे दिसते ते मोठमोठ्याने गात लिहून काढतो. अक्षरे लिहितो, आकडे लिहितो.. ईंग्लिश लिहीतो, मराठी लिहितो.. कॅपिटल लिहितो, स्मॉल लिहितो.. चित्रे काढतो, ती रंगवतो.. कधी जमिनीवर झोपून, तर कधी सोफ्यावर ऊभा राहून.. तर कधी कपाटावर चढून लिहितो. नवनवीन कोर्‍या भिंती शोधमोहीमेत त्याचे वॉश बेसिन आणि किचन सिंकवरही चढून झालेय. आणि आता अखेरीस घरच्या भिंती कमी पडू लागल्या म्हणत त्याने नोटबूक आणि ब्लॅकबोर्डवर लिहायला सुरुवात केली आहे.

तरीही भिंतींवरचे प्रेम कायम आहेच. आधीच्या लाईट कलर पेन्सिलींच्या लिखाणावर नवे लिखाण पुन्हा ठळक ऊठून दिसावे म्हणून आम्ही आता त्याला स्केचपेन द्यायला सुरुवात केली आहे. कधी मूड आला तर क्ले पासून शेप बनवत तेच भिंतींवरही चिकटवतो. सभोवताली चारही दिशांना पसरलेला कॅनव्हास पुरेपूर वापरतो Happy

ही त्याचीच काही झलक..
आमच्या बोलक्या भिंती Happy

१)
01.jpg
.
२)
02.jpg
.
३)
03.jpg
.
४)
04.jpg
.
५)
05.jpg
.

लिहिण्यासाठी कितीही ऊंचावर चढायची तयारी.. उच्च उच्च शिक्षण म्हणतात ते हेच Happy
६)
07.jpg
.

आणि तिथून कोसळून हात गळ्यात आला तरी आमचा उत्साह काही मावळत नाही Happy
७)
06.jpg
.

नवीन घर शोधताना एखादी छोटीशी रूम किड्स रूम असावी, आणि आपण ती छान सजवावी अशी बायकोची फार ईच्छा होती. ईथले जागेचे गगनाला भिडलेले भाव पाहता ते सोपे नव्हते. पण आता त्याचे काही वाटत नाही. लिविंग रूम असो वा बेडरूम वा मास्टर बेडरूम, किचनपासून बाथरूमपर्यंत सारेच किड्स रूम वाटतात आता Happy

८)
08.jpg
.

पण तरी एक बरे आहे अजून वॉटर कलर त्याच्या आयुष्यात आले नाहीत. आज ना उद्या येतीलच. कारण त्याच्या ताईच्या आयुष्यात ते येऊन गेलेत. हे भिंती-चित्रांची सुरुवात करायचे श्रेय तिलाच तर जाते.

चला तर आता थोडे फ्लॅशबॅकमध्ये जाऊया .....

-----------------------------

हे तिचे अगदी पहिले भिंतीवर काही रेखाटलेले. लहानपणी मुंबईतल्या एका घरात. साधेसेच काहीतरी. अगदी टेबलावर चढून वगैरे.

९)
09.jpg
.
१०)
10.jpg
.

या पहिल्या रोपट्याचा कौतुकाने फोटो काढला. अन बघता बघता त्याचा वटवृक्ष झाला. मुंबईतले हे घर लवकरच सोडल्याने ईथे पुर्ण रंगरंगोटी करता आली नाही. पण नवी मुंबईत एक आमचे भाड्याचे आणि एक आजोळचे हक्काचे, अशी दोन घरे तिला मिळाली. शक्यतो साधी पेन्सिल वा रंगीत खडूच द्यायचो. जेणेकरून ते पुसून पुन्हा कोरी जागा तिला देता यावी. पण जेव्हा ईतर रंगप्रकारांशी तिची ओळख झाली तेव्हा ते ही भिंतीवर अवतरायला सुरुवात झाली.

नव्या भाड्याच्या घराचे उद्घाटनच असे आपले नाव लिहून झाले. पोरगी जेमतेम सव्वादोन वर्षांची होती. त्या वयात आपले नाव लिहिते, ते देखील बापापेक्षा छान अक्षर काढून याचेच जास्त कौतुक होते.

.
दारावर तुमच्या नावाची पाटी आहे तर खिडकीवर माझ्या नावाची हवी Happy
११)
11.jpg
.

आणि मग हळू हळू भिंती भरू लागल्या...
१२)
12.jpg
.
१३)
13.jpg
.

लोकांच्या घरात लक्ष्मीची पावले उमटतात, आमच्या घरात हे असे हात उमटले Happy
१४)
14.jpg
.
१५)
15.jpg
.

आमच्या लक्ष्मीने आपली स्वतःची पावलेही रंगवायची सोडली नाहीत.
१६)
16.jpg
.

हातात पेन्सिल असो वा पेंट ब्रश. हवा तसा, हवा तिथे स्ट्रोक फिरवायला तिचा हात कधी कचरायचा नाही. त्यामुळे आम्हीही कधी तिला अडवले नाही.
१७)
17.jpg
.

वॉर्डरोब देखील यातून सुटले नाही.
१८)
18.jpg
.

पोरगी मुळातच हुशार होती. गणितही चांगले होते. त्यामुळे पाच वर्षांची होईस्तोवर ती तीन अंकी संख्यांची बेरीज करू लागलेली. पण हे तेव्हा आऊट ऑफ सिलॅबस होते. त्यामुळे पुस्तकात अशी गणिते नव्हती. मग मी आकडे बोलायचो, आणि ती भिंतींवर लिहून त्यांची बेरीज करायची.

१९)
19.jpg
.

पुढल्या वर्षी लॉकडाऊन लागला तेव्हा घरबसल्या खेळायच्या अनेक खेळांपैकी हा एक आमचा आवडीचा खेळ होता Happy

२०)
20.jpg
.

लॉकडाऊन काळातीलच एक घटना. त्या घरात एक मुलांच्या फोटोचे कोलाज करत मोठाले पोस्टर बनवलेले. एक दिवस ते भिंतीवरून निखळले. आणि त्याची मागची पांढरीशुभ्र बाजू उघडी पडली. एवढा मोठा कॅनव्हास लेकीच्या नजरेतून लपणार थोडी होता. मग ते पोस्टर उलटे करून त्यावर तिने आपला हात साफ केला. मोठ्या भिंतींवरचीच खेळाडू असल्याने तिने पंधरा वीस मिनिटातच पुर्ण जागा व्यापून टाकली. एक संध्याकाळ सत्कारणी लागली Happy

२१)
21.jpg
.

पुढे मग हाच पोस्टर आमच्या त्या घराची शान वाढवत होता.
२२)
22.jpg
.

काही भिंती तिच्या कलाकारीने छान दिसायच्या, तर काहींना तिने घाण केले. अर्थात आम्हाला तरी कधी तसे वाटले नाही. आपलीच पोरं, कौतुकच वाटणार. पण समोरून येणार्‍या प्रतिसादांमध्ये नेहमीच कौतुकाचे बोल नसायचे.

"मुलांनी भिंती किती घाण करून ठेवल्यात. तुम्ही त्यांना अडवत का नाहीत.. ओरडत का नाही.. बूकमध्ये लिहायची सवय का नाही लावत.. " असेही कधीतरी ऐकावे लागायचे.

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. पण हौसेला मोल नसते. आणि आपल्या हौसेचे मोल कोणाला पटवून द्यायच्या भानगडीत पडूही नये.
आमच्या दोन्ही घरात मात्र प्रत्येकालाच मुलांच्या या रंगरंगोटीचे कौतुक आहे. रोज दिवसभरात त्यांनी जे प्रताप केले त्याचे फोटो काढावेत आणि फॅमिली ग्रूपवर टाकावेत हे रुटीन आहे.

आज पोरगी जे काही झरझर स्केचेस काढते... किंवा रंगरंगोटी करते ... जे काही छान असेल, वा ठिकठाक असेल.. पण मनात कसलाही किंतु परंतु न ठेवता जे पटपट तिचा हात चालतो. त्याचे बीज कदाचित यातच रुजले असावे. तो कॉन्फिडन्स कदाचित तिला या बिनधास्त भिंती रंगवण्यातून मिळाला असावा.

ते भाड्याचे घर सोडताना त्यातील भिंती सोबत नेता येणार नाहीत याचेच सर्वात जास्त वाईट वाटत होते. त्यात बरेच गोड आठवणी सामावल्या होत्या. जाण्यापुर्वी त्या सर्वांचा एक छानसा विडिओ काढायचे मनात होते. पण कोविडकाळात घर शिफ्ट करायच्या धांदलीत ते डोक्यातून निसटलेच.. Sad

नवीन घरातल्या कोर्‍यापान भिंती पाहून, राहून राहून त्यांचीच आठवण येत होती. जमिनीवरील खेळण्यांचा पसारा जिवंतपणाची साक्ष रोज द्यायचा. पण भिंती अजूनही सुप्तावस्थेतच होत्या. लेकीचीही भिंत रंगवायची हौस आता फिटली होती. त्यामुळे छोट्या ऋन्मेषवरच भिस्त होती. थोडी वाट बघायला लावली त्याने. पण एकदा तो रंगात येताच पुन्हा आमच्या घरात गोकुळ नांदू लागले.

हा चार दिवसांपुर्वीचा फोटो. सध्या त्याला भिंती कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे त्याने भूखंड हडपायला सुरुवात केली आहे Happy

२३)
23.jpg
.

आणि हो, आता फायनली आम्ही त्याला पाटी पेन्सिल आणून दिली आहे. ती वापरून त्याची सेल्फ स्टडी चालू आहे. आयुष्यात पुन्हा कधी ईंटरव्यू द्यायची वेळ आली तर आता चिंता नसावी Happy

२४)
24.jpg

धन्यवाद,
ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रे....आमच्या घरीही हाच प्रकार आहे सध्या... लोक घरी येतात विचारतात तुम्ही अडवत का नाही... माझे सेम उत्तर असते- भिंती काय परत रंगवता येतील.. हा आनंद कसा परत मिळवणार... करू दे एन्जॉय....

सीमंतिनी, धन्यवाद आणि हो दिले नंबर.. डोक्यात होतेच, पण आळस केलेला Happy

च्रप्स, +७८६
तरी अशी लोकं कमीच भेटतात. निदान तोंडावर बोलून दाखवणारे तरी कमी भेटतात Happy

पण खरेय.. हा आनंद पुन्हा मिळवता येत नाही.. आणि हे वय गेले तरीही पुन्हा येत नाही.. किंबहुना मुलांची कुठलीही एक फेज गेली की पुन्हा येत नाही. ती आहे तोवर त्यांच्यासोबत जगून घ्यावी Happy

>>>>
आहे तोवर त्यांच्यासोबत जगून घ्यावी
>>>>
अगदी खरंय....

मस्त!
आमची मुलं रेघोट्या मारायची भिंतीवर पण खूप नाही.
आमच्या आधीच्या घरी मी आणि दोन्ही मुलांनी मिळून एक चित्र काढलं होतं. माझी चित्रकला अजिबात म्हणजे अजिबात चांगली नाही, पण झोपडी, झाड, सूर्य अशा स्टँडर्ड गोष्टी काढल्या आणि रंगवल्या होत्या आम्ही तिघांनी मिळून. त्या मूळ चित्रात मग धाकट्याने मन मानेल तसे बदल केले होते. लॉकडाऊनमध्ये दुसऱ्या एका भिंतीवर अजून एक चित्र काढलं. त्यातही नंतर भरपूर बदल झाले.
अवांतर- कोऱ्यापान हा शब्द आवडला!

किती गोड.
ओरडत का नाही? अडवत का नाही? म्हणणार्यांना तो गोड ससा दाखव. त्याला कोण ओरडेल.
मुलांना जेवढं काय करता येईल तेवढं करु दे.
अर्थात तुम्हा दोघांना सांगायला नकोच.

मस्तच!!!

मॉल मध्ये वगैरे मुद्दाम सेल्फी पॉईंट केलेले असतात तशा मस्त दिसत आहेत भिंती! Happy

सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद Happy

@/वावे, तुम्ही घरातल्या चित्रांबद्दल आधीही कुठे लिहिलेले का? वाचल्यासारखे वाटतेय. बहुधा चित्रेही टाकली असावीत..
आमच्याकडेही जुन्या घरात भिंती रंगल्याच आहेत म्हणत बायकोनेही एक दोन कार्टून कॅरेक्टर भिंतीवर काढलेले. पुढे लेकीने त्यात रंग भरलेले. त्याचे फोटो वर नाहीयेत.

अवांतर- कोऱ्यापान >>> तरी लिहीतानाच माझ्या मनात विचार आलेला की असा शब्द प्रचलित आहे की वेगळा बनतोय Happy

@ सस्मित,
अर्थात तुम्हा दोघांना सांगायला नकोच >>> हो, तरी पोरांना प्रोत्साहन द्यायचे जास्त क्रेडीट मला जाते Proud
स्पेशली लेकीचे स्टंट लहानपणापासून मीच एंटरटेन करायचो. आणि याबद्दल घरचे (स्पेशली बायकोच्या घरचे) मला शिव्या द्यायचे. त्या स्टंटगिरीचा तर वेगळा धागा होईल Happy

@ स्वांतसुखाय हो Happy घरी कुठेही सेल्फी काढला आणि फेसबूक व्हॉटसपवर शेअर केला की लोकं माझ्या थोबड्याला वाह वाह करायच्या आधी बॅकग्राऊंडला दिसणाऱ्या भिंतींवर कॉमेंट करतात Wink

सध्या हेच्च चालुये घरात,किचन मध्ये टाईल्स असल्याने फक्त ते राहिलंय आणि उंचावर,स्टूल कापटावर चढून रंगकाम न करण्याची सक्त ताकीद असल्याने उंचीवरच्या भिंती कोऱ्या आणि खाली सगळं रंगकाम असं 2D दिसतंय घर Happy

आणि हो खिडकीच्या काचांचा कॅनव्हास म्हणून वापर करून त्यात वॉटर कलर ने मोठ्ठी चित्र काढता येतात आणि पुसलं की पुन्हा दुसऱ्या चित्रसाठी कॅनव्हास तयार असत हा शोध पण मुलांनी lokdown मध्ये लावलाय

अरे मस्त.
छान, ही तर फॅशन म्हणुन सुरू करता येईल. एखादी भिंत
वॉल पेपर लावून मुलांना रंगवायला, लिहायला देणं वेगळं आणि एखादी सोडून अथवा सगळ्याच भिंती त्यांच्या ताब्यात देणं वेगळं.

@ आदू,
उंचीवरच्या भिंती कोऱ्या आणि खाली सगळं रंगकाम असं 2D दिसतंय घर ...
>>>
अगदी अगदी.. पट्टा तयार होतो Happy

आता सोफा आणि डायनिंग टेबलच्या जागा आलटून पालटून बदलायचा विचार करतोय. जेणे करून त्यामागे लपलेल्या मोकळ्या जागा उघड होतील

धन्यवाद पीनी, मानवमामा...

हो, एखाद्या भिंतीवर वॉलपेपर वा बोर्ड लाऊन लिहायची जागा बनवायचे असे फार आधीही डोक्यात होते. पण पोरांनी सगळ्याच भिंतींवर आपला हक्क सांगून तो प्रश्नच निकालात काढला Happy

तरी कालच आमचे डिस्कशन चालू होते. नवीन जागा कशी तयार करावी. लिहिलेय त्यावरच एक रंगाचा हात घरीच मारून घ्यावा की ऑनलाईन काही वॉलपेपर मिळतेय का बघावे..

हे एक प्रॉडक्ट मिळाले
कोणी वापरले आहे का? या प्रकारचे काही?

Naitik Creation Self-Adhesive White Board Sticker Removable, Whiteboard Sticker Wall Decal Vinyl Peel and Stick Paper for School, Office, Home, College Kids Drawing Wallpaper (60x200cm) https://amzn.eu/d/eWRBG9E

मुलांची रंगरंगोटी मस्त..
आमच्या घराच्या पण भिंती, कपाटाची दारं आतल्या बाजूने, टेबल, खुर्ची सगळं रंगलय..
कुणी पाहुणे यायचे असले कि नवरा विचारात पडतो घर कसं दिसतंय..त्याला दाखवला हा लेख आणि फोटो Happy

भारिये हे. पोराचं रंगकाम एक नंबर.

आमच्याकडे जरा उलट चालू आहे. घर redevelopment ला जाणार आहे. त्यामुळे "दिवार पर दिलकी बातें" लिहितोय.

धन्यवाद मृणाली, सामो, नताशा Happy

@ मृणाली,
हो Proud आमच्याकडेही हा प्रश्न पडतो की लोकांना आपणहून कसे बोलवावे.. पण याचा एक फायदाही होतो, ज्यांना घर कसे दिसतेय यापेक्षा घरातल्या माणसांमध्ये ईंटरेस्ट असतो तेच येतात वा बोलावले जातात :.. कश्याला हवेत फॉर्मेलिटी जपायला घरी येणारे पाहुणे. Happy

छान लेख!
लहानपणी घरातल्या भिंतीला ॲाईलपेंट रंग होता. त्यामुळे त्यावर खडूने लिहिलेले डस्टरने पुसता यायचे. मी आणि माझ्या बहिणीने शाळा-शाळा खेळायला भिंतींच्या वाटण्या केल्या होत्या.
कोणी वापरले आहे का? या प्रकारचे काही?>>> हो. ब्लॅकबोर्ड स्टिकर वापरात आहे. आजच त्यावर लेकाने माझा अभ्यास घेतला… मला ABC शिकविले.

धन्यवाद सोनाली
आमच्याही लहानपणीच्या घराला ऑईलपेंट होता. पुसले की झाले. पण ऊमटायचे फार छान नाही..

आणि हो, तो स्टिकरही ऑर्डर करतो. तो काढताना आणखी घराचा कलर निघून यायचा ही भिती होती.

तो काढताना आणखी घराचा कलर निघून यायचा ही भिती होती.>>> मी तो काढला नाही आणि अजून काही वर्ष तसाच काढणार नाही. प्रॅाडक्ट डिटेल्स मधे लिहिले होते कि रंग निघणार नाही. पण मला वाटते कि रंग निघेल.
पण ऊमटायचे फार छान नाही..>>> गुळगुळीत पृष्ठभाग असेल तर नाही उमटत.

आमच्या लक्ष्मीने आपली स्वतःची पावलेही रंगवायची सोडली नाहीत. >>> हे वाक्य खूप आवडलं Happy
सगळी कलाकारी भारीच आहे. ते मधेच खूप सारे चेहरे काढले आहेत ते तर एकदम एखादं स्ट्रीट आर्ट असावं किंवा म्यूरल, तसं वाटतंय Happy

Pages