लेह लडाख वारी भाग अकरा

Submitted by pravintherider on 27 September, 2022 - 02:43

लेह ते श्रीनगर ? अंतर ४१८ किमी

दोन दिवस गाडी ला आराम होता, त्यामुळे आज सकाळी सकाळी पहिले उठून गाडी चालू केली. थोडी साफ केली आणि सामान लावून साधारण आठ वाजता लेह वरून निघालो. माझं गाडी घेवुन लेह लडाख येण्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं, नी आता आम्हाला सुरक्षितपणे घरी जायचं होतं. हिमाचल प्रदेश आणि जम्मू मध्ये वातावरण खुप खराब आहे हे समजलं होत मात्र लडाख मध्ये वातावरण खुप छान होतं. लेह मधून निघताना हुर हूर वाटत होती पण हा क्षण येणार होताच... असो

आज आम्ही एकदम निवांत पने फिरून कारगील, द्रास किंवा सोनमर्ग मध्ये मुक्काम करणार होतो. आज पहिला थांबा होता पत्थर साहिब गुरूद्वारा. एकदम शांत आणि प्रसन्न वाटलं तेथे जावून. छान पैकी प्रसाद घेतला नी बाहेर आलो तो पर्यंत महाराष्ट्राची गाडी पाहून काही जवान बोलायला आले. छान गप्पा मारल्या आणि निघालो. आम्ही कुठे ही जवानांसोबत फोटो घेतले नाही.
गणेश मागे थांबला होता तर त्याला सांगितलं की, जेवण तयार आहे पण त्याने नकार दिला... त्याचा परिणाम पुढे कळेलच.

आता पुढील थांबा होता, मग्नेटिक हिल. आम्ही दिलेल्या जागेवर सर्व प्रकारे गाडी उभी करून पाहिली पण गाडी हट्टी आहे ती काही हलेना आपोआप, पण फोटो मात्र घेतले आणि लगेचच पुढे निघालो.

सिंधू आणि झांस्कर नदी एकत्र येतात त्या ठिकाणी थांबून मस्त फोटो घेतले. रिव्हर राफ्टिंग केली होती त्यामुळे लगेचच पुढे निघालो. रस्ता सुरवातीपासून एकदम मस्त होता. तसं ही आम्हाला उतार जास्त मिळणार याची मला खात्री होती.

आज एक गोष्ट आम्ही कटाक्षाने पाळली, गाडी चा AC बंद केला होता त्यामुळे चढावर गाडी कमी त्रास देते हे लक्षात आलं. मूबलेख आणि पुढे चंद्रा सारखी जमीन दिसणारे मूनलेंड वर छोटा सा थांबा घेवून पुढे निघालो.
आज आम्ही लेह श्रीनगर मार्गावरील सर्वात उंच फोटू ला पास पार करणार होतो.

रस्ता इतका छान होता की फोटू ला पास कधी आला समजलं पण नाही. एक तर गाडी आज मस्त चालत होती आणि रस्ता पण खूप छान होता.

पुढे नमिका ला तर काहीच वाटला नाही इतके रस्ते छान आहेत. काही वळणावर मात्र जास्त लक्ष देत चाललो होतो, कारण अपघात हे नेहमीच परतताना जास्त होतात कारण थोड निश्चिंत होतो. हिमालयात तर हि चुक जीवघेणी ठरू शकते.

आता आम्हाला कारगिल युद्ध स्मारक पहायचे वेध लागले होते. जसं की, आधी पासून माहीत होतच की युद्ध स्मारक कारगील पासून पुढे आहे मग आम्ही कारगील शहरात न जाता बायपास ने निघालो.

कारगील शहर खुप मोठं आहे. आम्ही विचारच केला नव्हता की इतके मोठ असेल. पंधरा वीस किमी नंतर पण स्मारक काही दिसेना पुढे असेल म्हणून मी चालतोय तर इकडे बुरहान, स्मारक गेलं मागे म्हणून सुरू झाला. इतके दूर नाही नीट बघितलं का, मी विचार करतोय की, रोड च्या एकदम बाजूला आहे मग मी कसं काय चुकलो साधारण तीस किमी नंतर आम्हाला डाव्या बाजूला खुप गाड्या दिसल्या बोललो ती बघ पार्किंग. थोड्याच वेळात आम्ही कारगील विजय स्मारका समोर उभे होतो.
कारगील... काय आहे आणि कसं सर्वांना माहीत आहे मात्र ज्या वेळी आपण स्वतः त्या ठिकाणी उभे राहून वंदन करतो त्या वेळी किती अभिमान वाटतो ते सांगू शकत नाही. कारगील विजय स्मारक हे निश्चित वंदनीय आहे. त्या ठिकाणी आम्ही जवळ जवळ दीड तास थांबलो. तेथे एक डॉक्युमेंट्री दाखवतात पण विज पुरवठा खंडित झाला होता तर पहायला मिळाली नाही. सकाळ पासून काही खाल्लं नाही आणि बाहेर चांगली सोय पण नव्हती मग आम्ही द्रास ला जेवण करू असं ठरवलं पण द्रास मध्ये ट्रॅफिक खुप होती गाडी लावायला जागा मिळाली नाही मग पुढे जावू आणि खावू काहीतरी म्हणून आम्ही सरळ पुढे निघालो. साधारण साडे तीन वाजले होते आणि आता सोनमर्ग जावू शकतो अशी अपेक्षा करून, मग  सोबत आहे तेच खात पुढे निघालो. ट्रॅफिक मध्ये वाढ झाली होती पण समोरून येणारी. आमच्या मागे एक हि गाडी नव्हती त्यामुळे जोजीला पास बंद झाला की काय अशी शंका मनात येत होती. जोजिला च्या थोड आधी पासूनच रस्ता खराब आहे.
मला एक माहीत होत की, झीरो पॉइंट वर खायला नक्की मिळेल आणि ट्रॅफिक पण... आमचं नशिब की आम्ही जायच्या आधीच इकडून गाड्या सोडल्या त्या मुळे आम्ही सरळ चेक पोस्ट पार केलं ते पण न ट्रॅफिक मध्ये न अडकता. बाकी गाड्या काही वेळ उभ्या केल्या होत्या. मग मात्र मी न थांबता खाली जायचा निर्णय घेतला नी सरळ सोनमर्ग कडे निघालो. रस्ता खुप खराब आणि समोरून येणाऱ्या मोठ्या ट्रक मुळे त्रास होत होता. आता माझ्या पुढे तीन सुमो होत्या आणि मागे दोन. जोजीला चालू झाला नी सुमो ने एक शॉर्ट कट घेतला. मी घेवू की नको या विचारात  होतो तोच समोरून जी गाडी आली त्याने सांगितल की या रस्त्याने नको सूमो मागुन खाली जा. जोजीला इतका खतरनाक आहे की, व्हिडिओ काढा बोललो तर, तू शांत गाडी चालव बाबा. व्हिडिओ आणि फोटो नंतर. रस्ता खराब आहे पूर्ण आणि रुंदी ला कमी पण काही ठिकाणी जागा आहे साईड ला पास देण्या साठी. मी आरामात चाललो तर मागील गाडी वाले हॉर्न देत होते. मी सरळ त्यांना वाट दिली जा बाबा पण त्रास काही देवु नको. हा शॉर्टकट मेन रोड ला भेटतो तिथे सर्व गाड्या उभ्या केल्या होत्या कारण मिलिटरी ट्रक वर चालले होते. बंदोबस्त तैनात होता, तो पर्यंत एक फौजी गाडी जवळ आले नी विचारपुस करायला लागले. कोणी त्रास दिला तर सरळ कोणत्या पण मिलिटरी कॅम्प वर जा तुम्हाला मदत नक्की मिळेल. आम्ही धन्यवाद देवुन सोनमर्ग कडे निघालो. तो पर्यंत खुप जोरात पाऊस चालू झाला. पुढे जायचं की थांबायचं या वर चर्चा चालू होती. रस्ता मला माहित होता नी, पावसामुळे जम्मु ची हालत खराब होती. मग बोललो, आपण अंधार पडायला सुरुवात होईल तो पर्यंत श्रीनगर नक्की जावू. निर्णय माझ्या वर होता, पण सोनमर्ग मध्ये खूप ट्रॅफिक जाम होती आणि पाऊस पण. मला वाटलं की, चुकीचा निर्णय तर नाही ना घेत असाच पाउस पुढे असला तर, कुठं अडकलो, काय करायचं तो पर्यंत हळू हळू सोनमर्ग च्या बाहेर आलो. मग बाकी विचार सोडून दिले आणि पुढे निघालो तर दोन तीन किमी नंतर पाऊस कमी होत गेला नी पुढे कडक उन आणि रस्ता एक नंबर, उतार जास्त, ट्रॅफिक थोडी होती. थोडा जोरात निघालो तर, बुरहान बोलतो भाई, आरामात जावू दे हे लोक चांगले नाहीत. त्याला सांगितलं, रस्ता मोकळा असेल तरी मी ८० च्या वर चालणार नाही.
एक दोन गावात थोडी ट्रॅफिक जॅम होती. आज आम्ही दाल लेक जवळच मुक्काम करणार असल्याचे ठरवलं पण श्रीनगर च्या आधी खूप ट्रॅफिक जॅम होती आणि अंधार पडायला पण सुरुवात झाली.
श्रीनगर मधे मला तरी कुठे ही शिस्त हा प्रकार दिसला नाही, सिग्नल लाल होता म्हणून गाडी उभी केली तर लोक चंद्रा वरून आलाय असं पाहत होती. एक दोन ठिकाणी तर, आमचा उद्धार पण केला. बुरहान रस्ता सांगत होता नी, पूर्ण गोंधळ उडाला होता. जसा जसा अंधार जास्त होत गेला मग थोडी भीती वाटायला लागली. मग एका ठिकाणी थांबून विचारलं तर म्हणे, की दाल लेक दूर आहे तुम्ही असं जा आणि तस जा. मोबाईल ने आम्हाला चुकीच्या वेळी रस्ता चुकवला. त्यांना विचारलं की, बाबा जवळपास कुठे होटेल आहे का, तर एकजण म्हणाला आहे, पुढे लगेच एक होटेल दिसलं, ४०००/- दोन रूम. मी सरळ सांगीतलं बुरहान ला पार्किंग व्यवस्था आणि जेवणाची सोय असेल तर घे, कारण आम्ही सकाळ पासून उपाशी होतो, अंधार आणि आमची सुरक्षितता महत्त्वाची होती. हॉटेल खुप छान होतं आणि बुरहान ने आता पण १०००/- डिस्काउंट घेतलाच. आम्ही गाडी लावली आणि रूम वर येवून मी मात्र मस्त आंघोळ केली. जेवण करायला वर मोकळी जागा होती कॅफे सारखी, काही वेळा पूर्वी थोड टेन्शन आलं होतं पण आता आम्ही निवांत झालो होतो. त्यांनी सांगितलं की, काश्मिर मध्ये टुरिस्ट ला कोणी त्रास देणार नाही कारण कोविड मध्ये जी, हालत झाली त्या वरुन समजलं की टुरिस्ट नाही आले तर.... काय होवु शकतं. जेवण करताना मी  जम्मू श्रीनगर रस्ता ची वर्तमान परिस्थिती पाहत होतो आणि आनंदाची बातमी की ट्विटर वर त्यांनी सांगितलं होतं, उद्या दोन्ही बाजूंनी जम्मू श्री नगर ट्रॅफिक चालू राहील. आज सकाळी गुरूद्वारा मध्ये आम्ही जेवण केलं नाही तर दिवस भर उपवास घडला पण प्रसाद घेतला तर रस्ता चालू झाला होता. कोणी काहीही म्हणो, आम्हाला मात्र पत्थर साहिब गुरूद्वारा चा अनुभव लगेच आला... असो.
रात्री झोपताना खाली निरोप दिला की, सकाळी लवकर जाणार आहोत चेक आउट प्रोसेस आणि पार्किंग गेट साठी कोण असेल त्याचा तर नंबर द्या. तो घेवून आम्ही सकाळी लवकर निघायचं ठरवून मस्त झोपी गेलो.

#मी रोज न विसरता, जम्मू काश्मीर, लडाख पोलिस यांचे ट्विटर पाहत होतो, जेणेकरून मला रस्ते आणि ट्रॅफिक ची योग्य माहिती मिळावी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त एकदम

प्रकाशचित्र मात्र एकही दिसले नाही
पहिल्या भागापासून