ब्रह्मास्त्र - एक प्रामाणिक परीक्षण - by SRK
---------------------------------------------------
विकेंडचे प्लान शुक्रवारी रात्रीच ठरवले जातात.
बायको सहज विचारते, "ब्रह्मास्त्र बघायची ईच्छा आहे का?"
आपण तर्जनी कपाळावर लाऊन विचारमग्न होतो. जणू ध्यान लाऊन संपुर्ण ब्रह्मांडाचा विचार करत आहोत.
पण आपल्या डोळ्यासमोर तरळत असतात गेले आठवडाभर वाचलेले रिव्यूज. ज्याचे ठळक हायलाईट्स खालीलप्रमाणे असतात,
>>>>>>>>
- संवाद फारच पोरकट आहेत
- पण वीएफएक्स छान आहेत
- पटकथेवर मेहनत घेतली नाही
- पण गाणी छान आहेत
- अभिनय कोणाचा काही खास नाही
- पण शाहरूखने छोट्याश्या भुमिकेत कमाल केली आहे.
- बरेच ईंग्रजी चित्रपटांची सरमिसळ आहे
- पण एकदा बघायला हरकत नाही. एंगेजिंग आहे.
>>>>>>>>
आपण सगळे 'पण' पणाला लावतो, आणि ओटीटीवर येईल तेव्हाच बघू म्हणत स्पष्ट नकार देतो. विषय तिथेच संपतो.
शनिवारी कळते बायकोने आपला गेम केला आहे. आपण नकार देताच तिने तिच्या आई आणि बहिणींसोबत प्लान बनवला आहे. सोबत आपल्या लेकीलाही नेत आहे.
आपण चरफडून जाब विचारायला जातो. पण तिथेही आपलीच चिरफाड होते.
तुलाच तर आधी विचारलेले. तूच तर नाही म्हणालेलास.. असे आपल्यालाच तोंडघशी पाडले जाते.
आता आपण देवाकडे प्रार्थना करू लागतो. पिक्चर अतिशय टुक्कार निघू दे रे देवा. यांना बिलकुल आवडू देऊ नकोस. नाहीतर घरच्यांच्या तोंडून पिक्चरचे कौतुक ऐकावे लागेल. ज्यांनी घाव दिला त्यांचेच मीठ चोळून घ्यावे लागेल.
वरती पणाला लावलेले सारे पण आता तुमच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात.
वीएफएक्स खरेच छान असतील तर चित्रपट लेकीला आवडणार, आणि ती त्याचे गुणगाण गात आपल्याला जळवणार.
बायको मुद्दामच शाहरूखचे जास्तीचे कौतुक करून खिजवणार.
त्यात दोन्ही मायलेकींनी दिवसभर केसरीया गाण्याचे समूहगायन आधीच सुरू केले असते. हळूहळू घरात पिक्चरचा माहौल तयार होत असतो. अश्यात आपण मध्यरात्री नेहमीसारखा फक्कड चहा करतो. आणि हळूच बायकोला बोलतो,
"तुम्ही सगळे गेलात तर घरी मी बोअर होईन. मी सुद्धा येईन म्हणतो.."
मग मध्यरात्रीच तिकीट बूक केले जाते.
तिकीट बूक होताना ३५० रुपये पर सीट बघून लेकीलाच मांडीवर घेऊन बसावे असा विचार मनात तरळतो.
पण थ्रीडीचा चष्मा एकच मिळाला तर काय फायदा असेही वाटते.
मग "८३" चित्रपटाच्या वेळचा चष्मा ढापून आणल्याचे आठवते. तो वापरता येईल ना गपचूप....
अगदी ईथवर डोक्यातले विचार भरकटू लागतात.
थोडक्यात सिनेमागृहात प्रवेश करेपर्यंत,
"तू बघ ऑर नको तू बघूस"..
मन संभ्रमातच असते.
पण एकदा चित्रपट सुरू होताच सारे पण पंतु परंतु मिटणार असतात. कारण पिक्चरची सुरुवातच शाहरूखच्या एंट्रीने होणार असते. आणि आपण त्याचे डायहार्ड फॅन असतो. वोह सिर्फ स्टार नही है, दुनिया है मेरी टाईप्स..
थोड्याच वेळात शाहरूखची एंट्री होते. आणि आपल्या लक्षात येते केवळ आपणच नाही तर आजूबाजुची जनताही त्याची फॅन आहे. अगदी शिट्ट्या, टाळ्या आणि फेटे उडवा टाईप्स नसले तरी अचानक थिएटरमध्ये बरेच लोकं आहेत हे जाणवते. शाहरूखला पाहताच लोकं आपली खुर्ची सरसावून बसतात आणि पलीकडच्या खुर्चीतून आपली लेकही आपल्याकडे बघून किंचाळते, पप्पाss शाहरूख खान...!
आणि तिथून सुरू होतो ब्रह्मास्त्राचा प्रवास...
काय आहे ब्रह्मास्र? कसे होतात त्याचे तीन तुकडे? ते शाहरूख नागार्जुन यांच्याकडे कसे येतात? कोण त्यांच्या मागे लागले असते? ब्रह्मास्त्राचे तीन तुकडे जोडून त्याला काय साध्य करायचे असते?? आणि या सर्वात काय करत असतो आपल्या चित्रपटाचा नायक शिवा? कोण असतो शिवा? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायचा प्रवास सुरू होतो. माझाही सुरू झाला. आणि मला तो चक्क छान वाटला.
सोशलमिडीयावरच्या संमिश्र (म्हणजे ठिकठाक ते बेक्कार) अश्या प्रतिक्रिया वाचून अपेक्षा कमी असणे पथ्यावर पडले असावे. पण मला तरी ब्रह्मास्त्र आवडला. माझ्या आठ वर्षाच्या लेकीलाही आवडला. तीन तास चित्रपटाने स्क्रीनवरून नजर हटवू दिली नाही. निखळ मनोरंजनाची अपेक्षा ठेऊन गेलेल्या चित्रपट रसिकांना अजून काय पाहिजे. फक्त सोबत कुठलेही पुर्वग्रहदूषित मत घेऊन न आलेले प्रेक्षक हवेत. सुरुवातीच्या द्रुश्यात जेव्हा शाहरूख खान आकाशात ऊडी मारून वानरास्त्राचे विराटरुपी दर्शन देतो, तेव्हा चित्रपट पहिल्या टाळ्या खेचतो.
शाहरूखचा सीन संपतो. आता थोडीफार बोअरींग लव्हस्टोरी झेलायची आहे अशी मनाची तयारी करून आपण खुर्चीत मागे रेलून बसायचे ठरवतो. कारण रिव्यूच तसे वाचले असतात. पण आलियाच्या क्यूटनेस समोर आपण सारे विसरून जातो.
रणबीर मला लहानपणापासून आवडतो. यात दोघांचे लव्ह अॅट फर्स्ट साईट दाखवलेय. वेगाने एकमेकांच्या प्रेमात पडतात. कदाचित प्रेमकथेत फार वेळ खर्च होऊ नये म्हणून गरजेचे असावे. पण शेवटी त्यांची लव्हस्टोरीच या चित्रपटाचा आत्मा दाखवली आहे. याच कारणासाठी बरेच जणांना ते पहिल्या नजरेतील प्रेम दाखवणे पटले नाहीये. पण मला पटले. आपल्या आईवडीलांचे अरेंज मॅरेज झाले असले तरी त्यांच्या नात्यात आज निस्वार्थ प्रेम आहे यावर आपण विश्वास ठेवतो. पण तेच एखाद्या पहिल्या नजरेतील प्रेमाला निव्वळ शारीरीक आकर्षणाचे नाव देऊन मोकळे होतो. सुरुवात आकर्षणाने होत असेलही, पण मला त्यांचे हळूहळू फुलणारे प्रेम आणि त्यांच्या नात्यातील वाढणारा विश्वास पटला.
किंबहुना माझा विश्वास आहे की प्रेमातला वेडेपणा अश्याच नात्यात आढळतो. तोलून मापून विचार करून केलेले प्रेम ती ऊंची गाठू शकत नाही.
त्यामुळे जेव्हा अखेरीस त्यांच्या प्रेमाची शक्ती ब्रह्मास्त्राच्या तोडीस तोड ठरते तेव्हा मला तरी ते पटले. प्रत्येकाला पटेलच असे नाही. (माझ्या माहितीनुसार हॅरी पॉटर चित्रपटातही हिरोला त्याच्या आईवडिलांच्या प्रेमाचे कवच तारते असे काहीतरी आहे ना..)
चित्रपटात कोणाला फार अभिनय करायला स्कोप ठेवला नाही. ते जरा चुकलेच. पण त्यामुळे वीएफएक्स आणि स्पेशल ईफेक्ट्स हे या चित्रपटाचे खरे हिरो आहेत म्हणावे ईतके त्यावर या चित्रपटाचा डोलारा सांभाळला गेला आहे. आणि मी तरी आजवर कुठल्याही बॉलीवूड चित्रपटात ईतकी उत्तम कामगिरी पाहिली नाही. मध्यंतरी तान्हाजी चित्रपटात जे काही पाहिले होते त्याने धसकाच घेतला होता या प्रकाराचा. पण हे वरच्या दर्जाचे होते. मॅजिक असो वा अॅक्शन, दोन्हीत सरस ईफेक्ट्स वापरले आहेत. कदाचित हॉलीवूड चित्रपटांच्या प्रेक्षकाला यात नावीन्य वाटणार नाही. तरी हे आपल्याकडचे असल्याने मला जास्त रिलेट करता आले., इमोशनली जास्त कनेक्ट होता आले.
संगीत मला नेहमीच भारतीय चित्रपटांचा आत्मा वाटतो. हे ते आहे जे आपल्याला हॉलीवूड चित्रपटांत सापडत नाही. हे आपले वैशिष्ट्य आहे आणि ते नेहमी जपले पाहिजे असेही वाटते. फक्त अश्या चित्रपटांत ते कथेला अडसर ठरू नये. यात ते बिलकुल झाले नाही. जी काही गाणी आली ती सारीच छान वाटली.
"मैनू चढिया डान्स का भूत" या गाण्यात रणबीरचा डान्स बघायला मिळाला, जो फार आवडतो. तरी त्याचे रिफ्लेक्सेस किंचित मंदावलेत असे वाटले. मुद्दाम त्याचे वय चेक केले. तर चाळीशीच्या ऊंबरठ्यावर आढळला.
"ओम देवाs देवाs" हे गाणे मी याआधी ऐकले नव्हते. आज थेट पिक्चरमध्येच पाहिले. थिएटरमध्ये खूप भारी वाटते. अंगावर काटा यावे असे आहे. आता घरी पुन्हा तो फिल घ्यायला मोठ्या आवाजात वाजवणे भाग आहे.
"केसरीया" गाणे कदाचित या वर्षातील सर्वोत्तम रोमांटीक ट्रॅक नसावाही. पण त्यातील "काजल कीs सियाही से लिखीs है तुने जाने, कितनो की लव्हस्टोरीया.." ही ती लाईन आहे जी आपण थिएटरमधून बाहेर पडताना मनातल्या मनात गुणगुणतो. अगदी घरापर्यंत घेऊन जातो.
चित्रपटाला ट्रोलच करायचे झाल्यास त्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये तसले मटीरीअल ठासून भरले आहे. जे आपण अल्लादिनच्या दिव्यासारखे घासून बाहेर काढू शकतो. कारण मुळातच हा विषय फॅन्टेसी आहे. बॉलीवूडने या स्केलला कधी हाताळला नाहीये. त्यामुळे लॉजिकची चीरफाड करणे सहज शक्य आहे.
हो नक्कीच,
या चित्रपटाची पटकथा आणखी सशक्त करता आली असती. लव्हस्टोरी आणखी फुलवता आली असती, संवाद अजून दमदार करता आले असते. चित्रपटातील ईतर कलाकारांच्या व्यक्तीरेखा आणखी ठळकपणे रेखाटत्या आल्या असत्या....
पण तरीही चित्रपट पुर्ण बघावा असा आहे. थिएटरला आणि शक्य झाल्यास थ्रीडीत बघण्यात जास्त मजा आहे. पुढच्या भागाची उत्सुकता वाटेल असा आहे. 'कटप्पाने बाहुबली को क्यू मारा?' यापेक्षा देव आणि अमृता कोण असतील हा प्रश्न जास्त छळणारा आहे 
(माझे अंदाज - रणवीर आणि दिपिका असतील.)
पण मला सर्वात जास्त उत्सुकता आहे ती पुढच्या भागातील फ्लॅशबॅक स्टोरीत सायंटीस्ट मोहन भार्गव उर्फ शाहरूख खान पुन्हा आपल्या चाहत्यांच्या भेटीला काही मेजवानी घेऊन येतोय का याची 
धन्यवाद,
- सुकुमार ऋन्मेषार्जुन खान/कपूर
उर्फ SRK 

तो रोल निगेटिव्ह आहे आणि
तो रोल निगेटिव्ह आहे आणि बहुतेक रणबीर कडून मारला जाणारा आहे >> ते बहुतेक तिसर्या भागात . दूसर्या भागत त्याला हिरो ठेवतील.
.
रणवीर यश आणि रितिक आल्रेडी नाही म्हणाले...मला वाटते रणबीर नेच करावा... >> रणबीर की रणवीर ?
माझ्यामते रणवीर ने करावा . विझलेल्या डोळ्यांचा देव काय बघायचा !
दिपिका असेलच .
रच्याकने , त्या होडीत दोघांची नावे ईन्ग्रजीत बघून गंमत वाट्ली
पण हे सगळ शिवाला का आणि कसं कळतं हा प्रश्न मला छळतच राहीला . समधानकारक उत्तर नाही मिळालं.
त्या होडीत दोघांची नावे
त्या होडीत दोघांची नावे ईन्ग्रजीत >>> ती आपल्याला कळावी म्हणून हो! नाहीतर तशी ती दैवी भाषेतच लिहीलेली असतात
अरे हो की.. नावे ईंग्रजीत
अरे हो की.. नावे ईंग्रजीत होती. पण तो काळ कधीचा दाखवला आहे.. जुना नसावा ना?
शिवा आताचा तर त्याचे आईवडील काही पुराणकाळातले नसावेत ना..
आधी ती अक्षरे मोडीत काढलेली
आधी ती अक्षरे मोडीत काढलेली असतात. नंतर दैवी कोपाने आंग्लाळतात.
पण हे सगळ शिवाला का आणि कसं
पण हे सगळ शिवाला का आणि कसं कळतं हा प्रश्न मला छळतच राहीला . समधानकारक उत्तर नाही मिळालं. >>> अहो स्वस्ति हे अख्खा पिक्चरच का बनवलाय याचं मला कधीच समाधानकारक उत्तर मिळणार नाही, तुमचं काय घेऊन बसलात
. ( पाहीलाय हे वेगळं सांगायला नको
)
हे अख्खा पिक्चरच का बनवलाय >
हे अख्खा पिक्चरच का बनवलाय >>>> हॉलीवूडपाठोपाठ आता टॉलीवूड सुद्धा ईथले मार्केट खाऊ लागलेय म्हणून बॉलीवूडला काही वेगळे करायची गरज भासू लागली आय मीन त्याच प्रकारचे भव्य दिव वीएफएक्स वगैरे... पण तरी या भागात काही ऊणीवा राहिल्या ज्या पुढच्या भागात दूर होतील असे वाटते. त्यात स्टोरीही पकड घेईल अशी आशा. त्यासाठी तरी प्रत्येकाने ओटीटीवर का होईना हा भाग बघायलाच हवा.
मला आख्ख्या मायबोलीवर आजकाल
मला आख्ख्या मायबोलीवर आजकाल फक्त हेमंत सरांचे प्रतिसाद भारी वाटुन लागलेत. काय अभ्यास! काय अभ्यास!
रून्मेषदादाला टफ फाईट देतात
रून्मेषदादाला टफ फाईट देतात ते.
VFX, पेक्षा कथा आणि कत मांडणी
VFX, पेक्षा कथा आणि कथे ची मांडणी सर्वात जास्त महत्वाची असते.
कथा
एकसंघ असावी, कमीत कमी सिनेमा बघताना तरी ती कथा खरी वाटावी, अतर्क्य वाटतील असे प्रसंग नसावेत.
कलाकार ना अभिनय करता यावा.
फक्त कपडे काढून शरीर दाखवण्याचा परिणाम प्रेक्षक वर पाच ते दहा मिनिट च होतो.
बाकी अडीच तास ते सहन केले जात नाही.
मला आख्ख्या मायबोलीवर आजकाल
मला आख्ख्या मायबोलीवर आजकाल फक्त हेमंत सरांचे प्रतिसाद भारी वाटुन लागलेत. काय अभ्यास! काय अभ्यास!
सस्मित टोमणा कळला.आता फक्त वाचकाच्या भूमिकेत राहीन.
उगाच मायबोलीकर ना अस्वस्थ वाटायला नको.
अभिप्राय बद्धल धन्यवाद
बापरे!
बापरे!
हेमंत हलके घ्या हो
मस्करीत लिहिलंय.
तद्दन फालतू चित्रपट
तद्दन फालतू चित्रपट
फक्त कपडे काढून शरीर
फक्त कपडे काढून शरीर दाखवण्याचा परिणाम प्रेक्षक वर पाच ते दहा मिनिट च होतो.
>>> this is true for any type of movie actually
काल एकदाचा हा ब्रह्मास्त्र
काल एकदाचा हा ब्रह्मास्त्र शिवा पाहिला. मुळात इतक्या बावळट्ट, थकेल्या, वकूब नसलेल्या, कॉमनसेन्स नसलेल्या लोकांकडे ब्रह्मास्त्रासारखी वस्तू सांभाळायला का दिली असेल असा प्रश्न पडला आहे. इंग्रजी सिनेमाची बिनडोक कॉपी आहे. उगा संस्कृत आणि संस्कृती भरलीये. ( एकतर त्या टर्मिनेटरनंतर कोणतंही कॅरेक्टर धावताना त्या शेप शिफ्टर लिक्विड मेटल मॅनसारखं धावतं. या सिनेमात त्या व्हिलनने वानरास्त्र घातलेलं असतं उड्या मारण्याऐवजी रोजचा सकाळचा धावण्याचा सराव पार पाडतंच ते पात्रं. ) आणि तो तेनझिंग थेट द लास्ट एअरबेंडर वरून ढापलाय. असली छुटपुट छूछागिरी करणारे म्हणे ब्रह्मास्त्र सांभाळणार! आश्रमाबाहेर 'आश्रम' अशी ठळक पाटी लिहिणार म्हणजे किती गुप्तता बाळगतात ते बघा. त्या आश्रमात जायला यायला एकच रस्ता ठेवलेला. नाही म्हणायला एक हेलिकॉप्टर आणि एक होडी देखिल होती. व्हिलन चाल करून आल्यावर डिंपलताई हेलिकॉप्टरमधून मंद हसत उडून जातात. निदान ब्रह्मास्त्राचे तुकडे तरी न्यायचे ना. ते ही नाही. ते ठेवले आश्रमात. यापेक्षा त्या जुनूनला ते ब्रह्मास्त्र द्या. ती बरी तुमच्यापेक्षा असं म्हणायची वेळ आली. आचरटपणा आहे सगळा.
हो बालिश आहे खरा
हो बालिश आहे खरा
ओटीटीवर आलाय पण अजून पाहिला नाही.
गाणी मात्र अजूनही वाजतात आमच्याकडे
ओटीटीवर पाहताना शाहरूखचा अंत
ओटीटीवर पाहताना शाहरूखचा अंत ( हे भगवान ये क्या लिख दिया मैने ? अब काशीमे जाकर मांजर मारने का पापक्षालन करना पडेगा) झाल्यावर आमच्या स्क्रीनवर पाटी आली होती.
Do you Want to continue ? (Y/N)
For Yes Press Home on your Remote
For No Press any key of your Remote
ज्यांनी थिएटरमधे पाहिला, त्यांना काय ऑप्शन आला होता ?
मी तसेही शाहरूखचाच पार्ट
मी तसेही शाहरूखचाच पार्ट दोनेक वेळा बघितला आहे. ओटीटीवर. बाकी मूवी एकदाच बघण्यासारखा असल्याने पास..
चित्रपट आता नको वाटतात..
चित्रपट आता नको वाटतात..
अतिशय हुशार कथा लेखक,दिग्दर्शक भारतात असतील पण त्यांना संधी च नाही मिळत म्हणून .
अतिशय फालतू कथालेखक आणि तेच सुमार दर्जा चे दिग्दर्शक सिनेमे काढत असतात.
बघावा असे वाटत पण नाही
कलाकार चा सहभाग ह्या मध्ये काहीच नसतो.
माणूस न घेता पण कलाकार उभे करने काही अवघड नाही .
त्या पेक्षा वेब सिरीज ल काही तरी कथा किंवा विषय तरी असतो
वेबसिरीज काय तीच माणसे असतात.
वेबसिरीज काय तीच माणसे असतात.
वेबसिरीजचे व्यसन लागते म्हणून त्या भारी वाटतात.
जसे की मराठी डेलीसोपचेही लागते. पण त्या मराठी असल्याने त्यांना डाऊनमार्केट बोलून हिणवणे सोपे असते.
काल एकदाचा हा ब्रह्मास्त्र
काल एकदाचा हा ब्रह्मास्त्र शिवा पाहिला. मुळात इतक्या बावळट्ट, थकेल्या, वकूब नसलेल्या, कॉमनसेन्स नसलेल्या लोकांकडे ब्रह्मास्त्रासारखी वस्तू सांभाळायला का दिली असेल असा प्रश्न पडला आहे. इंग्रजी सिनेमाची बिनडोक कॉपी आहे. उगा संस्कृत आणि संस्कृती भरलीये. ( एकतर त्या टर्मिनेटरनंतर कोणतंही कॅरेक्टर धावताना त्या शेप शिफ्टर लिक्विड मेटल मॅनसारखं धावतं. या सिनेमात त्या व्हिलनने वानरास्त्र घातलेलं असतं उड्या मारण्याऐवजी रोजचा सकाळचा धावण्याचा सराव पार पाडतंच ते पात्रं. ) आणि तो तेनझिंग थेट द लास्ट एअरबेंडर वरून ढापलाय. असली छुटपुट छूछागिरी करणारे म्हणे ब्रह्मास्त्र सांभाळणार! आश्रमाबाहेर 'आश्रम' अशी ठळक पाटी लिहिणार म्हणजे किती गुप्तता बाळगतात ते बघा. त्या आश्रमात जायला यायला एकच रस्ता ठेवलेला. नाही म्हणायला एक हेलिकॉप्टर आणि एक होडी देखिल होती. व्हिलन चाल करून आल्यावर डिंपलताई हेलिकॉप्टरमधून मंद हसत उडून जातात. निदान ब्रह्मास्त्राचे तुकडे तरी न्यायचे ना. ते ही नाही. ते ठेवले आश्रमात. यापेक्षा त्या जुनूनला ते ब्रह्मास्त्र द्या. ती बरी तुमच्यापेक्षा असं म्हणायची वेळ आली. आचरटपणा आहे सगळा.
नवीन Submitted by मामी on 12 December, 2022 - 10:45 >>>>> स ह म त। आश्रमाला लाकडाचा दरवाजा व मागील बाजूला साधं कुंपण पण नाही .
Pages