ब्रह्मास्त्र - एक प्रामाणिक परीक्षण - by SRK

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 September, 2022 - 13:09

ब्रह्मास्त्र - एक प्रामाणिक परीक्षण - by SRK
---------------------------------------------------

विकेंडचे प्लान शुक्रवारी रात्रीच ठरवले जातात.
बायको सहज विचारते, "ब्रह्मास्त्र बघायची ईच्छा आहे का?"
आपण तर्जनी कपाळावर लाऊन विचारमग्न होतो. जणू ध्यान लाऊन संपुर्ण ब्रह्मांडाचा विचार करत आहोत.
पण आपल्या डोळ्यासमोर तरळत असतात गेले आठवडाभर वाचलेले रिव्यूज. ज्याचे ठळक हायलाईट्स खालीलप्रमाणे असतात,

>>>>>>>>
- संवाद फारच पोरकट आहेत
- पण वीएफएक्स छान आहेत
- पटकथेवर मेहनत घेतली नाही
- पण गाणी छान आहेत
- अभिनय कोणाचा काही खास नाही
- पण शाहरूखने छोट्याश्या भुमिकेत कमाल केली आहे.
- बरेच ईंग्रजी चित्रपटांची सरमिसळ आहे
- पण एकदा बघायला हरकत नाही. एंगेजिंग आहे.
>>>>>>>>

आपण सगळे 'पण' पणाला लावतो, आणि ओटीटीवर येईल तेव्हाच बघू म्हणत स्पष्ट नकार देतो. विषय तिथेच संपतो.

शनिवारी कळते बायकोने आपला गेम केला आहे. आपण नकार देताच तिने तिच्या आई आणि बहिणींसोबत प्लान बनवला आहे. सोबत आपल्या लेकीलाही नेत आहे.
आपण चरफडून जाब विचारायला जातो. पण तिथेही आपलीच चिरफाड होते.
तुलाच तर आधी विचारलेले. तूच तर नाही म्हणालेलास.. असे आपल्यालाच तोंडघशी पाडले जाते.

आता आपण देवाकडे प्रार्थना करू लागतो. पिक्चर अतिशय टुक्कार निघू दे रे देवा. यांना बिलकुल आवडू देऊ नकोस. नाहीतर घरच्यांच्या तोंडून पिक्चरचे कौतुक ऐकावे लागेल. ज्यांनी घाव दिला त्यांचेच मीठ चोळून घ्यावे लागेल.

वरती पणाला लावलेले सारे पण आता तुमच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात.
वीएफएक्स खरेच छान असतील तर चित्रपट लेकीला आवडणार, आणि ती त्याचे गुणगाण गात आपल्याला जळवणार.
बायको मुद्दामच शाहरूखचे जास्तीचे कौतुक करून खिजवणार.

त्यात दोन्ही मायलेकींनी दिवसभर केसरीया गाण्याचे समूहगायन आधीच सुरू केले असते. हळूहळू घरात पिक्चरचा माहौल तयार होत असतो. अश्यात आपण मध्यरात्री नेहमीसारखा फक्कड चहा करतो. आणि हळूच बायकोला बोलतो,
"तुम्ही सगळे गेलात तर घरी मी बोअर होईन. मी सुद्धा येईन म्हणतो.."

मग मध्यरात्रीच तिकीट बूक केले जाते.
तिकीट बूक होताना ३५० रुपये पर सीट बघून लेकीलाच मांडीवर घेऊन बसावे असा विचार मनात तरळतो.
पण थ्रीडीचा चष्मा एकच मिळाला तर काय फायदा असेही वाटते.
मग "८३" चित्रपटाच्या वेळचा चष्मा ढापून आणल्याचे आठवते. तो वापरता येईल ना गपचूप....
अगदी ईथवर डोक्यातले विचार भरकटू लागतात.

थोडक्यात सिनेमागृहात प्रवेश करेपर्यंत,
"तू बघ ऑर नको तू बघूस"..
मन संभ्रमातच असते.

पण एकदा चित्रपट सुरू होताच सारे पण पंतु परंतु मिटणार असतात. कारण पिक्चरची सुरुवातच शाहरूखच्या एंट्रीने होणार असते. आणि आपण त्याचे डायहार्ड फॅन असतो. वोह सिर्फ स्टार नही है, दुनिया है मेरी टाईप्स..

थोड्याच वेळात शाहरूखची एंट्री होते. आणि आपल्या लक्षात येते केवळ आपणच नाही तर आजूबाजुची जनताही त्याची फॅन आहे. अगदी शिट्ट्या, टाळ्या आणि फेटे उडवा टाईप्स नसले तरी अचानक थिएटरमध्ये बरेच लोकं आहेत हे जाणवते. शाहरूखला पाहताच लोकं आपली खुर्ची सरसावून बसतात आणि पलीकडच्या खुर्चीतून आपली लेकही आपल्याकडे बघून किंचाळते, पप्पाss शाहरूख खान...!

आणि तिथून सुरू होतो ब्रह्मास्त्राचा प्रवास...
काय आहे ब्रह्मास्र? कसे होतात त्याचे तीन तुकडे? ते शाहरूख नागार्जुन यांच्याकडे कसे येतात? कोण त्यांच्या मागे लागले असते? ब्रह्मास्त्राचे तीन तुकडे जोडून त्याला काय साध्य करायचे असते?? आणि या सर्वात काय करत असतो आपल्या चित्रपटाचा नायक शिवा? कोण असतो शिवा? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायचा प्रवास सुरू होतो. माझाही सुरू झाला. आणि मला तो चक्क छान वाटला.

सोशलमिडीयावरच्या संमिश्र (म्हणजे ठिकठाक ते बेक्कार) अश्या प्रतिक्रिया वाचून अपेक्षा कमी असणे पथ्यावर पडले असावे. पण मला तरी ब्रह्मास्त्र आवडला. माझ्या आठ वर्षाच्या लेकीलाही आवडला. तीन तास चित्रपटाने स्क्रीनवरून नजर हटवू दिली नाही. निखळ मनोरंजनाची अपेक्षा ठेऊन गेलेल्या चित्रपट रसिकांना अजून काय पाहिजे. फक्त सोबत कुठलेही पुर्वग्रहदूषित मत घेऊन न आलेले प्रेक्षक हवेत. सुरुवातीच्या द्रुश्यात जेव्हा शाहरूख खान आकाशात ऊडी मारून वानरास्त्राचे विराटरुपी दर्शन देतो, तेव्हा चित्रपट पहिल्या टाळ्या खेचतो.

शाहरूखचा सीन संपतो. आता थोडीफार बोअरींग लव्हस्टोरी झेलायची आहे अशी मनाची तयारी करून आपण खुर्चीत मागे रेलून बसायचे ठरवतो. कारण रिव्यूच तसे वाचले असतात. पण आलियाच्या क्यूटनेस समोर आपण सारे विसरून जातो.

रणबीर मला लहानपणापासून आवडतो. यात दोघांचे लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट दाखवलेय. वेगाने एकमेकांच्या प्रेमात पडतात. कदाचित प्रेमकथेत फार वेळ खर्च होऊ नये म्हणून गरजेचे असावे. पण शेवटी त्यांची लव्हस्टोरीच या चित्रपटाचा आत्मा दाखवली आहे. याच कारणासाठी बरेच जणांना ते पहिल्या नजरेतील प्रेम दाखवणे पटले नाहीये. पण मला पटले. आपल्या आईवडीलांचे अरेंज मॅरेज झाले असले तरी त्यांच्या नात्यात आज निस्वार्थ प्रेम आहे यावर आपण विश्वास ठेवतो. पण तेच एखाद्या पहिल्या नजरेतील प्रेमाला निव्वळ शारीरीक आकर्षणाचे नाव देऊन मोकळे होतो. सुरुवात आकर्षणाने होत असेलही, पण मला त्यांचे हळूहळू फुलणारे प्रेम आणि त्यांच्या नात्यातील वाढणारा विश्वास पटला.

किंबहुना माझा विश्वास आहे की प्रेमातला वेडेपणा अश्याच नात्यात आढळतो. तोलून मापून विचार करून केलेले प्रेम ती ऊंची गाठू शकत नाही.
त्यामुळे जेव्हा अखेरीस त्यांच्या प्रेमाची शक्ती ब्रह्मास्त्राच्या तोडीस तोड ठरते तेव्हा मला तरी ते पटले. प्रत्येकाला पटेलच असे नाही. (माझ्या माहितीनुसार हॅरी पॉटर चित्रपटातही हिरोला त्याच्या आईवडिलांच्या प्रेमाचे कवच तारते असे काहीतरी आहे ना..)

चित्रपटात कोणाला फार अभिनय करायला स्कोप ठेवला नाही. ते जरा चुकलेच. पण त्यामुळे वीएफएक्स आणि स्पेशल ईफेक्ट्स हे या चित्रपटाचे खरे हिरो आहेत म्हणावे ईतके त्यावर या चित्रपटाचा डोलारा सांभाळला गेला आहे. आणि मी तरी आजवर कुठल्याही बॉलीवूड चित्रपटात ईतकी उत्तम कामगिरी पाहिली नाही. मध्यंतरी तान्हाजी चित्रपटात जे काही पाहिले होते त्याने धसकाच घेतला होता या प्रकाराचा. पण हे वरच्या दर्जाचे होते. मॅजिक असो वा अ‍ॅक्शन, दोन्हीत सरस ईफेक्ट्स वापरले आहेत. कदाचित हॉलीवूड चित्रपटांच्या प्रेक्षकाला यात नावीन्य वाटणार नाही. तरी हे आपल्याकडचे असल्याने मला जास्त रिलेट करता आले., इमोशनली जास्त कनेक्ट होता आले.

संगीत मला नेहमीच भारतीय चित्रपटांचा आत्मा वाटतो. हे ते आहे जे आपल्याला हॉलीवूड चित्रपटांत सापडत नाही. हे आपले वैशिष्ट्य आहे आणि ते नेहमी जपले पाहिजे असेही वाटते. फक्त अश्या चित्रपटांत ते कथेला अडसर ठरू नये. यात ते बिलकुल झाले नाही. जी काही गाणी आली ती सारीच छान वाटली.

"मैनू चढिया डान्स का भूत" या गाण्यात रणबीरचा डान्स बघायला मिळाला, जो फार आवडतो. तरी त्याचे रिफ्लेक्सेस किंचित मंदावलेत असे वाटले. मुद्दाम त्याचे वय चेक केले. तर चाळीशीच्या ऊंबरठ्यावर आढळला.

"ओम देवाs देवाs" हे गाणे मी याआधी ऐकले नव्हते. आज थेट पिक्चरमध्येच पाहिले. थिएटरमध्ये खूप भारी वाटते. अंगावर काटा यावे असे आहे. आता घरी पुन्हा तो फिल घ्यायला मोठ्या आवाजात वाजवणे भाग आहे.

"केसरीया" गाणे कदाचित या वर्षातील सर्वोत्तम रोमांटीक ट्रॅक नसावाही. पण त्यातील "काजल कीs सियाही से लिखीs है तुने जाने, कितनो की लव्हस्टोरीया.." ही ती लाईन आहे जी आपण थिएटरमधून बाहेर पडताना मनातल्या मनात गुणगुणतो. अगदी घरापर्यंत घेऊन जातो.

चित्रपटाला ट्रोलच करायचे झाल्यास त्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये तसले मटीरीअल ठासून भरले आहे. जे आपण अल्लादिनच्या दिव्यासारखे घासून बाहेर काढू शकतो. कारण मुळातच हा विषय फॅन्टेसी आहे. बॉलीवूडने या स्केलला कधी हाताळला नाहीये. त्यामुळे लॉजिकची चीरफाड करणे सहज शक्य आहे.

हो नक्कीच,
या चित्रपटाची पटकथा आणखी सशक्त करता आली असती. लव्हस्टोरी आणखी फुलवता आली असती, संवाद अजून दमदार करता आले असते. चित्रपटातील ईतर कलाकारांच्या व्यक्तीरेखा आणखी ठळकपणे रेखाटत्या आल्या असत्या....

पण तरीही चित्रपट पुर्ण बघावा असा आहे. थिएटरला आणि शक्य झाल्यास थ्रीडीत बघण्यात जास्त मजा आहे. पुढच्या भागाची उत्सुकता वाटेल असा आहे. 'कटप्पाने बाहुबली को क्यू मारा?' यापेक्षा देव आणि अमृता कोण असतील हा प्रश्न जास्त छळणारा आहे Happy
(माझे अंदाज - रणवीर आणि दिपिका असतील.)

पण मला सर्वात जास्त उत्सुकता आहे ती पुढच्या भागातील फ्लॅशबॅक स्टोरीत सायंटीस्ट मोहन भार्गव उर्फ शाहरूख खान पुन्हा आपल्या चाहत्यांच्या भेटीला काही मेजवानी घेऊन येतोय का याची Happy

धन्यवाद,
- सुकुमार ऋन्मेषार्जुन खान/कपूर
उर्फ SRK Happy

IMG_20220918_231152.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चाळीशी क्रॉस केलेल्या लोकांच्या जीवनात रोमान्स नसतो.. मग असे लोक नावे ठेवतात चित्रपटातील लव्ह स्टोरी बोरिंग आहे वगैरे.. डोन्ट ब्लेम देम... त्यांचे रोमँटिक आयुष्य संपलेलेच आहे..

@ कॉमी नाही. चित्रपट भंपक नाही.
आवडाव्यात अश्या गोष्टींसोबत तर्काच्या कसोटीवर गंडलेल्या गोष्टीही आहेत.
बघताना तुम्ही मनोरंजनासाठी बघता त्यामुळे पुर्ण चित्रपट न कंटाळता एंजॉय करता.
पण पुढे सोशल मिडीयावर प्रतिक्रिया देताना मात्र तुम्हाला त्यातल्या गंडलेल्या गोष्टी सांगायचा मोह आवरत नाही. मग त्या सांगून तरीही चित्रपट मला आवडला हे कबूल करणे बरेचदा जड जाते Happy

फुरोगामी,
मी शाहरूखचा चाहता आहेच. पण म्हणून त्याचे काहीही बघत नाही. बरेच जणांकडून शाहरूखचा कॅमिओ आवडल्याचा उल्लेख ऐकलेले. त्यामुळे ब्रह्मास्त्र बघण्याचे ते एक महत्वाचे कारण होतेच.
शाहरूख यात उगाच वीएफएक्सने तरुण न दाखवता मिडल एज तरीही चार्मिंग पर्सनॅलिटी दाखवला आहे. त्याचा तो लूक खूप आवडला. कुठलाही अभिनयाचा आव न आणता त्याने यात तीच स्टाईल मारली आहे जी वर्षानुवर्षे दाखवत तो चाहत्यांचे मन जिंकत आलाय. यात तो ओळखीचा आणि आवडीचा शाहरूख दिसला. छान वाटले Happy

प्रामाणिक लिहिलंय.
ट्रेलर बघुनच बघणार नाही ठरवलंय. नॉट माय टाइप. काहीतरी बकवासच असणार असं मी ठरवुनच टाकते ट्रेलर बघुन आणि मग नाहीच बघत.
त्यात तो र क आवडत नाहीच. आ भ आवडायची. ती पण चक्रम वाटु लागलीय आता.
मिडल एज तरीही चार्मिंग पर्सनॅलिटी दाखवला आहे.>>>> दाखवला आहे म्हणजे? तो आहेच मिडल एज चारमिंग! Wink

तो आहेच मिडल एज चारमिंग! Wink >>> हो, यात शंकाच नाही. पण पडद्यावर वेगळे दाखवले जाते ना बरेचदा. म्हणजे वीएफएक्स आहे सोबत तर २०-२२ वर्षांचा दाखवा. ते ईथे नव्हते हे बरेय.

कोणाच्या लहानपणापासून? >>>> आम्हा दोघांच्या Happy

धन्यवाद हीरा Happy

लालसिंग चढ्ढा बघायला गेलो होतो तेव्हा ब्रह्मास्त्रचा ट्रेलर बघितला होता. वर सस्मितने म्हटलं आहे तसंच, 'आपल्याला आवडण्यातला नाही' असंच मत झालं.
टीव्हीवर/ओटीटीवर येईल तेव्हा थोडा वेळ बघून आवडला तर पुढे बघणार.
(लालसिंगमधल्या शाहरुखच्या बारीकशा रोलच्या वेळीही थिएटरमध्ये लोक एकदम उत्तेजित झाले होते Happy )

Good, bad दोन्ही बाजूने चांगले परीक्षण लिहले आहे. ऋन्मेषचे लिखाण म्हणजे शाखाची एक्स्ट्रा स्तुती गृहीत आहेच Proud
मला रणबीर आवडत नाही त्यामुळे सिनेमा बघणार नव्हते पण पुढच्या भागात रणवीर दिपीका असण्याची शक्यता सगळ्यांनी मांडली आहे त्यामुळे पहिला भाग बघावा लागेल.
पाहुण्या कलाकाराला पाहून शिट्ट्या, टाळ्या, excitement हे आपल्याकडे नेहमीच असते असे मला वाटते. कारण लई भारी मध्ये सलमानच्या सोडाच पण जेनीलियाच्या एन्ट्री ला पण भरपूर शिट्ट्या, टाळ्या पडल्या होत्या.

क्यारेकटर्स नीट डेव्हलप नाही केलेत। शिवा मिस्टर इंडिया अनिल कपूर बनला आहे जो एका अनाथआश्रमात मुलांचा वाढदिवस सेलीब्रेट करण्यासाठी उड्या मारत, धावत पळत , सगळे धावण्याचे प्रकार करत जिथे पोचतो तिथले वातावरण , तिथली मुलं, एक काकू ज्या टेबलाच्या शेजारी बसल्या होत्या कोणाचं कोण नीट कळू नाही शकले . फक्त शिवा एक डीजेवाला विथ स्पेशल पावर जो एका इव्हेंट मध्ये एका मुलीवर फिदा होतो आणि तिच्या मागे लागतो बस झाले यांचे प्रेम सुरु। म्हणूनच त्यांचे एवढे इंटेन्स प्रेम गळ्याखाली नाही उतरत।

चित्रपटाच्या स्टोरीचे काय घेऊन बसलात ? शारुक ने पान मसाल्याची जाहिरात केली असती किंवा गेला बाजार बडबड गीते म्हटली असती तरी ऋन्मेऽऽष सरांनी तेवढ्याच आवडीने बघीतली असती. शारुक बघणे हीच प्राथमिकता बाकी सगळं दुय्यम असतं. हो ना सर ??

@ च्रप्स,
चाळीशी क्रॉस केलेल्या लोकांच्या जीवनात रोमान्स नसतो.. >>> शाहरूखने स्वतः पन्नाशी क्रॉस केली आहे. आज ना उद्या माझीही होईल. छे, असा कसा वय बघून रोमान्स संपेल Happy

@ वावे,
लालसिंगमधल्या शाहरुखच्या बारीकशा रोलच्या वेळीही थिएटरमध्ये लोक एकदम उत्तेजित झाले होते Happy
>>>>
तेवढ्यासाठी हा चित्रपट ओटीटीवर कधी येतोय याची वाट बघतोय Happy

रॉकेट्रीमध्ये सुद्धा तो आहे असे ऐकलेय. त्यातही चांगले केलेय असे ऐकलेय. तो चित्रपट असाही हिंदीत ओटीटीवर येईल तेव्हा बघायचा आहेच.

@ निल्सन,
लई भारी मध्ये सलमानच्या सोडाच पण जेनीलियाच्या एन्ट्री ला पण भरपूर शिट्ट्या, टाळ्या पडल्या होत्या.
>>>
ईथे बघुधा मराठी चित्रपटात बॉलीवूड कलाकार दिसले याचेच कौतुक असावे Happy

ब्रह्मास्त्रला बॉयकॉट करून चूक केली असा पश्चाताप आता लोकांना होत आहे असे या बातमीत म्हटले आहे.

https://www.lokmat.com/bollywood/ott-users-regret-missing-ranbir-kapoor-...

काही काही scenes चांगले आहेत. देवा देवा गाणं आवडलं. ती लोक आश्रमात पोहोचतात त्या अगोदरचा पाठलाग थरारक वाटला. पण परत तिथेही " शिवा शिवा " फारच irritate करतं.
देव कोण असेल याबद्दल उत्सुकता आहे.
आजच वाचलं , विजय देवरकोंडाशी बोलणी चालू आहेत.

विजय देवरकोंडाशी बोलणी चालू आहेत.>> हायला, अजून बोलणीच चालू आहेत. बहुधा साशंक असावेत. पहिल्या भागाला काय रिस्पॉन्स मिळतो हे बघून दुसरा भाग काढावा की नाही.

तो रोल निगेटिव्ह आहे आणि बहुतेक रणबीर कडून मारला जाणारा आहे.... रणवीर यश आणि रितिक आल्रेडी नाही म्हणाले...
मला वाटते रणबीर नेच करावा... रणबीर दीपिका पेयर बघून खूप दिवस झाले...

१) ब्रह्मास्त्र हे सिनेमाचे नाव आहे ते चुकीचे आहे.
ब्रह्मास्त्र ल धार्मिक लेबल तर आहेच पण ती जी कल्पना हजारो वर्षा पूर्वी केली गेली आहे त्याला काही अर्थ आहे.
ह्या विषयावर सिनेमा निर्माण करायचा असेल तर सखोल अभ्यास ,पुरावे, नीट मांडले पाहिजेत.
श्रद्धा शी निगडित हा विषय आहे

श्रद्धा कॅश करून व्यवसाय करणे मला तरी पटत नाही.
सिनेमाची सुरुवात होते..
ब्रह्मसत्र विषयी जुने संदर्भ दिले जातात..
.अर्थात च ते चुकीचे असतात.
नंतर सरळ शाहरुख हा संशोधक आहे त्याच्या ऑफिस मध्ये गुंड येतात असे की शाहरुख लं सहज चिरडून टाकतील .
त्यांना प्रवेश पण सहज मिळतो.
. शाहरुख कडे फॉर्म्युला असतो त्या साठी ते येतात
त्या नंतर शाहरुख जे माकड चाळे करतो.
ते बघूनच हा सिनेमा अगदी सुमार दर्जा च आहे हे लक्षात येते...
त्या पुढे हा सिनेमा कोणी बुध्दीमान माणूस बघेल असे मला तरी वाटत नाही

तो रोल निगेटिव्ह आहे आणि बहुतेक रणबीर कडून मारला जाणारा आहे.... रणवीर यश आणि रितिक आल्रेडी नाही म्हणाले...
>>>>>

शाहरूखने डर अंजाम बाजीगरमधील निगेटीव्ह रोल खाऊन टाकलेले.
त्यामुळे हे कारण काही पटत नाही. त्यात रणवीरने आधीच पद्मावतीचा खिलजी गाजवलाय.
बाई दवे,
हा यश कोण आहे?

ब्रह्मास्त्र ल धार्मिक लेबल तर आहेच पण ती जी कल्पना हजारो वर्षा पूर्वी केली गेली आहे त्याला काही अर्थ आहे
>>>>

ईतिहासाची छेडछाड करू नये हे ठिक आहे.
पण पुराण तर काल्पनिक असते. त्यात सिमेमेटीक लिबर्टी घ्यायला हरकत नाही. वा त्यातील संकल्पना आपल्या सोयीने वापरायलाही हरकत नाही.

त्या नंतर शाहरुख जे माकड चाळे करतो.
ते बघूनच हा सिनेमा अगदी सुमार दर्जा च आहे हे लक्षात येते...
>>>>>

सिनेमा संपल्यावर लक्षात राहतो तो शाहरूख
त्याचा सीन बघितल्यावर नव्वद टक्के पैसा वसूल. पुढे नाही बघितलाय तरी चालतेय.

Pages