लेह लडाख वारी भाग पाच

Submitted by pravintherider on 18 September, 2022 - 04:08

बिलासपूर ते मनाली दिनांक १५-०८-२०२२ अंतर १८५ किमी
आजची सकाळ हि आतिशय सुंदर होती. कारण हिमाचल प्रदेश मुळातच खुप सुंदर आहे आणि कोवळ्या उनात आजूबाजूचा परिसर छान दिसत होता. सकाळीच आम्ही हॉटेल सोडलं नी नाष्टा सुंदर नगर येथे करू अस ठरवलं. आज आमचा रस्ता मंडी, कुल्लू ते मनाली असा होता. ईकडे बुरहान ने समीर ला सांगितलं की, मंडी मध्ये मोठं मार्केट आहे मग काय काय घेणार याची यादी तयार केली. तो पर्यंत आम्ही सुंदर नगर पर्यंत पोहचलो पण ट्रॅफिक खुप होती नी त्यामूळे थोड पुढे जावून एका छान हॉटेल मध्ये नाश्ता करायला बसलो. मालक पण निवांत होते आणि महाराष्ट्रतील गाडी पाहून विचारपुस केली. त्यांनी सांगितलं की, मंडी मध्ये दोन दिवस झाले खुप पाऊस झाला आहे आणि आता पण आहे. रस्ता वाहून गेला होता नी जो थोडा चालू केला आहे त्या वर खूप ट्रॅफिक आहे. तर तुम्ही आता थोड मागे जा आणि डावीकडे वळून सरळ पंडोह चा रस्ता पकडा. रस्ता लहान पण चांगला आहे नी ट्रॅफिक नाही तुम्ही मंडी च्या पुढे निघाल. ऑनलाईन चेक केलं तर ट्रॅफिक होती मग काय करायचं हो नाही करता फिरलो मागे बघू काय होत.
खरंतर चंदिगढ मनाली हायवे खुप छान आहे, काम चालू आहे तेवढा सोडुन. हिमालया मध्ये प्रवास करताना तूम्ही किती आणि काही पण ठरवा तस होणार नाहीच... असो.
आम्ही नवीन रस्ता पकडला नी, सुरवातीला रस्ता खरचं छान होता. छोटी छोटी गावं, मस्त वळणदार रस्ता. चंडीगढ नंतर समीर ने आपण किती डोंगर पार करतो हे मोजायला चालू केलं होत पण दोन एक तासात त्याने नाद सोडून दिला. इतके डोंगर होते की काय करेल बिचारा. थोड्या वेळाने चढण सुरु झाली नी रस्ता लहान लहान आणि खराब होत चालला होता. अधे मधे काही गाडी येत  तेव्हा तिला रस्ता देताना काय काय करावं लागत होत ते मला नी समीर ला माहीत. गणेश आणि बुरहान मस्त झोपले होते. एक दोन वेळा तर हिमाचल मधील बस चालक काही इंचा वरून गाडी जोरात घेवून गेला. त्या नंतर मात्र आम्ही सरळ गाडी उभी करायचो जा बाबा... मग तो ट्रक, स्थानिक गाडी किंवा बस किंवा कोणी मागून  हॉर्न वाजवत आला तर साइड ला गाडी घेवून त्याला वाट देत देत आम्ही पांडोह ला एक पर्यंत पोहचलो. रस्ता अपक्षेपेक्षा जास्त खराब आणि अरुंद होता. पंडोह नंतर परत आम्ही मनाली हायवे ला लागलो. रस्ता खुप छान आणि सुंदर होता. कुल्लू बायपास ला थांबून छान छान फोटो आणि व्हिडिओ काढले. आम्ही कुल्लू जवळ एक छान हॉटेल पाहून जेवायचं ठरवलं पण रस्ता बंद असल्याने काही हॉटेल मध्ये मोजके पदार्थ तयार होते. मग विचार केला की, आता सरळ मनाली जावूया तो पर्यंत खुप ठिकाणी पॅराग्लायडिंग नी रिव्हर राफ्टिंग चे बोर्ड होते पण वातावरण खराब असल्याने आम्ही न थांबता सरळ मनाली ला निघालो. साधारण तीन पर्यंत आम्ही मनाली पोहचलो होतो आणि प्रवेश शुल्क म्हणून त्यांनी २५० रुपयांची पावती घेतली. आम्ही टोल नाका पार करून पुढे गाडी घेतली तर एक हॉटेल दिसलं, बुरहान जानेवारी मध्ये येवून गेला होताच पण त्या वेळी खुप महाग हॉटेल होते. सहज चौकशी केली तर फक्त ₹ ८००/- मध्ये रूम देणार बोलला. त्याला बोललो परत जावून विचार एकाच की चौघांचे कारण हॉटेल पाहून इतकं स्वस्त देईल अशी अपेक्षा नव्हती माझी ते पण पार्किंग व्यवस्था पण छान होती. पूर्ण ट्रिप मध्ये मी सर्वात महाग हॉटेल मनाली मध्ये मिळेल अशी अपेक्षा केली होती जे की सर्वात स्वस्त होटेल मिळालं. आम्ही मग पटकन आवरून लगेच हिंडीबा माता मंदिर पहायला निघालो. आम्ही गाडी घेवून गेलो, पण कोणी जाणार असेल तर गाडी सरळ पार्किंग मध्ये लावुन ऑटो ने जा. जास्त महाग नाही पण रस्ता खुप अरुंद आणि वर पार्किंग ला जागा कमी आहे त्यात गाडी जर चढावर उभी केली तर अजून त्रास होतो. स्थानिक लोक मदत नाही करत लवकर, कारण त्यांना पण त्रास होतो. ये जवानी है दिवानी  हा चित्रपट माझा आवडता आहे आणि तेव्हा पासून ईकडे येण्याची इच्छा होतीच. मंदिर आणि परिसर नितांत सुंदर आहे. मनसोक्त फोटो घेतले नी गुपचूप गाडी पार्किंग ला लावून आम्ही मॉल रोड वर फिरायला आलो. पाऊस येत जात होता मग एक छत्री विकत घेतली एक जवळ होती पण ती चौघांना अपुरी होती.
समीर आणि गणेश ने वेळेचा सदुपयोग करत मनसोक्त खरेदी केली. आम्ही पाऊस आणि थंडी त्या मुळे जेवण करूनच हॉटेल वर जायचं ठरवलं तो पर्यंत बुरहान ने सांगितलं की आपण ओल्ड मनाली जावूया. मग एक ऑटो मध्ये चार जण जे तो नाही बोलत होता मग गणेश ने समीर ला मांडीवर घेतो सांगून त्याला गप्प केलं नी आम्ही निघालो तर तिकडे पण छोटा सा मॉल रोड होता पण कॅफे मात्र एका पेक्षा एक होते. आम्ही साधारण एक तास फिरून परत ऑटो नेच मनाली मध्ये आलो तो पर्यंत आज जेवण नाही तर मोमोज, नूडल्स खायचं हे नक्की केलं होत. पोटभर खादाडी आणि मनसोक्त खरेदी करून आम्ही रूम कडे येत होतो तर गाडी मध्ये मागील टायरची हवा कमी झाली होती. सोबत हवा भरायची सोय होतीच मग हवा फुल्ल करून हॉटेल वर परतलो.
आज जास्त अंतर पार नाही केलं मग उद्या काय करायंच यावर चर्चा केली, बुरहान आणि गणेश ची खुप इच्छा होती पॅराग्लायडिंग करायची पण वातावरण खराब होत. मग सर्वांनी असं ठरवलं उद्या वातावरण ठीक झालं तर आपण एक मुक्काम अजून करू आणि नाही झालं तर उद्या सोलान व्हॅली पाहून केलोंग ला मुक्काम करू...
पण हिमालय... उद्या अजूनच नविन रंग दाखवणार होता...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users