लेह लडाख वारी भाग दोन

Submitted by pravintherider on 14 September, 2022 - 09:41

इगतपुरी ते मंदसौर दिनांक १२-०८-२०२२ अंतर ६०० किमी.
आज आम्ही ठरवल्या प्रमाणे मंदसौर पर्यंत प्रवास करणार होतो. मंदसौर येथे पशुपति नाथ मंदिर आहे. फार प्रसिद्ध आणि भव्य मंदिर आहे. श्रावण महिना असल्याने आम्ही तेथे जाणार हे ठरवलं होत. त्या प्रमाणे पहाटे लवकर उठून तयारी सुरू केली पण घरात सर्वजण उठले कारणाने थोडा उशीर झाला पण आम्ही पहाटे पाच वाजता निघालो आणि पहिले ग्राम दैवत मारुती मंदिरात दर्शन घेऊन निघालो.
गाडी मध्ये डिझेल फुल्ल केलं होतं त्यामुळे काही ब्रेक घेणार नव्हतो. गाडी बहुतांश मीच चालवणार होतो आणि मी ठरवलं होत की शक्यतो रात्री प्रवास नाही करायचा आणि ताशी ८० ते ९० वेगाने जायचं. आम्ही आज इगतपुरी नासिक धुळे रतलाम मंदसौर पर्यंत प्रवास करणार होतो. साधारण नासिक पासुन पुढे वातावरण खुप गरम होत आणि रस्ता छान आणि वाहतूक पण कमी होती. आम्ही मालेगाव च्या पुढे गेलो असेल आणि मला वाटलं की गाडी नीट चालत नाहीये साईड ला घेवून पहिले तर टायर पंक्चर झालं होतं मग टायर बदली केला नी धुळे मध्ये जावून पहिले पंक्चर काढून घेतली. धुळे च्या पुढे एक छान हॉटेल पाहून नाश्ता करून घेतला. तस तर हा रस्ता पूर्ण चार पदरी आहे आणि नासिक नंतर ट्रॅफिक पण कमी होते त्यामूळे एक सलग वेगात आम्ही रस्ता कापित चाललो होतो. आम्ही साधारण दुपारी तीन वाजेपर्यंत मध्य प्रदेश मध्ये प्रवेश केला होता मग सेंधवा च्या पुढे एक ढाबा बघितला आणि जेवायला थांबलो. मस्त दाल तडका आणि भात मागवला बाकी थोड घरून निघताना सोबत घेतलं होतं. जेवण करत होतो तोच काही ट्रक चालक बोलत होते ते ऐकलं की, धार वरून जाणारा रस्ता बंद केला आहे कारण एक दिवस आधी खूप पाऊस झाला असल्याने धरण फुटण्याची शक्यता आहे. आम्ही तस चेक केलं आणि पटकन निघालो तर धार साठी असणारा रस्ता चुकून मागे गेला मग काय थोडं पुढे जावून परत मागे आलो नी धार - मंदसौर रस्ता पकडला. तस तर रस्ता आता चार पदरी वरून दोन पदरी झाला होता पण रस्ता खरंच छान होता. तो रस्ता सुरु झाला नी लगेच छोटा घाट लागला नी पूर्ण घाटात साईड ला गाडी उभी करून लोकं उभी होती आणि पोलिस पण खूप. आम्ही वर जावून विचारलं तर कळलं की, धरण फुटलं तर पहायला ही लोकं उभी होती. आम्ही सरळ मग आमचा रस्ता पकडला. घाट चढून गेल्यावर मात्र पावसाची एक जोरात सर आली नी गेली. मग एक एक गाव मागे टाकत आम्ही साधारण साडे सहाच्या दरम्यान मंदसौर च्या पाच किमी अंतरावर एक भारत म्हणून हॉटेल दिसले सहज विचारून बघू, किती मध्ये रूम मिळेल या हिशोबाने त्याने आमच्या अंदाजा पेक्षा जरा जास्त कमी रक्कम सांगितली फक्त आठशे रुपये ते पण दोन मोठे बेड आणि तरी हवं असेल तर एक्सट्रा गादी मग काय लगेच रूम घेवुन आराम करायचं ठरवलं. (शेवटी मी माझं अंदाज पत्रक आणि प्रत्यक्षात आलेला खर्च टाकेलच) रात्री पण साधं जेवण मागवलं कारण आम्ही सर्वांनी ठरवलं होतं की, जास्त मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ प्रवासात कमी करायचे जेणे करून त्रास होणार नाही आणि खरंच झाला पण नाही. एक तर मी पूर्ण शाकाहारी, गणेश आणि समीर ला श्रावण तर बुरहान ला जेवण वाया गेले तर आवडत नाही आणि एकट्याला मांसाहारी जेवण मागवून संपणार नाही म्हणून तो पण शाकाहारी. पुर्ण प्रवासात त्याने केवळ एकदा ऑमलेट पाव आणि एकदा चिकन सूप मागवलं... असो.
आम्ही लवकरच जेवण मागवलं तो पर्यंत उद्या कुठ पर्यंत प्रवास करणार आणि रस्ता कोणता यावर चर्चा केली. तस तर सर्व तयारी करून गेलो होतो मात्र कुठे ही आगावू बुकींग केलं नव्हतं कारण तिथं पर्यंत मग पोहचण्या साठी विनाकारण घाई करावी लागते आणि तीच नको होती... पहिला दिवस आणि जवळ जवळ पूर्ण वेळ गाडी मध्ये होतो मग सुरवातीला फोटो खुप कमी आहेत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान प्रवासवर्णन! पुढेमागे ह्याच रूटने (मी घोटीहून प्रवास चालू करणार आहे) हा प्रवास करायचे ठरवतोय. आपण जिथे खाण्या राहण्यासाठी थांबलात त्या हाॅटेल / धाबे यांची नावे व इतर तपशील (आवडलेले /नावडलेले पदार्थ/रहाण्या-खाण्याचे अंदाजे दर) दिलेत तर आपली लेखमाला ट्रॅव्हल गाईड म्हणूनही वापरायला आवडेल.