कॉलेजचे ते मोरपिशी दिवस- हाडळीचा आशिक

Submitted by हाडळीचा आशिक on 12 September, 2022 - 02:58

डिस्क्लेमर- नियमांतल्या त्रुटी शोधणं आणि त्यातनं पळवाटा काढणं हा आमचा आयडीसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवतोच. Proud

नियम क्रमांक एक-
लिहिणारा मायबोलीकर आहे.
नियम क्रमांक दोन-
शीर्षकातील कॉलेज आणि मोरपिशी अनुभव एवढे उल्लेख लेखनात असणं पुरेसं ठरावं. Happy

मोरपिस !
पडद्यावर जेव्हा दोन फुलं एकमेकांना हलकासा स्पर्श करीत इर्द-गिर्द डोलतात तेव्हा स्त्रीला बाळ होतं हा महामंत्र आपल्याला हिंदी सिनेमानं जसा दिला तसाच वहीच्या पानांमध्ये लपविलेल्या मोरपिसालाही कालांतरानं बाळ होतं, ते एकाचे दोन होतात हा कोणा विद्वानानं रुढ केलेला कानमंत्र आमच्या दिदीनं मला माझ्या लहानपणी दिल्याचं आठवतंय. मोरपिसाबाबतची ही गोड समजूत पुढे वय वाढलं तशी अक्कल येऊन दूर झाली पण तरीही चौथी किवा पाचवीत असताना वहीच्या पानांमध्ये लपवलेलं ते मोरपिस अकरावीला जाईपर्यंत मी सांभाळून ठेवलं होतं. दरवर्षी इयत्ता बदलत राहीली तसे वह्या, पुस्तके, दप्तर आदी सगळं बदलत गेलं पण ती मोरपिस ठेवलेली शंभर पानी कवितेची वही दप्तरात तशीच व्यवस्थित सांभाळली जात होती. का ते तेव्हा कधी मला उमगलं नाही. आजही उमगत नाही. आणि त्यानं काही फरकही पडत नाही.

अकरावी !
आमच्या आबांनी मला तालुक्याला नेलं, कॉलेजला प्रवेश घेतला तेव्हा मी मनोमन हरखून गेले होते. पण हे हरखणं फार वेळ टिकलं नाही.
"तुला चांगले मार्कं पडले म्हणून येथे कॉलेजला घालतोय नाहीतर आपली शिकण्याची ऐपत नाही तेव्हा गपगुमान नाकासमोर चालत रहा. काही वाह्यातपणा करशीन तर तुझं लग्न लावून देईन." उपकार केल्यागत आलेल्या आबांच्या त्या शब्दांनी मला चीड आणलेली.. पण... पण काही नाही.

"हो आबा." मी शांतपणे उत्तरले.

माझं सर्व व्यवस्थित मार्गी लावून आबा वाडीला परतले तेव्हा सुटल्यागत मोकळं मोकळं वाटलं होतं. नाही म्हणून माझ्याकडे लक्ष ठेवायला गावातली सुमी सोबत होती. ती बारावीला अन् मी अकरावीला. माझी आयुष्यातली पहीली रूममेट.

ज्युनियर कॉलेजचा पहीला दिवस. बाजूच्या बेंचवर बसलेला तो
कुरळ्या केसांचा चुणचुणीत गोरा मुलगा माझा पहीला वास्तवातला क्रश होता. ही क्रश वगैरे विशेषणं नंतरची..तेव्हाचं असलं काही विशेषण आता आठवत नाही.. बहुतेक ते नव्हतं. तो मला आवडणं हे फक्त माझ्यापुरतं सिमीत होतं. त्याला चोरुन बघणं. त्याच्याशी कधी नजरानजर होताचं 'मी नाही त्यातली' अशा रितीनं तोंड फिरवणं असं तिनचार आठवडे चाललं पण एके दिवशी त्याला पहील्या रांगेतल्या गब्दुल प्रितीशी गुलूगुलू बोलताना पाहीलं आणि माझा त्याच्यातला इंट्रेस्ट कायमचा संपला.

घटक चाचणी एक

सात मार्कांचे एमसीक्यू त्यानं सातवेळेस इशारे करुन मला सांगितले तेव्हाच त्याच्याशी सात फेरे घेण्याचं मी मनोमन ठरवून टाकलं होतं कारण त्याआधी कधीही नोटीस न केलेले त्याचे गहीरे डोळे. मला त्या डोळ्यांनी विलक्षण वेड लावलं. गौतम त्याचं नाव... गौतम साळवे.
चाचणी परीक्षा संपल्यानंतर कधी एकमेकांसमोर आल्यावर ओळखीचं हसलं जायचं. बोलणं मात्र कधीतरी क्वचितच व्हायचं. तेही मोजकंच एक दोन शब्दांचं. भीड अजून चेपली नव्हती. कुठेतरी आबांची धास्ती मनात घर करुन बसलेली होती. अशात सहामाही परीक्षा संपली.

सहामाहीचा शेवटचा पेपर झाला त्या दिवशी संध्याकाळी सुमीला न्यायला एकजण रुमवर आला होता. तो कोण, कुठला मला जराही ठाव नव्हतं पण त्याची मला बघणारी ती हिडीस नजर धडकी भरवून गेली.

"कोण गं तो ?" दुसऱ्या दिवशी सकाळी रुमवर परतलेल्या सुमीला मी विचारलंच.

"सतिष...लग्न करणार आहोत आम्ही !" सुमीनं सांगितलं. कुठं काही बोलू नकोस असंही म्हणाली. आधी मी शांत राहीले. 'आपल्याला काय' असं म्हणत दुर्लक्ष करायचं ठरवलं पण मग मला त्याची कालची ती नजर आठवली आणि 'पुन्हा त्याला इकडे येऊ देऊ नकोस नाहीतर...' असं तिला ठामपणे ठणकावून टाकलं. माझी अनपेक्षित प्रतिक्रिया तिला बरीच जड गेली हे मला जाणवलं पण ती त्यावेळी शांत राहीली होती.

सहामाहीच्या सुटीनंतर रुमवर परतले तेव्हा एकदा सहज सुमीशी बोलताना मी, मला वर्गातला गौतम आवडत असल्याचं तिला विश्वासानं सांगून टाकलं. तिचं सिक्रेट माझ्याजवळ होतं म्हणून गौतमबद्दल तिला सांगण्यात कसलीही भिती वाटली नाही. तिनंही मला साथ देण्याचं कबूल केलं. आता मला पुढचं पाऊल टाकायचं होतं. कशी कोण जाणे भीड आता चेपली होती. आजूबाजूला अनेकांच्या जोड्या जमत असताना आपणच मागे का ही भावना पुढचं पाऊल उचलण्यास भाग पाडत होती का.. बहुधा !

वर्गातलं त्याचं चोरुन न्याहाळणं मला माहीती होतं. मलाही ते हवंहवंसं वाटायचं. गालांवरुन कोमल, मऊ-मुलायम मोरपीस फिरवल्यागत ते गुदगुल्या करायचं. अंतरंगात गोड लहर उमटायची. ते वय तसं होतं. चंचल..अल्लड...भावविभोर... धुंद...

कधीतरी त्यानं मुद्दामहून बेंचवर सोडलेली वही वर्गात दुसरं कुणी नसताना माझ्या हाती लागली. शेवटच्या पानावरती त्यानं काढलेला बदाम...त्याचे दोन कप्पे...एकात त्याचं स्वतःचं नाव अन् दुसऱ्यात फक्त एक आद्याक्षर.. माझंच असेल का... की ऐश्वर्याचं... की आणखी दुसऱ्या कोणाचं... मनात विचार येताच द्वेष, मत्सर, जलन इ. कायकाय वाटून गेलं. मग मीही हट्टाला पेटले. त्याची वही सॅकमध्ये कोंबली आणि रुमवर परतले. आता उद्याची वाट बघणं आलं पण हरकत नाही हा विषय आता तडीस न्यायचाच असा मनाशी निश्चय केला. रात्रभर ती वही जवळ घेऊन झोपले. पहाटे कधीतरी तो स्वप्नातही आला.

"तुझी वही" दुसऱ्या दिवशी कॉलेज सुटल्यावर त्याला एकटं गाठून त्याच्या हाती वही देत मी म्हटलं.
"थॅंक्स !" वही हाती घेत तो छान हसला. जाण्यासाठी वळला. आता पुन्हा वाट बघणं आलं. नाही..मला ते वाट बघणं मान्य नव्हतं. मी अस्वस्थ झाले पण काय करावं ते काही सुचेना. तोंडातून पटकन 'अरे...' निसटून गेलं.
तो थबकला. प्रश्नार्थक मागे वळला. मी भुवयानं निर्देश करुन त्याचं लक्ष हातातील वहीकडे वेधलं. त्यानं उत्सुकतेनं वही चाळली. शेवटच्या पानावर स्थिरावला.. काही क्षण रेंगाळला आणि मग मी ठेवलेलं ते मोरपिस हाती घेत गोड हसला. मी पुर्ण केलेलं ते नाव..तो बदाम त्याच्यावर त्यानं हलकेच ओठ टेकवले. मला माझं उत्तर मिळालं होतं. मी अंगांगं मोहोरले. हेच प्रेम होतं का...की आकर्षण... माहीती नाही. जे काही होतं ते सुखद होतं आणि मला हवंसं होतं.

सोबतचे सगळेजण कॉलेज करायचे. आम्ही दोघे खंडोबाचा पायथा करायचो. त्या पायथ्याला असलेल्या गर्द झाडीतून वाहणारा एक पाणथळ ओढा ही आमची एकांत भेटीची जागा होती. एकदुसऱ्याच्या सोबत ओढ्यातील घोटाभर पाण्यात पाय सोडून तेथील खडकावर तासनतास निवांत बसणं हा आमचा आवडीचा उद्योग झाला. आधी निव्वळ निःशब्द बसून राहणं पुढे निरंतर गप्पांत बदललं. आधीचे चोरटे मोहक कटाक्ष निसटत्या आणि ओझरत्या स्पर्शांत बदलले. अशातच कधीतरी साथसंगत करायला बाबूजी आणि आशाताईंचे स्वर आले आणि मग मात्र ही 'धुंदी कळ्यांना' पासून सुरु झालेली आमची अवस्था काही दिवसांत 'सुखाच्या उखाण्या'पर्यंत पोहोचली. या सगळ्या बेधुंद करणाऱ्या क्षणांना लवकरच चिरंजीवित्वही लाभणार होतं !
पण...
...पण कसं कोणास ठाऊक आमच्या आबांना आमच्या उद्योगांचा सुगावा लागला होता. त्या दिवशी दुपारी आबांनी आम्हाला तेथे सोबत पकडलं. सावज हेरण्यासाठी दबा धरुन बसणारा शिकारी आणि त्यादिवशी त्या गर्द झाडीत लपून राहीलेले आमचे आबा मला सारखेच क्रूर वाटले.
आबांनी कोणतीही संधी न देता आधी आम्हा दोघांना मुस्काडलं मग त्याला लाथा-बुक्क्यांनी तुडवलं. आमचा आक्रोश ऐकायला तो ओढा आणि तेथील ती गर्द झाडी सोडून दुसरं कोणीही नव्हतं. आम्हाला हाणमार करताना आबांच्या तोंडाचा पट्टा ब भ ग च्या बाराखडीनं सतत चालू होता. हे सगळं होत असताना त्यांनी त्याची इत्यंभूत माहीतीही त्याच्याकडनं वदवून घेतली होती आणि शेवटी त्याला तेथेच तसं एकटं सोडून सोबत आणलेल्या भावकीतल्या दत्तू पाटलाच्या राजदूतवर टाकून मला वाडीला कायमचं परत आणलं. या सगळ्यामागे कळ लावणारी सुमी होती हे मला पुढे काही वर्षांनंतर कळलं होतं.

संध्याकाळी आत्याला तातडीचा निरोप धाडला गेला. दोन तासांचा प्रवास करुन तिचा मोठा लेक तिला घेऊन रात्री नऊ साडेनऊच्या सुमारास घरी आला. तिला सर्व काही कथन करुन 'आक्का, भाऊची ही पोर आता तुझी...तूच पदरात घे आणि सांभाळ' म्हणून रितसर बोलणं केलं गेलं.
यांच्या सगळ्यांच्या वाक्या वाक्यागणिक गोधडीत स्फुंदणारी एकाकी मी पुरते कोलमडून पडले. आपल्याला आपलं असं कोणी नाही ही लहानपणीपासून मनात जपलेली भावना आता प्रबळ होऊ लागली. आत्याला मात्र आनंदाच्या उकळ्या फुटल्या. नाकीडोळी नेटकी असणारी देखणी सून कोणाला नको असते ? शिवाय आता आमची-आबांची पडती बाजू..धूर्त कावेबाज तिनं आबांकडून मोठा हुंडा कबूल करवला. त्यावेळी माझं वय होतं अवघं पावणेसोळा वर्षांचं !

या जगात आपलं असं आता कोणीच उरलेलं नाही ही जाणिव भल्या पहाटे मला मळ्यातल्या विहीरीवर घेऊन गेली. आपल्याला चांगलं पोहता येतं म्हणून विहीरीत मरणं इतकं सोपं नाही हे कळत होतं पण विहीरीचा तळ मला खुणावत होता. आत उतरायचं आणि भरपूर पोहायचं. अंगातलं त्राण संपेपर्यंत पोहून गहाळ व्हायचं आणि बुडून मरुन जायचं असा मनाशी निर्धार केला. विहीरीच्या कड्यांना धरुन मी खाली विहीरीत उतरणार एवढ्यात जमिनीवरील पाचोळ्याच्या आवाजानं कोणाच्यातरी येण्याची चाहूल लागली. मी आवाजाच्या दिशेनं अंधारात बघितलं. तो जवळ आला तशी त्याची ओळख पटली.

संग्राम !

आत्याचा मोठा लेक. हा येथे कशाला.. आता ? मी वैतागले.

"तू...तुम्ही...." स्वतःच्या नकळत पुटपुटले.

"मरायचंय ?" विहीरीकडे हात दाखवत तो हसला. जवळ आला.
मी शरमेनं मान खाली घातली.

"वेडी !" विहीरीच्या कठड्यावर बसत तो उद्गारला. मलाही स्वतःच्या जवळ बसवलं.

पुढील काही मिनिटे शांततेत गेली.

"शिकायचंय ?"
खाली मान घालून बसलेल्या मला त्यानं फक्त एकच प्रश्न विचारला.

माझ्या मनातलं पहिल्यांदाच कोणीतरी मला विचारत होतं. पण मी तरीही गप्प होते. त्यानं हातानं माझ्या हनुवटीला वर उचललं. खोलवर माझ्या डोळ्यांत बघून मला तोच प्रश्न पुन्हा विचारला. आता मात्र मला रडू कोसळलं. जवळ घेत पाठीवर थोपटत त्यानं मला शांत केलं. 'तू शिक पुढे' बोलून दिलासा दिला. आबांना शांत करण्याचं वचनही दिलं. मला त्याच्या आधारानं हायसं वाटलं. त्याच्याबद्दल अपार आपलेपणाची भावना निर्माण झाली. 'हाच आपला होणारा नवरा' या पुसटश्या विचारानं कुठेतरी एक सुखद गुदगुल्या करणारी क्षणिक लहर त्या तशा प्रतिकूल परीस्थितीतही उरातनं निघून गेली. माझं मरणं कॅंसल झालं. मी जगायचं ठरवलं.

"हिच्या मावशीकडे पाठवून हिचं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण पुर्ण करा मगच मी लग्न करेन." संग्रामनं आबांना अट घातली. आबांचा चेहरा खर्रकन् उतरला आणि त्यांनी आत्याकडे बघितलं. आत्या संग्रामशी भांडायला उपटली. मोठं भांडण झालं पण संग्राम आपल्या अटीवर ठाम राहिला. शेवटी आबा, आत्याला माघार घ्यावी लागली. त्यावेळी मला संग्रामचं मोठं अप्रूप वाटलं होतं. त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचा मी मनोमन निश्चय करुन टाकला. पण तरीही ते एक वर्ष वाया गेलं. बरंच उणंदुणं ऐकत, गळ्यात पडेल ते मळ्यातलं काम करीत वर्ष कसंबसं पार पडलं आणि मग मला मावशीकडं धाडण्यात आलं. गाव बदललं, कॉलेज बदललं. मावशीचं लक्ष माझ्यावर होतंच. मीही आता तेथे बऱ्यापैकी रुळले. कॉलेजमध्ये, अभ्यासातही रमले. प्रेम सोडून बाकी सर्व काही एंजॉयही करु लागले. आता प्रेम म्हणजे फक्त संग्राम एवढंच ठाऊक होतं.

....आणि त्या दिवशी सकाळी संग्राम घरी आला. त्याला बघून गोरीमोरी झालेली मी लाजून आत किचनमध्ये पळाले होते.
संग्राम आला, काही वेळ थांबला. मला घरी न्यायला आलोय असं मावशीला सांगून अगदी सहज सोबत घेऊनही गेला. त्याच्यासोबतचा तो बाईकवरचा प्रवास म्हणजे आयुष्यातला एक आनंददायी अनुभव होता. तो प्रवास संपूच नये असं मनोमन खूप वाटत होतं.

कुठं घेऊन चाललाय हा मला...काय आहे याच्या मनात... अनेक अनुत्तरीत प्रश्न होते तरीही मी गप्प आणि शांत होते.

त्यानं मला त्याच्या शहरात आणलं. बरंच हिंडवलं. मला हवं ते निवडण्याचं स्वातंत्र्य देऊन कायकाय खरेदी करवलं. आयुष्यात पहील्यांदाच स्वतःसाठी मी मनासारखी खरेदी केली होती. जे तोवर घातलं नाही, वापरलं नाही असं बरंच कायकाय त्यादिवशी घेतलं होतं. ते निवडण्यात त्यानं मदतही केली. नंतर त्यानं मला खाऊ घातलं आणि मग त्याचं कॉलेज दाखवायला घेऊन गेला. सगळं कॉलेज फिरून दाखवलं आणि शेवटी आम्ही त्याच्या कॉलेजकॅंटीनमध्ये आलो.

"ही पायल !" बोटानं तिच्याकडे निर्देश करीत संग्राम म्हणाला.
"हाय !" तिनं हात पुढे केला.
"......" मला काय बोलावं तेही सुचलं नाही. तिच्याशी कसाबसा मी हात मिळवला. ती मात्र मोकळेपणानं हसली. काही क्षण असेच शांततेत गेले आणि एकदम
"आम्ही दोघं लग्न करणार आहोत." संग्राम बोलून गेला.
डोळे कधी पाणावले कळलंच नाही. सगळं धूसर धूसर दिसू लागलं. ते दोघं पुढे बरंच काही बोलत राहीले जे माझ्या कानात घुसलंच नाही. फक्त दोघांच एकच वाक्य कायमस्वरुपी मनावर कोरलं गेलं.

"तू शिक पुढे...खूप शिक.. खूप मोठी हो !"
आता मला फक्त शिकायचं होतं ! फक्त शिकायचं होतं !

ग्रॅज्युएशनचं शेवटचं वर्ष आणि तो शेवटचा दिवस होता. तब्बल दोन वर्षे थांबून त्यानं मला प्रपोज केलं होतं. मला त्याच्या भावना आधीपासूनच माहिती होत्या. दोन वर्षे मीही ते त्याचं सोबत असणं मनापासून एंजॉय केलं होतं पण त्याला कधीच काही बोलले नाही कारण आधीचे जुने कटू अनुभव गाठीशी होते. कधीतरी तोच बोलेन, विचारेन याची मात्र मनोमन खात्री होती. झालंही तसंच..पण खूप..खूप उशीरा.. त्यानंच वेळ काळ ठिकाण सर्वकाही निवडलं होतं.. तो बोलला.. त्यानं विचारलं. मी मात्र 'घरी ये' बोलून त्याच्या कोर्टात चेंडू ढकलला होता. निर्णय त्याला घ्यायचा होता. आपण केवळ त्याला, त्याच्या निर्णयाला सपोर्ट करायचा हे मी मनोमन ठरवून टाकलं होतं.

मी त्याला दिलेलं घरी येण्याचं निमंत्रण त्यानं नाकारलं नव्हतं पण तो मात्र कधीच आला नाही. सगळे प्रयत्न करुनही त्याच्याशी पुन्हा कधी संपर्क झाला नाही. काही वर्षांनंतर अचानक एके दिवशी एका अनोळखी नंबरवरुन त्याचा फोनकॉल आला. मी तेव्हा ऑफिसमध्ये होते.

"हॅलो कोण ?"

"मी.. मी..." आवाज आजही ओळखीचा वाटला.

"तू ?... इतक्या दिवसांनी ?" मी अंदाजानं विचारलं.

"भेटायचंय तुला एकदा." त्याच्या आवाजात आर्जव होतं.

"अरे नक्कीच ! सांग, कुठं यायचं ? की तू येतोस ?" मला मनोमन आनंद झाला.

"तूच ये !" तो थोडं थांबला आणि पुढे म्हणाला,

"तू येशीनच पण त्यालाही सोबत आण."

"क्...कोणाला ?" मला प्रश्न पडला.

"तुझ्या नव्या प्रियकराला." तो शांतपणे उत्तरला.

आता मात्र मी गोंधळले पण तरीही

"बरं.. पण कुठं आणि कधी ?" स्वतःला सांभाळत मी पुन्हा विचारलं.

"गर्द झाडी.. पाणथळ ओढा...खंडोबाचा पायथा....येत्या अमावस्येला !" तो थंडपणे उद्गारला.

एकाएकी अंगावर शहारा आला. तोंडाला कोरड पडली. हातपाय थरथरु लागले आणि सुन्न होऊन मी जागीच कोसळले.

डोळे उघडले तेव्हा मी घरी होते.

"उठलीस ! आता कसं वाटतंय ?" समोर बसलेल्या लेखकानं स्मित करीत विचारलं.

"आता बरीये."

"मग निघूयात ?"

"कुठं ?"

"गर्द झाडी.. पाणथळ ओढा... खंडोबाचा पायथा...."

मी म्हणालो तशी ती पुन्हा भान हरवू लागली.

धन्यवाद !
_हाडळीचा आशिक /११-१२/९/२२

• शुद्धलेखन आणि व्याकरणाच्या चुकांबद्दल माफी असावी. Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळं बदलत गेलं पण ती मोरपीस ठेवलेली शंभर पानी कवितेची वही दप्तरात तशीच सांभाळली जात होती. का ते तेव्हा कधी मला उमगलं नाही आजही उमगत नाही. त्यानं फरकही पडत नाही.>>+१११
अगदी कमी आणि मोजक्या शब्दात दडलेला आशयघन.

अरे मगाशी मला ' अकरावी ' पर्यंतच दिसले होते.आता 2 तासांनी पहाते तर अजून लिहिले आहे!

हा तर पिसारा Lol
छान लिहिलंय. शेवटी लेखक नसता तरी चाललं असतं. ऐसा भी होता है लाईफमे.

<<सहामाहीचा शेवटचा पेपर झाला त्या दिवशी संध्याकाळी सुमीला न्यायला तो रुमवर आलेला. तेव्हाची त्याची ती हिडीस नजर मला धडकी भरवून गेली होती.>> इथे जरा गोंधळ झाला. मधेच हे लिहिल्याने सुमीला न्यायला गौतमच आला असं वाटतंय.

छान कथा!
ते लेखक प्रकरण समजलं नाही. नसतं तरी चाललं असतं.>>+१

आता पूर्ण वाचली.कथा आवडली.
सतिष्ची हिडीस नजर?
मी म्हणालो तशी ती पुन्हा भान हरवू लागली.....
इथे लेखक म्हणाला तशी मी पुन्हा..असे हवं होते का?

सूर्या, केशवकूल, देवकीताई, Ajnabi, मृतै, MazeMan, आबा, सस्मित, sonalisl, च्रप्स सगळ्यांना मनापासून धन्यवाद ! Happy

अरे मगाशी मला ' अकरावी ' पर्यंतच दिसले होते.आता 2 तासांनी पहाते तर अजून लिहिले आहे!>>>
'लास्ट मिनिट सबमिशन'मुळे आधी अकरावीपर्यंतच लिहीलेला धागा प्रकाशित केला होता. Lol

ते लेखक प्रकरण समजलं नाही. नसतं तरी चाललं असतं.>>>शेवटी लेखक नसता तरी चाललं असतं.>>>>
खंडोबाच्या पायथ्याशी काहीतरी (कथेत न लिहिलेलं) घडलं होतं त्याकडे (पुन्हा) लक्ष वेधण्यासाठी शेवटी लेखक प्रकरण वाढवलं.

<<सहामाहीचा शेवटचा पेपर झाला त्या दिवशी संध्याकाळी सुमीला न्यायला तो रुमवर आलेला. तेव्हाची त्याची ती हिडीस नजर मला धडकी भरवून गेली होती.>> इथे जरा गोंधळ झाला. मधेच हे लिहिल्याने सुमीला न्यायला गौतमच आला असं वाटतंय>>>>
हो ही लेखनात झालेली चूक होती ती दुरुस्त केली. धन्यवाद.

सतिषची हिडीस नजर?>>>
वखवखलेली लिहायचं होतं. ही कथेची गरज होती.

इथे लेखक म्हणाला तशी मी पुन्हा..असे हवं होते का?>>>नाही. ते मीच म्हणालोय. Lol

पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. Happy

छान लिहिली आहे. आवडली. हाडळीचे विचार आणि भावना सुंदर टिपल्या आहेत. हाणामारीतही निसर्गवर्णन असलेली कथा हे वैशिष्ट्य.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद अस्मिताई Happy
या कथेसाठी मला मतदान केलेल्या माबोकरांचे आभार Happy