मर्मबंधातील एखादे नाते - साक्षी

Submitted by साक्षी on 11 September, 2022 - 06:20

'जगायला ना नाहीये ग माझी, पण हे असं अंथरुणात पडून जगायची इच्छा नाहीये.' आईचं बोलता येत असतानाचं माझ्याशी बोललेलं शेवटचं वाक्य! नंतरचे तीन दिवस फार अवघड होते. वेदनांमुळे तिच्यासाठी आणि ती जाणार हे कळलं होतं त्यामुळे आमच्यासाठी. त्यानंतर तिचा आवाजही गेला. एकेक गात्र शिथिल होत गेली. ती आता फार दिवसांची सोबती नाही हे कसं कोण जाणे तिलाही जाणवलं होतं.

जाण्याआधीचे दोन दिवस तिने आम्हाला बोलावून घेतलं. ' मी आता जाणार आहे, पण तुम्ही फार वाईट वाटून घेऊ नका. माझा जीव कशातच अडकलेला नाही. महत्त्वाचे आणि आनंदाचे सगळे सण समारंभझालेत/ बघून झालेत. मला जाण्याचं अजिबात दु:ख नाही' असं सांगून टाकलं. असं कुठल्या मोहात न अडकता जाणं किती कठीण असेल. जाता जाता आम्हालाच आधार देऊन गेली.

काही बाबतीत तिचं वेगळेपण तिने जपलं होतं. सोशिक आणि तरीही ठराविक तत्वांशी अजिबात तडजोड न करणारी आई मी बघितली. हॉस्पिटल मधले शेवटचे काही दिवस तिच्यासाठी खूप वेदनामय होते. पण तिने ना कधी आरडाओरड केली ना कधी चिडचिड. शांत पडून असायची. ती गेल्यानंतर तिथल्या नर्स मला म्हणाल्या, काही अध्यात्म वगैरे करायच्या का त्या? अगदी सगळ्यांत शहाणा पेशंट होता हा आमचा!

वेळेच्या आधी ५ ते १० मिनिटं इच्छित स्थळी पोचायचं हा तिचा नियम तिने पोस्टाच्या नोकरीच्या ३२ वर्षांत सोडला नाही. सकाळी ७:३० च्या आधी सगळ्यांच्या आंघोळी झाल्या पाहिजेत हा तिचा नियम आम्हीही अपवादानेच मोडू शकलो. आपण कधीही उठलो तरी त्या आधीच ही कशी उठलेली असते, हे लहनपणी कोडं पडायचं. एकदा काहीतरी द्यायला सकाळी लवकर म्हणजे ६:३०-६:४५ ला माहेरी गेले तर आई नुकती उठली होती, अजुन अंथरुणातच. आई म्हातारी होतेय या जाणीवेने काळजात हललं एकदम.

तिने मला काय दिलं, याची न संपणारी यादी तयार होईल.तिची लवकर उठून आवरायची सवय मी घेतली आणि याचे बरेच फायदे मला जाणवतात. स्वयंपाकाची आवड आणि नियोजन हेही वाखाणण्याजोगं. जोडीला त्यात नेटकेपणाही! माहेरी सगळ्यांच्यात सुगरण हे बिरुद तिने मिरवलं. तिची साधी मसाला न घातलेली, फक्त आमसुल, मीठ, गूळ आणि कोथिंबीर घातलेली आमटीही सगळ्यांना फार आवडायची. गणपतीत आम्ही २०-२५ जणं घरातलेच असायचो. पहिल्या दिवशी १०-१२ जण बाहेरचे जेवायला असायचे. १०० मोदक करायची जबाबदारी आई पेलायची. मदतीला आम्ही काकवा, मुली, सुना असायचोच पण प्रोजेक्ट एक्झिक्युशन, मॅनेजमेंट पूर्ण आईची. त्याच बरोबर पुरणपोळ्या, गुळाच्या पोळ्या, सांज्याच्या पोळ्या, सोलकढी, ह्यात हातखंडा. मला थोडी स्वयंपाकाची आवड निर्माण होतेय म्हणल्यावर माझ्याबरोबर नविन पदार्थही शिकायची. तसंच त्या पदार्थांची आरएनडी करून ती तिची पद्धत, प्रमाण लिहून ठेवायची. पोस्टातून रिटायरमेंट घेऊन नंतर हौस म्हणून ऑर्डर्स घ्यायला लागली तेंव्हा तर प्रत्येक गोष्ट मोजून मापून लिहून ठेवायची. आम्ही म्हाणायचो आता थोडे दिवसांनी मीठ पण किती ग्रॅम मोजून घालशील. पण तिच्या या TRIED TESTED TRUSTED पाककृतींच्या जीवावर मी आज भरपूर शायनिंग मारुन घेते.

नोकरीची कितीही घाईची वेळ असेल तरी, आधी नियोजन करुन त्या त्या सणाला ते ते पदार्थ ती बनवायचीच. त्या सणाबद्दची थोडी तरी माहिती सांगायची. नाहीतर पुढच्या पिढीला हे पोचवायची अजुन चांगली पद्धत कोणती असेल.

तिचा तिच्या मनावर प्रचंड ताबा! एकदा आमची एक बॅग रिक्षात विसरली, त्यात आजीने दिलेला एकदम दुर्मिळ सोन्याचा नेकपीस होता. अशी श्रीमंती कमीच होती. एक मिनिट तिला वाईट वाटले, पण नंतर म्हणाली, ' असो, माझ्या नशिबात त्याचं सुख तेवढंच होतं. गेली ती वस्तू आपली नव्हतीच असं समजायचं.' त्यानंतर तिने कधीच तो विषय काढला नाही.

ती चाळीशीत असताना तिच्या एका पायात कळ आली आणि तो पाय दुखू लागला. काही दिवसांत दुसर्‍या पायाचंही तेच. शेवटपर्यंत या दुखण्याचं निदान झालंच नाही, पण तिने फार काळ रडत न बसता त्या दु:खाला जीवनाचा भागच बनवून टाकलं होतं. बाबा बँकेत आई पोस्टात..दोघांनी काटकसर करून व्यवस्थित पैसे जमवले. तिचे पाय दुखायचे त्यामुळे खूप चालू शकायची नाही, मग तिने स्वतःसाठी नियम घालून घेतला. थोडं चालायचं, थोडी रिक्षा..रोज फक्त १० रु खर्च होतील इतकीच रिक्षा करायची, उरलेलं अंतर चालत जायची. मी ९-१० वर्षांची असताना तिला कॅन्सर झाला होता, तोही तिने खंबीरपणे पचवला. इतका की ऑपेरेशन झाल्याच्या दिवशी उठून चालत ती वॉश रूम ला गेली. डॉक्टर पण म्हणाले, त्या खंबीर होत्या , त्यामुळे लवकर बर्‍या झाल्या.

लहान असतानाची कडक आई, कॉलेजमधे माझी मैत्रीण, माझ्या लग्नानंतर अजुन जवळची आणि माझ्या डिलिव्हरीनंतर घट्ट मैत्रीण झाली. प्रत्येक गोष्ट तिला सांगितल्याशिवाय मला चैन पडत नसे. आता तिला जाउन १० वर्षं झाली. तिच्या जाण्याचं दु:ख तर आहेच पण तिच्या छान आठवणी भरपूर आहेत आणि तीच आयुष्याची शिदोरी आहे.

आईच्या कॅन्सरमुळे लहानपणीच मी एकदम शहाणी झाले. माझा माझा अभ्यास करू लागले. आई-बाबांना त्रास कधी फारसा दिला नाही. पण त्याचं उट्टं नंतर भरून काढलं. वर्ल्ड ट्रेड सेंटर अ‍ॅटॅकमुळे शिक्षण संपवून लगेच नोकरी मिळाली नाही. तेंव्हा नोकरी मिळेपर्यंत चे सहा आठ महिने मी घरात सुतकी चेहेरे करून बसुन आईला फार त्रास दिला होता, असं तिनेच फार नंतर मला सांगितलं.

अजुन हा विषय असाच वाढत राहील, पण एक आठवण लिहिते आणि लेख संपवते. शेवटच्या दिवशी ती ICU मधे होती. भाऊ बाहेर होता. आधी ठरल्याप्रमाणे पहाटे मी तिथे गेले, तर बाबा पण आले होते. मला म्हणाले, "मला फार आठवण आली तिची, म्हणून आलो. थांबवेना घरी! असं वाटलं की ही बोलावते आहे. एकदा भेटायला सोडता का विचारू त्यांना!" तोवर आतून निरोप आला, की ती गेलीय. म्हणजे तिच्या कुडीत प्राण होता तेंव्हा बाबा, मी आणि भाऊ तिचे सख्खे तिच्या जवळच होतो, त्यातल्या त्यात सुख ते हेच!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद भरत, धनवन्ती.
शुदधलेखनाच्या काही चुका दिसतायत.. जरा वेळाने करते दुरुस्त

किती मनाला भिडणारे लिहिलं आहेस!

त्यतल्या त्यात सुख ते हेच! ..... हे मात्र अगदी खरेय.कदाचित उभयपक्षीही.

मनाला भिडले !
आई असते जन्माची शिदोरी...सरतही नाही..उरतही नाही...

साक्षी, ह्रद्य लिहिले आहेस. खोलवर पोचले. मलाही लिहून मोकळे व्हायचे आहे पण अजून शब्द मोकळे होत नाहीत. तू खूप सहज साधं मनापासून लिहिले आहेस.