ब्रम्हास्त्र बघा आणि निगेटिव्ह रिव्ह्यूचे भ्रमास्त्र तोडा!

Submitted by निमिष_सोनार on 11 September, 2022 - 02:39

ब्रम्हास्त्र (पार्ट 1: शिवा) ह्या 9 सप्टेंबर 22 ला रिलीज झालेल्या चित्रपटाचे हे परीक्षण आहे. मी हा चित्रपट 3D मध्ये बघितला. हा चित्रपट ट्रायोलॉजी असणार आहे म्हणजे या चित्रपटाचे अजून दोन भाग येतील. पहिल्या भागाच्या शेवटी दुसऱ्या भागाचे नाव अनाउन्स देखील झाले आहे, त्याचे नाव असणार आहे ब्रह्मास्त्र (पार्ट 2: देव). हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन थ्रीडीमध्येच बघणे योग्य आहे. हा लेख लांबणार आहे पण माझी विनंती आहे की हा लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचावा कारण यात फक्त परीक्षणच नाही तर या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक मुद्द्यांचा उहापोह केला आहे त्यातून तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळेल. आतापर्यंत भारतात सुपरहिरो असलेले अनेक चित्रपट येऊन गेले जसे भावेश जोशी, क्रिश, रा वन, फ्लाईंग जट्ट वगैरे. मुकेश खन्नापण आता शक्तिमानला भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर आणणार आहेत.

तर परीक्षण सुरु करण्याआधी मी सांगू इच्छितो की, ब्रह्मास्त्र आणि इतर अनेक बॉलिवूड चित्रपटांबद्दल सध्या सुरू असलेल्या वादग्रस्त मुद्द्यांचे पूर्वग्रह बाजूला सारून (जसे आलिया भट्ट कोणत्यातरी एका मुलाखतीत काय म्हणाली होती, ती कोणाची मुलगी आहे, तिचे वडील स्वभावाने कसे आहेत, आणि अमका कलाकार काय म्हणाला होता आणि तमक्या कलाकाराने अमक्या वर्षांपूर्वी काय केले होते, या चित्रपटाचा प्रोड्युसर कोण आहे, त्याचा स्वभाव कसा आहे वगैरे) तसेच सध्या प्रत्येक चित्रपटांत घुसलेले राजकारण हे सगळे बाजूला ठेऊन मी हा रिव्ह्यू केला आहे. एक सामान्य सिनेमा प्रेक्षक आणि रसिक या एकमेव नात्याने मी हा चित्रपट पाहिला आहे आणि त्याच नात्याने या चित्रपटाचे परीक्षण करत आहे आणि जे लोक फक्त एक कलाकृती म्हणून सिनेमा बघायला जातात त्यांच्याचसाठी हा रिव्ह्यू आहे! प्रत्येक चित्रपटाचे राजकारणच करायचे असे मनाशी ठरवून तो जर पाहिला गेला तर त्यात काही ना काही असे ओढून ताणून सापडतेच ज्याचा राजकारणाशी संबंध जोडता येईल.

हां, मात्र जेव्हा चित्रपटाची कथाच मुळात एखाद्या घडून गेलेल्या राजकीय घटनेवर आधारित असते ती गोष्टच वेगळी असते. तेव्हा तर चित्रपटात राजकारण कथेद्वारे आधीच घुसलेले असते. (उदाहरणार्थ धर्मवीर). तेव्हा राजकारण करत बसायला चांगला वाव असतो. त्यावेळेस चित्रपटाचे पूर्णपणे राजकारण झालेले असते.

सध्या बॉलीवूडवर टीका होते आहे की, बॉलीवूड फक्त रिमेक बनवत आहे (दो बारा, विक्रम वेधा, कट्टपुत्तली, मुळशी पॅटर्नचा रिमेक "अंतिम" वगैरे). परंतु, जेव्हा ओरिजनल बनवले जाते तेव्हासुद्धा टीकाच होते हे समजण्यापलीकडचे आहे. हॉलीवूडच्या "अवेंजर्स" सीरीजमधल्या सगळ्या चित्रपटात, विज्ञानाच्या नावाखाली अनेक अशक्य (अक्षरशः जादू वाटणाऱ्या) गोष्टी दाखवल्या जातात आणि त्या आपण सहजपणे वैज्ञानिक वैज्ञानिक म्हणून खपवून घेतो. आणि इथे भारतात जेव्हा ओरिजिनल काहीतरी कोणीतरी बनवायला जातं तेव्हा त्यात भारतीय प्रेक्षक सतराशे साठ चुका काढतो. हे बरोबर नाही. हॉलिवूड मारव्हल अवेंजर्सचे सगळेच 27/28 चित्रपट भारतीय लोक बघतात (त्यातील काही तर अगदीच सुमार आहेत), परंतु भारतात एखादा चांगला नवीन ओरिजिनल प्रयोग सुरू झाला, त्यावर मात्र विनाकारण टीका करतो.

तर ब्रम्हास्त्र हा अस्सल भारतीय सुपरहिरो फॅन्टसी अँक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यात जागतिक दर्जाचे हॉलिवुडच्या तोडीचे VFX (स्पेशल इफेक्ट्स) आहेत. याची कथा पूर्ण ओरिजिनल आहे. काहीजण लगेच याची तुलना हॉलिवुड अवेंजर्सशी करायला लागले, त्यांचे कन्सेप्ट कॉपी केले असे म्हणायला लागले आहेत पण तसे नाही आहे. खरे पाहिले तर ते लोक पण आपल्या (आणि ग्रीक, रोमन गॉड) पौराणिक कथांवरून प्रेरणा घेऊन चित्रपट बनवत असतात. जसे हनुमानाची गदा आणि थॉरचा हातोडा, आपला उडणारा हनुमान आणि त्यांचा उडणारा सुपरमॅन, लहान आणि मोठा आकार धारण करू शकणारा हनुमान आणि याचीच कॉपी असलेला राग आल्यावर आकार मोठा होणारा हल्क अशी अनेक उदाहरणे देता येतील.

पण काय झाले की, त्यांच्या कथा कल्पनांना पडद्यावर मूर्त रूप देण्यासाठी जे VFX तंत्रज्ञान लागते ते त्यांच्याकडे आधी आले आणि आपल्याकडे फार उशिरा आले. (क्रिश1 ने परदेशी तंत्रज्ञ वापरले होते मात्र क्रिश3 आणि रा वन ला शाहरुखच्या भारतीय कंपनीने स्पेशल इफेक्ट दिले होते. रा वन मधला मुंबई लोकल ट्रेनचा थरारक सिन ज्यात CST स्टेशन इमारत ढासळतांना दाखवली आहे तसेच क्रिश3 मध्ये शेवटी मुंबईतील इमारती कोसळत असताना स्ट्रॉलरमधल्या लहान बाळाला क्रिश कसे वाचवतो ते आठवा!)

ब्रम्हास्रला ऑस्कर विजेत्या टीम ने VFX दिले आहेत. यातही असाच एक लहान मुलाचा थरारक सिन आहे जो इंटरव्हल नंतर लगेच येतो त्या पण त्याबद्दल जास्त काही सांगता येणार नाही कारण चित्रपटातील अनेक पैकी एक रहस्य उलगडले जाईल जे चित्रपट बघायला जाण्याआधी माहिती असणे योग्य नाही. (जसे गुप्त मध्ये काजोल खुनी आहे हे आधीच माहीत पडले तर चित्रपट बघण्यात अर्थ रहात नाही)

ब्रह्मास्त्रची स्टोरी अयान मुखर्जीने लिहिली आहे. चित्रपटात एकूण नऊ अस्त्रांचा यांचा उल्लेख आहे. सर्व अस्त्रांची प्रमुख देवता म्हणजे ब्रह्मास्त्र. प्राचीन काळापासून ब्रह्मास्त्रचे रक्षण करणारी एक टीम आहे ज्यांना ब्रह्मांश म्हणतात. चित्रपटाची कथा सध्याच्या काळात घडते.

सध्या त्या ब्रह्मास्त्रचे तीन तुकडे झाले आहेत. ते तुकडे का झालेत याची एक मोठी कथा आहे ती इथे सांगत नाही. त्या कथेचा संबंध रणवीर कपूरच्या म्हणजे शिवाच्या आईवडिलांशी आहे, ती कथा अमिताभ (ब्रह्मांशचा गुरु) आपल्याला थोडक्यात सांगतो परंतु या चित्रपटाच्या पुढच्या भागात कदाचित शिवाच्या आई वडिलांची पूर्ण कथा सांगण्यात येईल. रणबिर कपूर स्वतः सुद्धा एक अस्त्र आहे अग्निअस्त्र. मात्र त्याची पूर्ण शक्ती वापरण्यासाठी त्याच्या जीवनात आलिया भट यावी लागते. ब्रह्मास्त्रचे दोन तुकडे दोन जणांकडे सुरक्षित आहेत. एक तुकडा मुंबईत राहणाऱ्या सायंटिस्ट मोहन भार्गव (शाहरुख खान) यांच्याकडे आहे. चित्रपटाच्या अगदी सुरुवातीलाच मोहन यांचेकडून जुनून नावाची एक विलन आपल्या दोन साथीदारांसह (जोश आणि रफ्तार) तो तुकडा चोरते आणि इतर दोन तुकडे कुठे आहेत तसेच ब्रह्मांश टीम चा आश्रम कुठे आहे याबद्दल मोहन यांना बंदी बनवून विचारते. ते पूर्ण माहिती सांगत नाहीत आणि इमारतीचे टेरेसवरून उडी मारतात. दुसरा तुकडा असतो नागार्जुन म्हणजे एक आर्टिस्ट जे वाराणसीत राहत असतात त्यांच्याकडे! तिसरा तुकडा कुणाकडे असतो हे सुज्ञ वाचक येथे ओळखू शकतात पण तो ज्याच्याकडे असतो त्याला ते माहिती नसते, त्याला ते कसे माहिती पडते आणि तो तुकडा कशाच्या स्वरूपात असतो ते बघणे खूप मनोरंजक आहे.

शाहरुखच्या घरी घडलेले सगळे रणवीरला आपोआप स्वप्नात दिसत राहते. जुनून (मौनी रॉय) आणि तिची दोन साथीदार वाराणसीत नागार्जुनच्या मागे लागतात त्यांना वाचवण्यासाठी रणवीर आणि आलिया भट वाराणसी पोहोचतात. मोहन यांच्याकडे वानर अस्त्र असते तर नागार्जुन याच्याकडे नंदी अस्त्र असते. या चित्रपटात हे अस्त्र जेव्हा जागृत होतात तेव्हा ते फक्त मूळ व्यक्तीच्या पाठीमागे अंधुक स्वरूपात दिसत राहतात मूळ व्यक्ती त्या अस्त्राच्या रूपात ट्रान्सफॉर्म होत नाही. हा एक युनिक कन्सेप्ट आहे आणि ओरिजनल आहे. बरेच जण म्हणतात की हा नुसता लेझर शो आहे परंतु ते खरे नाही. चित्रपट आणि त्यामागचा कन्सेप्ट पूर्णपणे नीट समजून न घेता अनेक लोक या चित्रपटावर टीका करत सुटले आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांचे कलेक्शन बघता हा चित्रपट प्रेक्षकांना आवडल्याचे दिसत आहे. असो.

जेव्हा जेव्हा ते अस्त्र जागृत होतात तेव्हा पडद्यावर भव्य दिव्य स्पेशल इफेक्ट आपले डोळे दिपवून टाकतात. तसेच हिमाचल प्रदेशातील पहाडी रस्त्यांवर कारचा थरारक पाठलाग असलेला जो सिन आहे तो तर हॉलीवुडच्याही कुठल्या चित्रपटाला लाजवेल असा आहे. तसेच वाराणसीतील शिव मंदिरातील जूनून टीम आणि रणबीर आलिया नागार्जुन यांच्यातील भव्य दिव्य फाईट सीन, बाप रे!

हे तर फक्त इंटरवल पर्यंत झाले. चित्रपट मोठा आहे. जवळपास तीन तासांचा!!

सेकंड हाफ मध्ये ब्रह्मांशचे रक्षक असलेली टीम जिथे राहते तो आश्रम दाखवला गेलेला आहे. त्याबद्दल वापरलेली कल्पनाशक्ती सुद्धा वाखाणण्याजोगी आहे. सेकंड हाफ मध्ये अमिताभची एन्ट्री होते. त्यानंतर ही बरीच कथा बाकी आहे आणि खूप गोष्टी घडतात. खूप नवी रहस्ये कळतात. चित्रपटाच्या शेवटी तर भरपूर अग्नी म्हणजे आगीने भरलेले VFX आहेत. नंतर अनेक अस्त्रांची ओळख होते जसे धनुष नाग अस्त्र, बर्फ अस्त्र, पवन अस्त्र, जल अस्त्र, प्रभा अस्त्र (प्रकाश असलेले अस्त्र) आहेत. अर्थात या सगळ्याच अस्त्रांचे धारक आणि त्यांचे उपयोग या पहिल्या चित्रपटात दाखवलेले नाहीत ते कदाचित पुढच्या दोन चित्रपटांमध्ये नीट दिसून येतील.

रणवीर कपूर आणि आलिया भटचे आणि अमिताभचे थोडेफार सीन वगळता संपूर्ण चित्रपटच स्पेशल इफेक्टने भरलेला आहे. यातील तीन गाणी चांगली आहेत. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम प्रेक्षणीय झाली आहे. जेव्हा विजुअल इफेक्ट्स नसतात तेव्हा भारतातील विविध शहरातील भव्य दिव्य पद्धतीने साजरे होणारे सण (दसरा, दुर्गापूजा, दिवाळी वगैरे) आपल्याला रणबीर आलियाच्या प्रेमकथेत बॅकग्राऊंडला दिसत राहतात ते बघायला खूपच छान वाटते. थ्रीडी मध्ये तर आणखी तिथे प्रत्यक्ष गेल्यासारखे वाटते. या चित्रपटातील बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा खूपच छान आहे. कार पाठलाग सिनच्या वेळेस असलेले बॅकग्राऊंड म्युझिक आणखी थ्रिलिंग एलिमेंट ऍड करते.

या चित्रपटातील शेवटी आपल्याला पुढील भागाची कथा काय असेल याचा अंदाज दिग्दर्शक देतो. एकूणच एक भव्य दिव्य डोळे दिपवून टाकणारा एक वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर हा चित्रपट बघायलाच हवा. आणि कोणताही पूर्वग्रहदूषित चष्मा न लावता थ्रीडी वाला चष्मा लावून हा चित्रपट बघायला हवा.

- निमिष सोनार, पुणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहिष्कार टाका असे आव्हान करणे हेच भारताच्या राज्य घटने विरुद्ध आहे.बेकायदेशीर आहे
सरकार आणि न्याय व्यवस्था खरेच ह्या देशात असेल तर .
बहिष्कार ची जाहीर मोहीम चालवणारी प्रतेक व्यक्ती,अशा बातम्या प्रसारित करणारे सर्व मीडिया चॅनेल ची सर्व लोक मालक असणाऱ्या व्यक्ती सहित.
जेल मध्ये असली पाहिजेत.
लोकशाही म्हणजे बेबंद शाही नाही.
आणि वर्षभर तरी jail मध्येच हवीत.

सिनेमा खराब असेल तर लोक बघणार नाहीत.
सिनेमा देश,धर्म,जाती,समाज गट,भाषा ह्या आधारावर समजत फूट padat नसेल,देशविरोधी विचार व्यक्त करत नसेल तर .
बहिष्कार टाका असा प्रचार करायचा हक्क.
अंध भक्तांना कोणी दिलं

अशक्य चिंधड्या Happy

आलियाला ब्रह्मास्त्र उच्चारता येत नाही. कैकवेळा ती भ्रमास्त्र म्हणते, ब्रह्मास्त्र नाही.
‘ शिवा, तुम कौन हो?‘, ‘ शिवा, तुम क्या हो?‘ हे संवाद मध्यांतराआधी किमान १०-१५ वेळा म्हणते.

संस्कृत तर कुठल्याही शब्दाच्या शेवटी म् लावून त्याला मंत्र म्हटलं आहे. सहस्र नंदीम् सामर्थ्यम् हे एक उदाहरण. नंदीनाम् असं षष्ठी अनेकवचन असतं ना?
१० वर्षे काय घासत होता आयान मुखर्जी?

रणबीर च्या बापाला ब्रह्मास्त्र हवं असतं. अमिताभ वगैरे लोकांसोबत ब्रह्मास्त्रासाठी युद्ध झाल्यावर तो केवळ शक्ती रूपाने जिवंत असतो. जसे Star Wars मध्ये Yoda, Obi-Wan Kenobi असतात तसे!

बाप अंधाराच्या बाजूचा आणि मुलगा प्रकाश आणि अंधाराच्या मध्ये अडकलेला. काही लक्षात येतंय? Luke Skywalker आणि Darth Vader ह्यांची गोष्ट आहे.

आणि ब्रह्मास्त्र चे तीन तुकडे जोडले की अस्त्र जागृत होतं. हा भाग तर Harry Potter and The Goblet of Fire मध्ये Voldemort जिवंत होतो अगदी तसा वाटतो.

कुठल्याही नावाच्या शेवटी अस्त्र लावलं की, ते अस्त्र होतं.
माया अस्त्र, प्रभास्त्र, नंदी अस्त्र, वानरास्त्र वगैरे काही नसतं. अग्नि, ब्रह्म आणि जल (त्याला पर्जन्यास्त्र म्हटलं जातं) सोडले तर सगळे खोटे आहेत.

संवाद तर इतके सुंदर आहेत; light शब्द किमान १००० वेळा वापरला असेल. आणि अमिताभ एके ठिकाणी म्हणतो, ‘ तुम्हे चिंगारी से ड्रॅगन बना दूंगा!‘
मध्यांतरानंतर जो अमिताभ बोलायला सुरू होतो, ते शेवटपर्यंत बोलतच असतो. संवाद अतिशय पोरकट आहेत, ‘ बटन ऑन करो‘ , ‘ लाईट आ रही हैं‘ वगैरे वगैरे!

पूर्ण चित्रपटात भारतीय पुराणांचा कुठेही उल्लेख नाही. अस्त्रांचा वापर करण्यासाठी काही तप, जप करावा लागत नाही. सगळं आयते असतं.

आणि शेवटी हिरोईनला वाचवण्यासाठी हिरोचे प्रेम ब्रह्मास्त्राच्या समोर मोठं ठरतं. कुठल्या Marvel, DC चित्रपटांत असले दृश्य आहे?

VFX अगदीच वाईट किंवा अगदीच उत्तम नाहीत, ठीक आहेत.

Astraverse नाही तर Loveverse आहे. पुढच्या चित्रपटात रणबीरच्या आई वडिलांच्या प्रेमकथे साठी तयार राहा. मुलगा हिरो आणि वडील खलनायक हा अतिशय पोरकट विषय असलेला चित्रपट आहे.

वडील अजून दाखवले नाहीत, पण चित्रपट पाहताना जे जाणवलं ते सांगतो आहे.

I thought it was a cocktail made with a dash of Harry Potter, hero’s duality & Force and darkside from Star Wars and typical Bollywood love story!! It is not rooted with our history/mythology.

ठिगळ १:
नंदीअस्त्र (व्याकरणाच्या दृष्टीने नंद्यास्त्र) आणि वानरास्त्र कुठल्याही पुराणात उल्लेख केलेले नाही. बैलबुद्धी लोकांच्याच कल्पनाच ह्या!! नावाची योग्य संधी करू न शकणारे लोक (त्यांनी ह्या विषयावर खूप संशोधन केले अशी चर्चा आहे.) काय दाखवणार आहेत तो सिकंदर जाणे.

अस्त्रांचे वेगळे जग वगैरे काही नसतं. MCU किंवा DCEU ची आंधळी नक्कल करायला जात असल्याने कल्पना केली असेल.
आणि ब्रह्मास्त्र अस्त्रांचा राजा किंवा किस्मत का सिकंदर वगैरे नाही.

गाणे तर बघा:

चिंगारियां ये जो मेरे सीने में है दफ़न
इनको ज़रा देके हवा बन जाऊं मैं अगन
दहक रहा है बनके शरारा देख मेरा बदन
सब कुछ मेरा करके फ़ना करता हूँ मैं हवन
ॐ देवा देवा ॐ देवा देवा नमः
नमहो नमः ॐ
ॐ देवा देवा ॐ देवा देवा नमः
नमहो नमः ॐ

पुढे इश्क, फितूर, फना, बंजारा वगैरे नेहमीचे शब्द, क्षमा करा, अल्फाज; आहेत.
ते ओम देवा देवा काय प्रकरण काढलं आहे, कुणास ठाऊक? तिथे बहुदा पूर्वी रब्बा वगैरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ह्यांचं कसं झालंय ना; संस्कृत झेपत नाही, शुद्ध हिंदी ह्यांना बोलवत नाही आणि उर्दू हल्ली प्रेक्षकांना चालत नाही. त्याची परिणीती अशा गाण्यात होते.

अस्त्रांवरचा चित्रपट आणि प्रेमकथा का जोडावी? अशा अतार्किक गोष्टींमुळे लोक हिंदी चित्रपट पाहणे बंद करीत आहेत. आता उगाच जिथे त्यांची श्रद्धाच नाही असे काशीचे घाट, महाकाल मंदिर वगैरे चक्कर मारीत आहेत.

Hypocrisy की भी सीमा होती हैं!

ठिगळ २:

संवाद Instagram reels मध्ये असतात तसे आहेत. आणि नुसते narration देऊन अमिताभ बच्चन यांचा पार Morgan Freeman केला आहे. प्रेमकथा नकोय असं नाही, तिने मूळ कथेला झोकाळून टाकायला नको. देवसेना आणि अमरेंद्र बाहुबली यांची प्रेमकथा कशी सहजसुंदर दाखवली तसे दाखवायला हवे होते. ही प्रेमकथा म्हणजे छप्री लोकांची Instagram reel आहे असं वाटतं राहतं.

टीप: रिकाम्या चित्रपटगृहात हा चित्रपट horror वाटू शकणार नाही, बिनधास्त जा.

तळटीप: Force प्रमाणे weak-minded लोकांचे mind control Star Wars मध्ये आहे तसे इकडे आहे. अग्नि अस्त्राने mind control कसे होते हे मात्र सांगितलं नाही. ह्याचे उत्तर शोधायला गेले असते तर कदाचित चित्रपट बनवायला अजून १० वर्षे लागले असते.

पाताळटीप: Deadpool २ मधला Rusty कसा लायटरच्या ठिणगीचे वणव्यात रूपांतर करतो, तसा शिवा, जो स्वतः अग्नि अस्त्र असून त्याला लाईटरची गरज असते.

स्वानंद बोर्डे, फेसबुकवरून साभार

भारी लिहिलंय.
बघण्याची शक्यता आता 0%

भारतात बुद्धिमान ,खरेच हुशार असणाऱ्या लोकांना संधी मिळत नाही त्याला सिनेमा पण अपवाद नाही.
प्रशासन पासून ,सरकार पर्यंत सर्व ठिकाणी फक्त हुजरे आहेत.
त्या मुळे ब्रह्मास्त्र सारखी पूर्ण देशाची अवस्था आहे.
भारतीय मीडिया तर जगातील सर्वात मूर्ख जमात

रणविर सिन्ग त्याचवेळेस आला पण त्याच्या भुमिकाची रेन्ज बघितली की करणचे सतत रणबिर कसा बेस्ट अ‍ॅक्टर आहे हे सगल्ञाकडून वदवुन घेण्याचे प्रयत्न हास्यास्पद वाटायला लागतात >>> +१११.

त्याने बहुतेक रणबीर आलियासाठीच कॉफी विथ करण शो काढलाय असं वाटतं. दोनच भाग मागे पाहिले होते फक्त त्यात प्रत्येकाच्या तोंडी रणबीर रणबीर ,,, ऑ ??? फुल स्क्रीप्टेड शो.

कालच पाहिला पण खरंच वर कोणी तरी लिहिले आहे कि 'लव्हस्टोरीया' नसती तरी चालला असता। किती ते प्रेम, किती ते इंटेन्सली एकमेकांकडे पाहणे , आणि लॉन्ग किस सगळेच ओके मध्ये। बाकी ....VFX VFX VFX ...

<<भ्रमास्त्र तोडा असे वाचुन घाबरलो आणि धागा उघडला. आता हुश्श् झाले
Submitted by भ्रमर on 14 September, 2022 - 15:43>>
भ्रमास्त्र तोडा असेच लिहिलंय की.
तुम्ही भ्रमरास्त्र तोडा असे वाचले का आधी?
>>>>>>>>>>>
Lol

ते ब्रम्हास्त्र फक्त मलाच गूगल क्रोम च्या चिन्हा सारखं वाटलं की ईतरांनाही?

आशुचॅंप छान प्रतिसाद

आशुचॅम्प Lol
धन्यवाद, हा रीव्ह्यू शेअर केल्याबद्दल.

आशुचॅम्प Lol
'ओम देवा' विचित्रच वाटलं होतं .

ट्रेलर आता पाहिला.
कुठलाही रिव्ह्यु वाचला नसता तरी ट्रेलर पाहूनच बघण्याची शक्यता 0% झाली असती.

ईतक्या रिव्यूमध्ये विविध प्रकारे या चित्रपटाची खेचताना बघितली आहे. पण सर्वात एक गोष्ट कायम आहे. शाहरूखचे सर्व जण. न चुकता भरभरून कौतुक करत आहेत.
या एकाच कारणासाठी बघावासा वाटत आहे. पण दुर्दैवाने त्याचा रोल पंधरा मिनिटांचा आहे. काय करावे समजत नाही..

"शाहरूखचे सर्व जण. न चुकता भरभरून कौतुक करत आहेत." - चुकताहात तुम्ही सर!! मी तर चुकूनही कुणाला असं काही करताना पाहिलेलं नाहीये. शाहरूख खान चे अनेक सिनेमे आवडते आहेत. पण ह्या सिनेमात तो काहीही छाप पाडू शकलेला नाहीये. तीच कथा नागार्जुनची, अमिताभची, डिंपलची, रणबीर ची आणि आलियाची. मुळात त्या कथेमधे, रोल्समधेच दम नाहीये. ज्या एका कलाकाराने चांगलं काम केलंय, स्वतःचं कॅरेक्टर पकडून ठेवलंय ती म्हणजे मौनी रॉय.

Happy सरांची ती खासियत आहे
अशा वेळी पूर्ण दुर्लक्ष करणे हे उत्तम
सर त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न आले की कसे गायब होतात तसे व्हावं नैतर सरळ

फक्त १५ मिनिटाचा रोल??? अर्र्र !!! काय वेळ आलिये ना? त्याच्यापेक्षा तर मोनी रॉयचा रोलही मोठा आणी छाप पाडणारा हे अजुनच अर्रर्र आहे...

मानव, ते जाळे नाहीये. वा चला असेलही. पण खरेच शाहरूखचे तितकेच कौतुक होतेय Happy

फेरफटका, मी तुम्हाला दाखवतो ते सारे रिव्यू आणि लिंकही देतो. पण रात्री. आज ऑफिसला जातोय. काम आहे Sad

आशूचॅंप यांनी आणलेला रिव्यू सुद्धा त्याच सिनेमाच्या फेसबूक ग्रूपवर वाचलेला. जर त्यांनी तो तिथेच बघितला असेल आणि ईतरांचेही रिव्यू वाचले असतील तर त्यांनीही हे शाहरूखचे कौतुक वाचले असेलच Happy

असो, रात्रीची वाट बघूया Happy

फक्त १५ मिनिटाचा रोल??? अर्र्र !!! काय वेळ आलिये ना?
>>>>>

शाहरूखचा रोल फक्त १५ मिनिटांचा आहे म्हणून त्याच्यावर काय वेळ आलीय हे लॉजिक अफाट आहे Happy

त्या पंधरा मिनिटातही त्याने हवा केली आहे आणि त्या पंधरा मिनिटांचेही त्याला मजबूत पैसे मिळाले असतील. जर या दोन्ही गोष्टी पंधरा मिनिटात होत असेल तर तो का ज्यादा मेहनत करेल. स्मार्ट बंदा स्मार्ट वर्क !
उगाच नाही तो भारतातला सर्वाधिक श्रीमंत कलाकार आहे. जगात दुसऱ्या क्रमांकाचा. आकडेवारी बदलली असेल तर चेक करावे लागेल.

हे बाकी खरंय हा. छोटासा कॅमिओ मिळणे हे वाईट वेळ आल्याचे द्योतक नव्हे. उलट प्रसिद्धीच्या शिखरावर असल्याचे आहे.

डाऊनी ज्युनिअर जर पुढच्या अव्हेंजर्स मध्ये १० सेकंदासाठी आला तरी पूर्ण थिएटर दणाणून सोडेल. ते काय डाऊनी वर वाईट वेळ आल्याचे दाखवत नाही.

आशा रीतीने सरांना स्त्राईक गावला आहे

आता तुमची काय सुटका नाही

सर, मी तिथेच वाचला पण शरूख नाव आलं की ते स्कीप करून पुढं जातो, आधीच तुम्ही शिसारी, घृणा, तिटकारा येईपर्यंत त्याची लाल करता
अजून बाहेर कुठं तेच परत वाचू Happy
बाकीचे काही इंटरेस्टिंग असेल तर वाचतो

पण शरूख नाव आलं की ते स्कीप करून पुढं जातो
>>>

ऐकावे ते नवलच Happy

काही हरकत नाही. मी रात्री तसेही तिथल्या अनेक रिव्यूतून शाहरूखचे कौतुक आणेन फेरफटका यांना उत्तर द्यायला. तुम्ही माझी पोस्ट स्किप करू शकता Happy

सर तुमचे धागे स्कीप करतो अक्खेच्या अकखे
पोस्ट चे काय घेऊन बसलात

रच्याकने उतारा मिळाला का?
किती वेळ लागला?

“ फेरफटका यांना उत्तर द्यायला.” - मी सिनेमा पाहून मांडलेलं माझं निरिक्षण आणि तू सिनेमा न बघता कुठल्यातरी फेसबूक ग्रूपवर वाचलेली मतं ह्यातून तू मला काय आणि का उत्तरं देणार?

ह्या प्रश्नाचं उत्तर मी देतो, ‘नको देऊस‘. Happy

Pages