ब्रम्हास्त्र बघा आणि निगेटिव्ह रिव्ह्यूचे भ्रमास्त्र तोडा!

Submitted by निमिष_सोनार on 11 September, 2022 - 02:39

ब्रम्हास्त्र (पार्ट 1: शिवा) ह्या 9 सप्टेंबर 22 ला रिलीज झालेल्या चित्रपटाचे हे परीक्षण आहे. मी हा चित्रपट 3D मध्ये बघितला. हा चित्रपट ट्रायोलॉजी असणार आहे म्हणजे या चित्रपटाचे अजून दोन भाग येतील. पहिल्या भागाच्या शेवटी दुसऱ्या भागाचे नाव अनाउन्स देखील झाले आहे, त्याचे नाव असणार आहे ब्रह्मास्त्र (पार्ट 2: देव). हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन थ्रीडीमध्येच बघणे योग्य आहे. हा लेख लांबणार आहे पण माझी विनंती आहे की हा लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचावा कारण यात फक्त परीक्षणच नाही तर या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक मुद्द्यांचा उहापोह केला आहे त्यातून तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळेल. आतापर्यंत भारतात सुपरहिरो असलेले अनेक चित्रपट येऊन गेले जसे भावेश जोशी, क्रिश, रा वन, फ्लाईंग जट्ट वगैरे. मुकेश खन्नापण आता शक्तिमानला भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर आणणार आहेत.

तर परीक्षण सुरु करण्याआधी मी सांगू इच्छितो की, ब्रह्मास्त्र आणि इतर अनेक बॉलिवूड चित्रपटांबद्दल सध्या सुरू असलेल्या वादग्रस्त मुद्द्यांचे पूर्वग्रह बाजूला सारून (जसे आलिया भट्ट कोणत्यातरी एका मुलाखतीत काय म्हणाली होती, ती कोणाची मुलगी आहे, तिचे वडील स्वभावाने कसे आहेत, आणि अमका कलाकार काय म्हणाला होता आणि तमक्या कलाकाराने अमक्या वर्षांपूर्वी काय केले होते, या चित्रपटाचा प्रोड्युसर कोण आहे, त्याचा स्वभाव कसा आहे वगैरे) तसेच सध्या प्रत्येक चित्रपटांत घुसलेले राजकारण हे सगळे बाजूला ठेऊन मी हा रिव्ह्यू केला आहे. एक सामान्य सिनेमा प्रेक्षक आणि रसिक या एकमेव नात्याने मी हा चित्रपट पाहिला आहे आणि त्याच नात्याने या चित्रपटाचे परीक्षण करत आहे आणि जे लोक फक्त एक कलाकृती म्हणून सिनेमा बघायला जातात त्यांच्याचसाठी हा रिव्ह्यू आहे! प्रत्येक चित्रपटाचे राजकारणच करायचे असे मनाशी ठरवून तो जर पाहिला गेला तर त्यात काही ना काही असे ओढून ताणून सापडतेच ज्याचा राजकारणाशी संबंध जोडता येईल.

हां, मात्र जेव्हा चित्रपटाची कथाच मुळात एखाद्या घडून गेलेल्या राजकीय घटनेवर आधारित असते ती गोष्टच वेगळी असते. तेव्हा तर चित्रपटात राजकारण कथेद्वारे आधीच घुसलेले असते. (उदाहरणार्थ धर्मवीर). तेव्हा राजकारण करत बसायला चांगला वाव असतो. त्यावेळेस चित्रपटाचे पूर्णपणे राजकारण झालेले असते.

सध्या बॉलीवूडवर टीका होते आहे की, बॉलीवूड फक्त रिमेक बनवत आहे (दो बारा, विक्रम वेधा, कट्टपुत्तली, मुळशी पॅटर्नचा रिमेक "अंतिम" वगैरे). परंतु, जेव्हा ओरिजनल बनवले जाते तेव्हासुद्धा टीकाच होते हे समजण्यापलीकडचे आहे. हॉलीवूडच्या "अवेंजर्स" सीरीजमधल्या सगळ्या चित्रपटात, विज्ञानाच्या नावाखाली अनेक अशक्य (अक्षरशः जादू वाटणाऱ्या) गोष्टी दाखवल्या जातात आणि त्या आपण सहजपणे वैज्ञानिक वैज्ञानिक म्हणून खपवून घेतो. आणि इथे भारतात जेव्हा ओरिजिनल काहीतरी कोणीतरी बनवायला जातं तेव्हा त्यात भारतीय प्रेक्षक सतराशे साठ चुका काढतो. हे बरोबर नाही. हॉलिवूड मारव्हल अवेंजर्सचे सगळेच 27/28 चित्रपट भारतीय लोक बघतात (त्यातील काही तर अगदीच सुमार आहेत), परंतु भारतात एखादा चांगला नवीन ओरिजिनल प्रयोग सुरू झाला, त्यावर मात्र विनाकारण टीका करतो.

तर ब्रम्हास्त्र हा अस्सल भारतीय सुपरहिरो फॅन्टसी अँक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यात जागतिक दर्जाचे हॉलिवुडच्या तोडीचे VFX (स्पेशल इफेक्ट्स) आहेत. याची कथा पूर्ण ओरिजिनल आहे. काहीजण लगेच याची तुलना हॉलिवुड अवेंजर्सशी करायला लागले, त्यांचे कन्सेप्ट कॉपी केले असे म्हणायला लागले आहेत पण तसे नाही आहे. खरे पाहिले तर ते लोक पण आपल्या (आणि ग्रीक, रोमन गॉड) पौराणिक कथांवरून प्रेरणा घेऊन चित्रपट बनवत असतात. जसे हनुमानाची गदा आणि थॉरचा हातोडा, आपला उडणारा हनुमान आणि त्यांचा उडणारा सुपरमॅन, लहान आणि मोठा आकार धारण करू शकणारा हनुमान आणि याचीच कॉपी असलेला राग आल्यावर आकार मोठा होणारा हल्क अशी अनेक उदाहरणे देता येतील.

पण काय झाले की, त्यांच्या कथा कल्पनांना पडद्यावर मूर्त रूप देण्यासाठी जे VFX तंत्रज्ञान लागते ते त्यांच्याकडे आधी आले आणि आपल्याकडे फार उशिरा आले. (क्रिश1 ने परदेशी तंत्रज्ञ वापरले होते मात्र क्रिश3 आणि रा वन ला शाहरुखच्या भारतीय कंपनीने स्पेशल इफेक्ट दिले होते. रा वन मधला मुंबई लोकल ट्रेनचा थरारक सिन ज्यात CST स्टेशन इमारत ढासळतांना दाखवली आहे तसेच क्रिश3 मध्ये शेवटी मुंबईतील इमारती कोसळत असताना स्ट्रॉलरमधल्या लहान बाळाला क्रिश कसे वाचवतो ते आठवा!)

ब्रम्हास्रला ऑस्कर विजेत्या टीम ने VFX दिले आहेत. यातही असाच एक लहान मुलाचा थरारक सिन आहे जो इंटरव्हल नंतर लगेच येतो त्या पण त्याबद्दल जास्त काही सांगता येणार नाही कारण चित्रपटातील अनेक पैकी एक रहस्य उलगडले जाईल जे चित्रपट बघायला जाण्याआधी माहिती असणे योग्य नाही. (जसे गुप्त मध्ये काजोल खुनी आहे हे आधीच माहीत पडले तर चित्रपट बघण्यात अर्थ रहात नाही)

ब्रह्मास्त्रची स्टोरी अयान मुखर्जीने लिहिली आहे. चित्रपटात एकूण नऊ अस्त्रांचा यांचा उल्लेख आहे. सर्व अस्त्रांची प्रमुख देवता म्हणजे ब्रह्मास्त्र. प्राचीन काळापासून ब्रह्मास्त्रचे रक्षण करणारी एक टीम आहे ज्यांना ब्रह्मांश म्हणतात. चित्रपटाची कथा सध्याच्या काळात घडते.

सध्या त्या ब्रह्मास्त्रचे तीन तुकडे झाले आहेत. ते तुकडे का झालेत याची एक मोठी कथा आहे ती इथे सांगत नाही. त्या कथेचा संबंध रणवीर कपूरच्या म्हणजे शिवाच्या आईवडिलांशी आहे, ती कथा अमिताभ (ब्रह्मांशचा गुरु) आपल्याला थोडक्यात सांगतो परंतु या चित्रपटाच्या पुढच्या भागात कदाचित शिवाच्या आई वडिलांची पूर्ण कथा सांगण्यात येईल. रणबिर कपूर स्वतः सुद्धा एक अस्त्र आहे अग्निअस्त्र. मात्र त्याची पूर्ण शक्ती वापरण्यासाठी त्याच्या जीवनात आलिया भट यावी लागते. ब्रह्मास्त्रचे दोन तुकडे दोन जणांकडे सुरक्षित आहेत. एक तुकडा मुंबईत राहणाऱ्या सायंटिस्ट मोहन भार्गव (शाहरुख खान) यांच्याकडे आहे. चित्रपटाच्या अगदी सुरुवातीलाच मोहन यांचेकडून जुनून नावाची एक विलन आपल्या दोन साथीदारांसह (जोश आणि रफ्तार) तो तुकडा चोरते आणि इतर दोन तुकडे कुठे आहेत तसेच ब्रह्मांश टीम चा आश्रम कुठे आहे याबद्दल मोहन यांना बंदी बनवून विचारते. ते पूर्ण माहिती सांगत नाहीत आणि इमारतीचे टेरेसवरून उडी मारतात. दुसरा तुकडा असतो नागार्जुन म्हणजे एक आर्टिस्ट जे वाराणसीत राहत असतात त्यांच्याकडे! तिसरा तुकडा कुणाकडे असतो हे सुज्ञ वाचक येथे ओळखू शकतात पण तो ज्याच्याकडे असतो त्याला ते माहिती नसते, त्याला ते कसे माहिती पडते आणि तो तुकडा कशाच्या स्वरूपात असतो ते बघणे खूप मनोरंजक आहे.

शाहरुखच्या घरी घडलेले सगळे रणवीरला आपोआप स्वप्नात दिसत राहते. जुनून (मौनी रॉय) आणि तिची दोन साथीदार वाराणसीत नागार्जुनच्या मागे लागतात त्यांना वाचवण्यासाठी रणवीर आणि आलिया भट वाराणसी पोहोचतात. मोहन यांच्याकडे वानर अस्त्र असते तर नागार्जुन याच्याकडे नंदी अस्त्र असते. या चित्रपटात हे अस्त्र जेव्हा जागृत होतात तेव्हा ते फक्त मूळ व्यक्तीच्या पाठीमागे अंधुक स्वरूपात दिसत राहतात मूळ व्यक्ती त्या अस्त्राच्या रूपात ट्रान्सफॉर्म होत नाही. हा एक युनिक कन्सेप्ट आहे आणि ओरिजनल आहे. बरेच जण म्हणतात की हा नुसता लेझर शो आहे परंतु ते खरे नाही. चित्रपट आणि त्यामागचा कन्सेप्ट पूर्णपणे नीट समजून न घेता अनेक लोक या चित्रपटावर टीका करत सुटले आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांचे कलेक्शन बघता हा चित्रपट प्रेक्षकांना आवडल्याचे दिसत आहे. असो.

जेव्हा जेव्हा ते अस्त्र जागृत होतात तेव्हा पडद्यावर भव्य दिव्य स्पेशल इफेक्ट आपले डोळे दिपवून टाकतात. तसेच हिमाचल प्रदेशातील पहाडी रस्त्यांवर कारचा थरारक पाठलाग असलेला जो सिन आहे तो तर हॉलीवुडच्याही कुठल्या चित्रपटाला लाजवेल असा आहे. तसेच वाराणसीतील शिव मंदिरातील जूनून टीम आणि रणबीर आलिया नागार्जुन यांच्यातील भव्य दिव्य फाईट सीन, बाप रे!

हे तर फक्त इंटरवल पर्यंत झाले. चित्रपट मोठा आहे. जवळपास तीन तासांचा!!

सेकंड हाफ मध्ये ब्रह्मांशचे रक्षक असलेली टीम जिथे राहते तो आश्रम दाखवला गेलेला आहे. त्याबद्दल वापरलेली कल्पनाशक्ती सुद्धा वाखाणण्याजोगी आहे. सेकंड हाफ मध्ये अमिताभची एन्ट्री होते. त्यानंतर ही बरीच कथा बाकी आहे आणि खूप गोष्टी घडतात. खूप नवी रहस्ये कळतात. चित्रपटाच्या शेवटी तर भरपूर अग्नी म्हणजे आगीने भरलेले VFX आहेत. नंतर अनेक अस्त्रांची ओळख होते जसे धनुष नाग अस्त्र, बर्फ अस्त्र, पवन अस्त्र, जल अस्त्र, प्रभा अस्त्र (प्रकाश असलेले अस्त्र) आहेत. अर्थात या सगळ्याच अस्त्रांचे धारक आणि त्यांचे उपयोग या पहिल्या चित्रपटात दाखवलेले नाहीत ते कदाचित पुढच्या दोन चित्रपटांमध्ये नीट दिसून येतील.

रणवीर कपूर आणि आलिया भटचे आणि अमिताभचे थोडेफार सीन वगळता संपूर्ण चित्रपटच स्पेशल इफेक्टने भरलेला आहे. यातील तीन गाणी चांगली आहेत. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम प्रेक्षणीय झाली आहे. जेव्हा विजुअल इफेक्ट्स नसतात तेव्हा भारतातील विविध शहरातील भव्य दिव्य पद्धतीने साजरे होणारे सण (दसरा, दुर्गापूजा, दिवाळी वगैरे) आपल्याला रणबीर आलियाच्या प्रेमकथेत बॅकग्राऊंडला दिसत राहतात ते बघायला खूपच छान वाटते. थ्रीडी मध्ये तर आणखी तिथे प्रत्यक्ष गेल्यासारखे वाटते. या चित्रपटातील बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा खूपच छान आहे. कार पाठलाग सिनच्या वेळेस असलेले बॅकग्राऊंड म्युझिक आणखी थ्रिलिंग एलिमेंट ऍड करते.

या चित्रपटातील शेवटी आपल्याला पुढील भागाची कथा काय असेल याचा अंदाज दिग्दर्शक देतो. एकूणच एक भव्य दिव्य डोळे दिपवून टाकणारा एक वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर हा चित्रपट बघायलाच हवा. आणि कोणताही पूर्वग्रहदूषित चष्मा न लावता थ्रीडी वाला चष्मा लावून हा चित्रपट बघायला हवा.

- निमिष सोनार, पुणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला बॉयकॉटशी काही देणेघेणे नाही पण ट्रेलर बघुन चित्रपट बघावासा वाटायला हवा. मला अजिबात वाटला नाहे. होलिवुडचे पेशल इफेक्ट भारतीय कंपन्याच बनवतात, मग भारतीय चित्रपटात इतके सुमार का असे वाटले. असो.

चाहत्यांना शुभेछ्हा!! सामान्य लोक बॉयकॉट व्गैरेच्या नादी न लागता मनोरंजन बघतात, पैसा व वेळ वसुल होतो काबघतात हेमावैम.

सामान्य लोक बॉयकॉट व्गैरेच्या नादी न लागता मनोरंजन बघतात, पैसा व वेळ वसुल होतो काबघतात हेमावैम.

>>>
सहमत.

मला सुद्धा ट्रेलर वरून सिनेमा क्रीन्ज आणि कॉर्नि असणार आहे असे वाटतेय, पण विलींग टू गिव्ह ईट अ शॉट

मी कालच हा सिनेमा पाहिला. पहायला जाताना खूप स्केप्टिकल होते खरंतर. पण पिक्चर सुरू झाल्यावर त्यात गुंतून गेले. निदान मला तरी VFX आवडले. स्टोरी आवडली. प्रेझेंटेशन आवडले. खूप फ्रेम्स खूप सुंदर आहेत त्यामुळे बघायला नेत्रसुखद सिनेमा आहे. गाणी बरी आहेत असं म्हणेन. म्हणजे शब्द आणि चाली छान आहेत. पण आवाज चांगला हवा होता असं वाटलं. गाणी नसतीच तरी चाललं असतं असं वाटून गेलं. रणबीर मला फारसा आवडत नाही. पण यात त्याचा वावर प्लेझंट आहे. पुराणातल्या अस्त्रांवर आधारित स्टोरी बांधणं कल्पक वाटलं. मला तर व्हिलन्स पण भारी वाटले.

सरतेशेवटी इतकंच म्हणेन की हा पिक्चर बिग स्क्रीन साठी आहे. तो तिथेच पाहिला तर अमेझिंग वाटतो.

ब्रह्मास्त्र पाहिला. नाही आवडला. व्हीएफएक्स छान आहे. मौनी रॉयचं कॅरेक्टर पण छान आहे. पण ओव्हरऑल पॅकेज नाही आवडलं.

शाहरूख यात शास्त्रज्ञ दाखवला आहे. त्याचे नाव मोहन भार्गव दाखवले आहे Happy
बहुतेक सर्वच जणांकडून त्याच्या भुमिकेचे विशेष कौतुक ऐकण्यात आले आहे.

वॉव किती क्रिएटिव्ह आणि ओरिजनल Happy
ऊऊम....तुम्हाला ना उकळत्या तेलाची शिक्षाच करावी लागणार आहे. सरांच्या सरांना नावं ठेवताय.

शाहरूखने स्वदेस चित्रपटात मोहन भार्गव या नासा शास्त्रज्ञाची भुमिका साकारली होती हे भारतातल्या लहानातल्या लहान अगदी काल जन्म घेतलेल्या मुलाला देखील ठाऊक असेल.
त्यामुळे ईथे ओरिजिनॅलिटी आहे की नाही हा प्रश्नच नाही.
पण क्रिएटीव्हिटी येस, त्या स्वदेस कॅरेक्टरचा संदर्भ ईथे चपलख / चपखल (कुठला शब्द कर्रेक्ट आहे?) वापरला असेल तर ते शाहरूखच्या चाहत्यांना नक्कीच सुखावणारे ठरेल.
ब्रह्मास्त्रला मिळालेली बंपर ओपनिंग याची साक्ष देत आहे Happy

अवांतर - गणपती स्पर्धा उपक्रमांची धामधूम संपली की स्वदेसवर एक वेगळा धागा काढूया. कारण स्वदेस हा चित्रपट शाहरूख चाहत्यांच्याच नव्हे तर भारतीय चित्रपटप्रेमींचा फार आवडता आहे. कुठूनही सुरू करा आणि बघायला घ्या. पुन्हा पुन्हा बघावासा वाटेल असा. निव्वळ क्लास! Happy

अगदी काल जन्म घेतलेल्या मुलाला देखील ठाऊक असेल>>> होय हे खरे आहे, मी कालच माझ्या मित्राला मुलगा झाला त्याला बघायला गेलो होतो, त्या बाळाला विचारलं स्वदेस मध्ये शरूख चे नाव काय होतं रे, त्याने क्षणाचाही वेळ न घेता पटकन सांगितले मोहन भार्गव म्हणून आणि पुढे असे ही म्हणाला की तो चिकू जो होता तोच पुढे जाऊन रणबीर होतो

डॉ आले आणि म्हणाले अहो काय आश्चर्य काल या बाळाला रडायचं नव्हतं म्हणून थापट्या माराव्या लागल्या आज बघा कसा चुरचुरू बोलतोय
म्हणलं शाखा ची जादू आहे तुम्हाला नई कळायची

मित्र म्हणाला ते ठीक आहे रे पण पुढे जाऊन हा मायबोली वर गेला तर सगळे माझा उद्धार करतील त्याच काय
म्हणलं सरांचा आदर्श घे
म्हणाला तीच भीती आहे Happy

अहो आशुचँप, तो आतिशयोक्ती अलंकार होता.
तरी तुम्ही त्याला छान खुलवलेत Happy

शाहरूख नावात एक जादू आहे. विषय निघाला की आता पन्नास शंभर पोस्ट त्यावरच येणार या धाग्यावर. ब्रह्मास्त्रला मिळालेली बंपर ओपनिंग याची साक्ष आहे. Happy

आणि हो, मला रोज ऊठून कसला धागा काढायची याची कसलीही "विवंचना" नाही. ठरवले तर रोज दहा काढू शकतो. सभोवतालच्या जगात ईतके विषय नक्कीच आहे. पण स्वदेस हा नक्कीच एक स्पेशल चित्रपट आहे. अगदी शाहरूखचा खोटा खोटा राग राग करणार्‍यांनाही त्याच्या या चित्रपटाचे खरे खरे कौतुक करावेच लागते. Happy

पण या निमित्ताने तुम्ही सर्कसची देखील छान आठवण काढलीत. बघा ना, त्यावेळी मीच नुकताच जन्मलेलो मुलगा होतो. पण तरीही ती मालिका मी पाहिली आहे आणि मला ती आठवत आहे. हिच तर शाहरूखची जादू आहे Happy

गुड्डु बादशा ह्यांवरही सेपरेट धागे हवेत बाई. बादशा मध्ये त्यांचे अ‍ॅक्टीण्ङ बघुन जिम कॅरीने काम करायचे सोडले. एस व्हेंचुरा रेफरन्स.

छे गुड्डू बोअर होता. शाहरूख काढला त्यातून तर बघण्यासारखे एक गाणेच होते. थंडी मे पसीना छूटे ना भूक ना प्यास लगे... डॅडी से पूछ लेना

बादशाह मात्र कमाल धमाल होता ! बॉलीवूडमध्ये या जॉनरचे चित्रपट फार चांगले बनत नाहीत. शाहरूखने त्यात हात घातला आणि सोने करून टाकले.

शाहरूख आणि जिम कॅरी या जोडगोळीबाबत सहमत. मला तर जॅकी चॅन देखील आठवतो. विनोदाचा टायमिंग आणि ती खळखळती उत्स्फुर्त एनर्जी हे या लोकांची खासियत आहे.

मला रोज ऊठून कसला धागा काढायची याची कसलीही "विवंचना" नाही. ठरवले तर रोज दहा काढू शकतो.>>>
मग काढत का नाही
कोणी काही बोललं का तुम्हाला? नाव सांगा आपण त्यांना मायबोलीवर जिणे मुश्कील करून टाकू
तुम्ही इतक्या प्रसव वेदना सहन करताना दहा ऐवजी रोज एकच धागा काढता हा सृजनशील सृष्टीवर अन्याय आहे

मग काढत का नाही
>>>>

एकदा अंबानी मुंबई गोवा हायवेवरून नागपूरला जात होते, मध्येच नालासोपारा आणि कर्जतच्यामध्ये असताना बिल गेट्स यांना जोरदार भूक लागली. म्हणून अदानी यांनी ईगतपुरीचा फेमस वडापाव खायला शिळफाट्याला गाडी थांबवली. तिथे मार्क झुकेरबर्ग यांनी दुकानदाराकडे एक समोसापाव ऑर्डर केला. तो दुकानदार म्हणाला भजीपाव संपले आहेत. पण बर्गर मिळतील. पण एक अडचण आहे. त्याची किंमत नगाला पन्नास रुपये आहे. त्यावर ईलॉन मस्क हसून म्हणाले, अरे राजा मी एकटाच तुझे दिवसाला हजार बर्गर विकत घेऊ शकतो.

त्यावर तो दुकानदार हेच म्हणाला, मग घेत का नाही.
मी शेजारीच ऊभा होतो. केवळ गालातल्या गालात हसलो Happy

ओह प्रतिसाद बदलतो
आधी वाटलं सगळ्यानी थोडी थोडी घेतलीय
मग आलं लक्षात

सर एकाच वेळी इतकी नका घेत जाऊ, तब्येतीला चांगलं नसतंय ते

ब्रह्मास्त्र वीकेंड ला बघितला.... Love story आणि गाणी अगदीच नसती तरी बरं झालं असतं.... संवाद सुध्हा प्रभावी नाहीत.. पण तरी कथा त्याला पुराणा तील reference आणि VFX चांगले आहेत

<तर ब्रम्हास्त्र हा अस्सल भारतीय सुपरहिरो फॅन्टसी अँक्शन थ्रिलर चित्रपट आहे. > हॅरी पॉटरशी साम्यस्थळे आहेत असं वाचलं.

हॅरी पॉटरशी साम्यस्थळे आहेत असं वाचलं>> हो..म्हणजे तिकडे आई वडील दोघेही जादुगार आणि आई वडिलांच्या प्रेमाच्या ताकतीने हॅरी वाचलेला असतो...इकडे शिवा चे आई वडील दोघेही ब्रह्मांश चे मेंबर असतात ज्यांच्या कडे वेग वेगळी अस्त्रे असतात..हे शिवा ला माहित नसते.आता जास्त नाही सांगत

Pages