पाककृती स्पर्धा-१ - तिरंगी पदार्थ - सुशी आणि माकी रोल्स - अमितव

Submitted by अमितव on 10 September, 2022 - 22:21
sushi rolls
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. निशीकी तांदुळ - २ वाट्या
२. सी-वीड शीट्स (सुशी नोरी)
३. राईस व्हिनेगर - ४ -५ टेबल स्पून. हे सुशीसाठीचे साखर आणि मीठ घातलेले मिळते. मी तेच वापरले आहे. नेहेमीचं राईस व्हिनेगर वापरलेत तर त्यात साखर आणि मीठ घालावं लागेल.
४. सुशीसाठीचा फ्रोझन सॅमन माशाचा तुकडा. कृपया टीप पहा.
५. अ‍ॅवकाडो लांब फोडी करुन
६. काकडी लांब फोडी करुन
sushi-sahitya-1.jpg

साहित्य - १

sushi-sahitya-2.jpg
साहित्य - २

sushi-sahitya-5.jpg
साहित्य - ३

बरोबर खायला
७. सोय सॉस
८. पिकल्ड आलं (जिंजर)
९. वसाबी पेस्ट

१०. सुशी रोल करायला मॅट

क्रमवार पाककृती: 

०. सुशी बनवायच्या २४ तास आधी सॅमन मासा फ्रीजर मधुन काढून फ्रीज मध्ये थॉ करायला ठेवा. हा घरातल्या तापमानाला किंवा गरम पाण्यात घालून थॉ करुन नये तर फ्रीज मध्ये काढून थॉ करावा असं म्हणतात.

आता रोल्स/ सुशी करायच्यावेळी:
१. निशीकी तांदुळ धुवून शिजवुन घ्या. हा चिकट तांदुळ असतो, त्यामुळे पाणी नेहेमीच्यापेक्षा कमी लागेल. राईस कुकर, आयपी, साधा कुकर कशातही शिजवा.
२. भात झाला की वाफ जिरायची वाट न बघता क्विक रिलीज करुन भात एका बाऊल मध्ये काढून घ्या. त्यात राईस व्हिनेगर घालून मिसळून घ्या/ सीझन करुन घ्या. याने भाताला सुशीला जी चव असते ती येते. शिवाय असं केल्याने बहुतेक भात अती जास्त चिकटत नसावा आणि हाताळायला सोपा पडत असावा.
३. आता भात थोडा निवतोय तोवर काकडी, अ‍ॅवकाडो, हवं असेल तर गाजर, हँडरोल करणार असाल तर अर्बची पानं ही चांगली लागतात तर ते सगळं धुवुन ज्युलिअन्स करुन घ्या.
४. फ्रीज मधुन मासा काढून पेपर टॉवेलने कोरडा करुन घ्या. किंचित दाबुन पाणी टिपलं की झालं.
५. आता या माशाचे तिरके तुकडे करुन घ्या. पहिला मोठा तिरका तुकडा बाजुला काढा. मग धारदार सुरीने जमतील तितके पातळ तुकडे करा. सॅमनला आडवे मसल्स (नक्षी) छान असते. जीवन सार्थकी लावायचं असेल तर ती नक्षी सुशी वर छान दिसली पाहिजे. टेक्निकली या कट्स ना काय म्हणतात, मसल्स मधुन अगेन्स्ट द ग्रिड कट करायचे का आणि कसे असे प्रश्न पडले तर गूगल करा. पण लक्षात ठेवा आपण स्टेक खाणार नाही आहेत. त्यामुळे फार डोकं चालवू नका.
६. आता पहिला काढलेला मोठा तुकडा सशीमी सशीमी करुन पटकन सोय सॉस/ वसाबीत बुडवुन कोणी बघायच्या आधी गट्टम करुन टाका.

माकी रोल्स

१. सुशी मॅट आडवी पसरवा. ती धुणे/ स्वच्छ करणे टाळायचं असेल तर त्यावर क्लिंज रॅप लावुन घ्या.
२. मॅटवर सीवीड शीट ठेवा. गुळगुळीत बाजू मॅटवर, खरखरीत वरच्या बाजूला.
३. आता हात पाण्याने ओले करुन भाताची मूद करा आणि सी-वीड शीट वर हळूहळू सपाट पसरवा. पूर्ण सीवीड शीट झाकायला मला साधारण दोन मुदी लागल्या. बर्‍यापैकी पातळ थर बनवा. माझा थोडा जाडच झाला, अजुन पातळ चालला असता.
sushi-roll-process-1.jpg

४. आता काकडी, अ‍ॅवकाडो आणि मगाशी कापलेले मासे यांचे तुकडे भातावर ठेवा. मी प्रत्येकी दोन-तीन तुकडे असे दोन बाजू बाजूला दोन ढीग ठेवलेत.
५. आता मॅटच्या सहाय्याने माकी रोल वळत जा. लक्षात ठेवा आपल्यात ती मॅट खात नाहीत, त्यामुळे मॅट रोल-ओव्हर करायची आहे वळायची नाही. भाताच्या चिकटपणा मुळे बर्‍यापैकी सहज रोल वळला जातो. जमेल तितका घट्ट वळा. हे अजिबात कठीण नाही.
६. आता रोलच्या दोन्ही बाजूंनी काही बाहेर आलं असेल तर भाताला चिकटवून आत ढकलायचा माफक प्रयत्न करा. आठवा: सुशी प्लेसला मिळणार्‍या रोल्स मधले बाजूचे रोल्स यथातथाच वळलेले असतात, आणि आपण तर सुशी शेफ पण नाही!
७. आता धारदार सुरी घेऊन त्या एक सापाचे आठ तुकडे करा. लक्षात ठेवा: डिव्हाईड अ‍ॅड काँकर!
म्हणजे आधी मध्यभागी कापून एकाचे दोन सारखे रोल करा. मग त्या दोन रोल्सच्या मध्यभागी कापा म्हणजे चार रोल्स होतील. मग चाराचे आठ करा. असं केल्याने रोल्स बर्‍यापैकी एकसमान दिसतात.
८. आता हे रोल्स, एका छोट्या बोट मध्ये/ वाटीत सोय सॉस आणि झेपेल तितकं वसाबी एकत्र करुन बरोबर पिकल्ड आल्याचे काप देऊन सर्व करा.
sushi-final-1.jpgसुशी:
ही करायला अत्यंत सोपी आहे.
१. हात ओला करुन लहान लिंबाच्या आकाराचा गोळा हातात घ्या. आता या भाताला मुटकुळं करतात तसा आकार द्या. निमुळता लंबगोल.
२. आता हा प्लेट मध्ये ठेवा आणि त्याच्यावर माशाचा एक तुकडा ठेवा.
३. हे दोन्ही, आता तळहातावर घेऊन अंगठा आणि तर्जनीची टोक एकमेकांना जोडून ओके इमोजी करतात तशी करा आणि यावरुन दोन-तीन वेळा अलगत फिरवा म्हणजे जरा चांगला आकार येईल. हे फार बोरिंग वाटलं (जे मला वाटलं) तर स्किप मारा, आणि वरुन माश्याचा तुकडा जरा दाबुन बसवा. तो मासाच इतका सुंदर दिसतो की बस! आणि तसाही भात झाकलाच जातो.
झालं! तय्यार!

व्हेजी रोल्स
sushi-roll-process-2.jpg

१. घरात व्हेजी लोकं असतील तर हे आनंदाने करा. माशात वाटेकरी जितके कमी तितकं चांगलंच ना! Wink
२. यात माकी रोल्सच करायचे फक्त मासा घालायचा नाही की झालं.
sushi-final-3_0.jpg
३. काकडी, अ‍ॅवकाडो, रताळं (रताळं डाऊन मार्केट वाटत असेल तर स्वीट पटेटो म्हणा) याचे चांगले लागतात.

वाढणी/प्रमाण: 
खाल तितके
अधिक टिपा: 

१. सुशी साठी नेहेमीचा सॅमन मासा वापरू नका. सुशी ग्रेडचा म्हणजे विशिष्ट तापमानाला काही वेळासाठी थंड केलेला असा मासा तुमच्या नेहेमीच्या दुकानात मिळेल किंवा एशिअन ग्रोसरी/ टीएनटी मध्ये हमखास मिळतो तोच वापरा. सुशी मध्ये कच्चा मासा खातो त्यामुळे यात हयगय अजिबात करू नका. हा मासा खूप महाग मिळतो पण बाहेर जाऊन चौघांनी सुशी खायला जो खर्च होतो त्याच्यापेक्षा बराच स्वस्तात कारभार होतो.
२. सुशीत असंख्य प्रकारे विविधता आणता येते. हँड रोल्स, आतली बाजूबाहेर म्हणजे बाहेर भात आणि सीवीड आत असा रोल, क्रिस्पी रोल्स इ. इ.
३. वेगवेगळ्या प्रकारची सुशी खाताना प्रत्येकाची चव नीट वेगळी समजायला सुशी खायच्या आधी आल्याचा काप खातात म्हणजे तोंड विसळून निघते आणि पहिली चव तोंडात रहात नाही.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट, युट्युब व्हिडिओज
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जबरदस्त, माझा फार आवडीचा पदार्थ पण मी अजून तरी बनवण्याचं धाडस केलं नाहीए
बाय द वे , नॅानवेज रेसिपी चालणार आहे का ?

मस्त! बरेच कष्ट आहेत पण कष्टाचे फळ एकदम भारी दिसत आहे.

(म्हाळसा, स्पर्धा धाग्यात तसा उल्लेख नसेल तर कशाला मुद्दा काढता उगाच! Proud )

सुशी अत्यंत आवडते. पण करुन बघू बघू करत इतके वर्षांत कधी केलीच न्हवती. यावेळी तिरंगी पदार्थ म्हटल्यावर पहिली सुशीच आठवली, पण सगळी साहित्य, कृती शोधण्यापासून सुरुवात होती. काल मुदत वाढत्येय दिसल्यावर टी-एन-टी गाठलं. तिकडे मी हातात कागद घेऊन काही इंग्रजीत लिहिलेलं दिसतंय का आवेशात चालतोय बघून एका एशिअन माणसाला दया आली बहुतेक! त्याने भरभर इकडे तिकडे कुठे काय मिळेल दाखवून फारच मदत केली.
म्हाळसा, नियमांत नॉन व्हेजचा उल्लेख नाही, त्यामुळे चालयला हरकत नसावी.
मानव, मी लिहिताना फार आकडे वाढवून लिहिलंय म्हणून कष्टाचं वाटेल. पण अजिबात कठिण नाही. सगळे जिन्नस जमवलेत तर खूपच सोपी आहे.

मस्तच रेसीपी. कौशल्याचे काम आहे. इथे सुशी फार महाग मिळते. सहा तुकडे सहाशे रुपये प्लस डिलिव्हरी चार्जेस, त्यामुळे घरी बनवणे श्रेयस्कर.

छान दिसतेय, तुमच्या रेसिपीतून काहीतरी वेगळे मला सापडतेच. अगदी प्रोफेशनल लूक आहे.

नॉनवेज बघून मी सुद्धा जरा गडबडलोच. पण तसेही गणपती गेलेत आता..

वैयक्तिक मत - स्पर्धेसाठी म्हणून नॉनवेज पदार्थ असायला हरकत नाही. त्यामुळे आपण आजवर कित्येक पाकृंना मुकलो आहेत. तरी गणपतीला नॉनवेज नको म्हटल्यास ते पदार्थ गणपती गेल्यावर मुदतवाढीत देण्याचा नियम करू शकतोच. हा स्वतंत्र धाग्याचा विषय असल्याने तुर्तास ईतकेच Happy

धन्यवाद.
@वेमा प्रादेशिक मध्ये जपानी असा ऑप्शन द्या ना. सध्या कॅलिफोर्निया रोल्स अमेरिकन म्हणून अमेरिकन प्लेस होल्डर म्हणून ठेवलाय.

मस्तच दिसतायत सुशी रोल्स!
उत्सव एकदम ओरिएन्टल केलास तू अमित Happy
(मेरी सुशी है जापानी, स्प्रिंग रोल्स व्हियतनामी, कॅनेडा में है रसोई, फिर भी बाप्पा हिंदुस्तानी!
असं काहीबाही सुचायलंय Proud )

लेकाला खूप आवडते हे पण वेगवेगळे घटक कुठे आणा, व 'पिंच ऑफ दिज' व 'पिंच ऑफ दॅट' वापरून उरलेल्या सामानाचे काय करा हा प्रश्न.... हे वाचून त्याला करायला शिकवेन. एकदोनदा सुशीच्या नावाखाली काकडीचा दहीभात दिलाय मी!
व्यवस्थित लिहिलेय, छान दिसतेय!!

फिर भी बाप्पा हिंदुस्तानी!>>>> Lol

(मेरी सुशी है जापानी, स्प्रिंग रोल्स व्हियतनामी, कॅनेडा में है रसोई, फिर भी बाप्पा हिंदुस्तानी!
असं काहीबाही सुचायलंय Proud ) स्वाती , भारीच जमलंय हे.

अमित केड्रामा बघतेय असा भास झाला मला. हे किमबॅप सारखंच आहे सेम.प्रत्येक केड्रामात हे खातातच आणि तयार करताना पण इतक्या वेळा बघितलंय, मला मस्त वाटलं रेसिपी वाचून. ( मी स्वतः अजून सुशी खाल्ली नाही कधी पण कशी खायची यांचे व्हिडिओ बघितले आहेत Proud )

प्रतिक्रियांसाठी सगळ्यांना धन्यवाद. Happy
स्वाती Proud आता नेक्स्ट पूटिनचाच नंबर लावला पाहिजे.
काकडीचा दही भात! कुफेहीपा! Proud
केड्रामा नाही बघितले अजुन. किमबॅप सर्च केलं तर भाताला व्हिनेगरने सिझन करायच्या ऐवजी तिळाच्या तेलाने सीझन करतात असं दिसतंय.

<<एकदोनदा सुशीच्या नावाखाली काकडीचा दहीभात दिलाय मी!>>>
निशब्द या कल्पकतेवर.. साष्टांग _/\_

मी सुशी केली नाही, मी सुशी खाल्ली नाही...
पण एक ममव शंका - इन्द्रायणी तांदळाचा थोsssडा जास्त पाणी घालून केलेला भात बराच चिकट होतो, तो चालेल का इथे????

हो चालेल. तुम्ही करुन बघितलंत तर लिहा.
ह्या निशीकी भाताला त्याची काही फार स्टाँग 'चव' / 'वास' असा जाणवला नाही. अगदी बासमती नको, पण बाकी लहान शिताच्या चिकट भातात राईस व्हिनेगर (विथ साखर मीठ) घातलं की चालेल असं वाटतं.

हो! नोरी स्नॅक वालं (वीड लिहिलं आणि खोडलं Proud ) ते बारकं असतं. ते प्रचंड अ‍ॅडिक्टिव्ह आहे.

जबराट आहे हे पण अपने बस कि बात नही (म्हणजे खायला आवडतं पण करायला जमणं अवघड)
... बाप्पा हिंदोस्तानी >>> हे अगदी चपखल (म्हणजे अर्थ आणि मीटर दोन्ही चपखल)

अगदी शिजवूनच हवा असेल तर टेंपुरा करा आणि घाला, आणि माश्याऐवजी श्रिंप टेंपुरा घाला. तो चांगला लागेल.
मासा शिजवुन तो अगदी मरगळलेला होईल. मासा शिजवायचा असेल तर तो इतर अनेक रेसिपीत करतोच की. इथे माशाची पातळ स्लाईस सिझन केलेल्या भाता बरोबर वसावी-सोय सॉसच्या मिश्रणात बुडवुन खायची आहे. कच्चा मासा सिल्की तोंडात विरघळणारा टेस्ट लेस ओडर लेस असा काही तरी भारीच लागतो. शिजलेला मासा चावायला लागेल आणि सुशी म्हणून तसं सुशीचं कंडिशनिंग झाल्याने नाही बरा वाटणार असं मला वाटतं.