कृत्रिम बुद्धिमत्ता

Submitted by पराग१२२६३ on 10 September, 2022 - 07:43

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) म्हणजे कृत्रिम पद्धतीने विकसित करण्यात आलेली बौद्धिक क्षमता. अलीकडील काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विविध क्षेत्रांमध्ये केला जात आहे. या बुद्धिमत्तेवर आधारलेलं यंत्र मानवाप्रमाणं स्वत: विचारही करू शकतं आणि परिस्थितीनुरुप निर्णयही घेऊ शकतं.

कृत्रिम बुद्धिमत्तेची ऐतिहासिक पार्श्वभूमी
इसवी सन पहिल्या शतकात ग्रीक वैज्ञानिक हेरोन यानं मानवाला त्याच्या कामात उपयुक्त ठरू शकणाऱ्या यंत्राचा उल्लेख केला होता. त्यानं काही यंत्र बनवलीही होती. त्यानं आपल्या ग्रंथांमध्ये 100 पेक्षा जास्त यंत्रांचं सचित्र वर्णन केलं होतं. भारतीय पौराणिक कथांमध्ये अशा स्वरुपाच्या यांत्रिक वस्तूंवर आधारित कथांचा समावेश आहे. ज्यूधर्मीयांच्या कथांमधील मातीच्या गोलेन, प्राचीन ग्रीक कथांमधील यांत्रिक दास ही त्या काळातील यंत्रांची काही उदाहरणं आहेत. इब्न अल-जजरी या अरब वैज्ञानिकांनं आपल्या लेखनात मानवाप्रमाणं दिसणाऱ्या आणि काम करू शकणाऱ्या यंत्रमानवाची संकल्पना सर्वात आधी मांडली होती. त्यानं मांडलेल्या संकल्पनांमध्ये शंभरपेक्षा जास्त यंत्रांमध्ये यांत्रिक चाकांचा वापर करून वेग आणि गतीचं नियंत्रण करण्याच्या पद्धतींचा समावेश होता. चीनमध्ये सु सोंग यानं 1088 मध्ये एक यांत्रिक घंटागृह उभारलं होतं.

यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
यंत्रमानव (Robot) किंवा अन्य यंत्रांचे नियंत्रण मानवाकडून केलं जातं. त्यामुळं नंतरच्या काळात मानवानं त्याच्याही पुढे विचार करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये अशा यंत्रांच्या निर्मितीबाबत विचार मांडला जाऊ लागला, जी यंत्र परिस्थितीनुरुप स्वत:हून निर्णय घेऊ शकतील, जिला विविध वस्तूंविषयी मानवाप्रमाणेच संवेदनशील असेल. या दृष्टीनं 1950 नंतर संशोधन सुरू झालं. अलिकडील काळात होत असलेल्या व्यापक संशोधनामुळं कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी जीवनात प्रवेश करू लागलेली दिसत आहे. आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेले दूरचित्रवाणी संच (टी.व्ही.), धुलाई यंत्र (Washing Machine), शीतपेटी (Fridge) यांसारखी यंत्र कृत्रिम बुद्धिमत्तेची उदाहरणं आहेत. आपण त्यामध्ये ज्या पद्धतीनं आज्ञावली (Programming) करू, त्याप्रमाणं ती कार्यरत राहतात. त्यामुळं यंत्रमानव हे आता केवळ यंत्र राहिलेलं नसून मानवाप्रमाणं विचार, आचार करू लागले आहेत आणि वस्तूंबाबत त्यांची जाणीव वाढू लागली आहे. ही यंत्र एखाद्या घटनेवर आपलं मत देऊ लागली आहेत आणि एखाद्या घटनेचं विश्लेषणसुद्धा करू लागली आहेत. हे सर्व कृत्रिम बुद्धिमत्तेमुळंच शक्य होत आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जास्तीतजास्त माहितीचं संकलन आणि तिचं अत्यंत वेगानं विश्लेषण या दोन्ही घटकांना अतिशय महत्व असते. त्यासाठी संगणक किंवा यंत्राला संलग्न केलेला processor उच्च क्षमतेचा असणे अत्यावश्यक असते.

अलिकडे कार्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची यंत्र बसवलेली असतात, जी अनेक माणसांची कामं कमी वेळेत करू शकतात. अलिकडे चालकरहित मोटारगाड्या ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ लागली आहे. या गाड्या कृत्रिम बुद्धिमत्तेचंच उदाहरण आहेत. या गाड्या स्वयंचलित आणि रस्त्यावरील परिस्थितीनुसार वाहनाचे नियंत्रण करू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं मानवी मेंदूचे कृत्रिम प्रतिरुप बनवण्याचे प्रयत्न होत आहेत. हा कृत्रिम मेंदू मानवी मेंदूप्रमाणेच विचार, विश्लेषण करून निर्णय घेऊ शकेल. तो स्वत:चे तर्कही मांडू शकेल.

फेसबुकच्या वापरकर्त्यांना त्यांच्या संभाव्य मित्रांची सूची सतत पाठवली जात असते. कधी असंही होतं की, आपण इंटरनेटवर काम करत असताना आपल्याला विविध जाहिराती अचानक स्क्रीनवर दिसू लागतात. अलिकडील काळात भ्रमणध्वनी संचाला (mobile phone) वापरकर्त्याने प्रश्न विचारल्यास त्याचं उत्तर त्या यंत्राकडून दिलं जातं. या सर्व बाबी कृत्रिम बुद्धिमत्तेचाच भाग आहेत. अलिकडे यंत्रांमध्ये ऐकण्याची, पाहण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही एखाद्या यंत्राची बुद्धिमत्ता असते. पंचेंद्रियांच्या माध्यमातून सजीवाला ज्ञान मिळत असते. पंचेद्रियांकडून आलेल्या संवेदनांची माहिती मेंदूपर्यंत पोहचवली जाते. त्यानंतर त्या माहितीचे मेंदूमध्ये विश्लेषण होऊन सजीवांकडून निर्णय घेतले जातात. कृत्रिम बुद्धिमत्तेत अशाच प्रकारे विविध संवेदकांचं जाळं निर्माण केलेलं असतं. त्यांच्या मदतीनं या संजाळातील मुख्य संगणकापर्यंत माहिती पाठवली जाते. त्या माहितीच्या आधारे तो संगणक त्या माहितीचे विश्लेषण करून योग्य तो निर्णय घेतो.

कृत्रिम बुद्धिमत्तेचे उपयोग
- डिजिटलीकरणाच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचं महत्व बरंच वाढलेलं आहे. मानवापेक्षा वेगानं काम करू शकणाऱ्या यंत्रांचं महत्व आज वाढलेलं आहे. चिकित्सा, बांधकाम, अंतराळ संशोधन आणि मानवी जीवनाशी निगडीत विविध कामं करण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता महत्वाची ठरू लागली आहे.
- भविष्यात नॅनो तंत्रज्ञानातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू होईल. त्याच्या मदतीनं सूक्ष्म यंत्रमानव रुग्णांवर शस्त्रक्रिया करू शकेल. म्हणजे डॉक्टरांच्या अत्यल्प हस्तक्षेपानं यंत्राच्या आधारे जटील शस्त्रक्रिया पूर्ण केल्या जाऊ शकतील. वैद्यकीय क्षेत्रातील अन्य कार्यांमध्येही सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहेच.
- क्रीडा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे. सामन्याची उच्च क्षमतेची छायाचित्रं जलद गतीनं काढणं, प्रतिस्पर्ध्यांचे डावपेच पाहून आपले डावपेच रचणं यात कृत्रिम बुद्धिमत्ता मदत करत आहे.
- बांधकाम क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता लाभदायक ठरणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं सुधारणा करण्यासाठी तिचा वापर होत आहे.
- अंतराळ संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्तेचं अतिशय महत्वाचं स्थान आहे. मानवासाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या अंतराळ मोहिमांमध्ये याचा वापर वाढत आहे.
- सायबर गुन्हेगारीमध्ये फसवणुकीचा शोध घेणे किंवा वित्तीय अनियमितता शोधून काढणे, वित्तीय देवघेवींवर देखरेख ठेवणे यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त ठरत आहे.
- सध्या वेगानं वाढत असलेल्या ऑनलाईन खरेदी-विक्रीसाठीही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जात आहे.
- विविध कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांची माहिती गोळा करणे, त्यांना संदेश पाठवणे, नव्या उत्पादनांची माहिती पाठवणे, सूची करणे इत्यादींसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे.
- वाहतूक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं मोटारगाड्या, विमानांचं संचालन मानवी हस्तक्षेपाशिवाय केलं जात आहे.
- कृत्रिम बुद्धिमत्तेचा पुढचा टप्पा असा असणार आहे की, एकदा यंत्रामध्ये आपण आज्ञावली समाविष्ट केली की, ते यंत्र काम करण्यासाठी स्वत:चे नियम स्वत:च बनवेल.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/09/blog-post_9.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Super intelligent असलेली कृत्रिम बुद्धिमत्ता माणूस कंट्रोल करू शकणार नाही.
संशोधक लोकांनी इशारा दिलेला आहे.
स्टीफन हॉकिंग ह्यांनी पण इशारा दिला होता.
बुध्दीमान AI बनवण्याच्या नादात अती बुद्धिमान कृत्रिम बुद्धिमत्ता कधी निर्माण होईल हे माणसाला कळणार पण नाही.

मशिन्स खूप हुशार झाले स्वतः निर्णय घेवू लागले आणि त्यानं कंट्रोल करणे माणसाच्या हातात राहिले नाही तर .
स्थिती खराब होईल .
पण इंटरनेट बंद करून,त्या यंत्राचा वीज पुरवठा बंद करून आपण थोडे तरी स्वतःला वाचवू शकू
पण मला सर्वात जास्त भीती वाटते तो genetic engineering वापरून जर अती बुध्दीमान प्राणी निर्माण झाला तर मात्र माणसाचा पूर्ण विनाश होईल.
कारण तो reproduction करण्यास सक्षम असेल.
यंत्र किती ही स्मार्ट झाली तरी reproduction करू शकणार नाहीत.