लहानपणीचे खेळ

Submitted by योडी on 3 June, 2009 - 01:41

खेळाशिवाय लहानपण?? कल्पनाच करवत नाही ना!! तर आपण लहानपणी जे खेळ खेळायचो ते इथे लिहा. शक्य असल्यास कसे खेळायचे ते लिहीलत तर उत्तमच.. Happy

आणखी एक नॉस्टॅल्जिया
http://www.maayboli.com/node/8242

गुलमोहर: 

आर्या Proud

आम्ही असा 'संतोषी माँ संतोषी माँ' खेळ खेळायचो (तेव्हा ते नवेच फ्याड आले होते, पिक्चरपण आणि त्यातले ते गाणेपण.... मैं तो आरती उतारू रे संतोषी माताकी | ) माझ्या काकांच्या कॉलनीतील सर्व चिल्लीपिल्ली पोरे, आम्ही सर्वजण कॉलनीतल्या मोकळ्या जागेत एकत्र जमायचो.... घरून संतोषी (का अजून कोणत्या तरी!) मातेचा फोटो काकूची नजर चुकवून पळवायचा, देवघरातील घंटा लांबवायची, उदबत्त्या, काडेपेटी, एखादा बटाटा वगैरे... मग बांधकामाच्या उरलेल्या विटांनी संतोषी मातेचे ''देऊळ'' बांधायचे, त्याला बोगनवेलीच्या फुलोर्‍याने सजवायचे, देवळात मातेचा फोटू ठेवून त्या भोवती रंगीत दगड, शंख-शिंपले वगैरेंची सजावट.... बटाट्यात उदबत्ती खोचून पेटवायची, घंटा किणकिण वाजवायची, खोटी खोटी आरती करायची आणि मग सर्वांनी त्या देवळाभोवती फेर धरून ते पिक्चरचे गाणे म्हणत नाचायचे...... आम्ही रोज....अगदी रोज हा खेळ खेळायचो! अजिब्बात बोअर न होता!!!! Uhoh

'डोंगराला आग लागली पळा पळा पळा ' या खेळात ज्याच्यावर राज्य त्याने हे वाक्य म्हटल्यावर स्टॉप म्हणताच आम्ही वेगवेगळ्या अ‍ॅक्शनमधे बसायचं असं ठरलेलं!
(मी लीडर असल्याने) एकदा सगळ्या मुलींना अ‍ॅक्शन्स वाटुन दिल्या होत्या. कोणी तबला वाजवायची, कोणी ड्रम, ढोलकी (हो तेव्हा तेवढीच वाद्य माहित होती)...मी स्वतः सतार वाजवण्याची अ‍ॅक्शन घेतली! ओळखताच नाही आलं कोणाला. Proud

पहिला पाउस पडुन गेला की माती छान ओलसर होते...मग ती टोकदार दगडाने सर्वांनी उकरायची! माझा पाय मोठा...मग त्यावर माती टाकत आणी हाताच्या तळव्याने ठोकत खोपा बनवायचा! तो नीट थापला की हळुच पाय काढायचा. मग या खोप्यापुढे अंगण सजवायचं...वाळुतल्या पांढ-या दगडांनी! एखादी प्रतिस्पर्धी गटातील कार्टी पण स्वतःचा वेगळा खोपा करायची मग काही मुली फितुर! चुकुन एखादीच्या पायाने आपला खोपा मोडला तर गुडघ्यात डोकं घालुन रडायचं मग सगळ्या जणी आपल्या आजुबाजुला येउन "माझी मुठ उघड" म्हणणार! जिची मुठ उघडली तिच्यावर राग नाही पण जिची नाय उघडली ती बिचारी हिरमुसली होउन घरी जायची. Happy

तुम्हा मुलांचे खेळ वाचून आमचे खेळ आठवले. आम्ही लहान असताना कुणीतरी महात्मा गांधी व्हायचं, कुणी पंडीत नेहरू , कुणी बोस, कुणी पटेल असं व्हायचं. गांधीजींवर इतरांना आउट करायचं राज्य असायचं. कधी कधी गांधीजी नेहरुंच्या मागे लागत. नेहरुंची रनिंग कमी असल्याने ते आउट होत. मग ते गांधीजी बनत आणि पटेलांना आउट करत. असे अनेक खेळ असायचे.

आमची मुलं जेव्हां शोले शोले खेळत तेव्हां मनाला यातना होत. आता मात्र मन दगड बनले आहे. मुलांचे बालक - पालक खेळ पाहून धडकीच भरते.

आम्ही "पेपर पेपर" खेळायचो. म्हणजे एक कोणीतरी पेपर छापणारा असायचा. तो वेगवेगळ्या काल्पनिक बातम्या आणि जाहिराती (काल्पनिकच) वहीच्या एका कागदावर अगदी वर्तमानपत्राच्या पद्धतीने लिहून काढायचा. व इतरांना वाचायला द्यायचा. हे "संपादक"पद प्रत्येकदिवशी आळीपाळीने बदलत असे. वाचक मात्र खूप सारे होते. ते छोटे "अंक" नंतरच्या काळात सुद्धा जपून ठेवले होते. अगदी कालपरवापर्यंत. कधीमधी सापडले कि वाचून धमाल यायची Lol

अजून एक खेळ होता. गावातल्या वेगवेगळ्या भागांना वेगवेगळी नावे दिली होती. दिल्ली, अमेरिका, इंग्लंड वगैरे. आणि आमच्या गाड्या त्या त्या भागात जायच्या. म्हणजे जो ड्रायवर असेल त्याने नुसतेच तोंडाने घीर्र्र्रर्र्र आवाज करत पळायचे आणि जो प्रवासी असेल त्याने त्याच्या मागून पळायचे. काही मुले ड्रायवर तर काही प्रवासी होत. ज्याला जिकडे जायचे तो तिकडे जाणाऱ्या ड्रायवरच्या गाडीत बसून जाई (म्हणजे मोठ्या माणसांच्या दृष्टीने त्याच्या मागून पळे) Biggrin अमेरिका खूप लांब गावाबाहेर होती, फुलांच्या झाडापाशी काश्मीर कि स्वित्झर्लंड होते, तळ्याच्या बाजूला कन्याकुमारी आणि वर्गातल्या एका गोऱ्या मुलाचे घर होते तो भाग इंग्लंड. असे काहीसे. खरोखरच्या जगात जिल्ह्याच्या गावाला जाणे हे सुद्धा आम्हा मुलांसाठी पर्वणी असण्याचा तो काळ होता. तेंव्हा आम्ही अशा प्रकारे फिरण्याची जणू हौस भागवून घेत होतो बहुतेक. पुढे मोठे झाल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने वारेमाप देश परदेश फिरलो. इंग्लंडला पहिल्यांदा गेलो तेंव्हा या खेळाची आठवण झाली होती. रम्य ते बालपण Happy

नमस्कार, मी मायबोली वर नवीन आहे. मराठीत "पत्त्यांचे खेळ" असे गुगल वर शोधल्यावर ही चर्चा सापडली. आम्हाला माहित असलेल्या एका पत्त्यांच्या खेळाचे (गोल्फ) नियम आम्ही यु ट्यूब वर टाकले आहेत (मराठीतून) - व्हिडीओ ची लिंक https://www.youtube.com/watch?v=gKOqhO2-1q8

वरती (आणि त्या पत्त्यांच्या खेळाच्या चर्चेमध्ये सुद्धा) बऱ्याच जणांनी काही जुन्या खेळांची नावे सांगितली आहेत. त्यातल्या एखाद्या बैठ्या खेळाच्या नियमांचा व्हिडीओ बनावा असे वाटत असल्यास कृपया सजेस्ट करा. आम्ही असा व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद!

वरती कोणीतरी "लहान मुले वय वर्षे ३ ते ८ साठी स्पर्धात्मक खेळ सुचवा..." असे विचारले आहे.
हा खेळ यु ट्यूब वर सापडला होता, तो पहा.

Pages