लहानपणीचे खेळ

Submitted by योडी on 3 June, 2009 - 01:41

खेळाशिवाय लहानपण?? कल्पनाच करवत नाही ना!! तर आपण लहानपणी जे खेळ खेळायचो ते इथे लिहा. शक्य असल्यास कसे खेळायचे ते लिहीलत तर उत्तमच.. Happy

आणखी एक नॉस्टॅल्जिया
http://www.maayboli.com/node/8242

गुलमोहर: 

अपर्णा, काय हे ! Lol आता वविला तुझ्या हातात स्ट्रॉ दिसला की पळूनच गेलं पाहिजे.
************
एक आस मज एक विसावा, एकवार तरी राम दिसावा, एक वार तरी राम दिसावा |

दिपड्या, घाणेरड्या. अजुनी इंटरवल असाच करतोस का काय? दिवाळीचे बाण लावायला तुझ्याकडे बाटली नको मागायला आता. Biggrin Biggrin Biggrin

पल्ली शाब्दीक कोट्या खूप छान करता तुम्ही,
योगीता,
खूप खूप अभिनंदन हा बीबी सुरु केल्याबद्दल, सगळ्यांनीच आपले सर्व खेळ लिहून झालेले आहेत, सगळं बालपण आठ्वलं,
विषामृत, नदी का पहाड, सुरपारंब्या, गोट्या, भोवरा, डिम, ढूस, बॉम्बे ढाय, कोया कोया, सगळे खेळ आठ्वले.
थॅंक्स यो,

ओहोहो ! योगे अगं काय बीबी सुरू केला आहेस.........सगळ्यांचे लहानपणीचे खेळ पाहुन मलाही खरंच नॉस्टॅल्जीया झालाय.

मी लहान असताना ८-९ वर्षाचा होईपर्यंत गल्लीत मुलींची संख्या जास्त असल्याने......सगळे मुलींचेच खेळ खेळलो ! :P.......भातुकली,जिभल्या,आंधळी कोशींबीर,आडमीटकिडा,विष-अमृत,आईचं पत्र हरवलं,फुगडी! (:D),शिवनापावणी(शिवाशिवी),गदीगायी(हा खेळ ७+७ गद्या आणि दगडाचे गोटे यांचा असतो...नक्की आठवत नाही!).........असे बरेच!

या सगळ्या खेळांमधे मी नेहमीच लिंबुटिंबु असायचो ! Happy

पण जरा मोठा झाल्यावर वर्गातली मुलं चिडवायची " अर्रे...हे बघा...पोरिंच्यात खेळतंय रं!" Sad Lol

आणि मग सुरूवात झाली ...खर्‍या "खेळकर आयुष्याला"....

लपंडाव: आम्ही खूपच भयानक पध्दतीने खेळायचो..... काही पोरं ऊसाच्या शेतात....काही थेटरात....आणि काही आसपासच्या दुसर्‍या गांवाला...वाडीहुन कुंडल्,पलुस,आमणापुर,बुर्ली,दुधोंडीपर्यंत जायची!
शेवटी शेवटी त्यांना शोधायचा घरातल्या लोकांवर डाव यायचा ! Proud

भवरे,गट्टया,विटीदांडु,कोया,चिंचोके,शिग्रेटची पाकीटे यांचे खेळही खूप खेळलो.

विटीदांडु आम्ही पॅराशुटच्या बाटलीला विटी बनवून खेळायचो.....त्याने अबल,डबल्,टिबल,चोबल असे करत करत एकदा पंचविसबल केल्याचेही आठवतेय !! Lol

सायकलची टायरे फिरवणे हा एक जबरी प्रकार होता....त्याचे इतके वेड लागलेले असायचे त्याचे कि, घरातल्यांनी दुकानातुन सामान आणायला सांगीतल्यावरही टायर फिरवत फिरवत दुकानला जायचो ! Lol
येताना मात्र चांगलीच सर्कस व्हायची,टायर गळ्यातच अडकवावे लागायचे.

क्रिकेट हा खेळ आमच्यासाठी बराच वेगळा होता.....त्यातले नियम आंतरराष्ट्रीय नियमांपेक्षाही कडक होते......सिक्स मारला कि आउट ! Sad (त्यामुळे मी दर पहिल्या बॉलला आउट व्हायचो!....भारतीय टीम एका चांगल्या हिटरला मिसली ! :P). बॉल गटारीत गेला कि पण आउट....ज्याने मारलाय त्यालाच तो घेवून यावे लागे.ज्याची बॅट असायची त्याला कधीकधी डबल जिवदान द्यावे लागे. आमच्या स्टंप या नेहमी दगडे नाहीतर काठ्या या असायच्या. बेल्स,पॅड हा प्रकार फक्त टीव्हीवर बघीतला होता!

यानंतर हे कांही अचाट खेळ

१.धनुष्यबाण :
रामायण महाभारताचा काळ होता तो.(म्हणजे या सिरीयल टीव्हीवर चालु असायच्या)
आम्ही खराट्याच्या काडीला वाकवून दोरी बांधुन धनुष्य तयार करायचो....पण ते फारच कमकुवत असायचे...मग शोध सुरु झाले...पाईपच्या तुकड्याला रबर बांधायचे आणि तिच्या भोकातून बाण खेचुन मारायचा! याने नेमही अगदी चांगला बसायचा
बाण गनगाटाचा/सरमाडाचा असायचा. त्याला पुढे पेनचे टोपण लावायचे...मी नविनच शोध लावला होता.
त्या बाणाला पुढे डांबराचा गोळा लावायचा आणि आत टाचणी घुसवायची.
उदबत्तीचा गोल आकाराचा पुडा पाठीला बांधायचा आणि त्यात हे ठेवणितले बाण(अस्त्रे असायची!) अशी आमची युध्दे चालत इकडच्या गल्लीविरूध्द तिकडची....!

समोरासमोर आलो कि, एकसाथ सगळे ओरडायचो..." महा.....भाSssर........त !! " Lol आणि एकमेकांवर तुटून पडायचो!
तसेच या धनुष्यबाणाचा प्रयोग आसपासची कुत्री,मांजरे,डुकरे,चिमण्या,कावळे यांच्यावरही व्हायचा.
नेम धरताना तीच रामायणाची बाण खेचुन कपाळाला लावुन मंत्र म्हणन्याची स्टाईल ! Proud
पण घरच्यांचे रट्टे बसल्यावर हा हिंस्र खेळ बंद पडला !

२.पाण्यातले खेळ :
पोहायला शिकल्यावर, विहीरीत आम्ही शिवाशिवी ने खेळायचो. तसेच एखादी हळुहळु बुडणारी वस्तु पाण्यातुन वर घेवून यायची(उदा.लिंबोणिची बी).
तसेच सुर,गड्डा(पाणी वर उडवणे,ही उडी चुकीची बसली कि पाठ शेकाटते), कोलांटी, याव्यतिरीक्त अजुन बर्‍याच स्पेशल उड्या होत्या त्या शब्दांत सांगणे कठीण आहे ! Happy

३.चिक्कीबॉल आणि आबाधबी(धबाधबी) :
चिक्कीच्या वाळक्या शेंगा गोळा करायच्या आणि त्याची चेचुन चेचुन पेस्ट बनवायची. त्या पेस्टचा गोळा बनवायचा.तो दोनेक दिवसांनी टणक बनतो. मग त्याच्यावर चिंध्या गुंडाळायच्या आणि वर एक चांगले कापड गुंडाळून वाकळेच्या जाड दोर्‍याने शिवायचो. त्याने धबाधबी खेळायची. पण धबाधबी ने खेळण्यापेक्षाही बॉल बनवणे माझे आवडते काम होते आणि माझी स्पेशालिटी ! Happy

४.मोगलीचा बुमरँग :
हा खेळ तसा कुणी खेळतं का नाही ते माहीत नाही. पण मी आणि माझ्या मित्राने बुमरँग बनवायचा चंग बांधला होता. एका पुस्तकात बुमरँग कसा बनवतात ती माहीती मीळाली. १२० अंशाचा, हलक्या लाकडाचा,वनपिस तुकडा शोधणे हे अवघड काम होतं.पण मिळवला...! शेजारच्या सुतारकाकांच्या मदतीने त्याचा, हवा तसा बुमरँग बनवूनही घेतला.
त्या पुस्तकात तो कसा चालवायचा तेही लिहीले होते....तो फेकताना कसा फेकायचा ..कसा परत पकडायचा वगैरे ..वगैरे! ....पण तो मोगलीसारखा चालवायला कधीही जमले नाही. Sad

मोगलीसारखे ओरडायला मात्र सही जमायचे ! Proud

प्रयोगी तत्वावर असे बरेच नवानविन खेळ खेळलो..पण हा खास आठवतोय्...बरीच मेहनत घेतली होती! त्यामुळे. Happy

शाळेतले मैदानी खेळ कबड्डी,खोखो हेही आवडीने खेळायचो.
दोन वर्षे मामाच्या गावी शिकायला असताना सुरफाट्या(आट्यापाट्या), सुरपारंब्या हे खेळही शिकलो,खेळलो. अजुन बरेच आहेत या लिस्टमधे नंतर कधीतरी लिहीन ते.आता थांबतो !

सगळंच काही अविस्मरणीय आहे. Happy

(आजकालची कार्टी, त्या बकवास व्हीडीओ गेमची बटने दाबत... घरी बसलेली दिसली कि, जाम वैत्ताग येतो!)

सलाम..सलाम...सलाम
ज्या डोक्यातन ह्या बी बी ची आयडिया निघाली त्या डोक्याला सलाम.
लहानपणी खेळलेल्या खेळांना नी खेळगड्यांना सलाम.
हे खेळ बनवण्यार्‍यांना आणि खिलाडूपणा शिकवण्यार्‍या सलाम
आणि ह्या सर्व खेळांनी बहरलेल्या लहानपणाला सलाम.

*************************************************
जे जे आपणासी ठावे.

प्रकाश Rofl
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.

http://www.maayboli.com/node/8242 इथे जा आणि आपले अनुभव शेअर करा.

प्रकाश,
अगदी अगदी Happy आम्ही पण हे सगळे खेळ खेळायचे Happy
धनुष्यबाणाच तर झक्कास वर्णन Happy

वा मस्तच्चे बीबी.. Happy अन नारळाच्या करंटीचे सुतळी ओवून केलेले फोन? Happy

साबणाच्या पाण्याचे फुगे काढायचे का कोणी??
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.

http://www.maayboli.com/node/8242 इथे जा आणि आपले अनुभव शेअर करा.

अजुनही काढते.. लेकीला आणल की आधी.. Happy

हे तर जाउ द्या...!

देव्हा-यातल्या पितळेच्या देवांना संडासच्या नळाखाली धुतलंय कोणी!

मी अन माझ्या बरोबरीची चुलतबहीण, एका सुट्टीमधे राहुरीला आली तेव्हा आम्ही हा उद्योग केला होता...सगळ्या देवांना संडासच्या छोट्या बादलीत बसवले अन.. निरमा टाकुन छान फेस केला अन न्हाउ घातले... अन मग..जाउ द्या!.. पुढचं समजुन घ्या ना गडे! Happy

शाळेत असतांना, सरांचे लक्ष्य नसतांना कर्कटकने लाकडी बेंचला होल पाडायच...छान खळगा तयार करायचा..त्यात खडुची पावडर भरायची अन....वरतुन शाईच्या पेनातली शाई टाकायची...आहे की नाही मज्जा! कै च्या कै खेळ! Happy

अजुन एक गंमत, गुलमोहरचे फुल खाल्लेय कोणी? गुलमोहरच्या फुलातील राजा म्हणजे एक पाकळी पांढरी अन वर लाल ठिपके असलेली असते, बाकी सगळ्या लाल असतात, तर ती पांढरी पाकळी जरा जाड असते, अन आंबटचिंबट छान लागते. माझी एक आतेबहीण पिकलेल्या लिंबोण्या पण खायची!शाळेत असतांना गेटच्या बाहेर चिंचा बोर करवंद वाली बसायची...धुळ्याला 'अमोन्या' नावाचा अजुन एक प्रकार येतो. हुरड्यासारखे दाणे पण अतिशय आंबट..आवडीने खायचो..! राहुरीला शाळेजवळ 'तुती'च्या झाडांची लाईन होती.. त्याचे फळ, फालसे असे नविन नविन प्रकार खाल्ले!

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...

http://www.maayboli.com/node/7762#comment-249911

अरे व्वा.. मस्तच बीबी !!

बरेचसे खेळ मिळतेजुळतेच आहेत..
प्रकाश.. धनुष्यबाण नि मोगलीसारखा बुमरँग माझाही आवडीचा खेळ.. पण बुमरँग म्हणशील तर मी जाडजुड पुठठ्याचा बनवायचो नि मधल्या कोपर्‍याला दोन बोटांमध्ये पकडुन चक्र फिरवल्यासारखे गॅलरीतुन बाहेर सोडायचो.. परत आलेच समजा !!

साबणाच्या पाण्याचे फुगे.. त्यातही मोठ्यात मोठा काढायला अजुनही मजा येते.. पुतणीसाठी अजुनही फुगवतो !

पावसाळ्यात खेकडे, बेडुक पकडण्याचा पण मस्त खेळ करायचो.. पकडायचे नि मग खड्डा खणुन वरती फरशी ठेवायची.. वाटायचे राहतील तिथे.. पण दुसर्‍यादिवशी गुल्ल !!

क्रिकेटच्या स्टंप ने गोल्फ खेळणे हा पण एक आवडीचा खेळ होता.. परफेक्ट होल साठी खड्डा खणुन करवंटी ठेवायचो ! Happy

गुलमोहर फुल घेउन फायटरचा खेळ खेळणेही आवडायचे.. पाकळ्यांमध्ये दांड्या असतात त्यात नि वरती टोकाला डाळी सारखे परागकण असतात ! एकदुसर्‍यांबरोबर त्या दांड्या घेउन ती डाळ बसल्याबसल्या उडवायची !

असे बरेच अतरंग खेळ आहेत !!

नयना.. Lol

सैतुकाच झाड होतं आमच्या शेजार्‍याच्या घरी . खूप खायचो आम्ही ते . आणि कारी बोरं डोंगरावर मिळायची आख्खा दिवस डोंगरावर जाउन जमवायचो कारी बोरं.
गुलमोहरचे फुल खाल्लेय कोणी? >> मी खाल्लय Happy
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

गुलमोहरचे फुल खाल्लेय कोणी?>>> मी पण खाल्लय... त्यायल्या पांढर्‍या पाकळ्या खाण्यासाठी तर आम्ही भांडायचो पण.. Happy

०------------------------------------------०
आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका!!!

देव्हा-यातल्या पितळेच्या देवांना संडासच्या नळाखाली धुतलंय कोणी!>>>> नयने अल्टीमेट! Lol
गुलमोहरचे फुल खाल्लेय कोणी?>>> मी पण. मी पण खाल्लय गुलमोहराचं फुल.

आम्ही पेपर, मासिकांमधली चित्र कापुन जमा करायचो. मग ती आडवी आणि उभी अशी विभागणी करायची. कुठली तरी एका प्रकारची निवडायची. मग ती चित्रं एकमेकांना (साईडवाइज) चिकटवायची. ती एक मोठ्ठी रिबनसारखी तयार होते. मग बुटाचा खोक्याला दोन छिद्र करुन त्यातुन कुंचाच्या(झाडुच्या) दोन काड्या टाकायच्या. मग चित्रांच्या रिबनचं एक टोक एका काडीला चिकटवायचं. ती रिबन त्या काडीभोवती गुंडाळायची आणि दुसरं टोक दुसर्‍या काडीला चिकटवायचं. मग दोन्ही काड्या एकाच दिशेनी फिरवत तो सिनेमा बाकीच्यांना दाखवायचा. Happy घरातल्यांचा तर जीव निघेल इतक्यांदा! रिवाईंडचा पण शो असायचा. Proud
आई बिचारी आधीच ती कात्रणं, डिंक, कुंचाच्या काड्या वाया घालवणं, कधी कधी काड्या त्या छिद्रांमधे टाकण्याआधीच त्यांना उत्साहाच्या भरात ती चित्रांची रिबन चिकटुन टाकणं, चित्रांच्या सिक्वेन्सवरुन भांडणं यानी जेरीला आलेली असायची. एकदाचं बुटाच्या डब्याचं झाकण त्याला लावलं की मग ती जिन्याखाली ठेवुन द्यायची. २-३ दिवसात आम्ही विसरुनही जायचो.

पेनच्या रिकाम्या रिफीलनी साबणाचे फुगे उडवायचो. प्लॅस्टीकच्या पिशवीतला पेप्सीकोला आणि आमच्या शाळेसमोर १ रुपयाला मिठाच्या पाण्यात ऊकळलेले २० बेबी आवळे मिळायचे. नुसत्या विचारानीच तोंडाला केवढं पाणी सुटलय!
______________________________
"शापादपि शरादपि"

आम्ही शाळेत असताना चने-मने बोरं आणि बोरकुट खुप खायचो.. अगदी ५ पैशाची चने-मने बोरं घ्यायचो...

०------------------------------------------०
आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका!!!

>>गुलमोहरचे फुल खाल्लेय कोणी?>>>
खातात की गुलमोहराची पांढरी रंगीबेरंगी पाकळी. Happy

पिल्लु बोरकुट मला पण आवडायचा!
एसारके .... हा सिनेमाचा शो आम्ही पण करायचो!

एबीसीडी सातारा माहीतीये कुणाला?
क्वार्टरला असतांना .. हा ( एका हाताचा पालथा आणि एका हाताचा सरळ पंजा ठेउन )टाळ्यांचा खेळ एकदातरी खेळल्याशिवाय आम्ही घरी जात नव्हतो.

गाणे असे आहे:

एबीसीडी सातारा
त्यात निघाला म्हातारा
म्हाता-याने खोदला खड्डा
त्यात निघाला गांधी बुढ्ढा (सॉरी)
गांधी बुढ्ढ्याने आणला साबु
त्यात निघाले सुभाष बाबु
सुभाषबाबुंनी आणल पेरु
त्यात निघाले पंडीत नेहरु
पंडीत नेहरुंनी केली सही
त्यात निघाली ताराबाई
ताराबाईने खाल्ले पान
त्यात निघाले हिंदुस्थान
हिंदुस्थान म्हणाले आलो आलो
चीन म्हणाले मेल्लो मेल्लो मेल्लो मेल्लो
*****
नख नख नखुल्या चंदनाच्या टिकुल्या
एक टिकली उडाली, गंगेत जाउन बुडाली
गंगेला आला पूर पूर .. आम्ही मुले शूर
असे काहीसे एक गाणे होते
***
दिवेलागणी झाली की सर्वांचे खेळ संपले की जिन्यामधे बसुन एक मुलगी भुताच्या गोष्टी सांगायची! मग सुरु व्हायचे एकेक ऐकीव किस्से ( आया-बायांकडुन ऐकलेले)

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...

http://www.maayboli.com/node/7762#comment-249911

यो, बूमरँग मला शिकव ना रे. माझ कधीच परत नाही आल. पोराच्या हातात द्यायचेत हे खेळ आता.
*************************************************
तू नसताना आठवीत बसतो जराजरासे,
तुझे बहाणे, ना येण्याचे तर्‍हेतर्‍हेचे

>>गुलमोहरचे फुल खाल्लेय कोणी?>>> हो हो आम्हीपण खायचो, एक्झोराची फूलं काढून त्याची दांडी चोखायचो . मधासाठी Happy घाणेरीची काळी काळी फळं कोणी खाल्ली आहेत? आणि पावसाळ्यात आमच्याइथे रानटी काटेरी फळं यायची ती आम्ही मुलमुली एक्मेकांच्या अंगावर मारायचो . एकदा का ते फळ डोक्यात अडकलं कि केस असे गुंतायचे !!! आणि चिकटणारी पानं पण असायची ती ही शर्टाला मागे चिकटवायचो.
आम्ही खेळताना राज्य येण्यासाठी हे गाणं म्हणायचो
इब डिब डिब
अँडं डँडं डँडं डो
इल पील पील पो
अँट पँट पैला पो
थालम थोला थती वन Happy

धनु

आम्ही कड्यापेटीचे फोन करायचो , आणि त्यातून ऐकूपण यायचे Happy
मे महिन्याच्या सुट्टीत सगळी चुलत भावंड मिळून युध्द खेळायचो . माझा भाऊ खुर्चीचा रनगाडा तयार करायचा मग धडाड धूडूम( प्रो. आठवले का? Wink ) युध्द सूरू. मग आम्ही होडीतून कुठेतरी जात असणार आणि नेमके कोणीतरी पाण्यात पडणार. ( कोण पडणार हे हे ठरलेलं असायच. नेहेमी माझी धाकटी बहिणच . ती एकदा वैतागली , ए नेहेमी नेहेमी मीच काय पडणार?) आणि मग आम्हाला शत्रूचा कोणितरी हेर सापडणारं , मग त्याच्या कडे एखादा नकाशा , ह्याची पण एक गम्मत , हा नकाशा जर आम्ही भावाला दाखवला तर तो नुसताच घ्यायचा, त्याला एवढं काहि महत्व द्यायचा नाही. पण मोठ्या बहिणींना जर नकाशा सापडला तर तो एवढा महत्वाच असायचा . अशी पार्शलीटी Happy . एकदा आम्हीत्याच्या विरूध्द बंड पूकारलं, पण तसा तो आमचा लाडका भाऊ होता. ( अजूनही लाडकाच आहे) आमचे खूप वेगवेगळे खेळ घ्यायचा तो. whats the good word? खेळायचो . तो सगळी तयारी करायचा.
चिठ्ठ्या तयार करायचा , खूप मजा यायची.
आणि वरती बाकीच्यांनी लिहीलेले खेळ- लगोरी, डफ्फर, करवंटी ऐसपैस,
आणि बहूल्यांची लग्नं लावायचो, त्यांचे दागिने करायचो त्यांना कपडे शिवायचो. माझे टेलरिंगचे पहिले धडे मी तेव्हाच घेतले Happy
धनु.

समोरासमोर आलो कि, एकसाथ सगळे ओरडायचो..." महा.....भाSssर........त !! " >>>>>

आम्ही आक्रमण!!!!!!!!

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

अरेच्च्या! सगळ्यांनीच खाल्लीत वाटत गुलमोहराची फुले..:) मी सुध्दा.. Happy
शिवाय गुलाबाची (कधीकधी), गोड पिवळ्या लिंबोण्या, लांब गवत तटकन उपटून मागचा पांढरा भाग, कामुण्या (यांना शहरी लोक काय म्हणतात माहित नाही) - काळ्या असतात छोट्याश्या अन बुळबुळीत..
खेळपाणी खेळताना एका मैत्रिणीनं एकदा भिजवलेली तुरीची डाळ पण खायला घातली होती - कच्चीच.. अन एकदा एका सासुरवाशिणीने खेळात (हो, ती फक्त १५ ची होती अन एका मै. ची वहिनी) एरंडाच्या बिया खाऊ घातल्या. मला, बहिणीला व मैत्रिणीला उलट्या झाल्या जास्त खाल्ल्या नव्हत्या म्हणून अन वैनीला २ दिवस दवाखान्यात ठेवावं लागलं होते.. Sad त्यांनी परसातलं ते झाड काढूनच टाकलं मग..

नयने,, कमाल करतीस हा तू, केवढी वांड होतीस ! Happy कारभारीण नुसती ! Happy

लहानपणीचा अजुन एक खेळ म्हणजे चोर पोलीस
हा बैठा खेळ आम्ही अजुनही घरात खेळतो. काही चिठ्ठ्यांवर राजा, राणी, प्रधान, सरदार, पोलीस आणि चोर अशी नावे लिहायची आणि त्यावर प्रत्येकाचे गूण ठरवायचे. चिठ्ठ्या एकत्र करुन टाकायच्या आणि सर्वांनी एकत्र उचलायच्या जो पोलीस लिहीलेली चिठ्ठी उचलणार त्याने चोर ओळखायचा. ओळखण्यात चुक झाली तर चोर आणि पोलीस यांनी आपापसात चिठ्ठ्यांची अदलाबदल करुन गुण घ्यायचे. असे अनेक राऊंड झाले की बेरिज करुन त्या दिवसाचा विजेता ठरवायचा. Happy
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

आम्ही पण लगोरी, आबा धोभि, डब्बा ऐस्-पैस, बिट्ट्या (इथे खोपा करायचा, मज्जा..), टिक्कर बिल्ला, नदी कि पहाड, साखळी साखळी, खेळभान्डी, शाळा-शाळा (झाडाचे पान म्हन्जे वहि..पेन म्हन्जे मोठा भाभळिचा काटा असायचा..), दुकान-दुकान खेळायचो..खुप छान वाटते आठवुन पण्..
आज-कालच्या मुलीना तर एकत्र खेळ भान्डे खेळायचे हे माहितच नसेल..कदाचित गावा कडे खेळत असतील अजुन...
पहीला पाउस पडला की देव किडे आगपेटीत मऊ गवतावर ठेवायचे..नन्तर सोडुन द्यायचे...फुल-पाखरू तर् कितिदा पकडले..गेले न ते दिवस...
बालपण मनाच्या कुपीत अगदी जपुन ठेवावसं वाटतं...हे सर्व लिहीतांना डोळे का पाणावले??????

(खुप लिहावस वाटतं पण मराठीत type करण कठीण जाते आहे...)

आम्ही लहानपणी विषामृत, मामाचं पत्र हरवल, कोणीही यावे टिचकी मारुनी जावे, डोंगराला आग लागली पळा पळा पळा, मगरमच्छ, मामाचं घर हे खेळ खेळत होतो.

शिवाय घरात झोळी सारखा झोपाळा बांधून मी आणि माझी बहिण त्यावर एकमेकींच्या विरुद्ध दिशेला तोंडे करून बसायचो आणि जोरजोरात झोके घ्यायचो. भिंतीला पायांनी रेटा देऊन देऊन झोक्याला वेग द्यायचो. त्यामुळे समोरासमोरच्या दोन्ही भिंतींवर पायांचे घाणेरडे छप्पे उमटून भिंती खराब झाल्या होत्या. Uhoh

शिवाय भातुकली, घर-घर खेळायचो. आमची एक मैत्रिण non-vegetarian होती. त्यांच्याकडे मासे खात असत. आमच्या सारख्या बाह्मणांकडे जिथे अंड म्हटले तरी डोळे मोठे होतील तिथे मासे हा प्रकार आमच्यासाठी अपूर्वाई चा होता. मासे कसे पकडतात, कोणकोणत्या नावांचे मासे खातात, त्यांची वैशिष्ट्ये काय वगैरे प्रश्नांनी मी व माझी बहिण त्या मैत्रिणिला भंडावून सोडायचो. आणि मग जी काही तुटपुंजी माहिती आम्हाला झाली होती त्या आधारावर मी आणि माझी बहिण मासे-मासे असा एक अभूतपूर्व खेळ खेळायचो. (हा खेळ आम्हीच invent केला होता.) म्हणजे काय करायचो की "आम्ही दोघी कोळी जातीच्या बहिणी असणार. एकदम गरिब. घरात अजून कोणीच नाही. नदीवर जाउन मासे पकडणे, ते विकणे, गजरे करून विकणे (कोळी आणि गजरे???? पण आम्हांला काही फरक पडायचा नाही Happy ) वगैरे उपायांनी आम्ही उपजिवीका करणार" ....काहीहि करायचो literally. आणि मासे म्हणून काय वापरायचो माहितीय? माशांच्या आकाराचे वाळत घातलेल्या कपड्यांना लावायचे चिमटे असतात ना ते.......... Happy

तसेच अजून एक खेळ आम्ही invent केला होता. घरात असतील नसतील तितक्या सर्वा छत्र्या उघडून पालथ्या घालून त्यांच्यावर एखादी चादर वगैरे घालून अंधारे घर तयार करत असू. जितक्या मैत्रिणी घरी खेळायला येणार असतील त्या सर्वांना त्यांच्या घरातून छत्र्या आणायला लावत असू. जितक्या जास्त छत्र्या तितके मोठे घर. आणि त्याच्या आतमध्ये भातुकली वगैरे मांडत असू. घराचा size (specially ऊंची) वाढवण्यासाठी प्रसंगी घरातल्या खुर्च्या+स्टूल वगैरेंचा ही वापर करत असू. Biggrin

शहरात विट्टी दांडू खेळायची हाऊस भागवताना, पुन्हा डबा बाटली ऐसपैस खेळताना पॅराशूट तेलाची प्लॅस्टीकची बाटली वापरायचो अन खेळायचो, तसेच जोडसाखळी यासारखे खेळ सुद्धा खूप खेळले आहेत. जोडसाखळी खेळताना तर मस्त पावसात घरासमोर साचलेल्या पाण्याच्या डबक्यातले पाणी ओसरायला लागले की त्यावर हलकेसे शेवाळ यायचे, मग त्यावरून धावताना मस्त आपटायचं अन लागलं तरी तसचं पुढचं राज्य पुर्ण करायचं. भोवरा खेळताना लगंडी पार झाल्यावर लंगडी नाही घालायची सरळ भोवरा फोडायला द्यायचा. गज रवा रवी खेळायचो. पतंग उडवायचो नाही पण एखाद्याची पतंग गुल झाली ती ती पकडायला मग नुसतं धावत सुटायचो.

मी लहान असताना भोपाळला काकांकडे रहायला गेले होते दोन महिने.... त्यांच्या कॉलनीत मराठी, पंजाबी, शिख, मुस्लिम, उत्तर प्रदेशी वगैरे सर्व प्रकारचे लोक होते व बहुतेक सर्वांची लहान लहान मुले होती. मग आम्ही सर्व मुले समोरच्या मोकळ्या जागेत ''संतोषी माता संतोषी माता'' खेळत असू. म्हणजे काकांकडची संतोषी मातेची (का कोण्या देवीची) तसबीर आणायची, तिच्यासाठी बांधकामातून उरलेल्या विटा एकमेकांवर रचून त्यांचे देऊळ बांधायचे, ते देऊळ सजवायचे, घरातली देवपूजेतील घंटा लांबवून तिथे ठेवायची, बोगनवेलीच्या ''फुलांनी'' देऊळ सजवायचे, उदबत्ती बटाट्यात खोचून पेटवायची आणि सर्व सोपस्कार पुरे झाले की देवळाभोवती फेर धरून ''मै तो आरती उतारू रे संतोषी माता की'' असे जोरजोरात गात, त्या तालावर ठेका धरून पावले टाकत, टाळ्या वाजवत नाचायचे!! आणि हा खेळ रोज आम्ही तासन् तास खेळायचो..... कसे काय बोअर नाही व्हायचो, आता आश्चर्य वाटते! Proud

ह्याशिवाय पुण्यात दुसर्‍या काकांकडे किंवा आमच्याकडेही उंच स्टुलावर चारही बाजूंनी चादर पांघरून ''बंबई का तमाशा देखो, आग्रेका ताज देखो, दिल्ली का कुतुब मिनार देखो'' असे केकाटत इतर खेळगड्यांना एकेक करून ती चादर उचलून आत डोके घालायला सांगायचो, आणि पलीकडून कोणीतरी तयारच असायचे....''बकर्‍याने'' आत डोके घातले की त्याचा कानच पिरगळ, नाकच ओढ, डोक्यावर टपलीच मार असले सर्व उद्योग!! जो बकरा होई तो मग त्याचे झाल्यावर आमच्या टीममध्ये सामील होई आणि इतरांनाही आपल्यासारखेच ''बकरा'' बनवले जाण्याची उत्सुकतेने वाट पाही!!

पहिला दुसरा पाऊस पडुन गेला की लालजर्द रेशमी किडे कशे कुठुन येतात कुणास ठाऊक.... ! मग त्यांना शोधायला मोहिम निघायची....सर्वांच्या बागेत.
बिचारे....ते किडे जास्त जगतही नाहीत. Sad

रस्त्याने जाताना मऊ मातीमधे छोट्याशा खळग्याच्या आकाराचे होल्स दिसतात.त्यात एक किडा असतो त्याला 'उंट' म्हणायचो. तो मुठीत ठेवला की गुदगुल्या करतो.

मिनी वटपौर्णिमा: गोलाकार छोटे दगड, फुटक्या काचा, बांगड्यांचे तुकडे, फरशांचे तुकडे असे अव्हेलेबल मटेरीयल सगळ्या जणींनी गोळा करायचे. बरोबर काही देवांचे छोटे फोटो (पुस्तकातुन कापलेले किंवा चाराण्याला मिळायचा १) ). सर्वांच्या बागांमधे फिरत प्रत्येक झाडाखाली बसायचे नि तिथे एकेक देवाचा फोटो ठेउन त्याला हे सगळ वाहुन साग्रसंगीत पुजा करायची.

Pages