कॉलेजचे ते मोरपिशी दिवस - फारएण्ड

Submitted by फारएण्ड on 8 September, 2022 - 16:21

कॉलेजात असताना पकाउ कोशण्ट भरपूर असलेल्या ज्या गोष्टी होत्या, त्यात वार्षिक ऑर्केस्ट्राचा नंबर बराच वर असावा.

दरवर्षी पास होत गेल्याने कॉलेजात हे तीनच वर्षे सहन करावे लागले, पण नंतर अशा कार्यक्रमाचे पेवच फुटले. एक कोणीतरी झगमगीत कपडे घालून कोणत्यातरी हिट्ट गाण्याने सुरूवात करत असे. तेव्हा थोडीफार नवीन रोमॅण्टिक गाणी असली तरी ऑर्केस्ट्रामधे बहुतांश लोक जुनीच गात. ७० च्या दशकातील काही बाळबोध गाणी हा या लोकांचा पहिला चॉइस. "बेखुदी मे सनम, उठ गये जो कदम", "छुपगये सारे नजारे, ओये क्या बात हो गयी" छाप गाणी हमखास असत. आमच्या कॉलेजात तर दरवर्षी नजारे छुपत. मग त्या गाण्यात एका कडव्यात "तेरी चुनरी लहराई, बरसात हो गयी" येते तेव्हा तो सॅटिन का कसली झालर लावलेला ड्रेस घातलेला अमुककुमार हटकून त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या सहगायिकेची चुनरी, ओढणी जे काय असेल ते हवेत उडवत असे, आणि त्यावर काही भाविक लोक शिट्ट्या वगैरे वाजवून त्याच्या सालाबादच्या कल्पकतेला दाद देत. एखाद्या लग्नात मंगलाष्टकांच्या वेळी एखादी बर्‍यापैकी गायिका असलेली वराची बहीण जेव्हा सर्व नातेवाईक, त्यांचे हुद्दे वगैरे ओवलेले गाणे म्हणते, त्यातील कडवी संपताना सुद्धा अक्षता टाकणारे लोक ते हेच असावेत.

अशी काही हिंदी गाणी झाली की अचानक "येऊ कशी कशी मी नांदायला" ची फर्माईश होई. हे गाणे ऑर्केस्ट्रा च्या पब्लिकमधे का लोकप्रिय होते हे मला आजतागायत समजलेले नाही. त्यानंतर अगदी नजाकत वगैरे असलेल्या चालीतील गाणीही ढोलकी व सिंथेसायझर वर वाजवून होत. मग हे प्रोफेशनल खेळाडू ब्रेक घेत, व कोणीतरी स्थानिक टॅलेण्ट पुढे येइ. हा मात्र हमखास पहिल्यांदा 'महुवा' ला आर्त साद घाली. 'गम उठाने ने के लिए मै तो जिए जाउंगा" म्हणत कोठेतरी नजर लावून सुरू होई. त्यातील "साँस की लय पे" हे नीट ऐकू येत नसे, त्यामुळे ते सास किले पे आहे असे काहीतरी वाटून हा नक्की कोणत्या किल्ल्यावर तिचे नाव घेणार आहे असा प्रश्न पडे.

अशीच एका वर्षातील आठवण. तेव्हाचे एक लोकप्रिय विरहगीत होते. नक्की कोणते लक्षात नाही. त्यात सुरूवातीला तो हीरो हृदय पिळवटून वगैरे गातो, आणि नंतर त्याची प्रेमिकाही काहीतरी खुलासा करते असे होते. तर एकाने तो हीरोचा भाग सुरू केला. तो खूप चांगला गात होता, त्यामुळे पब्लिकही तल्लीन होउन ऐकत होते. इथपर्यंत सगळे ठीक होते. पण त्याला त्या माहौलचा आनंद घेण्याऐवजी आपले गायकीतील अष्टपैलुत्व दाखवण्याची हुक्की आली, आणि त्याने त्या हीरॉइनच्या ओळीही बायकी आवाज काढून म्हणायला सुरूवात केली. आणि तोपर्यंत पूर्ण फोकसने ऐकत असलेल्या पब्लिकमधे जाम हशा पिकला. "त्यांच्या प्रेमकवितांमधे नको तेथे पांडित्य डोकावत असे" असे पुलंनी कोणातरीबद्दल लिहीले आहे, तसेच काहीतरी हे.

या ऑर्केस्ट्रातील अतिरेकाने ही गाणी प्रचंड नावडती झाली. मग नंतर अनेक वर्षांनी यातली एक दोन ओरिजिनल पुन्हा ऐकली तेव्हा इतकी काही ती वाईट नव्हती असे जाणवले. लोकांच्या मिमिक्री करण्याने शत्रुघ्न किंवा संजीवकुमार चे मूळचे मॅनरिझम नाटकी वाटतात तसे काहीतरी झाले होते.

पण मला सर्वात त्या "गम उठाने के लिए" गाण्याचे मला नेहमी आश्चर्य वाटे. "हाय तूने मुझे उल्फत के सिवा कुछ ना दिया, और मैने तुझे नफरत के सिवा कुछ ना दिया" वगैरे हे प्रेमवीर गाउ लागले, की एरव्ही कॉलेज मधे त्यांच्या नावावर जोडल्या गेलेल्या पण त्यांच्याबरोबर कधीच न दिसलेल्या मुली आठवत. त्यामुले कॉलेजमधे नेहमी दिसणारे चित्र, आणि या गाण्यातील शब्द याचा ताळमेळ लागत नसे. याचा नक्कीच उल्फत आणि नफरत च्या अर्थामधे गोंधळ झालेला असावा असेच वाटे. "Way out of your league" ही फ्रेज तोपर्यंत ऐकलेली नव्हती, पण ती जेव्हा ऐकली तेव्हा हे प्रेमवीर व त्यांच्या "नावावर" असलेल्या मुली आठवत. अर्थात ही फ्रेज आमच्या ग्रूपमधे माझ्यासकट अनेकांच्या बाबतीत अनेकदा लागू झाली होती, पण आम्ही किमान स्टेजवर रडकी गाणी गाउन लोकांना पकवत नव्हतो.

हे असेही एक मोरपीस Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol
ऑनेस्टली, कॉलेजचे दिवस मोरपिशी, फुलपाखरी, दगडधोंडरी असतात वगैरे सगळ्या फॅन्टसीज आहेत. सिनेमात कॉलेजची पिकनिक म्हणून दोन मुलांचे पालक शोभतील असे लोक हिरवळीवर टेप रेकॉर्डर ठेवून तंग प्यान्ट्स आणि/किंवा स्कार्व्ज (पॅन्टला पर्याय स्कार्फ नव्हे!) गाणी म्हणत (मग टेपरेकॉर्डर कशाला आहे तो? यांचं गाणं रेकॉर्ड करायला?) नाचताना दाखवतात तितक्याच येडपट! Proud

आता याला मोरपीस तरी कसं म्हणायचं >> त्याचे उत्तर ह्या वाक्यातल्या "र्थात ही फ्रेज आमच्या ग्रूपमधे माझ्यासकट अनेकांच्या बाबतीत अनेकदा लागू झाली होती," - अनेकदा - ह्या शब्द प्रयोगामधे असेल. अनेकदा, नेहमीच नाही. फा बोले तो सिर्फ फारेंड समझे क्या ? फायर है वोह Wink

ऑनेस्टली, कॉलेजचे दिवस मोरपिशी, फुलपाखरी, दगडधोंडरी असतात वगैरे सगळ्या फॅन्टसीज आहेत. सिनेमात 'कॉलेज की पिकनिक' म्हणून दोन मुलांचे पालक शोभतील असे लोक हिरवळीवर टेप रेकॉर्डर ठेवून तंग प्यान्ट्स आणि/किंवा स्कार्व्ज (पॅन्टला पर्याय स्कार्फ नव्हे!) गाणी म्हणत (मग टेपरेकॉर्डर कशाला आहे तो? यांचं गाणं रेकॉर्ड करायला?) नाचताना दाखवतात तितक्याच येडपट >> Lol "पॅन्टला पर्याय स्कार्फ नव्हे!" हे बराच वेळ विचार केल्यावर लक्षात आले .

छानेय मोरपीस Proud
हे कुठल्या वर्षांचे कालखंडाचे अनुभव आहेत.

आमच्यावेळी एके वर्षी आदत - जुदा होके भी तू मुझ मे कही बाकी है या गाण्याने वीट आणलेला.. बेसुरे पोरेही आतडे फेफडे पिळवटून गायची.. पण एक बरे होते, मी वीट येणार्‍या नाही तर ते गाऊन ईतरांना वीट देणार्‍या पोरांपैकी होतो Proud
https://www.youtube.com/watch?v=IVG5Rxxpj_E

Lol ऑर्केस्ट्राची (मोर)पीसं काढणं धमाल जमलंय. तुमच्यापेक्षा आम्ही लकी ठरलो मग. ना गॅदरिंग ना ऑर्केस्ट्रा. सो इतर पकाऊ गोष्टींवरच गुजारा चालत असे Wink

आता याला मोरपीस तरी कसं म्हणायचं >> ते चिकनपीस म्हणतात तशा अर्थाने असेल. Wink अर्थात आपल्याकडे ह्या कल्पनेने सुद्धा अटक होऊ शकते, त्यामुळे मी सुरुवातीच्या बिगीनिंगलाच 'मी नाही त्यातला' म्हणून टाकतो.

छानच लिहिलं आहे. ऑर्केस्ट्रात अतिपरिचयामुळे बरीच गाणी अवज्ञेला पोहोचली आहेत. नेमकी टिपली आहेस ती गाणी. वाचताना अगदी अगदी असं होत होतं. गावाकडे ज्या जीप, टेम्पो वगैरे चालतात (बस सोयीची नसल्यामुळे हाच एक आधार असतो) त्यात ही असली गाणी कुठल्यातरी नवीन गायकांच्या आवाजात असलेली कॅसेट कर्णकर्कश्श आवाजात लावलेली असत. त्यांनीही गाण्यांच्या वीट येण्यात आणखीन एक थप्पी लावली होती. पण सध्या अनेक वर्षांच्या खंडानंतर कधी चुकून ती गाणी कानावर पडली, तर मात्र जुन्या आठवणी दरवळायला लागतात. युट्यूबवर कधी ती गाणी दिसलीच, तर 'फादर, तुम्ही डुक्कर म्हणायचा ते हे आहे?' असा फील येतो.

“ हरचंद पालवांनी एकदम फा च्या मोरपीसाला ' कपाटाची बिज्जागिरी गंजून खल्लास' चा सूर लावला” - Lol

जबरी लिहिलयंस फा. ह्या ऑर्केस्ट्रामुळे नावडती झालेली आणि काही वर्षांनी ऐकल्यावर ‘इतकंही वाईट नाहीये‘ म्हणायला लावणारी बरीच गाणी आठवली. ‘हमखास टाळ्या‘ सदरातले वीर आठवले. Happy

“ ऑनेस्टली, कॉलेजचे दिवस मोरपिशी, फुलपाखरी, दगडधोंडरी असतात वगैरे सगळ्या फॅन्टसीज आहेत.” - टोटली सहमत! इंजिनियरिंगच्या सबमिशन सारखी ‘काय ती जाग्रणं, काय ते कटिंग चहाचे कप‘ वगैरे नॉस्टेल्जियाचा प्रकार आहे.

तर 'फादर, तुम्ही डुक्कर म्हणायचा ते हे आहे?' असा फील येतो. >>> Lol

हपा - काहीच प्रॉब्लेम नाही Happy

शेवटच्या वाक्याने मजा आली! Lol

कॉलेजमधला ऑर्केस्ट्रा या प्रकाराचा मला अजिबात अनुभव नाही. मोठ्या बहिणींकडून असं असतं एवढं ऐकलेलं आहे.
आमचं इंजि. कॉलेज अगदीच नवीन असल्यामुळे अशा काही परंपरा निर्माणच झालेल्या नव्हत्या. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन जिथून केलं तिथे नको तितक्या परंपरा होत्या. तिथे आम्ही नवीन असल्यामुळे त्यात फारसे फिट झालो नाही!
त्यामुळे
कॉलेजचे दिवस मोरपिशी, फुलपाखरी, दगडधोंडरी असतात वगैरे सगळ्या फॅन्टसीज आहेत. याच्याशी मीही सहमत. फेरफटकानी म्हटलंय तसं सबमिशन करताना कधीही ते एन्जॉय केलं नाही. पाचपाटील मागे अभियांत्रिकीचे दिवस लिहीत होते तसे त्यावरचे विनोद तेवढे आता एन्जॉय करता येतात.

ह.पांचा प्रतिसाद आणि त्यावरचा असामीचा बिजागऱ्यांचा विनोदही भारी!

Lol मजा आली वाचताना

आमच्या इथे कॉलेज फेस्ट्सना 'हे चिंचेचे झाड दिसे मज' फेमस होतं. त्यात हे फर्माईशी मोडवर गाणारा देखणा म्हणून पोरींत हिट्ट होता. आवाजही बरा होता. पण आमचं अर्ध लक्ष तो कोणत्या कार्यक्रमात कोणाला 'काश्मिरी' म्हणतोय याकडे जास्त असायचं

आमच्या एका गृपमधला मित्र, मैत्रिणीच्या घरातच केलेल्या एका बड्डे पार्टीला संध्याकाळी सन ग्लासमधे डोळे लपवत किशन कुमार बनून "अच्छा सिला दिया तुने" गायला होता. (त्यावेळी मास्क लावण्याची प्रथा असायला हवी होती Lol )

कॉलेज ऑर्केस्ट्रा !

बॅक एंड मध्ये जीव जातो पण मजा येते, येणारी पार्टी, त्यात बाई माणसाला मेकप अन् रेस्टला वेगळी खोली, बापे लोकांची तंबाखू ते अपेयपान फर्माईश, कॉलेज मधील इच्छुक पोरा पोरींची त्यांच्याशी सांगड घालून दिलेली अजून शिल्लक आहे का नाही ते तपासणे, एक न दोन, धुरळा नुसता.

मस्त लिहलेयस फारेंड!!

"दर्दे दिल दर्दे जिगर" हे खास ऑर्केस्ट्रावाल्यांचे पेटंट गाणे होते!!

एक जमाना होता 'मेलडी मेकर्स' वगैरे वाल्यांची धूम होती Happy

एखादा मिमिक्री आर्टिस्ट गाणाऱ्यांना विश्रांती द्यायला हमखास असायचाच (बाकी लोक पण असायचेच पण केश्तो हा या लोकांच्या खास आवडीचा असायचा)

लीडसिंगर्स मधली गाण्यांच्या मधली लटकी नेत्रपल्लवी बघायला मजा यायची

Lol सही लिहिलंयस फा. बऱ्याच दिवसांनी ना?

सविस्तर प्रतिसाद लिहावासा वाटतोय, पण सध्या जरा व्यग्र आहे. त्यामुळे माझा रूमाल. (आजकाल माबोवर हे कोणी फार म्हणत नाही. हे एक माबोमोरपीस समजा.)

Lol
एकदम मस्त फारएंड.
आमच्या वेळी ए मेरे दिल के चैन...फारच लोकप्रिय होतं...आणि त्यातलं..तुम जो पकड लो हाथ मेरा, दुनिया बदल सकता हूं मै...च्या वेळी ऑलरेडी असलेल्या जोड्यांची झालेली नजरानजर टिपणं हा फारच रोमांचक क्षण असायचा.... Happy
फारच छान आठवणी जागविल्यास!

फा, लईच भारी!
एकदम सगळे डोळ्यापुढे चित्र उभे केल्यागत लिहलयं!

Happy

टिपिकल फारेण्ड लेखन !
< पण आम्ही किमान स्टेजवर रडकी गाणी गाउन लोकांना पकवत नव्हतो>. Lol

Rofl फार मजा आली वाचायला.
कॉलेजमधला ऑर्केस्ट्रा या प्रकाराचा मला अजिबात अनुभव नाही. >> +१ तरी पण मजा आली..कविन चा रीप्लाय Lol

फार मजा आली वाचायला.+++१
ऑर्केस्ट्रा मुळे वीट आलेली काही गाणी म्हणजे-
सोला बरसकी बाली उमरको सलाम,
और इस दिलमें क्या रख्खा है
फुलोंके रंगसे दिलकी कलमसे
आणि महुवा

लोल, मस्तच लेख आणि आठवणी Happy आय एल एस लॉ ला जोशी म्हणून एक क्लार्क होते. ते दर एन्यूअल डेला गळा साफ करून घेत. रफीचे 'यु तो हमने लाख हसी देखे है' म्हणत आणि त्यात असा काहीतरी विचित्र आवाज काढत ह्या ओळीनंतर की बास.. सगळ पब्लिक एकदम खुश, 2 ते 3 वन्स मोअर पडत आणि ते पण न लाजता ते घेत Proud

ज्यूनिअर कॉलेजला असताना ते ‘नाम’ सिनेमातलं ‘चिठ्ठी आयी है’ फार वाजायचं. ‘अपने घर में भी है रोटी’ ऐकून डोळे पाणावणारी बहुतांश मित्रमंडळी आता परदेशात स्थायिक आहेत - तुझ्या लेखामुळे आठवलं. Happy

मस्त लिहिलं आहेस. खूप दिवसांनी 'फा' शैलीतला लेख वाचला. मजा आली.
>> कॉलेजचे दिवस मोरपिशी, फुलपाखरी, दगडधोंडरी असतात वगैरे सगळ्या फॅन्टसीज आहेत. >> याला +१

धमाल लिहिलंयस. ते बेखुदी मे सनम बद्दल अगदी अगदी. हे गाणं म्हणजे जणू ' गाना रूपी कान्हा' आहे. जन्माला आलं सिनेमात पण याचं पालनपोषण ऑर्केस्ट्रांनी केलं. अ जू न ही ऑर्केस्ट्रात हे गायलं नाही तर गायकांची बिदागी दिली जात नाही म्हणे.

हपा ... Lol