कथा

Submitted by Madhavi Deolankar on 7 September, 2022 - 07:27

कल्ला

थंडीच्या रातीला गाव सार मुरगाळून धुक्याची चादर पांघरूण गपगार पडलं होतं, नाही म्हणायला रस्त्यावरची दोन चार कुत्री गावच राखण करत उगाच गल्ल्यातून ओरडत फिरत होती, तेवढ्यात देशमुखांच्या वाड्यातून एकच कल्ला झाला, तो कल्ला रस्त्यावरची कुत्री बाबचळली अन भुंकू लागली, तस गावातल्या इतर कुत्र्यांनी पण आपला आवाज मिळवला, व एकच कल्ला सुरू झाला. पांडू शेतात चक्कर मारून नुकताच घोंगडी पांघरून झोपला होता, तेवढ्यात हा गोंधळ सुरू झाला, पांडू रागाने उठून बसला, "त्येच्या आयला, ह्या कुत्र्यांच्या, लईच सोकावलीत , रात नाय, दिस नाय... बोंबलत फिरत असत्यात, कोणी गचकल्यासारखं...." पुन्हा त्याने घोंगड गच्च ओढून घेतल, पण आता कुत्र्यासोबत माणसांचे पण आवाज येऊ लागले, "च्यामारी, कोणतरी खरच गचकल वाटत, देशमुखाची मातारी गेली की काय...? बर रातीचाच वकुत गाठला म्हातारीने" अस म्हणून त्याने अंगावरील घोंगडे बाजूला केले, व दोन लेकरांना पोटाशी घेऊन झोपलेल्या बायकोला म्हणाला, "ए पार्वते, उट की, एवढा आवाज व्हायलाय, अन तू गुमान झोपलीस" पार्वतीने अंगावरची पांघरून अजून घट्ट केले व म्हणाली, "झोपा तुमी बी, ती म्हातारी काय लवकर जात नाय, लई चिवट हाय" पण पांडुला राहवेना, त्यानं उशाचा मोबाईल काढला अन वकुत पाहिला, रातीचे दीड वाजायला आले होते, त्यानं उठून स्वेटर घातला, डोक्याला मुंडास नीट गुंडाळला व दसरा उघडून बाहेर आला, गल्लीच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या देशमुखांच्या वाड्याकडे नजर टाकली, वाड्याचा बाहेरचा लाईट लागला होता, पांडूने पायात चप्पल सरकवली तशी पांडुचा म्हातारा बाप ओरडला, "कोण हाय र ते...?" पांडू बाहेर पडताना म्हणाला "आबा म्या पांडू हाय, झोपा गुमान" अस म्हणून त्याने दरवाजा नीट लावून घेतला, तेवढ्यात शेजारचा अंदया पण बाहेर आला... अंदया त्याच्याकडे पाहत म्हणाला "काय र पांडू..? म्हातारी गेली वाटतं, लई कल्ला चाललाय" "व्हय गड्या" "चल, जाऊन येऊ आपुन" अस म्हणून दोघे वाड्याकडे गेले, वाड्याजवळ जत्रा भरली होती.... ज्ञाना, तुक्या, मंदिराचा पुजारी, तात्या, संत्या, नाम्या, गावातील इतर तालेवार मंडळी सारच आली हुती, बाहेरची बैठक गच्च माणसांनी भरली होती, एवढी गर्दी पाहून पांडू हळुच म्हणाला, "अंदया लेका, म्हातारी गेली वाटत रं" "व्हय गड्या, त्याबिगर का सारी जत्रा जमा झाली" पांडूने संत्याला खुणेने विचारले, तस संत्याने दोन्ही हात वर केले अन हात जोडले, तस पांडूला खात्री पटली. देशमुखाची आई रखमाबाई गेल्या दोन वर्षांपासून खाटेवर निजून होती, देशमुखाचा बाप बी शंभरीचा झाला होता, पायाने अधू झाला होता, काठी टेकवत चार पावलं चालायचा तेवढंच पण अजून दात शाबूत होते, पैलवान गडी हुता पहिले.... त्यामुळे त्यो काई एवढ्यात जाईल अस कुणाला वाटत नव्हतं, पण रखमाबाई गेल्या दोन वर्षात स्वर्गाच्या दारी जाऊन वापस आली होती, देशमुखाला सार गाव श्रावणबाळ म्हणत असे, माणूस सत्तरीला आलेला पण अजूनही आईवडीलांच्या पाया पडल्याशिवाय बाहेर जात नसे, देशमुखाचा बारदाना पण मोठा, लग्नाच्या दोन बायका, पहिलीला मूल होत नाही म्हणून दुसरी केली अन दुसरीच्या पायगुणाने पहिलीला दिवस गेले, लगेच दुसरीचा पाळणा हलला, मग काय दर दोन वर्षांनी वाड्यात पाळणा हलू लागला अन दोघींना चार चार मुलं झाली, त्यात पाच ल्योक व तीन मुली... तीन पोरं शेतीत रग्गड पिकवत होती, अन दोन पोर तालुक्यात किराणा दुकान अन खताच दुकान सांभाळत होती, पोरी तालेवार घरात सुखान नांदत हुत्या, देशमुखाच्या दोन्ही बायका त्यांना सुना आल्या तरी सासूच्या म्होर जायला घाबरत हुत्या... अशा भल्यामोठ्या देशमुखाच्या गोकुळात रखमाबाईचे वजन जरा जास्तच होते, जुने जाणते लोक सांगत की रखमाबाई लग्न करून येताना सोबत शंभर तोळे सोन अंगावर घालून आली होती, त्यामुळे देशमुखाचा बाप पण कधी रखमाबाईच्या शब्दाबाहेर गेला नाही... आतल्या खोलीत दोन्ही सुना, नातसुना, देशमुख, रखमाबाईचा नवरा आबा बसले होते, सुनांच्या रडण्याचा आवाज त्याच्यात शेजारील आया बायांचा आवाज टिपेला पोहचला होता, बाहेर अंगणात, बैठकीत बसलेल्या बापाय गडी अन जमलेल्या बायकांचा आवाज पण वाढला होता, कुणालाच कुणाचं ऐकू येत नव्हते, अन तेवढ्यात खोलीच्या बाहेर उभे असलेले नाना गावचे सरपंच कोतवाल संग आत घुसले, "ए पोरीनो गप बसा बर, मला बघू द्या म्हातारीला, मागच्या वेळी पण म्हातारी जाऊन वापस आली हुती' तस सारा आवाज बंद झाला... मग नाना, कोतवाल अन मंदिराचा पुजारी पुढे घुसले, कोतवालनी म्हातारीची नाडी बघितली, नाव जरी कोतवाल तरी त्याच्या बापाचा वैद्यकीचा धंदा होता, तोच वडिलोपार्जित धंदा कोतवाल पुढे चालवत हुता, कोतवालनी नाडी बघितली व म्हणाला, "आर गड्या, अंधुकशी नाडी लागतीया" अस म्हणताच दोन्ही सुना, नात सुना एकमेकीकडे पाहू लागल्या, तेवढ्यात नाना म्हणाले, "अरे नीट बघा, म्हातारीचा अंग थंड लागतया" अस त्यांनी म्हणताच पुन्हा सुना, नात सुना , बायका जोरात रडू लागल्या... बाहेरच्या बैठकीत पुन्हा कल्ला सुरु झाला. आता कोतवाल बावचाळला, त्यानं पुन्हा चेहरा बारीक करून म्हातारीची नाडी तपासण्यासाठी बराच वेळ हातात हात धरून बसला, पाच मिनिटं झाली पण गडी हात सोडना, सारी जण त्याच्याकडे पाहू लागली, आता नाना खवळला अन म्हणाला, "आर, नाडी तपासतोयस की हजामत करतोस रं...? लवकर सांग, सारी खोळंबलीत" तसा कोतवालनी विजयी मुद्रा केली अन म्हणाला, "आर नाना लागतीया अंधुकशी नाडी" त्यानं अस म्हणताच मोठ्या सुनेंन नकळत बोट मोडली.... इकडे नाना पण म्हातारीच्या अगदी जवळ गेले तिच्या तोंडाजवळ तोंड नेऊन म्हणाले, "ए रखमामाय...!" पण काही प्रतिसाद नाही, दोनदा तीनदा अस करून झाले... नाना म्हणायचे "म्हातारी गेली", कोतवाल म्हणायचा "ती जिती हाय" हे गोंधळ माजला, आता मंदिराचा पुजारी समोर आला व म्हणाला, "थांबा, माझ्याकडे एक युगत हाय, मला एक दोरा द्या कुणीतरी" सारी त्याच्याकडे पाहू लागली, तेवढ्यात देशमुख बायकोवर खेकसले, " ए, जा की दोरा दे त्याला" त्या माउलीला दोरा कुठे ठेवला तेच आठवना, तेवढ्यात सगळ्यात लहान नातसुन उठली व तिने एक दोरा आणून दिला, पुजाऱ्याने त्या दोऱ्याची एक बारीक वात तयार केली अन म्हातारीच्या नाकापुढे अगदी जवळ जाऊन धरली, सगळे श्वास रोखून पाहायला लागले, थोड्या वेळाने तो दोरा मागेपुढे हलला, त्याबरोबर पुजारी म्हणाला, "हाय, म्हातारी जित्ती हाय" हे म्हणल्याबरोबर नाना उठला व म्हणाला, "थांब, मी बघतो" मग नानांनी दोरा घेतला व म्हातारीच्या नाकाजवळ जरा दुरून धरला, पुन्हा सारे श्वास रोखून बघायला लागले, दोरा काही हलेना, तसे नाना म्हणाले, "बघा, मी मनलो नाय, म्हातारी गेली हाय मनून" पुन्हा बायका रडू लागल्या... आता प्रत्येक जण दोरा नाकाजवळ धरू लागला... कुणी म्हणू लागले, " जित्ती हाय" कुणी म्हणे, "गेली.." ह्या हो, नाही च्या चक्कर मध्ये बायका रडायच्या, थांबायच्या.... शेवटी वैतागून नातसुन म्हणाली "कोणीतरी नीट सांगा की, म्हणजे आमाला नीट रडता येईल".... अस होता होता पाच वाजायला आले अन तालुक्यातील दोन्ही मुलं त्यांच्या बायकांना, पोरांना घेऊन आले.... अन पुन्हा रडण्याचा एकच गोंधळ उडाला.... रखमाबाईचा नवरा आबा तिथंच मुरगाळून झोपला होता, तो या आवाजाने दचकून उठला..... तो एकदम ओरडला, "आर काय मासोळी बाजार भरवलाय... जा कुणीतरी शेरातून डाकतर आणा.... शानी म्हणता, म्हणता सारी पार येड्या बांबूची निगली" बाहेर अंगणात, बैठकीत बसलेली मंडळी बसून, बसून कंटाळून गेली होती, ती ह्या बोलण्याने उठली अन घराकडे निघाली..... चा...पाणी झाल्यावर पुन्हा येऊ अस म्हणत एक, एक गेली.... वाडा रिकामा झाला.... नाही म्हणायला दोन, चार मंडळी तिथंच थांबली.... छोटा नातू गाडी घेऊन तालुक्याला गेला, नातसुना उठल्या.... अंघोळीपांघोळी, चा पाण्याचं बगायला... दोन्ही मोठ्या सुना बसून, बसून अवघडून गेल्या होत्या, त्या पण उठल्या, त्यांच्या बरोबर बसलेल्या गावातील बायका घरच बघायला गेल्या.... देशमुख पण अवघडून गेले होते, ते पण उठले... म्हातारीचा नवरा आबा उठून प्रातर्विधी करायला गड्याचा हात धरून गेला.... आता म्हातारी एकटीच खोलीत पडली होती.... देशमुखाची पहिली बायको हळूच तिच्या सुनेच्या कानात बोलली, "बाई लवकर न्याहरी करून घ्या साऱ्या जणी, रातभर रडून रडून घसा सुकला साऱ्यांचा" सुनेने पदर सावरला व पटापट न्याहरी केली, साऱ्यांना वाढून दिली, पोटभर न्याहरी करून सारी ताजी झाली, अन हळूहळू म्हातारीच्या खोलीत जमा झाली, देशमुख पण येऊन बसले, आठ वाजेच्या सुमारास गावातली मंडळी न्याहरी करून बैठकीत जागा धरून बसली, तेवढ्यात तालुक्याला गेलेला मुलगा डॉक्टर घेऊन आला, साऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता दाटून आली.... डॉक्टरांनी म्हातारीला नीट तपासले व म्हणाले, "आजी जाऊन तीन घंटे झाले" हे ऐकताच कोतवाल म्हणाले, "बघा म्या तपासलं तवा म्हातारी जित्ती हुती" तस नाना खेकसला, "बर, बर पूर कर तुझं ग्यान आता" आता डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिले म्हणताच बायका ताज्या दमाने रडू लागल्या, देशमुख हाय खाऊन बसले, म्हातारीचा नवरा आबा म्हणाला, "रखमे मला सोडून अहेवपणी गेलीस ग तू" अस त्याने म्हणताच सारी मंडळी डोळ्यात आहे नाही तेवढं पाणी काढून रडू लागली.... असा सारा दोन, तीन तास गोंधळ चालला, परगावाहून कुणी यायचे बाकी नव्हते म्हणून अंत्यसंस्काराची तयारी चालू झाली, तिरडी तयार झाली अन देशमुख म्हातारीच्या अंगावर पडून रडू लागला, तसा त्याच्या मोठ्या बायकोला फणकारा आला, ती ओरडली "अव..! अस काय करताय लहान लेकरावांनी, व्हा बाजूला, सारी खोळंबलीत तुमच्या पायी" देशमुख बाजूला झाले, अन तिरडी उचलली गेली पुन्हा वाड्यात एकच कल्ला झाला, अन म्हातारी अहेवपणी वाड्याच्या बाहेर पडली.... गल्लीच्या दूतर्फा ही गर्दी झाली होती, सारे हात लावून लावून म्हातारीचा आशीर्वाद घेत होते, सार गाव स्मशानभूमीत पोहचले.... सारी तयारी झाली.... अन गुरुजी म्हणाले "चला, मुखाग्नी द्या" आता म्हातारीच्या नवऱ्याने आबाने मडकं धरलं व ते प्रदक्षिणा मारू लागले पण त्याला चार पावलं नीट चालता येईना, मडकं घरंगळू लागलं शेवटी एकाने त्याचा हात धरला व सोबत चालू लागला, पण म्हाताऱ्याला एका प्रदीक्षणेतच धाप लागली व ते तिथंच खाली बसले, आता काय करावे कोणाला काही सुचेना, बर नवरा असताना पोरानं अग्नी देऊ नये अस गुरुजी म्हणाले, मोठाच धर्मप्रसंग उभा राहिला, शेवटी पांडू पुढे आला व त्याने आबाला पाठीवर घेतले व तो फेऱ्या मारू लागला पण आबाच्या हातातील मडकं वेडंवाकडं होऊ लागले ते बघताच संत्या समोर आला त्याने मडकं हातात धरलं अन तो पांडूच्या माग चालू लागला, दोन फेऱ्या पूर्ण झाल्या अन गुरुजी म्हणाले, "आर लोकहो काय करताय तुमी, मडकं समोर धरून चालायला हवं" अस म्हणताच पुन्हा संत्या समोर अन पांडू त्याच्यामागे होऊन फेऱ्या मारू लागले, ते बघून अंदया नानाला म्हणाला, "बायको गेली एकाची, मडकं धरलं दुसऱ्याने अन फेऱ्या मारतया तिसरच" अस त्याने म्हणताच तिथल्या बसलेल्या मंडळीना हसू येऊ लागले, पण देशमुखाकडे बघून जो तो हसू दाबू लागला.... अस कसतरी होत एकदाच्या फेऱ्या पूर्ण झाल्या व मडकं फुटलं... म्हातारा होता नव्वद किलोचा त्याला पाठीवर घेऊन पांडूलाच धाप लागली... त्याने म्हाताऱ्याला खाली टेकवला व तो दम खाऊ लागला, इकडे म्हाताऱ्याने हातात लाकूड धरलं व चितेपाशी गेला पण त्याला नीट धरता येईना शेवटी नाना वैतागला व त्यानेच लाकूड धरले व चिता पेटवली, सारी मंडळी रातपासून बसून अवघडली होती, चिता पेटताच साऱ्यांना हायस झालं पण म्हातारीची कवटी काय लवकर फुटेना... हळूहळू एक एक माणूस मागच्यामागे निघून गेला, अन चितेपाशी पाच लेक, पांडू, आबा, संत्या अन गावातील काही मंडळी.... बऱ्याच वेळाने कवटी फुटली व आबा देशमुखाला म्हणाले "तुझी आय लय चिवट हाय बग, जाताना पण चिवटपणा करूनच गेली" म्हातारी गेली, तीच दिसकार्य झालं पण अजूनही म्हातारीच्या मरणाचा किस्सा पारावरती आठवला की हसण्याचा एकच कल्ला माजतो....

©®माधवी देवळाणकर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults