गणपती: एक चिंतनः मायबोली आयडी अश्विनी मावशी

Submitted by अश्विनीमामी on 4 September, 2022 - 09:28

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची,
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ता फळांची..

गणपतीच्या आगमनाची तयारी सुरु झाली की मनात एक प्रसन्नता संचारते. नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे असे हे गोजिरे दैवी रूप आपल्या घरी अवतरणार म्हणून उत्साह भरभरून ओसंडू लागतो. पण माझ्या मनात बाप्पाची जी प्रतिमा आहे ती अशी पेण ची बनवलेली मूर्तीच जिवंत झाल्यासारखी. पण एका जागी बसलेली नव्हे. एक मोठे जागृत काळ्या दगडाचे मंदीर आहे. मागे काही मंत्रघोष चालू आहे. सर्व देवतांच्यामूर्ती आहेत व पूजा पाठ चालू आहेत. उदबत्त्यांचा, ताज्या फुलांचा निरांजन समई कापूर शेंदूर अष्ट गंध ह्यांचा एकत्रित सुवास वातावरणात भरून आहे. मागे सनई - चौघडा लयीत चालू आहे व देवभक्तांची दर्शनाची लगबग चालू आहे. आणि ह्या गडबडीतच बाप्पा इकडून तिकडे जात आहेत कपाळावर थोडा घाम आलेला आहे. लाल शेला , पितांबर सोन्याचे दागिने सर्व यथास्थित आहेत. व हातात एक मोदकही आहे. त्या शेल्याच्या रेशमाचा कोरा वास, मोदकावरच्या तुपाचा पण वास येत आहे. कोणत्यातरी भक्ताचे बोलाव्णे आले म्हणून आधीचे काम आटोपून तिकडे जात आहेत. मी तिथेच मंदिरात बाजूला उभी आहे बाप्पा माझ्याकडे बघतात व हसतात, आशिर्वादाचा हात उंचावतात व ठीक होणार आहे सर्व. व पुढे निघून जातात.

कधी कधी लाल जास्वंदीच्या फुलात किंवा एखाद्या माणकाच्या खड्यातही बाप्पाचे रूप दिसते. राम- पंचायतन, शिव - पार्वती ह्यांचे एकाजागी बसलेली अशी प्रसन्न रुपे मानसपूजा करताना दिसतात परंतु बाप्पा मात्र कायम इथून तिथे प्रवासात. कारण आपण सर्व त्यांची सतत आठवण काढतच असतो. भक्तांच्या कल्याणा...

जिमखान्यावरील आमच्या भागवत बिल्डिंगच्या एका बाजूला पांचाळेश्वराचे देउळ , उजवी कडे मशीद व समोर श्रीकृष्णमंडळाचा गणपती. त्यामुळे लहानपणी खाली खेळताना आपसुक मंदिरात जाणे व्हायचेच. मंडळाचा गणपती उत्सव संपला की शेजारी नीट ठेवलेला असे त्याला ही शाळेत जाताना हात जोडलेच जायचे. लहानाचे मोठे होताना प्रत्येक परीक्षेला, कसोटीच्या क्षणी बाप्पा सोबत असेच. इतकी सतत व सलग आधाराची सोबत माणसांची पण फारशी लाभलेली नाही. त्यामुळे बाप्पावर अवलंबून असणे अजूनही आहेच. व तो ही आश्वासक मुद्रेने
घाबरलेल्या मनास "मी आहे." म्हणून समजूत घालत अस्तो.

शाळेत सातवीच्या वर्गात सरांनी सर्वांना अथर्वशी र्ष शिकवले होते. पूर्ण वर्ग एक मुखाने ते म्हणताना ऐकायला फार छान वाटायचे. बालगणेश मागच्या बाकावर आपल्या बरोबरच बसुन स्तोत्र ऐकत आहे असे वाटायचे. अबोध उमलत्या वयात अष्ट विनायक चित्रपट बघितला. त्यातले वसंत राव व त्यांना साथ देणारी मुलगी हे अगदी आपण व आपले बाबा आहेत असेच वाटायचे. खरं आई शप्पत. अजूनही प्रथम तुला वंदितो हे गाणे माझ्या प्रत्येक प्लेलिस्ट मध्ये असतेच अस्ते. गाण्यांमधून चित्रपटातून हे सुभग प्रतीक भेटतच राही. मनाला आश्वस्त करत राही.

हैद्राबादला गेल्यावर तिथे पेणच्या सुबक सुरेख मूर्ती अगदी अभावानेच दिसत व चुकल्या चुकल्यासारखे वाटे. तिथल्या मूर्ती पण वेगळ्याच जरा ओबडधोबड बनवलेल्या असत. देव सर्वत्र एकच. पण पुण्याच्या गणेशोत्सवाची, मुर्तींची आठवण येत राही. तुटलेपणा जाणवत राही.

नशीबाने परत महानगरी मुंबईत कर्मभूमी साकारायला पाठवले. तेव्हा इथे बाप्पाचे दर्शन होईल हा एक सुखद आशावाद मनात होता. पण अजुनही लालबागच्या राज्याच्या गर्दीत जाणे जमलेले नाही व सिद्धिविनायकाचे पण कळस दर्शनच झाले आहे. कधी तरी नक्की. तोपरेन्त मानसपूजा व ध्यान. टोकाची अनिश्चितता व अस्थिरतेचा , असुरक्षिततेचा सामना करणार्‍या ह्या महानगरीत बाप्पावर भिस्त ठेवुन लोकल मध्ये चढणारे, घराबाहेर पडणारे किती तरी लोक आहेत.

आता वानप्रस्था श्रमात पदार्पण केल्यावर एक सत्य समोर दिसत राहते की येतात जातात ते जीव. पण गजानना सारखी दैवी शक्ती कायम इथेच असते व जगाच्या कल्याणासाठी झटत असते. मोरया.

घरी बसल्या गणेशासाठी एक छो टेसे मंदीर बनवले आहे. मूळ संकल्पना पिंट्रेस्ट वर बघितली. पॉकेट श्राइन म्हणून सर्च करा. गणेशाची मूर्ती रुपेरी सोलुशन मध्ये घालून चकचक केली आहे.

PIC07.jpgPIC05.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहिलं आहे अमा. डोळ्यासमोर ते मंदिर आलं आणि प्रसन्न वाटलं.
स्क्रोल करताना पहिल्या फोटोत बाप्पा दिसले नाहीत तर म्हटलं शेजारी गेले असतील तर खाली आलेच लगेच! मस्त Happy

किती सुंदर लिहिलं आहे. लगबगीने ईथेतिथे फिरणारे बाप्पा इमॅजिन करुन मस्त वाटलं.
पॉकेट श्राइन छान आहे.

किती सुंदर लिहिलं आहे. लगबगीने ईथेतिथे फिरणारे बाप्पा इमॅजिन करुन मस्त वाटलं.
पॉकेट श्राइन छान आहे. >> +१