श्रीगणेशा

Submitted by मनोलय ... on 3 September, 2022 - 10:47

*श्रीगणेशा ...*

उत्सवाने दूर नेला श्रीगणेशा,
मानवाने दूर केला श्रीगणेशा ...

सूर गेला, छंद गेला, नृत्य गेले,
कर्ण कर्कश्शात बुडला श्रीगणेशा ...

मिरवणुक ती, पंथ माझा का हरवला ?
लाख खड्डे बघुन पुसतो श्रीगणेशा ...

खिळखिळी हाडे जिवाचे हाल कसले !
सहन धक्के करित बसला श्रीगणेशा ...

मानवाचे तत्त्व गेले, नीती गेली,
राजकारण बघत बसला श्रीगणेशा ...

धर्म गेला, पंथ गेला, 'जात' आली,
सोवळे नेसून नंगा श्रीगणेशा ...

झिंग तरुणाईस आली जी विदेशी,
मद्य प्याले बघत बसला श्रीगणेशा ....

कोपला 'पाऊस' देवा काय झाले ?
त्याच अतिरेकात बुडला श्रीगणेशा ...

त्या विचारी लोकमान्या आठवा हो,
मग कळे का दूर गेला ? श्रीगणेशा ....

सगुण भक्ती मर्म सांगे नीट ऐका,
'निर्गुणा'तुन हाक देतो श्रीगणेशा ...

- सचिन चंद्रात्रे.

Group content visibility: 
Use group defaults